क्रांतीने खाल्लेली पिल्ले!

क्रांतीचा उद्देश साध्य करता आला नाही तर लोक क्रांतीच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून उठतात

फोटो सौजन्य : alaraby.co.uk

कोणताही लढा किंवा क्रांती दीर्घ काळ चालू राहिली तर त्याचा मूळ उद्देश संपुष्टात तरी येतो किंवा जेव्हा त्या क्रांतीचे उद्देश साध्य झाले आहेत असे वाटते तेव्हा  सामाजिक-राजकीय-आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ इतके बदललेले असतात की, त्याचा समाजाला किंवा व्यवस्थेला किंवा त्या देशाला काहीच उपयोग राहत नाही. बऱ्याच वेळा ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती केलेली असते त्यांना जर क्रांतीचा उद्देश साध्य करता आला नाही तर ज्यांनी क्रांती करण्यात मोलाची भूमिका बजावलेली असते तेच लोक क्रांतीच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून उठतात. त्या बंडाला ऐतिहासिक संदर्भ असतील तर बऱ्याच वेळा त्याला प्रतिक्रांती असेही म्हटले जाते. यातही क्रांतीचा प्रणेता आपल्या विचारांवरून किंवा ध्येयावरून भटकला तर त्याचे अनुयायीच त्याच्या जिवावर उठले असल्याचे इतिहासात डोकावले असता लक्षात येते. क्रांती होताना जर ती रक्तरंजित आणि अतिजीवित हानी करणारी असली तर प्रतिक्रांती त्याहूनही अधिक भडक आणि भयंकर असण्याची दाट शक्यता असते. सध्या म्यानमार आणि आँग सान स्यू की यांच्याबाबत घडत असलेल्या घटना पाहिल्या की याचा सहज प्रत्यय येतो.

म्यानमारला 1948मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्यू की यांच्या वडिलांचा घातपाती मृत्यू झाला आणि तेथील लष्कराने सत्ता ताब्यात घेतली. स्यू की तेव्हा अत्यंत लहान होत्या... पण लोकशाहीची उमेद आणि आस त्यांच्या मनात होती. कळत्या वयात लष्करी सत्तेविरुद्ध त्यांनी आवाज उठवल्यानंतर लष्कराने त्यांना नजरकैदेत टाकले. 20 वर्षांहून अधिक काळ त्यांनी विजनवासात काढला... पण आपली लढाई सोडली नाही. मानवाधिकाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यात त्या यशस्वी झाल्या. 

नव्वदचे दशक त्या अर्थाने स्यू की यांचेच होते. त्यांची शांतताप्रिय लढाई मानवाधिकाराच्या लढाईतील एक मैलाचा दगड ठरली. आंतरराष्ट्रीय समुदायाने 1991मध्ये त्यांना शांततेचे नोबल देऊन गौरवले. अमेरिका विशेषतः बराक ओबामा यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने लष्करावरील दबाब वाढवत नेला आणि म्यानमारमध्ये लोकशाही अस्तित्वात आली. 

लष्कराने मारलेली कायदेशीर मेख राष्ट्राध्यक्ष होण्यात त्यांना अडचणीची ठरली तरी स्यू की यांना सर्वोच्च असे सल्लागाराचे पद कायद्यात तरतूद करून बहाल करण्यात आले.  त्यानंतर 2017-18मध्ये रोहिंग्या मुस्लिमांना देशात आसरा देण्यावरून म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. असंख्य मुस्लिमांचे शिरकाण करण्यात आले... पण त्याविरुद्ध स्यू की यांनी अवाक्षरही काढले नाही की विरोधही केला नाही. आंतरराष्ट्रीय समुदायांच्या आणि मानवाधिकार संघटनांच्या दृष्टीने ही अत्यंत धक्कादायक बाब होती... कारण त्यांचा आंतरराष्ट्रीय हिरो खलनायक होऊन म्यानमार लष्कर, पोलीस आणि तेथील धर्मांध जनतेकडून होणारा नरसंहार शांतपणे पाहत होता. 

