लेखक किंवा कलावंत आपला जीवनानुभव कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट यांसारख्या साहित्य वा कलाकृतींतून अभिव्यक्त करण्याचा पयत्न करतो. म्हणजेच त्याचा जीवनानुभव प्रकट करण्याचे माध्यम ती साहित्यकृती वा कलाकृती असते. लेखकाच्या वा कलावंताच्या जीवनानुभूतीचे स्वरूप व त्याने त्याच्या अभिव्यक्तीसाठी निवडलेले माध्यम यांत परस्पर साहचर्य असते. परंतु एखाद्या कलाकृतीतील बहुस्तरीय अनुभव अभिव्यक्तीच्या अनेक शक्यता सुचवतो. यातूनच कधी स्वत:च्या तर कधी दुसऱ्यांच्या कलाकृतीस वेगळा रूपबंध देण्याचा प्रयत्न होतो. यालाच ‘माध्यमांतर’ असे म्हटले जाते.
प्रत्येक कलाप्रकाराची स्वत:ची वैशिष्ट्ये, माध्यम, संकेतरचना असतात. अर्थातच या साऱ्याचे स्वरूप लवचिक असते. यात व्यक्तीनुरूप, कालानुरूप, परिस्थितीनुरूप बदल घडत असतो. माध्यमांतर होताना अभिव्यक्तीच्या माध्यमात बदल घडतो; तसाच तो आशय, सौंदर्य, भाषा, स्वरूप यांतही घडतो. मूळ साहित्यकृती व माध्यमांतरित कलाकृती या संक्रमणात घडलेल्या वा घडवलेल्या बदलांचे स्वरूप अभ्यासणे रंजक ठरते.
कादंबरी या साहित्यप्रकाराचे साधन शब्द हे आहे तर चित्रपट या दृक्श्राव्य कलेचे माध्यम कॅमेरा हे आहे. कादंबरीतील शब्दांच्या प्रतिमा प्रत्यक्ष दिसतात आणि वाचकाच्या मनात संवेदना निर्माण करतात, त्याच्या अनुभवविश्वाला समृद्ध करतात. कादंबरीचे आकलन व तिचा आस्वाद या प्रक्रिया वाचकसापेक्ष असतात. चित्रपट हा दृश्यप्रधान असतो त्यामुळे एखाद्या कादंबरीला चित्रपटरूप देण्यासाठी कादंबरीतील आशय दृश्यात्मक करणे आवश्यक असते. वाचकाच्या मनातील प्रतिमांशी मिळत्याजुळत्या दृश्यांचा पट उभा करणे हे अवघड व आव्हानात्मक काम असते. त्यासाठी पटकथाकाराला योग्य शब्दयोजना करावी लागते, कथानकात गतिमानता आणावी लागते, संवादांत योग्य बदल करावे लागतात, घटनांचा क्रम बदलावा लागतो आणि पात्रांची संख्या व लांबी कादंबरीत आहे तितकीच ठेवता येत नाही. कादंबरीचा विस्तृत अवकाश आणि चित्रपटाच्या वेळेची मर्यादा यांचा मेळ साधण्याचे अत्यंत कळीचे आव्हानही त्याला पेलावे लागते. परंतु दृश्य, संवाद, संगीत आणि अभिनय या घटकांच्या जोडीने अतिशय प्रभावी चित्रपट निर्माण करणे अवघड असले तरी अशक्य नसते.
