समाजातील दुःख, दैन्य, दारिद्रय, उच्च-नीचता, जातिधर्मांतील भेदाभेद व ढोंगीपणा यामुळे गुरुजींचे अंतःकरण पिळवटून निघत असे. त्यापोटीच अस्पृश्यता निवारणाचे अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. आदर्शवादाचे ध्येय उराशी बाळगून निःस्वार्थीपणाने त्यांनी केलेले कार्य आजच्या भ्रष्टाचरणी समाजातील नव्या पिढीला अवगत करून देण्याचे काम 'बलसागर भारत होवो' या प्रयोगातून होते आहे.
'बलसागर भारत होवो' हा खरं तर हा दृक्श्राव्य अभिवाचनाचा प्रयोग. आशयपुंजी साने गुरुजींचा जीवनपट. 'साने गुरुजी म्हणजे मातृहृदयी माणूस' ही प्रतिमा महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या मनामनांत ठसलेली आहे. मुलांसाठी गुरुजींनी लिहिलेले संस्कारक्षम बालसाहित्य आणि गुरुजींचे कार्य माहीत नाही, असा मराठी माणूस विरळाच. मुलांमध्ये रमणारे, त्यांना शिकवणारे, गोष्टी सांगणारे, संवेदनशील, कविमनाचे साने गुरुजी.. त्यांच्या जीवनात अशा काही नाट्यमय गोष्टी घडल्या आहेत की, ज्यातून गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचे निराळे पैलू दिसतात. अशा पैलूंचा शोध घेऊन त्यांचे केलेले सादरीकरण म्हणजे, 'बलसागर भारत होवो' हा दृक्श्राव्य अभिवाचनाचा प्रयोग होय. याचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच (28 मार्च रोजी) पुण्यात 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या मुख्य थिएटरमध्ये झाल्या. हा प्रयोग पाहण्यासाठी मी आवर्जून गेलो होतो.
संहिता लेखन करताना डॉ. माधवी वैद्य यांनी साने गुरुजींच्या संपूर्ण साहित्याचा धांडोळा घेऊन, गुरुजींच्या जीवनातील संघर्षमय प्रसंगांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयोगाची संहिता डॉ. वैदय यांची असली, तरी यातील शब्दन् शब्द साने गुरुजींचा आहे. त्यातून गुरुजींच्या संवेदनशील मनाचे अनेक हळुवार कंगोरे दाखवण्याबरोबरच त्यांच्यातल्या योद्ध्याचे लढाऊपण, कठोर निर्णय घेणारी निश्चयी वृत्ती ठळकपणे अधोरेखित करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. साने गुरुजींच्या संघर्षलढ्यातील करारीपणा व ठामपणा प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणारे अभिवाचक धीरज जोशी, सानिका आपटे, ओंकार गोवर्धन यांचेही विशेष कौतुक केले पाहिजे; कारण गुरुजींच्या संघर्षयात्रेतील अनेक पात्रांचा संवाद या तिघांच्या तोंडून ऐकताना ती ती पात्रे हुबेहूब डोळ्यांसमोर उभी राहतात.
साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणी जागवणाऱ्या प्रसंगांतील संवाद ऐकताना प्रेक्षक 'श्याम'च्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप होऊन जातात ते गुरुजींच्या जीवनातील अखेरच्या प्रसंगापर्यंत जोडलेलेच राहतात. गुरुजींच्या बालपणाबरोबरच काही कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय प्रसंग उभे करताना अभिवाचनाला दृश्यांची समर्पक जोड दिल्यामुळे साने गुरुजींनी जगलेला काळही मनःपटलावर पुढे सरकत जातो.
साने गुरुजींच्या प्रत्येक कृतीतून त्यांच्यातील ध्येयवादी तत्त्वचिंतक दिसतो, त्यांच्यातील निःस्वार्थीपणा आणि परोपकारप्रियता याही गुणांची पदोपदी प्रतिती येते. धुळे येथील गिरणीकामगार युनियनच्या टाळेबंदी विरोधातील आंदोलनप्रसंगी जलसमाधीची घोषणा, अंमळनेर गिरणी कामगारांच्या पगारवाढीसाठी केलेले आंदोलन, पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी केलेले उपोषण यातून साने गुरुजींमधील लढाऊपणा दिसतो.
