वयाची ऐंशी पार केलेला तो कॅलिफोर्नियातल्या सँटा मोनिकातलं त्याचं बालपण कसं होतं ते सांगतोय. सन १९३३ च्या भयंकर जागतिक महामंदीचं सावट काहीसं फिकट व्हायला लागलेलं. कमालीच्या काटकसरीच्या जगण्यात करमणुकीची चैन परवडणं अशक्यच. सर्वसाधारण कष्टकरी मधयंवर्गीय कुटुंब. कुठतरी फुटकळ रेडियो. अजून टीव्ही आलाच नव्हता. पै पै जमवून कधीतरी जवळच्या थेटरात जाऊन सिनेमा बघायचा. थिएटर म्हणजे काय तर एक मोठी खुर्च्या मांडलेली खोली, माणसं कुजबुजत दाटीवाटीनं बसलेली. खोलीत अचानक अंधार होतो आणि समोरच्या पडद्यावर काहीतरी नवीन, भारी, कल्पनेच्या पलीकडचं दिसायला लागतं. सगळेजण भान हरपून ती दृश्य डोळ्यात साठवत एका वेगळ्याच जगात पोचतात.
हा फक्त टाइमपास नसतो तर रोजच्या खडतर आयुष्यातून घटकाभर सुटका झाल्याचा आनंद असतो. सिनेमाचे ते दोन तास 'जादुई' असतात. त्या बिकट दिवसांत त्याच्या बालमनावर झालेलं सिनेमाचं गारुड आजन्म कायम राहिलं आणि सिनेविश्वाला एक हँडसम अभिनेता आणि एक टॅलेंटेड दिग्दर्शक मिळाला. रॉबर्ट रेडफर्ड. तो १६ सप्टेंबरला निवर्तल्याची बातमी ऐकली नि कितीतरी आठवणी जाग्या झाल्या.
मलाही इंग्रजी सिनेमा शाळकरी वयातच गवसला. मग टीव्हीवर रोज एक नवीन कथा, नवीन वळणं, नवीन शेवट आणि पुन्हा नवीन सुरुवात. हॉलीवुडचा सिनेमा आणि ब्रिटिश सिनेमा यातला फरक फक्त भौगोलीक किंवा भाषिक नाही हे समजायला लागलं. मायकल डग्लस, पियर्स ब्रोस्नन, मायकल केन, केविन कॉसनर, कर्ट रसेल, अँथनी हॉपकिन्स, ह्यु ग्रांट, अॅल पचीनो, रॉबर्ट दे नीरो मनावर ठसायला लागले. आणि एक दिवस ध्यानीमनी नसताना रॉबर्टची भेट झाली.
पहिली भेट
सिनेमाची सुरुवातीची १५/२० मिनिटं डेमी मूरला बघण्यात गेली. कथेत काही विशेष घडत नव्हतं. आणि अचानक कॅसिनोच्या एका सीनमधे एलिगंट सूटमधला पन्नाशीतला एक अभिनेता दिसला. वयस्कर पण तजेलदार चेहरा, पाणीदार निळे डोळे, स्वच्छ इंग्रजी अॅक्सेंट, स्क्रीनवर सहज वावर आणि सुंदर अभिनय. पहिल्याच नजरेत कुणीही प्रेमात पडावं असा सगळा ऐवज होता त्याच्याकडं. मीही जरा सरसावून बसले. संथावलेल्या कथेला अचानक कलाटणी मिळते आणि सिनेमाच्या नावाचा अर्थ उमगतो.
इतका देखणा रॉबर्ट खलनायक? असं वाटतं. पण पुढं त्याच्या भूमिकेचे वेगवेगळे कंगोरे समोर येतात. रॉबर्टनं ज्या सहजतेनं तो रईस, कावेबाज पण शेवटी हरलेला जॉन पडद्यावर साकार केलाय ते बघून त्याला मनोमन सलाम ठोकला. रॉबर्टची ती पहिली भेट. सिनेमा 'इनडीसेंट प्रपोजल'.
