निराधारांचा मायबाप

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने

साहित्य, संशोधन, संपादन, प्रशासन आणि समाजकार्य इ. क्षेत्रांत समर्पणशील वृत्तीने कार्यरत असणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा भव्य नागरी सत्कार रविवारी (9 ऑक्टोबर रोजी) कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे सरांच्या कामाचा किंवा त्यांच्या कार्यपद्धतीचा, त्यांच्या व्यवहाराचा विचार केल्यास प्रकर्षाने आपल्यासमोर दोन-तीन गोष्टी येतात. सर हिंदीचे प्राध्यापक होते, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य होते, साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. तसा लवटे सरांशी माझा ऋणानुबंध 1995-96 पासूनचा. त्यांच्याबरोबरचा हा 26-27 वर्षांचा प्रवास बघितल्यानंतर असं जाणवतं की, सरांची ‘निराधारांचा मायबाप’ ही जी ओळख आहे, ती सगळ्यांत जास्त मोठी आणि मनाला भावणारी आहे. हिंदी-मराठी तसंच एकूण साहित्य क्षेत्रातील त्यांचं जे योगदान आहे, त्या सगळ्या योगदानापेक्षा त्यांना एका उंचीवर घेऊन जाणारी ती ओळख आहे.

मला असं वाटतं की, आज महाराष्ट्राच्या समाजकारणात किंवा महाराष्ट्राबाहेर अगदी उत्तरप्रदेशपर्यंत सुनीलकुमार लवटे या नावाला जी प्रतिष्ठा आहे, ती या क्षेत्रात त्यांचं जे काम आहे त्या कामाला आहे. त्याचं दुसरं एक अंग असं आहे की, ते ज्या परिस्थितीतून आले किंवा ते ज्या संस्थेतून आले, त्या संस्थेबरोबरची नाळ त्यांनी आजही तुटू दिलेली नाही.

बऱ्याचदा असं होतं की, आपण ज्या परिस्थितीतून येतो, त्या संघर्षाच्या परिस्थितीतून येऊन पुढे आपला प्रवास अधिक फलदायी किंवा अधिक सुखकर झाला की, बऱ्याचदा माणसाला आपल्या पूर्वायुष्याबद्दलच्या आठवणी कुणाला सांगायला किंवा आपलं पूर्वायुष्य अशा पद्धतीचं आहे असं सांगायला सहसा आवडत नाही. पण लवटे सरांचं तसं झालेलं नाही. त्यांची पंढरपूरच्या 'नवरंगे आश्रमा'तील जी ओळख आहे, तिथली सुनीलकुमार लवटे नावाची त्यांची जी छाप आहे, प्रतिमा आहे ती आजही कायम आहे. तो त्यांच्या सगळ्या जगण्याचा पाया आहे असं मला वाटतं. त्यांचं इतकं समृद्ध जीवन आज जे आहे, त्याचा सगळा पाया त्या पंढरपूरच्या संस्थेचा आहे. त्यावर सरांच्या आयुष्याची सगळी इमारत उभी राहिली आहे. त्या संस्थेतून संघर्ष करत त्यांची वाटचाल सुरू झाली, सगळं आयुष्य उभं राहिलं आणि त्यानंतर 1980-85 च्या दरम्यान ते बालकल्याण संकुलामध्ये काम करायला लागले. ते महावीर महाविद्यालयात प्राध्यापक असताना ते तिथं काम करायला लागले. त्यांनी बालकल्याण संकुलमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ काम केलं. रिमांड होमचं बालकल्याण संकुलामध्ये रूपांतर करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रात आजही बालकल्याणाच्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या संस्था कुठल्या, असा जेव्हा विचार होतो किंवा गुगलवर जाऊन जरी तुम्ही सर्च करायचा प्रयत्न केला, तर बालकल्याणच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोल्हापुरातील दोन-तीन संस्थांची नावे आपल्यासमोर येतात. त्यामध्ये बालकल्याण संकुल, हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड, चेतना अपंगमती संस्था चटकन पुढे येतात. मला आठवतं, 1995-96 ला मी वृत्तपत्रामध्ये लवटे सरांचं नेहमी बालकल्याणबद्दल काहीतरी चांगलं चाललेलं वाचत होतो, तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहिलं की, मला या संस्थेच्या कामाशी जोडून घ्यायला आवडेल. त्यांचे लगेच उत्तर आलं की, तुम्ही कधीही या, संस्थेचे दरवाजे 24 तास उघडे आहेत. मी त्यावेळी बेळगांव ‘तरुणभारत’मध्ये काम करत होतो. संस्थेची माहिती घेतली आणि ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत लेख लिहिला. त्यावेळी महावीर जोंधळे हे 'लोकमत' औरंगाबादचे संपादक होते. त्यांनी तो लेख लोकमतच्या सर्व आवृत्यांत वापरला. बालकल्याण संकुलचा पत्ता दिल्यामुळे त्या काळात संस्थेला खूप मदत झाली. त्यामुळे संस्थेच्या कामाशी जोडले गेलो ती नाळ आजही कायम आहे व ती आता श्वास असेपर्यंत कायम राहील.

