टेकड्यांवर स्वच्छता अभियान राबविणारी पुण्यातील मुले 

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने घेतलेली  मुलाखत 

माझ्या ओळखीचा एक पुण्यात राहणारा १७ वर्षांचा हुशार तरूण मुलगा आहे. त्याला ट्रेकिंग, गिर्यारोहण या गोष्टींची खूप आवड आहे. पुण्यातल्या टेकड्यांवर लहानपणापासूनच तो आईसोबत फिरायला जायचा. त्यामुळे त्याला ही आवड निर्माण झाली, आणि ती हळूहळू वाढत गेली. पुढे त्याचा एक ट्रेकिंगचा ग्रुप तयार झाला... पुण्याच्या निम्यापेक्षा अधिक तरुणांना लागू पडेल अशी ही ओळख. टेकड्यांनी आणि किल्ल्यांनी वेढलेल्या, सह्याद्रीच्या शिखरांशी, कड्यांशी जवळीक असलेल्या या शहराला ट्रेकिंगचा नाद नसता तरच नवल. इथले तरूण टेकड्यांवर फिरायला जाण्यात, पायवाटांनी किल्ले सर करण्यात आनंद शोधणारे, मित्र मिळवणारे. सगळं छान आहे! पण हे लोक  टेकड्यांचा आणि किल्ल्यांचा परिसर मात्र कचऱ्याने, प्लॅस्टिकने खराब करतात. तरूणच नव्हे सगळेच करतात. पण माझ्या ओळखीच्या ज्या तरुणाचा मी उल्लेख केला, तो मात्र या गोष्टीला असलेला एक सन्माननीय अपवाद आहे. – ओजस फाटक त्याचं नाव. तो टेकड्या स्वच्छ करतो. १२ वर्षांचा असल्यापासून करतो. आणि नुसता स्वच्छ करून थांबत नाही, तर या कामाला संघटनात्मक स्वरूप देऊन ते काम दीर्घकालीन sustainable initiative म्हणून चालू राहील यासाठीही तो प्रयत्नशील आहे. निसर्गावर मनापासून प्रेम करणाऱ्या, परिसरातला निसर्ग आणि पर्यावरण यांच्या राखणीचा एक पाईक झालेल्या ओजसशी आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने मोकळा संवाद साधला. त्याची गोष्ट खरोखर अभिमानास्पद म्हणावी अशीच आहे.

प्रश्न – ओजस, तुझी थोडक्यात ओळख करून देशील? तू सध्या काय करतोस, तुझ्या आवडी निवडी काय?
उत्तर – माझं नाव ओजस फाटक. मी पुण्यात कोथरूडमध्ये राहतो. अक्षरनंदन शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे, आणि आत्ता बारावीला विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. माझ्या खूप वेगवेगळ्या लहानमोठ्या आवडीनिवडी आहेत. अगदी आवर्जून सांगायचं तर मी पिआनो वाजवतो, नाटक करतो, लेखन करतो, कराटे शिकतो, आणि मला ट्रेकिंग-गिर्यारोहण यांचीही खूप आवड आहे.

प्रश्न – तुझ्या या ट्रेकिंग-गिर्यारोहणाच्या आवडीतूनच तुझं टेकडी स्वच्छतेचं काम सुरू झालं असेल, बरोबर ना?
उत्तर – हो अर्थातच. पण हे काम सुरू व्हायला आणखीही एक निमित्त घडलं. हवा चांगली व्हावी, प्रदूषणावर थोडा उतारा व्हावा, एकूणच पर्यावरण चांगलं राहावं, या हेतूने ज्येष्ठ गिर्यारोहक आणि वनस्पती अभ्यासक उषःप्रभा पागे यांनी टेकड्यांवर स्थानिक झाडं लावली पाहिजेत असं सुचवलं होतं. २०२० मध्ये जेव्हा करोना काळातला पहिला लॉकडाऊन सुरू होता, तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी, माझी आई आणि माझा भाऊ पुण्यातल्या टेकड्यांवर जाऊन स्थानिक वनस्पतींच्या बिया पेरण्याचं काम करायचो. आणि वनविभागाने टेकड्यांवर केलेला कचरा साफ करायचो. तीच या कामाची सुरुवात म्हणावी लागेल.

