समाज घडवणाऱ्या, असामान्य कर्तृत्वाच्या सामान्य माणसांचा कोश

डॉ. संजय शिंदे यांच्या ‘माझं गाव, माझी माणसं’ या व्यक्तिचित्रणात्मक लेखांच्या पुस्तकाचा परिचय

सामाजिक वातावरण, त्या वातावरणाचा बदलत गेलेला आवाका आणि तो बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा प्रतिसाद यांतून एक सामाजिक संघटन तयार करणाऱ्या आणि बदलाच्या प्रक्रियेला गतिमानता देत सामाजिक बदल घडविणाऱ्या अशा व्यक्तींचा एक कोश तयार होणे गरजेचे असते. तो कोश घडविण्याचे काम डॉ.संजय शिंदे यांच्या हातून घडले आहे. आपल्या पुस्तकातून त्यांनी आपल्या मातीतील अशा कर्तृत्ववान व्यक्तींना समकालीनत्व प्राप्त करून दिले आहे.

‘माझं गाव, माझी माणसं’ हे डॉ. संजय शिंदे यांनी लिहिलेले तेरा व्यक्तिरेखांचे पुस्तक आहे. लेखकाने परिचय करून दिलेल्या त्यांच्या गावगाड्यातील शिलेदारांची ही व्यक्तिचित्रे म्हणजे त्यांच्या भावविश्वाशी समरस असलेल्या आणि समाजाचे भाग्य उजळून टाकणाऱ्या ज्या व्यक्तिरेखांना त्यांनी जवळून पाहिले आहे, अनुभवले आहे. ज्यांच्या कर्तृत्वाच्या सावलीत ते लहानाचे मोठे झाले आहेत अशा व्यक्तिरेखांचे मोठेपण रेखाटणारे हे पुस्तक आहे.

भौतिक परिस्थितीशी झगडत ज्या सामान्य माणसांनी यश संपादन केले आहे आणि समाजपरिवर्तनाला गती दिली आहे, त्यांच्या महान कार्यातील अंतर्विरोधातून जी विचारात्मक आणि भावनात्मक स्पंदने डॉ. शिंदे यांच्या संवेदनशील मनात निर्माण झाली आहेत, ती स्पंदने टिपून त्यांनी आपल्या मातीतल्या माणसांचे मोठेपण जगासमोर मांडले आहे. हे एका दृष्टीने चांगलेच झाले, कारण अशा व्यक्तींचे मोठेपण कुणी तरी जगासमोर मांडायलाच हवे होते.

सामाजिक वातावरण, त्या वातावरणाचा बदलत गेलेला आवाका आणि तो बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींचा प्रतिसाद यांतून एक सामाजिक संघटन तयार करणाऱ्या आणि बदलाच्या प्रक्रियेला गतिमानता देत सामाजिक बदल घडविणाऱ्या अशा व्यक्तींचा एक कोश तयार होणे गरजेचे असते. तो कोश घडविण्याचे काम डॉ. संजय शिंदे यांच्या हातून घडले आहे. आपल्या पुस्तकातून त्यांनी आपल्या मातीतील अशा कर्तृत्ववान व्यक्तींना समकालीनत्व प्राप्त करून दिले आहे.

खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात, प्राकृतिक प्रभावाने परिपूर्ण असलेल्या आंबोलीसारख्या प्रादेशिक खेडेगावातील, खाई-खंदकाच्या, उंच डोंगररांगांच्या, झाडांनी वेढलेल्या प्रदेशात माती, निसर्ग, प्राणी, पक्षी, फुले यांच्याविषयी अपार कुतूहलाने जिव्हाळा असलेल्या माणसांनी, राज्य घडवणारी आणि देशाच्या वैभवात भर टाकणारी कर्तबगारी केली आहे. ही कर्तबगारी रेखाटताना त्यांनी आपल्या खेडेगावातील सामान्य माणसांना असामान्य महापुरुषाच्या रांगेत उभे करण्याचे कसब आपल्या लेखणीतून दाखविले आहे.