समाजातील दुःख, दैन्य, दारिद्रय, उच्च-नीचता, जातिधर्मांतील भेदाभेद व ढोंगीपणा यामुळे गुरुजींचे अंतःकरण पिळवटून निघत असे, यामुळेच अस्पृश्यता निवारणाचे अनेक कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. आदर्शवादाचे ध्येय उराशी बाळगून निःस्वार्थीपणाने त्यांनी केलेले कार्य आजच्या भ्रष्टाचरणी समाजातील नव्या पिढीला अवगत करून देण्याचे काम 'बलसागर भारत होवो' या प्रयोगातून होते आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळण्यासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये गुरुजींच्या संवेदनशील मनाला सर्वात जास्त वेदना झाल्या. या कामी महात्मा गांधीजींनी पाठिंबा दयावा, असे गुरुजींना वाटत होते. तशा आशयाचे पत्रही त्यांनी गांधीजींना लिहिले होते. पण गांधीजींनी पाठिंबा देण्याऐवजी उपोषण थांबवण्याचा सल्ला दिला. गांधीजींना आदर्श मानून चालणारे सानेगुरुजी तितकेच दृढनिश्चयी होते. त्यांनी उपोषण तसेच पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. अखेर गुरुजींच्या लढ्याला यश मिळाले. देश स्वतंत्र व्हावा, यासाठी गांधीजींनी पुकारलेल्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन गुरुजींनी अनेकदा तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती, परंतु देश स्वतंत्र होण्याआधीच या पांडुरंगाने पंढरपूरच्या पांडुरंगाला जातिभेदाच्या अमंगळ कलंकापासून मुक्त केले. गांधीजींची हत्या झाली, तेव्हा गुरुजींचे मन व्यथित झाले. प्रायश्चित्त म्हणून त्यांनी 29 दिवस उपोषण केले. गांधीजींच्या विचारसरणीचे अनुसरण करत त्यांनी ग्रामस्वच्छता, मैला वाहणे यासारखी अनेक सामाजिक कामे निःस्वार्थी भावनेने केली. परंतु साने गुरूजी त्यांच्या उत्तरायुष्यात अनेक कारणांमुळे नैराश्याने ग्रासले होते. सामाजिक जीवनात आपण पूर्णतः अयशस्वी झालो आहोत, अशी त्यांची भावना झाली होती. आपली आदर्शवादी ध्येये, विचार, तत्त्वे यांचा व्यक्तिगत आणि सार्वत्रिक जीवनात त्यांना मेळ बसेना. एकटेपणाची भावना वाढत गेली. त्यातच झोपेच्या गोळ्या खाऊन त्यांनी चिरनिद्रा घेतली. प्रयोगातली ही अखेरची घटना श्रोत्यांच्या मनाला चटका लावून जाते.
साने गुरुजींचे एकूण जीवनकार्य महान आहे. राजकीय व सामाजिक जीवनातील विविध आंदोलने, राष्ट्र सेवा दल, आंतरभारती यांची स्थापना, साधना साप्ताहिक आणि अन्य विविध प्रकारची कामे हे सारे या छोट्या संहितेत मांडणे केवळ अशक्य आहे, तरीही 'बलसागर भारत होवो' या प्रयोगात दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दृक्श्राव्य संकलनातून गुरुजींचा संपूर्ण जीवनपट साकारण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र साठे, नंदेश उमप आणि सानिका आपटे यांनी गायलेली श्रवणीय गाणी समर्पक ठिकाणी योजली आहेत. 'प्रयास फाऊंडेशन'चे संचालक राजेंद्र सुराणा आणि 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांच्या सहयोगाने 'बलसागर भारत होवो' या समृद्ध नाट्यानुभव देणाऱ्या अभिवाचनाचे असंख्य प्रयोग पुढील काळात होत राहावेत. प्रेक्षकांकडून या प्रयोगाला भरभरून प्रतिसाद मिळत राहील, अशी मला खात्री वाटते.
आजच्या भ्रष्ट राजकीय गढूळ वातावरणात आणि नीतिमूल्यांची घसरण होत असलेल्या समाजात सानेगुरुजींच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या, उगवत्या पिढीसाठी दिशादर्शक ठरणाऱ्या अशा प्रयोगाची नितांत गरज आहे. समयोचित संहिता लिहून अभिवाचनाचा हा अभिनव प्रयोग पुढे आणल्याबद्दल डॉ. माधवी वैदय आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे कौतुक आणि अभिनंदन!
- माधव राजगुरु
(लेखक, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष आहेत.)
Tags: साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने नाटक अभिवाचन माधवी वैद्य शेखर नाईक Load More Tags
Add Comment