प्रश्न – त्या कठीण काळात दोन चांगली कामं करायला तू सुरुवात केलीस. पण मुख्य म्हणजे, लॉकडाऊन संपल्यानंतरही केवळ पूर्वीच्या व्यक्तिगत रूटीन मध्ये न अडकता, ते काम तुझ्या नव्या रूटीनचा भाग झालं आणि ते तू पुढची पाच वर्षं सातत्याने करत राहिला आहेस. त्याला “ECOFORCE” या नावाने संस्थात्मक स्वरूपही दिलं आहेस. ही कल्पना कशी सुचली? काही विशिष्ट घटनेने प्रेरणा मिळाली का? की सहज सुचलं?
उत्तर – मी लॉकडाऊन सुरू असताना सातवीत होतो. तेव्हा मी हॅरी पॉटरची पुस्तकं वाचायचो. पाचव्या पुस्तकात जसा हॅरी वॉल्डेमॉर्टच्या विरोधात त्याची स्वतःची एक सेना उभी करतो, तशी कचऱ्याच्या विरोधात आपली पण एक सेना असली पाहिजे असं मला वाटायचं. माझी कल्पना माझ्या काही जवळच्या मित्रांना सांगितली, त्यांनाही ती पटली. मी लॉकडाऊन सुरू असतानाच त्यांना कल्पना देऊन ठेवली होती, की नियम शिथिल झाले की हे असं काम आपण मिळून सुरू करुयात म्हणून. त्याप्रमाणे २०२०च्या शेवटी शेवटी, मी आठवीत असताना, आम्ही गटाने कामला लागलो.

प्रश्न – तुमचा गट कसा निर्माण झाला? कसा मोठा होत गेला? गटाची संस्था कशी झाली? तिचं ECOFORCE हे नाव कसं सुचलं?
उत्तर – अगदी सुरुवातीला आम्ही जे आठ लोक मिळून कामाला लागलो, ती सगळी माझी जवळची मित्रमंडळीच होती. लहानपणापासूनची. अन्वय परळीकर, मुक्ता परळीकर, शाल्मली नलावडे, साहिल गोलटगावकर, ओजस खेडकर, रमा राजपुरोहित, निमिष पळणीटकर आणि मी स्वतः असे आम्ही आठ जण सुरुवातीला होतो. अजूनही त्याच तळमळीने काम करतोय. हीच आमची Core Team आहे असं म्हणता येईल. हळूहळू आमचे आणखी काही मित्र आमच्या सोबत आले, मित्रांचे मित्र, त्यांचे मित्र असे सगळे आमच्याशी जोडले गेले. सोशल मीडिआवर आमच्या पोस्ट्स पाहून काही लोक आमच्याबरोबर काम करायला लागले. आम्हाला काम करताना प्रत्यक्ष पाहून काहींना सहभागी व्हावंसं वाटलं. असं ते वर्तुळ वाढत गेलं आणि अजूनही वाढतंच आहे. पूर्वी आम्ही आठ जण एक टेकडी साफ करायचो, आता आम्ही ७५-८० जण मिळून आळीपाळीने चार टेकड्या साफ करतो.

काम सुरू केल्यानंतर वर्षभरानंतर असं वाटायला लागलं की आपला नुसता अनौपचारिक मित्रगट नसावा, तर संस्था असावी. माझ्या सख्ख्या मामाने अणि त्याच्या मित्रांनी लहान असताना निसर्गाच्या अभ्यासासाठी एक रानवा नावाची संस्था चालू केली होती, आणि त्याच्या अक्षरांचा एक full form सुद्धा होता. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मीही या गटासाठी असंच नाव शोधून काढलं. सुरुवातीची दोन वर्ष आमच्या गटाला काहीच नाव नव्हतं. मात्र २०२२ मध्ये आम्ही ECOFORCE असं नाव घेतलं. ज्याचा full form आहे Environmental Conservation with Ordinary Folk On Realistic Circumstances for Earth. पर्यावरणासाठी जमेल ते realistic काम करणं हे आमचं उद्दिष्ट आहे.