आर. के. नारायण यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीच्या मुखपृष्ठावर एका नृत्यांगनेचे चित्र आहे. यातून ही कथा राजू नावाच्या पर्यटन मार्गदर्शकाची (गाईड) असली तरी त्याच्या सरळसोट आयुष्याला कलाटणी देण्यास कारणीभूत ठरलेले रोझी हे स्त्रीपात्र अधिक महत्त्वाचे आहे हे वाचकाच्या लक्षात येते. नारायण यांच्या अनेक साहित्यकृतींप्रमाणेच या कादंबरीचे कथानकही मालगुडी नावाच्या दक्षिण भारतीय काल्पनिक शहरात घडते. कादंबरीची सुरुवात राजू तुरुंगवासातून मुक्त झाल्यावर होते. निर्धन, बेघर अवस्थेतील राजू मालगुडीनजीकच्या एका खेड्यात पोहोचतो. तृतीयपुरुषी निवेदनशैलीतून त्याची सद्यस्थिती आणि प्रथमपुरुषी निवेदनातून त्याच्या गतकालीन जीवनाचा पट वाचकांसमोर मांडला जातो. मालगुडीमधील राजूचे साधे सरळ बालपण, तिथे रेल्वे स्टेशन झाल्यावर वडिलांनी फलाटावर विकत घेतलेले दुकान, वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर राजूने दुकानाचा केलेला विस्तार आणि त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना स्थलदर्शन घडवून ‘गाईड’ ही स्वत:ची कमावलेली ओळख हा तपशील कादंबरीचा जवळजवळ एक चतुर्थांश भाग व्यापतो. मार्को नावाचा वयस्कर, विक्षिप्त स्वभावाचा पुराणवस्तूसंशोधक आणि त्याची तरुण सुंदर पत्नी रोझी यांच्या आगमनाने राजूच्या जीवनाला कलाटणी मिळते. मालगुडीच्या पुरातन गुंफांमधील शिल्पे, भित्तिचित्रे, शिलालेख यांच्या अभ्यासात रस असलेला मार्को आणि पुंगीच्या तालावर डोलणारा नाग बघण्यास उत्सुक असलेली, स्वत:च्या नृत्याच्या आवडीला कशीबशी वेसण घातलेली रोझी यांच्यातील विजोडता राजूला जाणवते. मार्को अभ्यासात मग्न असताना तो रोझीला नागनृत्य बघायला घेऊन जातो. नागासोबत डोलणाऱ्या रोझीची नृत्यनिपुणता आणि तिचे लावण्य यांनी भारावून तिच्या प्रेमात पडतो. मार्कोसारख्या विजोड पतीशी कशीबशी जुळवून घेणारी रोझीदेखील तरुण, वाक्चतुर राजूकडे आकर्षिली जाते. त्याला आपली जीवनकहाणी सांगते.
एका देवदासीच्या पोटी जन्मलेल्या रोझीला नृत्यकलेचा ध्यास असतो. तिच्या आईने आपल्या मुलीला समाजात सन्मानाचे जीवन जगता यावे म्हणून तिला शिक्षण दिलेले असते. रोझीने विवाह करावा अशी तिच्या आईची इच्छा असते. विवाहासाठी रोझीच्या समोर फक्त जातीपाती न मानणाऱ्या मार्कोचा पर्याय उपलब्ध असतो. लग्नानंतर नृत्य करायचे नाही या अटीवर मार्कोने रोझीशी लग्न केलेले असते.
राजू आणि रोझीमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित होतात. तिचे नृत्यांगना बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन तो तिला देतो. या संबंधांचा सुगावा मार्कोला लागताच तो रोझीचा त्याग करून मद्रासला निघून जातो. रोझी राजूच्या घरी आश्रयाला येते. अत्यंत कर्मठ विचारांच्या राजूच्या आईला याने धक्का बसतो. ती रोझीशी वाईट वागू शकत नाही, पण तिला घराबाहेर काढण्याचे हरप्रकारे प्रयत्न करते. राजू तिला जुमानत नाही तेव्हा स्वत:च्या भावाला मदतीला बोलावते. त्याचाही उपयोग होत नाही तेव्हा स्वत:च भावाच्या घरी निघून जाते. रोझीशी ठेवलेल्या संबंधांमुळे राजूची समाजात बदनामी होते. दुकानही गमवावे लागते. तरीही राजू रोझीला दिलेले वचन पूर्ण करतो. काही काळानंतर रोझीचे नृत्यकौशल्य आणि राजूचे वाक्चातुर्य यांचा संगम यशस्वी ठरतो. सुप्रसिद्ध नृत्यांगना झालेली रोझी आणि तिचा व्यवस्थापक राजू यांच्याकडे पैशांचा प्रचंड ओघ सुरू होतो आणि इथेच त्यांच्या नात्याला तडा जातो. तथाकथित उच्चभ्रू वर्तुळात वावरताना राजूला दारू, जुगार यांचा नाद लागतो. नृत्यकलेत रमणारी पण पैशांसाठी नृत्याच्या मांडलेल्या बाजाराला विटलेली रोझी त्याच्यापासून मनाने दुरावते. त्यातच मार्कोचा त्यांच्या जीवनात पुन्हा अप्रत्यक्षपणे प्रवेश होतो. मार्को त्याच्या मालगुडीच्या गुंफांवर लिहिलेल्या संशोधनपुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत राजूचे आभार व्यक्त करून पुस्तकाची एक प्रत राजूला पाठवतो. शिवाय रोझीचे स्त्रीधन तिला परत करण्याची इच्छाही व्यक्त करतो. राजू पुस्तकाची प्रत लपवून ठेवतो. मार्कोच्या वकिलाने रोझीसाठी पाठवलेल्या कागदपत्रावर तिच्या खोट्या सह्या करतो. हे सारे तो तिचा ऐवज लुटण्यासाठी नव्हे तर ती पुन्हा तिच्या नवऱ्याकडे जाईल या भीतीने करतो. अर्थातच या गुन्ह्यासाठी त्याला तुरुंगात जावे लागते. त्याच्या तुरुंगवासाच्या काळात रोझी स्वतंत्रपणे नृत्याचे कार्यक्रम करत राहते. आयष्यात आलेल्या दोन्ही पुरुषांचा त्याग करून मानाने आणि प्रतिष्ठेने जीवन जगते.
