लोकसाहित्याच्या अभ्यासक- डॉ.सरोजिनी बाबर

मराठी लोकसाहित्याच्या संकलक असलेल्या डॉ.सरोजिनी बाबर यांचे नाव लोकसंस्कृतीच्या अनुषंगाने अग्रक्रमाने घ्यावे लागते. जाणीवपूर्वक, डोळसपणे, प्रांजळ तळमळीने केलेल्या लोकसाहित्य संकलनामुळे डॉ.बाबर यांचे लोकसाहित्यात महत्वाचे योगदान आहे. याबरोबरच त्यांनी विविध वाङ्मय प्रकारातून विपुल लेखन केले आहे. इ.स.1961 मध्ये महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. या माध्यमातून डॉ.बाबर यांनी अफाट संकलन करुन लोकसाहित्य व लोकसंस्कृती विषयक विविध ग्रंथांचे संपादन केले.

डॉ.सरोजिनी बाबर यांचा जन्म इ.स.1920 मध्ये झाला. श्री.कृष्णराव बाबर व गंगूबाई बाबर या दांपत्याच्यापोटी जन्मलेल्या सरोजिनी लहानपणीच पोलिओच्या बळी ठरल्याने पायाने थोडया अधू झाल्या होत्या. मुलीचा जन्म म्हणजे दुर्दैव समजल्या जाणाऱ्या काळात श्री.कृष्णराव बाबर यांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण दिले. स्त्रियांविषयी उदार दृष्टिकोन असलेल्या वडिलांकडून आनुवंषिक सद्विचारांचा, सत्कार्याचा, समाजसेवेचा संस्कार व वारसा सरोजिनी यांना मिळाला होता. इ.स. 1951 मध्ये पी.एच.डी पदवी त्यांनी मिळवली. पुढे त्यांच्या समाजशिक्षणमाला व लोकसाहित्यामधल्या प्रचंड योगदानामुळे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना इ.स.1982 साली डी.एस्सी. (डॉक्टर ऑफ सायन्स) ही पदवी प्रदान करुन त्यांचा सन्मान केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इ.स. 1952 ते 1957 या काळात त्या तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधानसभा सदस्या होत्या. महाराष्ट्र विधानसभेच्या त्या इ.स.1964 ते 1966 या कालावधीत सदस्या होत्या. इ.स. 1968 ते 1974 या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या.

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांची व्यासंगी वृत्ती, विद्वत्ता, मराठी साहित्याबद्दलचे प्रेम जागृत होते हे विविध प्रसंगांतून लक्षात येते. यासंबंधी विविध अनुभव त्यांनी त्यांच्या ‘माझ्या खुणा माझ्या मला’ या आत्मकथनवजा पुस्तकात मांडले आहेत. राजकारणात नाते महत्वाचे नसून विचार प्रभावी ठरतो, या विचाराच्या डॉ.बाबर होत्या. संयुक्त महाराष्ट्रासंबंधी प्रश्न निर्माण झाला तेव्हा त्यावर प्रभावी विचार मांडून वक्तृत्वशैलीच्या जोरावर होकारार्थी ठरावासाठी त्या मते मिळवू शकल्या. विधानसभेत निवडून गेल्यावर स्त्रीजीवनविषयक सुधारणा घडवून आणू अशी इच्छा धरुनच त्यांनी विधानसभेतील स्थान ग्रहण केले. एखादा कायदा तयार होताना स्त्रियांच्या कल्याणाची गोष्ट कोणती होईल आणि तो विशिष्ट कायदा सर्वसामान्य स्त्रीजीवनाला कसा पोषक ठरेल याचा अभ्यास करुनच डॉ.बाबर सभागृहात प्रश्नोत्तरांच्या तासाच्यावेळी नियमितपणे हजर राहत असत.

भारतीय समाजातील लोकसंस्कृतीची आज सर्व जगभर चर्चा होते आहे. लोकसंस्कृतीची अभिव्यक्ती प्रामुख्याने भारतीय कुटुंबव्यवस्थेतील स्त्री व तिच्या जीवन वाटचालीतून आविष्कृत होते. आपल्या संस्कृतीत विविध सण, उत्सव, कुलाचार, पारंपरिक चालीरिती व विधींना महत्वाचे स्थान आहे. या लोकसंस्कृतीचे समग्र दर्शन डॉ.सरोजिनी बाबर यांच्या लोकसाहित्यविषयक लेखनातून घडते. डॉ.बाबर यांनी ‘स्त्री’ व ‘लोकसंस्कृती’ केंद्रस्थानी ठेवून विविध वाङ्मयप्रकारातून लेखन केले आहे. डॉ.बाबर यांचे लोकसाहित्यविषयक लेखन व संपादने तसेच त्यांच्या कादंबऱ्या, कथा, काव्य, स्फूटलेखन व बालसाहित्यातूनही लोकसंस्कृती व स्त्रीजीवन विविध घटकांव्दारे आविष्कृत झालेले दिसते. संस्कृतीचा वसा घेऊन जीवनाकडे पाहणाऱ्या व्यक्ती डॉ.बाबर यांनी आपल्या लेखनातून रेखाटल्या. यामध्ये प्रामुख्याने लोकसंस्कृतीतील स्त्री दिसते. स्त्रीजीवनातील विविध प्रसंग रेखाटून स्त्रीमनातील विविध भावभावनांचे चित्रण डॉ.बाबर यांनी केले. सामाजिक परिस्थितीमुळे स्त्रीजीवनातील नियंत्रणे, बंधने इ.चा संदर्भही त्यांनी स्त्रीचित्रणाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. पारंपरिक स्त्रीजीवन चित्रण, नातेसंबंधातील विसंवाद, ढासळलेली नीतिमूल्ये आणि त्यासाठी संस्कारशील आदर्शवादही त्यांनी मांडला.