प्रश्न – तुम्ही काय काय, कसं कसं, कुठे कुठे काम करता?
उत्तर – आम्ही महिन्यातून सहा वेळा टेकड्यांवरील परिसर स्वच्छ करतो. पुण्यातल्या वेताळ टेकडी, म्हातोबा टेकडी, महात्मा टेकडी, हनुमान टेकडी, या चार टेकड्यांवर सध्या आम्ही काम करतो. वेळा ठरलेल्या असतात, एका वेळी दोन-तीन तास काम करतो. पोती आणि रबर ग्लव्ज घेऊन आम्ही टेकड्यांवर जातो आणि दिसेल तो अविघटनशील कचरा गोळा करत करत खाली येतो.

प्रश्न – याने टेकडी तर स्वच्छ होते, पण मग गोळा केलेल्या कचऱ्याचं तुम्ही पुढे काय करता?
उत्तर – गटातल्या सर्वांनी गोळा केलेला कचरा टेकडीखाली एकत्र करतो, त्याचं थोडं वर्गीकरण करतो. आणि मग सिंहगड रोडला रूद्र  म्हणून एक recycling centre आहे, त्यांच्याकडे आम्ही त्यातलं प्लॅस्टिक देतो. ते पुढे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून इंधन निर्मिती करतात. बाकी unrecyclable कचरा आम्ही भंगार वाल्यांना फुकटात देऊन टाकतो.

प्रश्न – गोळा केलेल्या कचऱ्याच्या sustainable व्यवस्थापनाविषयी काही भविष्यात योजना आहेत का? त्याचं recycling, upscaling, repurposing, वगैरेसाठी, जे फेकायचंच आहे ते कुठे, कसं, सुरक्षितपणे फेकावं या दृष्टीने?
उत्तर  कचऱ्याला recycle करणे reuse करणे आणि upcycle करणे एवढ्या तीन गोष्टी करण्याजोग्या आम्हाला माहिती आहेत. टेकडीवरचा कचरा reuse तर काही करता येत नाही. त्यामुळे recycling साठी आम्ही तो देऊन टाकतो. प्लॅस्टिक recyclig पासून सहसा पुन्हा प्लॅस्टिक निर्मिती करता येते, इंधन निर्मिती करता येते नाहीतर वीज निर्मिती होऊ शकते. याहून वेगळ्या कचरा व्यवस्थापनाच्या sustainable पद्धती असतीलच. त्याची माहिती करून घेऊ, शिकून घेऊ. आणि भविष्यात विचार नक्की करू.

प्रश्न – म्हणजे तू आत्ता जे काम सुरू केलं आहेस त्याच क्षेत्रात शिक्षण घेणार का?
उत्तर – हो, Environmental Science मध्ये किंवा निसर्गाशी संबंधित विषयात मला शिक्षण घ्यायचं आहे. पर्यावरणाशी संबंधित काहीतरी धमाकेदार चांगलं काम आयुष्यात करणं असा माझा ध्यास आहे. मग त्याच्याशी संबंधित जे काही शिक्षण घ्यावं लागेल ते मी घेईन.

प्रश्न – मगाशी तू म्हणालास की तुम्ही वन विभागाने केलेला कचरा साफ करायचात. म्हणजे नेमकं काय? वनविभाग काय कचरा टेकडीवर करू शकतो?
उत्तर – आम्ही ज्या टेकडीपासून आमचं काम सुरू केलं, ती टेकडी वनविभागाच्या हद्दीत येते. स्वतः वनविभागच तिकडे कचरा करायचा. काही वर्षांपूर्वी वनविभागाने एक प्रकल्प हाती घेतला होता. ग्लिरिसिडिया या विदेशी झाडाच्या ठिकाणी देशी झाडं लावण्याचा. ते जी रोपं आणायचे, त्याच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या जिथे काढतील तिथेच टाकून द्यायचे. हा मोठा आणि दीर्घकालीन प्रकल्प होता, त्यामुळे ते प्लॅस्टिक पिशव्यांचं प्रमाण खूपच जास्त होतं. शिवाय येणाऱ्या कामगारांचा इतरही खाण्यापिण्याचा कचरा असायचा तो वेगळाच. तो सगळा कचरा आम्ही गोळा करायचो. मग आम्ही एकदा ठरवून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना वारंवार विनंती केली, वारंवार पत्रव्यवहार केले आणि काही काळाने आमच्या त्या प्रयत्नांना यश आलं. त्यांचं तसं प्लॅस्टिक कचरा टेकडीवर सोडून जाणं, आणि प्लॅस्टिक जाळणंही पुष्कळ कमी झालं. आमच्या कामाच्या सुरुवातीच्या दिवासतले टेकडीवरचे अनुभव, वनविभागाशी चर्चा करताना आलेले अनुभव, या सगळ्या अनुभवांवर आधारित असं एक छोटेखानी पुस्तकही मी लिहिलंय. आधी अटक मटक या मुलांच्या मासिकात लेखमाला लिहिली होती, मग त्याचं पुस्तक झालं. “माती आणि पाती” असं त्या पुस्तकाचं नाव आहे.