समाज उभे करणारे हे सर्व चेहरे ग्रामीण भागातील आहेत. त्या सर्वांचा एकच समान स्वर आहे; तो म्हणजे स्वतःबरोबर आपल्या दुर्गम भागातील गावाचा आणि त्याचबरोबर समाजाचा चेहरा घडविणे. पण असे करताना नकळत त्यांच्या हातून आपल्या राज्याचा आणि देशाचाही चेहरा बदलत गेला आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकहितवादी बापूसाहेब शिंदे होय. अतिशय साध्या, शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्वाच्या बापूसाहेबांनी आंबोलीसारख्या खेडेगावात जन्म घेऊनही पुण्यात स्थापन केलेल्या कात्रज डेअरीला महाराष्ट्रात नावारूपाला आणले आणि त्या डेअरीचे व्हाईस चेअरमनपद भूषविले आहे. बापूसाहेब शिंदे म्हणजे कात्रज डेअरीचा चालता बोलता इतिहास आहे. बापूसाहेबांनी आंबोली गावापासून जवळच असलेल्या कोहिंडे गावात आश्रमशाळा उभारून पुढच्या पिढीच्या माध्यमिक शिक्षणाची सोय केली. हे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले, याचा आढावा डॉ. शिंदे यांनी आपल्या पुस्तकात उलगडून दाखविला आहे.


हेही वाचा : शब्दांची नवलाई : विद्यार्थ्यांना मराठीचा लळा लावणारा कवितासंग्रह - उमेश घेवरीकर


कर्तबगार लोकांना समजून घेण्यात वेळ घालवू नये असे म्हणतात. पण त्यासाठीही योग्य वेळ यावी लागते. अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या कार्याच्या स्वरूपावर सहज आणि एकल अधिष्ठानाच्या रूपात भाष्य करणारी व्यक्तीही जन्माला यावी लागते. इतकेच नव्हे तर या व्यक्तीचा सहवास लेखकाला लाभला पाहिजे. डॉ. शिंदे यांना या सर्वच व्यक्तिरेखांचा भरपूर किंवा अल्पसा सहवास लाभला आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष पाहिलेल्या या व्यक्ती पुन्हा एकदा जनसामान्यांसमोर शब्दरूपाने उभ्या राहिल्या आहेत. त्या सर्वांची स्वभाववैशिष्ट्ये आणि कार्यकर्तृत्व एकमेकांत गुंफून त्यांचे समर्पक व्यक्तिमत्त्व डॉ. शिंदे यांनी उभे केले आहे. असे करताना त्यांनी कुठेही काल्पनिक घटनांचा आधार घेतलेला नाही. त्या सर्व व्यक्ती जशा आहेत तशा त्यांनी त्या उभ्या केल्या आहेत.

कार्ल मार्क्सने म्हटले आहे की, कोणत्याही युगातील कर्तबगार नेत्याची विचारधारा ही त्या युगाची विचारधारा आहे, त्या समाजाची विचारधारा आहे. म्हणूनच ते विचार कळत नकळत समाजातील व्यक्तींच्या विचारधारेत उतरत असतात. समाज विकासाचे प्रचंड वेड असलेल्या व्यक्तींचे विचार समाजात उतरविताना, विचारांनी प्रेरित असणारी पुढची पिढी आंबोली गावच्या या असामान्य माणसांनी तयार केली आहे. म्हणूनच अशी असामान्य माणसांची पुढची पिढीही आंबोली गावात तयार होत गेली आहे. डॉ. संजय शिंदे यांच्यासारखी सुशिक्षित आणि शिकलेल्या पिढीतील व्यक्ती राजगुरुनगरसारख्या नावाजलेल्या शहरामधील नावाजलेल्या महाविद्यालयात उपप्राचार्यपदावर काम करत आहे. असे कितीतरी तरुण विविध क्षेत्रांत मागील पिढीचे विचार आणि संस्कार घेऊन उच्चपदावर कार्यरत आहेत.

