विनोद समजण्यासाठीही 'पाहिजे जातीचे'! 

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या विरोधानंतर विजय तेंडूलकरांच्या नाटकाचा हिंदी प्रयोग नुकताच रद्द करण्यात आला. त्यानिमित्ताने...

‘पाहिजे जातीचे’ या नाटकाचा पहिला प्रयोग 12 नोव्हेंबर 1976 रोजी दादरच्या छबीलदास नाट्यगृहात झाला. म्हणजे हे नाटक पंचेचाळीस वर्षांपूर्वीचे आहे. विजय तेंडुलकर हे मराठीतले अभिमानास्पद नाटककार, पण त्यांना तसं म्हणणं हे फार संकुचितपणाचं ठरेल. त्यांच्या नाटकांचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत आणि त्यांचे प्रयोगही झाले आहेत. बंगालमधल्या लोकांना तेंडुलकर हे ‘आपलेच’ नाटककार वाटतात. तसे हिंदी भाषेतल्या रंगकर्मींनाही तेंडुलकर ‘आपले’च वाटतात. हे वास्तव लक्षात घेता तेंडुलकर हे नाटकाकार वा साहित्यिक म्हणून भारतीय पातळीवरचे आहेत ही मराठी माणसाच्या दृष्टीने विशेष अभिमानाची गोष्ट मानता येईल.

माणसाच्या मनात दडून असलेली हिंसा प्रसंगी किती विद्रूप आणि भयानक असते याचा आरसाच तेंडुलकरांनी प्रेक्षकांसमोर धरला. नटूनथटून, शालूशेले आणि गजरे घालून नाटकाला जाणाऱ्या मध्यमवर्गीयांना तेंडुलकरांनी त्यांचे भयानक रूप दाखवले. साऱ्यांनाच हे आवडलं असं नाही, पण तेंडुलकरांच्या नाटकांनी जीवनाची ही हिंसक बाजू समोर आणली. ज्यांना त्यांच्या नाटकांमुळे आपल्याच शेपटीवर पाय पडलेला (वा दिलेला) आहे हे लक्षात आले त्यांनी त्यांच्या नाटकांना विरोध केला. झुंडीनं येऊन, दहशत पसरवून, आरडाओरडा करून नाटकांचे प्रयोग बंद पाडण्याचाही प्रयत्न झाला. प्रामुख्याने ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाइंडर’ या नाटकांना फार मोठा लढा द्यावा लागला. ‘सखाराम’चे निर्माते कमलाकर सारंग यांना कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या.

‘घाशीराम’चा परदेश दौरा होऊ नये यासाठी संस्कृती रक्षणाचा मक्ता स्वतःच्या शिरावर घेतलेल्या लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ‘घाशीराम’मुळे चुकीचा इतिहास लोकांसमोर जाईल असा विरोधकांचा दावा होता. असा विरोध करणाऱ्यांमध्ये मराठीतले नामवंत साहित्यिक होते, वृत्तपत्र संपादक होते, राजकारणी तर होतेच होते. नंतर पुढे राजकारणात मोठे झालेले तेव्हा ‘सखाराम बाइंडर’च्या रंगमंचावर धुडगूस घालण्यात आणि रंगमंचावरचे फुटलाइट्‌स बुटाने फोडण्यात कसे आघाडीवर होते याची आठवण सखारामची भूमिका करणारे प्रख्यात अभिनेते निळूभाऊ (फुले) यांच्या तोंडून मी ऐकलेली आहे. 

‘कन्यादान’ नाटकात दलित समाजाचं चुकीचं चित्रण केलेलं आहे म्हणूनही तेंडुलकरांवर टीका झालेली आहे. थोडक्यात तेंडुलकरांच्या ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ या नाटकानंतरच्या प्रत्येक नाटकानं काही ना काही तरी वाद समाजात निर्माण झालेला आहे. असे वाद निर्माण होणं हे समाज जिवंत असल्याचं लक्षण असतं, हे जरी खरं असलं तरी तेंडुलकरांच्या वाट्याला त्यामुळे भरपूर मनस्तापही आलेला आहे. 

‘पाहिजे जातीचे’ हे नाटक मात्र याला अपवाद म्हणता येईल. साधं, सोपं, सरळ असं हे नाटक आहे. ‘गमतीशीर शोकांतिका’ असं त्याचं वर्णन करता येईल. हे नाटक म्हणजे अतिशयोक्तीच्या अंगानं फुलवलेला फार्सच आहे. जातीच्या प्रथेवर जाता-जाता भाष्य आहे. पण तो नाटकाचा विषय आहे असं म्हणता येणार नाही.

