तेरा मेरा रिश्ता क्या?

आय. आय. टी. कानपुरमध्ये 17 डिसेंबर 2019 रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व नोंदणी यांच्या विरोधात मोर्चा काढला गेला. त्या मोर्चात प्रसिद्ध पाकिस्तानी उर्दू शायर फैझ अहमद फैझ यांची 1979 मध्ये लिहिलेली 'हम देखेंगे' ही नज्म सामूहिकरीत्या म्हटली गेली. त्यावर काही मोदी समर्थकांनी ‘हम कबतक देखेंगे?’असा उलट प्रश्न विचारून चर्चेला अधिकच उत आणला. त्याचवेळी आय. आय. टी.च्या काही प्राध्यापकांनी ही कविता हिंदूविरोधी आहे अशी तक्रार केली. इन्स्टिट्यूटच्या डिरेक्टरांनी त्यावर आता एक चौकशी-समिती बसवली आहे. चौकशी समिती जो काही  निर्णय देईल ते देओ. पण अशा प्रकारच्या घटनांच्या मुळाशी तात्कालिक चर्चेपलीकडेही काही चिरंतन प्रश्न असतात. विविध संस्कृतींचे लोक जिथे पिढ्यानपिढ्या एकत्र राहतात, अशा भारतासारख्या देशात असे प्रश्न सामोपचाराने सुटावेत असे वाटत असेल तर सर्वांनीच समजूतदारपणा दाखवणे गरजेचे असते. 
 
फैझ हे उर्दूचे मोठे कवी आहेत. 'हम देखेंगे' या नज्ममधूनही त्यांची कवी म्हणून असलेली थोरवी दिसून येईल. 1984 साली ते कालवश झाले. पण त्यांचे चाहते पाकिस्तानात आणि भारतात आजही आहेत. फैझ मार्क्सिस्ट समजले जातात.  तसंच ते राजकारणातही सक्रिय होते. ते झुल्फिकार अली भुत्तो यांच्या मंत्रीमंडळात होते. पाकिस्तानचे लष्करशहा झिया-उल-हक यांनी त्यांना तुरुंगात ठेवले होते. बराच काळ ते सोव्हिएत युनियनमध्ये परांगदा होते. प्रस्तुत नज्म त्यांनी झियांच्याच विरोधात लिहिली होती. झियाविरोधी एका सभेत पाकिस्तानची प्रसिद्ध गायिका इकबाल बानो हिने जेव्हा ही नज्म गायिली तेव्हा उपस्थितांनी इन्किलाब झिंदाबादचे नारे दिले होते. पन्नास हजार उपस्थितांची ती सभा उधळून लावण्यासाठी तेथील वीज तोडली गेली होती. त्यानंतर ते क्रांतीगीत म्हणून सर्वत्र गाजू लागले. त्या सभेत गायल्या गेलेल्या या गाण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग युट्युबवर उपलब्ध आहे. भारतातही अनेक मोर्च्यांत आणि निदर्शनांच्या प्रसंगी ते गायले गेले आहे. ते गीत असे:

हम देखेंगे 
लाज़िम है कि हम भी देखेंगे 

वो दिन कि जिस का वादा है 
जो लौह-ए-अज़ल में लिख्खा है
 
जब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गिराँ 
रूई की तरह उड़ जाएँगे 

हम महकूमों के पाँव-तले 
जब धरती धड़-धड़ धड़केगी 

और अहल-ए-हकम के सर-ऊपर 
जब बिजली कड़-कड़ कड़केगी 

जब अर्ज़-ए-ख़ुदा के काबे से 
सब बुत उठवाए जाएँगे 

हम अहल-ए-सफ़ा मरदूद-ए-हरम 
मसनद पे बिठाए जाएँगे 

सब ताज उछाले जाएँगे 
सब तख़्त गिराए जाएँगे 

बस नाम रहेगा अल्लाह का 
जो ग़ाएब भी है हाज़िर भी 
जो मंज़र भी है नाज़िर भी 

उट्ठेगा अनल-हक़ का नारा 
जो मैं भी हूँ और तुम भी हो 

और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा 
जो मैं भी हूँ और तुम भी हो 
हम देखेंगे 

