कुंभमेळ्याच्या कामांमुळे झालेला विचका मान्य करण्याऐवजी ह्या अपयशाचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडण्यासाठी गिरीश महाजन सावज शोधतच होते. महानगर गॅस लिमिटेडच्या रूपाने त्यांना हे सावज आयतंच सापडलं. महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकी दरम्यान प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे रोल झालेले पाहून महाजनांनी दूरध्वनीवरूनच महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना तावातावात फैलावर घेतलं. आता महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी महाजनांसमोर काय तोंड उघडणार? महाजनांसमोर तोंड उघडल्यास आपली काही धडगत नाही हे ओळखून, केवळ महाजनांची खप्पा मर्जी होऊ नये यासाठी, महानगर गॅस लिमिटेडनं आपल्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केलं. शेवटी सत्तेसमोर शहाणपण चालत नाही.
दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अवघं नाशिक शहर कात टाकत असतं. ह्या सोहळ्यासाठी समस्त नाशिककरांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. तेवढ्या काळासाठी रंगरूप पालटून गेलेलं हे शहर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेलं असतं.
पण पुढच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या कुंभमेळ्याचं चित्र मात्र अगदी उद्विग्न करणारं आहे. कुंभमेळ्याला जेमतेम वर्षभराचा कालावधी उरलेला असताना रस्त्यांची आणि इतर कामं अद्याप रखडलेलीच आहेत. ही कामं काही केल्या गती घेण्यास तयारच नाहीत. कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आयुक्त नेमण्यात आले. संत महंत कंठशोष करून थकले. विरोधकांनी मोर्चे काढले. पण सुस्तावलेले प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची ‘तारीख पे तारीख’ सुरूच आहे. कुंभमेळ्याचं शिवधनुष्य पेलायला निघालेलं प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री भर सभेत रावणाप्रमाणे तोंडावर आपटल्यामुळे सर्वत्र त्यांचं हसू होत आहे. सत्ताधाऱ्यांची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. अनेक नाशिककरांना रस्ते अपघातात हकनाक प्राणास मुकावं लागलं आहे. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे की सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप परतेल याची शाश्वती राहिलेली नाही.
प्रशासनाला आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना मात्र त्याचं काही सोयरसुतक उरल्याचं दिसत नाही. नाशिक दत्तक घेण्याची भाषा करणारे आणि मी पुन्हा येईल अशी त्रिवार भिमगर्जना करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाहीत. समस्त नाशिककर मात्र ह्या सगळ्या गोष्टींना अक्षरशः वैतागले आहेत. रोजचं जिणं मुश्किल झालेले नाशिककर ह्या मरणयातनांतून कधी एकदाची सुटका होते याकडे डोळे लावून बसले आहेत.
चकचकीत रस्ते आणि त्यावरून धावणाऱ्या चकचकीत गाड्या म्हणजेच विकास, असा सोयीस्कर समज करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांनी सगळं काही झकपक करण्याच्या नादात संपूर्ण शहरातले रस्ते उखडून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी तर उद्घाटनाआधीच रस्त्यांना तडे गेले आहेत.
प्रभू श्रीरामचंद्र यांनी आपल्या बालपणी मला आकाशातला चंद्रच हवा असा हट्ट धरला होता. हा बालहट्ट पुरवण्यासाठी बालरामाला जलपात्रात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब दाखवण्यात आलं होतं. ह्या प्रतिबिंबाला हात लावून बालराम हरखून गेला होता. आता प्रतिबिंब नव्हे तर अवघा चंद्र आपल्या खाचखळग्यांसह जमिनीवर उतरला आहे की काय असं वाटू लागलं आहे. आणि जर तो नभातला चंद्र जमिनीवर उतरलेला नसेल तर कदाचित नाशिककरच चंद्रावर पोहोचले असावेत असं वाटतं.
