रत्नाकर मतकरी: माणूसशास्त्राचा लेखक

ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांचे 17 मे रोजी निधन झाले. आपल्या 81 वर्षांच्याआयुष्यात त्यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध साहित्यप्रकार हाताळले. इतकेच नव्हे तर त्यांची ओळख रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशी देखील  होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी 'वेडी माणसं' या एकांकिकेपासून लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या लेखनातील एक महत्त्वाचा साहित्यप्रकार म्हणजे गूढकथा. मराठी साहित्यात भय आणि गूढकथेचे गारुड मतकरी यांनी निर्माण केले. त्यांच्या भय-गूढ कथालेखनाविषयी आजच्या पिढीतील कथाकार हृषीकेश गुप्ते यांनी व्यक्त केलेल्या या भावना..

रत्नाकर मतकरींचे मराठी कलाप्रांतातील योगदान अमूल्य आणि अमाप आहे. यात साहित्यापासून नाट्यकला, सिनेकला, चित्रकला अश्या अनेक प्रांतांचा समावेश होतो. साहित्यात जरी त्यांचे प्रमुख योगदान गुढकथेच्या प्रांतातले मानले जात असले तरी त्यांनी तेथेही अगदी बालवाङ्मयापासून समिक्षेपर्यंतचा मोठा लेखनपट साकारला. गुढकथांसोबतच त्यांनी ‘जौळ’सारखे समाजप्रबोधनात्मक, तर ‘ॲडम’सारखे तत्कालीन मानवी नैतिकतेला धक्का देणारे कादंबरीलेखनही केले. नाट्यक्षेत्रातही त्यांच्या बालनाट्यचळवळीविषयी मोठ्या प्रमाणात बोलले जात असले तरी तिथेही त्यांच्या बहुपल्ली कारकिर्दीचे दर्शन होते. यात अगदी समकालीन सामाजिक मानसिकतेला छेद देणाऱ्या 'लोककथा 78' सारख्या प्रायोगिक रंगभूमीपासून सामाजिक, कौटुंबिक आशयाच्या व्यावसायिक नाटकांपर्यंतच्या विविध नाट्यकृतींचा समावेश होतो. 

नाट्यक्षेत्रातले त्यांचे योगदान हे लेखनापासून मधले अनेक टप्पे पार पाडत दिग्ददर्शनापर्यंत साकारलेले दिसते. सिनेलेखनापासून सिनेदिग्दर्शनापर्यंतचा  प्रवास साकारताना त्यांनी ‘गहिरे पाणी’सारखी छोट्या पडद्यासाठी केलेली ‘कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन- रत्नाकर मतकरी’ अशी बहुआयामी निर्मिती दुर्लक्षित करता येत नाही. खरंतर इतकं प्रचंड कलाकौशल्य, कसब आणि प्रतिभा लाभलेल्या या कलावंताविषयी लिहिणं हे तसं जबाबदारीचं काम आहे. त्यासाठी अभ्यास, वेळ आणि व्यक्त होण्यासाठी पुरेशी जागा यासह इतर अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. मतकरींच्या साहित्येतर कलाप्रांतातील कामगिरीविषयी भाष्य करण्यास मी पात्र नाही. यापुढचे विवेचन हे मुख्यत्वे मतकरींच्या गुढकथालेखनाविषयी आणि त्या लेखनाने माझ्या पिढीवर केलेल्या गारुडाविषयी असेल.

मतकरींच्या लेखनाशी माझी ओळख झाली ते साल साधारण सत्याऐंशी-अठ्ठ्याऐंशी असेल. नेमका काळ आठवत नाही, पण माझ्या गावातल्या नागोठण्यातल्या ग्रंथालयात मी काहीतरी वाचत बसलो होतो. त्याकाळी साधारण चार ते सात या वेळेत गावातले छोटे ग्रंथालय चालू असे. तिथल्या बाकड्यांवर बसून बहुवयीन लोक वर्तमानपत्रांपासून ते स्त्री-पुरुष लेखकांच्या त्या काळात लोकप्रिय असणाऱ्या कादंबऱ्यांपर्यंत काय काय वाचत बसलेले असत.