लढवय्ये असलेल्या समाजवादी साकोरे बाबांशी त्यांचा फार संबंध आलेला नाही, पण लहानपणापासून त्यांच्या अस्तित्वाचे गारुड मनावर घट्ट विणलेल्या साकोरे बाबांच्या अंत्यविधीला हजर असलेल्या डॉ. शिंदे यांना साकोरे बाबांबद्दल भरभरून बोलणारी माणसे भेटली. समाजासाठी कष्ट घेतलेल्या या व्यक्तीवर लिहिताना त्यांच्या आठवणी जाग्या होतात. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेले साकोरे बाबा ब्रिटीशांच्या बाजूने जागतिक लढ्यातही लढलेले होते याची नोंद ते आवर्जून घेतात. देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आपल्या गावात राहून समाजकार्य केले. त्यांनी गावात सातवीपर्यंत शाळा आणली, शाळेसाठी इमारत उभी केली. डॉ. शिंदे सांगतात की, याच शाळेत माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनशैलीला आकार मिळाला आहे. त्यांचे भरीव कार्य म्हणजे मुंबईमध्ये काम करणाऱ्या डबेवाल्यांसाठी त्यांनी ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’ धर्मादाय आयुक्तांकडून रजिस्टर करून घेतले. म्हणजेच जागतिक स्तरावर मुंबईच्या डबेवाल्यांची झालेली ओळख वाढविण्यात साकोरे बाबांचा अप्रत्यक्षरीत्या मोठा हात आहे. ब्रिटिशांनी जागतिक स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता दिलेल्या सैनिकांपैकी ते एक सैनिक होते.

शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा ही मानवी विकास मोजण्याची परिमाणे आहेत. यांचा संबंध भारतीय संस्कृतीशी आहे. या संस्कृतीशी एकनिष्ठ राहून बलोपासना करणाऱ्या झिपू पैलवानाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्रीयन कुस्तीशी नाते सांगणाऱ्या एका पैलवानाचे व्यक्तीचित्रण आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कुस्तीचा विकास केला, त्या विकासाची शृंखला ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचते, ती व्यक्ती म्हणजे झिपु पैलवान! आंबोलीसारख्या खेडेगावात अनेक पहिलवानांची पिढी त्यांनी निर्माण केली. सध्या सुरू असलेली महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान ही योजना त्यावेळेस आंबोलीसारख्या खेडेगावात त्यांनी राबविली होती. या त्यांच्या दूरदृष्टीला डॉ. शिंदे यांनी अभिवादन केले आहे

कोणताही माणूस कोणत्या ना कोणत्या कारणाने निसर्गाशी जोडला गेलेला आहे. त्याला निसर्गाची ओढ असते. ही ओढ निसर्गाचे ऋण फेडून प्रत्येकाने पूर्ण करायला हवी असे सांगताना डॉ. शिंदे यांनी गंगामामांनी उभारलेल्या फळबागेचे कौतुक करीत त्यांच्या निसर्गवेड्या प्रेमाचे चरित्र रेखाटले आहे.

शंकरशास्त्री ऊर्फ ‘बुवाआप्पा’ यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना ग्रामीण भागातील पारंपरिक वारकरी पंथातील एक तेजस्वी व्यक्ती आपल्या डोळ्यापुढे उभी केली आहे. खेडेगावांमध्ये पंचांग पाहणे, भविष्य सांगणे, पुराणकथांचे वाचन करणे यासाठी एक तरी धार्मिक व्यक्ती प्रत्येक गावात असते. संस्कारावर संस्कृती अवलंबून असते असे म्हणतात. शंकरआप्पानी गावातील लहान मुलांवर केलेले संस्कार खूप मोलाचे आहेत. त्याचबरोबर बारसे, मुंज, विवाह, ग्रहपिडा, ग्रहप्रवेश, भूमी, पूजा, सण-उत्सव अशा अनेक कार्यांच्या प्रसंगी बुवाअप्पांनी केलेली गावाची सेवा निस्वार्थीपणाचे एक उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘माझा गाव, माझी माणसं’ या पुस्तकामध्ये अनेक सामान्य व्यक्तींचे असामान्यत्व उलगडणारी व्यक्तिचित्रे रेखाटताना डॉ. संजय शिंदे यांनी गावातील आणि गावकुसाबाहेरील व्यक्तींविषयी आदर व्यक्त केला आहे. अशीच गावकुसाबाहेर व्यक्ती म्हणजे सनईवादक भागूतात्या होय. आठवणीच्या स्मृतीपटलावर ही कलोपासक व्यक्ती स्वार होऊन त्यांच्या लेखणीतून अवतरली आहे. सर्व प्रकारची मंगलकार्ये, ग्रामोत्सव, बैलपोळा, भंडारा, होळी अशा प्रसंगी त्यांची सनई पंचक्रोशीत वाजू लागायची, तेव्हा ऐकणारे सगळे मंत्रमुग्ध होऊन जायचे. ते उत्तम कलोपासक होते. त्यांच्या कलेने आपले बालपण समृद्ध झाले असे डॉ. शिंदे त्यांच्याविषयी भावना व्यक्त करताना म्हणतात.

