साने गुरुजी यांनी लिहिलेल्या गोड गोष्टी चे दहा भाग आहेत. त्यात गुरुजींनी लिहिलेल्या काही गोष्टी स्वतंत्र आहेत, काहींचे भावानुवाद आहेत, काही रूपांतरित आहेत, तर काही आधारित आहेत. काही भारतीय भाषांमधील व काही इंग्रजी भाषेतील साहित्यातून गुरुजींनी वेचलेले हे सुवर्णकण आहेत. या गोष्टींचे वाचन किंवा अभिवाचन मागील सत्तर वर्षांतील प्रत्येक पिढीवर कमी अधिक प्रभाव टाकून गेले आहे. मूल्ये, संस्कार आणि संस्कृती यांची पेरणी करणाऱ्या या गोष्टी आहेत. त्यातील चित्रमयता आणि प्रवाही व रसाळ भाषा, यामुळे योग्य प्रकारे सादरीकरण केले तर त्याला आजची मुले मुलीही प्रतिसाद देतातच. अशाच प्रयोगाचा अनुभव सांगणारा हा छोटासा लेख...
आज साने गुरुजींचा 70 वा स्मृतिदिन. यानिमित्ताने मला माझा एक अनोखा अनुभव लिहावासा वाटतो आहे. एखादी गोष्ट आपण चांगल्या हेतूने सुरु करतो. पण तेव्हा माहित नसतं की ही नवीन वाट तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे. या नवीन वाटेवरचा प्रवास तुम्हाला काय अनुभव देणार आहे, कुठले मनोहर देखावे दाखवणार आहे याचीही काही कल्पना नसते. या नव्या प्रवासात तुम्ही काय शिकणार आहात, काय मिळवणार आहात, किती अविस्मरणीय क्षण तुमच्या ओंजळीत जमा होणार आहेत, एक व्यक्ती म्हणून तुमचा किती उत्कर्ष होणार आहे यांचाही काहीच अंदाज नसतो. असाच एक पूर्वनियोजित नसलेला हा माझ्या आयुष्यातील प्रवास!
22 मार्चला पहिलं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. ही काहीतरी नवीन, वेगळी आणि आतापर्यंत कधीही न अनुभवलेली गोष्ट होती. मुलांच्या शाळा बंद. बाहेर कुठेही जाण्यावर बंदी होती. घरीच बसणं सक्तीचं, घरात राहाणंच हितकारक याची तीव्र जाणीव होतीच. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी कपाटातील सगळी पुस्तकं काढून बसले. या दिवसांमध्ये काय वाचाता येईल, हे बघायला गेले आणि हातात आला साने गुरुजींच्या गोड गोष्टींचा दहा भागांचा संच! ही पुस्तकं वाचली गेलीच नव्हती. नवीन कोरी, अगदी जशीच्या जशीच्या तशी होती, त्यांच्या नवीन कोऱ्या वासासकट!
ही पुस्तकं पाहत असताना माझ्या मनात विचार आला, "आपण ही पुस्तकं मुलांसाठी वाचली तर? काय हरकत आहे? मुलांकडून मराठी पुस्तकांचं वाचन होत नाही तर आपण ते वाचू... मुलं नक्कीच ऐकतील." वेळेचा तर प्रश्न नव्हता. मुलांना मुबलक वेळ मिळणार होताच. सांगलीमध्ये संवाद ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळ्या वयोगटातील मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचवायच्या असा निश्चय केला. दुसरा दिवस होता गुढीपाडव्याचा! कुठल्याही नवीन आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य दिवस! दुसऱ्याच दिवसापासून उपक्रम सुरु करायचा असं ठरलं. आत्ता या क्षणी असं वाटतं की ज्या क्षणी हा उपक्रम सुचला त्या क्षणाला, साने गुरुजींच्या साहित्याला आणि या साहित्याची गोडी लावणाऱ्या माझ्या आई-वडिलांना याचं श्रेय द्यावं.
25 मार्चला गुढीपाडव्याला या उपक्रमाची सुरुवात केली. संवादच्या ग्रुपवर गोष्टींचा ऑडिओ रेकॉर्डिंग करून, पाठवण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर माझ्या मित्र-मैत्रिणींचा ब्रॉडकास्ट ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून या कथा त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचू लागल्या. वाचन आणि लिखाणाची आवड असणाऱ्यांच्या आणखी काही व्हाट्सअप ग्रुपवरही या गोष्टी पाठवायला लागले. आज या उपक्रमाला 78 दिवस पूर्ण झाले.