प्रश्न – ही खूपच आशादायक गोष्ट आहे. आपल्या कामाची अशी पावती मिळणं समाधानकारक आहे. हे काम करताना अशी पावती तुम्हाला वारंवार मिळत असेल, काही मासलेवाईक अनुभव सांगशील का? तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या घटना, व्यक्ती यांच्याविषयी सांगशील का?
उत्तर – आम्हाला काही अनुभव खूपच चांगले आले. म्हणजे जेव्हा टेकडीवर नेहमी येणाऱ्या लोकांना आम्ही हे काम नियमितपणे, न कंटाळता, कोणतेही पैसे न घेता करताना दिसतो, तेव्हा खूप लोक कौतुक करतात, क्वचित काही मोजके लोक कामात त्या त्या वेळी सहभागी होतात. मग आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो, त्यांना वेळोवेळी मदतीला बोलवतो. काही लोक तर अश्या पद्धतीने आमच्या टीम चे कायमस्वरूपी सदस्यही झाले. शिवाय अनेक लोक सोशल मीडिया वर आमचं कौतुक करतात, आम्ही कोणतीही जाहिरात जाणीवपूर्वक न करता आमच्या कामाला प्रसिद्धी मिळते, थोडा awareness वाढतो. लोक या गोष्टीचा निदान विचार करतात, हे सगळं मला खूप महत्त्वाचं वाटतं. उषःप्रभा पागे आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. वेळोवेळी कौतुक आणि मार्गदर्शन करतात. काही सामाजिक संस्थांनी आमच्या कामाची दखल घेऊन आमचा सन्मान केला आहे, त्यातूनही प्रोत्साहन मिळतं. आणि टीमच्या सदस्यांचं एकमेकांना पाठबळ असतंच. त्याने न थांबता काम करत राहण्याचा उत्साह वाढतो.

प्रश्न – काही अनुभव उलटही आले असतील. काही अडचणी आल्या असतील...
उत्तर – उलट अनुभव म्हणजे, अनेकदा टेकडीवर चालायला येणारे लोक आमच्याकडे येऊन सांगतात, पलीकडच्या बाजूने, पायथ्याला, किंवा अमुक तमुक मंदिरापाशी खूप कचरा आहे, तो गोळा करा. किंवा, long weekend येऊन गेला तर जरा जास्त कचरा असेल, तुमचं काम वाढलंय, किंवा असं काहीतरी. म्हणजे, हे काम आमचंच आहे असं गृहीत धरून, येऊन आम्हाला काम सांगतात. आम्ही ते करतोच आणि करणारच आहोत,  पण या लोकांना स्वतःची काहीच जबाबदारी वाटत नाही का? असा प्रश्न पडतो. मला सांगावंस वाटतं, की अहो, हे तुम्ही केलं तरी चालणारे. मी हे नागरिक म्हणून जबाबदारीने करतोय, तुम्हीही करू शकता, कोणीही करू शकतं. आम्ही करतो काम चांगलं आहे म्हणता, पण तेच चांगलं काम करायला स्वतः तयार नसता! आमचं काम बघून इतरांना प्रेरणा मिळेल म्हणता पण तुम्हाला स्वतःला काही प्रेरणा मिळत नाही!