त्याचं नाव घेताच डोळ्यांसमोर येतो उंच अंगकाठी, चमकदार निळेशार डोळे, धारदार नाक, ओठांवर नेहमी एक हलकं स्माइल; पुरुषी बॅरीटोन नसलेला पण दमदार आवाज; दाट सोनेरी केसांइतकाच सुरकुत्यानी भरलेला पण फ्रेश गोरागोमटा चेहरा; क्वचित सोनेरी फ्रेमचा चश्मा किंवा स्टायलिश एविएटर सनग्लासेस; साधा पांढरा शर्ट आणि डेनिम जीन्समधला बॉब. यावरूनच त्याला 'हॉलीवुडचा गोल्डन बॉय' हे बिरुद मिळालं. 'हॉलीवुडमधले सगळेच देखणे चेहरे दुर्लक्षणीय नाहीत' अशा आडवळणानं आणि आढ्द्यतेनं का होईना बीबीसीनंही त्याची मातब्बरी मान्य केली.
तो मुरांब्यासारखा म्हातारा होत गेला. क्वचित गंभीर, विचारात हरवलेला पण एरवी ऐकायला नि बोलायला उत्सुक. त्याच्या वागण्यात, बोलण्यात कधी उसना आविर्भाव, गोंधळ किंवा चाचपड जाणवली नाही. त्याच्याच वयाच्या इतर हॉलीवुडकरांच्या मानानं स्पष्ट विचार, नेमकी भाषा आणि चोख काम यामुळं तो उठून दिसायचा.
बॉबच्या लक्षवेधी भूमिका
न्यूयॉर्कला अमेरिकन अकॅडेमी ऑफ ड्रमॅटिक आर्ट्समधून अभिनयाचं रीतसर प्रशिक्षण घेऊन बॉबनं वयाच्या तेवीसाव्या वर्षी अभिनयाचा ओनामा केला. टीव्ही आणि ब्रॉडवेवर काही लहानमोठ्या भूमिका केल्यानंतर सलग सिनेमा, त्याला समांतर टीव्ही आणि अगदी अलीकडे नेटफ्लिक्स असा त्याचा एकंदर आलेख आहे.
सुरुवातीच्या त्याच्या नवख्या लुकमधे हळूहळू हॉलीवुडची स्टाइल येत गेली. अभिनय अधिक सहज, गहिरा आणि कसदार होत गेला. देखण्या आयरिश रत्नाला हॉलीवूडच कोंदण मिळालं. तब्बल साठ वर्षांच्या हॉलीवूड कारकिर्दीत नायक म्हणून चाळीसेक आणि दिग्दर्शित केलेलं दहा असे मोजून फक्त पन्नासेक चित्रपट बॉबच्या नावावर आहेत. त्यापैकी माझ्या आवडीच्या या निवडक भूमिका. (लेखात कोणत्याही चित्रपटाच्या नावावर क्लिक केल्यास त्याचे ट्रेलर पाहता येईल.)
द हॉर्स व्हिस्परर : डोंगरावरच्या एका रांचवर राहणारा टॉम बुकर. हॉर्स व्हिस्परर म्हणून त्याची ख्याती. घोड्यांची अंतर्बाह्य ओळख असणारा असा घोडेबहाद्दर जाणकार जो चाबकाऐवजी हळुवार पण ठाम पद्धतींना घोड्याला हळूहळू काबूत आणतो. एक दिवस त्याच्या तबेल्यावर टीनेजर ग्रेस आणि तिचा लाडका घोडा पिल्ग्रिम येतात. एका रपेटीदरम्यान झालेल्या अपघातात उजवा पाय आणि जिवलग मैत्रीण गमावल्यावर तिनं घोड्यावर बसणंच बंद केलय. तिची अवस्था बघून एरवीचा आज्ञाधारक, शिस्तीचा पिल्ग्रिम बेकाबू झालाय. शारीरिक जखमा भरून येतायत पण मनावरचा ओरखडा सलतोय.
