शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी सृजनआनंद विद्यालय 1986 मध्ये स्थापन केले. त्यांनी त्या काळात जे प्रयोग केले ती पायवाट आज महामार्ग होताना दिसत आहे. ज्या काळात प्रयोगशील शिक्षण हा शब्द फारसा प्रचलित नव्हता अशा काळात त्यांनी प्रयोगशील आणि आनंददायी शिक्षण यांचा वस्तुपाठ घालून दिला.
शालेय शिक्षण प्रणालीला आकार देण्यासाठी 1964 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोठारी आयोगाने म्हटले होते की, ‘भारताचे भवितव्य हे वर्गातील खोल्यांमध्ये घडत आहे.’ लीलाताईंनी वर्गाच्या खोल्यांमधून सगळे जग बदलून दाखवण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण, सामाजिक बांधिलकी, बंधुत्व यांविषयीचे सगळे प्रश्न त्यांनी वर्गखोलीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विषय उपक्रमशीलतेने शिकवत त्यांनी मुलांच्या कल्पकतेला प्रतिभेला सतत आव्हान दिले. शाळेत केलेले सर्व प्रयोग त्यांनी पुस्तकरूपाने संकलित केले. हे प्रयोग आज दीपस्तंभ म्हणून समोर आहेत.
लीलाताईंनी आपल्या शाळेत निरनिराळे प्रयोग केले. त्यांपैकी असे काही प्रयोग बघूयात जो कोणताही शिक्षक कोणत्याही शाळेत राबवू शकेल.
सर्वसाधारण उपक्रम:
पालकांना खर्च करावा लागू नये म्हणून या शाळेतील स्नेहसंमेलन हे शाळेच्या गणवेशातच होतात. फारतर कागदी दागिने, मुखवटे केले जातात. त्यामुळे पालकांना मुलांच्या स्नेहसंमेलनासाठी करावा लागणारा खर्च वाचतो. सर्व मुलांचा वाढदिवसही एकाच दिवशी साजरा होतो. त्यामुळे गरीब पालकांवर जो खर्चाचा ताण यायचा तो कमी होतो. शिक्षक मुलांना शिक्षा करीत नाहीत. मुले शिक्षकांना सर-मॅडम न म्हणता ताई दादा म्हणतात. त्यातून जवळीक वाटे. लीलाताई मुलांच्या आजीच्या वयाच्या असूनही मुले त्यांना लीलाताईच म्हणत. मुलांमध्ये जवळीक निर्माण करण्यासाठी या शाळेतील मुले आठवड्यातून एकदा खाण्याचा पदार्थ बनवतात.
भाषाविषयक उपक्रम:
लीलाताई मुलांकडून भाषेचा विविधांगी वापर करून घेत. उदा., तीन अक्षरी पाच शब्दांचे वाक्य लिहायला सांगणे, सात मुलांना एका रांगेत उभे करून पहिल्या मुलाने कर्ता सांगायचा आणि शेवटच्या मुलाने क्रियापद सांगायचे व मधल्या मुलांनी अर्थपूर्ण वाक्य होईल असे शब्द सांगायचे, ‘स्म’ ने सुरु होणारे शब्द सांगणे ‘णे’ ने शेवट होणारे शब्द सांगणे, ‘द मा मिरासदार’ या शब्दांमधून 20 अर्थपूर्ण शब्द बनवून घेणे असे उपक्रम त्या घ्यायच्या. ’चालताना अपघात झाला’ हे वाक्य सांगून ‘यामागे किती कारणे असतील’ असा प्रश्न त्या विचारत असत. कुटणे, चेचणे यातील फरक समजायला त्याचे वापर विचारत. निरोप हा शब्द आल्यावर, निरोप किती प्रकारे दिला जातो हे मुले सांगत. निबंधाचे विषय फार गंभीर न देता ‘आईसक्रीम खातानाची मजा’ ‘थंडी वाजते तेव्हा’ असे असत.
व्याकरण शिकवताना:
कंटाळवाणे व्याकरण त्या खेळातून शिकवायच्या. उदा., ‘मला दोन नामे, तीन सर्वनामे, दोन विशेषणे, एक क्रियापदे असे वाक्य तयार करून दाखवा’, अशी कोडी विचारत. अनुस्वार दिला की अर्थ बदलतो असे शब्द विचारतात. मुले ‘खत –खंत’ अशा जोड्या तयार करायची. ‘विशेषण’ शिकवताना एका खोक्यात लाल, शूर, लाजाळू असे 50 विशेषण शब्द चिठ्ठ्यांवर लिहून टाकत. ते खोके वर्गात टांगून कागद खाली पडले की मुले एक एक चिठ्ठी वाचून एक एक वाक्य त्यावर तयार करायची आणि विशेषण समजत असे. त्यांनी कापड शब्द म्हणताच मुले 17 शब्दांनी कापडाचे वर्णन करायची. त्या क्रिया करून दाखवायच्या आणि मुले ते क्रियापद ओळखायची. त्या फळ्यावर झाड काढायच्या आणि मुले त्या झाडाला 125 प्रश्न विचारत, त्यामुळे प्रश्नकौशल्य विकसित होत.