त्याचा मी केलेला अनुवाद असा: 

आम्हीही पाहू तो दिवस, 
जो येणं  अटळ आहे;
ज्याचं त्यानं वचन दिलंय, जे 
दगडावर कोरून ठेवलंय :
अन्यायाचे आणि अत्याचाराचे अजस्र पहाड 
जेव्हा कापसाप्रमाणे उडून जातील; 
आमच्या गुलामगिरीला आधारभूत झालेली 
जमीन जेव्हा थरारून उठेल;
आम्हाला  न्याय देण्याचा ठेका घेणाऱ्यांच्या
डोक्यावर जेव्हा वीज कडाडू लागेल;
खुदाच्या पवित्र काबा मधून 
जेव्हा सगळ्या मूर्ती हटवल्या जातील. 
तेव्हा, 
निष्कलंक असूनही तिरस्कराने झिडकारलेल्या 
आम्हाला सिंहासनावर बसवलं जाईल;
हवेत भिरकावले जातील सारे राजमुकुट ; 
जमीनदोस्त होतील सगळी सिंहासनं. 
(सगळं नष्ट होईल) बस एक अल्लाचं नाव राहील; 
अल्लाह, जो दिसत नाही, पण हजर आहे;
तो दृश्य आहे आणि द्रष्टाही. 
मग होईल ‘अन-अल्-हक’चा गजर;
जे तू आहेस आणि मीही. 
आणि  जगात ‘खल्क-ए-खुदा’ची सत्ता चालेल;
जो तू आहेस आणि मीही... 

एका इस्लामी, धर्मवेड्या लष्करी हुकूमशहाच्या विरोधात लिहिलेली आणि पद-दलित जनतेच्या राज्याची स्वप्ने दाखवणारी ही कविता हिंदुविरोधी आहे अशी काहींची भावना झाली, तर ते कुणाला चमत्कारिक वाटेल. पण ती कविता हिंदुविरोधी आहे, असे काही हिंदूंना वाटले तर त्यातही अस्वाभाविक असे काही नाही. कोणताही कवी आपले म्हणणे अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी काही प्रतीके वापरत असतो. ही प्रतीके त्याच्या, आणि ज्यांना उद्देशून कविता लिहिली आहे त्यांच्या संस्कृतीत रुजलेली असतात. इथे कवी धर्माने मुस्लिम आहे. तो स्वतः कदाचित धार्मिक नसेलही, पण धर्मनिष्ठ मुस्लिमांशी त्याला संवाद साधायचा आहे. तेव्हा त्यासाठी इस्लामी संस्कृतीत रुजलेली प्रतीकेच तो वापरणार, हे कुणालाही समजण्यासारखे आहे. त्यामुळे, काबाच्या मशिदीतून मूर्ती हटवल्या जातील आणि फक्त अल्लाचेच नाव राहील असे जेव्हा कवी म्हणतो तेव्हा त्याचा प्रतीकात्मक अर्थ 'झियासारख्या माजलेल्या सर्वसत्ताधीशांना हटवले जातील आणि फक्त सत्यच (अल्लाच) टिकेल.' असा घेतला जायला हवा. नंतरच्या ओळीत तर ते स्पष्टच होते. 'अन-अल्-हक'चा अर्थ मीच ईश्वर आहे, 'अहं ब्रम्हास्मि' हाच होतो.

