कमला (श्यामला) हॅरिस यांचे मूळ आणि कुळ 

श्यामला गोपालन आणि डोनाल्ड हॅरिस यांच्या कन्येची वाटचाल...

अमेरिकेच्या (माजी) उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या जीवनकहाणीमध्ये सर्व प्रकाशझोत त्यांच्या आई श्यामला गोपालन यांच्याकडे वळणं क्रमप्राप्त आहे. खुद्द कमला यांनाही ते रास्तच वाटेल. २०१९ साली प्रकाशित झालेल्या ‘द ट्रुथ्स वुई होल्ड’ या आत्मकथनात कमला हॅरिस म्हणतात, “मॉमी, माझ्या पुस्तकातली स्टार तूच आहेत, कारण तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय. ’मी श्यामला गोपालन हॅरिसची मुलगी आहे’, असं म्हणता येणं ही माझ्यासाठी या जगाच्या पाठीवरची सर्वांत मोठी उपाधी किंवा सर्वांत मोठा सन्मान आहे.”

श्यामला स्तनांच्या कर्करोगाविषयी संशोधनकार्य करत होत्या. २००९ साली वयाच्या सत्तराव्या वर्षी आतड्याच्या कर्करोगने त्यांचं निधन झालं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षातर्फे आपल्या मुलीची उमेदवारी जाहीर झाल्याचं पाहायला त्या या जगात नव्हत्या. परंतु, त्यांचं अस्तित्व कमला यांच्या प्रवासात कायमच ठळकपणे जाणवत राहील.

“मी कायम तिच्याबद्दल विचार करत असते, आणि काही वेळा वर पाहून तिच्याशी बोलतेही,” असं कमला यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं होतं.

कमला यांच्या आईची उंची कशीबशी पाच फुटांच्या वर जाणारी होती, एकंदर देहयष्टी किरकोळ होती, पण त्यांच्यात बुद्धिमत्तेचं प्रखर तेज होतं आणि इच्छाशक्ती प्रचंड होती.

श्यामला वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सांस्कृतिक चाकोरीच्या बाहेर पडल्या. स्वतःच्या जिवावर जगाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचल्या. तिथे स्वतःचं वैज्ञानिक संशोधनाचं महत्त्वाचं काम तर केलंच, पण ते करता करत त्यांनी आपल्या दोन मुलींना घडवलं. मुलींची नाळ आपल्या स्वतःच्या आणि परदेशातल्या अपरिचित असलेल्या अशा दोन्ही संस्कृतींशी जोडून ठेवली. स्वतः पुढे जात असताना आपण इतरांना मागे सोडायचं नसतं याची शिकवण दिली.

कमला हॅरिस यांनी त्यांच्या आत्मकथनात लिहिलेल्या आठवणी आणि या परिवाराची मित्रमंडळी, सहकारी व जवळचे नातेवाईक यांच्या मुलाखती यांतून हे स्पष्ट होतं की, मुलाखती यांतून हे स्पष्ट होतं की, कमला यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार येण्यात त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे. आईनेच त्यांना सामाजिक न्यायाची दृष्टी, स्वतंत्र बाणा आणि जगातील आपले स्थान ओळखण्याचे भान दिले. कमला त्यांच्या आईला कायम ‘मॉमी’ असं संबोधत असत.

कॅलिफोर्नियाच्या अ‍ॅटर्नी जनरल पदासाठीच्या स्पर्धेत कमला यांचा नुकताच बोलबाला होत होता, तेव्हाची एक आठवण त्यांच्या आत्मकथनात आली आहे. त्या वेळी श्यामला कर्करोगाने आजारी होत्या, पण आपल्या मुलीची कामगिरी कशी होतेय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. 'मी आईला सांगितलं, “मॉमी, हे लोक म्हणतायत की, ते मला धूळ चारणार आहेत.” आई एका कुशीवर आडवी पडलेली होती. तिने वळून माझ्याकडे पाहिलं आणि फक्त मोठ्ठं स्मितहास्य केलं. तिने मला खंबीर घडवलं आहे, आणि तिच्यातला लढाऊ बाणा माझ्यातही अगदी ठासून भरलेला आहे हे तिला पक्कंच ठाऊक होतं.' असं कमला यांनी लिहून ठेवलं आहे.