तुरुंगवास भोगून बाहेर पडलेला राजू मालगुडीजवळच्या एका खेड्यात पोहोचतो. याच बिंदूवर राजूच्या गतकालीन जीवनाची कथा संपवून लेखक राजूच्या सद्यस्थितीला भिडतो. खेड्यातल्या अडाणी लोकांना संभाषणचतुर राजू एखादा दैवी ज्ञानी पुरुष वाटतो. भोळे गावकरी त्याला स्वामी म्हणून स्वीकारतात. जगण्यासाठी काहीच आधार न उरलेला राजूही गावकऱ्यांचा गैरसमज दूर करत नाही. गावकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि श्रद्धेचा फायदा तो घेतो. परंतु हळूहळू तो स्वत:च या जाळ्यात अडकतो. गावात दुष्काळ पडल्यावर राजूने पाऊस पडण्यासाठी अन्नत्याग करावा ही गावकऱ्यांची अपेक्षा राजूला नाईलाजाने पूर्ण करावी लागते. पण ती करत असतानाच त्याच्या मनात स्वत:च्या अर्थहीन जीवनाला अर्थ प्राप्त झाल्याची भावना जागृत होते. राजूच्या उपोषणाची बातमी सर्वदूर पसरून लोकांचे लोंढे त्याच्या दर्शनासाठी गावात येतात. उपोषणाच्या अकराव्या दिवशी गलितगात्र अवस्थेतला राजू आन्हिके आटोपण्यासाठी नदीवर गेला असताना त्याला दूरवरच्या डोंगरात पाऊस पडल्याचा आभास होतो आणि तो नदीच्या पात्रात कोसळतो. कादंबरी अशा अनिश्चित बिंदूवर संपते....कोणत्याही नैतिक-अनैतिकतेच्या वा आध्यात्मिकतेच्या प्रश्नावर भाष्य न करता; शेवटी खरोखरच पाऊस पडला की नाही किंवा राजूचा मृत्यू झाला की नाही हे देखील वाचकांच्या कल्पनेवर सोडून.
‘द गाईड’ या इंग्रजी चित्रपटाची पटकथा नोबेल पारितोषिक विजेत्या प्रख्यात लेखिका पर्ल बक यांनी लिहिली आणि चित्रपटाचे दिग्दर्शन टॅड डॅनिएलोव्हस्की यांनी केले. इंग्रजीत हा चित्रपट काढणे यात विषयाचे आव्हान नव्हते. भारतीय संस्कृतीचा विचार करता ही कथा त्यातील विवाहबाह्य संबंध, नायक-नायिकेचे विवाहाशिवायचे सहजीवन यांमुळे काळाच्या पुढची असली तरी पाश्चात्य संस्कृतीसाठी ती फारशी खळबळजनक नव्हती. चित्रपट इंग्रजी असल्यामुळे त्यात (हिंदी चित्रपटाचा अविभाज्य भाग असलेली) गाणी असणेही अनिवार्य नव्हते. पटकथेत मालगुडी या गावाऐवजी उदयपूर या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळाची निवड केली गेली. कादंबरीप्रमाणे काळाचे चक्र मागे-पुढे न फिरवता काळाची सरळ मांडणी केली गेली. राजूच्या बालपणाचा भागही गाळला गेला. चित्रपटाच्या सुरुवातीला पर्यटकांना उदयपूरमधल्या ऐतिहासिक वास्तू दाखवणारा व अधूनमधून वडिलांच्या दुकानावर देखरेख करण्यासाठी आणि नवीन पर्यटक शोधण्यासाठी रेल्वे फलाटावर दाखल होणारा देखण्या व लोभस व्यक्तिमत्त्वाचा राजू गाईड दिसतो. या रेल्वे फलाटावरच राजूची भेट मार्को आणि रोझी या दांपत्याबरोबर होते. त्यांच्या नात्यातील विसंवादही त्याला जाणवतो. राजू तरुण, सुंदर, कलावंत मनाच्या, जीवनाचा समरसून उपभोग घेऊ इच्छिणाऱ्या रोझीच्या प्रेमात आकंठ बुडतो. अभ्यासू पण अरसिक पतीला विटलेली रोझीदेखील राजूच्या प्रेमाला प्रतिसाद देते. तिच्या नृत्यकलेचे त्याने कौतुक केल्यावर हुरळून जाते.
