‘माणूस आहे म्हणून’ची प्रस्तावना

मोहिब कादरी यांचे ‘माणूस आहे म्हणून’ हे पुस्तक 23 मार्च रोजी प्रकाशित झाले.

अहमदपूर येथे झालेला पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

'आठवणी जुन्या शब्द नवे' या शीर्षकाचे मोहिब कादरी यांचे पहिले पुस्तक 2016 मध्ये साधना प्रकाशनाकडून आले. त्यांचे 'माणूस आहे म्हणून' हे दुसरे पुस्तकही साधना प्रकाशनाकडून आले असून, परवा 23 मार्च 2022 रोजी त्याचे प्रकाशन अहमदपूर (जिल्हा लातूर) येथे झाले. मराठीतील प्रख्यात कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शानदार समारंभात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक फ. म. शहाजिंदे हे प्रमुख अतिथी होते. या पुस्तकाला श्रीपाल सबनीस यांनी लिहिलेली प्रस्तावना येथे प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

मोहिब कादरी यांचे ‘माणूस आहे म्हणून’ हे पुस्तक सेक्युलर माणसाची अंशतः आत्मकथा सांगते. धर्मांध व जात्यांध वर्तमानात ‘चांगला माणूस असणं’ महत्त्वाचं असल्याची भूमिका लेखक कादरी मांडू पाहतात. माणुसकीचा पराभव मोहिबभाईंना अमान्य आहे. शिवाय जो चांगला माणूस नसेल तो कुठल्याही धर्माचा असूच शकत नाही असा निर्वाळा त्यांनी दिलाय. माणसाचं माणूसपण विकसित होऊन सर्वांचं सर्वार्थाने कल्याण व्हावं या स्वप्नाच्या रंगात रमणाऱ्या मोहिबभाईंच्या या लेखनात अनेक व्यक्ती-प्रसंग आणि घटनांचे संदर्भ आलेत. अहमदपूरची कर्मभूमी, मूळ गाव दाबका आणि जन्मभूमी उमरग्याच्या अनुबंधांसह या लेखनात प्रतिबिंबित झालीय.

मोहिब कादरी साधना परिवारात निष्ठेने रमले. साने गुरुजींच्या वारशात संपादक विनोद शिरसाठ यांनीही मोहिबभाईंच्या भूमिकेला व लेखनाला प्रकाशमान केले. ग्रामीण मुस्लीमधर्मीय मोहिब कादरी हिंदू धर्माच्या अनेक सुसंस्कृत माणसांच्या माणुसकीने प्रभावित झाल्याचे चित्र सेक्युलर समाजाच्या चरित्राची नांदी सिद्ध करते. या प्रक्रियेत मारवाडी पण समाजवादी सत्यनारायण काळे यांचे व्यक्तिचित्र भेटते. वडील कम्युनिस्ट आणि मुलगा समाजवादी हा कौटुंबिक पातळीवरचा विसंवाद विचारस्वातंत्र्याचे मूल्यभान करून देतो.

काळे कुटुंबीयांने ‘जावई’ म्हणून लेखकाचा सत्कार करून जीव लावण्याचे वास्तव गौरवास्पद आहे. प्रा. सौ. ललिता गादगे यांच्या रूपाने मोहिबभाईंना मोठी बहीण मिळाली. त्यांच्या कुटुंबात लेखकाला आत्मीयतापूर्ण स्थान मिळाले. महेंद्र यांच्या कौटुंबिक वातावरणात मोहिबभाई मित्र म्हणून कायम झाले.

बँक अधिकारी जोशी आणि मोहिब कादरी यांच्यादरम्यान धर्माच्या भिंतीसह घराची भिंतही नाहीशी झाली. त्यामुळे दिवाळी, दसरा व रमजान ईद आनंदी वातावरणात साजरे केले जात. सर्वांच्या घरात मोहिबभाईंच्या दानिश या मुलाचा मुक्त वावर व विश्वासाची नोंद मानवी संबंधांची अस्सल साक्ष देते. जोशीसाहेबांच्या आईचा तो विशेष लाडका आहे हे लेखकाचं कथन माणुसकीचं दर्शन घडवतं. आनंदाच्या अनेक क्षणांचे सहभागीदार प्रगत शेतकरी विवेक येरमे यांचा, लेखकासाठी जागा विकत घेण्याबाबतचा पुढाकार अर्थपूर्ण आहे.

