आपले शत्रू आपणच!

Photo Courtesy: Getty Images

हत्तीला पकडण्याची एक ठराविक पद्धत आहे. हत्तीचा कळप जंगलातील ज्या रस्त्याने नेहमी जाणेयेणे करतो, त्या रस्त्यावर एक खोल खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यावर झाडाच्या नाजूक फांद्या, पाने, माती टाकून तो बुजवला जातो. जणूकाही तिथे सर्वसामान्य जमीन आहे, असा आभास निर्माण केला जातो. मग जेव्हा त्या मार्गाने जाणाऱ्या कळपातील एखादा हत्ती त्या नाजूक फांद्यावर पाय देतो, तेव्हा साहजिकच त्या हत्तीच्या वजनाने ती फांदी मोडून हत्ती त्या खड्ड्यात पडतो. बाकीचे हत्ती घाबरून पळून जातात. मग माहूत येऊन खड्ड्यात अडकलेल्या त्या हत्तीला दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढतात. आणि मग आयुष्यभरासाठी तो हत्ती त्या माहुताचे अर्थार्जनाचे साधन बनतो.

एकदा असेच एक हत्तीचे पिल्लू त्या खड्ड्यात पडते. माहूत त्या पिलाला त्या खड्ड्यातून बाहेर काढून घरी घेऊन येतो. त्यावेळी आपले स्वातंत्र्य हरवलेले ते पिल्लू जिवाच्या आकांताने माहुताच्या तावडीतून निसटून जाण्याचा प्रयत्न करते. माहूत या साऱ्या गोष्टीला सरावलेला असल्याने त्याला अनुभवातून या पिलाला कसे हाताळाचे याचा 'अंदाज' आलेला असतो. तो त्या पिलाच्या पायात एक साखळी बांधतो आणि पळून जाण्यापासून अटकाव करण्याची व्यवस्था करतो. स्वातंत्र्य हरवलेले ते पिल्लू अंगातील सारी शक्ती एकवटून ती साखळी तोडायचा प्रयत्न करते. परंतु ती साखळी मजबूत असल्याने त्या पिलाला तोडता येत नाही. 

काही वर्षे निघून जातात. आता त्या हत्तीच्या पिलाचे रूपांतर एका बलदंड अशा हत्तीमध्ये झालेले असते. त्या हत्तीच्या पायात अजूनही त्याच्या लहाणपणी घातलेली ती साखळी असते. खरेतर आता त्या हत्तीच्या अंगात इतके बळ आलेले असते की,  मोठा साखळदंडसुद्धा तो हत्ती सहजपणे तोडू शकतो. परंतु, एका लहानशा साखळीला घाबरून तो हत्ती ते गुलामीचे जिणे  जगत असतो. 

हे असे का होते? कारण लहानपणी त्या हत्तीच्या पिल्लाने जिवाच्या आकांताने प्रयत्न करून पाहिलेला असतो. परंतु पायातील साखळी काही त्याला तोडता आलेली नसते. त्यामुळे त्या हत्तीच्या मनात ही गोष्ट पक्की बसलेली असते, की आपल्या ताकदीपेक्षा त्या साखळीची क्षमता जास्त आहे. लहानपणीच्या त्या अनुभवाचा परिणाम आता असा होतो, की  मोठा साखळदंड तोडण्याची क्षमता असलेला तो हत्ती त्या लहानशा साखळीला हिसका द्यायचा साधा प्रयत्नसुद्धा करत नाही. आणि तसा प्रयत्नच न केल्यामुळे त्याचे आयुष्य माहुताच्या रूपाने कुणीतरी दुसराच सतत नियंत्रित करत राहतो.

मग असा प्रश्न पडतो की त्या हत्तीचे खरे शत्रू कोण? रस्त्यामध्ये खड्डा खणून त्याला पकडणारा माहूत? त्याला त्या खड्ड्यात तसेच सोडून पळून जाणारे त्याचे मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट? की त्याचे, नशीब, नियती, परिस्थिती? याचे उत्तर कुणाही सुज्ञ माणसाला विचारले तर तो हेच सांगेल की, त्या हत्तीच्या पिलाचे शत्रू यापैकी कुणीही नाही. त्या हत्तीच्या पिलाचा खरा शत्रू आहे ते स्वतः! त्याची चुकीची विचार करण्याची पद्धत. कारण क्षमता असतानाही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न न करणारा हत्ती, स्वतः जितका त्याच्या त्या परिस्थितीला जबाबदार आहे तितके दुसरे कुणीही नाही. 

तर जे त्या हत्तीच्या पिलाचे झाले, तेच आपलेही होत असते का? खरेतर त्या हत्तीच्या मनात जसा त्याच्या पायातील साखळीबद्दल एक भयगंड तयार होतो. तसेच अनेक माणसे आयुष्यात नवीन काही करून पाहण्यापेक्षा चाकोरीत राहण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानतात. आपल्या मनातील भयगंडाला थेटपणे सामोरे जाणयापेक्षा त्याच्या आहारी जाणे पसंद करतात. आणि मग तो भयगंड दूर न करता त्याला कुरवाळत राहून, आपल्या दुर्दशेला दुसरे कुणीतरी जबाबदार असल्याचे रडगाणे गात राहतात. 