काळाच्या पुढे पाहणारी आई

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळपास एक दशक आधी, १९३८ साली श्यामला यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सनदी अधिकारी होते, तर आई गृहिणी होती. या कुटुंबातील चार अपत्यांपैकी श्यामला सर्वांत थोरल्या.

“आमचे वडील पी. व्ही. गोपालन हे दक्षिण भारत सोडून मुंबई, कलकत्ता व दिल्ली या शहरांमध्ये नोकरीसाठी स्थायिक झालेले आमच्या कुटुंबातले पहिलेच.” असं श्यामला यांचे धाकटे भाऊ गोपालन बालचंद्रन यांनी ‘यूएसए टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्र्याऐंशी वर्षीय बालचंद्रन सांगतात, “आम्ही जोवर काही उघडउघड वाईट कृत्य करत नसू, तोवर आमचे आईवडील आमच्याशी तुलनेने नरमाईनेच वागत.” “श्यामला तडफदार आणि खोडकर होती. आम्ही दोघे शाळा चुकवून काहीतरी धडपडी करायला जायचो आणि त्यातूनच कधीकधी अडचणीतही यायचो.” अशी आठवण बालचंद्रन सांगतात. 

पण श्यामला यांची एक धडपड मात्र त्यांच्या आयुष्याचा मार्ग आणि अमेरिकेच्या इतिहासाची दिशा बदलणारी ठरली. दिल्ली विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर वयाच्या एकोणिसाव्या वर्षी श्यामला यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं की, त्यांना न्यूट्रिशन (पोषण) व एन्डोक्रीनॉलॉजी (शरीरातील अंतःस्रावांचे शास्त्र) या विषयात पीएच.डी. करायची आहे, त्यासाठी बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्यांना प्रवेशही मिळाला आहे. त्या वेळी भारतात, विशेषतः श्यामला यांच्या रूढीवादी तामिळ ब्राह्मण समुदायामध्ये, एकोणीस वर्षं हे मुलीचं ‘लग्नाचं वय’ मानलं जात असे. विशेषतः कॉलेजातून पदवी घेऊन आलेल्या मुलीचं लग्न तर तातडीने होत असे. बालचंद्रन म्हणतात, “नवऱ्याहून जास्त शिकलेली मुलगी लोकांना नको असे, म्हणून मुलींना जास्त शिकवत नसत. पण आमच्या पुरोगामी वृत्तीच्या वडिलांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांनी श्यामलाला उत्तेजन दिलं. त्यांच्याकडे फार पैसा नव्हता, त्यामुळे त्यांनी तिला सांगितलं की तुला एक वर्ष पुरेल एवढी पैशाची सोय मी करू शकतो, पण पुढे तुझे तुला पैसे कमवावे लागतील. श्यामलाने ते स्वीकारलं.”

श्यामला आणि त्यांच्या मुली

छोट्या चणीच्या श्यामला १९५८ साली अमेरिकेच्या भूमीवर येऊन पोचल्या तेव्हा तिथे त्यांची कोणाशीही ओळख नव्हती. त्या काळात युरोपीय मूळ असणाऱ्या लोकांना अमेरिकेत वास्तव्यासाठी प्राधान्य देणारी राखीव जागांची व्यवस्था प्रचलित होती. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय लोकांची संख्या अगदी मर्यादित होती. पुढे 1965 मध्ये इमिग्रेशन अँड नॅचरलायझेशन हा स्थलांतरविषयक कायदा आला, त्याने हे निर्बंध शिथिल झाले, पण त्यापूर्वी भारतीयांना अमेरिकेत सहज प्रवेश नव्हता. मायग्रेशन पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार, १९६० साली संपूर्ण अमेरिकेत केवळ बारा हजार भारतीय स्थलांतरित राहत होते. त्यांत श्यामला एक होत्या, हे विशेष म्हणावे लागेल.

