तारुण्यभान - लैंगिक जीवनशिक्षण देणारा उपक्रम

 प्रेम, लैंगिकता व प्रजननविषयक शास्त्रीय ज्ञान आणि सामाजिक भान 

लैंगिकता या विषयाबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल असतं. विशेषतः तरुण पिढीच्या मनात याविषयीचं कुतूहल अधिक असतं. हे कुतूहल शमवण्याच्या उद्देशानं डॉ. राणी बंग यांनी आणि त्यांच्या चमूनं तरुणांना लैंगिक जीवनशिक्षण देणारा उपक्रम दोन दशकांपूर्वी सुरू केला. ‘तारुण्यभान’ या नावानं प्रसिद्ध असलेला हा उपक्रम आजही संपूर्ण महाराष्ट्रभर यशस्वीरीत्या सुरु आहे. राज्यातल्या एक लाखाहून अधिक तरुणतरुणींनी आजवर या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. 

जबाबदार लैंगिक वर्तनासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांची अतिशय सखोल आणि कालसुसंगत शास्त्रीय माहिती ‘तारुण्यभान’मधून दिली जाते. डॉ. राणी बंग या पेशानं स्त्रीरोग तज्ज्ञ. निवळ अज्ञानापोटी लैंगिक आजारांशी झगडणाऱ्या अनेक तरुणतरुणी त्यांच्या दवाखान्यात यायचे. पौगंडावस्थेतल्या तरुणांमध्ये होणारे शारीरिक आणि भावनिक बदल, मासिक पाळी, गर्भधारणा यांविषयीच्या अज्ञानाविषयी आणि लैंगिक आरोग्याविषयी बोलण्याचा संकोच यांमुळे बहुतेक समस्या उद्भवत असल्याचं त्यांना आढळलं. 

लैंगिक प्रबोधनातून या समस्या काही अंशी सुटू शकतात या भावनेतून मग ‘तारुण्यभान’च्या शिबिरांची आखणी करण्यात आली. 1993पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘तारुण्यभान’ची पाचशेच्या आसपास शिबिरं घेण्यात आली मात्र या सत्रांमध्ये प्रत्यक्ष सामील न होऊ शकलेल्या तरुणांची संख्या साहजिकच अधिक होती. त्यांच्यापर्यंत हे लैंगिक प्रबोधन पोहोचवणं आणि त्याचं दस्तऐवजीकरण करणं या  उद्देशानं ‘तारुण्यभान’ शिबिरामध्ये दिली जाणारी माहिती डॉ. राणी बंग आणि करुणा गोखले यांनी पुस्तकरूपानं लिहिली आणि राजहंस प्रकाशनानं ती ‘तारुण्यभान’ याच नावानं प्रकाशित केली. 

लैंगिकतेच्या अनेक संकल्पनांविषयी आपल्याला जुजबी माहिती असते. मासिक पाळी म्हणजे काय, गर्भधारणा कशी होते या प्रश्नांची गोळाबेरीज उत्तरं बहुतेकांनी पाठ्यपुस्तकातून मिळवलेली असतात. ‘तारुण्यभान’मध्ये अनेक गुतागुंतीच्या संकल्पना शास्त्रीय तरीही सोप्या आणि नेमक्या भाषेत समजावून सांगितलेल्या आहेत. वयात येताना मुलामुलींमध्ये होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, त्या अनुषंगानं लैंगिक अवयवांची आवश्यक स्वच्छता, आकर्षण, मैत्री, प्रेम यांमधील फरक अशा मुद्द्यांवर पुस्तकातील पहिल्या प्रकरणात चर्चा केलेली आहे.

पुरुष आणि स्त्री यांच्या प्रजननसंस्थांची सविस्तर माहिती अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकरणांमध्ये वाचायला मिळते. ‘गर्भधारणा कशी होते?’ याची माहिती प्रकरण चारमध्ये देण्यात आली आहे तर पाचव्या प्रकरणात ‘गर्भधारणा आणि बाळंतपण’ हा विषय हाताळण्यात आला आहे. मासिक पाळी, वंध्यत्व, त्यावर मात करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान यांची सखोल माहिती सहाव्या प्रकरणात करण्यात आली आहे. 

बेभान लैंगिक वर्तनातून उद्भवणारी सर्वात धोकादायक समस्या म्हणजे गुप्तरोग. हे गुप्तरोग पसरण्यामागची कारणे, त्यांचे प्रकार, त्यांची लक्षणे आणि त्यांचे दुष्परिणाम यांविषयीची माहिती ‘गुप्तरोग’ या सातव्या प्रकरणात वाचायला मिळते. सोबतच सामाजिक आरोग्याच्या परिप्रेक्ष्यातून तारुण्यभानच्या चमूनं त्याचं केलेलं विश्लेषण यात आहे. हा सगळा अट्टाहास ज्यासाठी करायचा त्या जबाबदार लैंगिक वर्तनाचं महत्त्व सांगणारं आठवं प्रकरण आहे ‘बेजबाबदार लैंगिक वर्तन’. 

जोडीदार निवडीविषयी तरुणाई संभ्रमात असते. या संभ्रमातून सुटका करण्यासाठी मार्गदर्शक ठरणारी माहिती ‘जोडीदाराची निवड’ या नवव्या प्रकरणात देण्यात आली आहे. तारुण्यभानच्या आजवर घेण्यात आलेल्या शिबिरांमध्ये सहभागी झालेले तरुणतरुणी तारुण्यभानच्या चमूला विविध प्रश्न विचारतात. तरुणाईकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आणि त्यांच्या उत्तरांचा समावेश ‘प्रश्न तुमचे, उत्तर आमचे’ या शेवटच्या प्रकरणात करण्यात आला आहे. हे पुस्तक म्हणजे विवेकपूर्ण लैंगिक जीवन व्यतीत करण्याची मार्गदर्शिकाच आहे असं नक्कीच म्हणता येईल.  

तरुणांचा कल वाचनापेक्षा ऐकण्याकडे आणि बघण्याकडे अधिक असतो त्यामुळे तारुण्यभान उपक्रमातली विविध सत्रं ‘निर्माण फॉर यूथ’ या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या स्वरूपातही पाहता येतील. दर बुधवारी एक नवा व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला जातो. ‘तारुण्यभान - लैंगिकतेविषयी न बोलल्या जाणार्‍या प्रश्नांचा उलगडा’, ‘मासिक पाळीविषयी प्रश्न’, ‘हस्तमैथुन - समज-गैरसमज’ या आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देणारी तारुण्यभान मालिका तरुणाईमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांतच तिला साठ लाखांहून अधिक व्ह्युव्ज मिळाले आहेत. कोविडच्या काळात महत्त्वाच्या ज्ञानाचं हे खर्‍या अर्थानं विकेंद्रीकरण म्हणता येईल. 

-    चारुता गोखले

Tags: तारुण्यभान चारुता गोखले पुस्तक युट्युब लैंगिकता तरुणाई उपक्रम Tarunyabhan Charuta Gokhale Rani Bang Karuna Gokhale राणी बंग Load More Tags

Comments:

kiran shankar lagoo

APRTIM,BODY, MIND,SOUL,TOGATHER ISHUMAN BEHEVIR

Add Comment

संबंधित लेख