फेसबुकचे भविष्य: आव्हानात्मक तरी उज्ज्वल

Photo Courtesy: laverdad.es

04 फेब्रुवारी 2004 रोजी हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी फेसबुक खुलं झालं. आज या घटनेला सोळा वर्षे झालीत. सोळावं वर्ष म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी किंवा देशासाठी अगदीच किशोरवय. फेसबुक मात्र याला अपवाद ठरलं. अवघ्या सोळा वर्षांत फेसबुकने खरोखरच जग बदललं, असं म्हणायला हरकत नाही. 

पूर्वी तुम्हाला कुठेही लिहायचं असेल तर तुम्हाला माध्यम उपलब्ध नव्हतं. आजही त्या-त्या ठिकाणच्या वर्तमानपत्रांना लेख पाठवा. ऑनलाईनच लिहायचं असेल तर मर्यादित क्षमता (reach) असणाऱ्या ब्लॉगवरच लिहा किंवा डिजिटल पोर्टलवर लिहा. आणि तुमचं मत प्रकाशित करायचं किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार कोण्या तिऱ्हाईत व्यक्तीकडे असायचा.  मग तो संपादक असेल, संपादकीय टीम असेल किंवा राजकीय नेता असेल. फेसबुकने मात्र प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं. फेसबुकने नक्की काय केलं, याचा विचार आज सोळा वर्षांनी केला तर असं लक्षात येतं की, फक्त भारतातच नव्हे तर जगामध्ये फेसबुकने पहिल्यांदा अभिव्यक्तीचं लोकशाहीकरण केलं.

एकदा तुम्ही व्यक्त व्हायला लागलात, तुम्हाला अभिव्यक्ती मिळाली की आपोआपच तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि गोष्टी बदलत जातात. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हे अनुभवायला मिळालं आहे. गेल्या काही वर्षांत जगभर झालेल्या क्रांत्यांचा आणि जग बदलवणाऱ्या महत्त्वाच्या घटनांचा केंद्रबिंदू फेसबुकच राहिला आहे. प्रत्येकाला अभिव्यक्त होऊ देणं, ही फेसबुकने जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. 

भारताचंच उदाहरण घ्यायचं झाल्यास, अभिव्यक्त होत जाण्यामुळे येथील नागरिकांचा आत्मविश्वास वाढत गेला. याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे 2008मध्ये आलेला 'वेक अप सिड' नावाचा सिनेमा. स्वतःची पॅशन (आवड) फॉलो करू पाहणारा - उच्चभ्रू घरातील तरुण मुलगा या सिनेमाचा नायक होता. पुढे 2013मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमातील नायक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. गेल्याच वर्षी रणवीर सिंगचा 'गली बॉय' हा सिनेमा आला. त्यातला नायक हा धारावीच्या झोपडपट्टीतला होता. 

आपल्या महत्त्वाकांक्षा, आपली स्वप्नं आणि पॅशन फॉलो करण्याची ताकद तेरा वर्षांत कुठल्या कुठे पोहोचली याचा चढता आलेख या तीन चित्रपटांमधून प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याला दिसतो.  इंटरनेट, 4G यांच्यासोबतच याचं श्रेय फेसबुकलाही जातं. 

अर्थातच या कालावधीत फेसबुकमुळे अनेक बऱ्यावाईट गोष्टीही घडल्या आहेत. 'ब्रेक्झीट' (ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे यासाठीचा कौल) व्हावा की होऊ नये, निवडणुकांमध्ये फेसबुकचा होणारा वापर योग्य की अयोग्य, 'केंब्रीज अ‍ॅनालिटीका'चे प्रकरण; फेसबुकशी संबंधित असे अनेक वाद सतत सुरूच आहेत. मात्र कोणतेही माध्यम उदयास आल्यानंतर त्यात स्थिरता येण्यासाठी, त्या माध्यमाबद्दलची बरीवाईट मतं बनवण्यासाठी आणि समाजमन घडवण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. म्हणूनच फेसबुकचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी सोळा वर्षांचा कालावधी पुरेसा नाही.  

