पात्रं अस्सल असली तरच नाटक वैश्विक होतं

दिवाळी 2024 निमित्त मुलाखत 5/5

दिवाळीनिमित्त कर्तव्य साधना वरून विशेष मुलाखती आम्ही प्रसिद्ध केल्या. 

1. टीव्ही या माध्यमाचा सखोल अभ्यास असलेली अभिनेत्री-लेखिका मुग्धा गोडबोले
2. भाषांवर आणि अभिनयावर प्रेम करणारा अभिनेता-अभिवाचक नचिकेत देवस्थळी
3. 'जेन झी'साठी भूगोल, पर्यावरण, तत्त्वज्ञान असे जड विषय रंजक कथा-कादंबऱ्यांतून मांडणारी लेखिका मृणालिनी वनारसे
4. कथकची परंपरा आणि आजच्या काळाला सुसंगत कथनं यांचा मेळ घालणारी नृत्यांगना मानसी गदो 
5. नवोदित नाटककार-दिग्दर्शक-बालसाहित्यिक मुक्ता बाम

आज त्यातली पाचवी आणि समारोपाची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. आज 5 नोव्हेंबेरला मराठी रंगभूमी दिवस देखील साजरा होतो आहे. त्याचे औचित्य साधून नवोदित नाटककार आणि दिग्दर्शक मुक्ता बाम हिच्या मुलाखतीने दिवाळी विशेष मुलाखत मालिकेची सांगता करत आहोत.


मुक्ता बाम एक नाटककार आणि बालसाहित्यिक म्हणून उदयास येते आहे. मुक्ताने अगदी बालवयातच लेखनाला सुरुवात केली आणि ती सातत्याने लिहीत राहिली. गेली सुमारे 15 वर्षं ती नाटक आणि बालसाहित्य लिहिते आहे. कथा, कविता, जाहिरात, मालिका या स्वरूपाचं लेखनही तिने केलेलं आहे. तरूण वयातच तिच्या लेखनात कमालीची प्रगल्भता जाणवते. तिच्या सगळया कामात संवेदनशीलता, अभ्यास आणि स्त्रीवादी विचार यांचा एक समान धागा आहे. तिच्या चार सामाजिक एकांकिकांसाठी तिला महाराष्ट्र फाऊंडेशनचा रा. शं. दातार नाट्य पुरस्कार 2021 मध्ये मिळालेला आहे. तिच्या समाजाभिमुख लेखनाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तिच्याशी संवाद साधला.

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा संवेदनशीलतेने विचार करून अर्थपूर्ण वैचारिक अभिव्यक्ती करण्याकडे तुझा कल आहे. ही वैचारिक जडणघडण कशी झाली?
माझ्या आई बाबांनी खूप आधीपासून मला वाचण्याची आणि व्यक्त होण्याची सवय लावली. मला जेव्हापासून बोलता यायला लागलं तेव्हापासून घरातली एक व्यक्ती म्हणून छोट्या छोट्या गोष्टींत ते मला माझं मत विचारायचे. त्यामुळे मला आपलं मत असलं पाहिजे, ते मांडता आलं पाहिजे याची जाणीव झाली. त्यानंतर अक्षरनंदन शाळेत मी घडले. ज्या गोष्टींची मला “हे माझं प्रिव्हिलेज आहे” अशी जाणीव आधी नव्हती ती या शाळेत असल्यामुळे झाली. समाजाशी बांधिलकी, मातृभाषेचं प्रेम आणि एखाद्या गोष्टीचा विविध अंगांनी विचार करणं हे मी शाळेत शिकले. शाळेतही ‘स्वमत’ घडवण्यासाठी उत्तेजन मिळालं.

आता आठवून गंमत वाटते, आम्ही फळ्यावर ‘असहकार’ असं लिहायचो आणि अभ्यासाऐवजी खेळाचा तास पाहिजे अशी मागणी लिहून खाली सह्या करायचो. लहान वयापासूनच आंदोलन / चळवळ करणं, आणि आपलं वय, सामाजिक स्थान, लिंग काहीही असो, आपला मुद्दा मांडणं आणि समोरच्याचा ऐकून घेणं हे माझ्यात रुजलं.

याचबरोबर जी पुस्तकं मी वाचली त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी हॅरी पॉटर वेड्यासारखं वाचायचे. त्यात ज्या पद्धतीने वेगवेगळे सामाजिक घटक एका शाळेत एकत्र येतात, विघातक शक्तीच्या विरोधात एकवटून उभे राहतात आणि अंतिम विजय प्रेमाचा होतो, ते मला आवडतं. असहिष्णू प्रवृत्ती वाढत असताना प्रेम आणि मैत्री हेच आपले आधार असणार आहेत असं मला खरंच वाटतं. कला समाजासाठी असते असंही माझं ठाम आहे. माझ्या लेखनातही तो एक अंतःप्रवाह आहे.

तू लिहायला सुरुवात खूप लहानपणापासून केलीस. आवड किंवा ऊर्मी म्हणून लिहिता लिहिता व्यवसाय म्हणूनही लिहायला लागलीस. त्या प्रवासाविषयी थोडं सांग. 
मला आठवतच नाही इतक्या आधीपासून मला मला लिहायला आवडायचं. मला गाणी-गोष्टी सुचायच्या पटपट. मला सुचेल ती गाणी म्हणत, कविता करत मी घरत फिरायचे असं सगळे सांगतात. आई-बाबांनी पण ते ऐकून घेतलं, समजून घेतलं. तुम्ही जे काही मांडता त्याला येणारा पहिला प्रतिसाद खूप महत्त्वाचा असतो. माझ्या लिहिण्याचं तेव्हा कौतुक झालं नसतं तर मी किती लिहीत राहिले असते माहीत नाही.