लवटे सरांची इतक्या वर्षांत संस्थेच्या कामातली लगन फार जवळून पाहता आली. त्यावेळी बारा-साडेबारा वाजता ते महावीर महाविद्यालयातून यायचे. त्यांच्याकडे एक ब्रिफकेस असायची. त्यांची निळी स्कूटर संस्थेच्या दारात डाव्या बाजूला लागलेली असायची. सर तिथेच छोट्या केबिनमध्येच बसलेले असायचे. तिथे एकदा ते बसले की, तहानभूक हरवून काम करायचे. त्यांना वेळ किती झाला हे त्या वेळी कळत नसे, रात्रीचे सात वाजले तरी त्याचे त्यांना भान नसायचे. ते सगळं काम केल्यानंतर ते आपल्या घरी जायचे. म्हणजे प्राध्यापक म्हणून ते सकाळी सातला घरातून बाहेर पडायचे आणि अध्यापनाची-ज्ञानदानाची तिथली सेवा दिल्यानंतर ते संस्थेत यायचे आणि इतका वेळ द्यायचे की, ते त्या मुलांशी एकरूप व्हायचे. संस्था चालवणं म्हणजे तिथल्या मुलांना दोन वेळचं खायला, कपडे, चांगलं आरोग्य देणं एवढ्यापुरतंच नाही. ते खऱ्या अर्थानं त्या मुलांचे आई-वडील झाल्याचं मी अनुभवलं आहे. माझ्या डोळ्यासमोर आजही ते चित्र ठळकपणे उभं राहतं, सरांची स्कूटर लागली आणि ते तिथून पायरी उतरायला लागले की, पाच-दहा मुले येऊन त्यांच्या पायाला मिठ्ठीच मारायचे. सर कुणाला उचलून घ्यायचे, कुणाला काखेत घ्यायचे. ही जी त्यांची आईवडील होऊन प्रेम द्यायची पद्धत होती, तेच त्यांचं खरं जगणं होतं. 

कुणाचं आजारपण आहे, कुणाचं शिक्षण अपुरं आहे, कुणाचं लग्न आहे, कुणाचं बाळंतपण आहे, कुणाला करिअरसाठी काही मदत हवी आहे, कुणाला पत्र लिहिणं, फोन करणं... ही सगळी कामं आपल्या मुलासाठीसुद्धा एखादा आईबाप जेवढं करणार नाही, तेवढ्या तळमळीने ते करायचे. त्यांच्यानंतरही याच भावनेने संस्थेचं काम सुरु असल्याने आजही ही संस्था निराधारांची आधार बनली आहे. या कामात कुठंही लवटे सरांची 'मी करतोय' अशी भावना नसायची. असं इतकं वाहून घेऊन 100 टक्के संस्थेचे होऊन ते काम करायचे. अनेक वर्षे तिथे त्यांनी चांगलं काम केलं. 