या पुस्तकातील गुत्तेदाराची लांबलेली सत्यकथा पसरट आहे; पण परागंदा झालेल्या वडिलांना मुलीने शोधून काढूनही घरच्यांच्या विरोधाने वृद्धाश्रमात केलेली पाठवणी वेदनादायक ठरते. स्वाभिमानी मोहम्मद चाचांचा मृत्यू काळजाला चटका लावतो. वृद्धाश्रमातील अनुसयाताईंच्या मांडीवर पाणी व दूध पीत मोहम्मद चाचांचा मृत्यू झाल्याचं लेखकाने केलेलं वर्णन प्रत्ययकारी आहे. इथे धर्माची भिंत कोसळून फक्त माणसातील निखळ निस्वार्थ प्रेमाचे दर्शन घडतं. अनुसयाताईंना मुस्लीम प्रेताला स्पर्श करण्याची संमती देणारे मौलवीसुद्धा परंपरेतील कडवे संकेत झुगारून माणुसकीचं औदार्य पेरतात आणि हिंदू ताई मुस्लीम चाचांच्या तोंडावरून हात फिरवते, अश्रू गाळते. हेच माणूसपण श्रेष्ठ आहे.

मोहिब कादरी यांच्या लेखनातील जीवनाचे काही संदर्भ वाचकाला अस्वस्थ करून जातात. आयुष्याच्या पूर्वार्धात शेतातील झोपडीत राहणारा हा अस्सल माणूस आपल्या वागण्या-बोलण्यातून व विचारांच्या समृद्धीतून स्वतःचं स्वतंत्र असं धर्मनिरपेक्ष जग निर्माण करतो. त्यांच्या आत्मकथेचे संदर्भ सामान्य माणसाचं माणूसपण सांगू पाहतात.

शिक्षण घेताना प्रयोगशाळेत रसायनाच्या संपर्काने एकमेव शर्ट जळल्याचा प्रसंग आणि त्यावेळी ओघळलेले दुःखाश्रू अस्वस्थ करणारे आहेत. सरांचा आपुलकीचा स्पर्श आईच्या स्पर्शासारखा वाटल्याची लेखकाची अनुभूती प्रांजळ आहे. एकमेव शर्टाची शोकात्म कथा मोहिबभाईंच्या गरिबीचे वास्तव सांगते.

हक्काच्या जागेत घर बांधण्याला मुस्लीम संदर्भाने काही हिंदूंनी केलेला कट्टर व धर्मांध विरोध आणि त्या पार्श्वभूमीवर इतर हिंदूंनी औदार्य दाखवून सिद्ध केलेली धर्मातीत माणुसकी लेखकाच्या जीवनातील संवाद-संघर्षाचं नाट्य सांगू पाहते. त्याचे जिवलग मित्र भारत चामे यांनी ‘माझ्या घराशेजारी घर बांधा’ म्हणून केलेला आग्रह आणि ‘आपण सारे मिळून राहू’ म्हणून केंद्रे काकूंनी घातलेली प्रेमळ साद लेखकाप्रमाणेच वाचकांच्या मनाला भिडते. डॉ. केंद्रे आणि सौ. केंद्रे या शेजाऱ्यांनी मोहिबभाईंच्या कुटुंबाला दिलेला माणुसकीचा अनुभव धर्मातीत सह-अस्तित्वाची वास्तवता सिद्ध करतो. घराच्या उभारणीत सत्तूभाऊ, ललिताताई व जोशीसाहेब यांनी केलेली मदत लेखकाने कृतज्ञतापूर्वक नोंदली आहे.