मी चौथीत असताना शाळेच्या संमेलनासाठी कल्पना सुचवत होते तेव्हा ताईंनी (शिक्षिका) मलाच लिहायला उत्तेजन दिलं. ते पहिलं नाटक मी लिहिलं. दरवर्षी शाळेत सातवी ते दहावी या वर्गांच्यात स्पर्धा असायची. एक विषय, एक आठवडा वेळ असं द्यायचे, आणि त्यात संपूर्ण वर्गाने सहभागी व्हायचं, जास्तीत जास्त कला सामावून घ्यायच्या, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गाणं, नाच, वेशभूषा, केशभूषा, जे काही असेल ते सगळं मुलांनी पालक किंवा शिक्षकांच्या मदतीशिवाय करायचं आणि सादर करायचं. सातवीत असताना मी स्पर्धेच्या वेळी सुरुवातीचे काही दिवस शाळेत रजा होते. रजा असताना मला गृहपाठ करावा लागणार नाही. त्यामुळे मला नाटक लिहायला वेळ मिळेल तर मी नाटक लिहायचं असं वर्गातल्या मुलांनी मिळून ठरवलं. मी जरा नखुषीनेच लिहिलं पण नंतर नाटक बसवण्याची प्रक्रिया मला खूपच भावली.

तेव्हापासून मी शाळा – कॉलेजच्या अनेक स्पर्धांसाठी, संमेलनांसाठी नाटकं लिहीत गेले. आणि पुढे अजून लिहितेच आहे.

तुझ्या नाट्यसंहितांचे आशय-विषय हे आजच्या समाजाचे आहेत, त्यांची मांडणी थेट आहे. या कल्पना कशा सुचतात आणि लेखनामागे काय विचारप्रक्रिया असते ते सविस्तर सांगशील?
शाळेनंतर मी फर्ग्युसन कॉलेजला गेले. शाळेत प्रेमाने ऐकून घेणारे, कौतुक करणारे आणि प्रोत्साहन देणारे लोक जास्त असतात, त्यामुळे एका सुरक्षित कोशात तुम्ही असता. काम मनापासून करता पण कौशल्याला धार मात्र चढत नाही. पण कॉलेजमध्ये तुमचं लेखन सहज चॅलेंज केलं जातं, विरोधी मतांनी टक्कर दिली जाते. त्यामुळे कोणाला डावलताच येणार नाही असं लेखन करायची ईर्ष्या निर्माण झाली. चर्चा विवादातून माझं कौशल्य अधिक धारदार होत गेलं.

कॉलेजमधलं माझं पहिलं नाटक ‘खेळ’ हे रूढार्थाने सामाजिक नव्हतं. पण प्रसारमाध्यमांचा वापर करून प्रोपोगांडा चालतो त्याविषयी बोलणारं होतं. नंतरचं नाटक विशेष जवळचं आहे. विपाशा नावाची अरुण कोलटकर यांची कविता आहे. बाईवरचा अन्याय, दुःख याविषयी इतकं उघड आणि थेट अंगावर येणारं लेखन मी प्रथमच वाचलं होतं. मी मध्यमवर्गीय साजूक तुपातल्या वातावरणात वाढल्यामुळे मला असं काही लिहिता येणार नाही असं वाटलं. आणि म्हणूनच तसं आवर्जून लिहावंसंही वाटलं. मग त्याच कवितेवर आधारित नाटक लिहिलं.

त्याच्याआधी मी एका नाटकाच्या प्रक्रियेत होते. त्यात 11 मुलं होती आणि मी एकटीच मुलगी होते. तेव्हा मी खूप जवळून पाहिलं की मुलं मुलींबद्दल काय बोलतात, कसा विचार करतात ते. ते डोक्यात होतं. शिवाय माझ्यासारखं इतर चार मुलींना आपण backstageचं काम करून पाहावं असं का नसेल वाटत? शारीरिक क्षमतेचा अभाव की मानसिक अडसर? त्यात समानता का नाही? असे सगळे विचार त्या काळात माझ्या डोक्यात होते. त्यामुळे विपाशा नाटक हे बाईचे प्रश्न मंडणारं आणि माझ्याशी जोडलेलं असं झालं.

विपाशा ही प्राचीन ग्रीसमधल्या हायपेशिया नावाच्या शास्त्रज्ञ स्त्रीची गोष्ट आहे. ती मोठी पंडिता होती, अलेक्झांड्रियाचा राजा तिचा शिष्य होता. ती ख्रिश्चन धर्मप्रसाराच्या विरोधात उभी राहिली. तिने कायमच शिक्षण आणि विचार यांचा पुरस्कार केला. अत्यंत निर्घृणपणे तिला मारण्यात आलं.

आम्ही हे नाटक केलं त्याच्या दोनच वर्षं आधी डॉ. दाभोलकरांची हत्या झाली होती. त्यांचाही हाच लढा होता, आंधळा कट्टरतावाद विरुद्ध डोळस विवेकवाद. 'जे मुद्याने लढू शकत नाहीत ते समोरच्याला संपवतात पण तरी विचार संपत नाही.' हेच आम्हाला नाटकातून मांडायचं होतं, पण थेट दाभोलकरांचा घटनासंदर्भ घेऊन नाटक केलं असतं तर सध्याचे पूर्वग्रह आणि विरोध मनात घेऊन काही प्रेक्षक बघायला आले असते, मुद्दा समजण्यात तो अडसर ठरला असता. पण एका वेगळ्या काळातली वेगळ्या जगातली गोष्ट सांगून आम्ही तो अडसर टाळला, आणि खूप टोकदारपणे एक जास्त वैश्विक ‘म्हणणं’ मांडलं.