बालकल्याणमधून त्यांना बाहेर पडायला लागणं हा खरं तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला एक दुःखद प्रसंग होता. त्यांचे बालकल्याणमधलं काम असू दे, शाहू स्मारक ट्रस्टमधलं असू दे किंवा करवीर नगर वाचन मंदिरमधलं असू दे; या तिन्ही संस्थांमध्ये त्यांनी एका टप्प्यावर असं ठरवलं की, आता मी तिथे राहणं योग्य नाही. त्या वेळी तिथून ते एका क्षणात क्विट झाले.असे क्विट झाले की, सरांनी पुन्हा त्या संस्थेच्या आवारातसुद्धा पाय ठेवलेला नाही. तिन्ही संस्थांच्या..! त्यांचा सत्कार समारंभ जो आज रविवारी 9 ऑक्टोबर 2022 ला होत आहे, तो शाहू स्मारकला झालेला नाही. कारण शाहू स्मारकमध्ये राजीनामा दिल्यानंतर कधीच ते गेलेले नाहीत. करवीर नगर वाचन मंदिरचंही तसंच आहे. या तिन्ही संस्थांमधून अशा पद्धतीने बाहेर पडण्यापाठीमागे मला दिसतात ती दोन-तीन कारणे अशी होती की, सरांचा त्या संस्थांमध्ये काम करण्याचा जो झपाटा होता, तो 180-200 स्पीडचा होता. त्यांच्या बरोबरीनं काम करणारे जे लोक होते, ते कमी स्पीडचे होते. सरांची व्हिजन एकदम स्वच्छ होती. ज्या संस्थेत ते काम करतात, त्या संस्थेत ओनरशिप घेऊन, म्हणजे त्या संस्थेसाठी 100 टक्के आपलं योगदान देऊन ते काम करतात. किंबहूना त्या संस्थामय ते होऊन जातात. शाहू स्मारकला नावारूपाला आणलं. ते ज्यावेळी शाहू स्मारक ट्रस्टचे काम करत होते, त्या वेळी शाहू स्मारक ट्रस्ट गाजत होता, इतके सांस्कृतिक कार्यक्रम ते घ्यायचे. करवीर नगर वाचन मंदिरातसुद्धा असंच. तिथे भौतिक सुधारणा आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून सतत ती संस्था चर्चेत राहिली. या तिन्ही संस्थांना उंचीवर नेण्याचं काम त्यांच्या काळात झालं. 

या संस्थांमध्ये काम करताना माणूस म्हणून त्यांच्या हातून कांही चुका घडल्याही असतील परंतु त्या चुकांमुळे संस्थेचं कांही नुकसान झालं, संस्थेला कुठे खाली मान घालायला लागली असं कधीच झालं नाही. 'सक्रिय दुर्जनापेक्षा निष्क्रिय सज्जन समाजाला फार घातक असतात' अशी एक म्हण आहे, तसा अनुभव लवटे सरांना मुख्यत: बालकल्याण संकुलात काम करताना आला. बालकल्याणमध्ये त्यांना असं वाटायचं की, ते काम करताना त्यांच्या कामावर एक-दोन लोक बोटं दाखवायचे किंवा त्यांना काही आवडत नव्हतं. पण बाकीचे लोक ‘सुनीलकुमार लवटे यांचं काम चांगलं आहे’ असं म्हणायचे. पण काही कसोटीच्या क्षणी मात्र त्या बालकल्याणमध्ये चांगलं काम करणारी जी माणसं होती - ज्यांचा लवटे सरांच्यावर प्रचंड विश्वास होता - ती आपलं मत व्यक्त करू शकली नाहीत. आणि जी माणसं माझी आहेत, माझ्या कामाला बळ देणारी, माझ्यावर विश्वास असणारी आहेत असं सरांना वाटायचं, ते अशा कसोटीच्या क्षणी फक्त बघत राहिले.. त्यावेळी त्यांना आलेला अनुभव वेदनादायी होता. एवढं काम उभं करायचं आणि एका क्षणात त्या कामातून बाहेर पडणं हे फार अवघड असतं, ते भल्याभल्यांना शक्‍य होत नाही; पण ते लवटे यांनी करून दाखवलं. एक काम थांबलं तेव्हा त्यांनी नवे काम हाती घेतलं आणि ते त्याहून उंचीचे करून दाखवलं. एखाद्या सामाजिक कामात गुंतणं आणि त्यातून इतक्या चटकन बाहेर पडून नवं सामाजिक काम करणं यासाठी एक दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, ती त्यांनी नेहमीच दाखवली आहे. कामातून काम उभं करणारा हा माणूस आहे. 