श्यामला अमेरिकेत आल्यावर जवळपास लगेचच काळ्या समुदायाकडे ओढल्या गेल्या आणि नागरी अधिकारांच्या चळवळीचं उद्दिष्ट त्यांनाही आपलंसं वाटलं. या चळवळीच्या १९६२ साली झालेल्या एका सभेमध्येच त्यांची डोनाल्ड हॅरिस यांच्याशी भेट झाली. मूळचे जमैकाचे असणारे डोनाल्ड त्या वेळी अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवण्यासाठी अभ्यास करत होते.

एका वर्षाने डोनाल्ड व श्यामला यांनी लग्न केलं. आपली मुलगी भारतात परतून नियोजित पद्धतीने आपल्याच समुदायातील एखाद्या मुलाशी लग्न करेल, अशी श्यामला यांच्या पालकांची अपेक्षा होती. श्यामला यांनी मात्र परंपरेला न जुमानता स्वतःच्या निवडीनुसार लग्न केलं, इतकंच नव्हे तर स्वतःच्या वंशाचा व राष्ट्रीयत्वाचा नसणारा माणूस नवरा म्हणून निवडला.

कमला यांनी आपल्या आईचा हा निर्णय म्हणजे ‘आत्मनिग्रहाचं व प्रेमाचं’ कृत्य असल्याचं म्हटलं आहे.

श्यामला यांना वयाच्या पंचविसाव्या वर्षी, १९६४ साली डॉक्टरेटची पदवी मिळाली, तेव्हाच त्यांनी कमला यांना जन्म दिला. दोन वर्षांनी त्यांना माया ही दुसरी मुलगी झाली. माया आता नागरी अधिकारविषयक कार्यकर्त्या आहेत.

श्यामला व डोनाल्ड यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यांनी १९७१ साली घटस्फोट घेतला.

श्यामला यांनी बर्कले फ्लॅट्स या परिसरातील सांस्कृतिकदृष्ट्या संमिश्र स्वरूपाच्या कष्टकरी वर्गाच्या लोकवस्तीत आपल्या मुलींना वाढवलं. ‘श्यामला आणि तिच्या मुली’ म्हणून त्या तिघींची या भागात ओळख होती. कमला आणि त्यांची बहीण माया लहानपणापासून त्यांच्या भारतीय मुळांशी घट्ट जोडलेल्या होत्या (त्यांच्या नावांपासूनच याची सुरुवात झाली), परंतु “आपण अमेरिकेत दोन काळ्या मुलींना वाढवतो आहोत याची स्पष्ट जाणीव आईला होती”, असं कमला लिहितात. “आपण राहण्यासाठी निवडलेला देश मायाकडे आणि माझ्याकडे काळ्या मुली म्हणून पाहील, हे आईला माहीत होतं. आम्ही आत्मविश्वासपूर्ण, व स्वाभिमानी काळ्या स्त्रिया म्हणून मोठं व्हायला हवं, असा निश्चय तिने केला होता.”

श्यामला यांनी त्यांच्या मुलींना काळ्या लोकांच्या स्थानिक चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेसाठी पाठवलं आणि रेजिना शेल्टन ही काळी बाई चालवत असलेल्या नर्सरी स्कूलच्या वरच ते राहत असत.

रेजिना शेल्टन व श्यामला यांच्यात घट्ट नातं निर्माण झालं. कमला यांनी रेजिनांचा उल्लेख ‘दुसरी आई’ असा केला आहे. श्यामला कामासाठी प्रयोगशाळेत गेलेल्या असत तेव्हा मुलींचा वेळ रेजिना यांच्यासोबतच जात असे.

याच वस्तीत राहणारी, कॅरोल पोर्टर ही कमला यांची बालपणीची वर्गमैत्रीण होती. “कमलाची आई तिला शाळेत सोडायला यायची तेव्हा मी तिला बरेचदा पाहिलं होतं. तिचे भारतीय आजी-आजोबा अमेरिकेत त्यांना भेटायला अधून मधून येत असत. कमला तेव्हा मला आजीआजोबांशी बोलण्यासाठी घरी बोलवत असे. साडी नेसलेली तिची आजी अजूनही मला स्पष्ट  आठवते. कमलाची मुळं तिच्या आईच्या संस्कृतीमध्ये घट्ट रुजलेली आहेत”, असं पोर्टर यांनी ‘यूएसए टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आपल्या मुलींच्या आयुष्यात श्यामला यांचं अस्तित्व ‘सक्षम माते’चं होतं, असं पोर्टर म्हणाल्या.