गृहिणी आणि वेश्या या समाजानेच एकमेकींच्या विरोधात उभ्या केलेल्या बायका आहेत. त्या एकमेकींशी काही बोलू शकतील का, बोलल्या तर काय बोलतील? अशा विचारातून ‘टिळा’ हे नाटक सुरू झालं. आणि तेव्हा मी कुठल्या तरी सॅनिटरी पॅडची खूप इंटरेस्टिंग जाहिरात पाहिली होती. त्यात आधी काही बायका मासिक पाळी म्हणजे त्रास, वैताग असं सांगतात आणि नंतर काही बायका सांगतात की, "पाळी आली की आम्हाला खूप छान वाटतं कारण त्या पाच दिवसांत आम्ही आम्हाला वेळ देतो किंवा आम्हाला काम नाही करायला लागत." आणि हे सांगणाऱ्या त्या सगळ्या वेश्या होत्या. जाहिरातीत अतिशयोक्ती असेल, पण मला तो दृष्टिकोन भावला. पाळी हा सगळ्या स्त्रियांना जोडणारा धागा आहे. तो जर वेश्या आणि गृहिणीला समोरासमोर आणू शकला तर त्यातून पुढे नाटक घडवता येईल, असं वाटलं.

नाटकात सुमन नावाची गृहिणी आहे, तिला मूल होत नसतं, दर महिन्याला पाळी आली की घरचे तिला टोचून बोलत असतात. एकदा ती पाळी आल्यावर घरातून पळून येते आणि योगायोगाने वेश्यांच्या वस्तीत चक्कर येऊन पडते. वेश्या तिच्याशी आपुलकीने वागतात, लगेच धंद्याला लावत नाहीत. ते पाच दिवस तिच्यासाठी एक वेगळाच अनुभव तयार करतात. शेवटी ती तिथून निघून जाते, पण एक वेगळंच जग त्यानिमित्ताने तिला दिसतं. 

त्या निमित्ताने मी पुण्यातल्या वेश्यावस्तीत जाऊन दोन आठवडे फिरत निरीक्षण करत होते, काही लोकांशी बोलत होते, मला कधीच घरून आडकाठी झाली नाही, पण आमच्या एक मित्राला या नाटकात काम करायला घरच्यांनी नाही म्हटलं. वेश्या, आणि मासिक पाळी असे दोन ‘टॅबू’ विषय यात असल्यामुळे माझ्या ओळखीचे काही लोक टिळा पाहायला अजूनही कचरतात. समाज कसा विचार करतो हेही या निमित्ताने दिसलं.

‘ऑस्कर’ हे नाटक ऑस्कर वाइल्ड या बंडखोर आयरिश लेखकाच्या जीवनावर आधारित आहे. ते लिहिलं तेव्हा भारतात LGBTQ+ संदर्भातल्या जाणिवा स्पष्ट होत होत्या, समलिंगी विवाहासाठी कायदे बदलायची मागणी होती, चळवळ वाढत होती. अठराव्या शतकात ऑस्कर वाइल्डला समलिंगी प्रेमसंबंधांबद्दल कायद्याने कठोर शिक्षा होत असतानाही “कोणीही कोणावरही केलेलं प्रेम श्रेष्ठ आहे” हेच तो म्हणत राहिला. त्या घटनेच्या आधाराने लैंगिकता आणि प्रेम याविषयी बोलणारं ते नाटक होतं.

‘रंग’ हे नाटक मी लिहिलं तेव्हा फेअर न् लवली या गोरेपणा वाढवणाऱ्या क्रीमची केस चालू होती. गोरा रंग असणं आणि नसणं याने मुलींना काय फरक पडतो, त्याची जाणीव त्यांना कशी करून दिली जाते, रंगाने ठरणारी ओळख जपण्यासाठी किंवा पुसण्यासाठी त्या त्वचेची, रंगाची सतत काळजी घेण्यात, मेक-अप करण्यात आणि सगळ्यात वाईट म्हणजे एका ठराविक पुरुषी नजरेने स्वतःकडे बघण्यात किती वेळ घालवतात यावर बोलणारी ती एकांकिका होती.

नाटक लिहिताना आपलं काहीतरी ठाम म्हणणं असलं पाहिजे. एखादा विचार घेऊन आपण जगतोय तर तो विचार मांडणारी गोष्ट फुलवता आली पाहिजे, असं माझं मत आहे.

विपाशा, टिळा, रंग, आणि ऑस्कर या एकांकिकांसाठी तुला महाराष्ट्र फाऊंडेशनचा 2021चा रा. शं. दातार नाट्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर तुझं 'यात्रा' हे बहुचर्चित नाटक आलं. त्यात आशयाइतकीच प्रभावी दृश्यात्मकता आहे. त्याविषयी काय सांगशील?
‘यात्रा’ हे खरंतर टिळाचंच एक्सटेन्शन आहे. टिळामध्ये जी कोठ्याची मालकीण होती ती या वाटेला कशी आली असेल, ती आणि तिच्यासारख्या अनेक जणी हे जगणं स्वीकारून तिथेच का बांधलेल्या राहत असतील? असा विचार येत होता डोक्यात. हे सगळं आपण दृश्यात्मकता वापरून दाखवलं तर काहीतरी इंटरेस्टिंग तयार होऊ शकेल असं वाटलं. मी विपाशाच्या वेळेला वेळेला मनुस्मृती, कुराण आणि बायबलमध्ये स्त्रियांबद्दल काय लिहिलं आहे असं थोडसं वाचन केलं होतं. त्यातून चार पातळ्यांवर स्त्रियांना कायम बांधून ठेवलं जातं असं मला वाटलं होतं. तर त्या चार गाठींत अडकत गेलेली बाई जर आपण दाखवली तर ती नुसती एका वेश्येची गोष्ट न होता एका बाईची गोष्ट होईल असा विचार डोक्यात आला.