दोघांनाही या गर्तेतून बाहेर काढायची अवघड जबाबदारी टॉमच्या शिरावर असते. कोलमडून गेलेली लहानगी ग्रेस आणि तिच्या प्रेमापोटी विव्हळ झालेला मुका पिल्ग्रिम. दोघांच्याही भावना समजून घेत टॉम आस्तेआस्ते दोघांचा विश्वास जिंकतो. कधी मायेनं तर कधी आग्रहानं तो त्यांच्या जखमा भरून काढतो. आणि एक दिवस घोड्यावर बसायची धास्ती घेतलेली ग्रेस पिल्ग्रिमवर बसून रपेट मारते. टॉमची जबाबदारी पूर्ण होते. शेवटच्या सीनमधे एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशा अवस्थेत त्यांना निरोप देणारा टेकडीवर घोड्यावर बसलेला टॉम विसरणं अशक्यच. डेनिममधल्या रांगड्या काऊबॉयच्या रुपात बॉब अगदी फिट्ट बसला.
द ग्रेट गॅट्सबी : एका आलिशान मॅनशनमधे एकटाच राहणारा मिलियोनेयर गॅट्सबी. त्याच्या अवाढव्य स्विमिंग पूलवर सतत खर्चिक पाया होतात पण तो त्यात कधीच सामील होत नाही. त्याचा भूतकाळ, त्यानं इतकी संपत्ती कशी कमावली याची कुणालाच माहिती नसल्यानं त्याच्याभोवतीचं गूढ वलय अजूनच गडद होतं. ऑक्सफर्डचा पदवीधर असूनही तो तेव्हा गरीब होता म्हणून त्याची प्रेयसी डेझी त्याला नाकारून दुसरीकडं लग्न करते. त्याच डेझीला मिळवण्यासाठी तो परत आलाय. पण एका दुर्दैवी गैरसमजापायी त्याच्याच मॅनशनमधे गॅट्सबीचा खून होतो. इतकी वर्षं त्याच्या मॅनशनवर पार्ट्या या झोडलेल्यांपैकी कुणीही त्याच्या अंत्यसंस्काराला फिरकत नाही.
अमाप संपत्ती कमावूनही कंगाल, गरिबीमुळं प्रेमात झालेला पराभव ही त्याची कमजोरी, अपयशी प्रेमाचा भूतकाळ जिवंत करायची धडपड, लार्जर देंन लाइफ पण आतून पोखरलेला, खोकला बडेजाव असे बारकावे बॉब उत्कटतेनं सादर करतो. खासकरून खाली पार्टीचा धिंगाणा सुरू असताना वरच्या गॅलरीत उभा राहून सतत काहीतरी शोधणारी त्याची अस्वस्थ नजर आणि ते न दिसल्यावर निराश होऊन त्याचं आत निघून जाणं बॉबनं लाजवाब पेश केलंय. याच कादंबरीवर अजून तीन चित्रपट आले. पण तो रईसी बाज, रहस्य, ग्लॅमर आणि उरातली वेदना बॉबनं अशा उंचीवर नेलीय की लेखकालाही आपल्या मानसपुत्राचा अभिमान वाटावा.
ऑल द प्रेसिडेंट्स मेन : बॉब आणि कार्ल हे वॉशिंग्टन पोस्टचे दोन पत्रकार. जिवावर उदार होऊन वॉटरगेट घोटाळ्याचे धागेदोरे शोधून काढतात. सत्ताधीशांनी सगळी शक्ति पणाला लावली तरी त्यांच्या चुका लपून राहत नाहीत आणि दुरुस्तही करता येत नाहीत. त्यामुळं अपरिमित हानी मात्र होते. मुजफ्फर रज्मीच्या शब्दांत 'लमहो ने खता की थी, सदियो ने सजा पाई'.
रात्रीच्या अंधारात, अंडरग्राऊंड पार्किंगमधे एका अनामिक खबरीकडून बॉब माहिती मिळवतोय. त्या अंधाऱ्या सीन्समधेही बॉबच्या चेहऱ्यावरचा तणाव अंगावर काटा आणतो. सगळे ठिपके नीट जुळवायची बॉबची धडपड भन्नाट आहे. दाराच्या साध्या कडीपासून सुरू झालेली गोष्ट व्हाइट हाऊस हादरवून टाकते. हॉलीवुडच्या बॉबनं पोस्टचा बॉब असा पेश केला की पोस्टच्या बॉबनं त्याला जाहीर दाद दिली. एका अभिनेत्यासाठी याहून मोठी शाबासकी ती काय.