लवटे सरांनी शाहू स्मारकचा राजीनामा दिला. त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून राजाराम माने नुकतेच रुजू झाले होते. ते शाहू स्मारक ट्रस्टचे पदसिध्द अध्यक्ष. लवटे यांच्या पुढाकाराने एवढं चांगलं काम तिथे सुरु असताना त्यांनी तिथून राजीनामा देऊन बाहेर पडणं हे कोल्हापुरातील काही जाणकार मंडळींना योग्य वाटलं नाही. आम्ही जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन लवटे सरांचा राजीनामा मंजूर करू नका असं सांगायचं ठरलं. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली, लोकमतचे संपादक वसंत भोसले, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर आदी मान्यवर एकत्र जमलो आणि जिल्हाधिकारी राजाराम माने यांना भेटायला गेलो. तिथे त्यांना “हा माणूस राहिला पाहिजे, तुम्ही त्यांचा राजीनामा मंजूर करू नका” असं सांगून आलो. आम्ही पाच-साडेपाच वाजता त्यांना भेटायला गेलो होतो आणि सांगून बाहेर आलो. थोड्या वेळाने लवटे सरांनी जाऊन पुन्हा पत्र दिलं की, ‘असं कांहीतरी शाहू स्मारकबाबत चाललेलं आहे आणि मला संस्थेत काम करायचं नाही, माझा राजीनामा तुम्ही मंजूर करावा.’ जिल्हाधिकाऱ्यांचा पुन्हा फोन आला, “त्यांनी स्वतः येऊन पत्र दिलं आहे की, मला काम करायचं नाही आणि माझा राजीनामा मंजूर करा. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याशिवाय मला गत्यंतर नाही. त्या व्यक्तीला जर काम करायचं नसेल तर आपण काय करणार..!” असा विषय झाला आणि सरांनी राजीनामा दिला. मग पानसरे अण्णाही म्हणाले की, ठीक आहे, त्यांना जर काम करायचं नसेल तर आपण त्यांना एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन आग्रह करणं बरोबर नाही आणि तो माणूस तसं ऐकणारा नाही.' 

यावरून कदाचित कुणाला तरी वाटेल की, हा लवटे यांचा हा हेकटपणा होता. पानसरे अण्णांनी सांगूनसुद्धा सरांनी ऐकलं नाही; पण त्यांच्या दृष्टीने ती त्यांनी आखून घेतलेली एक जीवनपद्धती होती. जिथे माझ्या कामाबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतं, अविश्वास दाखवला जातो, तिथं आपण राहणं हे बरोबर नाही. पण दुसरंही एक त्यांचं वेगळेपण असं की,या तिन्ही संस्थांमधून सर जरी बाजूला झाले तरी त्या संस्थांच्या कामातून ते आजही बाजूला झालेले नाहीत. किंवा त्या संस्थेच्या कामाबद्दल त्यांच्या मनांत तसूभरही कटूता कधीच आलेली नाही. आजही बालसंकुलमध्ये काही चांगलं घडावं यासाठी त्यांच्या पातळीवर जे काही करता येणं शक्य असते त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. संस्थेतल्या मुलांना जर काही गरज लागली, त्यांच्यासाठी चोबीस तास त्यांचे दरवाजे आजही उघडे असतात. बालकल्याण संकुलातील कितीतरी मुलांच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, बाकीच्या अडी-अडचणी, कुटुंबात काही सांसारिक अडचणी आल्या तर अशा अनेक कारणांसाठी कितीही अडचणी आल्या तरी ते कधीच त्या माणसांपासून दुरावले नाहीत. त्यांच्यासाठी ते आजही धावून जातात. मागच्या वर्षी रत्नागिरीत अशा संस्थेतून बाहेर पडलेल्या सगळ्या माहेरवाशिणींना पुण्यातल्या अनाथ संस्थेच्या पुढाकाराने रत्नागिरीत एकत्र आणले. त्या संस्थेचा हा मेळावा यशस्वी व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन मोठी आर्थिक मदत केली. संस्थेतून बाहेर पडलेल्या कित्येकांना नोकरी लागण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