त्यासाठी मला खूप पटकन साडी हे दृश्य माध्यम सुचलं. साडी हे परंपरेच्या सौंदर्याइतकंच परंपरेच्या ओझ्याचंही प्रतीक आहे. शिवाय बाईला बंधनात अडकवणाऱ्या बऱ्याच गोष्टी वरकरणी सुंदर दिसतात. त्याही दृष्टीने साड्या हे रूपक चपखल बसलं.

पहिली गाठ बाईपणाची, ती जन्मापासूनच तिच्या पदराला बांधलेली असते. म्हणून पहिली गाठ बांधूनच नायिकेचा प्रवेश होतो. प्रेक्षकांच्या मनातही त्याबद्दल कुतूहल निर्माण होतं. आणि जेव्हा तिच्या मैत्रिणीचा भाऊ त्यांचा भातुकलीचा खेळ उधळून लावतो आणि ती त्याला मारायला धावते तेव्हा पहिल्यांदा तिला जाणवतं की आपल्याला पुढे जायला जमत नाहीये. तिची मैत्रीण तिला म्हणते “पोरांची जात अशीच. तू कुठे जाते त्याला मारायला? आपण आपलं आवरू आणि खेळू.” तेव्हा तिला बंधन, गाठ याची दुखरी जाणीव होते.

पुढे जेव्हा ती कोठयावर येते तेव्हा ती एका गिर्‍हाईकाच्या प्रेमात पडते, लग्नाची स्वप्नं बघते. संसार, जोडीदार, एकनिष्ठता यासारख्या कल्पनांची भुरळ पडून तिची तिनेच बांधून घेतलेली असते ती दुसरी गाठ. तो तिला सोडून निघून जातो, आत्महत्या करतो आणि मग ती स्वतःच्या पोटात वाढत असलेलं त्याचं मूल अबॉर्ट करते. पण आईपणाची तिसरी गाठ तिच्या पदराला बांधली जाते.

लहानपणीपासून बाबांनी सांगितलेली “आपल्याला यात्रा पूर्ण करायची आहे” ही गोष्ट मनात ठेवून ती तिथून निघून यात्रेत मिसळून पंढरपुरात जायचं ठरवते. पण त्याच रात्री कोठयाच्या मालकिणीचा मृत्यू होतो आणि तिला जाणीव होते की इथल्या मुलींना आधार द्यायला इथेच राहायला पाहिजे असं म्हणून जबाबदारीची शेवटची गाठ स्वतःला बांधून घेत ती तिथेच राहते. 

त्यात ‘आवा चालली पंढरपुरा’ या अभंगाचं थोडं वेगळं इंटरप्रिटेशन करायचा प्रयत्न केला होता. त्या अभंगात मजेशीर वर्णन आहे की आवा पंढरपूरला जायला निघते, खूप तयारी करते पण घरीच येऊन थांबते. यात्राची नायिका म्हणते की ‘कदाचित आवाची या सगळ्यात काही चूक नव्हती, तिचं घर तिच्या अस्तित्वाचा इतका भाग झालं होतं की ते तिला सोडता येत नव्हतं’.

यात्रासाठी अभ्यास करायला तू वेश्यावस्तीत जात होतीस असं तू म्हणालीस. तुझ्या सर्वच नाटकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने तू अभ्यास करतेस. त्याची प्रक्रिया थोडक्यात सांग.
मला खूप आवडतं रिसर्च करायला. जे म्हणू ते वैश्विक असावं किंवा त्याला एक स्थलकालाच्या पलीकडचा संदर्भ असावा असं जर आपल्याला वाटत असेल तर ती पात्रं खूप अस्सल असली पाहिजेत. आणि त्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही. उदाहरणार्थ एखाद्या पात्राच्या तोंडची भाषा – त्याची स्थळ-काळविशिष्ट भाषा, प्रादेशिक वैशिष्ट्यं, त्याच्या व्यवसायाची एक परिभाषा, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरामुळे असलेली भाषा, काही विशिष्ट शब्द, काही हेल, मराठीत हिंदी-इंग्लिशचा कमी जास्त वापर, वयानुसार वेगळी बोली अशा अनेक गोष्टींचा प्रभाव भाषेवर असतो. त्याची नीट माहिती घेऊन ते माझ्या लेखनात आणण्यात मला आनंद मिळतो.

अभ्यास करून मी जे लिहिलेलं असेल ते वाचून तुम्हाला जर वाटलं की “बघा, मुक्ता नुसती ‘मी किती अभ्यास केलाय’ हे अभिनिवेशाने दाखवत सुटलीये” तर मात्र माझ्या अभ्यासाचा उपयोग शून्य. नाटकात माझ्या अभ्यासाचा परिणाम दिसला पाहिजे, माझ्या अभ्यासाची पुस्तकं नव्हे, हे सांभाळायला कसरत करावी लागते. सुरुवातीला माझी काही नाटकं त्या अर्थाने जड होती. पण आता सरावाने तो समतोल अधिक चांगला जमायला लागला आहे.

