अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर २०२६ आहे. अर्ज मिळविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी sharadjoshi.fellowship@sahyadrifarms.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या आणि अभ्यासाला लेखन व कृतीची जोड देऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. शरद जोशींच्या विचारांना आजच्या प्रश्नांसमोर ठेवून तपासण्याची आणि ते नव्या पिढीपर्यंत अर्थपूर्ण रीतीने पोहोचविण्याची ही संधी आहे.
शरद जोशी म्हटले की अनेकांच्या डोळ्यांसमोर शेतकरी आंदोलन, रस्त्यावर उतरलेले शेतकरी, सभा आणि मेळावे उभे राहतात. शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना सार्वजनिक चर्चेत स्थान मिळवून देणे हे त्यांचे मोठे योगदान होते. मात्र, त्यांची ओळख तेवढ्यापुरती मर्यादित ठेवली, तर त्यांच्या कामातील अनेक महत्त्वाचे पैलू नजरेआड होतात. ते शेतकरी नेते होते, तसेच शेतीच्या अर्थकारणाची मांडणी करणारे आणि ती प्रत्यक्ष कृतीतून तपासून पाहणारे अभ्यासकही होते. शेती, उद्योग, उद्योजकता, जागतिक धोरणे आणि ग्रामीण समाज यांचा परस्परसंबंध त्यांच्या विचारांमध्ये दिसतो. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करताना त्यांनी अर्थव्यवस्थेची व्यापक चौकट समोर ठेवली.
शेतकऱ्याचे स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय, हा त्यांच्या मांडणीतील महत्त्वाचा प्रश्न होता. काय पिकवायचे, कसे पिकवायचे, कोणाला विकायचे आणि आपल्या व्यवसायाची वाढ कशी करायची, या निर्णयांमध्ये शेतकऱ्याला किती वाव आहे, हे समजून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. बाजारपेठेचे स्वातंत्र्य, मुक्त अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यवसायासाठी सक्षम होणे या विषयांवर त्यांनी विचार मांडले. महिला शेतकऱ्यांचा सहभाग श्रमांपुरता मर्यादित न राहता निर्णयप्रक्रियेपर्यंत पोहोचावा, हा त्यांच्या विचारांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू होता. त्यामुळे त्यांच्या कार्याचा अभ्यास करताना आंदोलनाबरोबरच आर्थिक आणि सामाजिक विचारांकडेही पाहावे लागते.
काळ पुढे जातो तसा एखाद्या व्यक्तीच्या कामाचा संदर्भ बदलतो. काही घटना आणि निर्णय चर्चेत राहतात; मूळ विचार मागे पडू शकतो. शरद जोशी यांच्या बाबतीतही त्यांच्या व्यापक मांडणीपेक्षा आंदोलनाची प्रतिमा अधिक ठळक राहिली. त्यांच्या विचारांतील काही पैलू नव्या पिढीपर्यंत पुरेसे पोहोचले नाहीत. ते पुन्हा समजून घेणे म्हणजे जुन्या मांडणीची केवळ पुनरावृत्ती करणे नव्हे. त्यांनी कोणत्या परिस्थितीत कोणते प्रश्न उपस्थित केले, त्यामागील भूमिका काय होती आणि आज त्यातील काय उपयुक्त ठरू शकते, याचा तटस्थ अभ्यास होणे आवश्यक आहे.
आजच्या युवा शेतकऱ्यांसमोर संकटे आहेत आणि संधीही आहेत. हवामानातील अनिश्चितता, बाजारातील बदल आणि व्यवसायाच्या व्यवहार्यता यांचा विचार त्याला करावा लागतो. त्याच वेळी प्रक्रिया, मूल्यवर्धन, सामूहिक व्यवसाय आणि नव्या बाजारपेठांकडे जाण्याचे मार्ग शोधावे लागतात. अशा वेळी आर्थिक स्वातंत्र्य आणि उद्योजकतेचा विचार त्याला आपल्या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यास मदत करू शकतो. शरद जोशींच्या विचारांत महिला शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा होता. शेतीतील महिलांच्या श्रमाला मान्यता मिळण्याबरोबरच त्यांना उत्पन्नावरील अधिकार आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे, अशी त्यांची भूमिका होती. महिलांना शेतीच्या अर्थकारणात आणि निर्णयप्रक्रियेत समान स्थान मिळणे हा त्यांच्या शेतकरी स्वातंत्र्याच्या विचाराचा अविभाज्य भाग होता. शरद जोशींच्या विचारांतील कोणते मुद्दे आज स्वीकारता येतील, कोणत्या मांडणीचा बदललेल्या संदर्भात विचार करावा लागेल आणि त्यातून कोणती कृती घडू शकते, हे शोधण्याची जबाबदारी नव्या पिढीने घेण्याची गरज आहे.