जे व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे, तेच अनेक अर्थांनी समाजाच्या बाबतीतही खरे आहे. समाजालाही भयगंडाला हटविण्यापेक्षा त्याला कवटाळणेच अधिक श्रेयस्कर वाटते. मागास समाजापासून तथाकथित प्रगत समजल्या गेलेल्या समाजाने काही भयगंड मोठ्या निष्ठेने आणि आस्थेने जपून ठेवलेले पाहायला मिळतात.

मार्टिन सेलिग्मन आणि जी. बिगले यांनी 1975 मध्ये 'लर्नेड हेल्पलेसनेस इन द रॅट' हा शोधनिबंध 'जर्नल ऑफ कंपॅरिटिव्ह फिसिओलॉजी अँड सायकॉलॉजी' या अतिशय प्रतिथयश अशा शोधपत्रिकेत प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये उंदीर एका विशिष्ठ परिस्थितीला सामोरे गेल्यानंतर त्या परिस्थितीचे आकलन कसे करतात; त्याचा त्यांच्या विचार करण्याच्या, प्रतिसाद देण्याच्या, अनुभवांचे अर्थ लावण्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो; याचा खूप सखोल उहापोह केला होता. 

यामध्ये एका प्रयोगात दोन उंदरांना दोन वेगळ्या पिंजऱ्यात ठेवले होते. त्यातील एका उंदराला पिंजऱ्यातून सुटून जायचा प्रयत्न केल्यावर विजेचा धक्का दिला. त्या झटक्याने त्या उंदराला झालेला त्रास, त्याचे गतप्राण होणे शेजारच्या पिंजऱ्यातील उंदीर पाहिल अशी व्यवस्था केलेली होती. आणि ज्या उंदराने हे सगळे पाहिले आहे, त्याला त्या पिंजऱ्यातून पळून जाता येईल अशी व्यवस्थाही केली. परंतु शेजारच्या पिंजऱ्यातील उंदराने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला कसा विजेचा धक्का बसला, हे या दुसऱ्या उंदराने पाहिलेले असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे विजेचा प्रवाह प्रवाहित न करताही आणि उंदराला पिंजऱ्यातून पळून जाता येणे शक्य असूनही, तो तसे करत नाही. कारण आपल्या अनुभवातून तो असहायता शिकलेला असतो.

यावर मानसशास्त्रामध्ये खूप मूलगामी संशोधन झाले आहे. आज ज्याचा सकारात्मक विचार करण्याच्या पद्धती म्हणून गवगवा झालेला आहे, अशा अनेक पद्धती या प्रकारच्या संशोधनांचा, अभ्यासांचा परिणाम आहेत. या मार्टिन सेलिग्मन यांनी 2004 मध्ये टेड टॉक मध्ये दिलेल्या व्याख्यानातून खूप मूलगामी चिंतन प्रेक्षकांसमोर ठेवले आहे. मानसशास्त्राचा प्रवास हा आजारावरील एक उपचार पद्धती इथपासून मानसिक स्वास्थ प्राप्त करणे अशा रचनात्मकतेपर्यंत कसा झाला, हे त्यांनी अतिशय नेमकेपणाने आपल्या समोर ठेवले आहे. 

मानवी आयुष्यातील प्राथमिक टप्पा, केवळ तात्कालिक आनंद शोधण्याचा असतो. त्यानंतरचा टप्पा ज्या गोष्टीने आपण देहभान हरपून जातो असे काहीतरी करण्याचा असतो. तर तिसरा टप्पा, आयुष्याला अधिक गहिरा अर्थ देणाऱ्या  रचनात्मक कार्यातून इतरांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा असतो. या तीन टप्प्यांपैकी आपण नेमके कुठल्या टप्प्यावर आहोत हे सातत्याने तपासणे आणि आहोत त्यापेक्षा उन्नत टप्प्याकडे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असणे यातून आयुष्याला अनोखे मोल येऊ शकते. म्हणजे आपले आयुष्य उन्नत असण्यासाठी आणि नसण्यासाठीही जर कुणी जबाबदार ठरत असेल तर प्रामुख्याने आपण स्वतः!

अग्नी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्यानंतर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी या क्षेपणास्त्रांच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र झटणारे डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना प्रश्न विचारला गेला होता की,  "यातून काय पाठवता येईल?" या प्रश्नाचा रोख अर्थातच असा होता की,  किती क्षमतेचा अणुबॉम्ब आपल्या शत्रूराष्ट्रावर, किती  अंतरापर्यंत  पाठविता येईल? यावर डॉ. कलाम चेहऱ्यावरील स्मित कायम ठेवत म्हणाले "यातून फुलेसुद्धा पाठविता येतील !" कारण, क्षेपणास्त्र हे फक्त एक वाहन आहे. आपण ठरवायचे असते की, त्यातून काय वाहून न्यायचे.