तू स्वतः लिहिलेली नाटकं दिग्दर्शितही करतेस. त्या प्रक्रियेविषयी सांग. एकाच कलाकृतीकडे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून बघताना काही वेगळा दृष्टिकोन असतो का? 
लेखन दिग्दर्शनातला समतोल मी शोधते. लेखक म्हणून विचार करताना शब्द, त्यांचे अर्थ, वाक्य, संवाद यांचा विचार असतो, दिग्दर्शक म्हणून टोन, मंचावरची पात्रांची जागा, वावर, देहबोली यांचा विचार करते.

नाटकात काय आणि कसं ‘दिसेल’ याचाही विचार करते. यात्राच्या बाबतीत दृश्य परिणाम साधण्याचा एक वेगळा प्रयोग साड्यांच्या सहाय्याने मी केला. विपाशाच्या वेळी दिग्दर्शक ऋग्वेद सोमणने त्याला समूहनाट्याची दृश्यात्मकता आणली. मग लेखक म्हणून माझ्याकडून त्याने काही प्रवेश लिहूनही घेतले. त्या वेळेस मी खूप जवळनं अनुभवलं की दिग्दर्शक काय लेव्हलची दृश्यात्मकता आणू शकतो. रंग संहिता मी बसवली नाहीये पण लिहिताना एक प्रतिमा डोक्यात होती. पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने एकदा अमेरिकेतल्या वर्णद्वेषावर आधारित एका नाटकात ही गोष्ट केली होती. काळे आणि गोरे लोक दाखवण्यासाठी त्यांनी रंगानुसार कलाकार नाही निवडले, तर ते ज्या रंगाचे पात्र आहेत त्या रंगाचा चष्मा त्यांच्या चेहऱ्यावर काढला होता. तुमचा दृष्टिकोनही तुमच्या रंगातून ठरत असतो असा एक आणखी विचार त्यातून व्यक्त झाला.

तू आता पुण्यातून मुंबईला गेली आहेस. नाटकवाल्या माणसाला मुंबईत दोन प्रकारचे अनुभव येतात - एक म्हणजे मोठी व्यावसायिक नाटकं आणि दुसरं म्हणजे प्रायोगिक नाट्य चळवळी. मुंबईत वेगवेगळ्या भाषांसाठी राष्ट्रीय स्तरावरच्या वेगवेगळ्या नाट्यचळवळी आहेत. त्यात तू कशी सहभागी होतेस?
‘आजीबाई जोरात’ नावाचं एक व्यावसायिक ‘महाबालनाट्य आहे’ त्याची सहदिग्दर्शक म्हणून मी काम केलं आणि मला कळलं की मराठी नाटकाचंसुद्धा काम किती ग्रँड पद्धतीने होऊ शकतं, त्याची आर्थिक गणितं लक्षात आली.
मुंबईत मी अजून नाटक केलेलं नाही पण मी खूप नाटकं बघते. इथली पद्धत वेगळी आहे. शहर बदललं की नाटक पण बदलतं हे प्रकर्षाने जाणवलं.

उदाहरणार्थ, आम्ही विपाशाचे प्रयोग जेव्हा पुण्यात करायचो तेव्हा लोकांना ते प्रचंड आवडायचं. थोडी जड आलंकारिक भाषा असली तरी ती समजायला अडचण आली नव्हती पण आम्ही ते मुंबईला केलं किंवा शासनाचा महाराष्ट्र दौरा पण केला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण खूप मर्यादित प्रेक्षक वर्ग डोक्यासमोर ठेवून, त्यांना आपण सांगतोय ते संदर्भ, ती प्रतीकं समजणार आहेत हे गृहीत धरून नाटक करतोय. इचलकरंजीला लोकांना जे भावलं ते पुण्यातल्या लोकांनी खिजगणतीतही घेतलं नव्हतं. मुंबईत प्रेक्षकांना प्रकाशयोजना, भव्यता या गोष्टींचं आकर्षण वाटलं होतं. एकच नाटक वेगवेगळ्या ठिकाणचे प्रेक्षक कसे बघतात हा खूप वेगळा अनुभव मी घेतला होता.

त्यामुळे आता मी त्या दृष्टीनेही नाटकं पाहते. हे नाटक पुण्यात झालं तर लोक काय बघतील? मुंबईत काय आवडतं? कुठे हशा येतोय, कशाचं कौतुक होतं, कशावर टीका होते, मांडणीच्या पद्धतीतलं कुठे काय भावेल, हे समजून घेते. मुंबईत हिंदी आणि इंग्रजी नाटकं खूप बघितली जातात. त्यात कलाकार अधिक मोकळेपणाने शरीराचा वापर करतात, रंगमंचीय अवकाश ते खूप वेगळ्या प्रकारे वापरतात. पुण्यात अजूनही शब्दप्रधान मराठी नाटकाला अधिक वाव आहे. 