हेही वाचा : आर. के. नारायण यांची गाईड चित्रपटाविषयीची फ्रंटलाईन या इंग्रजी नियतकालिकात प्रसिद्ध झालेली मुलाखत
भारतीय संस्कृतीच्या मुशीत घडलेल्या प्रेक्षकांना विवाहित रोझीचे राजूशी मोकळेपणाने वागणे खटकू शकते. रोझी आणि राजूमधील शारीरिक संबंध सांकेतिक पद्धतीने न दाखवता चित्रपटात त्यांचे थेट दर्शन घडते. त्यांच्या संबंधांचा सुगावा लागताच मार्कोने रोझीचा त्याग करणे, रोझीने राजूच्या घरी आश्रय घेणे, त्याच्या आईचा या संबंधांना असणारा विरोध आणि तिचे घर सोडून जाणे हा भाग मूळ कादंबरीनुसार आहे. पण मार्को आणि रोझी यांच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग इंग्रजी चित्रपटात खूप वेगळ्या व कलात्मक पद्धतीने सादर केला आहे. एका पुरातन अंधाऱ्या गुंफेत घडणारा हा प्रसंग मार्को आणि रोझीच्या वैवाहिक जीवनावर पडलेल्या काळ्या सावलीचे सूचन करतो, मार्कोच्या मनातली नृत्याविषयीची आणि व्यभिचारी पत्नीविषयीची चीड प्रखरतेने व्यक्त करतो; तसेच स्वत:च्या कृत्याविषयी जराही अपराधगंड नसलेल्या, मार्कोशी तावातावाने भांडणाऱ्या रोझीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतो. रोझी त्या काळोख्या, भुलभुलैय्यासदृश गुंफेतून बाहेर पडण्याचा शर्थीने प्रयत्न करत असते; जणू ती तिच्या जीवनाच्या अंधाऱ्या चक्रव्यूहातून सुटकेचा मार्ग शोधत असते.
राजू आणि रोझीचे विवाहबाह्य सहजीवन काही काळच यशस्वी ठरते. त्यांच्या नात्यात निर्माण झालेल्या दुभंगास राजूला लागलेली चैनी जीवनाची चटक कारणीभूत असल्याचे चित्रपटातून अधिक प्रकर्षाने जाणवते. राजूला फसवणुकीच्या आरोपाखाली झालेला तुरुंगवास संपल्यावर तो मुंबई शहरात जाऊन उपजीविकेचे साधन शोधण्याचा प्रयत्न करतो पण कोणतेही कौशल्य अंगी नसल्यामुळे अयशस्वी ठरून खेड्यात परततो असा कादंबरीत नसलेला भाग इंग्रजी चित्रपटात आहे. या पार्श्वभूमीवर पुढे राजूला अंधश्रद्ध गावकऱ्यांनी बहाल केलेले ‘स्वामी’पद आपल्या समाजातील विरोधाभासावर प्रकाश टाकते. चित्रपटाच्या शेवटी उपोषणाला बसलेल्या, गलितगात्र अवस्थेतल्या राजूला रोझी भेटायला येते, त्याला उपोषण सोडण्याचा सल्ला देते असा प्रसंग आहे. मूळ कादंबरीतल्या निस्संग, स्वतंत्र बाण्याच्या रोझीच्या धारदार व्यक्तिमत्त्वाची छटा थोडी मवाळ करण्याचा प्रयत्न त्यात दिसतो. चित्रपटाचा शेवटही कादंबरीप्रमाणे अनिश्चित बिंदूवर होत नाही. राजूचा मृत्यू होतो व त्याच क्षणी पावसाचे थेंब पडू लागतात असा सरधोपट शेवट प्रेक्षकांचा अपेक्षाभंग करतो.
