आक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 3/12

pond5.com | प्रातिनिधिक चित्र

बर्ट्रांड रसेल यांच्या 'The Conquest of Happiness' या पुस्तकाचा स्वैर मराठी अनुवाद करुणा गोखले यांनी पाव शतकापूर्वी 'सुखी माणसाचा सदरा' या नावाने केला, तो विशेष लोकप्रिय झाला. त्यानंतर सिमोन द बोव्हूआर यांच्या 'सेकंड सेक्स' या आणखी एका जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला. त्यांच्या स्वतंत्र लेखनाचे 'बाई माणूस' हे पुस्तकही चांगलेच दखलपात्र ठरले आहे. आज त्यांची ओळख मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त अशी आहे..

त्यांनी 2021 या वर्षी 'स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान' या विषयावरील संशोधन प्रकल्प हाती घेतला होता.. त्यामध्ये 203 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्या सर्वांना एकूण 62 प्रश्न विचारले गेले आणि प्रत्येक मुलाखत साधारणतः सव्वा तास चालली. त्या अभ्यासावर आधारित बारा भागांची लेखमाला 'कर्तव्य'वरून सलग 12 आठवडे (प्रत्येक रविवारी) प्रसिध्द करीत आहोत...

स्त्रियांबरोबर वावरताना त्यांच्या वर्तणुकीतील काय खटकते या प्रश्नाला एका उत्तरदात्याने टिप्पणी केली आहे की, काही स्त्रिया पुरुषांनी दिलेल्या त्रासाचे उट्टे काढायचे म्हणून त्यांच्याशी नको इतक्या अधिकारी वृत्तीने वागतात. आणखी काही तरुणांनी खंत व्यक्त केली की, अधिकार मिळालेत ना; मग ते वापरलेच पाहिजेत अशी काही मुलींची समजूत असते. त्यातून त्या गरज नसताना चढेल वागतात. एका तरुणानेपण हेच निरीक्षण नोंदवले, परंतु त्याची कारणमीमांसा निराळी केली. त्याच्या मते, आपल्याला बेदखल केले जाईल या आशंकेपायी काही स्त्रिया उगाच आक्रमक वागतात. या शेऱ्यांत काही प्रमाणात तथ्य दिसते. काही उच्चशिक्षित, तरुण स्त्रिया पुरुषांशी (विशेषकरून रिक्षाचालक, रखवालदार, वेटर्स, खासगी वाहनचालक, बस कंडक्टर्स अशा कष्टकरी पुरुषांशी) उद्दामपणे बोलताना दिसतात. या वृत्तीमुळे सर्वच शिक्षित स्त्रियांबद्दल पुरुषांच्या मनात अढी निर्माण होते. एवढेच नाही, तर त्यांचा पुरुषी अहंकार डिवचला जाऊन ते संधी मिळताच त्याचे उट्टे काढतात. कुणासाठीही अपमान हा क्लेशदायकच असतो. स्त्रीकडून झालेला अपमान तर पुरुषास अधिक क्लेशदायक वाटतो. त्यातून मग काही पुरुषांच्या मनात सूडाची भावना निर्माण होते. पुरुष शारीरिक ताकदीत स्त्रीपेक्षा वरचढ असल्याने त्याला तिच्यावर सूड उगवणे फार अवघड जात नाही. स्त्रीपेक्षा अधिक ताकदवान शरीर हा हुकमी एक्का वापरून असे पुरुष स्त्रीला नामोहरम करू शकतात. स्त्रीला दोघांच्या शारीरिक शक्तीतील फरकाचे भान ठेवावे लागते. कुणीही उद्दामपणा करणे चूकच आहे, पण स्त्रीने तो पुरुषासोबत आणि विनाकारण केल्यास एका चुकीपायी तिची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता वाढते. हे कटू असले, तरी वास्तव आहे आणि ते नाकारून चालत नाही. 

मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर हा मुद्दा तसा गुंतागुंतीचा आहे. याचे कारण, केवळ स्त्री चळवळीमुळे स्त्रियांना नव्याने अधिकार प्राप्त झाले आणि त्या त्यांचा गैरवापर करू लागल्या हे अर्धसत्य आहे. पितृकेंद्री कुटुंबव्यवस्थेत सत्तास्थानावरील पुरुषाच्या माध्यमातून त्याच्या निकटवर्ती स्त्रियांना कमी-जास्त अधिकार मिळत होतेच. आणि अधिकारी वृत्तीच्या स्त्रिया त्यांचा चांगल्या-वाईट कामांसाठी उपयोग आणि प्रसंगी दुरुपयोग करत होत्याच. विवाहित स्त्रीस सासूरवास हा ‘पुरुष संक्रमित सत्तेचा स्त्रीकडून होणारा गैरवापर’ याचे उत्तम आणि फार पुरातन उदाहरण आहे. आजही बहुसंख्य स्त्रिया ‘विवाहित पुरुषाची आई किंवा बहीण’ या नात्याद्वारे मिळणाऱ्या अधिकारांचा गैरवापर कमी-जास्त प्रमाणात करतच असतात. मुद्दा हा आहे की, अधिकारांचा गैरवापर करणे ही वृत्ती जशी पुरुषाच्या अंगी असू शकते, तशी स्त्रीच्याही अंगी आढळणार.

सत्तेची आकांक्षा आणि अधिकारासाठी चढाओढ ही उपजत सहजप्रवृत्ती आहे. अगदी लहान मुलांमध्येसुध्दा ती आढळून येते. लहान मुले जर शाळा शाळा खेळत असतील, तर सर्वांनाच टीचर व्हायचे असते; विद्यार्थी किंवा शिपाई व्हायला सहसा कुणी तयार नसते. साहजिकच त्यातल्या त्यात वयाने लहान, सौम्य प्रकृतीच्या, मवाळ वृत्तीच्या मुलांना विद्यार्थी आणि शिपाई व्हावे लागते. पण अधिकारांची असोशी आणि गैरवापर ही जशी सहजप्रवृत्ती आहे, तद्वत सामोपचार, सहकार आणि समन्यायबुद्धी या अत्यंत उपयुक्त प्रवृत्ती होत, हेपण माणूस अनुभवातून शिकलेला आहे. म्हणून तर सजग पालक आणि शिक्षक आपल्या पाल्यांमध्ये या वृत्ती रुजवण्याचा प्रयत्न करतात. जे त्यांचा अवलंब करतात, ते जीवनात भावनिकदृष्ट्या संतुलित राहतात, ज्यांना तसे करणे जमत नाही, ते लौकिकार्थाने यशस्वी होऊनसुध्दा त्यांचा भावनांक कमीच राहतो. हे जेवढे पुरुषांना लागू पडते, तेवढेच स्त्रियांनासुध्दा लागू आहे. स्त्री चळवळीने समष्टीच्या पातळीवर सर्व व्यवस्था स्त्री-पुरुषांसाठी समन्यायी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून बळ घेऊन शिक्षण, आर्थिक स्वावलंबन साधलेल्या स्त्रीने व्यक्तिगत पातळीवर जर समन्यायाच्या तत्वाला तिलांजली देत अधिकारांचा गैरवापर केला, तर तो व्यक्तीचा दोष होय, परिवर्तनवादी चळवळीचा नाही. अर्थात चळवळीचा आनुषंगिक परिणाम म्हणून स्त्रियांमध्ये फुकाची आक्रमकता, अधिकारांचा गैरवापर, स्त्री चळवळीचा सोयीस्कर वापर अशी दुरिते निर्माण होतात, तेव्हा चळवळीस त्याची दखल घेणे क्रमप्राप्त असते, पण त्यांचे उत्तरदायित्व मात्र पूर्णपणे व्यक्तीचेच.  