लायन्स फॉर लॅम्ब्स : बॉब, टॉम क्रूज आणि मेरिल स्ट्रीप अशी तगडी स्टारकास्ट. आपली राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तरुण सैनिकांना युद्धावर पाठवायची योजना आखणारा सत्तापिपासू सेनेटर (टॉम), ती बातमी टीव्हीवर आली तर हलकल्लोळ होईल हे माहीत असणारी टीव्ही पत्रकार (मेरिल) आणि ज्याचे दोन विद्यार्थी त्या युद्धात ओढले जातात तो प्रोफेसर (बॉब) यांची ही तिपेडी कहाणी. 'कोकरांच्या शिकारीसाठी सिंह' या भयंकर उपरोधातून घडणारं भयंकर नाट्य. हे तिघं एकाही सीनमधे एकत्र ये-त नाहीत. पण विचित्र परिस्थितीत हे तीन स्वतंत्र धागे एकमेकांत गुंतत जातात. तरुणा विद्यार्थ्यांना सतत मोटिवेट करणारा आदर्शवादी प्रोफेसर मॅली त्याचे विद्यार्थी युद्धात मारले गेल्याची बातमी ऐकल्यावर उन्मळून पडतो. त्याची तगमग बॉबच्या नजरेत अचूक उमटते. एका उनाड विद्यार्थ्याला सुधारायचा त्याचा आटापिटा, ती तळमळ बॉबनं जिवंत केलीय.
द कॅन्डिडेट : बिल मके हा नामांकित वकील नाखुशीनच सेनेटची निवडणूक लढवतोय. त्याचा आदर्शवाद अक्राळविक्राळ राजकीय व्यवस्थेत चिरडला जातोय. लिहून दिलेल्या भाषणाव्यतिरिक्त एकही शब्द बोलायची बंदी. हळूहळू तो त्या व्यवस्थेला सरावतो. प्रचलित राजकारणाच्या बाहेरून आलेला आदर्शवादी वकील ते मुरलेला राजकरणी हे त्याचं स्थित्यंतर बॉबनं अगदी नेमकेपणानं टिपलंय. शेवटच्या सीनमधला 'व्हॉट डु वुई डू नाऊ' असं गालातल्या गालात हसत विचारणारा बिल त्याच्या आगामी वाटचालीबद्दल खूप काही सांगून जातो. सिनेमातले निवडणूक प्रचाराचे त्याचे करिश्मायी पोस्टर्स बघून वाटतं बॉबनं कधी निवडणूक लढवली असती तर?
द नॅचरल : रॉय हॉब्ज हा एक गिफ्टेड बेसबॉल खेळाडू. पण एका गोळीबारात जखमी झाल्यानं हातातोंडाशी आलेलं ड्रीम करियर हातातून निसटून जातं. या वेदनेत १६ वर्षं घालवल्यानंतर रॉय एक मोडकळीला आलेला बेसबॉल क्लब जॉइन करतो. हळूहळू त्याच्यातला दडपला गेलेला नॅचरल बेसबॉल खेळाडू बहरायला लागतो. बरबाद झालेलं करियर सावरून तो दमदार कमबॅक करतो. आधीचा उध्वस्त, खचलेला रॉय आणि शेवटचा विजयी रॉय बॉबनं सहीसही उभा केलाय. स्लो मोशनमधे जीव तोडून बेसबॉल थ्रो करणारा रॉय फैंटास्टिक दिसतो. शेवटच्या स्टेडीयममधल्या सीनमधे निर्णायक क्षणी रॉय खेळायला उभा आहे. त्याची टिपिकल बॅट घेतलेली पोझ, बॉलवर रोखलेली नजर आणि सर्व शक्ती एकवटून खेळलेला अप्रतिम स्विंग शॉट. तो शॉट इतका उंच जातो की थेट स्टेडियमच्या उंच टॉवरवरच्या लाइट फोडून टाकतो. बघणाराही मुठी वळत 'बकप' म्हणत खुर्चीत उसळी मरतो. हा स्पोर्ट्स सिनेमातला एक क्लासिक सीन ठरला. उगाच नाही अमेरिका बेसबॉलच्या प्रेमात पडली!
