भारत देशात महाराष्ट्र राज्यात पुणे नावाचे एक शहर आहे. तुम्ही पुण्यातच राहता...
पुणे हे सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
पुण्यात ससून नावाचे एक मोठे सरकारी रुग्णालय आहे. कोरोना काळात तिथं लोकांची गर्दी वाढली आहे. तुमच्याच घरातील एका नातेवाईकाला ताप व सर्दीचा थोडा थोडा त्रास होऊ लागलाय मग तुम्ही त्याची कोविडची टेस्ट करावी म्हणून नेटवर माहिती शोधता... तुम्हाला एक नंबर मिळतो तुम्ही त्यावर फॉर्म भरता रजिस्टर करता आणि निवांत होता पण तिथून कळवले जाते की बाहेरगावची लॅब असल्याने आम्ही पुण्यातल्या टेस्ट करत नाही. मग पुण्यातला एक नंबर मिळतो... तिथे फोन केल्यावर ते प्रिस्क्रिप्शन मागतात... शिक्क्या आणि डॉक्टरने घेतलेल्या लिखित जबाबदारी सोबत... असं लिखित देणं डॉक्टर शक्य नाही सांगतात.
मग तुम्ही नातेवाईकाला घेऊन ससून रुग्णालय गाठता. तिथे खचाखच गर्दी आहे, म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ही रुग्णालयाबाहेरच पाळायची एक गोष्ट आहे. इस्पितळ व कोविड ओब्सेर्वेशन युनिटशी सुरक्षित अंतराचा काहीही संबंध नाही... तेही पुण्याशी अंतर राखून आहे.
तिथे गेल्यावर दारात एक माणूस पडला आहे त्या श्वास घेता येत नाहीये हे दृष्टीस पडते. तो माणूस स्वतःच्या हाताने नाकाजवळ तडफडत वारा घालत आहे... हा प्रकार पाच मिनिटात संपतो... स्ट्रेचर येतं.. त्याला घेऊन जातं... कुठे? माहीत नाही.
आत अनेक टेबलं मांडलेली आहेत. प्रत्येक टेबलाला एक तोंड आहे.. पण त्या तोंडाची जीभ मजबूत आहे. आणि ती तुमच्याशी तलवारीगत बोलते... एका रांगेत टेस्ट केली जाते म्हणून तुम्ही त्या एका रांगेत उभे राहता... माणसाला माणूस चिकटून उभा आहे... वॉर्डच्या एका कोपऱ्यात कोरोना शांतपणे हे सगळं पाहत आहे...
रांगेत उभे राहिलेले तुम्ही पाहता की एक मुलगा रांगेत तुमच्या पुढे शिरू पाहत आहे.. त्याच्या चेहऱ्यावर तो करत असलेल्या लबाडीची पुर्ण छटा आहे.
तुम्ही त्याला विचारता,
"तुम्ही रांगेत आहात का"
तो "हो" म्हणतो..
तुम्ही काही म्हणायच्या आतच त्याच्या पुढचा माणूस त्याच्यावर गुरकावतो..
"तुम्ही हिथं न्हाय मागं जा..!!"
त्या मुलाचा चेहरा पडतो तो मागे निघून जातो...
काही वेळाने तुम्ही उगाचच मागे पहाता...
तर पन्नाशीच्या एका बाईची व्हीलचेयरवर उलघाल चालली आहे. तो मुलगा तिला हाताने वारा घालतोय. ती मध्येच उठतेय... तिला श्वास घ्यायला त्रास होतोय.. तिला तो खुर्चीत बसवतो.. तो रांग किती मोठीय हे मान वर करून पाहतो तुमची त्याची नजरानजर होते. तुम्ही तोंड फिरवता... पण पापण्या जडावतात...
एक माणूस एका टेबलावरून दुसऱ्या टेबलाकडे जातोय. त्याच्या नातेवाईकाचा कोविड टेस्टचा रिपोर्ट गहाळ झालाय असं सांगण्यात आलंय... त्याला कळत नाहीये आता पुन्हा रांगेत उभा राहू? की आधी पेशंटला घेऊन येऊ... त्याचा चेहरा बधिर झाला आहे...
बारामतीहून आलेला एक माणूस एका डॉक्टरांशी बोलत आहे. मध्येच आरडा ओरडा सुरू होतो. समोरचा माणूस हात जोडतोय...
"सर ओरडू नका मी तुम्हाला काही म्हणत नाहीये..."
तरीही आरडा ओरडा सुरुय
समोरचा माणूस हात जोडतोय
सांगतोय,
"सर असं ओरडू नका लोकांना वाटेल मी तुमच्याशी भांडतोय..
मी फक्त बोलतोय शांतपणे..!!"
आरडा ओरडा आपोआप शांत होतो... की तुम्ही कान वळवून घेता? तुम्हाला कळत नाही कदाचित मेंदू बधिरतेकडे जात असावा...