हेही वाचा : स्त्रीमुक्ती चळवळ - संशोधनावर आधारित लेखाजोखा - करुणा गोखले


आणखी दोन-तीन तरुणांच्या टिप्पण्यावर टिप्पणी करणे अगत्याचे आहे. एक म्हणाला, “स्त्रियांच्या मनातील पुरुषांविषयीचे बायसेस खूप वाढले आहेत आणि ते त्या वारंवार बोलून दाखवतात”. दुसरा म्हणाला की, ‘सतत पुरुषांना झोडपत राहिल्यानं चांगले पुरुषपण त्यांच्यापासून लांब राहतात. किमान 20% पुरुषांना तरी स्त्रियांचे भले व्हावे असेच वाटत असते, ते कधीही स्त्रियांना त्रास देण्याचा विचारही करत नाहीत. स्त्री चळवळीची फक्त हीच एक बाजू मला नकारात्मक वाटते.’ तिसरा युवक म्हणाला की, ‘जो पुरुष बदलायचा प्रयत्न करत असतो आणि स्त्री-पुरुष समानतेचे तत्व अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या प्रयत्नांना दाद दिल्यास त्याचा बदलण्याचा हुरूप वाढतो. पण त्याच्यातल्या उणिवांवर बोट ठेवून सतत त्याबद्दल दूषणे दिल्यास तो नाउमेद होतो, हे वास्तव स्त्रियांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.’ असा नाउमेद झालेला पुरुष अधिक आक्रमक आणि स्त्रीप्रती असहिष्णू होण्याची शक्यता असते. 

तरुणांच्या वरील विधानांवर तटस्थपणे विचार करणे गरजेचे आहे. शतकानुशतकांच्या पितृकेंद्री व्यवस्थेमध्ये स्त्रीचे पराकोटीचे वस्तूकरण झाले ते स्त्रीवादाने लेखनातून, भाषणांमधून समाजापुढे आणले. ते करताना पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेवर घणाघाती प्रहार केले. ते केले नसते, तर संपूर्ण मानवजातीला घेरून राहिलेला सत्ता-असमतोल आणि अन्याय समाजाला दिसलाच नसता. परंतु आज तो टप्पा पार करून आपण बरेच पुढे आलो आहोत. समाजव्यवस्था स्त्रीला अन्यायकारक आहे, हे स्त्रीवादाने समाजाला दाखवून दिले त्याला आता शंभर वर्षे होत आली. पुरुषरचित व्यवस्थेला फटकारे मारून जागे करणे जेव्हा गरजेचे होते, तेव्हा ते करून झाले आहे. जसजशा स्त्रिया शिक्षित, सजग होत गेल्या तसतसे त्यांनी व्यवस्थेतील सत्ता-असमतोल आणि अन्याय दूर व्हावा यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु केले. आणि त्यांस काही प्रमाणात यशसुध्दा येत आहे. आता सतत पुरुषांना झोडपणे गरजेचे राहिलेले नाही. उलट, आता वैयक्तिक पातळीवरील प्रयत्न म्हणून स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेत वज्रलेप झालेल्या कल्पना बदलणे अगत्याचे आहे. त्यासाठी पुरुषांवर घणाघात करण्यापेक्षा सुसंवादाचे साधन वापरून एकमेकांच्या बाजू समजून घेणे, एकमेकांना त्यांच्या वर्तनातील विरोधाभास निदर्शनास आणून देणे उभयपक्षी अधिक श्रेयस्कर ठरणार आहे. स्त्रीवादाने एक ज्ञानशाखा या नात्याने स्त्रीच्या दुय्यमत्वाची आणि पुरुषप्रधानतेची सैद्धांतिक मांडणी केली. ती करताना स्त्री चळवळीला वस्तुनिष्ठ आणि तर्ककठोर राहणे आवश्यकच होते. परंतु ती मांडणी पचवून त्यातील पचेल, रुचेल, झेपेल तेवढे आचरणात आणण्यासाठी समाजमन बदलण्याचे काम सहृदयतेने, चिकाटीने आणि प्रदीर्घ काळ करावे लागणार आहे.