बुच कॅसिडी अँड सनडान्स किड : बुच आणि सनडान्स या कायद्यानं बहिष्कृत केलेल्या तडीपार मित्रांची भरपूर अॅक्शन आणि ट्विस्ट असलेली कहाणी. या थ्रिलरनं त्या वर्षी ४ ऑस्कर्ससह एकूण २४ पुरस्कार खिशात घालत रग्गड कमाई केली. याच भूमिकेमुळं 'सनडान्स' हा गोल्डन शब्द बॉबच्या आयुष्यात आला.
परफेक्ट हॉलीवुड पर्सनॅलिटी लाभलेल्या बॉबच्या अजून कितीतरी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका एकदातरी आवर्जून बघाव्या अशा. 'लीगल ईगल्स' मधला टॉम लोगन आणि 'थ्री डेज ऑफ द कोंदोर' मधला जोसेफ टर्नर एकदम चार्मिंग. 'आऊट ऑफ आफ्रिका' आणि 'द वे वुई वेअर' या दोन्ही चित्रपटांत बॉबचा अभिनय उत्तम आहे. पण या कथा मुळातच नायिकाप्रधान असल्यानं मेरिल आणि बार्बरासमोर त्याला मर्यादित वाव होता. जसं 'चाँदनी' आणि 'सागर' चित्रपटांत ऋषी कपूरसारखा चॉकलेट हीरो असूनही श्रीदेवी आणि डिंपलनंच आख्खा सिनेमा व्यापून टाकला.
स्टारडमचं एक तप
प्रत्येक कलाकाराच्या कारकिर्दीत एक सुवर्णयुग असतं. प्रतिभेच्या ऐन बहराचा असा काळ जेव्हा मास्टरपीसेस जन्माला येतात. एक नवीन बेंचमार्क, नवीन मानदंड प्रस्थापित होतो. बॉबनं १९६७ ते १९७९ अशी सलग बारा वर्षं स्टारपद उपभोगलं. त्यातली १९७३ ते १९७६ ही त्याच्या कारकीर्दीतली गोल्डन वर्षं ठरली. या वर्षांत तो बॉक्स ऑफिसवरचा टॉप स्टार होता. हॉलीवुडचा अनभिषिक्त सम्राट. योगायोग म्हणजे याच काळात अमिताभ बॉलीवुडचा शहनशाह झाला.
त्याचं ग्लॅमर, त्याची स्टाइल आणि त्याची अभिनयावरची हुकूमत याच्या आसपासही कुणी पोचलं नाही. बॉबला या चार वर्षांत जणू 'मिडास टच' लाभला होता. तो हात लावेल त्या कथेचं, भूमिकेचं, सिनेमाचं सोनं झालं. जणू कॅमेराही बॉबच्या प्रेमात पागल झाला होता. याच काळात त्याला नवीन मॉडर्न हेयरस्टाइलसकट त्याची आयकॉनिक 'स्टार पर्सनॅलिटी' मिळाली. आणि तो अमेरिकन स्वीटहार्ट बनला.
बॉबचं वेगळेपण
जसा वानखेडेच्या पिचवरचा सचिन, विंबल्डनच्या कोर्टवरचा सँप्रास आणि माइकसमोरची लता तसाच रोमॅटिक सीन्समधला बॉब. नॅचरल, एलिगंट, आपल्याच मस्तीत आणि हुकूमी कामगिरी. अहाहा. त्याचे निळे डोळे बोलतात तेव्हा शब्द विरून जातात. त्याच्या हँडसम लुक्सचं भारावलेपण ओसरल्यावर त्याचं वेगळेपण उमगायला लागतं.