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी प्रकरणी उडालेल्या देशभराच्या गोंधळात उपास भोगणारा जिवलग मित्र संजय याने मोहिब कादरी यांच्यासाठी जेवण नाकारलं, कारण जेवण फक्त एकासाठी आलं होतं आणि मित्राला सोडून तो जेवू इच्छित नव्हता. दुसरीकडे संचारबंदी असताना लपत-छपत संजय व मोहिब यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येणारे रविकांत गोखले साहेब पुण्याचे वाटेकरी ठरले. या तिघांची गळाभेट व आनंदाचे सुखद क्षण भिजल्या डोळ्यांनी लेखक कादरी यांनी शब्दबद्ध केलेत.


हेही वाचा : माझी पहिली कमाई - शिवप्रकाश निजवंते


हिंदू-मुस्लीम दंगल संदर्भातील सामान्य पहारेकऱ्यांच्या संवादातून त्यांचं सुंदर विश्लेषण या लेखनात प्रगट झालं आहे. पहारेकरी म्हणतो, उपाशीपोटी कुठं दंगल आठवते का? ही पोट भरलेल्या लोकांची कामं आहेत साहेब. अर्थात माणसाचा धर्म विसरलेली माणसंच धर्माच्या नावे दंगली पेटवतात हा सारांश सांगणारा पहारेकरी अनुभवाच्या शहाणपणाचं सूत्र सांगतो. समाजाच्या विकासात केवळ विद्वानांची ज्ञाननिष्ठाच निर्णायक नसते तर सामान्य- अतिसामान्यांचं अनुभवसिद्ध शहाणपणसुद्धा त्याकरता योगदान देतं हे वास्तव वाचकांना नवं मूल्यभान देणारं आहे.

मयुरी मल्लिनाथ कुर्ले आणि मोहिब कादरी यांच्या मामा-भाचीच्या अनुबंधाची अर्थपूर्ण सत्यकथा प्रत्ययकारी आहे आयुष्यभर कष्ट करून मयुरीच्या शिक्षणाचं स्वप्न साकारणाऱ्या आईचा मृत्यू आणि एमटेकची पदवी संपादन करण्यातील लेखकाचं पायाभूत अधिष्ठान यामधील द्वंद्वात्मक नाट्य प्रचंड भावतं. कादरी हे मयुरीचे मामा कसे? या प्रश्नाच्या उत्तरात धर्मातीत माणूसपणाचं दर्शन घेतलेले प्राचार्य आणि वाचकसुद्धा समाधान पावतात. कादरी यांच्या गुंजोटी तहसीलमधील छोट्या गावातील दुष्काळ भोगणाऱ्या गरीब कुटुंबाची शोककथा हृदयाला पीळ पाडते. घरचं सामान विकून पोट भरण्याची आलेली वेळ सर्वच गरिबांच्या शोकात्म जीवनकथेचं भयाण वास्तव सांगते.

छोटी मोठी कष्टाची कामं करत मोहिब यांनी त्यांची दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत पास केल्याची नोंद प्रतिकूलतेतही आनंदाच्या क्षणांची पेरणी करणारी ठरते. रेल्वे व वायुदलाच्या अंतिम चाचण्यातील अपयश आणि भारतीय आयुर्विमा महामंडळातील 'विकास अधिकारी'पदी झालेली निवड या घटनांतील विरोधी लय एकूणच मानवी जीवनातील ऊन-सावलीचं द्वैत सांगते.

लेखक आपल्या जीवनातील अनुभव सांगताना त्यांच्यातील प्रांजळ माणूस व्यक्त झालाय. शालेय जीवनातील दारिद्र्‌याचे संदर्भ ऐकताना लेखकाच्या गुरुजींच्या डोळ्यात आलेलं पाणी त्यांच्या माणूसपणाची खूण आहे. पण त्यांच्या अश्रूंची किमया तिथेच संपत नाही. हे गुरुजी कादरींना त्यांचा डबा देऊन करुणेचं चांदणं शिंपडतात म्हणून तर शाळा संपते पण गुरुजी मात्र लेखकाच्या काळजात आजही सन्मानित आहेत. लेखक कादरी यांचा अहमदपूरचा जीवनानुबंध 'खुदा का नूर' म्हणून अधोरेखित झालाय. अर्थातच याला कारण त्यांच्या सभोवतालचा, माणुसकी जपणारा माणसांचा गोतावळा आहे.