हा सगळा नियोजनशून्य कारभार संकटमोचक गिरीश महाजन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. कुंभमेळ्याला अजून वर्षभराचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे सगळं काही निर्विघ्नपणे पार पडेल अशी ग्वाही दस्तुरखुद्द गिरीश महाजन जाहीरपणे देत आहेत. संकटमोचकच निवांत असल्याने प्रशासनदेखील निवांत आहे. मच्छिंद्र भागाजी चव्हाण यांनी लिहिलेल्या आणि गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी स्वरबद्ध केलेल्या एका गझलेतील "निवांत एकटाच मी,निवांत ही तुझी नशा" ह्या काव्यपंक्तीप्रमाणे सगळेच सत्ताधारी नशेत असल्याचं जाणवतं. सगळा कारभार रामभरोसे सुरू आहे. ह्या परिस्थितीमुळे नाशिककर हतबल झाले आहेत. त्यांना कोणीही वाली उरलेला नाही. ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ अशी त्यांची अवस्था झाली आहे.
गेल्या कुंभमेळ्यात नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना कुंभमेळ्याची कामं कशी निर्विघ्नपणे पूर्ण झाली हे नाशिककरांना कळालंदेखील नाही, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. शहरातली आजची परिस्थिती बघितली तर राज ठाकरेंच्या दाव्यात खरोखरच तथ्य असल्याचं जाणवतं. अगदी गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंत सत्ता काबीज करूनदेखील सत्ताधारी पक्षाकडून कामे का उरकत नाहीत? ह्या प्रश्नाचं उत्तर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी द्यायला हवं. राणा भीमदेवी थाटात नाशिक शहर दत्तक घेतल्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक कुठे अंतर्धान पावले, याचंही उत्तर नाशिककरांना मिळायला हवं.
नाशिकच्या विकासासाठी मिळालेला 35 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करताना नाशिककरांना अजिबात विश्वासात घेण्यात आलेलं नाही. अगदी रेवड्या उडवाव्यात त्याप्रमाणे निधीची उधळपट्टी करून मनमानीपणाने कामं रेटून नेली जात आहेत. तसा विचार केला तर 35 हजार कोटींत एखादं छोटं शहर उभारता आलं असतं. पण इथे तर त्याचाच बट्ट्याबोळ करणं बिनबोभाट सुरू आहे. अशा परिस्थितीत नाशिककरांनी आपलं गाऱ्हाणं मांडावं तरी कोणाकडे? प्रशासनाने उपलब्ध करून दिलेलं पोर्टल आणि मदतवाहिनी किती कुचकामी आहे याचा प्रत्यय शहरवासीयांना यापूर्वीच आला आहे. अद्ययावत करण्यात आलेल्या पोर्टलचं लोकार्पण केवळ उद्घाटनाअभावी रखडलं आहे. आयुक्तांकडे गाऱ्हाणं मांडायला जावं तर ते भेटतच नाहीत. त्यांच्या सुभेदारांना भेटायला जावं तर ते कोणालाही जुमानत नाहीत. एका बाजूला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांवर पकड उरलेली दिसत नाही, तर दुसरीकडे प्रशासनातले अधिकारी आयुक्तांना आवरेनासे झाले आहेत. ह्या दोघांच्या साठमारीत नाशिककरांची अवस्था अगदी अडकित्त्यातल्या सुपारीसारखी झाली आहे.
वास्तविक पाहता कुंभमेळ्याची कामं मार्गी लागून त्यातल्या संभाव्य उणिवा दूर करण्यासाठी प्रशासन एव्हाना सज्ज व्हायला हवं होतं. पण हे तर दूरच राहिलं; अनेक मोक्याच्या ठिकाणी अजूनही कामांचा नारळही फुटलेला नाही. नियोजनाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाच्या असलेल्या द्वारका ते दत्त मंदिर यादरम्यानच्या रस्त्यावर आधी मेट्रो रेल्वेचा उड्डाणपूल बांधण्याच्या वल्गना करण्यात आल्या. ह्या वल्गना हवेत विरत ना विरतात तोच आता कुंभमेळ्याला पुरेसा कालावधी उरला नसल्याचे सांगून वाहनांसाठी उड्डाणपूल बांधण्याचे आश्वासन देत नाशिककरांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली. उड्डाणपुलावरची गाडी हळूच घसरून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर उतरली. शेवटी सिमेंट काँक्रिटचादेखील पर्याय शक्य नसल्याचे सांगत डांबरीकरणाचा निर्णय घेण्यात आला. एवढे सव्यापसव्य केल्यानंतर आता हे डांबरीकरणाचं काम कधी सुरू होईल, हे ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रच जाणोत. हा झाला मुद्दा शहरातल्या मुख्य रस्त्यांचा. शहरातल्या अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तर कोणीही वाच्यता करायलाही तयार नाही.