हे सगळे कमी की काय म्हणून नंतरच्या निवडणुकीत स्यू की यांचा पक्ष पूर्वीपेक्षा मोठ्या बहुमताने (तब्बल 79 टक्के मते मिळवून) पुन्हा सत्तेवर आला... मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमा मात्र मलीन झाली होती. त्यांची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू होती. आपल्यापुढे भविष्यात असलेला हा धोका लक्षात आल्यावर लष्कराने स्यू की यांनी निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करून हे लोकनियुक्त सरकार बळाचा वापर करून पदच्युत केले आणि स्यू की यांना पुन्हा नजरकैदेत टाकले. 

या वेळेस मात्र स्यू की यांना आंतरराष्ट्रीय पाठिंबा आणि सहानुभूती मिळाली नाही. तरीही 16 मार्च 2021 रोजी आंतरराष्ट्रीय समुदायाने विनंती करूनही लष्कराने त्यांना मुक्त केलेले नाही... पण या वर्षी सार्वत्रिक निवडणूक घ्यायचे मान्य केले आहे. ज्या उद्देशाने स्यू की ही लढाई लढत होत्या तो उद्देशच त्यांनी बाजूला ठेवल्याने आज त्यांच्या बाजूने खंबीरपणे लढणारे कोणी नाही आणि पुन्हा म्यानमारमध्ये लोकशाही नांदेल की नाही याची कोणालाच शाश्वती नाही. हे आजचे उदाहरण असले तरी इतिहासात अशा अनेक घटना आणि उदाहरणे पाहायला मिळतील जिथे क्रांतीच्या नेतृत्वाने आपल्या उद्देशाला हरताळ फासल्यानंतर त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली. जगातील पहिली राज्यक्रांती म्हणून ओळखली जाणारी फ़्रेंच राज्यक्रांती हे यातील सगळ्यांत समर्पक उदाहरण सांगता येईल.

जॉर्ज जॅक्स डांटन हा 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीचा आद्य प्रणेता समजला जातो. फ्रेंच राज्यसत्ता उलथवून टाकण्यासाठी डांटनने राजघराण्यातील सर्वांचे शिरकाण केले आणि सत्ता हस्तगत केली. पेशाने वकील असलेला डांटन अतिशय बेरकी होता. त्यांची वकिलांची क्रांतिकारी संघटनाही होती. त्यात त्याच्याइतकाच हुशार आणि बेरकी वकील असलेला एक सदस्य होता. त्याचे नाव मॅक्सिमिलेन रॉबिसफेरे! तो त्याचा मूळ प्रतिस्पर्धी होता. 

एकाच संघटनेत असून आणि एकाच उद्देशाने काम करत असतानाही त्यांचे दोघांचेही फार सख्य नव्हते. साहजिकच मॅक्सिमिलेनने त्याला आव्हान दिले. ते आव्हान परतवून लावण्यासाठी डांटनने क्रांतिविरोधी शक्तींशी हातमिळवणी केली. त्यांना खूश करण्यासाठी राष्ट्राची संपत्ती वापरली. त्याचे हे कटकारस्थान उघड झाल्यावर मॅक्सिमिलेनने त्याच्यावर चांगलाच सूड उगवला. भ्रष्टाचाराचा आणि स्वराज्याच्या शत्रूशी संगनमत केल्याचा आरोप ठेवून त्याच्याच क्रांतिकारी वकील संघटनेने त्याचा शिरच्छेद केला. वयाच्या चौतिसाव्या वर्षी डांटन नावाचे पर्व इतिहासजमा झाले आणि त्याचे कोणालाच सोयरसुतक वाटले नाही. सामान्य जनतेला तर मुळीच नाही.

क्रांती यशस्वी होऊन हातात पद, प्रतिष्ठा आणि सत्ता आल्यानंतर क्रांतीच्या मूळ उद्देशापासून दूर झाल्याने पदच्युत व्हाव्या लागलेल्या, तुरुंगवास सहन करावा लागलेल्या किंवा अनुयायांकडूनच हत्या करण्यात आलेल्या अनेक व्यक्ती इतिहास सापडतात. झिम्बाब्वेचे अगोदर सात वर्षे पंतप्रधान आणि नंतर 30 वर्षे अध्यक्ष राहिलेले रॉबर्ट मुगावे हे असेच प्रभावी आणि वादग्रस्त नाव! अफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या अधिकारांसाठी लढणारे आणि श्वेतवर्णीय सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारे मुगावे समस्त अफ्रिकन देशांचा आणि जगभरातील कृष्णवर्णीय समाजाचा आवाज होते. 

