साने गुरुजींची एका वाक्यात ओळख सांगायची असेल तर 'मानवतावादाचे सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ते' असे म्हणता येईल. ते अमळनेरला गेले होते तत्त्वज्ञान शिकण्यासाठी, शिक्षक होण्यासाठी नव्हे! मात्र तत्त्वज्ञानाचा उपयोग अंतिमतः मानवी जीवन सुखी व समाधानी होण्यासाठी केला पाहिजे, असा साक्षात्कार त्यांना झाला. आणि मग ते मानवी संस्कृतीच्या वाटचालीचा शोध घेऊ लागले. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांनी ‘भारतीय संस्कृती’, ‘चिनी संस्कृती’ व ‘इस्लामी संस्कृती’ ही तीन पुस्तके लिहिली. यातील पहिले पुस्तक त्यांच्या हयातीत प्रकाशित झाले, दुसरे पुस्तके कधीच प्रकाशित होऊ शकले नाही, तिसरे पुस्तक त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झाले.
ही तीन पुस्तके लिहिताना, गुरूजींच्या मनात भारतीय, इस्लामी व चिनी या तिन्ही संस्कृती आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि आपल्या देशबांधवांना समजावून दिल्या पाहिजेत हा विचार प्रबळ झालेला असणार. किंबहुना त्यांचा मानवतावादी विचार बळकट होण्यासाठी आणि 'खरा तो एकचि धर्म' ही अजरामर प्रार्थना त्यांच्या लेखणीतून बाहेर येण्यासाठी वरील तिन्ही पुस्तकांच्या काळातील अभ्यास व चिंतन उपयुक्त ठरले असणार. अशा पार्श्वभूमीवर इस्लामी संस्कृती या छोट्या व अपूर्ण, पण विशेष महत्त्वाच्या पुस्तकाकडे पाहायला हवे. इस्लामी संस्कृतीचा उगम, विकास व विस्तार कसा झाला याविषयीचे कुतुहल हे पुस्तक काही प्रमाणात शमवते आणि बऱ्याच जास्त प्रमाणात वाढवते. कोणत्याही उत्तम पुस्तकाचे हे प्रमुख लक्षण असते.
अशा या पुस्तकावर सावित्री-फातिमा विचारमंच या संस्थेने शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट अशी त्रिस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे आम्ही स्वागत करतो आणि स्पर्धेत अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी व्हावे असे आवाहन करतो. आपला देश अधिकाधिक एकात्म व प्रगतिशील व्हावा यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणारा आहे!
- संपादक (साधना साप्ताहिक व कर्तव्य साधना)
सावित्री-फातिमा विचारमंच या संस्थेविषयी
सामाजिक ऐक्य अबाधित राखण्याच्या उद्देशाने 2017 मध्ये सावित्री-फातिमा विचारमंच, पुणे या संस्थेची स्थापना झाली. संभाजीराव बोरुडे हे संस्थेचे अध्यक्ष असून अली इनामदार हे समन्वयक आहेत. मंचातर्फे सामाजिक सद्भाव वृंद्धिगत करण्याच्या दृष्टिने विविध कृतीकार्यक्रम घेतले जातात. फुलेवाडा येथे आयोजित करण्यात आलेली ‘सामाजिक ऐक्य परिषद’,असेम्ब्ली हॉलमधील सर्वधर्मीय परिषद इत्यादी त्यातील महत्त्वाचे उपक्रम.
स्पर्धेचा हेतू आणि स्पर्धेचे तपशील
सध्याच्या वातावरणात राजकीय व आर्थिक लाभासाठी राजकारणी लोक देशाला वेठीस धरत आहेत. स्वार्थी राजकारणासाठी समाजामध्ये परस्परद्वेषाची मोहिम राबवली जात आहे. एका विशिष्ट समाजाच्या-विशेषतः मुस्लिमांच्या- राक्षसीकरणाची मोहीम तीव्र झाली आहे. या समाजाविषयी बहुसंख्याक समाजात असलेल्या अज्ञानाचा गैरफायदा धर्माध संघटना घेतात. जनमानसाच्या अज्ञानाचे रुपांतर भीतीत आणि भीतीचे रुपांतर द्वेषात करण्याची मोहीम संघटीतपणे आखली जाते. परिणामी बहुसांस्कृतिक भारतीय समाजातील सद्भावना, सौहार्द, सहजीवन इत्यादी मुल्यांचा ह्रास होत आहे. इतकेच नाही तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या राज्यघटनेतील मूलभूत तत्त्वालादेखील हादरे बसले आहेत. अशा काळात देश व समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या तमाम विद्वान, अभ्यासक, संघटक, कार्यकर्ते व नागरिकांनी ‘सामाजिक ऐक्य’ अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. त्याकरता साने गुरुजींनी लिहिलेलं इस्लामी संस्कृती हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे.