बसच्या प्रवासात मिळालेले कुराण अंध विश्वनाथ हंबर्डे यांनी गावच्या मशिदीत सन्मानाने दिल्याची आठवण आणि लेखकाची झालेली गळाभेट, आनंदाच्या अश्रूत चिंब भिजल्याचे कथन लई भारीच! शिवाय हंबर्डे यांच्या शिक्षणाच्या ध्यासाची सत्यकथा त्यांना अडचणीत मदत करणाऱ्या पाशाभाई, मोहसीनभाई, निजामुद्दीन भाई यांच्या उदार इस्लामच्या मानवतावादी संस्कारांनी प्रेरणादायक ठरलीय. हिंदू-मुस्लीम सौहार्दपूर्ण आलेल्या संवादाचं हे 'मोहिब कादरी पर्व' समाजात ऐक्याचा आदर्श अधोरेखित करणारं आहे.

पोलिओग्रस्त मुलीच्या शिक्षण प्रवेशासाठी जीवापाड प्रयत्न करणाऱ्या लेखकाच्या भूमिकेतील माणुसकीचा कृतिशील गहिवर मला स्वतःला प्रचंड प्रभावित करतो. धर्मापलीकडील अस्सल मानवी संबंध मोहिब यांना वंदनीय आहेत. त्यांचे इस्लामी जन्मसंस्कार मौलवींचा कट्टरवादाला बाजूला ठेवून पैगंबर साहेबांच्या मूलभूत करुणेतून उदयाला आल्याचे जाणवते. रमजान महिन्यात कारुण्य केवळ 30 दिवसापुरते मर्यादित न राहता तहहयात मोहिब कादरींच्या काळजात ते रुजलं, म्हणून तर अनेक सेवाभावी कार्यात त्यांचा आलेला सहभाग स्वयंसिद्ध दिसतो. अर्थात या सेवेचं भांडवल करून मानसन्मानसह कोणत्याही स्वार्थाची बाधा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झालेली नाही. बहुसंख्याक हिंदू समाजातील अनेक व्यक्तींचं प्रेम व विश्वास मोहिबभाईंच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय. अर्थात त्यांची माणूसपणाची पात्रता त्यात आहे आणि प्रेम करणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या स्नेहीजणांचा आत्मीयभावही महत्त्वाचा आहे.

अपंग मुलीच्या मदतीसाठी सत्तूभाऊंनी दहा हजार रुपये दिल्यावरही त्यांच्या आईने आणखी पाच हजार रुपये देण्याची दाखवलेली उदारता कोणत्या शब्दात गौरवावी! अशी प्रांजळ माणसांची श्रीमंती भोगणारे मोहिब कादरी खरंच भाग्यवान आहेत. या लेखनातील निवेदनात डोळ्यातील अश्रुंचे संदर्भ वारंवार भेटतात. विशेष म्हणजे हिंदू मुस्लिमांच्या द्वैत भावनेला व भेदात्मक भूमिकेला छेद देणाऱ्या माणसांच्या काळजाचे संदर्भ त्या आनंदाच्या अश्रुंना लाभलेत. अश्रू दुःखाचे असोत व आनंदाचे असोत; त्यांची अभिव्यक्ती मानवाच्या अंतःकरणातून होते. ती माणूसपणाची अस्सल थोरवी सांगते. त्याच अश्रुंचं तत्त्वज्ञान स्वतःच्या अनुभवकथनातून मोहिब कादरी मांडू पाहतात. अश्रुंचा हा धागा साने गुरुजींच्या मातृहृदयी भूमिकेला कवटाळून, पैगंबरांच्या मानवतावादी समतापर्वाला भिडतो. या जागेपासून करुणावादी बुद्धही अत्यंत जवळ उरतो.