शेतकरी प्रश्नांकडे आपण नेमके कसे पाहतो? उत्पादन, हवामान, भाव, कर्ज आणि मदत एवढ्यापुरताच हा विषय आहे का? की त्याच्या मुळाशी शेतकऱ्याचे आर्थिक स्वातंत्र्य, बाजारपेठेतील स्थान आणि स्वतःच्या व्यवसायाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे? शरद जोशी यांनी आपल्या विचारांतून आणि कृतीतून या प्रश्नांना व्यापक स्वरूप दिले. त्यांच्या विचारांचा आजच्या परिस्थितीत नव्याने अभ्यास व्हावा आणि त्यातून कृषी क्षेत्राला दिशा देणारी मांडणी पुढे यावी, या उद्देशाने ‘शरद जोशी फेलोशिप’ सुरू करण्यात आली आहे. सह्याद्री फार्म्स आणि शेतकरी संघटनेच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फौंडेशनमार्फत होत आहे. यासाठी अभ्यासू, स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या आणि संशोधनासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या फेलोशिपचा मुख्य उद्देश शरद जोशी यांच्या कृषी, आर्थिक स्वातंत्र्य, शेतकरी सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विचारांना समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. ग्रामीण युवक, शेतकरी, विद्यार्थी, संशोधक, शिक्षण संस्था, माध्यमे, कृषी उद्योग आणि धोरणांचा अभ्यास करणारे यांच्यात या विषयांवर संवाद निर्माण व्हावा, अशी अपेक्षा आहे. संशोधन, लेखन, मुलाखती, दस्तऐवजीकरण, चित्रफिती आणि सार्वजनिक सादरीकरण यांच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण साहित्य तयार होईल. पुढील पिढ्यांना उपयोगी पडेल असे संदर्भसाहित्य निर्माण करणे आणि सामूहिक कृषी उद्योगांविषयी विचार करणारे कृतीशील युवक घडविणे, ही या उपक्रमाची व्यापक दिशा आहे.
फेलोशिप कार्यक्रम किमान पाच वर्षे राबविण्याची संकल्पना असून दरवर्षी पाच फेलोज निवडण्याचे नियोजन आहे. अशा सातत्यपूर्ण कामातून विविध विषयांवरील संशोधनपर दस्तऐवज आणि काही चित्रफीत मालिका तयार होऊ शकतील. हे साहित्य पुढे प्रकाशित करण्याची आणि अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याची दिशा संकल्पनापत्रात मांडली आहे. फेलोजच्या निवडीसाठी आणि त्यांच्या कामाला मार्गदर्शन करण्यासाठी समिती असेल. शेतकरी संघटनेबरोबरच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, माध्यमांतील व्यक्ती आणि अभ्यासकांच्या सहभागातून मार्गदर्शन मिळेल.
अभ्यासासाठी विषयांची व्याप्ती मोठी आहे. शरद जोशींचे बाजारपेठेच्या स्वातंत्र्याविषयीचे विचार, महिला धोरण, मुक्त अर्थव्यवस्थेची मांडणी किंवा शेतकऱ्यांच्या निर्णयस्वातंत्र्याचा प्रश्न यांपैकी एखादा विषय निवडता येईल. त्यांच्या एखाद्या पुस्तकाचा सखोल अभ्यासही करता येईल. आंबेठाणची शेती आणि त्यांच्या इतर कृतीप्रयोगांचा मागोवा घेता येईल. त्यांच्या सहवासात काम केलेल्या व्यक्तींच्या मुलाखतींमधून विशिष्ट विषयाचे दस्तऐवजीकरण करता येईल. आजच्या युवा शेतकऱ्यांनी त्यांच्या विचारांतून काय स्वीकारावे, हा अभ्यासाचाही विषय असू शकतो. उमेदवाराने नाविन्यपूर्ण विषयांची निवड करण्याचे स्वातंत्र्य घेणे अपेक्षित आहे.
निवडलेल्या विषयाला न्याय देण्यासाठी मूळ साहित्याचे वाचन आणि संदर्भांचा शोध महत्त्वाचा असेल. शरद जोशींची पुस्तके, उपलब्ध डिजिटल साहित्य, संबंधित व्यक्तींच्या मुलाखती आणि आवश्यक क्षेत्रभेटी यांचा अभ्यासात उपयोग करता येईल. एखाद्या विचाराचा अर्थ सांगताना त्याचा मूळ संदर्भ स्पष्ट करणे आणि स्वतःचे निष्कर्ष पुराव्यांच्या आधारे मांडणे अपेक्षित आहे. लेखनातून काम करणाऱ्या उमेदवाराला विषयाची सुसंगत मांडणी करता यायला हवी. चित्रफित किंवा मुलाखतींच्या माध्यमातून काम करणाऱ्यानेही विशिष्ट विषयाभोवती अभ्यास केंद्रित ठेवणे आवश्यक आहे. माध्यम कोणतेही असले, तरी अभ्यासाचा दर्जा आणि आशय महत्त्वाचा राहील.