प्राध्यापक म्हटलं की मी, माझी मुले, पत्नी, माझा संसार असं एक चौकटीतलं आयुष्य तयार होतं. पण या माणसाच आयुष्य हे एकदम खुले आहे. त्यांच्या घराचे दरवाजे हे कायम सर्वासाठी उघडे असतात. कोणीही अडचणीतला माणूस आला, त्यांनी रात्री दोन वाजता जरी त्यांचे दार ठोठावलं तरी ते उघडणार याची शंभर टक्के गॅरंटी असते. तिथे गेल्यानंतर आपल्या प्रश्‍नाचं, आपल्या अडचणीचं, आपल्या दुःखाचं काहीतरी परिमार्जन होईल आणि लवटे सर आपल्याला काहीतरी आधार देतील असा विश्‍वास असतो. माणूस म्हणून सरांचं हे एक मोठं देणं आहे. साहित्यक्षेत्रालली त्यांची उंची आहेच, पण या सगळ्यांपेक्षा मला नेहमी सरांचा हा जो एक दृष्टीकोन आहे, तो खूप भावणारा आहे.

सरांनी खूप लेखन केलं आहे. एकाच वेळी ते वेगवेगळ्या फील्डवर, पाच-सहा फोरमवर काम करत असतात. वि. स. खांडेकर अध्यासनाचं काम चालू आहे, त्यांच्या ग्रंथांचं काम सुरू असतं, एखाद्या संस्थेला मदत करण्याची धडपड सुरू असते, तोपर्यंत तिकडे परभणीला एखादं व्याख्यान आहे, ते एसटीतून जात असतात, कोल्हापुरात आणखी काही काम असतं. तो माणूस प्रवास करून आला आहे, थकलेला आहे, मी आता काही करणार नाही असं कधीच म्हणत नाही. त्यांचं वाचन प्रचंड आहे. जे छापून येईल ते सगळ कात्रणं काढून ठेवायची त्यांना सवय आहे. त्यांच्या घरी त्यांचं स्वतःचं समृद्ध असं ग्रंथालय आहे. संदर्भसंग्रह प्रचंड आहे, ते स्वत:च एक ज्ञानकोश आहेत. बालकल्याणाच्या क्षेत्रातल्या सगळ्या तरतुदी, देशभरात त्या क्षेत्रात काय काम झालं आहे, आपण कुठे आहोत,आणि काय व्हायला पाहिजे, याचा कृतिआराखडा तयार करायला जर सांगितला तर त्यांच्याइतकं कुणाकडेही व्हिजन असणार नाही, इतका चांगला समृद्ध त्यांचा अनुभव आहे.

आजचा त्यांचा कोल्हापुरातला जो सत्कार आहे, हे त्यांच समाजातल मोठेपण समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर जसं वेगवेगळ्या कारणांसाठी- तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी गूळ किंवा एक जिंदादिल शहर म्हणून प्रसिद्ध आहे, तसंच सुनीलकुमार लवटे यांच्यासारखा माणूस कोल्हापूरचा आहे किंवा कोल्हापुरात त्यांची जडणघडण झाली आहे, हेसुद्धा कोल्हापूरला अभिमान वाटावे असेच आहे.. त्यांचं आरोग्य अजूनही चांगलं आहे. या वयातही ते आजारी पडलेले, गोळ्या घेऊन झोपले आहेत असा अनुभव कधीही नाही. ते सतत कार्यमग्न असतात. आज काय करायचं, उद्या काय करायचं असं सगळ शेड्यूल ठरलेलं असतं. शब्द दिलेला आहे आणि त्यांनी पाळला नाही, असं माझ्या माहितीत वर्षांच्या इतिहासात कधी झालेलं नाही. एखाद्याला एखादी मदत करतो म्हटले तर ती कुठल्याही थराला जाऊन शंभर टक्के करणार म्हणजे करणार.