डॉ.बाबर यांच्या लेखनात स्त्रीजीवनाशी निगडीत पुरुषजीवन व सर्व नातेसंबंधही तितक्याच समर्थपणे आलेले दिसतात. भारतीय संस्कृती व लोकपरंपरा याविषयी असणारे डॉ.बाबर यांचे प्रेम, ओढ पात्रांशी व परिस्थितीशी तडजोड करताना दिसतात.

मराठीच्या प्रारंभकाळापासून ते 1960 या कालावधीत स्त्रियांनी मराठीत लिहिलेल्या वाङ्मयाचा परामर्श तसेच स्त्रीशिक्षणाच्या वाटचालीतील विविध घटकांचा अभ्यास करुन स्त्रीशिक्षणाचा आढावा डॉ.बाबर यांनी आपल्या संशोधन लेखनातून घेतला आहे.

डॉ.बाबर यांनी संकलन करुन या संकलित सामग्रीला संग्राहक म्हणून स्वतःकडे न ठेवता हा लोकवाङ्मयाचा ठेवा त्यांनी वैयक्तिकरित्या तसेच लोकसाहित्य समितीच्या माध्यमातून ग्रंथरुपाने अभ्यासकांच्या व वाचकांच्या समोर आणला. बाबरांनी वैयक्तिकरित्या काही संकलनात्मक पुस्तके प्रसिध्द करुन लोकसाहित्याबद्दलची आवड आणि कर्तव्यतत्परता दाखविली आहे. ‘सुंबरान मांडील’ (1957) व ‘गुलाबकळी’ (1961) या पुस्तकांतून भारतीय लोकसंस्कृतीतील विविध लोककथांचे संकलन त्यांनी केले आहे. ‘नक्षत्रमाला’ (1971) या पुस्तकात मराठी लोककथांचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे.

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्ष डॉ.बाबर यांनी या समितीच्या माध्यमातून संपादित केलेल्या लोकसाहित्य व लोकसंस्कृती विषयक ग्रंथांची संख्या विपुल आहे. जनलोकांचा सामवेद, कुलदैवत, भोंडला भुलाबाई, श्रावणभाद्रपद, सण-उत्सव, दसरादिवाळी, आदिवासींचे सण उत्सव ही त्यांची सणउत्सव व देवताविषयक संपादने आहेत. ‘कौटुंबिक नातेसंबंधविषयक संपादने’ मध्ये बाळराज, जा माझ्या माहेरा, राजविलासी केवडा, जाईमोगरा, नादब्रम्ह, कारागिरी, रांगोळी इ.संपादने आहेत. याबरोबरच लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, लोकसाहित्य साजशिणगार, नंदादीप, सांगीवांगी, वैजयंती इ.संपादनेही आहेत.

श्री. कृष्णराव बाबर यांनी इ.स.1950 मध्ये समाजशिक्षणमाला सुरु केली. स्वतः सरोजिनी या समाजशिक्षणमालेच्या अंकांच्या संपादक होत्या. नव्याने अक्षरओळख झालेल्या सर्वसामान्य लोकांना लेखनवाचनाची गोडी लागावी आणि त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान सोप्या भाषेत आणि माफक किंमतीत देता यावे या हेतूने समाजशिक्षणमाला सुरु झाली. या मालेचे एकूण 550 अंक प्रकाशित झाले.