‘आम आदमी’ अशी ओळख करून देताना कैलासराव शिंदे यांच्याविषयी त्यांची आपुलकी दिसून येते. कैलासराव शिंदे यांनी ग्रामीण भागात राहून लोककल्याणासाठी केलेले राजकारण डॉ. संजय शिंदे यांनी जवळून पाहिले आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे राजकीय नेते कैलासरावांनी आपल्या गावात आणले होते. कैलासराव शिंदे यांनी समाजासाठी छोटी-मोठी कामे केली, त्यामागे दुसऱ्याला जगवण्याची भूमिका होती असे डॉ. शिंदे म्हणतात.

पशुवैद्यकीय डॉक्टर असलेले लाहिरू महादेव रोकडे हे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. शिंदे यांचे मित्र. आपल्या मित्राविषयी भरभरून लिहिताना त्यांनी डॉक्टरांचा संपूर्ण जीवनपट लेखातून उभा केला आहे. ते म्हणतात की, पाण्यात साखर विरघळावी तसे डॉक्टर आमच्यात विरघळून गेले होते. पण त्यांचे अकाली जाणे सर्वांनाच भावुक करून गेले. डॉ. संजय शिंदे म्हणतात की, ते आमच्या आनंद संप्रदायाचे अधिपती होते. तेल संपल्यावर निरंजन विझावे इतक्या सहजपणे त्यांनी जगाचा अकाली निरोप घेतला.

आंबोली गावातून कैलासराव शिंदे यांच्याप्रमाणेच राजकारणात उतरून अनेक सामाजिक कामे केलेल्या सुरेशभाऊ शिंदे या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देताना डॉ. संजय शिंदे यांनी त्यांच्या सर्व राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला आहे. जलयुक्त शिवार, टॅंकरमुक्त गाव, शेती, पशुसंवर्धन या क्षेत्रांत योगदान अशा अनेक सामाजिक दायित्वाने सुरेश शिंदे यांचे कर्तृत्व उजळून निघाले आहे. त्यांचा हा लेख डॉ. संजय शिंदे यांनी अतिशय विस्ताराने लिहिलेला आहे. सुरेशभाऊंनी समाजाच्या भविष्याची वाटचाल सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्यांचे फार मोठे योगदान डॉ. शिंदे यांनी लेखातून उभे केले आहे.

सुदामदादा पाटील यांना लेखकाने ‘गावगाड्यातील समन्वयकार’ म्हटले आहे. आंबोली गावच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत एक-दोन नव्हे तर तब्बल चार दशके त्यांनी सक्रिय योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने आंबोली गावच्या समाजकारणात मोलाची भर टाकल्याची सविस्तर माहिती दिली आहे. कुस्तीचे प्रचंड वेड असलेल्या या व्यक्तिमत्वावर भरभरून लिहिताना त्यांच्या लेखणीला बहर आला आहे.