स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीत आता ही प्रक्रिया सुरु झाली आहे. यापुढे परस्पर विखार, कुचेष्टा, परस्पर अनादर, अवहेलना यांपेक्षा एकमेकांचे ऐकून घेणे आणि एकमेकांना समजावून सांगणे हाच मार्ग स्त्री-पुरुषांसाठी उपकारक ठरणार आहे. एकमेकांना सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या वृत्तीने दोघांचाही वेळ आणि शक्ती संघर्ष करण्यात खर्ची पडेल. स्त्री चळवळींना आता याचे भान आले आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठीतील एक अग्रगण्य स्त्रीवादी मासिक ‘मिळून साऱ्याजणी’ त्याच्या मुखपृष्ठावर ठळक अक्षरात जे ब्रीदवाक्य लिहिते, त्यात चाळीस वर्षांत झालेले बदल! या मासिकाने 1989 या त्याच्या स्थापनावर्षापासून ते 2021 या 41 वर्षांच्या कालखंडात आपले ब्रीदवाक्य कालानुरूप अधिकाधिक समावेशक केले. ती चारही ब्रीदवाक्ये खाली उद्धृत करत आहे.

स्वत:शी नव्यानं संवाद सुरु करणारं मासिक (1989-2009) 
स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी संवाद साधावा यासाठी... (2009-2019)
‘ती’ आणि ‘तो’ या पलीकडचे सर्व ‘ते’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्यानं संवाद साधावा यासाठी... (2019-2021)
‘ती’, ‘ते’ आणि ‘तो’ यांचा स्वत:शी आणि परस्परांशी नव्यानं संवाद होण्यासाठी...मासिक नव्हे, चळवळ (सप्टेंबर 2021-)

काळ पुढे सरकला, स्त्री चळवळ अधिकाधिक समावेशक झाली, तशी मासिकानेही आपली भूमिका अधिक व्यापक करून त्यात ‘ते’सुध्दा येतात हे स्पष्ट केले. शिवाय परस्पर संवाद हेच चळवळीचे अंतिम ध्येय आहे, हेपण अधोरेखित केले. आता चळवळ जे सुचवते, ते आचरणात आणण्याचे कर्तव्य प्रत्येक स्त्री-पुरुषाचे आहे. परंतु मुख्य अडचण ही आहे की, चळवळ वारंवार जे लेखनातून उद्धृत करते, ते फार थोडे जण वाचतात. स्त्री चळवळीतील अभ्यासकांचे लेखन तर मुख्यत्वे स्त्रियाच वाचतात. बहुसंख्य पुरुष त्यास अनुल्लेखाने मारतात किंवा त्याची कुचेष्टा करतात. त्यामुळे वास्तवात घडते असे की, स्त्रियांच्या वर्तणुकीतील जे जे खटकते, त्याची जबाबदारी व्यक्ती म्हणून त्या स्त्रीवर न टाकता, त्याचे खापर चळवळीवर फोडले जाते. पण चळवळ अशा वर्तणुकीचे समर्थन करते का, याची खातरजमा करण्याची तसदी कुणीच घेत नाही. शिवाय आणखी एक कटू वास्तव विचारात घ्यावे लागते. पुरुषकेंद्री व्यवस्था, विशेष करून अशी कुटुंब व्यवस्था आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर फायद्याची वाटणारे स्त्री-पुरुष समाजात नेहमीच अस्तित्वात असतात आणि भविष्यातही राहणार. स्त्रियांना पुरुषांविषयी आणि पुरुषांना स्त्रीविषयी पूर्वग्रह पहिल्यापासून होतेच. त्यांचे वर्तन पूर्णपणे या पूर्वग्रहांवर आधारित असे. पण एकविसाव्या शतकात, किमान शहरी, शिक्षित स्तरांत तरी स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर वाढला असताना हे बायस कमी व्हायला हवेत. त्यातच दोघांचे भले आहे. 


