करोनाच्या वाढत्या फैलावामुळे जगातील बहुतांश देशांपुढे आर्थिक, सामाजिक, वैद्यकीय, राजकीय आव्हानांसोबतच शिक्षण क्षेत्रातही नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. गेले अनेक दिवस शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद आहेत. टाळेबंदी उठली तरी शिक्षणसंस्थांची द्वारे उघडायची की नाहीत हा प्रश्न आहे. विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की नाही यावरून धुमशान चालू आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षणप्रक्रिया त्वरित सुरू करावी असे काही लोकांना वाटते. पण ‘शारीरिक अंतर’ ठेवण्याच्या नियमांचे पालन या विद्यार्थ्यांनी केले नाही व करोनाचा संसर्ग वाढला तर काय होईल, हा प्रश्नही भेडसावतो आहे. एका बाजूला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे व दुसऱ्या बाजूला त्यांना करोनापासून सुरक्षित ठेवणे या द्वंद्वातून काय मार्ग काढायचा हा प्रश्न आहे. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने याबाबतचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शिक्षणसंस्थांची कुलुपे उघडली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ॲानलाईन शिक्षणाचा पर्याय सुचविण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निकाली लागेल हे एकवेळ मान्य केले तरी यामुळे ही कोंडी पूर्णपणे फुटेल असे नाही. एकतर यासाठी लागणाऱ्या साधनसुविधा आपल्याकडे सर्वदूर उपलब्ध नाहीत. या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या तरी यांचे यथायोग्य उपयोजन करण्याचे प्रशिक्षण नसेल तर हा सगळा खटाटोप वाया जाण्याची शक्यता आहे.
याबरोबरच संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांची मानसिकता बदलण्याचे फार मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. शिक्षणप्रक्रियेत तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत जाणार आहे हे मान्य केले तरी शिक्षक व विद्यार्थी यांच्या थेट व परस्पर संवादाचे महत्त्व कायमच राहणार आहे. यादृष्टीने ॲानलाईन शिक्षण हा एक विकल्प म्हणून मान्य केला तरी पर्याय म्हणून मान्य होण्याची शक्यता नाही.
शाळा व महाविद्यालयात सुमारे तीस वर्षांपूर्वी संगणक आले तेव्हा काय गंमती घडल्या याची आठवण अनेकांना असेल. काही ठिकाणी शिक्षक व विद्यार्थी संगणकाची मोडतोड करतील या भयातून संगणक कपाटात कुलुपबंद अवस्थेत ठेवणे किंवा मुख्याध्यापकांच्या घरी नेऊन ठेवणे अशी दृष्ये दिसत असत. यात मुख्याध्यापकांचा किंवा शिक्षकांचा दोष नव्हता. हे सारे कसे हाताळायचे याचे ज्ञान नव्हते व संभाव्य नुकसानीची जबाबदारी विनाकारण पत्करण्याची जोखीम कशाला घ्यायची ही मानसिकताही होती.
आता काळ बदलला आहे. अनेक शिक्षक, विद्यार्थी व पालक तंत्रज्ञानस्नेही झाले आहेत. मोबाईल फोन्सचे उपयोजन झपाट्याने वाढते आहे. असे असूनही जोपर्यंत ॲानलाईन शिक्षणाच्या साधनसुविधा सर्वत्र उपलब्ध होत नाहीत व शिक्षकांचे योग्य प्रशिक्षण होत नाही तोपर्यंत याची परिणामकारक अंमलबजावणी करता येणार नाही. तसेच संगणकाच्या पडद्यासमोर सलगपणे किती तास बसले तर स्वास्थ्य बिघडणार नाही व याचा वयोगटाशी थेट संबंध आहे का याबाबत स्पष्ट कल्पना आल्याशिवाय काहीही ठोस निर्णय घेणे कठीण आहे.
शाळा व महाविद्यालयातील प्रचलित शिक्षणप्रक्रियेला विकल्प म्हणून ‘दूरस्थशिक्षण’,‘होम स्कूलिंग’ व ‘स्वयंशिक्षण’ यांचा विचार करावा लागेल. हे पर्याय निश्चितच नाहीत, पण विकल्प जरूर आहेत. यातील ‘दूरस्थशिक्षण’ हा विकल्प ‘मुक्तशाळा’ व ‘मुक्त विद्यापीठ’ यांनी बऱ्यापैकी यशस्वीपणे उपयोजित केला आहे. दूरस्थशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित करताना शिक्षक व विद्यार्थी यांचा प्रत्यक्ष संवाद होणार नाही हे गृहीत धरलेले असते. शैक्षणिक साहित्यातूनच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न असतो. असा संवाद होण्यासाठी विद्यार्थी किमान वयोमर्यादा गाठलेला असावा लागतो. यामुळे दहावी, बारावी या स्तरावरील विद्यार्थी दूरस्थशिक्षणाचा मार्ग काही प्रमाणात उपयोजित करू शकतात. उच्च शिक्षणासाठी तर दूरस्थशिक्षण हा एक उत्तमच विकल्प आहे. परंतु प्राथमिक व माध्यमिक स्तरावर दूरस्थशिक्षण उपयोगाचे नाही. या स्तरावर ‘होम स्कूलिंग’ हा विकल्प विचारात घेता येऊ शकेल.