एक मोठी अडचण अशी येते की आमच्या drives ना कधीकधी कामाला लोकच येत नाहीत. आणि कधी कधी एवढे येतात की टीमला नियंत्रणात ठेवणं, सूचना देणं वेळोवेळी direct करणं हेही शक्य होत नाही. नेमकं काय केल्याने लोक येतील, किंवा नियंत्रित संख्येतच येतील पण नियमितपणे येतील याचं गणित बसवण्यासाठी, समतोल साधण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्यातूनच शिकतो.

सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे लोक कचरा करायचे बंदच होत नाहीत. आम्ही आज जिथे सफाई केली तिथे जेव्हा पुढच्या वेळी जातो, तेव्हा परत प्रचंड प्रमाणात कचरा तिथे असतोच. आणि आम्ही तो साफ करत राहतो. कचरा करणारे लोक आमच्या संपर्कात थेट अजून आलेले नाहीत. आणि आम्हीही त्यांना गाठून थोपवण्याचा फार प्रयत्न अजून केलेला नाहीये. कधीतरी त्यांच्याशी जाऊन बोलावं अणि आपल्या बाजू मांडाव्या असा विचार आहेच.

प्रश्न – लोक सर्वत्र कचरा करतात, ही खूपच मोठी समस्या आहे. ती सोडवण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केलेत का? त्याचा उपयोग कितपत होतो? निदान कचरा टाकणं कमी होतं का?
उत्तर – म्हातोबा टेकडीवरच्या कचऱ्याच्या प्रमाणात खरंच खूप फरक पडलाय, कारण आम्ही तिथं खूपच जास्त काम केलंय. याचाच परिणाम म्हणजे म्हातोबा टेकडीवर हिरवळसुद्धा बाकी टेकड्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे .पूर्वी वनविभागाने केलेला कचरा या भागात खूप पडलेला असायचा. ते प्लॅस्टिक उचललं नसतं तर एवढी हिरवळ कधी आलीच नसती.

प्रश्न – तुम्ही कधी राजकीय सपोर्ट घेण्याच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला का? तुमच्या प्रयत्नांना राजकीय विरोध तर होत नाही ना?
उत्तर – आम्ही एकदा काही नगरसेवकांना भेटून टेकड्यांवर ठिकठिकाणी कचरापेट्या ठेवणे, स्वच्छता राखण्याविषयी पाट्या लावणे, नियम करणे अश्या काही सूचना करून पाहिल्या.आमच्या सूचना चांगल्या आहेत, आम्ही खूप गरजेचं सामाजिक काम करतो आहोत असं कौतुक झालं, पण त्याविषयी प्रत्यक्ष कृती झाली नाही. आमच्या कामाला सध्या तरी राजकीय विरोध होत नाही, उलट कौतुक, नैतिक पाठिंबा हेच मिळतं पण त्यापलीकडे कृतिशील पाठिंबा, काही concrete बदल हे मात्र घडत नाही. आम्हाला जेव्हा राजकीय विरोध व्हायला लागेल, तेव्हा त्याचा अर्थ नक्कीच असा असेल की लोकांचे चुकीचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतील. आम्ही संस्था म्हणून मोठे असू, कार्यकर्ते म्हणून आमची nuisance value मोठी झालेली असेल. त्यामुळे असा विरोध होईल तेव्हा ते चांगलंच लक्षण असेल, असं मला वाटतं.

प्रश्न – तुम्हाला, तुमच्या कामाला कधी लोकांकडून विरोध झाला आहे का? विरोधाचं स्वरूप काय होतं? तीव्रता किती होती?
उत्तर – एकदा एका टेकडीवर एका वयस्कर लोकांच्या गटाने आम्हाला सांगितलं, की तुमचं हे काम बंद करा, आणि आम्ही इथे झाडं लावतो, त्या कामात सहभागी व्हा. आम्ही त्यांना सांगायचा प्रयत्न केला, की तुम्ही जी झाडं लावता ती चुकीची आहेत, कुठेही कोणतीही झाडं लावून चालत नाही, त्याचाही विचार करावा लागतो. पण त्यांना आमचं पटलं नाही. आम्हाला त्यांचं पटलं नाही. थोडा वाद झाला, पण बाकी काही नाही. आम्हाला विरोध होत नाही, पण साथही मोठ्या प्रमाणात मिळत नाही, एवढंच खरं.