‘गाईड’ या हिंदी चित्रपटाचे पटकथा लेखन आणि दिग्दर्शन हे दोन्ही विजय आनंद यांनी केले. चित्रपट अधिक रंजक व्हावा आणि मुख्यत्वे तो भारतीय प्रेक्षकांच्या पचनी पडावा म्हणून त्यात अनेक बदल केले गेले. आक्रमक, स्वार्थी, परंपरागत भारतीय पत्नीच्या प्रतिमेला छेद देणारी नायिका, सामान्य व स्खलनशील नायक, पत्नीच्या इच्छाआकांक्षांच्या बाबतीत संपूर्णपणे बेफिकीर असलेला पती, चुका करणारी, गोंधळलेली पात्रे, कुटुंबसंस्थेविषयीची अनास्था, नायक-नायिकेचे विवाहबाह्य संबंध, अनेक प्रकारे अर्थ लावता येतील असा शेवट ही कादंबरीची वैशिष्ट्ये होती पण नायक-नायिकेच्या पडद्यावरील आचरणाबाबतीत कर्मठ असलेल्या भारतीय प्रेक्षकांसाठी हीच त्यांनी चित्रपटाकडे पाठ फिरवण्याची कारणे ठरू शकली असती. भारतीय कवी शैलेन्द्र यांच्या अर्थपूर्ण गीतांनी, सचिन देव बर्मन यांच्या सुमधुर संगीताने, देव आनंदच्या आत्मविश्वासपूर्ण, शैलीदार अभिनयाने, वहिदा रेहमानच्या लावण्याने आणि डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या तिच्या नृत्यांनी ही भीती काही अंशी दूर झाली होती. पण तरीही कादंबरीतल्या विषयावर अनेक वेष्टने चढवली गेली. रोझी व्यभिचारी वाटू नये याची काळजी घेतली गेली. त्यासाठी मार्कोच्या व्यक्तिरेखेत अनेक बदल केले गेले. त्याचे किरकोळ व विदुषकी व्यक्तिमत्त्व, त्याच्यापासून रोझीला मूल होणे शक्य नसणे, त्याचे दारू पिणे, रोझीशी एकनिष्ठ नसणे, या साऱ्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न करणे अशा गोष्टी दाखवल्या गेल्या आणि रोझी नवऱ्याला सोडून राजूकडे राहायला गेली तरी बिचाऱ्या रोझीवर तिच्या नीच नवऱ्यानेच ही वेळ आणली हे प्रक्षकांना पटवून दिले गेले. तिच्याबद्दल सहानुभूती, समजूतदारपणा दाखवणाऱ्या, तिच्यातील कलेला पाठिंबा देणाऱ्या राजूशी तिचे निर्माण झालेले भावबंध समर्थनीय होते हे प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. राजूच्या आईशी रोझीने प्रेमादराने वागणे, राजूच्या उपोषणाची बातमी समजल्यानंतर तिने राजूच्या आईला घेऊन त्याला भेटायला येणे या साऱ्यातून रोझीच्या आत दडलेले आदर्श भारतीय स्त्रीत्व ठळकपणे सिद्ध झाले. तिच्या मनात जागृत असलेल्या राजूविषयीच्या प्रेमाला वासनेचा स्पर्श न होता ते उदात्त ठरले. मूळ कादंबरीतील राजूच्या स्वार्थी व संधीसाधू भासणाऱ्या व्यक्तिरेखेत भावनाप्रधानतेचे रंग मिसळले गेले. चित्रपटात राजूला अगदी आदर्शवादी म्हणून सादर केले नसल्रे तरी प्रेक्षकांची सहानुभूती त्याच्याकडे वळेल याची काळजी घेतली गेली. त्याच्या उपोषणाचे फलित म्हणून पाऊस पडलेला दाखवून भारतीय प्रेक्षकांची अपेक्षा आणि श्रद्धा भंग होणार नाही याचे आव्हानही यशस्वीरित्या पेलले गेले. शेवटी पश्चातापाने पोळून निघून आपल्या सगळ्या चुकांचे परिमार्जन करणारा, गावकऱ्यांच्या भल्यासाठी प्राणांतिक उपोषण करणारा मरणासन्न अवस्थेतला राजू त्यागमूर्ती वाटतो यातच दिग्दर्शकाचे यश आहे.
