दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कॉलेजला जाताना सकाळी सकाळी मोह फुले वेचणाऱ्या बायका दिसायच्या. आता लॉकडाऊनमुळे घरी असल्यामुळे हे दृश्य काही बघायला मिळाले नाही. पण दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात अनेकवेळा मला या मोहांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. आणि मग हेमलकशातील मोह वेचण्याचे ते दिवसही आठवायला लागतात.
माझे लहानपण हेमलकशाला गेले. मोह फुलांनाच त्या भागात मोह म्हणण्याचा प्रघात आहे. हेमलकशातील अनेकजण म्हणजे कर्मचारी वर्ग, लेप्रसी पेशंट्स वगैरे आपल्या कामाच्या वेळा सांभाळून मोह वेचत. आम्ही मुलंही मोह वेचायला जात असू. हेमलकशातील प्राण्यांना, गुरांना चारा नसताना पूरक खाद्य म्हणून मोह उपयोगी पडते. त्यासाठी लोकांकडून मोह विकत घेऊन ते प्रकल्पावर साठवून ठेवले जाई.
ही मोहफुले दिसायला फारच गोड. इतर फुलांसारख्या याच्या पाकळ्या विलग नसतात. फिकट पिवळा रंग किंवा हिरवा आणि पिवळा मिळून जो रंग होतो तसा मोहफुलांचा रंग असतो. फुलांना थोडा उग्र वासही असतो. काही फुलं गोल, काही निमुळती तर काही छान टपोरी असतात. त्यांच्यातील रसामुळे ती वेचताना हात ओला चिकट होऊन जातो.
गाईगुरांचे, जंगलातील अनेक प्राण्यांचे आणि मुख्य म्हणजे अस्वलांचे हे अत्यंत आवडते खाद्य. माडिया गोंड आदिवासींच्या आहारातही मोहांचा वापर होतो. काही लोक मोहांचे पुरणही घालतात. या मोहांपासून दारुही काढली जाते. गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत मोहांची झाडे मोठया प्रमाणात आहे. आदिवासी कधीच मोहांची झाडे तोडत नाही, कारण आदिवासी संस्कृती या मोहांच्या झाडाशी जोडलेली आहे. मोहांची फुले आणि फळे दोन्ही उपयोगात येतात. फुलांपासून पावसाळ्यात खाद्यपदार्थ तयार होतात, तर मोहांच्या फळापासून-ज्याला टोळ म्हणतात- तेल काढले जाते. अनेक आदिवासी स्वयंपाकासाठी हेच तेल वापरतात.
साधारणतः होळी नंतरचा सिझन हा मोहफुलांचा असतो. मार्च-एप्रिल महिन्यात मोह वेचण्याचे काम चालते. पहाटे-पहाटे मोह पडायला सुरुवात होते. मोहांच्या झाडाला खालच्या दिशेने लोंबणाऱ्या गुच्छात अंदाजे 8 ते 10 फुले असतात. सर्व झाडे या सिझनमध्ये अशा गुच्छांनी लदलेले असतात. ही फुले सकाळीच वेचावी लागतात, कारण नंतर ती जंगलातले प्राणी, गाई म्हशी खाऊन टाकतात. आदिवासींच्या आयुष्यातील मोहांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या शेतातील झाडांना मात्र कोणी हात लावत नाही.