प्रसिद्ध झालेल्या आवाहनानुसार, कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि २५ ते ५० वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. विविध विद्याशाखांतील विद्यार्थी, संशोधक, पत्रकार, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर लेखन करणारे, कृषी प्रश्नांचे अभ्यासक तसेच पात्र शेतकरी यांच्यासाठी ही संधी आहे. निवड करताना केवळ शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव पाहिला जाणार नाही. उमेदवाराची स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, वाचन आणि लेखनाची सवय, विषय समजून घेण्याची दृष्टी आणि प्रस्तावित प्रकल्प पूर्ण करण्याची तयारी विचारात घेतली जाईल. या कामासाठी पुरेसा वेळ देण्याची तयारी ही आवश्यक बाब आहे.
फेलोशिपचा कालावधी सात ते आठ महिन्यांचा असेल. निवड झालेल्या प्रत्येक फेलोला अभ्यास आणि संशोधनासाठी एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मिळेल. आवश्यक प्रत्यक्ष प्रवासासाठी कमाल २५ हजार रुपयांपर्यंत स्वतंत्र प्रवासभत्त्याची तरतूद आहे. प्रवास झाल्यासच हा खर्च देण्यात येईल. संशोधनपर लेखासाठी साधारण २५ ते ३० हजार शब्दांची अपेक्षा आहे. अर्जदाराने आपल्या प्रस्तावात प्रकल्पाचे स्वरूप, कामाचा कालावधी आणि अपेक्षित निष्पत्ती स्पष्ट करावी लागेल. अर्थसाहाय्य विविध टप्प्यांत दिले जाईल; प्रवासखर्चाचे निकष निवडलेल्या उमेदवारांना कळविले जातील. दृकश्राव्य प्रकल्पासाठी भागांची संख्या, कालावधी आणि अपेक्षित निर्मिती स्पष्ट करावी लागेल.
पूर्ण भरलेल्या स्वाक्षरीयुक्त अर्जासोबत, संक्षिप्त परिचय, आवश्यक पुरावे, ३०० शब्दांचा विचारपर नमुना आणि ८००–१,००० शब्दांचा स्वतंत्र मराठी लेख जोडणे आवश्यक आहे. या लेखासाठी आर्थिक स्वातंत्र्य, बाजारपेठेचे स्वातंत्र्य किंवा आंदोलनाच्या प्रतिमेपलीकडील शरद जोशींचे अर्थविचार यांपैकी विषय निवडता येईल. लेखाला किमान तीन संदर्भ द्यावेत. AI किंवा डिजिटल साधनांचा वापर केला असल्यास त्याचा तपशील जाहीर करावा. अपूर्ण, संदर्भहीन किंवा इतरांकडून तयार करून घेतलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवडप्रक्रियेत अर्जाची पडताळणी, लेखन व विचारकौशल्यांचे गुणांकन आणि पहिली मुलाखत होईल. एकत्रित गुणांनुसार निवडक उमेदवारांची अंतिम मुलाखत होईल. निवडीनंतर संमतीपत्रावर सही केल्यावरच निवड निश्चित होईल. नियोजित आढावे, आवश्यक सुधारणा आणि वेळेत अंतिम काम पूर्ण करणे बंधनकारक राहील. प्रकाशन व वापराचे अधिकार आयोजकांकडे राहतील. साहित्यचौर्य, चुकीची माहिती किंवा अपूर्ण कामाबाबत संस्थेला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार असेल.
अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर २०२६ आहे. अर्ज मिळविण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी sharadjoshi.fellowship@sahyadrifarms.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करू इच्छिणाऱ्या आणि अभ्यासाला लेखन व कृतीची जोड देऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. शरद जोशींच्या विचारांना आजच्या प्रश्नांसमोर ठेवून तपासण्याची आणि ते नव्या पिढीपर्यंत अर्थपूर्ण रीतीने पोहोचविण्याची ही संधी आहे.
- प्रमोद राजेभोसले
मुख्य समन्वयक, शरद जोशी फेलोशीप उपक्रम
मुख्य कार्यकारी अधिकारी, सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन, नाशिक
sharadjoshi.fellowship@sahyadrifarms.com
Tags: Sharad Joshi Shetkari Sanghatana शरद जोशी अभ्यासवृत्ती शेती शेतीतील संशोधन कृषि उत्पन्न बाजार समिति शेतमालाला योग्य भाव शेतकरी संघटना साधना डिजिटल सह्याद्री रूरल सह्याद्री रूरल डेव्हलपमेंट फौंडेशन नाशिक शरद जोशी फेलोशिप फेलोशिप Load More Tags
Add Comment