निळू फुले: अभिजात कलावंत, लोभस व्यक्तिमत्व

डॉ. लागू यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब या लेखातून स्पष्टपणे दिसते..

कर्तव्य साधना

निळू फुले व डॉ. श्रीराम लागू आपल्या अप्रतिम अभिनयाने व अव्वल दर्जाच्या सामाजिक बांधिलकीने मराठी माणसांच्या मनात विराजमान झालेले दोन मानबिंदू. त्या दोघांशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे घनिष्ठ संबंध होते. सामाजिक कृतज्ञता निधी जमवण्यासाठी आयोजित उपक्रमात व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत ते संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे, डॉ. दाभोलकर 1 मे 1998 रोजी साधनाचे संपादक झाले तेव्हा पहिल्याच दिवाळी अंकात त्यांनी डॉ. लागू यांच्यावर वि. वा. शिरवाडकर आणि निळू फुले यांचे लेख प्रसिद्ध केले होते. आणि त्याच्या पुढच्या वर्षी (1999 मध्ये) डॉ. दाभोलकरांनी, निळू फुले यांच्यावर लेख लिहिण्यासाठी डॉ. लागू यांना विनंती केली होती. तोच हा लेख. हा लेख आहे निळूभाऊ यांच्यावर, पण यातून डॉ. लागू यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसते..


1969 च्या जानेवारीत मी आफ्रिकेतून भारतात परत आलो. तीन वर्षे भारतापासून दूर होतो. वैद्यकीय व्यवसाय बंद करून व्यावसायिक नट होण्याचा निर्णय घेऊनच परतलो होतो. तेव्हा आल्याबरोबर रंगभूमी आणि चित्रपट या क्षेत्रांची चाचपणी सुरू केली. रणमैदानात पाऊल टाकण्यापूर्वी युद्धपरिस्थितीचा नीट अंदाज घेणे आवश्यक होते!

काशिनाथ घाणेकर यांचे 'अश्रूंची फुले' हे नाटक पाहिले. काशीनाथचा अभिनय चांगलाच अतिरेकी झाला होता. मग 'अबोल झाली सतार' नावाच्या दारव्हेकरांच्या एका नाटकाचा प्रयोग पाहिला. नाटक अगदीच सामान्य होते, पण अतिशय शिस्तीत बांधलेला, सुविहित प्रयोग मराठी रंगभूमीवर मी प्रथमच पाहिला. खूप बरे वाटले. त्यानंतर गुलजारचा 'अचानक' हा चित्रपट पाहिला. हिंदी चित्रपटात क्रांती झाल्यासारखेच वाटले! दादा कोंडक्यांची 'विच्छा' पाहिली. दादांचा भन्नाट मोकळा- ढाकळा अभिनय पाहून अगदी हरखून गेलो. आणि मग निळू फुल्यांचे 'कथा अकलेच्या कांद्याची' हे वगनाट्य पाहिले आणि थक्कच झालो! त्यातील लीला गांधींचे नृत्य तर अद्भुत होतेच; पण निळूभाऊंचा अभिनय (त्यातली 'हिप्पी'ची भूमिका सोडता) विलक्षणच होता. मी असले काहीच मराठी रंगभूमीवर त्याआधी पाहिले नव्हते!

चाळीसच्या दशकापासून मी मराठी रंगभूमीवरचे खूप मोठे नट पाहिले होते; पण हे 'बेणे' काही वेगळेच होते! अत्यंत सुनियोजित आणि तरीही अगदी उत्स्फूर्त वाटणारा तो अभिनय होता. डोळे, भुवया, ओठ, गाल, पापण्या या चेहऱ्यावरच्या अवयवांच्या अगदी सूक्ष्म पण आशयसंपन्न हालचालींनी फार मोठा परिणाम तो साधत होता. रंगभूषेत अत्यल्प बदल करून, केवळ चेहऱ्याच्या संयत हालचाली आणि वाणीचा हुकमी वापर करून, दोन-तीन व्यक्तिरेखांचे वेगळेपण, निळूभाऊ अगदी लीलया पण ठसठशीतपणे उभे करत होते.