मी सहसा या काळात ग्रंथालयात बसून बाबुराव अर्नाळकरांच्या झुंझारकथा वाचत असे. त्या दिवशी नेमके माझ्या आवडीचे कोणतेही पुस्तक न सापडल्यामुळे सरते शेवटी मी शेजारीच ठेवलेल्या दिवाळी अंकांची चळत उपसू लागलो. त्या काळात ग्रंथालयात नवे, जूने, प्राचीन असे कोणत्याही काळातले दिवाळी अंक साल आणि सनांची तमा न बाळगता रात्रंदिवस पडून असत. ताज्या दिवाळीत आलेल्या नव्या अंकाव्यतिरिक्त या अश्या जुन्या अंकांवर फार कुणाचे लक्ष नसे. ते कुणीही येऊन कधीही वाचू शके, त्यासाठी वर्गणीची अट शिथील होती. त्याच चळतीतील एका दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाने माझे लक्ष वेधले आणि मी तो अंक चाळू लागलो. मुखपृष्ठाबद्दल आता सविस्तर काही आठवत नाही, पण आतील रेखाचित्रे पांढऱ्यावर विशेष काळे करावे अश्या प्रकारातील, डोळ्यांत ठसणारी होती. आतल्या चित्रांवर तोवर डोळ्यांना ठाऊक असणाऱ्या सामान्य चित्रबोलीला छेद देणारे असे ओबडधोबड पण तरीही एक वेगळेच सौंदर्य ल्यालेले होते.

आज अस्पष्टशा आठवणाऱ्या त्या चित्रांवरून असा अंदाज बांधता येतो, की ते बहुधा सुभाष अवचट वा चंद्रमोहन कुलकर्णींचे कलाकाम असावे आणि चित्रांच्या गूढाकारांवरून तो बहुधा नवल वा हंसचा दिवाळी अंक असावा. अर्थात हाही निव्वळ अंदाज! तोही आज बांधलेला. याच अंकातील एका कथाचित्राखालील नावाने माझं लक्ष वेधलं गेलं. ते नाव मात्र आजही अगदी खात्रीने आठवतं.
रत्नाकर मतकरी!

छान कॅलीग्राफी केलेल्या काळ्याभोर ठसठशीत रत्नाकर या नावाखाली मतकरी हे आडनाव. कॅलीग्राफीचं ते अक्षरलेणं एखाद्या मुकुटासारखं वाटत होतं. डौलदार. ऐटदार. त्या अंकातील ती विशिष्ट कथा मग मी आधाशासारखा तिथेच कोपऱ्यात बसून वाचू लागलो. ती साधारण संध्याकाळची वेळ होती, मी ती कथा वाचत गेलो बाहेर दिवस मावळत गेला. बाहेर मावळणाऱ्या दिवसागणिक आणि त्या कथेतील वाचल्या गेलेल्या प्रत्येक ओळीगणिक माझ्या आत एक अनामिक अंधार दाटत गेला. कथा वाचून संपली तेव्हा लायब्ररी बंद व्हायची वेळ झाली होती. 

लायब्ररी ते घर हा त्या संध्याकाळचा परतीचा प्रवास माझ्यासाठी सर्वाधिक भीतीदायक होता. घराच्या वाटेवर मोठालं तळं होतं. तळ्याकाठी विविध जातीच्या नानाविध आकारांच्या झाडांची गर्दी होती. ही झाडे संध्याकाळी वेगवेगळ्या आकाराच्या सावल्या जमिनीवर कोरत. त्या कथेच्या वाचनाचा माझ्यावरचा परिणाम एवढा मोठा होता, की तो दिवस, ती संध्याकाळ आणि त्या कथेच्या लेखकाचं नाव माझ्या मनावर कायमचं ठसलं गेलं.