ह्या कुंभमेळ्याला तब्बल 10 कोटींहून अधिक भाविक नाशकात आणण्याचा चंग सत्ताधाऱ्यांनी बांधला आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची शहराची भौगोलिक क्षमता आहे की नाही याचा अभ्यास सत्ताधाऱ्यांनी अजिबात केलेला नाही. तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पहिल्याच श्रावणी सोमवारी गर्दीचं व्यवस्थापन कसं कोलमडून पडलं हे समस्त नाशिककरांनी अनुभवलं. प्रशासनाला जर श्रावणी सोमवारची गर्दीही आवरत नसेल, तर 10 कोटींचा प्रवाह उसळून आल्यास काय अनवस्था प्रसंग ओढवेल, या विचाराने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
कुंभमेळ्याच्या कामांमुळे झालेला विचका मान्य करण्याऐवजी ह्या अपयशाचं खापर कोणाच्या तरी डोक्यावर फोडण्यासाठी गिरीश महाजन सावज शोधतच होते. महानगर गॅस लिमिटेडच्या रूपाने त्यांना हे सावज आयतंच सापडलं. महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकी दरम्यान प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे रोल झालेले पाहून महाजनांनी दूरध्वनीवरूनच महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना तावातावात फैलावर घेतलं. आता महानगर गॅस लिमिटेडचे अधिकारी महाजनांसमोर काय तोंड उघडणार आहेत? महाजनांसमोर तोंड उघडल्यास आपली काही धडगत नाही हे ओळखून, केवळ महाजनांची खप्पा मर्जी होऊ नये यासाठी, महानगर गॅस लिमिटेडनं आपल्याच एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित केलं. शेवटी सत्तेसमोर शहाणपण चालत नाही.
महानगर गॅस लिमिटेडनं आपल्या वायुवाहिन्यांचं जाळं सर्वदूर पोहोचवण्यासाठी नाशकातले रस्ते खोदून ठेवले ही वस्तुस्थिती कोणीही नाकारणार नाही. मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडनं करोडो रुपयांची रक्कम कधीच अदा केली, ह्या वस्तुस्थितीकडे देखील कानाडोळा करता येणार नाही. नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त होऊनदेखील महानगरपालिकेनं खड्डे भरण्याच्या कामात चालढकल का केली, याचा जाब महाजनांनी आयुक्तांना विचारायला हवा होता. पण आयुक्तांनाच असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तर आपल्यावरच नामुष्की ओढवेल, हे वेळीच ओळखून महाजनांनी अतिशय चाणाक्षपणे महानगर गॅस लिमिटेडच्या नावावर बिल फाडलं आणि तळीखाली अडकलेला आपला हात अगदी अलगदपणे काढून घेतला.
ह्या सगळ्या प्रकरणात महानगर गॅस लिमिटेडला जरी बळीचा बकरा बनवण्यात आलं असलं तरी महानगरपालिकेच्या अंतर्गत वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी लक्ष्मीदर्शनासाठी अडून बसले आहेत. लक्ष्मीदर्शन होत नसल्यामुळे कंत्राटदारांची देयके मंजूर करण्यास पद्धतशीरपणे आडकाठी आणली जात आहे. त्यामुळे उर्वरित कामं मार्गी लावणं कंत्राटदारांना अवघड झालं आहे. लक्ष्मीदर्शनाची ही चर्चा महाजनांच्या कानापर्यंत पोहोचली नसेल, असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. ह्या लक्ष्मीदर्शनाला आळा घालण्यात जर महाजनांना अपयश येत असेल तर ह्या लक्ष्मीला पाय फुटून ती कोणत्या सत्ताधीशांचे उंबरठे झिजवत आहे हे न कळण्याइतके नाशिककर दुधखुळे नक्कीच नाहीत.