मोह वेचण्याच्या या सिझनमध्ये झाडे पकडण्याची आमची खूप मजेदार स्पर्धा चालायची. म्हणजे मोह पडायला सुरुवात होण्याच्या आधी त्या झाडाखालची वाळलेली पाने गोळा करून ती जाळली जायची, त्यामुळे जागाही स्वच्छ होई व मोह वेचणे सोपे जाई. ज्यांनी ही जागा स्वच्छ केली, मग ते झाड त्याचे, असे गणित असे.अशी पाच-सात झाडे पकडली जायची, आणि मग तिथलाच मोह वेचायचा. 'हा मोह खूप पडतो, तो बांधावरचा जरा उशीराच पडतो, यावर्षी बोडीजवळचा (तलाव) मोह कमीच पडला', अशी कौतुके, तक्रारी आपापल्या झाडांविषयी केल्या जायच्या. ही सगळी झाडे प्रामुख्याने हेमलकशाला लागून असलेल्या जंगलाजवळची असत. आत जंगलात फारसे कोणी जात नसत, अपवाद आमचा लखन पंडित हा मेसमधील आचारी. हा पंडित सगळ्यात जास्त मोह वेचायचा. भल्या पहाटे उठून तो मोह वेचायला जायचा आणि एकावर एक अशा तीन टोपल्या डोक्यावर आणि एक खांद्यावर अशा रुपात परत यायचा. कोणी सर्वांत जास्त मोह वेचले यावर मग सगळ्यांची चर्चा चालायची.
मेस मध्ये काम करणाऱ्या लहानूबाईची मुलगी लता हिच्यासोबत मी मोह वेचायला जायचे. मला स्वतःला मोह वेचायला फार आवडायचे. त्यासाठी भल्या पहाटे उठायचा अजिबात कंटाळा यायचा नाही. एक दोन मोठ्या टोपल्या, मोह वेचून मोठ्या टोपलीत टाकण्यासाठी छोटी टोपली, सोबत पाण्याची बाटली, चुंबळ करण्यासाठी एखाद फडकं,असा सगळा लवाजमा घेऊन आम्ही पकडलेल्या झाडांपाशी जायचो. मोठी टोपली भरली की ती वर झाडाच्या बुंध्यात ठेवायचो.
मी फक्त प्राण्यांसाठी म्हणून थोडे मोह वेचायचे, आणि मग लताला मदत करायचे. घरी आल्यावर आम्ही ते मोह छान सारवलेल्या अंगणात वाळत घालायचो. हेमलकशाच्या आमच्या अंगणात खूप मोगऱ्याची झाडे होती. मोगऱ्याचा आणि मोहांचा मस्त वास मग दरवळत राहायचा. ही मोहफुले चांगली तीन चार दिवस वाळवावी लागत. सगळ्यांच्या अंगणात तेव्हा हेच चित्र दिसायचं. चांगली वाळली की ती पोत्यात भरून ठेवायची. त्यावेळेस दोन रुपये किलोप्रमाणे त्याचे पैसे मिळायचे. आता हा दर वीस पंचवीस रुपये झाला आहे. मोह विकताना खूप गंमत यायची. कोणी किती किलो वेचले, कोणाला किती पैसे मिळाले, या पैशांतून काय घेणार यांवर मस्त चर्चा रंगायची. हेमलकशाला मानधनावर काम चालते, त्यामुळे अनेकांना या पैशाचा उपयोग होत असे. अर्थात पैसाच महत्वाचा होता असे नाही. पण कोणी सर्वांत जास्त मोह वेचले या चढाओढीत एक गंमत असे. आजही कुठे मोह पडलेले दिसले की माझ्या हातून ती उचलीच जातात आणि लहानपणी अनुभवलेला तो सुगंध परत त्या दिवसात घेऊन जातो.
या मोह वेचण्यातून मस्त व्यायामही व्हायचा. चांगली सडकून भूक पण लागायची. मग मेस मध्ये असलेला कुठलाही नाश्ता आवडीने खाल्ला जायचा. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यावर बोअर होत म्हणण्याची वेळही यायची नाही. सध्याच्या वेगवेगळ्या उन्हाळी क्लासेसच्या जत्रेत ,वेगवेगळ्या स्पर्धांच्या रस्सीखेचात ही मोह वेचण्याची स्पर्धा मात्र वेगळाच आनंद द्यायची हे मात्र तितकेच खरे...
- मोक्षदा मनोहर - नाईक
mokshadamanohar77@gmail.com
(लेखिका, आनंद निकेतन कॉलेज, आनंदवन जिल्हा चंद्रपूर येथे मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.)
Tags:Load More Tags
Add Comment