साने गुरुजींच्या गोष्टींच्या दहा भागांपैकी, 'खरा मित्र' या पहिल्या भागातील 'आवडती नावडती', 'तीन मडकी', 'न्याय देणारा गुराखी', 'गोसावी', 'सोन्याची साखळी', आणि 'खरा मित्र' या कथांच्या रेकॉर्डिंगने उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 'घामाची फुले' या दुसऱ्या भागातील 'स्वर्गाची माळ' (या कथेच्या ऑडिओची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.), 'जाई', 'बासरीवाला', 'अश्रुंचे तळे', 'ज्याचा भाव त्याचा देव', 'थोर त्याग', 'मातृभक्ती', 'बाहुला गाय' आणि 'घामाची फुले' या कथांचे रेकॉर्डिंग केले. 'फुलाचा प्रयोग' या चौथ्या भागातील 'दोघांचा बळी', 'फुला', 'फुलाला फाशीची शिक्षा', 'राजा आला, फुलं वाचला; 'समुद्रकाठच्या तुरुंगांत', 'तुरुंगातील प्रयोग', 'फुलाला दोन बक्षिसे' आणि 'घरी' या आठ कथाही ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून झाल्या. 'सोराब आणि रुस्तुम' या सहाव्या भागातील 'वामन भटजींची गाय', 'पाखराची गोष्ट', 'उदारांचा राणा' व 'सोराब आणि रुस्तुम' या चार कथांचेही ऑडिओ रेकॉर्डिंग झाले. तर अशा एकूण 19 लघुकथा प्रत्येकी दोन ते तीन भागांमध्ये रेकॉर्ड केल्या. तर दीर्घ कथेचे मनूबाबा हे तिसरे पुस्तक 17 भागांत रेकॉर्ड केले. असे एकूण 80 भागांत ऑडिओचे रेकॉर्डिंग झाले. यातील प्रत्येक भाग साधारणतः आठ - नऊ मिनिटांचा आहे. आजवर या कथा व्हाट्सअपच्या माध्यमातून आठशेहून अधिक जणांपर्यंत पोहोचल्या आहेत .
या उपक्रमातून वैयक्तिकरित्या मला खूप अनमोल गोष्टी मिळाल्या. अखंडपणे, सातत्य ठेवून, रोज गोष्टीचं ऑडिओ रेकॉर्डिंग करून ते पाठवण्यात, मी आजपर्यंत यशस्वी ठरले. 'सातत्य' या गोष्टीत मी कायम कमी पडते. पण या उपक्रमाने माझा आत्मविश्वास वाढवला. मनाने ठरवले तर कुठलीही गोष्ट खंड न पाडता, अविरतपणे मी करू शकेन याची खात्री पटली आणि हे अशक्य नाही हेही जाणवलं. एखाद्या नव्याने सुरु केलेल्या गोष्टीतील रुची, पहिल्या दिवसाइतकीच आजही टिकवून ठेवणं सहजगत्या जमलं.
स्वतःबद्दल काही गोष्टी आपल्याला नीटशा माहित नसतात. ह्या गोष्टींचं वाचन करताना कळलं की मला हे वाचन करणे अगदी मनापासून आवडतंय. माझ्यासाठी ते काम नाहीये तर अगदी आवडीची गोष्ट आहे. मला काय आवडतं हे या उपक्रमाच्या निमित्ताने नव्याने कळले. माझ्या मुलांना मराठी वाचावंसं वाटू लागलं आणि कितीतरी मराठी शब्दांची नव्याने ओळख झाली. जे शब्द आपण रोज वापरत नाही. 'वीट आला' हा शब्द वाचनात आला तेव्हा मुलाने मला विचारले, "आई, म्हणजे वीट बांधकाम का?" असे आणि यासारखे बरेच प्रश्न इतरही मुलांना पडले. त्यांच्या घरच्यांकडून शंकानिरसन केले गेले.
या उपक्रमामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढायला मदत झाली. मराठीतले काही, फारसे न वापरले जाणारे शब्द मुलांपर्यंत पोहोचले. सगळ्या मुलांपर्यंत माणुसकीचे, नीतिमत्तेचे सुंदर संदेश, उत्तम साहित्य या गोष्टींच्या माध्यमातून पोहोचवता आले.
महाराष्ट्रात होऊन गेलेल्या, साने गुरुजींसारख्या एका महान व्यक्तिमत्वाची मुलांना नव्याने ओळख झाली. एक शिक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, स्वातंत्रसैनिक अशा व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या छटा असलेले संवेदनशील साने गुरुजी, काही प्रमाणात का होईना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता आले. त्यांच्याकडून या गोष्टी अंशतः का होईना पण त्यापुढील पिढीत झिरपतील अशी आशा या उपक्रमामुळे वाटू लागली आहे.
(वाचकांना या कथा ऑडिओ स्वरूपात हव्या असतील तर लेखिकेशी इ-मेलवर संपर्क साधता येईल.)
- शाल्मली वझे
shalmali.vaze@gmail.com
ऐका 'साने गुरुजींच्या गोड गोष्टी' या दहा पुस्तकांच्या संचातील 'घामाची फुले' या पुस्तकातील कथा - 'स्वर्गातील माळ'
Tags: Katha Goshti Audio Book Story साने गुरुजी कथा साने गुरुजींच्या गोष्टी ऑडिओ बुक Load More Tags
Add Comment