प्रश्न – तुम्ही जे काम करता, त्याने स्वतःच्या आरोग्याला अपाय होऊ नये यासाठी काय काळजी घेता?
उत्तर - काम करताना सुरुवातीपासूनच आम्ही सर्व जण स्वच्छतेची नीट काळजी घ्यायचो, त्यामुळे गेल्या साडेतीन वर्षात कुणालाच कधीच यामुळे तब्येतीचा त्रास झालेला नाहीये. व्यवस्थित काळजी घेण्यामध्ये hand gloves घालणे, गरज वाटली तर मास्क घालणे, शक्यतो full sleeves चे कपडे घालणे या गोष्टी येतात. शिवाय काम झाल्यावर कपडे, gloves, मास्क स्वच्छ धुणे, आंघोळ करणे, या वैयक्तिक स्वच्छतेच्या गोष्टीदेखील आम्ही कटाक्षाने पाळतो.

प्रश्न – तुम्ही तुमच्या कामाला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करता का? असल्यास कसा? कोणत्या माध्यमातून? नसल्यास तसा विचार केला आहात का?
उत्तर – आम्ही स्वतः आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंट वर आमच्या आगामी drives च्या वेळा, टेकडीवरचे स्वच्छ करण्याआधीचे आणि नंतरचे फोटो, कोणी कौतुकाची थाप दिली असेल ते असं काही काही शेअर करतो. पण फार आक्रमक जाहिरात करत नाही. आम्हाला काही वर्तमानपत्रं, न्यूज चॅनल्स, सोशल मीडियावरचे काही भरपूर फॉलोवर्स असलेले लोक – अभा भागवत, सुषमा दाते यांनी भरपूर promote केलं आहे.

प्रश्न – प्रसिद्धीने काम अधिक चांगलं होतं, की अडथळे निर्माण होतात?
उत्तर – प्रसिद्धीचा आम्हाला उपयोगच जास्त झालाय, काही महत्वाचे लोक कामात सहभागी होतात, लोकांपर्यंत आमचा विचार पोहोचतो. पण कधी कधी लोक सोशल मीडियावरची एखादी पोस्ट पाहून ऑनलाइन ग्रुप्सवर उगाच सहभागी होतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडून कामाची अपेक्षा करतो, पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, काम करणं, त्याकडेच ते दुर्लक्ष करतात, हे मला अजिबात आवडत नाही. असा एक तोटाही जाणवतो प्रसिद्धीचा.

प्रश्न – आत्तापर्यंतच्या तुमच्या कामातले milestones कोणते वाटतात तुला? दोन्ही – काम पुढे नेणारे, कामात मोठ्या अडचणी आणणारे...
उत्तर – १० ऑक्टोबर २०२० या दिवशी आम्ही मित्रांनी ठरवलं की आता आपल्याला गटाने पर्यावरणस्वच्छतेचं काम करायचं आहे. तो दिवस सगळ्यांत महत्त्वाचा, ते आमचं पहिलं पाऊल. नंतर २७ ऑक्टोबर २०२२ या दिवशी आम्ही पहिल्यांदा एकाच वेळी एक टेकडी पूर्ण साफ केली होती. २५ जून २०२३ या दिवशी आमचा शंभरावा drive होता, त्याला विशेष प्रसिद्धी दिली होती, खूप लोक सहभागी झाले होते, खूप वेळ काम केलं होतं आम्ही त्या दिवशी. १० डिसेंबर २०२३ या दिवशी गिरीप्रेमी या भारतातल्या खूप मोठ्या गिर्यारोहण संस्थेने आम्हाला मानपत्र देऊन गौरवलं होतं. ४ जानेवारी २०२४ या दिवशी आम्ही ECOFORCE बंद करायचा निर्णय घेतला. हा एक वाईट माइलस्टोन होता. पण येता १६ जून २०२४ हा दिवस एक उत्तम माइलस्टोन ठरेल,  कारण त्या दिवशी आम्ही आमच्या कामाला नव्या दमाने, नव्या पद्धतीने सुरुवात करतो आहोत.