आंबोलीसारख्या खेडेगावात जन्मलेल्या अनेकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे आणि स्वतःसह आपल्या गावाचे नाव उंचावले आहे. स्वतःबरोबरच देशपातळीवर त्यांनी गावाचे नाव उंचविले आहे असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सुभाष शिंदे होय. त्यांनी देश-विदेशात मेकअप डिझाईनर म्हणजे रंगभूषाकार म्हणून आपले नाव उंचावले आहे. ऐश्वर्या रॉय, प्रियंका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींचे चेहऱ्यावरील सौंदर्य त्यांनी रुपेरी पडद्यावर खुलविले आहे. सरबजीतसिंग, रामलीला, मेरी कोम, 72 मैल प्रवास अशा एकाहून एक चित्रपटांत त्यांनी रंगभूषाकार म्हणून नाव कमविले आहे. काळडोकेवाडी या आंबोलीजवळील वस्तीत एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या सुभाष शिंदे यांनी मुंबईला जाऊन प्रसंगी पडेल ते काम करून, चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आणि संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर काम केले. या क्षेत्रात ते एकटेच मोठे झाले नाहीत, तर त्यांनी सर्वसामान्यांसाठीही कार्यशाळा उघडल्या. अतिशय सात्विक व्यक्तिमत्वाचे सुभाष शिंदे हे आंबोली गावचे भूषण आहेत.

‘माझा गाव, माझी माणसं’ हे पुस्तक वाचताना शिवाजीराव शिंदे या आणखी एका भारदस्त, प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख होते. आंबोलीसारख्या खेडेगावातून येऊन माथेरानसारख्या जगप्रसिद्ध शहरात नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द उभी करताना शिवाजीरावांनी स्वतःच्या व्यवसायाबरोबरच अनेक समाजोपयोगी कामे केली आणि स्वतःबरोबर आपल्या गावाचे नावही उंचीवर नेले आहे.

या पुस्तकामध्ये समाजस्वास्थ्य जपणारे धन्वंतरी डॉक्टर किशोर खुशालाणी ‘सेवा परमो धर्मः’ या न्यायाने आंबोली गावात वावरले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा लेख आपल्याला वाचायला मिळतो.

या पुस्तकातील शेवटचा लेख महाराष्ट्राची लोककला असलेल्या नाट्यवेड्या व्यक्तीवर आधारित आहे. आंबोलीकरांचे नाट्यप्रेम या लेखातून दिसून येते. आंबोली गावात वेळोवेळी वेगवेगळ्या सामाजिक नाटकांचे प्रयोग झाले. या नाटकांमध्ये काम केलेल्या अनेक कलावंतांविषयी डॉ. शिंदे यांनी ऋण व्यक्त केले आहे. हौशी कलाकारांनी एकत्र येऊन आपल्या आयुष्यातील कर्तृत्वाचे दिवस नाट्यसेवेत व्यतीत केले आहेत. त्यांच्याविषयीच्या भावना या लेखातून व्यक्त झालेल्या दिसतात.

एकूणच ‘माझा गाव, माझी माणसं’ हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य केलेल्या विविध व्यक्तींच्या सुंदर फुलांचा गुच्छ आहे. किंवा असे म्हणता येईल की, मधमाशा ज्याप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर उडत मधुकण गोळा करतात आणि नंतर त्यांच्यापासून सुंदर मधाचे पोळे तयार करतात. त्याप्रमाणे डॉ. शिंदे यांनी आपल्या गावातील या मधुकणांसारख्या गोड आणि मधुर व्यक्तिमत्त्वांचे सुंदर पोळे तयार केले आहे. मध हा आरोग्यदायी असतो असे म्हणतात. त्यादृष्टीने डॉ. शिंदे यांचे हे पुस्तक म्हणजे भावी पिढीच्या आरोग्यासाठी एक सुंदर दस्तऐवज आहे. मराठी भाषेतील वाचकांसाठी आणि समाजासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.

माझं गाव, माझी माणसं
लेखक - संजय शिंदे
प्रकाशक - अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे
पृष्ठे - 204; मूल्य - 300 रु.

प्रा. साईनाथ पाचारणे, राजगुरुनगर
sainathjpacharne@gmail.com 


'माझं गाव, माझी माणसं' या पुस्तकाचा आंबोली येथे झालेला पुस्तक प्रकाशन सोहळा या लिंकवर पाहता येईल.

Tags: चरित्रात्मक पुस्तक शिक्षण सामाजिक चळवळ प्राध्यापक महाविद्यालय Load More Tags

Comments:

Vitthal Pbadtare

प्रस्तावानेतच पुस्तकाची खूप छान ओळख करून दिली आहे. नक्कीच हे पुस्तक वाचण्याचा योग्य येईल.

Add Comment