रेडिओ आणि टी.वी.चा शोध लागल्यानंतर त्यांच्या दहा कोटी संचांच्या विक्रीसाठीच कदाचित सोळा वर्षे लागली असतील, पण फेसबुक सुरु झाल्यानंतर पहिल्या आठ वर्षांतच शंभर कोटी 'लॉग इन्स' (वापरकर्ते) तयार झाले. इतक्या अफाट वेगाने हे सोशल मिडिया जगभर पसरले आणि त्यामुळे या बऱ्यावाईट प्रश्नांच्या तीव्रतेची व्याप्ती प्रचंड वाढली. 

फेसबुकचा हा सर्व व्याप सांभाळायचा कसा, त्याचा होणारा बरावाईट प्रभाव रोखायचा कसा या प्रश्नांची तीव्रता दिवसागणिक वाढू लागल्यामुळे त्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक बाजूंविषयी जगभर चर्चा होऊ लागली असून नव्याने नियमावलीही तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. अमेरिका, युरोपियन युनियन आदींनी याविषयी कायदे केले, भारतातही डेटा संरक्षण कायदा येणार आहे.

पण हे सोपस्कार पार पडेपर्यंत फेसबुक एव्हाना म्हातारं होऊ लागलं आहे. लोकांना त्याचं नाविन्य राहिलेलं नाही. आता ते फेसबुकवर जास्त वेळ घालवत नाहीत. तरुणाईदेखील इंस्टाग्रामकडे वळली आहे. व्हॉटस्अ‍ॅप, टिकटॉक ही माध्यमं प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. मात्र फेसबुकच्या निर्मात्यांकडे दूरदृष्टी असल्यामुळे, आपल्या सुगीच्या काळातच त्यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉटस्अ‍ॅप विकत घेतलं आणि त्यामुळे फेसबुकचं जगावरचं नियंत्रण अजूनही शाबित राहिलं आहे.   

'डेटा इज न्यू ऑईल' (आधुनिक काळात डेटा किंवा माहिती तेलाइतकीच मौल्यवान असणार) असं म्हटलं जातं. त्यामुळे या ऑईलचं उत्खनन करणारी व्यक्ती किंवा संघटना सर्वाधिक पैसा कमावते. ऑईल रिफायनरीज (तेल कंपन्या) पूर्वी जगावर नियंत्रण ठेवत असत. फेसबुक ही आजची 'डेटा' रिफायनरी कंपनी आहे. त्यामुळे जगावर तिचं नियंत्रण आहे. 

सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या फेसबुकसमोरची आव्हानंही  प्रचंड आहेत. रसातळाला गेलेली विश्वासार्हता, अल्गोरिदम्समुळे (रचनेमुळे) वापरकर्त्यांच्या मानसिकतेवर होणारे बरेवाईट परिणाम, जगभर सुरु असणारे खटले; अशा असंख्य संकटांनी फेसबुकला घेरलेलं आहे. मात्र जगातील दीडशे ते दोनशे कोटी व्यक्ती दिवसातले दोन ते तीन तास फेसबुकचं कोणतं ना कोणतं प्रॉडक्ट वापरतच असतात. त्यामुळे फेसबुकचं भविष्य अतिशय आव्हानात्मक असलं, तरी ते उज्ज्वल निश्चितच असणार आहे. 

भविष्याचा विचार करता, पुढची निदान पाच वर्षं तरी फेसबुक जगावर राज्य करत राहील याबद्दल काहीही शंका नाही. आणि जरी त्यांचं हे साम्राज्य लयाला गेलं, तरी 'दोन दशकं जगाला दिशा देणारा एक स्टार्टअप' अशी फेसबुकची नोंद इतिहास नक्कीच घेईल. 

- विनायक पाचलग 
vinayak@vedbiz.com

(लेखक सोशल मीडिया एक्स्पर्ट व राजकीय सल्लागार आहेत.)

Tags: विनायक पाचलग तंत्रज्ञान Vinayak Pachlag Facebook Technology Load More Tags

Add Comment