कुंभमेळ्याच्या कामांमुळे केवळ रस्त्यांचा प्रश्न निर्माण झाला असता तर तेही समजून घेता आलं असतं. पण रस्त्यांच्या जोडीला इतर मूलभूत प्रश्नदेखील आ वासून उभे आहेत. शटडाऊनच्या नावाखाली दोन-दोन दिवस संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवणं, सतत होणारी पाण्याची गळती, दूषित पाणी पुरवठा, भटक्या कुत्र्यांची समस्या यांसारख्या इतर समस्यादेखील काही केल्या नाशिककरांची पाठ सोडायला तयार नाहीत. एके काळी संपूर्ण शहराला दिवसातून दोन वेळा पाणी पुरवठा करण्यात यायचा. सर्वांना मुबलक पाणी मिळायचं. आता मात्र हे पाणी केवळ एकच वेळ मिळत आहे; आणि तेही कमी दाबाने. रस्त्याची कामं करताना जवळ जवळ असलेल्या मलवाहिन्या आणि जलवाहिन्या फोडून ठेवल्या आहेत. त्यामुळे दूषित झालेलं पाणी तीर्थाच्या रूपात महानगरपालिका घरोघरी पोहोचवत आहे. हे थोडे म्हणून की काय, वीज पुरवठा खंडित होऊन बत्ती कधी गुल होईल याचा नेम राहिलेला नाही. शहरातली प्रदीर्घ काळापासून रखडलेली वीज उपकेंद्रांची कामं रस्त्यांच्या कामांप्रमाणेच अजूनही मार्गी लागलेली नाहीत. रस्ते बांधताना विजेच्या केबल ठिकठिकाणी तोडून ठेवल्यामुळे परिस्थिती अजूनच गंभीर झाली आहे. त्यात स्मार्ट मीटर लावल्यामुळे येत असलेल्या वाढीव वीज देयकांची भर पडून नाशिककरांचा जीव अगदी मेटाकुटीस आलेला आहे.
हेही वाचा : Faith Meets Fintech?- Rucha Mulay (कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या हायटेक भुरटेगिरीविषयी इंग्रजी लेख)
शहराचे वैभव म्हणून ओळखले जाणारे ठिकठिकाणचे जॉगिंग ट्रॅक जलवाहिन्या बदलण्याच्या नावाखाली उद्ध्वस्त करून ठेवले आहेत. त्यामुळे साधा फेरफटका मारणेदेखील दुरापास्त होऊन बसले आहे. उद्ध्वस्त करून ठेवलेल्या ह्या जॉगिंग ट्रॅकना त्यांचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कोणत्याही स्वरुपाची हालचाल होत नसल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
कुंभमेळ्यासाठी प्राप्त झालेला 35 हजार कोटींचा निधी संपवण्यासाठी तितकेच किंवा अधिक मूल्यांकन असलेल्या पायाभूत सुविधांचा विध्वंस करण्यात येत आहे. कोणाचाही पायपोस कोणात उरलेला नाही. एकदा बांधण्यात आलेले सिमेंट काँक्रिटचे रस्ते फोडण्याचे देखील प्रताप सुरू आहेत. कधी सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी तर कधी महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार हे प्रताप सुरू आहेत. सातत्याने सुरू असलेली ही घसरण रोखण्यात कुंभमेळा मंत्री ह्या नात्याने गिरीश महाजन पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. कुंभमेळ्याची अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही नियोजन असल्याचं दिसत नाही. कुंभमेळ्याच्या कामांचे बनावट कार्यारंभ आदेश काढण्यामागे त्यांचेच आप्तस्वकीय असल्याचं समोर आलं आहे. बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील गरुड भरारी घेणारा एक प्रमुख आरोपी देखील त्यांचाच निकटवर्तीय असल्याचं निष्पन्न झालं आहे. ह्या सर्व प्रकरणांत महाजनांना दोषी धरता येणार नाही, पण यामुळे त्यांच्याभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे.