फार सुंदर काहीतरी पाहिल्याचा आनंद घेऊन मी घरी गेलो. निळूभाऊंचा फॅन झालो. त्यानंतर जवळजवळ तीस वर्षे मी निळूभाऊंबरोबर काम करतो आहे- जास्त करून चित्रपटात, पण नाटकांत आणि सामाजिक चळवळीतही; मात्र माझ्या 'पंखेपणाला' खोट यावी असे काहीही निळूभाऊंच्या हातातून घडलेले नाही! (एक गमतीची गोष्ट म्हणजे, आम्ही दोघेही मूलतः नाटकवाले असलो तरी गेल्या तीस वर्षांत आम्ही फक्त तीनदा नाटकात एकत्र आलो. 87 साली 'लग्नाची बेडी'त, 92 साली (इंग्रजी!) 'कमला'त आणि 97 साली 'प्रेमाची गोष्ट'मध्ये. आणि त्यातले पहिले दोन प्रसंग नाटकापेक्षा सामाजिक चळवळीशी जास्त संबंधित होते!)

निळूभाऊंची फार नाटके मी पाहिलेली नाहीत. फार नाटके, मला वाटते, त्यांनी केलीही नाहीत. 'जंगली कबूतर', 'सूर्यास्त', 'सखाराम बाइंडर' आणि अगदी अलीकडचे 'रण दोघांचे' एवढीच मी पाहिली. 'कबूतर'मधला त्यांचा अभिनय खूप 'टाळ्याखाऊ' होता. (ती व्यक्तिरेखाच तशी भडक होती.) पण धादांत मेलोड्रामासुद्धा किती वास्तवाच्या पातळीवर खेचता येतो, याचा तो मूर्तिमंत धडा होता. 'सूर्यास्त' मधला, अगदी स्फोटाच्या काठावर वावरणारा म्हातारा ध्येयवादी अप्पाजी उभा करताना सेवादलाचे भाऊ रानडे आणि सेनापती बापट या दोन महान व्यक्तिमत्वांचे असे बेमालूम मिश्रण निळूभाऊंनी स्वतःच्या व्यक्तिमत्वात केले होते की गुंग होऊन पाहत रहावे!

'बाइंडर' मधला निळूभाऊंनी उभा केलेला 'सखाराम' हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाविष्कारांपैकी एक आहे. केवळ भारतीय रंगभूमीवरचा नव्हे, तर जागतिक रंगभूमीवरचा! 'बाइंडर' हे माझे अत्यंत आवडते नाटक. ते दिग्दर्शित करण्याची माझी फार इच्छा होती; ती सफल न झाल्याने मनात थोडी अढी घेऊनच मी प्रयोग पाहायला गेलो होतो. अर्थात, निळूभाऊ काम उत्तम करणार याबद्दल मनात शंका नव्हतीच. पण निळूभाऊंचा सखाराम मनात आणि डोळ्यांत न मावण्याइतका अक्राळविक्राळ होऊन समोर उभा राहिला, तेव्हा अगदी अभावितपणे त्यांचे पाय धरावेसे  वाटले मला!

एक गमतीची आठवण आहे. मी आणि तेंडुलकर (विजय) एकदा पुण्याहून मुंबईला चाललो होतो. गाडीत शेजारी बसलो होतो. बोलता बोलता तेंडुलकर म्हणाले, "एक नवीन नाटक लिहायला घेतले आहे. त्यात तुम्ही आणि निळूभाऊंनी काम करावे असे माझ्या मनात आहे." असे म्हणून त्यांनी बॅगेतून लिखाणाचे कागद काढले. ते माझ्या हातात देत म्हणाले, "वाचून पहा. नाटकाचे नाव आहे, 'घाशीराम कोतवाल.' तुम्ही- घाशीराम आणि निळूभाऊ-नाना फडणवीस, असे माझ्या मनात आहे!" मी अधाशासारखे ते वाचले. मला वाटले जेमतेम अर्धा-पाऊण अंक असेल. पण आपण काही तरी अफलातून वाचतो आहोत, हे जाणवले. पुढे जगप्रसिद्ध झालेल्या या नाटकात मी आणि निळूभाऊ एकत्र आलो असतो तर? या विचाराशी मी आजही कधी कधी खेळत असतो!