‘होम स्कूलिंग’ हे काय प्रकरण आहे हे समजून घ्यायला हवे. अमेरिकेत ‘होम स्कूलिंग’ तर इंग्लंड व इतर युरोपिय देशात ‘होम एज्युकेशन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या या वेगळ्या वाटेला ‘घरबसल्या शिक्षण’ असे मराठीत म्हणता येईल. एका अर्थाने होम स्कूलिंग मध्ये नवीन असे काही नाही. माणूस कळपात राहू लागला व यथावकाश कुटुंबसंस्था अस्तित्वात आली तेव्हापासून घरच्या घरी शिक्षण सुरू झाले असणार. कुटुंबसंस्था जोपर्यंत राहील तोपर्यंत हे सुरूच राहणार आहे. जगातील बहुतेक सर्व देशात होम स्कूलिंग विविध प्रकारे अंमलात आणण्यात आले आहे. आजही ते सुरू आहे.
पालकांनी त्यांच्या जवळील ज्ञान व कौशल्ये मुलांना थेटपणे द्यावीत किंवा संस्काराप्रमाणे मुलांनी ती अप्रत्यक्षपणे घ्यावीत हे परंपरेने जगभर होत आले आहे. शालेय शिक्षण सक्तीचे करण्याबाबतचे कायदे येण्यापूर्वी मुलांचे शिक्षण कुटुंबात किंवा समाजामार्फत होत असे. होम स्कूलिंग या संकल्पनेकडे अलीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. खाजगी व सार्वजनिक शाळांना हा एक विधिवत पर्याय आहे असे मानले जाते. अजूनही काही देशांनी याला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. असे असूनही होम स्कूलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या धिम्या गतीने सर्वत्र वाढते आहे. यामागची कारणे काय आहेत?
स्थानिक शाळेबद्दलचे असमाधान हे एक प्रमुख कारण असले तरी काही आणखीही कारणे यामागे आहेत. सर्वसाधारण शाळांमधून मुलांच्या व्यक्तिगत गरजांकडे होणारे दुर्लक्ष, शाळेतील मुलांची झुंडशाही, प्रदूषित वातावरण, अध्यापनाचा सुमार दर्जा, असमाधानकारक अभ्यासक्रम, अंमलबजावणीतील हेळसांड अशी विविध कारणे यामागे असू शकतात. विशिष्ट धार्मिक व नैतिक शिक्षणाची गरज हे कारणही सांगितले जाते. मुलांच्या अध्ययन व विकास प्रक्रियेत आपला सहभाग असायला हवा असे काही पालकांना वाटते. मुले काय व कसे शिकतात यावर आपले थेट नियंत्रण असावे असे काहींना वाटते. तसेच मुलांच्या व्यक्तिगत कलानुसार व क्षमतेनुसार शिक्षण दिले जावे हा विचारही यामागे असू शकतो. एका शिक्षकाने एका वेळी अनेकांना शिकविण्यापेक्षा एकाने एकालाच ‘वन टू वन’ पध्दतीने शिकविणे अधिक परिणामकारक आहे, असेही काही लोकांना वाटते.
होम स्कूलिंग हे एक पर्यायी शिक्षण तत्त्वज्ञान आहे, अशी मांडणी सुझन आयझॅक्स, शार्लोट मॅसन, जॉन होल्ट, सर केनेथ रॉबिन्सन, इत्यादी शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. होम स्कूलिंगच्या मागचे तत्त्वज्ञान विशद करताना जॉन होल्ट यांनी प्रथम ‘डी-स्कूलिंग’ किंवा ‘शाळेविना शिक्षण’ ही संकल्पना मांडली. होम स्कूलिंग ही एक पालकत्वाची शैली आहे, पध्दती आहे. मनुष्य वस्तीपासून दूरवर एकाकी राहणाऱ्या कुटुंबातील मुले, थोड्या कालावधीसाठी पालकांबरोबर राहणारी मुले, सातत्याने प्रवास करणाऱ्या पालकांची मुले यांचे प्रश्न वेगळेच आहेत. क्रीडापटू, कलावंत, संगीताचे अभ्यासक इत्यादींचे प्रशिक्षण व सराव/ रियाझ यांचा सुयोग्य मेळ घालणे महत्वाचे असते आणि पारंपारिक शाळा व महाविद्यालयातून हे सारे जमवून आणणे कठीण असते.