कमला सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट अ‍ॅटर्नी पदासाठी निवडणूक लढवत होत्या तेव्हा, त्यांची आई इस्त्री करण्याचं टेबल डेस्क म्हणून सोबत घेऊन फिरायची आणि पत्रकांच्या प्रती तयार करण्यातही सहभागी व्हायची, असं पोर्टर सांगतात.

प्रखर बुद्धिमत्ता

कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैद्यकशाखेचे मानद प्राध्यापक डॉ. रॉबर्ट कार्डिफ यांनी १९६०च्या दशकात श्यामला यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याचं लक्षणीय व्यक्तिमत्व त्यांनाही जाणवलं.

“साडी नेसलेली, लहान चणीची ही स्त्री ‘उंदराच्या स्तनाचा जीवशास्त्रीय अभ्यास करणाऱ्या प्रसिद्ध लोकां’च्या परिषदेत अधिकारवाणीने बोलत होती”, कार्डिफ म्हणाले. “ती पुढाकार घेऊन सर्वांशी बोलत होती, संवाद साधत होती. तिचं वेगळं ठळक अस्तित्व जाणवत होतं,” असं ते ‘यूएसए टुडे’शी बोलताना म्हणाले.

उंदरांमधील प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर जनुकाचं विलगीकरण व वैशिष्ट्यं या संदर्भात श्यामला यांनी केलेलं काम स्तनातील पेशींच्या हार्मोन्सना प्रतिसाद देण्याच्या क्षमतेवरील संशोधनाला नवीन दिशा देणारं ठरलं. काही दशकांनी त्यांनी कार्डिफ यांच्यासोबत वैज्ञानिक संशोधन-निबंधांचं सहलेखन केलं.

“ती अत्यंत बुद्धिमान स्त्री होती, आणि कोणत्याही विज्ञानविषयक चर्चेत ती माझ्यावर मात करत असे, कारण संशोधकीय साहित्य माझ्यापेक्षा तिला जास्त माहीत होतं. तिची विनोदबुद्धीही विलक्षण होती. खूप पाल्हाळिकही बोलायची. यावर आम्ही एक विनोदही करायचो - जे सांगायला एक हजार शब्द लागतील असं काहीतरी एकाच छायाचित्रातून सांगितलेलं बरं, असं मला वाटायचं, पण ‘एका छायाचित्रापेक्षा एक हजार शब्द कधीही जास्त चांगले’ असं श्यामलाचं ठाम मत होतं.” असं अठ्ठ्याऐंशी वर्षीय कार्डिफ सांगतात.

‘मॉमी’कडून मिळालेले धडे

कमला हॅरिस यांच्या आयुष्यातील लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या सर्वच गोष्टींत श्यामला यांचे अस्तित्व जाणवते.

हॅरिस भगिनींचा एखादा दिवस वाईट गेला किंवा वातावरण उदासवाणं असेल तर त्यांची आई त्यांना ‘अनबर्थडे’ गिफ्ट आणून देत असे आणि ‘अनबर्थडे’केकही आणला जात असे. लुईस कॅरॉलच्या ‘थ्रू द लुकिंग ग्लास’ या पुस्तकातून त्यांना ही कल्पना स्फुरली होती म्हणे.

आपल्या आईकडून आपल्याला अनेक धडे मिळाल्याचं कमला यांनी लिहिलं आहे.

कोणतंही काम अर्धवट सोडू नये.

अनेक गोष्टी करणारे आपण पहिलेच असू शकतो, पण आपण शेवटचे नसू एवढी खातरजमा करावी - निराळ्या शब्दांत सांगायचे तर, आपल्याला येतं ते दुसऱ्याला शिकवावं, दुसऱ्याला मार्गदर्शन करावं.

कोणत्याही परिस्थितीने वैतागून चिडचिड करू नये.