हेही वाचा : बाई घरात बसून फक्त स्वयंपाक करतीये आणि पुरुषच कसा शहाणा आणि कर्तबगार आहे ही इमेज मला तोडायची होती... - प्रतिमा कुलकर्णी


प्रश्न संच 4 मध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एक तरुण म्हणाला, “निगोशिएशन, डिस्कशन ही स्किल्सच पुरुषाला ठाऊक नाहीत.” त्याचे हे विधान अर्धे-मुर्धे खरे आहे. पुरुषाकडे ही स्किल्स नाहीत, असे नाही. ती आहेत. सत्ताकारण, अर्थकारण करताना तो ती पुरेपूर वापरत असतो. पण स्त्रीबरोबर वागताना ही स्किल्स वापरण्याऐवजी झटकन उपरोध, कुचेष्टा, आक्रमकता किंवा हिंसा ही आयुधे उपसतो. याचे कारण स्त्रीशी व्यवहार करताना त्याला पुरुषप्रधान व्यवस्थेचे फायदे मिळत असतात आणि तो सत्तास्थानी असतो. सत्तेवर असणाऱ्या व्यक्तीची समोरच्या माणसांशी सामोपचाराने घेण्याची व्यावहारिक गरज तुलनेने कमी तीव्र असते. आतापर्यंत स्त्रीकडे शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य यांच्या अभावामुळे सत्ता नसे. त्यामुळे सहजीवनात तगून राहण्यासाठी तिला सुसंवाद, सामोपचार, तडजोड ही साधने आत्मसात करणे भागच होते. पण जसे स्त्रीचे सामाजिक स्थान उंचावू लागले, तिच्या हाती आर्थिक सत्ता आणि अधिकार आले, तसे काहींमध्ये सत्तास्थानाचे गुण येऊ लागले. म्हणूनच कॉर्पोरेट जगतात सामोपचाराने वागणाऱ्या काही स्त्रिया त्यांच्यापेक्षा निम्न सामाजिक स्तरातील पुरुषांशी वागताना मात्र आक्रमक होताना दिसतात. पुरुषाच्या आक्रमकपणावर कोरडे ओढता ओढता स्त्रीसुध्दा जर तेवढ्याच तत्परतेने पुरुषाची पारंपरिक आयुधे परजू लागली, तर महत्प्रयासाने साध्य होऊ घातलेला स्त्री-पुरुष संबंधातील मोकळेपणा कधी लोप पावेल कळणारही नाही. 

एका तरुणाने तक्रार केली की, ‘बायका ओव्हरप्रोटेक्टिव्ह झाल्या आहेत. बसमध्ये चुकून जरी धक्का लागला, तरी ओव्हर रिअ‍ॅक्ट करतात. एकदा माझा चुकून एका बाईला धक्का लागला. त्या बाईने इतक्या जोरजोरात आरडाओरडा सुरु केला! अधिकार मिळाले म्हणून किती अ‍ॅग्रेसिव्हली निषेध करायचा?’ या तरुणाची तक्रार अगदीच अवाजवी नाही. गर्दीच्या वेळी बसमध्ये स्त्रियांना अनेक सहेतुक, निर्हेतुक धक्के सहन करावे लागतात हे खरे आहे. त्यांची त्याच क्षणी दखलही घेतली पाहिजे. पण दरवेळी आरडओरडाच केला पाहिजे असे नसते. निषेध नोंदवताना स्पष्ट पण तरीही सुसंस्कृतपणे तो नोंदवता येतो. परंतु प्रत्येक वेळी तसे तारतम्य ठेवले जातेच असे नाही. एकंदरीतच आपल्या भावना संतुलितपणे व्यक्त करण्याचे प्रशिक्षण देणे हा आपल्या समाजात मुलभूत संस्कारांचा भाग नाही. त्यामुळे स्त्री-पुरुष नात्यातील हे कंगोरे व्यक्तिगत पातळीवरच हाताळायला हवेत. 