1960 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेली आर. के. नारायण यांची ‘द गाईड’ ही कादंबरी विषयाच्या दृष्टीने आधुनिक, नाविन्यपूर्ण व अभिजात असली तरी कादंबरीचे ठसठशीत दक्षिण भारतीय प्रादेशिकत्व पाहता त्यातील इंग्रजी भाषा अनेक ठिकाणी कृत्रिम वाटते. हीच त्रुटी इंग्रजी चित्रपटातही जाणवते. परंतु तरीही कादंबरीचा विस्तार, त्यातील निवेदने आणि दीर्घ वर्णने यांतून उभा केलेला पात्रांचा भूतकाळ, त्यांचे विचार आणि प्रेरणा, पात्रांच्या मानसिक द्वंद्वाचे आणि निर्णय प्रक्रियेचे बारकाईने केलेले विश्लेषण, स्वातंत्र्यानंतरच्या काळात हळूहळू बदलत गेलेले सामाजिक जीवनाचे वर्णन या साऱ्याच्या सविस्तर मांडणीमुळे कादंबरी वाचताना कथानकाचे व पात्रांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पदर उलगडत जातात; दोन्ही चित्रपटांत गतिमानतेच्या अडथळ्यामुळे त्याला मर्यादा आहे. कादंबरी व तीवर आधारित दोन्ही चित्रपट यांत रोझीच्या मनातील दडपल्या गेलेल्या लैंगिक वासनेचे प्रतिनिधित्व करणारी नागप्रतिमा हे एक लक्षणीय साम्य आहे. डोलणाऱ्या नागाकडे पाहताना रोमांचित होऊन नृत्य करणाऱ्या रोझीविषयी राजूच्या मनात उत्पन्न झालेले अनावर आकर्षण हा कादंबरीतील प्रसंग दोन्ही चित्रपटांत तसाच येतो. अशी काही साम्यस्थळे सोडल्यास दोन्ही चित्रपटांत कादंबरीचा तलम पोत आढळत नाही. कादंबरीच्या अखेरीस राजूच्या अध्यात्माभोवती आकारल्या गेलेल्या बाजाराविषयी प्रखर सामाजिक भाष्य मूळ लेखकाने केले आहे ज्यामुळे अखेर अधिक गडद परिणाम होतो. दोन्ही चित्रपटांत मात्र असे भाष्य येत नाही. त्यांत नायकाचे नायकपण अधोरेखित करण्यावर भर दिलेला दिसतो. प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, त्यांना आनंद देणे हाच चित्रपटांचा उद्देश होता हेही जाणवते.
एकंदर पाहता ‘द गाईड’ या कादंबरीचे लेखन वाचकांच्या आवडीनिवडीचा आणि खपाचा विचार न करता उत्स्फूर्तपणे केले गेले आणि त्यामुळे प्रभावी झालेले आहे. ‘गाईड’ हा व्यावसायिक चित्रपट मात्र प्रेक्षकशरणतेमुळे, व्यावसायिक व आर्थिक गणितांमुळे प्रेक्षकांना झेपेल एवढीच वेगळेपणाची वाट चोखाळतो आणि एक संगीतनृत्यमय प्रेमकथा म्हणून रसिकांच्या स्मरणात राहतो.
- सई भूषण प्रभू
prabhubg91@gmail.com
(लेखिका नाट्य साहित्याच्या अभ्यासक असून विजय तेंडुलकर आणि मोहन राकेश यांच्या नाटकांच्या तौलनिक अभ्यासावर त्यांनी पीएचडी केलेली आहे.)
द गाईड ही कादंबरी येथे विकत घेता येईल.
तसेच चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल :
Tags: गाईड राजू रोझी मार्को इंग्रजी हिंदी कादंबरी चित्रपट शब्दचित्र चित्रभाषा माध्यमांतर रूपांतर साहित्य आणि चित्रपट Load More Tags
Add Comment