तुमचा नंबर येतो.. तुम्हाला एक चिठ्ठी दिली जाते व सांगितलं जातं की त्या तिथे पलीकडे टेस्ट होईल.. तोवर इथं थांबा..
"इथं म्हणजे कुठं?"
"इथं समोर व्हरांड्यात..!!"
"अहो पण त्याला ताप आहे..!"
"मग? आम्हाला काय सांगता? इथं सगळ्यांनाच ताप आहे..!!"
तुम्हाला काहीच कळत नाही..
पण आता लघवीला जायची वेळ झालीय हे तुम्हाला कळतं. तुम्ही तिथल्या शिपायाला विचारता,
"बाथरूम कुठे आहे?"
तो तंबाखू चोळत विचारतो,
"तुमचा पेशंट ऍडमिट हाय का हिथं..?"
"नाही"
"मग तुम्हाला हिथं बाथरूमला जाता येणार नाही.. रस्त्यावर मुता..!!"
"अहो.. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय?"
"हो, मला साहेबाने जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय.."
तो निघून जातो..
त्याचंही डोकं बधिर झालं असं मानून तुम्ही सोडून देता..
व्हिलचेयरवरची पन्नाशीची बाई आता खाली बसत नाहीये... ती सरळ आत गेलीय... एकाएका खाटेवर दोन दोन पेशंट आहे दोन खाटांत तीन फुटांहुन कमी अंतर आहे...
ती त्यातल्या एकाला खाली ओढते...
आणि स्वतः झोपायचा प्रयत्न करते...
पण ...
तिला परत व्हिलचेयर वर बसवलं जातं... तिच्या डोळ्यात खाटेवर झोपलेल्यांच्याप्रती असूया दिसते...
खाटेवर आडवे झालेले डोळे निमूट पंखे पाहताहेत...
तिथंच बाजूला हिरव्या कापडात एक बाई आहे... तिच्या हातात हिरव्या बांगड्या आहेत... आजूबाजूला कुणीच नाही.. तिनं साडी नेसली आहे... तुम्ही निरखून पाहता... तिची छाती... तिची छाती हलत नाहीये... ती हरलीय... तिची बॉडी झालीय... मृत्यूत आणि तुमच्यात दोन फुटांतून कमी अंतर आहे...
इतक्यात एकाला फिट आलीय त्याचे हातपाय वाकडे झाले... डॉक्टरांना बोलावलं... ते सगळे आत गेले...
रिपोर्ट गहाळ झालेल्या माणसाचा चेहराही गहाळ झालाय...
माणसांचे चेहरे बधिर दिसताहेत... सुन्न झालेत... चेहऱ्यांमध्ये दोन भाग झालेत... टेबलांचे चेहरे... व त्या समोरचे चेहरे...
ती चिठ्ठी घेऊन तुम्ही टेस्ट करायला जाता...
"पाच वाजले वेळ संपली.. परवा या..!!"
"उद्या??"
"उद्या सुट्टी...!!"
तुमचा मेंदू बधिरतेची सीमा ओलांडू लागतो..
"...मग मी ह्या पेशंटला कुठं ठेऊ?"
"इथंच ठेवा, तुम्ही त्याला घरी नाही नेऊ शकत... पण आमच्याकडे बेड्स उपलब्ध नाहीत... आणि पुण्यात कुठंच बेड उपलब्ध नाहीत..!"
वाक्यांचा काहीही ताळमेळ तुम्हाला लागत नाही...
बराच वेळ तुम्ही नुसते बसून राहता...
शेवटी तुम्ही ओळखी ओळखीत एक वशिला लावून हॉस्पिटल शोधता... तिथं नातेवाईकाचा ईसीजी काढला जातो...
पेशंट सुद्धा दिवसभराच्या दगदगीने दमल्यामुळे जरा आराम करतो...
तुम्हाला कडाडून भूक लागलेली असते... रात्रीचे बारा वाजत आलेले असतात...
बाहेर एक भुर्जीपावची गाडी बंद व्हायच्या मार्गावर तुम्हाला दिसते.. तुम्ही तिथं जाऊन चार पाव आणि प्लेटभर भुर्जी पोटाच्या पोकळीत घालता...
तुमच्या जिवंत पेशंटला घेऊन तुम्ही घरी येता...
उद्या काय करायचंय तुम्हाला माहीत नाही...
तुम्हाला झोप लागते आणि स्वप्नात हिरव्या बांगड्या दिसू लागतात..!
ही घटना वास्तविक आहे, याचा कोणत्याही काल्पनिकतेशी संबंध नाही. आणि जर संबंध आढळून आलाच, तर तो निव्वळ योगायोग समजु नये.
- स्वाती पाटील, मुंबई
swatipatil.cacr@gmail.com
(लेखिका, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून 'मासिक पाळी व्यवस्थापन' या विषयाच्या तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या लेखनही करतात.)
Tags: स्वाती पाटील कोरोना पुणे रुग्णालये सरकारी रुग्णालये रुग्ण आरोग्य व्यवस्था Experience Swati Patil Pune Sassoon Hospital Load More Tags
Add Comment