वर्तमानपत्र हे शैक्षणिक साहित्य:
या शाळेत वर्तमानपत्राचा विविधांगी वापर होतो. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटीखाली, रेघ मारा, बातमीतील नामे क्रियापदे विशेषणे यावर खुण करा, असे स्वाध्याय इथे दिले देतात. बातम्यांवर चर्चा घडवल्या जातात. ‘आश्रमशाळेतील मुलीला चटके दिले’ ही बातमी त्या प्रश्नपत्रिकेत टाकत, आणि ‘मुलांना काय वाटले?’ हे लिहायला सांगत. रेल्वे अपघाताची बातमी वाचून घेत त्यावर चर्चा घडवत. या शाळेत व्यंगचित्र, मुलांसाठीची चित्रे दाखवून त्यावर बोलते करतात. पालकांना आग्रहाने मुलांसोबत पेपर वाचा असे सतत सांगतात. वर्तमानपत्राच्या रद्दीपासून मुलांना अनेक वस्तू शिकवतात, दागिने करून घेतात व तेच स्नेहसंमेलनात वापरतात.
प्रकल्प पद्धतीने शिकवणे:
प्रकल्प पद्धतीने शिकवण्याचा समावेश अभ्यासक्रमात आता कुठे झाला, पण लीलाताईंनी 35 वर्षांपूूर्वीच याची सुुुरुवात केली. आयोडीनयुक्त मिठाची सक्ती झाली तेव्हा, मीठ कसे तयार करतात इथपासून ते दांडी यात्रा, मीठ विक्री इत्यादी उपक्रम मुलांना करायला सांगितले. फेरी काढली, मिठाची शास्त्रीय माहिती देणारी व्याख्याने ठेवली.
त्यांच्या शाळेत बाजार भरतात. पाणी प्रकल्प करताना पाण्यावरील कविता संकलित करतात, पाण्यावरील म्हणी व वाकप्रचार मुले जमवतात. एक गाव एक पाणवठा चळवळ काय होती, नर्मदा जनआंदोलनामध्ये पाण्याचा प्रश्न कसा आहे इत्यादी प्रश्नांवर व्याख्याने ठेवली जातात. मुले आपल्या गल्लीत नळाचे वाया जाणारे पाणी व माणशी होणारा पाण्याचा वापर यांची पाहणी करतात.
मुले रंगदर्शक शब्द, चवदर्शक, तापमानदर्शक शब्द लिहितात. पैसा या प्रकल्पात वेगवेगळ्या देशांची नाणी तर घेतात पण प्राचीन काळापासून तर आजपर्यंत चलन कसे बदलले, हा तपशीलही जमवतात. नोटा कशा छापल्या जातात हे मुले यानिमित्ताने समजून घेतात. पैशाचा वापर कुठे कुठे होतो, हे शिकतात. सोबतच, पैसा शब्द असणारी मराठी, हिंदी गाणी ही मुले संकलित करतात.
सामाजिक संस्कार करणारे उपक्रम:
लीलाताई व त्यांचे पती बापूसाहेब, दोघेही सामाजिक कार्यकर्ते होते. त्यामुळे राज्यघटनेने दिलेली मुल्ये आपण कशी रुजवू शकू याचा ते सतत विचार करीत. त्यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी शाळेत निमंत्रित केले. मुलांना गरिबांचे जगणे कळावे म्हणून झोपडपट्टीत सहल नेली. मुलांना खेड्यात नेले. कष्टकरी बांधवांना सन्मानाने शाळेत बोलावून त्यांच्या मुलाखती घेतल्या. वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी, भुताची भीती दूर करण्यासाठी स्मशानात सहल काढली. ‘पाऊस पाडण्यासाठी प्रार्थना करा’ असे आवाहन करणाऱ्या राज्यपालांना हे आवाहन अवैज्ञानिक कसे आहे याबाबत मुलांनी पत्र लिहीले.
‘अंधश्रद्धा कोणत्या कोणत्या आहेत?’ याची यादी त्यांनी मुलांकडून करून घेतली. स्त्रियांना दुय्यम लेखणाऱ्या कविता, म्हणी यांबाबत मुलांना सजग केले. ‘गणेशोत्सवात काय नसावे?’ यावर, उपेक्षित वर्गाविषयीच्या बातम्या वर्गात सांगून त्यावर चर्चा घडवल्या. मुलांनी रेडीमेड उत्तरे स्वीकारू नयेत यासाठी सतत प्रश्न विचारून त्या मुलांना विचार करायला भाग पाडायच्या.