त्या नाटकाचे जमले नाही, पण लवकरच आम्ही दोघे एकत्र येण्याचा योग्य आला तो 'पिंजरा' या शांतारामबापूंच्या चित्रपटात. मी चित्रपटात मी अगदीच नवखा तर निळूभाऊ स्टार. पण प्रमुख भूमिका माझी होती, निळूभाऊंची भूमिका दुय्यम होती. मी संपूर्ण पटकथा वाचलेली असल्याने, इतकी दुय्यम भूमिका निळूभाऊंनी स्वीकारली याचे मला जरा आश्चर्यच वाटले होते. पण त्या निमित्ताने का होईना, एकत्र काम करायला मिळेल, हा आनंद होता.

चित्रपटात आमचे एकत्र काम फार नव्हते; त्यामुळे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी एकत्र काम करायची फारशी संधी मिळायची नाही. पण आमच्या चित्रपटातला खलनायक जो होता तो कोल्हापूरचा स्थानिक कलावंत होता आणि दया येऊन म्हणा, की निळूभाऊंच्या मैत्रीमुळे म्हणा, तो बऱ्याच वेळा रात्री आम्हा दोघांना त्याच्या घरी जेवायला बोलवायचा. त्या वेळच्या अनौपचारिक मैफिलींत निळूभाऊ या व्यक्तीच्या जरा जवळ जाता आले.

एक गोष्ट त्या मैफिलींत नित्यनेमाने घडे. पहिला अर्धाएक तास निरनिराळ्या विषयांवर गप्पा होत. साहित्य, संगीत, तमाशा, कुठलाच विषय वर्ज्य नसे. एरवी अबोल, बुजरे वाटणारे निळूभाऊ सर्व विषयांत रसिकतेने आणि जाणकारीने बोलत. पण सुमारे अर्ध्या तासानंतर ते एकदम स्वतःचे पार्लमेंट भरवीत. त्यात जवाहरलाल नेहरूंना खेचून आणीत आणि स्वतः राममनोहर लोहिया बनून ते अत्यंत अनपार्लमेंटरी भाषेत नेहरूंचे वाभाडे काढीत! मी उगीच दुबळेपणाने नेहरूंची बाजू घेत असतो असे पाहून, एकदा त्यांनी मला सुनावले; अगदी माझी कीव करत सुनावले, "डॉक्टर, तुम्ही फक्त 'महाराष्ट्र टाइम्स' वाचता, म्हणून असं बोलता. तुम्ही लोहिया वाचला पायजेलाय." एरवी अगदी ऋजु, जवळजवळ ओशाळे वाटणारे निळूभाऊ अशा वेळी अगदी वेगळ्याच अवतारात दिसायचे. स्फोट होऊ मागणारा ज्वालामुखी आत खदखदत असल्यासारखे भासायचे. त्यावेळीच मला निळूभाऊंच्या समर्थ अभिनयाची किल्ली हाताला लागल्यासारखी वाटली!

राजकारणात निळूभाऊंना नुसता रस नव्हता तर राजकारण निळूभाऊंच्या अंगात चांगले भिनले होते. लोहियांच्या राजकीय- सामाजिक- ऐतिहासिक विचारांनी त्यांना झपाटले होते. लोहियांचा आणि माझा प्रत्यक्ष संबंध कधीच आला नाही. टी.व्ही.वर सुद्धा मी त्यांना पाहिलेले नाही. पण त्यांची अनेक प्रकाशचित्रे पाहून आणि त्यांची भाषणे वाचून, त्यांची एक प्रतिमा मनात तयार झालेली आहे. अतिशय जळजळीत, जहाल आणि तितकेच ऋजु, हळुवार, विनोदाची खूप सूक्ष्म पण सखोल जाण असणारे आणि कारुण्याने गदगदून गहिवरणारे, असे हे चित्र माझ्या मनात आहे. त्याच्या खुप जवळ जाणारे निळूभाऊंचे व्यक्तित्व आहे आणि लोहियांचा प्रखर बुद्धिवाद निळूभाऊंच्यात नसल्याने, निळूभाऊंचे व्यक्तिमत्व खूप लोभसवाणे झालेले आहे!