महिपती बभ्रुवाहन नावाचा बेकार तरुण एका खेडेगावातील महाविद्यालयात मुलाखतीसाठी येतो. जातीचा कुणी दुसरा उमेदवार मुलाखतीसाठी नाही हे शिक्षणसंस्थेच्या चेअरमनला लक्षात आल्यावर तो या अधल्यामधल्या जातीच्या तरुणाला मराठीच्या प्रोफेसराची नोकरी देतो. ‘आरंऽ काय बिनवशिल्याचं एकादं तरी तट्टू असू द्या की कालिजात. च्यायलाऽ शिक्षानसंस्था हाय, थोडं तरी पावित्र्य हवं. काय?’ हा त्याच्या निवडीचा निकष असतो.

आता महिपतीपुढे आव्हान आहे ते कोणत्याही परिस्थितीत आहे ही नोकरी टिकवून धरण्याचं. तिथल्या बनेल वातावरणात तगून राहण्यासाठी तो बबन्यानामक गुंड पोराशी त्याच्याच शिव्यांच्या भाषेत सामना करतो, दारू पितो, तंबाखू खातो. त्याच्याशीच दोस्ती करतो. चेअरमनची ‘पुतनी’ नलू (डोक्यावरून पदर वगैरे) त्याच्या हाताखाली लेक्चरर म्हणून येते. त्याचं रीतसर तिच्याशी लफडं सुरू होतं. ती त्याला प्रेमपत्र लिहिते. त्यांची भानगड चेअरमनला कळल्यावर तो आपल्या आडदांड बहिणीला – अक्काला – नलूवर रोज तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिच्याबरोबर पाठवायला लागतो. 

महिपती या अवघड परिस्थितीत नलूशी लग्न करण्याचा घाट घालतो. पहाटेच्या अंधारात ती बाहेर आली की बबन्या तिला पळवून आणणार, बाहेर उभ्या असलेल्या टॅक्सीत घालणार आणि थेट तिला पंढरपूरला घेऊन येणार. तिथं भटजी तयारच असेल. नलू पोहोचली की वाजवा रे वाजवा. ठरल्याप्रमाणे जिवावर उदार होऊन बबन्या पहाटेच्या अंधारात नलीच्या डोक्यावर घोंगडी टाकतो आणि नलीला घेऊन थेट पंढरपूरला येतो. भटजी लग्नाची घाई करतच असतो. घोंगडं बाजूला केल्यावर ती अक्का आहे हे लक्षात येतं. पुढे काय होणार? महिपतीची ही काहीशी गमतीशीर शोकांतिका तेंडुलकरांनी मोठ्या बहारीनं रंगवली आहे. 

‘आविष्कार’च्या या प्रयोगात नाना पाटेकर बबन्याची भूमिका करायचा. मी चुकत नसेन तर त्याचं ते पहिलंच नाटक होतं आणि त्यात तो महिपतीची भूमिका करणाऱ्या विहंग नायकसकट सर्वांना ‘खाऊन’ टाकायचा, पण त्याची भूमिकाच तशी ‘भावखाऊ’ होती. या नाटकानंतर नानाची गाडी नाट्य-चित्रपट क्षेत्रांत सुसाट सुटली. सर्वांनी दोन घटका हसतखेळत आनंद लुटावा असा त्या नाटकाचा प्रयोग व्हायचा. या प्रयोगाचे दिग्दर्शक होते अरविंद देशपांडे. 

तेंडुलकरांचं नाटक म्हणजे ‘वाद’ हे ठरलेलं होतं, पण तथाकथित संस्कृती रक्षकांना अगदी सूक्ष्मदर्शक यंत्रातून तपासूनसुद्धा या नाटकात वादग्रस्त असं काही आढळलं नव्हतं. त्यामुळे या नाटकाच्या वाट्याला निषेध, मोर्चे असलं काही आलं नाही. ‘तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे काम नोहे ।’ असा तुकारामांचा अभंग आहे. यातील ‘जातीचे’ तुकारामांनी वेगळ्या अर्थानं वापरलं आहे. परंतु तेंडुलकरांनी ‘पाहिजे जातीचे’ हे नाव नाटकाला देऊन एक वेगळीच गमंत साधली होती. पण त्या वेळी वारकऱ्यांनाही विनोदनिर्मितीसाठी अशी गमंत करण्याची परंपरा ठाऊक होती.