प्रतिभा जागवणारे उपक्रम:
या शाळेतील मुलांसमोर हातरुमाल टाकला तर मुले त्याच्या 60 वस्तू बनवून दाखवतात, इतकी कल्पकता विकसित केली गेली. प्रत्येक वर्गाने एक कल्पना घेवून वर्गासमोर सुशोभन करावे असा एक उपक्रम होता. मुले पाने, फुले,बिया, दगड चित्र रंग यांपासून ते करत. नाव-गाव-फुले- फळे असे मुलांचे चार गट तयार करून आपापल्या गटाचा एक-एक शब्द सांगायचा असा खेळ घेत, गटांना वेगवेगळी नावे देत.
मुले कुणाच्या लग्नासाठी गावाला गेली की आल्यावर त्यांना त्याचे वर्णन लिहावे लागे. वर्गात रोज कोडी विचारली जात त्यातून जिज्ञासा जागृत होई. वर्गात फक्त नाटकाचा विषय देत व मुले संवाद तयार करत. काही शब्द दिले की मुले गोष्ट लिहायची. मुले कविताही लिहू लागली. एकच शब्द दोन अर्थाने वापरायला लावत. त्यातून ‘गरिबांच्या पालात पाल निघाली’ अशी भन्नाट वाक्ये तयार होऊ लागली. 100 उत्तर येईल अशी आकडेमोड करा असेही प्रश्न दिले जात.
शिक्षकांसाठी उपक्रम:
मुलांना सोबत घेऊन शिक्षक काही उपक्रम करू शकतात. उदा., झाडे लावून संगोपन, वर्षात पाच ते सहा खेळ शिकणे, गोष्टी जमवून मुलांना सांगणे, आकाशदर्शन, पक्षीनिरीक्षण, वनस्पतींचा परिचय, इतर भारतीय भाषेतील एखादे गाणे शिकणे, विविध दगड, लाकडे, पिसे, कविता, कोडी संकलन करण्याचा छंद जोपासणे, पाककृती शिकणे, एकांताची अनुभूती देणे, पाणी व वीज बचत अनुभूती देणे, झोपडपट्टीत मुलांना नेवून त्या मुलांशी विद्यार्थांनी मैत्री करणे, गाणे,नाच, जादू, व्यायामप्रकार, मुलांना रांगोळी येण्यासाठी प्रयत्न करणे, वाचनाची गोडी लावणे इत्यादी.
प्रत्येक तासिकेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना किमान 15 प्रश्न विचारावेत. वर्गात सतत नाट्यीकरण घेणे, मुलांची उत्सुकता जागृत ठेवणे, कितीही राग आला तरी न ओरडणे, न मारणे, अशा छोट्या छोट्या अपेक्षा लीलाताई व्यक्त करत.
हे सर्व उपक्रम कोणताही शिक्षक नक्कीच करू शकतो. शाळेतील शिक्षकांनी सतत उपक्रम करावेत म्हणून त्या दर शुक्रवारी शिक्षकांची सभा घेत, त्यासाठी तपशीलवार नियोजन करत असत. त्यातून विविध शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा घडवत व नवीन माहिती सांगत असत.
लीलाताईंचे सृजनआनंद विद्यालय अनेक नवनवे उपक्रम करीत 35 वर्षे सुरु आहे. सध्या सुचिता पडळकर शाळेच्या प्रमुख आहेत. कोल्हापूरला गेल्यावर या शाळेला जरूर भेट द्या. लीलाताईनी शाळेतील प्रयोगांवर ‘ऐलमा पैलमा शिक्षण देवा’, ‘शिक्षणातील ओअॅसीस’, ‘आनंददायी मूल्यमापन’, ‘लिहिणं वाचणं मुलांचं’ इत्यादी पुस्तके लिहिली आहेत. शिक्षकांनी ती जरूर वाचायला हवीत.
- हेरंब कुलकर्णी, अकोले, जि. अहमदनगर.
herambkulkarni1971@gmail.com
(लेखक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक व कार्यकर्ते आहेत.)
Tags: शिक्षण प्रयोगशील शिक्षण लीला पाटील लीलाताई कोल्हापूर सृजनआनंद विद्यालय हेरंब कुलकर्णी Education Experimental Education Lila Patil Lilatai Kolhapur Srujan Anand Vidyalaya Heramb Kulkarni शिक्षक विद्यार्थी Student Teacher Load More Tags
Add Comment