क्षेपणास्त्र बनविल्यानंतर समाजात एक प्रकारचा उन्माद तयार होतो. आणि सार्वजनिक जीवनातून विवेकाला सामूहिक तिलांजली दिली जाते. खरेतर ती त्या अणुबॉम्बपेक्षाही जास्त संहारक असते. ती जितके त्या समाजाचे नुकसान करू शकते, तेवढे कदाचित शत्रूराष्ट्राचे अणुबॉम्बसुद्धा करू शकत नाहीत. आणि  हे जाणण्याइतके डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम संवेदनशील आणि समाजशील होते. परंतु आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला आपल्यावर स्वार होऊ न देता, आपल्यातील सद्सद्विवेक जागा ठेवणे हे खरोखरच एक अलौकिक मूल्य आहे. त्या मूल्याचे मोल जाणले तर आपण आपले मित्र होऊ, अन्यथा आपणच आपले शत्रू !

दुसऱ्या महायुध्दाच्या अंतिम टप्प्यात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकून प्रचंड नरसंहार केला. अगदी आज जन्माला येणाऱ्या पिढयासुद्धा अनेकदा त्या उध्वस्ततेच्या खुणा घेऊनच जन्माला येत असतात. लौकिक अर्थाने अमेरिकेचा दुसऱ्या महायुद्धात विजय झाला असला तरी, अमेरिकेने त्यानंतर मात्र उन्माद, विजयोत्सव साजरा करणे हेतुपुरस्पर टाळले. 

आजही अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जपानला गेल्यानंतर हिरोशिमा, नागासाकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन तेथे श्रध्दांजली वाहिल्याशिवाय येत नाही. हे करण्याचे कारण म्हणजे जर शत्रुत्वाची बीजे नव्या पिढीच्या मनात रोवली गेली तर त्यातून संपूर्ण जगाचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता होती. या विद्वेषातून भविष्यातील संहाराची पायाभरणी होऊ नये हाच त्यामागचा उद्देश होता. डोंगराएवढ्या चुका केल्यानंतरही जाणीवपूर्वक केलेल्या लहानशा गोष्टीही भविष्याला वेगळा आकार देवू शकतात. हेच यानिमित्त लक्षात घेणे संयुक्तिक ठरते. जपाननेसुद्धा धिक्कारण्यापेक्षा 'साकारणे' जास्त मोलाचे मानले. त्यातूनच राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षाच्या दंतकथेला जपान आपली प्रवासगाथा बनवू शकला.   

एलनर रुझवेल्ट या एके ठिकाणी म्हणतात की, तुमच्या संमतिशिवाय तुम्हाला कुणीच इजा करू शकत नाही. आणि खरेतर जोपर्यंत आपण एखादया टीकेला, अपमानाला , दुःखद स्मृतीला आपल्याला कमकुवत करण्याची, स्वतःला कमी लेखण्याची, स्वतःला उध्द्वस्त करण्याची संमती देत नाही तोपर्यंत त्या गोष्टीमध्ये स्वतःची अशी ताकद असत नाही. त्यामुळे आपणच अशा अनुभवांना किती किंमत द्यायची आणि स्वतःचे मूल्यमापन कसे करायचे, हे ठरवायचे असते. एके ठिकाणी खूप सुंदर म्हटले आहे, 'Under certain uncertainty, some people brake down, and some brake down the record'. आपण कुठल्या प्रकारात मोडतो, उन्मळून पडणाऱ्या की, इतिहासाला कलाटणी देणाऱ्या? आयुष्य आपल्याला कायम कशाची तरी निवड करायला सांगत असते. प्रश्न असा आहे की, आपण निवड कशाची करतो?                              

हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे चीनच्या वुहान प्रांतातून प्रवास करत जगातील जवळपास 196 पेक्षा अधिक देशांना कोरोना या विषाणूने विळखा घातला. या आजाराशी दोन हात करण्याइतकेच महत्वाचे आहे ते या आजाराने पडझड झालेल्या जगात पुन्हा एकदा पूर्वीइतक्याच ठामपणे उभे राहणे, स्वतःला सावरणे. या कोरोना साथीच्या जाण्यानंतर आपल्या मनातील भयगंड, साशंकता, दोषारोप यांच्या विषाणूपासून वाचण्यासाठी गरज असेल मनाच्या लसीकरणाची! तर मग आताच्या या लॉकडाऊन काळात आपण निवड कशाची करणार? आपल्याच आतमध्ये असणाऱ्या शत्रूशी लढण्याची, की आपल्या सोयीनुसार, गरजेनुसार समोरच्याला दोषारोपासाठी शत्रू ठरविण्याची? 

- प्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंके, पुणे
1982prataps@gmail.com 

(लेखक मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: मानसशास्त्र सकारात्मकता अमेरिका अणुबॉम्ब कोरोना विवेक ए. पी. जे. अब्दुल कलाम मानसिकता Pratap Salunke Psychology Positivity America Nuclear Bomb Corona Rationality APJ Abdul Kalam Mentality Load More Tags

Comments:

Shyam

कठीण काळात मनुष्याने आशावाद जिवंत ठेवला पाहिजे. एका चित्रपटात सांगितले आहे आपत्तीतून आविष्यकार उदय होतो

Add Comment