हिंदीत वसंत देवांनी या नाटकाचा अनुवाद केला तेव्हा त्यांच्यापुढे तुकारामांनी महत्त्वाच्या मानलेल्या संतचतुष्ट्यातील संत कबीर डोळ्यांसमोर होते...           

‘जाति न पूछो साधू की पूछ लीजिये ज्ञान ।
मोल करो तरवार का पड़ा रहन दो म्यान ॥’  

यांतील पहिल्या काव्यपंक्तीत किंचितसा बदल करून देवांनी ‘जाति ही पूछो साधु की’ अशी  मजेशीर अर्थचमत्कृती साधली होती. विंदा करंदीकरांच्या विरुपिकांची आठवण यावी अशी संतवचनाची ही मजेशीर मोडतोड आहे. आता यातल्या विनोदाच्या छटा फोडून सांगितल्या तर काय गंमत राहिली? तशा त्या फोडून सांगताही येणार नाहीत. अखेर विनोद समजायलाही ‘पाहिजे जातीचे’ हेच खरं.

‘अंक’ या मुंबईच्या नाट्यसंस्थेनं या हिंदी नाटकाचे 234 प्रयोग केल्याची नोंद ‘रंग तेंडुलकर’ या प्रयाग शुक्लसंपादित ग्रंथात आहे. कोणताच वाद न घडवता हे नाटक 45 वर्षांपूर्वी बिनबोभाट मराठी रंगभूमीवर आलं आणि गेलंही. या नाटकाची आपल्याला हवी तशी दखल तेव्हा घेता आली नाही याची खंत तेंडुलकरांच्या विरोधकांना वाटली असावी. (स्वतः तेंडुलकरांनाही ती वाटली नसेलच याची खातरी नाही. आपली नाटकं कलाबाह्य कारणांनी गाजवणाऱ्या उपद्रवी मंडळींची त्यांनाही एव्हाना बऱ्यापैकी सवय झालेला होती.) गाजवायचंच झालं असतं तर संतश्रेष्ठ तुकाराम आणि संतश्रेष्ठ कबीर यांच्या वचनांचा विपर्यास केला अथवा मोडतोड केली असा ‘नावा’पुरता आरोप त्या नाटकावर करता आला असता, परंतु वारकरी संप्रदाय, किंबहुना अख्खा भक्ती संप्रदायच – आणि तोही सर्व धर्मांतला - इतका हुळहुळ्या स्वभावाचा कधीच नव्हता आणि ऊठसूट भावना दुखावून घेण्याची परंपरा पहिल्यापासूनच हिंदू संस्कृतीत आणि परंपरेत नव्हती. 

मध्यप्रदेशातील छतरपूर इथे होणाऱ्या चौथ्या ‘शंखनाद राष्ट्रीय नाट्यमहोत्सवा’तल्या ‘जात ही पूछो साधु की’ या इप्टाच्या हिंदी नाटकाला छतरपुर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी अलीकडेच विरोध केला. या नाटकाचा प्रयोग झाला तर ‘व्यापक उग्र आंदोलन’ करण्याची धमकी त्यांनी दिली. हे नाटक (आणि ‘बेशर्ममेव जयते’  हे दुसरं नाटक) हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांच्या विरोधात आहे म्हणून त्यांचे प्रयोग थांबवण्यात यावेत असं निवेदन त्यांनी कलेक्टरला दिलं आणि तातडीनं या नाटकाचे प्रयोग थांबवण्याचा आदेश कलेक्टरांनी दिला. नाटकाच्या नावात ‘साधू’ असल्यानं हा विरोध झाला.

खरंतर भक्तिमार्गात ज्यांना साधू आणि संत संबोधतात ते साधूसंत आणि विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ज्यांना ‘साधू’, ‘संत’ मानते ती मंडळी या दोहोंमध्ये मूलभूतच फरक आहे.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी धर्मनिरपेक्षतेची शपथ घेत असताना त्यांच्या पहिल्या शपथविधीला ज्यांना व्यासपीठावर स्थान दिले होते ते साधू आणि संत वेगळेच आहेत. सर्वसामान्य जनतेचा त्यांच्याशी काही संबंध येत नाही. त्यांनाही सर्वसामान्य जनतेशी काही देणंघेणं नसतं. ‘ऐसे संत जाले कळी । तोंडी तमाखूची नळी ।।’ असा त्यांच्यावर तुकारामांनी कधी काळी ‘हल्लाबोल’ केलेला आहे. त्या काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नव्हते, नाहीतर त्यांनी साधूसंतांना विरोध करणाऱ्या अभंगांना बंदीच आणली असती.  (देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या शपथविधीलाही साधू हजर होते, पण ते ‘संधीसाधू’ होते.)