हमाली करणारे मेहबूबभाई आणि त्यांची दोन्ही पायांनी अपंग असणारी मुलगी हऩिफाची शोकात्म कथा कोणत्याही सहृदय वाचकाच्या मनाचा ठाव घेते. त्यांच्या मदतीसाठी पुढे आलेले मानवी हात माणूसपणाचं मूल्य सिद्ध करतात. किल्लारीच्या भूकंपात दगडमातीच्या ढिगाऱ्यात गमावलेले आईवडील चिरंजीव विजय कुमार पाटलांनी बाहेर काढले. पण त्यात रडत न बसता इतर संकटग्रस्तांना त्यांनी केलेली मदत लेखकाला विशेषत्वाने भावते. संकटात मदत करणाऱ्या सर्व माणसांना लेखक ‘फ़रिश्ते’ संबोधतात.

दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात कोणी दारू पीत नव्हतं ही लेखकाची नोंद अर्थपूर्ण आहे. पण जावई मात्र दारूच्या नशेत गाडीचा अपघात करून नऊ लोकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो, ही वास्तव कथा तपशिलासह लेखकाने कथन केली. प्रेतांच्या जवळ परत परत येणारा-जाणारा कुत्रा त्याच्या इमानदार प्रेमामुळे मात्र जवळचा वाटला. या संकटातून शहाणपण शिकलेल्या मालकाने दारूचा धंदा बंद केल्याचा निर्णय खूप बोलका आहे.

विकी व त्याच्या आई-बहिणीच्या जीवनाची सत्यात्म शोककथा मन पिळवटून टाकते. विकीचा कॅन्सरशी चाललेला लढा मृत्यूने संपतो आणि दुःखाचा डोंगर आईवर कोसळतो. लेखक लिहितो, ईश्वराने दिलेली सर्वोत्तम भेट परत घेतली. मृत्यूची घटना किती दुर्दैवी असते याचं गांभीर्य लेखकाने समर्थपणे आत्मीयतेतून शब्दात मांडलंय. या कथेतील विकीला जाणवलेलं अंतिम पराजयाचे सत्य व शहाणपणातून पुढील उपचाराचा खर्च करू नये म्हणून त्याने घेतलेला निर्णय समंजस माणूसपणाची साक्ष देतो. जिवंत राहणाऱ्या आई-बहिणीच्या भवितव्याची चिंता मृत्यूच्या छायेतही विकीने केलीय. त्याच्या जीवंतपणासाठी आईने केलेला आटापिटा व त्याग लक्षवेधक ठरलाय. साने गुरुजीप्रणित 'साधना'च्या वर्तमान ध्येयवादाला साजेशी भूमिका आत्मकथनाच्या संदर्भाने मोहिब यांनी या लेखनात मांडलीय. माणूसपणाची निष्ठा, मानवी संस्कृतीच्या एकात्म भवितव्याचा अभ्यास या पुस्तकाच्या पानापानावर अनुभवता येतो. सर्व धर्माचे विसंवाद व विद्वेष, गडद झालेल्या अस्मितांच्या संघर्षात उफाळून आलेल्या वर्तमानात मोहिब कादरी यांचं हे अंशतः आत्मकथन माणूस आणि माणुसकीचा गहिवर पेरतं. सहजीवन व सह-अस्तित्वाचं मूल्य सिद्ध करतं. धार्मिक एकात्मतेच्या शिवाय समाज व विश्वजीवनाचा विकास अशक्य असल्याचं सूत्र सांगतं. माणसाचं माणूसपणच सर्वश्रेष्ठ असल्याची अनुभूती देणाऱ्या या पुस्तकाची ही प्रस्तावना लिहिताना मला प्रचंड समाधान मिळतं आहे. मोहिब कादरी यांचं हार्दिक अभिनंदन!

- श्रीपाल सबनीस, पुणे
sabnisshripal@gmail.com


'माणूस आहे म्हणून' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: मराठी मुस्लीम ग्रामीण साहित्य अनुभव ललित आत्मचरित्र व्यक्तीपर लेखन मराठी साहित्य Load More Tags

Add Comment

संबंधित लेख