प्रश्न –  ECOFORCE बंद करावीशी का वाटत होती तुम्हाला – नेमकी काय अडचण होती? आर्थिक समस्या होती का? काम बंद पडू शकते हे जाणवल्यानंतर काय भावना होत्या?
उत्तर – नाही, आर्थिक समस्या नव्हती. आम्हाला आर्थिक समस्या जाणवत नाही. कारण आमच्या आर्थिक गरजाच कमी आहेत. Gloves, मास्क आणि पोती एवढ्याच गोष्टी आम्हाला लागतात. Gloves कुठून, कोणते, किती दराचे घ्यायचे याची सर्वांना माहिती देतो. लोक ते आपले आपले आणतात. त्याचा पुनर्वापर करता येतो. १-२ वर्ष ते आरामात वापरता येतात. करोना काळापासून मास्कसुद्धा सर्वांकडे असतातच. वापरुन रिकामी झालेली पोती अत्यंत स्वस्तात मिळतात, १०-२० रुपयांचा खर्च असतो. तोही आम्ही आळीपाळीने करतो, त्याचा कोणा एकालाच भार होत नाही. लोक स्वतःचं नेहमीचं वाहन / पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरुन कामाच्या ठिकाणी येतात. प्रत्यक्ष कामाचा तर खर्च असा नसतोच. त्यामुळे आमची समस्या आर्थिक नव्हतीच.

आमची समस्या होती कृतिशील सहभाग मंदावत जाण्याची. Core Team च्या डेडिकेशनमुळे अत्यंत नियमितपणे होणारे drives, आणि ECOFORCE मध्ये असणारं अनौपचारिक वातावरण यामुळे इतर लोकांनी आम्हाला काहीसं गृहीत धरायला सुरुवात केली होती, किंवा काम आणि आम्ही यांना गांभीर्याने घेणं बंद केलं होतं, असं मला वाटत होतं. अनेक महिने काही प्रगती दिसत नव्हती. बऱ्याच लोकांचा सहभाग अनियमित होत होता. सहभाग वाढावा यासाठी केलेल्या आवाहनांना पुरेसा प्रतिसाद नव्हता. त्यामुळे संस्था म्हणून बंद करावी, पण आपापल्या पातळीवर जमेल तसं काम करत राहावं असं मला वाटायला लागलं. मी तसं जाहीरही केलं. हे काम बंद होऊ नये असं वाटत होतंच, पण नाईलाज होतोय असंही वाटत होतं.

प्रश्न – पण त्यानंतर तुम्ही काम नेटाने करत राहायचं ठरवलंत – हा धाडसी निर्णय घेताना तुमच्या कामाचं त्रिस्तरीय विभाजन करण्याचा तुमचा मानस आहे, म्हणजे नेमकं काय करणार? काम कसं पुढे नेणार?
उत्तर – मी जेव्हा मित्रांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सुचवलं की संस्था बंद करणं हा उपाय नाही, आपण काम चालू ठेवू, त्याचा काहीतरी वेगळा विचार करू. मग आम्ही बऱ्याच चर्चा करून त्रिस्तरीय विभाजन करण्याचा निर्णय घेतला. आमचं काम हे सहभाग घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत कुठे बसतं हे पाहिलं. प्रत्येकाचा अनुभव, माहिती, हे पाहिलं. आणि त्यानुसार तीन स्तर केले. ज्यामुळे कामाचं आणि जबाबदारीचं न्याय्य पद्धतीने विभाजन होऊ शकेल, आणि काम सुरळीत होईल. आता याच महिन्यात आम्ही परत नवा ड्राइव घेऊन येतच आहोत. आता सध्या ECOFORCE ला नव्या बदलांसकट पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधी आम्ही आमचं मुळातलं काम व्यवस्थित होतंय ना याची खात्री करून घेऊ. अणि मग त्यानंतर आम्ही पुढचा टप्पा गाठायचा प्रयत्न करू.

प्रश्न – अभिनंदन. आणि शुभेच्छा! आता तुमच्या फोकस एरिया बाहेरचा एक प्रश्न विचारते, River Front Development (RFD) च्या विरोधात झालेल्या आंदोलनात तुमचा सहभाग होता – त्यात तुम्ही नेमका कसा सहभाग घेतलात?
उत्तर – RFD संदर्भात जे जे पटेल, त्याला पूर्ण बळानिशी पाठिंबा द्यायचा हे आम्ही ठरवलंच होतं. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी झालो, मोर्चे काढले, रस्त्यावर उतरून लोकांशी चर्चा केल्या, सोशल मीडिया वर भरपूर बोललो, शक्य त्या सर्व मार्गांनी आम्ही सक्रिय सहभाग घेतला. यापुढेही घेत राहू. आम्ही तात्पुरता लाक्षणिक सहभाग नोंदवून थांबणार नाही.