हिंदू धर्मातील व्यापक उदारमतवादाचे भान नसणाऱ्यांनी हिंदू धर्म अगदी कचकड्याचा करून ठेवला आहे. वास्तविक देवाला मनुष्यरूपात पाहण्याची, त्याला  मित्र मानण्याची, त्याची थट्टा करण्याची, अगदी त्याला शिव्यासुद्धा देण्याची ‘इये मराठीचिये नगरी’ समृद्ध परंपरा आहे. त्या थट्टेत एक मोकळेपणा आहे. अशा देवाची भीती कुणीच कधी बाळगली नाही. तमाशात गवळण सादर करताना श्रीकृष्णाची किती निर्मळ थट्टा करण्यात येते!  ‘गाढवाच्या लग्नात’ला ‘साधू’ आठवतोय? सावळा कुंभार वारंवार त्याची कफनी वर करून ‘तू आत काही घातलंयस का रे?’ असा प्रश्न करून चोख हशे वसूल करत असतो. अभिजनांतही आचार्य अत्रे यांनी ‘ब्रॅण्डीची बाटली’त अशीच कृष्णाची थट्टा केलेली आहे. ‘तो मी नव्हेच’मध्ये राधेकृष्ण महाराज आणून आसारामांसाऱख्या साधू-महाराजांची आचार्य अत्र्यांनी भरपूर थट्टा केलेली आहे. ही समृद्ध हिंदू परंपरा ठाऊक नसणारी मंडळी सत्तेत आल्यानं मोठाच घोळ होऊन बसलेला आहे. ‘हे चालणार नाही, ते चालणार नाही‘ असा मंत्रच जपायला त्यांनी सुरुवात केलेली आहे.

इथली परंपरा माहीत नसणाऱ्यांना, इथली संस्कृती माहीत नसणाऱ्यांना धर्मरक्षणाचा आणि संस्कृतिरक्षणाचा ठेका दिला कुणी? आता अशी थट्टा-मस्करी न सोसणाऱ्यांचे प्रतिनिधी केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर (आणि त्यांचे तसलेच अज्ञानी बोलवते धनी) नेटफ्लिक्स, अमेझॉन अशा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्याचे ठरवत आहेत. ‘वायर’, ‘स्क्रोल’ अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हे ‘बजरंगी’ गदा आणणार किंवा उगारणार आहेत. काळ तर मोठा कठीण आला असंच म्हणणं भाग आहे. (दुसरं काय म्हणणार?)

- मुकुंद टाकसाळे 
mukund.taksale@gmail.com

(सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विषयांवर गांभीर्याने विनोदी लेखन करणाऱ्या मुकुंद टाकसाळे यांचे बहुतांश लेखन 'ललित वैचारिक' स्वरूपाचे असते.)

Tags: मराठी नाटक विजय तेंडूलकर पाहिजे जातीचे जाति ही पूछो साधु की वाद मुकुंद टाकसाळे Drama Play Marathi Hindi Vijay Tendulkar Controversy Load More Tags

Comments:

shirish patil

विजयतेंडुलकरांची नाटक इतकी प्रभावी असतात की ती कळली तर प्रतिक्रिया देणार! पाहिजे जातीचे या साध्या सरळ नाटकावर बंदी घालणारे म्हणजे आपण कोणत्या दिशेने प्रवास सुरू केला आहे याचे जीवंत उदाहरण आहे,आपण खरचं हिन्दूआतंकवादी झालो काय? शरम वाटते.

डॉ अनिल खांडेकर

आपल्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. विजय तेंडुलकर या श्रेष्ठ भारतीय नाटककारांचे आकलन करु शकत नाही हे आपले दुर्दैव ! त्याच बरोबर भारतात संकुचित , कलासाहित्या बद्दल जाण , परिचय नसलेले लोक आहेत ..हे दुर्दैव..

Add Comment