स्वयंशिक्षणाचे अनेक आदर्श आपल्याकडे आहेत. एकलव्याची कथा आपल्या चांगल्या परिचयाची आहे. पण जगभर अशा अनेक सत्यकथा आहेत. कार्व्हरची कथा काही वेगळी नाही. चहूबाजूंनी नकारघंटा वाजत असताना, परिस्थिती प्रतिकूल असताना, कोणत्याही फलाची शक्यता नसतानाही माणसे केवळ स्वयंस्फूर्तीने शिकलेली आहेत, स्वत:ला सिध्द करू शकलेली आहेत. विकसित देशांमध्ये स्वयंशिक्षणाच्या मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन विशेष शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आले आहे. उदाहरणार्थ: स्यू शिरीन यांचे ‘सेल्फ-ॲक्सेस’, बी. पेज यांचे ‘लेटींग गो, टेकींग होल्ड- अ गाइड टु इन्डिपेंडन्ट लॅंग्वेज लर्निंग’.
मुख्य प्रवाहातील शालेय शिक्षणापासून वेगळी पर्यायी व्यवस्था आणण्याचे प्रयत्न भारतातही झाले आहेत. गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांचे शांतीनिकेतन व विश्वभारती विद्यापीठ, श्री अरविंदांचे इंटरनॅशनल सेंटर ॲाफ एज्युकेशन, महात्मा गांधीजींचे बुनियादी शिक्षण, जे. पी. नाईक व चित्राताई नाईक यांचे गारगोटी विद्यापीठ, लीलाताई पाटील यांचे सृजन आनंद विद्यालय, विद्याताई पटवर्धन यांचे अक्षरनंदन ही काही ठळक उदाहरणे आहेत. प्रचलित शिक्षण व्यवस्थेबद्दलच्या असमाधानातून करण्यात आलेले हे शैक्षणिक प्रयोग आहेत. यांचे महत्त्व वादातीत आहे. शिक्षण प्रक्रिया ही एकसाची व कुलुपबंद होऊ नये व प्रयोगशील रहावी हा महत्वाचा विचार यामागे आहे.
करोना महामारीने वेठीस धरलेल्या शिक्षण क्षेत्राला यातून खूप काही घेण्यासारखे आहे. करोनाचे संकट केव्हा संपेल हे कोणीच सांगू शकत नाही. सम-विषम पध्दतीने दुकाने चालवता येतील, मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय व खाजगी कार्यालयांचे कामकाजही चालवता येईल, सुरक्षित अंतर राखून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करता येतील, पण शिक्षण व्यवस्थेचे काय करायचे याचे समाधानकारक उत्तर आज कोणाकडेच नाही.
आठवड्यातील तीन दिवस शाळा व तीन दिवस घरी अशी व्यवस्था करायची म्हटले तरी शाळेत तीन दिवस अभ्यासक्रमातील कोणते घटक घ्यायचे व कोणते घटक मुलांवर घरी अभ्यासासाठी सोपवायचे हे ठरवणे सोपे नाही. तसेच,आरोग्य सुरक्षेसाठी आवश्यक ते शारीरिक अंतर मुलांमध्ये कसे ठेवायचे हे आव्हानही संबंधितांच्या समोर आहे.
शिक्षकांच्या किंवा पालकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग व मार्गदर्शनाशिवाय प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्वसामान्य विद्यार्थी काही शिकू शकतील यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. किती पालक यासाठी वेळ देऊ शकतील व किती यासाठी सक्षम असतील हेही आपल्याला माहीत नाही.
सध्याच्या पेचप्रसंगातून बाहेर पडायचे असेल तर शिक्षण प्रक्रियेशी संबंधित सर्वच घटकांनी निर्धार केला तर काही मार्ग निघू शकतो. महायुध्दात बेचिराख झालेले देश फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभे राहिले, महापूर व वादळांशी सामना करीत माणसे नव्या आशेने कामाला लागली अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत.
काही गोष्टी शाळेत, काही गोष्टी घरी, काही दूरस्थशिक्षणाच्या माध्यमातून, काही होम स्कूलिंगच्या माध्यमातून, काही स्वयंशिक्षणाच्या माध्यमातून शिकणे अशा ‘मिक्स्ड पॅकेज’ ला सध्यातरी पर्याय नाही हे मान्य करावे लागेल. निराशेच्या गर्तेतून बाहेर येऊन शिक्षणाच्या नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तर
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती,
कथा या खुल्या सागराला..
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा,
किनारा तुला पामराला...
- हर्षवर्धन कडेपूरकर, नाशिक
harsh.kadepurkar@gmail.com
(लेखक, नाशिक येथील बी.वाय.के. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)
Tags: शिक्षण कोरोना हर्षवर्धन कडेपूरकर दूरस्थशिक्षण होम स्कूलिंग Education Teaching Harshwardhan Kadepurkar Distance Education Home Schooling Load More Tags
Add Comment