त्या कथेचं नाव आता आठवत नाही, पण बहुधा ती मतकरींची ‘लपाछपी’नामक कथा असावी असं वाटतंय. ‘आम्ही तिघं जण आहोत. मोठा विल्कु, छोटा विल्कु आणि मी. मीही विल्कुच.’ अशी त्या कथेची सुरुवात होती असं साधारण आठवतंय. अर्थात मनावर कायमची ठसलेली ती आठवण जागृत करण्यासाठी त्या नेमक्या कथेचं नाव वा कथानक सुस्पष्ट आठवण्याची काहीही आवश्यकता नाही. नुस्तं रत्नाकर मतकरी हे नाव त्यासाठी पुरेसं आहे. ती मी वाचलेली पहिली गुढकथा नव्हती; म्हणजे नसावी. पण पुस्तकांना लेखक असतात आणि त्यातील आपल्यावर किमया करणारे लेखन ही त्या लेखकाची किमयागिरी असते हे मला आयुष्यात त्या दिवशी सर्वप्रथम कळले. माझ्या मनात लेखकाचे म्हणून ठसलेले ते पहिले नाव होते. 
रत्नाकर मतकरी!

भय आणि गूढकथेच्या मांडणींचे अनेक प्रकार वेगवेगळ्या भारतीय आणि परदेशी लेखकांनी हाताळलेले आहेत. सहसा गुढकथेच्या उभारणीसाठी स्थलकालाची ठळक गरज ही अत्यंत अपरिहार्य असते. भय वा गुढाच्या निर्मितीसाठी बरेचदा रिकामा काळ आणि चित्रमय वर्णनाची कास बऱ्याच लेखकांकडून धरली जाते. भयपटात ज्या प्रमाणे संथ कॅमेरा आणि अचानक तीव्रता बदलणारा ध्वनी यांचा वापर करून भयाचे धक्के (Jump Scares) निर्माण केले जातात, तसा हा स्थलकाल ठळक करण्याचा प्रकार जगभरातल्या भयकथालेखकांकडून भयसाहित्यनिर्मिती करताना सर्रास वापरला जातो. एखाद्या जागेचे पान न पान वर्णन करून वाचकाला सहसा त्यात गुंतवले जाते आणि मग हे वर्णन संपवताना एखाद्याच ओळीद्वारे अघटिताची चाहूल लावून वाचकाला धक्का देत कथानकाशी बांधून ठेवले जाते. मतकरींच्या लेखनशैलीने हा रूढ प्रघात नाकारला. घट्ट आणि गडद वर्णनांना फाटा देत त्यांनी छोट्या छोट्या वाक्यांद्वारे गूढाची जी मोहनमाळ विणली ती मराठी साहित्यासाठी अभिनव आणि म्हणूनच अत्यंत लक्षवेधी होती. उदाहरणादाखल खालील ओळी वाचू.

खेकडा. पाठीवरचे विद्रुप ओझे सांभाळीत धावणारा. आकड्यांसारखे पाय पुढेमागे हालवीत. कुरूप. किळसवाणा खेकडा. ती आपल्या मुलीला खेकडा म्हणते, ते एका अर्थी बरोबरच आहे. पोलियोमुळे कायमचे व्यंग आलेली मुलगी. काटक्यांसारखे बारीक हातपाय. पाठीवरचे कुबड. घरभर फिरणारा खेकडा.

या नेमक्या आणि थोडक्या शब्दांत एक प्रकारचे कौरुप्य, किळस आणि कणव मतकरी अत्यंत प्रभावीपणे मांडतात आणि याच शैलीत ते मराठी साहित्यातील त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या गूढकथेचा, ‘खेकडा’चा प्रारंभ करतात. मतकरींची ही छोटेखानी वाक्यांची शैली वाचकाच्या मनाला गडद आणि घट्ट भयाची मगरमिठी मारत नसेलही; पण वाचकाच्या मनाच्या पृष्ठभागावर भयाचा एक थेंब हलकेच सोडून पाण्यात फुटणार्‍या शाईप्रमाणे वाचकाच्या मनाचा नितळ रंग कायमचा बदलवून टाकण्याची किमया नक्कीच साधते. मतकरींच्या कथांबाबत बोलताना ‘मानसशास्त्र’ हा शब्द वारंवार वापरला गेला, पण मला मतकरींच्या कथा मानसशास्त्रापेक्षा माणूसशास्त्राच्या जास्त वाटत आलेल्या आहेत.