निळूभाऊंनी अभिनयाचे (अथवा राजकारणाचेही) पुस्तकी शिक्षण घेतलेले दिसत नाही. पण जीवनाच्या पुस्तकातून त्यांनी आपला अभिनय खूप संपन्न आणि समृद्ध केला आहे.
कलावंताची 'प्रतिभा' ही नेमकी काय चीज आहे, हे मला माहीत नाही; पण निळूभाऊंना तिचे अनंत हस्ते देणे आहे , हे उघड आहे. मात्र तिच्यावर संस्कारांचे असे काही अलंकार त्यांनी चढवले आहेत आणि ते झळझळीत अलंकार त्यांच्या प्रतिभेशी असे काही एकजीव झाले आहेत की  त्यामुळे निळूभाऊंच्या अभिनयाला अभिजात कलेचे उच्च मूल्य विनासायास प्राप्त होते.

स्वतःची जन्मतारीखही नक्की माहीत नसलेला लहानगा निळू, आपल्या आठ-दहा भावंडांसह पुण्याला खडकमाळच्या रस्त्यावर गोट्या खेळत असताना अल्लाद राष्ट्रसेवादलात उचलला गेला, तो काळ बेचाळीसच्या स्वातंत्र्यसमराचा होता. उत्तम संस्कार होण्यासाठी तो सर्वोत्तम काळ होता आणि एसेम, साने गुरुजी, ना. ग. गोरे, मधु लिमये, नाथ पै असल्या अनेक दिग्गजांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संस्कार निळूभाऊ अधाशासारखे घेत होते. खूप आणि चौफेर वाचत होते. मनन- चिंतन करत होते. कलापथकात पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर यांची लोकनाट्ये करत होते. कुसुमाग्रज, अमर शेख यांची गाणी गात होते. अभिनयाबरोबरच अभिजात संगीत, नृत्यकला, चित्रकला यांतही मनस्वी रस घेत होते. पण मुख्य म्हणजे समाजापासून तुटले नव्हते. उलट समाजाच्या सगळ्या थरांच्या वेदनांशी एकरूप होत होते. उत्तम दर्जाचे संस्कार यांच्या विलक्षण रसायनातून निळू फुले नावाचे अभिनयाचे एक उत्तुंग शिखर शांत, तृप्त, समाधानी दिसते आहे. ही तृप्ती त्याला दीर्घकाळ मिळत राहो.

मी एकदा निळूभाऊंना कुणाशी तरी बोलताना ऐकले की, ते तरुणपणी ससून हॉस्पिटलच्या बागेला पाणी घालण्याचे काम करीत असत! तो काळ नेमका कोणता होता, हे त्यांना विचारण्याचे धाडस मला झाले नाही; कधी होणारही नाही. कारण मी मेडिकलचा विद्यार्थी म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरीचे धडे घेत असताना निळूभाऊ बाहेर उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात झाडांना पाणी घालत होते, ह्या वास्तवाची जाण मला फार ओशाळवाणे करेल!

- डॉ. श्रीराम लागू 
(साप्ताहिक साधना, दिवाळी अंक
1999)

हे ही वाचा:
डॉ. श्रीराम लागू : लयबद्ध माणूस, लयबद्ध अभिनेता - निळू फुले 

Tags: Shriram Lagoo Sadhana Archive निळू फुले डॉ श्रीराम लागू Load More Tags

Comments:

डॉ अनिल खांडेकर

निळूभाऊंचे अप्रतिम , सह्रुदयतेने व्यक्तीचित्र रेखाटले आहे. नाटक चित्रपटातील भूमिका पाहिल्या. समाजवाद्यांच्या , सेवादलाच्या व्यासपीठावर त्यांना ऐकलं. डॉ लागू यांनी ही दोन्ही रूपे एकाच फ्रेम मध्ये बेमालूम बसविली आहेत.. एकात दुसरे सहजपणे सामावले आहे. निळूभाऊ आणि डॉ लागू या दोन्ही सहयात्रींना आदरांजली.

Shantanu Ghodke

Wah wah, liked last two paragraphs. It's shows the greatness of Shriram lagoo sir.

Add Comment