तू पाहिलेल्या काही प्रभावी नाटकांविषयी सांग. 
रोनाल्ड हारवूड या लेखकाचं अतुल कुमार यांनी दिग्दर्शित केलेलं ‘टेकिंग साईड्स’ नावाचं नाटक आहे. हिटलर चा पाडाव झाल्यानंतर अमेरिकेने जर्मनीतून नाझी विचारांच्या समर्थकांना हद्दपार करण्यासाठी कारवाई केली. अनेक लोकांवर खटले चालवले. जर्मन संगीत दिग्दर्शक (आणि कथित नाझी समर्थक) विल्हेल्म फुर्टवँगलर यांच्यावरही खटला भरला होता. त्यांचा हिटलरला विरोध होता, त्यांनी ज्यूंना छुपी मदतही केली होती. पण उत्तम सर्जनशील काम जर्मनीत करायला मिळत होतं म्हणून ते शेवटपर्यंत तिथेच राहिले. या कथानकाच्या माध्यमातून कला आणि राजकारण वेगळे आहेत का, असावेत का, कलाकारांनी राजकीय भूमिका घ्यावी की नाही अशा प्रश्नांवर दोन्ही बाजूंनी लॉजिकल चर्चा होते. मला अशा गोष्टी खूप आवडतात ज्या ऐतिहासिक किंवा काल्पनिक कथेतून खरंतर आजच्या परिस्थितीवर बोलता. ते एक विशेष लेखनचातुर्य आहे. ते या नाटकात दिसतं.

उच्छाद नावाचं एक मराठी नाटक मला आवडलं. यास्मिना रेझा यांच्या गॉड ऑफ कार्नेज या प्रसिद्ध फ्रेंच नाटकाचं ते मराठी रूपांतर आहे. यात दोन मुलांचं भांडण सोडवण्यासाठी त्यांचे पालक एकमेकांना भेटतात. खेळीमेळीत सुरू झालेलं बोलणं हळूहळू भांडणात परिवर्तित होतं. लिंग, जात आणि वर्ग याबाबतचे पूर्वग्रह डोकं वर काढतात, शिष्टाचाराचे मुखवटे फाटतात. आपल्यासारखीच माणसं हिंसेच्या किती आदिम पातळीवर जाऊ शकतात हे दिसतं.

शहरी वातावरणाच्या गुंतागुंती सांगणाऱ्या गोष्टी मराठी नाटकात तितक्या निर्भीडपणे पुढे येत नाहीत, त्याच्याबाबतचा काही कॅथारसिस किंवा रिलीफ शोधायचा असेल तर इंग्लिशकडे जावं लागतं. उच्छादच्या रूपात खूप दिवसांनी मी खूप उघडपणे शहरी असलेलं मराठी नाटक पाहिलं.

नाटकाव्यतिरिक्त तू काही प्रमाणात कविताही लिहितेस. जाहिरातींसाठी लेखन करतेस, टीव्ही मालिकेसाठी लेखन केलं आहेस आणि मुख्य म्हणजे बालसाहित्याची निर्मिती करतेस. त्याविषयी आम्हाला सांग. 
मला असं वाटतं की तुम्हाला लिहायला सुचलं तर तुम्हाला त्यासोबतच त्याचं माध्यमही सुचतं आणि माझी सहजप्रवृत्ती ‘पात्र कोण असतील, ती काय बोलतील’ अशा संवाद स्वरूपातच सुचण्याची आहे. इतर माध्यमं त्या मानाने कमी हाताळली जातात, कॅफेपासची मुलगी ही माझी एक कविता प्रसिद्ध झाली आहे. त्यातही एक अल्पवयीन बलात्कारित मुलगी भणंग अवस्थेत एका कॅफेबाहेर बसलेली आहे, आणि तिच्याबाबत घडलेल्या अत्याचाराच्या बातमीचे पडसाद भावशून्य होऊन कॅफेमधल्या तरुणांच्या चर्चेत ऐकते आहे. असं वर्णन आहे. वातावरणनिर्मिती, संवाद हे आलंच आहे.

जाहिरातीसाठी लेखनाचं काम पूर्णवेळ व्यवसाय म्हणून मी दोन वर्षं करत होते आणि अजूनही फ्रीलान्स पद्धतीने करते. जाहिरातीचा प्रेक्षक नाटकापेक्षा खूप जास्त आणि ज्याचा अंदाज घेणं काठिण आहे असा असतो. ब्रॅंडला त्यांची लोकप्रियता टिकवायची असते, व्यवसाय वाढवायचा असतो त्यामुळे खूप धाडसी सामाजिक परिवर्तनाचे संदेश देऊन प्रयोग करायला ते तयार नसतात. कारण त्यांना लोकांचा विरोध परवडण्यासारखा नसतो. जाहिरातीतून त्यांच्या प्रॉडक्टची प्रतिमा घडत असते. असं आर्थिक भान आणि लोकांच्या श्रद्धा आणि भावनांना कमी लेखून चालणार नाही याचं भान मला या क्षेत्रात आलं. 

खूप धाडसी नाही, पण थोडा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न चालू ठेवला. चितळे बंधू या मिठाईच्या ब्रॅंडसाठी आम्ही छोटी एक जाहिरात केली होती गणेशोत्सवात. त्यात एक आई मुलाला उकडीचे मोदक शिकवत असते आणि लग्नानंतर सासरी पण तुझ्या मोदकांचं कौतुक झालं पाहिजे असं संगत असते. मोठ्या ब्रँडच्या माध्यमातून तुम्ही थोडासा विचार बदलू शकता आणि ते करायला मजा येते. चितळेंसाठी मी अनेक जाहिराती लिहिल्या आहेत. मदर्स डे ला आईवर महानपणा आणि त्यागाचं ओझं लादण्यापेक्षा तिला माणूस म्हणून चिडणे, रडणे, चुकणे, अशा गोष्टींची मुभा देऊया अशा आशयाची, किंवा मराठी भाषा गौरव दिनाला मराठी बोली भाषांचा सन्मान करण्याची इत्यादी.