प्रश्न – त्या निमित्ताने - तुम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी होणाऱ्या सर्वसामावेशक चळवळीचा भाग होत आहात, की तुमचं काम टेकडी सफाईविषयकच राहणार आहे?
उत्तर – सध्या तरी काम केवळ टेकडीपुरते आहे, पण जसे आम्ही RFD च्या विरोधातील आंदोलनात सहभागी झालो, तसे आपल्याला योग्य वाटणाऱ्या, पर्यावरणाच्या रक्षणार्थ काम करणाऱ्या कोणत्याही चांगल्या चळवळीसाठी उभे राहू. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी होणाऱ्या सर्वसामावेशक चळवळीचा भाग आम्ही आहोतच, इतर विषयांना धरून चळवळ करणारे आमचे मित्र आमच्या चळवळीशी जोडले जातील, आम्ही त्यांच्या चळवळीशी जोडले जाऊ, हे नक्की घडेल.

प्रश्न – तुम्ही एक तरुण संस्था, तरुणांची संस्था आहात, तुमच्या समवयस्क लोकांमध्ये पर्यावरणाच्या, समाजाच्या प्रश्नांविषयी किती आस्था जाणवते? त्यातली किती माणसं फक्त संवेदनशील असतात, किती कृतिशील – तुमचा अनुभव काय?
उत्तर – पर्यावरणाच्या प्रश्नांबाबत प्रौढ लोकांमध्ये जाण आणि जागरूकता जास्त आहे, पण माझ्या समवयस्क मुलांमध्ये त्याबाबत कृती करण्याची आग जास्त दिसते. कारण पर्यावरणाच्या ऱ्हासाचे जे तीव्र परिणाम भोगावे लागणार आहेत, ते आमच्या पिढीला भोगावे लागणार आहेत, याची जाणीव असते त्यांना.

प्रश्न – इतर तरुणांना काही appeal?
उत्तर – फक्त कौतुक करू नका, सामील व्हा. आमचंच काम असं नाही, कोणतंही चांगलं काम निवडा, पण ते काम प्रत्यक्ष करा. Action घ्या, लोकांना भेटा, चर्चा करा, बदल घडवून आणा.

- ओजस फाटक 

संवादक - ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: sadhana digital environment day 5 june ecoforce Load More Tags

Comments:

Aditi Sekhri

Your work is commendable.I stay in Mumbai..Would have loved to join you guys.I frequently visit Pune.I would like to join you whenever possible in your endeavour

अंजली मुळे

ओजस,तुझं खूप खूप कौतुक ! तुझी मुलाखत वाचताना ग्रेटा थनबर्ग ची आठवण आली. भविष्यातल्या संकटाची तुम्हाला जाणीव आहे आणि. त्यासाठी तुम्ही आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे ,तुम्ही नक्की यशस्वी होणार. खूप खूप शुभेच्छा !

pratik raut

खर्च फार महत्वाचे आपण काम करत आहात. लोक सक्रीय सहभाग घेतील अशी अपेक्षा बाळगू नका कारण अध्याप समाज माध्य्माव्र्च्या प्र्शिधीसाठी झ्त्नार्याना खर्या समस्यांची जाणीव व्हायला वेळ लागेल. तसे हि रचनात्मक काम करताना लवकर सक्रीय पाठींबा मिळत नसतो..

रेखा जोशी

व्वा ओजस.. खूप कौतुक व खूप धन्यवाद तुमची टीम हे काम विचारपूर्वक करत आहे हे लक्षात आले. तुमच्या टीमचे स्वरूपही तुम्ही काळजीपूर्वक आखले असावे हे मुलाखतीतून समजत आहे. आलेले अनुभव व त्यातून निराश न होता मार्गक्रमण हे कौतुकास्पद आहे. खूप शुभेच्छा.

Add Comment