एका तरुणाची टिप्पणी खूपच मासलेवाईक आहे. स्त्रियांच्या आक्रमकतेविषयी बोलताना तो म्हणाला की, ‘आता चळवळीवर आणि ज्यांना तिचे फायदे मिळाले आहेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी स्त्रीवाद सोडून देऊन समानतेवर बोललं पाहिजे.’ या त्याच्या विधानाचा अर्थ उलगडून मागितला तेव्हा मात्र त्याला ठोस काहीच बोलता आले नाही. स्त्रीवाद प्रथमपासून समानतेवरच बोलत आला आहे. समानता आणि विषमता यांचे अनेकानेक पैलू उलगडून दाखवतानाच स्त्रीवादाच्या अभ्यासाची क्षेत्रे विस्तारत गेली आहेत. त्यामुळे स्त्रीवाद सोडून देऊन समानतेवर काम करणे हा भलताच अंतर्विरोध होईल.

आक्रमकता आणि अधिकार वापरण्याचा सोस यांबाबत आधुनिक स्त्रीविषयी तरुणांना जी गाऱ्हाणी आहेत त्याला एक सांस्कृतिक पैलूसुध्दा आहे. तो पूर्णपणे दुर्लक्षिता येत नाही. कुठलाही सामाजिक बदल हा भूतकाळातील वास्तवाच्या पार्श्वभूमीवर जोखला जातो. आजवर स्त्रीला सामाजिक क्षेत्रात स्वअर्जित असे कुठलेच अधिकार नव्हते. आता महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावणारी स्त्री तिच्या पदास आणि कामास आवश्यक तेवढा जरी अधिकार वापरू लागली, तरी तो परंपराप्रिय व्यक्तीस खटकतो. पडखाऊ संस्कार झालेल्या अनेक स्त्रिया आजूबाजूला दिसत असताना तरुण मुली आत्मविश्वासाने स्वत:चे मत किंवा इच्छा बोलून दाखवू लागल्या की काहींना त्या फारच आक्रमक वाटू लागतात. आपल्या सर्वेक्षणातील एक तरुणी म्हणालीच की, ‘सासरी एखाद्याचे मत पटले नाही, आणि मी तसे बोलून दाखवले की नवऱ्यासकट सर्वांना वाटते की मी वडीलधाऱ्यांचा उपमर्द करते. अशाच स्वरूपाचा सल आणखी एका तरुणीने व्यक्त केला : “तरुण मुलीला स्वत:चे मत असेल, तर ती विचारी न वाटता, आगाऊ वाटते”. माझी एक अत्यंत उच्चपदस्थ, यशस्वी मैत्रीण एकदा म्हणाली होती की, ‘स्त्री जसजशी तिच्या कार्यक्षेत्रात यशाची शिखरे गाठते, तसतसे वैयक्तिक जीवनात तिला अधिकाधिक नम्र व्हावे लागते, अन्यथा नात्यांची समीकरणे बिघडतात.’ 

थोडक्यात मुद्दा हा की, आक्रमक आणि अधिकारांचा गैरवापर करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांना तसे दूषण देणारा समाज या दोघांनाही वास्तवाचा संदर्भ लक्षात घेऊनच स्वत:चे वर्तन ठरवायला हवे. 

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com 


हेही वाचा : 
या घरकामाचे करायचे काय? (पूर्वार्ध)
या घरकामाचे करायचे काय? (उत्तरार्ध)

Tags: स्वअर्जित अधिकार पुरुषप्रधानतेची सैद्धांतिक मांडणी स्त्रीवाद पुरुष Load More Tags

Add Comment