इथे फैझना अभिप्रेत असलेला मी, म्हणजे सामान्य माणूस! तोच सत्य आहे, त्याच्याच हाती ही सत्ता जाईल असे फैझना म्हणायचे आहे. सूफी फकीर 'अन-अल्-हक'चा जप करत असत. परंतु इस्लाम धर्म तर 'अल्लाह आणि बंदा' यांच्यात द्वैत मानतो, त्याच्या उलट ‘मीच परमेश्वर आहे’ असे म्हणण्याचा उद्धटपणा केल्याबद्दल कित्येक सूफींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

कवी कितीही प्रतिभावान असला तरी नवीन प्रतीके निर्माण करण्याच्या त्याच्या क्षमतेला काही मर्यादा असतेच. त्या मर्यादेबाहेर तो सहसा जाऊ शकत नाही. सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून अशी प्रतीके तारतम्याने वापरावी लागतात. विशेषतः जिथे अनेक संस्कृती एकत्र येतात तेथे तारतम्याची आवश्यकता वाढते. कारण संदर्भ बदलला की प्रतीकांचा अर्थ बदलतो.

'तेरा मेरा रिश्ता क्या? ला इलाह इलल्लाह' अशी घोषणा करणाऱ्यांना पाठिंबा देणारे जेव्हा ही नज्म गातात तेव्हा 'काबासे सब बुत उठावाये जायेंगे… बस नाम रहेगा अल्लाहका' या ओळींचा अर्थ ‘बूतपरस्त’ लोकांच्या दृष्टीने वेगळा होतो. पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळीही 'पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाह इलल्लाह' अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे, हा प्रश्न ‘टेक्स्ट’चा न राहता ‘हायपर टेक्स्ट’चा होतो.

'हायपर टेक्स्ट' हे काय आहे? तर ही एक संगणकीय महाजाल किंवा वर्ल्डवाईडवेबशी (WWW) संबंधित संकल्पना आहे. एका गोष्टीचा संबंध दुसऱ्या गोष्टीशी कम्प्युटर कसा जोडायचा त्यामागचे तर्कशास्त्र ही संकल्पना सांगते. ही कल्पना 1941 साली लुई बोर्गेस या स्पॅनिश कादंबरीकाराने लिहिलेल्या एका रहस्यकथेवर आधारलेली आहे. कथेचे नाव आहे 'गार्डन ऑफ फोर्किंग पाथ'. फोर्किंग पाथ म्हणजे फाटा, फुटलेली वाट. या गोष्टीचा काळ पहिल्या महायुद्धाच्या वेळचा आहे. आजच्यासारखी त्यावेळी सहजासहजी माहिती पाठवता येत नव्हती. गोष्ट थोडक्यात अशी आहे: त्सुन नावाचा एक चिनी हेर जर्मनीसाठी इंग्लंडमध्ये हेरगिरी  करत असतो. त्याच्यावर सोपवलेले काम असते, ब्रिटिश तोफखाना लंडनमध्ये कुठे ठेवला आहे हे शोधून काढणे. त्सुनने ती जागा शोधलेली असते, पण जर्मनांना ते कसे कळवायचे हा त्याच्यापुढे प्रश्न असतो. कारण, एम.आय. 5 या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेला तो गुप्तहेर आहे हे कळलेले असते; आणि ती त्याच्या मागावर असते. त्सुनलाही हे सारे ठाऊक आहे. त्यामुळे, तो त्यांचा ससेमिरा चुकवत पळतो आहे...