मराठी लोकसंस्कृती समृध्द असल्याची प्रचिती लोकवाङ्मयातून येते. मराठी लोकसाहित्याचे महाराष्ट्रात पहिले संमेलन भरविण्याची महत्वाची कामगिरी महाराष्ट्र लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा या नात्याने डॉ.सरोजिनी बाबर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली. इ.स.1959 मध्ये मुंबई येथे लोकसाहित्याचे अखिल भारतीय संमेलन झाले. त्यावेळी महाराष्ट्रात असे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारे खास संमेलन भरवावे असा विचार पुढे आला. तत्कालीन मुख्यमंत्री ना.यशवंतराव चव्हाण यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती. 23 मे 1961 मध्ये पुणे शहरातील सदाशिव पेठेमधील सरकारी अध्यापन विद्यालयात लोकसाहित्य, लोकसंस्कृतीचे संमेलन भरविण्यात आले. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ना.यशवंतराव चव्हाण, समाजकल्याण खात्याचे मंत्री ना.डॉ.त्रिं.रा.नरवणे, शेतकी खात्याचे उपमंत्री ना.मधुसूदनजी वैराळे, महापौर श्री.किराड, श्री.चिन्मुळगंदसाहेब (सचिव, शिक्षणखाते महाराष्ट्र), डॉ.पवार व लोकसाहित्य समितीचे सभासद, तसेच अनेक निमंत्रित, लोकसाहित्याचे रसिक इत्यादींची उपस्थिती होती. निबंधवाचन, लोकनृत्य, लोककलांचे प्रदर्शन, लोकगीत गायनाची संगीतसभा असे चार प्रमुख विभाग या संमेलनात होते. या संमेलनातील लोकनृत्यांसाठी व लोकगीतांच्या गायनासाठी गावोगावचे कलाकार हौसेने पुण्याला आले होते. डॉ.सरोजिनी बाबर यांची लोकसाहित्याविषयी असलेली तळमळ संमेलनाच्या या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते. लोकसाहित्याविषयीचे लेखन, संकलन व संपादन यांबरोबरच संमेलनासारखे विविध उपक्रम यशस्वीपणे पार पाडून समाजात पुन्हा एकदा लोकसाहित्याविषयी आस्था निर्माण करण्यासाठी व लोकसाहित्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले दिसतात.

एक कृतिशील लेखिका म्हणून बाबर यांनी आपल्या संस्कृतीशी प्रामाणिक राहून जीवनाचा आस्वाद घेतला. या आस्वादाचा आविष्कार त्यांनी आपल्या लेखनातून केला. त्यांनी आपल्या मनावर संस्कृतीचा कसा प्रभाव असतो हे सांगण्यासाठी भरपूर लेखन केले. समाजासाठी त्यांनी भरपूर वेळ दिला. सामाजिक व कौटुंबिक जीवनाचे त्यांनी चिंतन केले. हे चिंतन व मनन बोलीभाषेच्या माध्यमातून लेखनाव्दारे समाजासमोर ठेवले. विविध अनुभव, प्रसंग, परिस्थिती इत्यादींमधून संस्कृतीचा नेमका प्रभाव ओळखण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे हे आपल्याला त्यांच्या लेखनातून जाणवते. ग्रामीण जीवन व संस्कृती यांच्यातील अतूट संबंध ओळखून त्यांनी ग्रामजीवनातील विविध घटकांना पारखून घेतले. त्यांचा आविष्कार लेखनातून केला. ग्रामीण भागातील जीवनमूल्ये त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यांचाच आविष्कार नवीन पिढीसाठी केलेल्या लेखनातून त्या करतात.

आजच्या विज्ञानयुगात मानवी जीवन ताणतणावयुक्त, संघर्षमय, अशांत होऊन निराशेच्या गर्तेत जाताना दिसते. आज अतृप्तीच्या खुणा मानवी संस्कृतीच्या चेहऱ्यांवर उमटलेल्या दिसतात. मानवच मानवतावादी मूल्यांच्या अधःपतनास जबाबदार आहे हे लक्षात येऊ लागले आहे. सद्विचारांची कास सोडून अविचारांची, अविवेकाची, अशांतीची पूजा बांधू पाहणाऱ्या मानवाला आज पुन्हा मागे वळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लोकसाहित्याची उजळणी करणे, त्यातील खाणाखुणांनी नव्याने ओळख करुन घेणे, संस्कृतीतील समृध्दी व पावित्र्य लक्षात घेऊन महान व उच्च आचारविचारांची मनापासून पूजा बांधणे आजच्या काळात महत्वाचे वाटते. संस्कृतीतील महान मानवतावादी मूल्यांना नव्याने उजाळा देऊन आचरणात आणण्यासाठी लोकसाहित्यातील विविध घटकांकडे अभ्यासूवृत्तीने, डोळसपणे पाहणे ही काळाची गरज आहे.

- प्रा.डॉ.भारती रेवडकर

(प्रोफेसर व मराठी विभागप्रमुख, श्रीशिवाजी महाविद्यालय, बार्शी.)

प्रस्तुत लेखिकेने 'डॉ. सरोजिनी बाबर यांच्या वाङ्मयाचा अभ्यास' या विषयावर पी.एचडी केलेली आहे.

 

Tags: मराठी साहित्य Load More Tags

Comments:

Pruthviraj Pawar

नमस्कार मी पृथ्वीराज पवार,डॉ.सरोजिनी बाबर (आक्का) यांचा नातू आपण लिहिलेला लेख वाचुन व ति.आक्का वरील आपले प्रेम पाहुन फार आनंद झाला.आपल्यास डॉ.बाबर यांच्या बद्दल अजून माहिती आणि संदर्भ लागल्यास माझ्याशी आपण कधीही संपर्क साधू शकता मोबाइल नं. 8390118811 (पृथ्वीराज पवार)

डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण

नमस्कार , खुप छान लेख आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना उपयुक्त व मार्गदर्शक आहे.

देवेंद्र पचंगे

लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती !

Add Comment