साधना प्रकाशनाची दोन नवी पुस्तके ऑनलाईन उपलब्ध

साने गुरुजींच्या 121 व्या जयंतीचे (24 डिसेंबर) निमित्त साधून दोन पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली आहेत. ‘दंतकथा’ आणि ‘उघडा दरवाजे उघडा’ ही दोन्ही पुस्तके अनुवादित आहेत आणि मराठीतील नामवंत लेखक भारत सासणे यांनी ते अनुवाद केलेले आहेत. (ही दोन पुस्तके इ-बुक स्वरूपातही उपलब्ध आहेत.) ही दोन्ही पुस्तके वाचताना आपण अनुवादित लेखन वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही, इतके ते अनुवाद प्रवाही झाले आहेत. एकेका बैठकीत वाचून होतील अशी ही प्रत्येकी पन्नास पानांची पुस्तके आहेत.

'दंतकथा' ही लघुकादंबरी, अब्दुल बिस्मिल्लाह यांनी 1990 मध्ये लिहिली आणि 'इंडिया टुडे'च्या हिंदी आवृत्तीत क्रमशः प्रसिद्ध झाली. नंतर ती राजकमल प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आली. त्यानंतर दशकभराने ती कादंबरी भारत सासणे यांनी वाचली आणि तिचा मराठी अनुवाद केला. मग 2002 च्या साधना दिवाळी अंकात ती संपूर्ण कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या वेळी संपादक असलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांना ती विशेष आवडली होती, हे नोंद घेण्यासारखे आहे. 'दंतकथा' ही बाह्यरूपाने पाहिली तर एका कोंबड्याची आत्मकथा आहे, पण अंतरंग पाहिल्यावर दिसतात एका पशूच्या नजरेतून माणूस नावाच्या प्राण्याचे जीवनव्यवहार व मनोव्यापार!

दुसरे पुस्तक आहे, 'दरवाजे खोल दो' या उर्दूमधील नाटकाचा अनुवाद. 1964 मध्ये हे पुस्तक कृष्ण चंदर यांनी लिहिले. त्या काळात ते नभोनाट्य स्वरूपात आले आणि नंतर रंगमंचावरही. मात्र ते भारत सासणे यांच्या वाचनात आले या वर्षी. त्याचा संपूर्ण अनुवाद प्रसिद्ध केला 13 जून 2020 च्या साधना साप्ताहिकात. नव्याने बांधली जात असलेल्या इमारतीचा मालक आणि त्या इमारतीत वास्तव्यासाठी येऊ इच्छिणारे भाडेकरू यांच्यातील संवाद असे त्या नाटकाचे बाह्यरूप. मात्र त्याच्या अंतरंगात दिसतात- नव्याने उभारणी होत असलेले भारत नावाचे राष्ट्र आणि त्यात वास्तव्य करणारे विविध भाषा बोलणारे व विविध जाती, धर्म, संस्कृतीचे लोक!

'दंतकथा' हे पुस्तक सोबतच्या लिंकवरून विकत घेता येईल :

पेपरबॅक आवृत्ती   
ई- बुक - (किंडल)

‘उघडा दरवाजे उघडा’ हे पुस्तक सोबतच्या लिंकवरून विकत घेता  येईल :

पेपरबॅक आवृत्ती   
ई- बुक - (किंडल)