असे पळत असताना तो अल्बर्ट नावाच्या एका माणसाच्या घरात घुसतो. या अल्बर्टजवळ एक पुस्तक असते. त्याचे नाव - 'गार्डन ऑफ फोर्क पाथ'. त्या पुस्तकाचा काही भाग गायब झालेला असतो, त्यामुळे त्यांना फोर्क पाथचे - फाट्याचे रहस्य कळत नसते. विशेष म्हणजे, ते पुस्तक त्सुनच्याच एका नातेवाईकाने लिहिलेले असते. अल्बर्ट आणि त्सुन मिळून त्या फाट्याचे कोडे सोडवतात. हा फाटा जमिनीवर (स्पेसवर) नसून काळावर (Timeमध्ये) असतो. एकाच 'वेळी' अनेक फाटे फुटत असतात, एकाच ठिकाणाहून नव्हे. या रहस्याचा उलगडा होईपर्यंत एम.आय.5 चे ऑफिसर त्याच्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्सुनला आता कळून चुकते की, पळून जाणेही शक्य नाही आणि जर्मनांना माहिती देणेही शक्य नाही. एम.आय.5चे ऑफिसर त्याला पकडायला येत असतात, तेवढ्यात तो पिस्तूल काढतो आणि अल्बर्टला गोळी मारतो.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या लंडन टाइम्समध्ये बातमी येते: जर्मन हेर त्सुन पकडला गेला. पण आत्महत्येचा प्रयत्न न करता त्याने अल्बर्ट नावाच्या अनोळखी माणसावर गोळी झाडली आणि तो पोलिसांच्या स्वाधीन झाला. स्वतःवर गोळी झाडण्याऐवजी अनोळखी अल्बर्टला त्सुनने का मारले, याचा अर्थ ब्रिटिशांना समजत नाही; मात्र जर्मनांना तो समजतो. आणि संध्याकाळपर्यंत अल्बर्ट पार्क मधला ब्रिटिश तोफखान्याचा तळ जर्मन उध्वस्त करतात.

नज्म गाणारे आणि तक्रार करणारे दोघेही हायपर टेक्स्ट जाणण्याइतके उच्च-शिक्षित आहेत. त्यामुळे आय.आय.टीच्या डिरेक्टरांना चौकशी समिती नेमावी लागते. इथे दुसराही एक प्रश्न निर्माण होतो. भाषेचे अमर्याद सामर्थ्य जसे प्रस्तुत प्रकरणात दिसून येते तसेच एकेश्वरवादाच्या मर्यादाही.

कविवर्य भा. रा. तांब्यांनीही एक क्रांतिगीत लिहिले आहे, ‘रुद्रास आवाहन’ या नावाचे. काव्य म्हणून, कदाचित, ते अधिक ‘उजवे’ही ठरेल. त्याची सुरवात आहे,

डमडमत डमरु ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येई रूद्रा ।

इथे निश्चितच रुद्र या उग्र हिंदू देवतेला आवाहन आहे. पण येथे दुसऱ्या धर्माचा अधिक्षेप होत नाही. हिंदू धर्म ‘एक्सक्ल्युसिव्ह’ नसल्यामुळे, रुद्राला आवाहन करताना अन्य देवतांच्या मूर्ती फोडण्याची किंवा अन्य धर्माच्या संकल्पनांचा उपमर्द करण्याची जरुरी तांब्यांना भासत नाही. 'साधनानां अनेकता' असल्याने शक्य झाले आहे. दुर्दैवाने फैझ अहमद फैझ असे करू शकत नव्हते. 

या प्रश्नाला केवळ सांस्कृतिकच नाही तर ऐतिहासिक संदर्भही आहे. 'वन्दे मातरम्' हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही. कारण त्यात मूर्तिपूजा अभिप्रेत आहे. आणि ती आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे, असा काही मुस्लिम धर्मियांचा समज आहे. त्या काव्यातील प्रतीकात्मकता धर्मनिष्ठांना आपण पटवून देऊ शकलेलो नाही. म्हणून, आजही तो प्रश्न पूर्ण मिटलेला नाही. 'हम देखेंगे'ला असलेला हिंदूंचा विरोध ही मुस्लिमांच्या 'वन्दे मातरम्'च्या विरोधाची प्रतिक्रियाही असू शकते. कारण, दोन्हींची जातकुळी एकच आहे. समाधानाने एकत्र राहण्यासाठी दोन्ही समाजगटांनी एकमेकांच्या भावनांची कदर करायला हवा. एकतर्फी चांगुलपणा फार काळ टिकत नसतो, एवढाच याचा अर्थ आहे.  

- हरिहर कुंभोजकर
(hvk_maths@yahoo.co.in)

Tags: हरिहर कुंभोजकर harihar kumbhojkar faiz ahmad faiz भा रा तांबे झुल्फिकार अली भुत्तो हम देखेंगे hum dekhenge Load More Tags

Add Comment