ग्लॅमरस, अॅक्शन, थ्रिलर, राजकीय ड्रामा, भावनिक असा बॉबचा ऐसपैस पल्ला. कावेबाज जॉन ते रांगडा पण हळुवार घोडेस्वार टॉम; पोलिसांना चकमा देणारा तडीपार सनडान्स ते जीव धोक्यात घालून गुन्ह्याची पाळंमुळं खणून काढणारा जिगरबाज पत्रकार बॉब; विद्यार्थ्यांना तळमळीनं घडवणारा प्रोफेसर मेली ते ठरवून सराईत राजकारणात उडी घेणारा सेनेटर बिल; रईस पण आतून पराभूत गॅट्स्बी ते बरबाद करीयरच्या राखेतून भरारी घेणारा बाजीगर बेसबॉलपटू रॉय. लेखकानं लिहिलेल्या प्रत्येक पात्राला बॉबनं पुरेपूर न्याय दिला. जवळपास दरवर्षी बॉबचा एक सिनेमा यायचा. त्यातले कित्येक बजेटच्या १०/१५ पट कमाई करून टॉप १० मधे पोचले.
सुरुवातीची दोनेक वर्षं काहीसा नवखा, भिरभिरत्या नजरेचा बॉब लवकरच हॉलीवूडचं तंत्र आणि सिनेमाचा मंत्र आत्मसात करतो. नकळत्या वयात पडलेली सिनेमाची छाप आणि कळत्या वयात घेतलेली डोळस मेहनत यातून त्याच्यातला अभिनेता घडत गेला. घोडे, जंगल, स्कीइंग, समुद्र, डोंगरदऱ्या अशा नॅचरल सीन्समधे तो जान आणतो. त्यानं रंगवलेले खलनायकही इंटेलिजंट नि सोफिस्टिकेटेड होते.
जसा गायक स्वतःचा षड्ज शोधत असतो तसाच प्रत्येक अभिनेता स्वतःची विशिष्ट अभिनय शैली शोधत असतो. बॉबला त्याचा आवाका, शैली आणि परफेक्ट पर्सनॅलिटी अचूक गवसली. दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार, समीक्षक, प्रेक्षक, नवोदित कलाकार सगळ्यांचाच लाडका बॉब. जणू मणिकांचन ग्लासातला दुग्धकेशरशर्करा योगच. त्यानं सिनेमा या माध्यमाची ताकत पुरेपूर ओळखली; त्याच्या कलात्मक, तांत्रिक, व्यावसायिक अशा सगळ्या अंगांना भिडला आणि सर्वार्थानं सिनेमा जगला.
प्रत्येक इंग्रजी अभिनेत्याची एक सुप्त महत्वाकांक्षा असते. वाइल्ड वेस्टचा रांगडा काऊबॉय, सर्वशक्तिमान अमेरिकी प्रेसिडेंट आणि डॅशिंग डेअरिंग जेम्स बॉन्ड यापैकी एक तरी ड्रीम रोल मिळावा. अभिनयाची कृतार्थता आणि इतिहासात कायमची नोंद. यापैकी बॉबनं रफ न टफ काऊबॉय अनेकवेळा आणि अफलातून साकारला. 'अमेरिकी प्रेसिडेंट किंवा 007 त्यानं कसा वठवला असता' हा विचार हमखास डोक्यात तरळतो.
ऑस्करची हुलकावणी आणि गवसणी
वयाच्या ३४ व्या वर्षीच बॉबनं दिग्दर्शक म्हणून कामाला सुरुवात केली. अभिनेता म्हणून ऑस्करनं त्याला १० वर्ष हुलकावणी दिली. पण दिग्दर्शक म्हणून ऑर्डिनरी पीपल (१९८०) हा बॉबचा पहिलाच चित्रपट थेट ४ ऑस्कर्सला गवसणी घालतो. बॉब सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक होतो. फक्त ६ मिलियन बजेटवर तयार झालेल्या या चित्रपटानं ९० मिलियन कमावले. कॅमेऱ्याच्या समोर आणि पाठीमागे, सिनेमाच्या आर्ट आणि क्राफ्ट या दोन्ही प्रांतात त्याची हुकूमत आहे यावर शिक्कामोर्तब झालं.