या पुस्तकाच्या प्रस्ताविकात आचार्य विनोबा भावे लिहितात, “हिंदू आणि मुसलमान हजारो वर्षांपासून भारतात एकत्र राहत आहेत. तथापि एकमेकांच्या थोर पुरुषांविषयी आणि धर्मग्रंथांविषयी एकमेकांना पुरेशी काय, फारशी माहिती नसते. ती असणे जरूरी आहे. कारण आम्हाला एकत्र नांदायचे आहे आणि एकत्र नांदून, विविधतेत एकता कशी राखता येते, इतकेच नव्हे, विविधतेनेच एकता कशी खुलते, हे जगाला दाखवायचे आहे. या दृष्टिने प्रस्तुत पुस्तक विशेष स्वागतार्ह आहे.”
या पुस्तकातून मांडलेला विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी सावित्री-फातिमा विचारमंच या पुण्यातील संघटनेने पैगंबर जयंतीचे आणि साने गुरुजींच्या जयंतीचे निमित्त साधत एक कृतिकार्यक्रम आखला आहे. त्यात साने गुरुजींच्या ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकावर आधारित लेखी परीक्षेचे आयोजन पुणे येथे करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पर्धकांची तीन वयोगटात विभागणी करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्वांसाठी खुली आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी म्हणजे साने गुरूजी जयंतीला या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेतून एकूण 12 पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यांची एकूण रक्कम 1 लाख 92 हजार रुपये आहे. शिवाय, स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप -
ही स्पर्धा शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट अशी त्रिस्तरीय होणार आहे.
गट 1 : 10वी ते 12वी
गट 2 : पदवीधर, पदव्युत्तर आणि पी.एच.डी.
गट 3 : खुला गट
प्रत्येक गटांमध्ये अनुक्रमे पहिले बक्षिस 31,000 रुपये, दुसरे 21,000 रुपये आणि तिसरे 11,000 रुपये अशी तीन बक्षिसे दिली जातील. या व्यतिरिक्त प्रत्येक गटामध्ये उत्तेजनार्थ 1100 रुपये बक्षीस दिले जाईल. सोबतच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रशस्तीपत्रक दिले जाईल. नावनोंदणी शुल्क प्रत्येकी 100 रुपये असेल, नावनोंदणी ऑनलाइन केली जाईल. नाव नोंदणी 25 ऑक्टोबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 या कालावधीत करता येईल.
नावनोंदणी केल्यानंतर प्रत्येकाला साने गुरूजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ हे पुस्तक सावित्री-फातिमा विचारमंचातर्फे विनामूल्य देण्यात / पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर स्पर्धकांनी हे पुस्तक काळजीपूर्वक वाचून परीक्षेची तयारी करणे अपेक्षित आहे. 18 डिसेंबर 2021 रोजी या पुस्तकावर आधारित 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षा पुणे शहरात आयोजित केलेली आहे. बाहेरील विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभाग नोंदवता येऊ शकेल, परंतु प्रवास व निवासाची व्यवस्था त्यांना स्वत: करावी लागेल. परीक्षेचे ठिकाण आणि वेळ व्यक्तिगत संपर्क साधून कळवले जाईल. सावित्री-फातिमा विचारमंच आयोजित या स्पर्धेत अधिकाधिक व्यक्तींनी सहभागी होऊन; समाजात सद्भावना वृद्धिंगत करण्याच्या कार्यात सामील व्हावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणी करण्यासाठी या लिंकचा वापर करावा.
Tags: साने गुरुजी इस्लामी संस्कृती स्पर्धा Sane Guruji s Islami Sanskruti Contest Statement Load More Tags
Add Comment