एकदा सह्याद्री हॉस्पिटल्सची जाहिरात म्हणून त्यांनी सकाळमध्ये रोज एक याप्रमाणे आरोग्यविषयक सल्ला देणारे 365 अभंग प्रसिद्ध केले होते. ते मी लिहिले होते. नंतर पुढच्या वर्षी त्याचं पुस्तक करून पुण्यात जेव्हा आषाढी वारीचा मुक्काम होता तेव्हा ते पुस्तक सह्याद्रीने वारकऱ्यांना वाटलं. अशी काही दीर्घकालीन कॅम्पेन सुद्धा केली आहेत. 

'सारं काही तिच्यासाठी' नावाच्या मालिकेच्या 160 एपिसोडसाठी मी पटकथा लेखनासाठी साहाय्यक होते. तिथे मी माझ्या वैचारिक भूमिकेपेक्षा खूप वेगळं काम केलं. मला काय म्हणायचं आहे यापेक्षा प्रेक्षक काय बघणार आहेत, काय पाहून ते आजचा एपिसोड बघतील आणि उत्सुकतेने परत उद्याही टीव्ही लावतील यासाठी प्रत्येक प्रसंग शक्य तितक्या नाट्यमय पद्धतीने लिहायचा असतो. हे असंही मला सुचू शकतं असं मला वाटलंच नव्हतं.

बालसाहित्याबद्दल सांगायचं तर माझं हे काम मला खूप महत्त्वाचं वाटतं. आपल्या मागच्या पिढ्यांनी जे लिहून ठेवलं, त्यामुळे आपल्याला लहानपणी सकस साहित्य वाचायला मिळालं. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी तसा ठेवा तयार करणं ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं. मला लहानपणीची मी पण थोडी थोडी आठवते की तेव्हा मला काय वाटायचं किंवा मला काय प्रश्न पडायचे आणि त्या आधारे मी गोष्टी लिहिते. स्टोरीटेलसाठी अशा 37 गोष्टी मी लिहिल्या आणि त्या ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहेत. स्टोरीटेलने गोष्टींची चार यूनिवर्स करून ठेवली आहेत. एकेका यूनिवर्सची पात्रं ठरलेली असतात, आणि तीच पात्रं वापरुन नवनव्या कथा वेगवेगळे लेखक लिहितात. सुरुवातीला ते मला मूल दत्तक घेतलयसारखं वाटलं. आता ती सगळी पात्रं माझीच झाली आहेत. 

‘महाराजांचा मावळा’ नावाची गोष्ट आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगचं महत्व लहान मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे असं त्याचं ब्रिफ होतं. पॉझिटिव्ह थिंकिंग हा विषय लहान मुलांना रंजकपणे सांगणं खूप अवघड होतं. मी लहानपणीच्या आठवणींचा उपयोग करून घेतला, आणि गोष्ट लिहिली. सई नावाच्या एका मुलीला शाळेतल्या नाटकात शिवाजी महराजांच्या तिसऱ्या मावळ्याची भूमिका मिळते. आपल्याला बिनमहत्त्वाची भूमिका मिळाली याने तिला वाई वाटते. ती नकारात्मक विचार करायला लागते. तिला विनाकारण असं वाटायला लागतं की लोक आपल्याकडे बघूनच हसतात, आपल्याला कमी समजतात वगैरे. शिक्षक पालक तिला हळूहळू त्यातून बाहेर पडायला मदत करतात. सकारात्मक विचार करायला शिकवतात अशी गोष्ट. अशा रियलिस्टिक रियलिजमच्या आणि जादुई फॅन्टसीच्या गोष्टी मला लिहून बघता आल्या. मी लिहिलेली ‘नावात काय आहे’ आणि ‘टेबलाखालचं जग’ ही दोन लहान मुलांसाठीची पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत.

मला एक कळलं आहे की लहान मुलांसाठी जर तुम्ही मनापासून लिहिलं आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळाला तर मुलांनाही मिळतो.

अभिवाचनाच्या कार्यक्रमांतून कोणते विषय मांडले आहेस?
आम्ही एक कार्यक्रम करायचो ‘ती’च्या गोष्टी’ नावाचा. स्त्रीवाद विकसित होत गेला तसे त्याचे पडसाद साहित्यातून उमटत गेले ते लोकांपुढे आणण्यासाठी साहित्यातल्या स्त्री व्यक्तिरेखांचा प्रवास कालखंडानुसार आम्ही मांडतो. 

आठवणीतील पत्रं असा एक कार्यक्रम आहे. पत्र लिहिणं, वाचणं त्यातला संवाद हे मला खूप आवडतं. त्यातून खूप खरा माणूस कळतो. या कार्यक्रमात काही मजेशीर, काही वर्णनात्मक, काही भावनिक अशी अनेक पत्रं आम्ही वाचतो. तो “फील गुड” प्रकारचा कार्यक्रम आहे.

तुझ्या लेखनावर कोणकोणत्या विचारसरणीचा प्रभाव आहे? 
कोणत्याही विचारसरणीचा गाभा मला पूर्णपणे एवढा कळलेला नाही की मी हा माझा “ism” आहे असं मानावं. पण मी निश्चित स्त्रीवादी आहे आणि आपली जी संविधानिक मूल्यं आहेत समता बंधुता त्यांच्याकडेच अंतिमतः जाणारं मी लिहिते. हिंसा, कट्टर धार्मिकता, असहिष्णुता, शोषक वृत्ती यांचं चित्रण वातावरण निर्मितीसाठी मी करते. पण त्यातून शेवटी मी ज्या लोकशाहीच्या आणि समानतेच्या मुद्द्यांवर विश्वास ठेवते त्यांचीच मांडणी करते.