समाजसुधारक अशी प्रतिमा असलेले मुगावे सुरुवातीला नेता आणि नंतर हुकूमशहा कधी झाले हे त्यांनाही कळले नाही. त्यांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराची आणि मानवी हक्कांची पायमल्ली करणारी अनेक प्रकरणे घडली. त्यांविरुद्ध झालेले उठाव, मोर्चे आणि आंदोलने त्यांनी बळाचा वापर करून अत्यंत अमानुषपणे दडपली. अध्यक्षपदाच्या निवडणुका त्यांनी गैरप्रकार करून जिंकल्या. पूर्णपणे हुकूमशहा झालेल्या मुगावेंना स्वपक्षातूनच आव्हान मिळाले आणि शेवटी 2017मध्ये भ्रष्टाचारामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे त्यांना पदच्युत व्हावे लागले. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांचा आजारपणामुळे सिंगापूरमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला... परंतु त्यांचा आजार आणि त्यांच्या मृत्यूचे कारण यांविषयी कुणालाच फारशी माहिती नाही. 

जगभरात अशी अनेक उदाहरणे असली तरी दोन ताजी उदाहरणे महत्त्वाची आहेत. पहिले उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेले डोनाल्ड ट्रम्प! अमेरिकेत ‘क्लू क्लाक्स क्लान’ नावाचा श्वेतवर्णीय लोकांचा एक गट आहे. ‘अमेरिका फक्त श्वेतवर्णीय आणि त्यातही ख्रिश्चन लोकांची आहे आणि इथल्या साधनसंपत्तीवर, नोकऱ्या आणि सुविधांवर फक्त त्यांचाच अधिकार आहे... त्यामुळे इथे स्थलांतरित म्हणून आलेले आणि आणले गेलेले सर्व कृष्णवर्णीय असून त्यांना गुलामाचीच वागणूक दिली पाहिजे. त्यांना कोणतेही अधिकार आणि साधनसंपत्तीत कोणताही वाटा देता कामा नये.’ असे या गटाला वाटते. त्यासाठी हा गट सतत क्रियाशील असतो (भारतीयही यांच्या दृष्टीने कृष्णवर्णीयच असतात) आणि सतत मोर्चे आणि आंदोलने करत असतो. 

भारतात जसा धर्मांधांना पाठबळ देणारा राजकीय पक्ष आहे तसाच अमेरिकेतही या गटाला पाठबळ देणारा पक्ष आहे आणि तो रिपब्लिकन पक्ष म्हणून ओळखला जातो. डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील या गटाचे सक्रिय सदस्य होते आणि ज्युनिअर ट्रम्प त्या गटाविषयी सहानुभूती राखून असल्याच्या बातम्या कायम येत असत. ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेची केलेली वाताहत समजून घेण्यासाठी ही एक बाब पुरेशी आहे. 

रिपब्लिकन पक्षाला या विचारांची पडलेली भुरळ पहिल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीतच उतरली आणि हा माणूस आपल्याला नको असे बहुतांश रिपब्लिकन म्हणायला लागले. त्यातूनच रिपब्लिकन पक्षाचे निवडणुकीतील बालेकिल्ले असलेल्या अनेक राज्यांत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा आणि पर्यायाने वर्णाच्या आधारे द्वेषाच्या भिंती घालू पाहणाऱ्या ट्रम्प यांचाही अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी केलेली कारस्थाने आणि त्यांच्या श्वेतवर्णीय धर्मांध अनुयायांकडून केली गेलेली कृत्ये लोकशाहीला आणि माणूसपणाला आव्हान देणारीच होती.