कुंभमेळ्याच्या कामांचा विस्कोट झाल्यामुळे गिरीश महाजन वैयक्तिक पातळीवर तर अपयशी ठरले आहेतच; पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांचेदेखील पितळ उघडे पडले आहे. पक्षाच्या ह्या नेत्यांनी कुंभमेळ्याच्या कामांचा वेळोवेळी आढावा घ्यायला हवा होता. कामे का उरकत नाहीत याबाबत कारणमीमांसा करायला हवी होती. साक्षात संकटमोचक संकटात का सापडले यावर आत्मपरीक्षण करून योग्य तो मार्ग काढायला हवा होता. महाजनांना ही जबाबदारी पेलवत नसल्याचे पाहून त्यांच्या जागेवर एखाद्या कार्यक्षम आणि नव्या दमाच्या मंत्र्याची नेमणूक करायला हवी होती. त्यामुळे प्रशासनाला आलेली मरगळ झटकता आली असती. पण महाजनांच्या अपयशावर पांघरूण घालून त्यांच्या गळ्यात थेट जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची माळ घालण्यात आली. ज्या महाजनांची हकालपट्टी करायची त्याच महाजनांना सुमार कामगिरी करूनही गौरवण्यात आलं. त्यामुळे एक प्रकारे नाशिककरांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आलं. हे सगळं अनाकलनीय आणि बुचकळ्यात टाकणारं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त असल्याने महाजनांबाबत "गिऱ्या तो भी टांग उपर" असं कोणी म्हणालं तर ते गैर ठरणार नाही.
मुख्यमंत्री फडणवीस आणि महाजन यांची मैत्री जगजाहीर आहे. अडचणीत सापडलेल्या आपल्या मित्राला फडणवीस वाऱ्यावर कसे सोडतील? त्यामुळे "लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती" असं म्हणत फडणवीसांनी महाजनांच्या सगळ्या चुका पोटात घेतल्या. मित्र पक्षांचा विरोध असूनही पालकमंत्रीपदाची धुरा महाजनांकडे सोपवली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आत्मविश्वास दुणावलेले महाजन अगदी वाजत गाजत आपल्या लवाजम्यासह मुंबई नाक्यावर अवतरले. कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीमुळे वाहतुकीस निर्माण झालेला अडथळा दृष्टीआड करून एका नव्या देहबोलीसह ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बाईट देऊन गेले. "कुंभमेळ्याची कामं अशी झपाट्याने चालू आहेत, तशी काळजीपूर्वक चालू आहेत! रस्ते येत्या 20, 30, 50 वर्षात कधीही उखडणार नाहीत. आपण नाशिकला वेगळी दिशा मिळवून देऊ" असे बेधडक सांगून, आले तसे निघून गेले. नाशिकला वेगळी दिशा देऊ असं सांगत महाजन अजून किती दिवस नाशिककरांची दिशाभूल करणार आहेत? नाशिकची परिस्थिती आटोक्यात राहिली नसल्याची जाणीव फडणवीसांना झालेली नाही का? नाशिक दत्तक घेणारे पिता म्हणून त्यांचं काही उत्तरदायित्व नाही का? एका अकार्यक्षम मंत्र्याला नाशिककरांच्या माथी मारून त्यांनी काय साध्य केलं? ह्या व अशा इतर अनेक प्रश्नांची उत्तरं महाजन आणि फडणवीस यांना द्यावीच लागतील, अन्यथा नाशिककर रस्त्यावर उतरून त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा.
- स्वप्निल गायकवाड
sggaikwad1975@gamial.com
(लेखक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात कार्यरत आहेत.)
Tags: nasik sinhastha सिंहस्थ नासिक कुंभमेळा कुंभ मेळा सिंहस्थ पर्वणी सिंहस्थ कुंभ मेळा त्र्यंबकेश्वर गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार प्रशासकीय हलगर्जीपणा नियोजन Load More Tags
Add Comment