‘श्यामलाच्या मुली’ कोणत्याही अन्यायाविषयी तक्रार करत असतील, तर त्यावर त्यांच्या आईचं प्रत्युत्तर लगेचच यायचं: “तुम्ही याबद्दल काय करणार आहात?” किंवा “तुम्ही काहीतरी करा त्यावर!” (डू समथिंग). कमला यांच्या भाषणांमध्येही “डू समथिंग” हा शब्दप्रयोग वारंवार होताना दिसतो. अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना याच शब्दप्रयोगाला घोषणेचं रूप दिलं

श्यामला यांच्या ‘भिन्न उच्चारां’वरून त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत काही विपरीत मत बनवणाऱ्या लोकांविषयी कमला यांनी लिहिलं आहे व त्यावर त्या बोलल्याही आहेत.

या संदर्भात आईने दिलेला धडा असा: आपण कोण आहोत हे दुसऱ्याने आपल्याला सांगायची गरज नसते. आपण कोण आहोत हे आपणच त्यांना सांगावं.

आईने मागे ठेवलेला वारसा

या वर्षारंभी मिनी तिमाराजू या प्रजनन अधिकारविषयक कार्यकर्तीला इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट या संघटनेकडून ‘डॉ. श्यामला गोपालन हॅरिस अवॉर्ड फॉर अ‍ॅलीशिप अँड सिव्हिल राइट्स’ हा पुरस्कार देण्यात आला. कमला यांनी पुरस्कारासोबत तिमाराजू यांना दिलेल्या पत्रात लिहिलं होतं, “माझ्या आईला तू आणि तुझं काम आवडलं असतं.”

मिनी तिमाराजू या भारतीय-अमेरिकी असून त्यांचे पती गोरे आहेत. त्यांनी दोन काळ्या मुलांना दत्तक घेतले आहे. तिमाराजू यांनी हिलरी क्लिंटन यांच्या २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षीय प्रचारमोहिमेमध्ये माया हॅरिस यांच्यासोबत जवळून काम केलं होतं. हॅरिस भगिनींच्या आईचा त्या दोघींवरही मोठा प्रभाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या “श्यामला १९६५ चा स्थलांतरविषयक कायदा होण्याआधी, अगदी किशोरवयात इथे आल्या. यातूनच त्यांच्यातलं बंडखोरीचं आणि चळवळीचं धाडस दिसतं. त्यांनी स्वतःच्या मुलींना ज्या तऱ्हेने वाढवलं ते थक्क करणारं आहे. श्यामला स्वतः काळ्या नव्हत्या तरीही त्यांनी या दोन स्त्रियांना निःसंकोचपणे काळेपणासह जगायला शिकवलं आणि त्याच वेळी आपल्या वंशसांस्कृतिक उगमाविषयी अभिमान बाळगायलाही शिकवलं. सामाजिक हित व सामाजिक कल्याण यांविषयी कमला आणि माया आज ज्या तऱ्हेने विचार आणि धडपड करतात त्यात त्यांच्या आईचा प्रभाव दिसतो.” 

‘इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट’चे सहसंस्थापक दीपक राज म्हणाले की, श्यामला गोपालन यांनी नागरी अधिकार चळवळीचं अग्रगण्य नेतृत्व केलं आणि मिश्रवर्णीय विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून मार्गदर्शन केलं, त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय संघटनेने घेतला. “स्थलांतराचा अनुभ केवळ व्यक्तिगत उपलब्धीपुरता मर्यादित नसतो तर, लोकसेवेशीही त्याचा संबंध असतो. आपण समुदायाला काहीतरी परत द्यायला हवं, आणि भविष्यातील पिढ्यांसाठी मार्ग घडवायला हवा, याची आठवण श्यामला यांच्या वारशातून होते,” असं ते म्हणाले.