आई बाबा आणि दोन टीनेजर मुलं असा चौकोनी सुखवस्तू परिवार. पण एका बोट अपघातात थोरला मुलगा दगावतो. धाकटा मानसिक रुग्ण बनतो. या धक्क्यानं हादरलेला परिवार हळूहळू नॉर्मल व्हायची धडपड करतोय. बाबा धाकट्या मुलाशी कनेक्ट होतायत. पण आई त्याच्याशी तुटक वागतेय. वास्तव नाकारून 'एवरिथिंग इज अंडर कंट्रोल' असं भासवण्याचा तिचा आटापिटा. आई आणि मुलातलं अंतर वाढतंच जातं. काळजाचा तुकडा गमावलेली, धाकट्या मुलाला माफ करू न शकणारी आई माहेरी निघून जाते. मागं उरतात बाबा आणि बेटा.
कथेतले हे भावनिक चढउतार, बारकावे, संघर्ष, अनपेक्षित वळणं आणि प्रत्येकानं त्यातून काढलेला मार्ग हे सगळं वठवून घेताना बॉबची गाढ भावनिक बुद्धिमत्ता अधोरेखित होते. या सिनेमाला 'आणि शेवटी सगळं ठीक झालं' असं टिपिकल हॅपी एंडिंग नाहीये. कारण असा भावनिक गुंता कधीच सुटत नाही. फक्त गाठींच्या निरगाठी होऊ न देणं एवढंच माणसाच्या हातात असतं कदाचित.
तिहेरी ऋणानुबंध
प्रोवो हे यूटा राज्यातलं गाव बॉबची सासुरवाडी. याच भागात त्यानं वयाच्या ३२ व्या वर्षीच एक ऐसपैस रांच खरेदी केला. त्याच्या आसपासचा हजारो एकर भूभाग पर्यावरण संरक्षणासाठी आरक्षित करून घेतला. निसर्गाचं लेणं ल्यालेल्या या परिसराला आपल्या आवडत्या भूमिकेवरून नाव दिलं 'सनडान्स'. इथं त्यानं व्यावसायिक (रिसॉर्ट), भावनिक (सिनेमा) आणि हरित (पर्यावरण) अशी तिहेरी गुंतवणूक केली. फक्त पुंजी आणि प्रसिद्धी नव्हे तर ७ दशकांचं व्यावसायिक शहाणपण, सिनेमाचा अनुभव, आणि निसर्गप्रेमाची. सिनेमाच्या बेभरवशी जगात राहूनही याची बेगमी तो तिशीत असल्यापासूनच करत होता.
बॉबला स्कीईंगचं अतोनात वेड. तो म्हणायचा 'स्कीईंग कार रेसिंगच्या पुढं एक पाऊल आहे. कारण त्यात कुठलं मशीन नसतं. तुम्ही थेट निसर्गतत्वांच्या सन्निध पोचता. तो एक उन्मुक्त देहिक अनुभव असतो'. चहूबाजूला शुभ्र बर्फाची चादर, सोनेरी उन्हं, काळा स्कीईंग सूट, हातमोजे, डोळ्यांवर स्की गॉगल्स, वाऱ्यावर उडणारे दाट सोनेरी केस आणि डोंगरकड्यावरून सुसाट खाली येणारा रॉबर्ट हा फोटो कायम स्मरणात राहील.
अनेक नवोदित सिनेकलावंतांचा मेंटॉर आणि गॉडफादर म्हणून बॉबनं ४० वर्षं काम केलं. आपली गोष्ट सांगायची असोशी असणाऱ्यांसाठी सनडान्समधे वर्षभर फिल्ममेकिंगच्या प्रयोगशाळा चालवल्या, दरवर्षी सनडान्स फिल्म फेस्टिवल केला. युटामधे एक मिनी हॉलीवूड वसवलं. अनेक होतकरू अभिनेते, दिग्दर्शक त्याच्या हाताखाली सिनेमाचे धडे गिरवून उत्तम सिनेमाची दिशा आणि शिदोरी घेऊन गेले. बॉब मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या इंडिपेंडंट सिनेमाचा चॅम्पियन झाला.