लोकांनी मुक्ताला काय म्हणून ओळखावं असं तुला वाटतं?
लोकांनी मला लिहिणारी मुलगी किंवा व्यक्त होणारी मुलगी म्हणून ओळखलेलं आवडेल.

आम्हा तरुणांना सतत असं विचारतात सध्या नवीन काय चालू आहे? पण अशा साठ वर्षाच्या बाईला हा प्रश्न विचारला जात नाही. तिचं रूटीन चालू असणार, दुसरं काय असं गृहीत धरतात. मला मात्र आवडेल सतत नवं काहीतरी करत राहायला जेणेकरून साठीच्या वयातही मला हा प्रश्न विचारला जाईल.

प्रश्न विचारणे, व्यक्त होणे आणि लिहिणे या तीन गोष्टी कायम करत राहायच्या आहेत, एवढं नक्की ठरलेलं आहे. लिहीत राहण्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधून जोपर्यंत मला माझ्या मनातली गोष्ट सांगता येईल तोपर्यंत मी समाधानी असेन.

धन्यवाद मुक्ता. तुझं प्रगल्भ काम समजून घेणं हा खूप आनंददायक अनुभव होता. तुला लिहिण्याच्या नव्या वाट सापडत राहोत, आणि लेखणी बहरत राहो , हीच शुभेच्छा!
 

संवाद आणि शब्दांकन - ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com

Tags: mukta bam writer director drama Load More Tags

Comments: Show All Comments

Prasad Narayanrao Deshpande

व्वा मुक्ता छान व्यक्त झाली आहेस... तुझे हार्दिक अभिनंदन आणि भावी कार्यासाठी मनापासून शुभेच्छा... तुझ्या व्यक्त होण्याने समाजातील दबलेल्या माता भगिनींना व्यक्त होण्याची प्रेरणा मिळावी ही अपेक्षा... प्रसाद देशपांडे, प्रकल्प सहयोगी, सेवावर्धिनी, पुणे.

Anuradha Shripad Kulkarni

मुक्ता, तुझं खूप कौतुक.तुझी मुलाखत वाचताना तुझी वैचारिक जडणघडण लक्षात येतेय.किती वेगवेगळ्या अंगांनी विचार केलाय..लिखाणाची,विषयाची विविधता ,त्यातून तुझी प्रगल्भता लख्ख जाणवते. तुला खूप खूप शुभेच्छा.

मानसी गदो

लहान वयातही असलेली विचारांची स्पष्टता, ध्यास घेऊन काम करणं, प्रयोगशीलता, अभ्यासू वृत्ती हे सगळं कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच मुक्ताच्या लेखणीला एक तेज आहे.

Vikas Deshmukh

खूप छान व एकदम मोकळेपणाने दिलेली मुलाखत. मुक्ताला खूप खूप शुभेच्छा !

राजश्री बाम

मुक्ता, खेळ,विपाशा, ऑस्कर,रंग, यात्रा --अशा विविध विषयांवरील नाटकं/ एकांकिका लिहितांना तू करत असलेला विचार, त्यासाठी वाचलेली पुस्तके यामुळे लेखना मागची विचार प्रक्रिया लक्षात आली.खास यात्रा संदर्भात --वारांगनांचा जीवनप्रवास, त्यांना ज्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते त्यांचे स्वरूप --हे सर्व त्या वस्तीत जाऊन त्या सर्वांना प्रत्यक्ष भेटून,बोलून अनुभव घेऊन लेखणी द्वारे जी "यात्रा " घडवलीस, ते फारच विशेष आहे.

Radhika Prabhudesai

खूपच सुंदर. तिच्या लेखनावर तिच्या आईबाबांबरोबर आजीचा ही प्रभाव मला जाणवतो. मुक्ता खूप यशस्वी हो. खूप खूप शुभाशीर्वाद.

भाग्यश्री आठवले

मस्त. तुझ्या आत्तापर्यंतच्या जवळजवळ सगळ्या लेखन प्रवासाला कवेत घेणारी, आणि त्या कलाकृतींच्या मागचा विचार, धडपड सामोरी आणणारी एक परिपूर्ण मुलाखत आहे ही.

Vidya Bam

मुक्ताची मी आजी असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे.तिच्या लहानपणापासून म्हणजे सातवी पासून स्वतः लेखन, दिग्दर्शन हे मी पाहिलेलं आहे.वाचनाची प्रचंड आवड तिला आहे. या मुलाखतीत सगळं आलेलंच आहे. तिला असेच यश मिळत राहो हीच सदिच्छा.

Vidya Bam

खूप छान

Ashwini Marathe

मुक्ता, खूप छान मुलाखत! 'यात्रा' पाहिलं होतं, खूप आवडलं.. आज ह्या मुलाखतीतून तुझं लेखन, त्याची व्याप्ती, तुझी वैचारिक बैठक आणि तुझ्या लेखनासाठी तू घेत असलेले कष्ट कळले. तुला सतत नवं काहीतरी करायला मिळो. मनःपूर्वक शुभेच्छा!

Ritesh Inamdar

मस्त. खूपच छान मुक्ता. तुझ्या लेखन प्रवासाची एक परिपूर्ण मुलाखत!!!

Add Comment