घरी परतण्याची ओढ

मृत्यू जवळ आहे याची जाणीव झाल्यावर श्यामला यांना शेवटचं एकदाच भारतात जाऊन यायचं होतं. पण त्यांची ही सर्वांत मोठी इच्छा अपूर्ण राहिली. श्यामला यांना हा प्रवास करणं शक्य नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांचे भाऊ बालचंद्रन आपल्या बहिणीला शेवटचं भेटण्यासाठी दिल्लीहून विमानाने अमेरिकेत आले. कमला त्यांच्या मामाला प्रेमाने ‘अंकल बाळू’ असं संबोधतात. “आई अंकल बाळू येण्याची आणि त्याचा निरोप घेण्याची वाट बघत होती, हे आता लक्षात येतं. त्यांची भेट झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सकाळी आईने प्राण सोडला,” असं कमला लिहितात.

आईच्या निधनानंतर कमला चेन्नईला जाऊन आल्या. आधीही आजीआजोबांना भेटायला दर वर्षी त्या आईसोबत चेन्नईला येत असत. कमला लहानपणी भारतात येत, तेव्हा बेझन्ट नगरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या आजोबांसोबत व आजोबांच्या मित्रांसोबत एलिअट्स बीचवर चालायला जायच्या. आईचं निधन झाल्यावर कमला पुन्हा त्या समुद्रकिनाऱ्यापाशी आल्या.

“कमलाने श्यामलाच्या अस्थि सोबत आणल्या होत्या. आम्ही एलिअट्स बीचवर जाऊन बंगालच्या उपसागरात श्यामलाच्या अस्थि विसर्जित केल्या,” असं बालचंद्रन ‘यूएसए टुडे’शी बोलताना म्हणाले.

आईच्या निधनानंतरचा एक भावूक प्रसंग कमला यांनी त्यांच्या आत्मकथनात नोंदवला आहे. “आई ख्रिसमसच्या वेळी पारंपरिक पद्धतीने चिली रेलेनॉस नावाचा पदार्थ करायची. ती गेल्यानंतर एकदा या पदार्थाची तिची रेसिपी शोधण्यासाठी मी खूप खटपट केली. तेव्हा मला एक वही सापडली आणि ती उघडल्यावर त्यातून या रेसिपीची पानं खाली जमिनीवर पडली. जणू काही मला काय हवंय हे लक्षात ठेवून आई माझ्या मदतीसाठी तिथे आलीच होती”.

वारसा पुढे चालवताना

आईसोबत किचनमध्ये बसून तिला स्वयंपाक करताना बघणं, पदार्थांचे गंध अनुभवणं आणि खाणं, याची सुखद आठवण कमला नोंदवतात. त्यांच्या आईकडे चिनी धाटणीचा एक प्रचंड मोठा सुरा होता. या सुऱ्याने त्या वेगवेगळ्या भाज्या इत्यादी कापत असत. जवळच्या कपाटात वेगवेगळे मसाले भरून ठेवलेले असत.

आपण कधी अमेरिकेत गेलो तर दक्षिण भारतीय पदार्थ तयार करण्याचं आईचं कसब आता आपल्या भाचीने आत्मसात केलंय, असं बालचंद्रन सांगतात.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा निवडणुकीसाठी उभं राहण्याची इच्छा मागे घेतली, आणि त्याऐवजी कमला यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला, त्याच्या आदल्याच रात्री बालचंद्रन कमला यांना भेटायला आले होते. “तिला दुसऱ्या दिवशी काय होणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. नाहीतर ती आदल्या रात्री आमच्या सोबत बसून निवांत जेवण्यात वेळ घालवत थांबली नसती,” असं ते म्हणाले.

त्यानंतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून आपली भाची नामांकन स्वीकारत असताना बालचंद्रन व त्यांच्या दोन धाकट्या बहिणी समोर पहिल्या रांगेत बसून तो प्रसंग डोळ्यांत साठवत होते.

लेखन: स्वप्ना वेणुगोपाल रामस्वामी
भाषांतर- प्रभाकर पानवलकर


‘यूएस टुडे’वर २२ ऑगस्ट २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या इंग्लिश लेखाचं हे मराठी भाषांतर आहे.

मराठी वाचनाच्या सोयीसाठी काही किरकोळ संपादन केलं आहे.

 

Tags: us elections 2024 shyamala gopalan maya harris Load More Tags

Comments:

Anup Priolkar

Thanks for very Lovely and informative article.

Add Comment