बॉबनं शहाणपणानं भविष्य आखलं, अत्युच्च यश चाखलं, आणि जे जे उभं केलं ते प्राणपणानं राखलं. तहहयात सिनेमा आणि पर्यावरणाशी बांधिलकी जपली. पोकळ शब्दांनी नाही तर प्रत्यक्ष काम करून. सनडान्स हा त्याचा अमूल्य वारसा.
कॅलिफोर्निया, नेवाडा आणि यूटा. तीन शेजारी राज्यं. अनुक्रमे बॉबची जन्मभूमी, कर्मभूमी आणि स्वप्नभूमी. एक अनामिक मूल ते गोल्डन बॉय ते सनडान्स मॅन या त्याच्या प्रवासाचे साक्षीदार. सँटा मोनिकाच्या मातीत उगवलेलं रोपटं लॉस अँजेलीसच्या अवकाशात बहरतं आणि त्या वटवृक्षाच्या पारंब्या सनडान्सच्या मातीत खोलवर उतरतात. बॉबच्या आयुष्यातला असा हा तिहेरी ऋणानुबंध.
कृतार्थ गौरवांजली
बॉबला ओळखणाऱ्या सगळ्यांनी आपापल्या शब्दांत त्याच्या आठवणींना उजाळा दिला. बॉब म्हणजे डेनिममधे बसवलेला रशमोअर पर्वताचा देखणा कातीव तुकडा. अस्सल अमेरिकन हीरो 'असा' दिसतो. त्याच्या ऑरामुळं हॉलीवूड उजळून गेलं. व्हीएफेक्सच्या आधीच्या क्लासिक हॉलीवुडचा हीरो. इंडिपेंडंट सिनेमाचा गॉडफादर. आर्टिस्टिक गेमचेंजर. त्याच्यासारखा आयकॉन स्क्रीनवर किंवा स्क्रीनबाहेर पुन्हा होणे नाही. वन ऑफ दी ग्रेटेस्ट स्टोरीटेलर्स ऑफ अवर टाइम्स.
केनेडी सेंटरमधे २००५ साली त्याचा लाइफटाइम अचिवमेंटसाठी सन्मान झाला. तेव्हा "एव्हरी सोसायटी हॅज गोल्डन बॉइज. बॉब वॉज दी कॅप्टन ऑफ अमेरिकन गोल्डन बॉइज” हे शब्द ऐकून एरवी कधी भावुक न होणाऱ्या बॉबच्या डोळ्यांत कृतार्थतेचे अश्रू तरळले.
अलविदा रॉबर्ट
शार्क्सच्या जगातला डॉल्फिन, रुपेरी पडद्यावरचा गोल्डन बॉय. पन्नास वर्षं सनडान्स जोपासल्यावर त्याच निसर्गाच्या कुशीत आता कायमचा विसावला. सनडान्सचा आत्मा हरपला. सनडान्स भूमिकेपासून सुरू झालेलं वर्तुळ सनडान्सच्या मातीतच पूर्ण झालं. रॉबर्ट या नावाचा अर्थ आहे शायनिंग विथ ग्लोरी. आपल्या नावाला साजेसंच जगला तो. 'व्हॉट डू यू स्टँड फॉर, व्हॉट डू यू फाइट फॉर, व्हॉट डू यू लिव्ह फॉर, व्हॉट डू यू डाय फॉर' याचा कित्ता देऊन गेला.
त्यानं पडद्यावर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेत, कॅमेऱ्यात कैद केलेल्या प्रत्येक फ्रेममधे आणि घडवलेल्या प्रत्येक सिनेकलावंतात त्याचा 'जादुई' अंश तेवत राहील. चाहत्यांसाठी त्याचे बोलके निळे डोळे आणि वॉर्म स्माइल हाच ऐवज. अलविदा रॉबर्ट !
- डॉ. ज्योती पाटील
jyopat2016@gmail.com
(लेखिका बायोटेक्नॉलॉजी संशोधक आहेत.)
Tags: रॉबर्ट रेडफर्ड सनडान्स सनडान्स फिल्म फेस्टिव्हल हॉलीवुड ज्योती पाटील द ग्रेट गॅट्सबी अभिनेता दिग्दर्शक गोल्डन बॉय Load More Tags
Add Comment