विविध मानवी भावभावनांचे न पाहिले गेलेले पैलू मतकरींनी त्यांच्या कथांतील वैचित्र्याद्वारे अत्यंत प्रभावीपणे मांडले. त्यांच्या कथांतील पात्रांचे पेच हे वरकरणी मानवी जीवनातील पेचांपेक्षा वेगळे आणि म्हणूनच गूढ वाटत आले असले तरी शेवटाकडे येताना मानवी जीवनातील नैतिक पेचांशी ते धक्कातंत्राचे नाते साधतात. मतकरींच्या लेखनातील तीव्र जीवनदृष्टीचे आणि सजग समाजभानाचे सातत्यपूर्ण दर्शन कायम विस्मयचकीत करते. 

असे असली तरी छोटेखानी वाक्यांचा सातत्यपूर्ण वापर करणे अथवा आणि दाटविणीचा शब्दसंभार टाळणे ही काही मतकरींची मर्यादा नव्हती. उदाहरणादाखल मतकरींच्याच ‘फाशी बखळ’ या कथासंग्रहातील ‘हडळ’ या कथेकडे पाहू. एरवी आपल्या लेखनात घट्ट आणि गडद वर्णनशैलीला फाटा देणाऱ्या मतकरींनी या कथेची सुरुवात खालीलप्रमाणे केली आहे.

कात्रीने जागोजागी भोकसे पाडावेत तसे आभाळ जागोजागी उसवले होते. झारीतून गळावे तसे पाणी नुसते झराझर गळत होते. दिवस अंधारले होते आणि रात्री ओल्याचिंब झाल्या होत्या. मधुनमधून वारे भरारा फिरत असे. असे जोराचे वारे त्या पावसातून भरकटू लागले, म्हणजे एखादे बुळबुळीत ओले हिंस्त्र नखाळ जनावर फिस्कारते तसे भासू लागे. पिसाळल्यासारखा मग पाऊस अंगावर येई आणि दारेखिडक्या दणाणून झोडी. झोपड्यांची झडपे फडाफड मुस्कटात मारावे तशी कडकडत. वाऱ्यापावसाच्या त्या माथेफिरु जोडगोळीच्या थैमानाला भिऊन चिटपाखरू घराबाहेर पडत नव्हते. धारेत सापडलेल्या काटकीसारखे माणूस त्या धुवाधारांत गरगरून जायचे. गावात सगळीकडे ढोपरभर चिखल झाला होता. त्यात जनावरदेखील रुतून बसेल असे वाटायचे; वहाळ फुगून वाहात होते, त्यात माती ओरबाडून धावणारे रक्तासारखे लाल पाणी येई, पैलवानदेखील पायाखालचा धोंडा निसटून त्यात गडप होण्याचा संभव; सारी दारे बंद, गाव सुन्न झाला होता! ढोलीबाहेर पडलेल्या पक्ष्यांची ताठ झालेली, पाय वासलेली प्रेते ओल्या पाचोळ्यात पडली होती. भिंतीवर किरटी जीवाणू धावत होती. दिशा भिन्नाट झाल्या होत्या आणि माणसे हरवल्यागत झाली होती.

ही कथा सर्वप्रथम वाचली तेव्हा मला क्षणभर शालेय क्रमिक अभ्यासक्रमात दहावीला असलेली शंकर पाटलांची ‘वळीव’ ही कथा आठवली. ‘वळीव’मधले सुरुवातीचे उन्ह, उष्मा आणि उकाड्याचे वर्णन नंतर हळूहळू बदलत जाणाऱ्या वातावरणाद्वारे धुवांधार पावसात रुपांतरीत होते. ‘वळीव’ला असलेल्या खाश्या ग्रामीण लेपाशी नागरी मतकरींच्या या कथेची नाळ घट्ट जोडलेली आढळते. घटीत ज्या ठिकाणी घडते तेथील स्थलकालाची मतकरी ज्या बारकाईने इथे उभारणी करतात, हे सर्वप्रकारच्या आशयाशी मतकरींनी अत्यंत जवळून अनुसंधान साधले असल्याचा प्रखर प्रत्यय देते.

या कथेतील घटीताप्रमाणे मतकरींच्या सर्वच कथांमध्ये एखादे वैचित्र्य वा अद्भुत पाठीच्या कण्याप्रमाणे ताठ उभे आढळते. मात्र शेवट लोकप्रिय अश्या धक्कातंत्राने करताना मतकरी तत्कालीन कौटुंबिक मनभेद, मानवी जगण्यातले व्यक्तिगत पेच आणि सामजिक असोशीचे एक तीव्र तात्पर्य हलकेच उलगडून जातात. मतकरींच्या लेखनातील जगण्याचे पेच तत्वज्ञानाची चर्चा करत नसतीलही, पण तत्कालीन मानवी जगण्याचे प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसते.