भारतातही धर्माच्या आधारे राजकारण करू पाहणाऱ्या आणि सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचे एक वजनदार नेते म्हणजे लालकृष्ण आडवाणी! अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनता पार्टी आणि नंतर भारतीय जनता पक्ष अशी वाटचाल केलेल्या आणि या सर्वांचा सर्वेसर्वा असलेल्या आडवाणींचा भाजपला सत्तेजवळ घेऊन जाण्यात सगळ्यात जास्त वाटा आहे आणि ते श्रेय निःसंशयपणे  त्यांना जाते. अनेक वेळा अनेक यात्रा काढलेल्या आडवणींनी भाजपला हिंदूंचा पक्ष म्हणून भारतात आणि जगातही ओळख मिळवून दिली. 

रामजन्मभूमी आंदोलनाने हिंदी पट्ट्यातील सर्व राज्यांत राक्षसी बहुमतासह सत्ता मिळवून दिली असली तरी पंतप्रधानपदाने मात्र त्यांना कायम हुलकावणी दिली. बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादात अयोध्येत राममंदिर व्हावे यासाठी आडवाणींनी किती ‘खस्ता खाल्ल्या’ हे संपूर्ण देशाला माहीत आहे... पण आज राममंदिर दिमाखात उभे राहण्याच्या मार्गावर असताना आडवाणी देशाच्याच नव्हे तर स्वपक्ष भाजपच्याही विस्मरणात गेलेले आहेत. ज्या राममंदिरासाठी त्यांनी एवढे कष्ट उपसले त्याच्या पायाभरणी समारंभालाही त्यांना उपस्थित राहता आले नाही. यापेक्षा नियती आणखी वेगळा काय सूड उगवणार आहे!

यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सभ्यपणाचा आव आणून आपला जातीद्वेष्टा, धर्मद्वेष्टा, वर्णद्वेष्टा किंवा हुकूमशाही कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेत्यांचे त्यांच्या अनुयायांनीच पतन केल्याचे किंवा त्यांच्यावर कारवाई केल्याची असंख्य उदाहरणे इतिहासात आहेत. यातील कळीची उदाहरणे म्हणून आपल्याला हिटलर आणि मुसोलिनीच माहीत आहेत, पण लेखाच्या सुरुवातीला दिलेले म्यानमारचे उदाहरणही बोलके आहे.  

जनतेच्या भल्यासाठी अणीबाणी असा दावा करणाऱ्या इंदिरा गांधी यांनाही जनतेने धडा शिकवलेला आहे. भारतातील आतंकवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान अजूनही दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. तालिबान सत्तेत आल्यावर आणि मुस्लीम धर्माचे राज्य आल्यावर संपूर्ण अफगाणिस्तान आबादीआबाद होईल असे म्हणणारी अफगाणी जनता तालिबानच्या मगरमिठीत अडकून गलितगात्र झाली आहे... त्यामुळे क्रांतीची पिल्ले आपल्या उद्देशापासून दूर गेली तर क्रांती स्वतः त्या पिल्लांना खाते हेच अंतिम सत्य आहे. त्यासाठी लागणारा वेळ फक्त कमीजास्त असतो... त्यामुळे पिल्लांनी क्रांतीच्या मूळ उद्देशापासून दूर जाता कामा नये. अमेरिकन जनतेला हे लवकरच कळले आणि ती सावरली. भारतीयांकडूनही तीच अपेक्षा आहे.

- डॉ. के. राहुल  
srass229@gmail.com

(लेखक बारामती येथील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: लेख के राहुल क्रांती प्रतिक्रांती म्यानमार इंदिरा गांधी लालकृष्ण अडवाणी K Rahul Revolution Counter Revolution Myanmar Indira Gandhi Lalkrishna Advani Load More Tags

Comments:

प्राजक्ता

अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण लेख. जगभरात मुसोलिनी, हिटलर शिवाय असणारी अनेक लोक त्यांची कार्यपद्धती व ते का लयाला गेले या गोष्टीची माहिती कळली. मूळ उद्देशा पासून भरकटले तर जनता त्याला योग्य रस्ता दाखवते

Add Comment