कितीही अडचण आली तरी दिलेल्या शब्दापासून मागे येणार नाहीत. अशी फार कमी माणसं आपल्या आजूबाजूला समाजात मिळतात. शब्दाला जागणारा, वेळ पाळणारा, दुसऱ्यांच्या  मदतीसाठी धावून जाणारा माणूस आणि समाजबदलासाठी सतत झगडणारा कार्यकर्ता अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची अनेक रुपे आहेत. प्राध्यापकाचे चांगले जे गुण आहेत, चिंतनशील पाहिजे, समाजशील पाहिजे, अभ्यासशील पाहिजे, ते सगळे गुण त्यांच्याकडे पुरेपूर आहेत; पण आता नव्या प्राध्यापकांचे जे दोष-त्रुटी असतील ते त्यांनी कधीच अंगाला चिकटू दिलेले नाहीत. महावीर कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी घेतली तर त्यांनी तिथे जे काम केलं, तेही महावीर कॉलेजला एका उंचीवर नेऊन ठेवणारं होतं. त्या वेळी गंमतीने म्हटलं जायचं, सरांचा दबदबा एवढा होता की, प्राचार्यांच्या जागेच्या ठिकाणी जर सरांची नुसती गाडी लागली असेल तरीसुद्धा तास आणि बाकीचं सगळ व्यवस्थित होणार. म्हणजे सर महिना-दोन महिने जरी तिकडे गेले नाहीत आणि सरांची नुसती गाडी जरी प्राचार्यांच्या गाडीच्या जागी बघितली तरी सर आत आहेत हा एक आदरयुक्त दबदबा होता, तो मोठा होता. 

ज्या संस्थेत त्यांनी काम केलं त्या त्या संस्थेतला खालचा जो माणूस आहे, त्याला सरांनी पोटाशी धरलं. बालकल्याणचे कर्मचारी असोत किंवा महावीर कॉलेजचे शिपाई, त्यांच्या व्यक्तिगत अडीअडचणींत मदत करण्यापासून त्यांचे प्रश्न सोडवण्यापर्यंत सरांनी नेहमी मदत केली. संघटनकौशल्य, वेगवेगळ्या क्षेत्रांत माणसं उभी करणं, त्यांना विश्वास देणं आणि चांगली कामं करून घेणं याची हातोटी त्यांच्याइतकी दुसऱ्या कुणाकडे नाही. त्यामुळे महावीर कॉलेजमध्येही ते छाप पाडू शकले.

बालकल्याणमध्ये त्यांच्या कामाचा ठसा आजही आहे आणि तो कायमस्वरूपी राहील. महाराष्ट्रात कुठेही बालकल्याण संकुल म्हटलं, की अजूनही त्याबरोबर सुनीलकुमार लवटे यांचंच नाव येतं, हा त्यांच्या कामाची उंची मोजणारा एक मापदंड आहे असं म्हटलं तर ते मला चुकीचं वाटत नाही.

सरांचं कौटुंबिक आयुष्यही समृध्द आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीत पत्नी रेखा यांचा आधार आणि सहनशीलताही मोठी आहे. अग्निज्वाळांसोबत संसार करणे हे तसे सोपे नाही. त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तमरित्या स्थिरावली आहेत. दोन्ही मुलांची हसत खेळत त्यांनी जातीपातीच्या भिंती मोडून लग्ने करून दिली आहेत. जे बोलतो त्याच वाटेवरून चालत जाण्याचा वसाही त्यामागे आहे.

- विश्वास पाटील, कोल्हापूर 
vishwas07@gmail.com 
(लेखक 'लोकमत', कोल्हापूर आवृत्तीचे उपवृत्तसंपादक आहेत.)

Tags: कोल्हापूर सुनीलकुमार लवटे सत्कार समिती नागरी सत्कार साहित्य साहित्यिक हिंदी साहित्य Load More Tags

Comments:

AK Farakate

खूप छान लेख. सरांच्या कार्याला व्यक्तिमत्वाला न्याय देणारा. नागरी सत्काराद्वारे कोल्हापूरकर संयमी कर्मवीर अक्षर साधकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे. खूप बरे वाटले. कर्यक्रमास शुभेच्छा. --अनिल फराकटे कणकवली

Add Comment