मराठीत गुढकथालेखन करताना मतकरींनी निवेदनाचे असंख्य प्रयोग केले. प्रथमपुरुषी, तृतीयपुरुषी निवेदनासोबतच मतकरींनी द्वितियपुरुषी निवेदनातही आपल्या कथा रचल्या. मात्र मतकरींच्या कथांमधले निवेदन हे गुढकथेचा परिणाम साधण्यासाठी केलेले नसून त्या त्या कथानकाच्या लेखनघनतेशी थेट प्रमाणबद्धता साधण्यासाठी केलेले आढळते. त्यामुळेच मतकरींची गुढकथा ही कृत्रीम न वाटत सेंद्रीय पद्धतीने कागदावर उतरलेली वाटते.

मतकरींना मी वैयक्तिकरित्या चार वेळा भेटलो. त्यातल्या पहिल्या दोन भेटी ह्या अत्यंत सविस्तर आणि ऐसपैस होत्या. पण त्या पहिल्या भेटींतली माझी भुमिका ही बहुतांशी एका कुतुहल वाचकाची असल्याने मला त्यांच्या लेखनप्रक्रियेविषयी फार चर्चा करता आली नाही. नंतरच्या दोन भेटी ह्या अत्यंत धावत्या होत्या. एखाद हस्तांदोलन आणि दोनचार हसरे शब्द एवढ्यापुरत्या मर्यादित. 

वर नमुद केलेले पावसाचे वर्णन असलेली त्यांची ‘हडळ’ ही कथा माझ्या वाचनप्रवासात पुन्हा वाचल्यावर मी त्यांना हर्षभरीत होऊन फोनही केला होता. त्या वर्णनाविषयी मी भरभरून बोलू लागल्यावर ते खूप वेळ आनंदाने हसत राहिले. त्या वर्णनाचे कौतुक इतरही काही जेष्ठ लेखकांनी केले असल्याचे त्यांनी मला आवर्जून सांगितले आणि ‘ये एकदा मुंबईत भेटू.’ असे आग्रहाचे आमंत्रणही दिले. त्यानंतर कायमच मुंबईत गेल्यावर मतकरींना भेटावे आणि त्यांच्या प्रत्येक कथेतील लेखनसौष्ठवाविषयी त्यांच्याशी बोलावे असे सतत वाटे. दुर्दैवाने तसे झाले नाही.

‘मतकरी गेले’ हे शब्द उच्चारल्यावाचून हा लेख पूर्ण करायचा होता, पण आता ते शक्य नाही. मराठी भयगुढकथेच्या प्रांगणात मतकरींनी असंख्य रत्ने मुक्तहस्ते उधळून ठेवली आहेत. त्या प्रत्येक रत्नाचे बहुविध पैलू पारखी जवाहऱ्याकडून तपासून घेऊन मतकरींच्या लेखनसौष्ठवाचे पुनर्मुल्यांकन मराठी साहित्यक्षेत्राने मतकरींना गुढकथेपुरते मर्यादीत न ठेवता करायला हवे. बाकी मराठी वाचकाच्या वाचनभुकेसाठी ‘रत्नाकर मतकरी’नामक अलिबाबा आपले रत्नभांडार कोणत्याही परवलीच्या शब्दाची अट न ठेवता कायमचे उघडे ठेऊन निघून गेला आहे. माझ्यासह अनेक वाचकांना ते पिढानपिढ्या नक्कीच पुरून उरेल.

- हृषीकेश गुप्ते
gupterk@yahoo.in
(लेखक, नव्या पिढीतील कथालेखक व कादंबरीकार आहेत.)

Tags: रत्नाकर मतकरी हृषीकेश गुप्ते कथा साहित्य गुढकथा गहिरे पाणी ॲडम खेकडा Ratnakar Matkari Hrushikesh Gupte Literature Obutury Obituary Load More Tags

Add Comment