1918-19 मध्ये 'स्पॅनिश फ्लू' नावाच्या तापाने जगभर धुमाकुळ घातला होता. एकट्या भारतामध्ये सुमारे 1.8 कोटी लोक (तत्कालीन लोकसंख्येच्या 6%) या रोगाच्या संक्रमणाला बळी पडले होते. आता बरोबर शंभर वर्षांनी अशाच एका गहिऱ्या संकटाशी जग लढा देत आहे. हे संकट आहे कोरोना विषाणूचे. या नोवल कोरोना विषाणूचे (COVID 19) संक्रमण हे Zoonotic प्रवर्गातले म्हणजे- प्राण्यांपासून मानवामध्ये संक्रमित होणारे असून त्याची जैविक शाखा ही SARS (Severe Accute Respiratory Syndrome) या काही वर्षांपूर्वी उद्भवलेल्या आजारांपैकी आहे.
डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुबैइ प्रांतातील वुहान या राजधानीच्या शहरात या विषाणूंचा उद्भव झाला. चीनचे औद्योगिक शहर म्हणून ख्याती असणारे वुहान हे शहर जगभरातील कच्चा माल, सेवा व तज्ज्ञ मनुष्यबळ पुरवठा साखळीचे (Global supply chain) महत्वाचे केंद्र आहे.
युरोप आणि त्यातही मिलान हे इटालीयन शहर जगभरात ‘फॅशन हब’ म्हणून प्रसिद्ध आहे. या इंडस्ट्रीला लागणारा बहुतांश माल, मनुष्यबळ व सेवांचा पुरवठा चीनच्या वुहान प्रांतातून होतो. आजही लक्षावधी चीनी लोक या व्यापारामुळे मिलान येथे वास्तव्याला असतात. आज युरोप आणि त्यातही उत्तर इटलीतील लोंबार्डी- मिलान हा परिसर या संक्रमणाचा ‘हॉटस्पॉट’ बनला तो यामुळेच.
आज जवळपास सर्वच खंडांत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झालाय. 175 हून अधिक देश या आजाराविरूद्ध युद्धपातळीवर लढा देत आहेत. यांपैकी द. कोरिया, इटली आणि चीन या देशांकडून भारताला शिकण्यासारखं बरेच काही आहे. भारत हा चीननंतरचा जगातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचा देश. येथील दर चौरस कि.मी. घनता (464 लोक) भारताची ओळख ‘दाटीवाटीने राहणारा प्रचंड लोकसंख्येचा देश’ अशी बनवते. त्यामुळे, वेळीच प्रभावी उपाय केले नाहीत तर, भारत हा कोरोना विषाणु संक्रमणाचे नवीन केंद्र बनेल, असा इशारा डॉ. रामनन लक्ष्मीनारायणन यांसारखे तज्ज्ञ देतात.
कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्यात विषाणूंची आयात होते. परदेशी किंवा परदेशगमन करून आलेला भारतीय नागरिक या विषाणूंचा वाहक ठरतो. जगभरातील सर्वच देशांनी हा टप्पा पुर्ण केलाय. या विषाणूची बाधा झालेले प्रवासी जेव्हा स्थानिक नागरिकांच्या संपर्कात येतात तेव्हा संक्रमणाचा दुसरा टप्पा (Stage two) पुर्ण होतो.
भारतासह जगभरातील अनेक देशांनी हा दुसरा टप्पाही पार केला आहे. आता बाधा झालेले स्थानिक लोक हे आपापल्या सामाजिक समुहाच्या संपर्कात येतात व आजवर बेरजी पद्धतीने झालेला विषाणूंचा फैलाव हा तिसऱ्या टप्प्यात (Stage three) गुणाकारी पद्धतीने सुरु होतो. यालाच Community transmission असेही म्हणतात. युरोप, अमेरिका, चीन, द. कोरिया, जपान यांसारखे सर्वच पुढारलेले देश आता Community transmission च्या विळख्यात सापडले आहेत.
सुदैवाने भारतात हे संक्रमण अजुनही दुसऱ्या टप्प्यात आहे. तिसरा टप्पा येऊ नये किंवा त्याची परिणामकारकता अल्प रहावी यासाठी भारतातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. आपल्या देशातील हे संक्रमण प्रभावीपणे रोखणे अत्यावश्यक बनले आहे. याचा मुकाबला सरकारी व समुदाय (Community) पातळींवर कसा करावा हे चीन, इटली व द. कोरिया यांच्या उदाहरणांतून आपल्याला शिकता येईल.
या संसर्गाची जननी असणाऱ्या चीनने सुरुवातीला कोरोना विषाणूविषयी कमालीची गुप्तता बाळगली होती. डॉ. ली वेन लियांग यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची चीनी पद्धतीने मुस्कटदाबी करण्यात आली. पुढे रोगाचा अनियंत्रित फैलाव झाल्याने सरकारला चीनी जाग आली. दरम्यान या रोगाची लागण होऊन डॉ. ली मृत्युमुखी पडले. सरकारी मुस्कटदाबी विरोधाचे आज ते राष्ट्रीय नायक बनले आहेत. काळाचा महिमा असा, की चीनी सरकारनेही आपली चुक मान्य करुन ली यांच्या कुटुंबियाची माफी मागितली आहे.
संकट किती गहिरे आहे याची उशीरा का होईना जाणीव झाल्यानंतर चीनी प्रशासकीय यंत्रणा आपल्या लौकीकानुसार कामाला लागली. ज्या वुहान शहरातून या विषाणुंचा फैलाव झाला- त्याच्या व एकूणच हुबैइ प्रांताच्या सीमा संपूर्णपणे बंद करण्यात आल्या. जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता संपूर्ण वुहान शहर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले. बाधित रूग्ण, त्यांचे नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पुरेशी खातरजमा करून त्यांचे उपचार व विलगीकरण करण्यात आले. बाधित व्यक्ती व परिसर यांची डेटा बॅंक बनवली गेली. प्रत्येक पेशंटची हालचाल व निवासस्थान यांना ट्रॅकर बसवण्यात आले. वुहानच्या नागरिकांना आपल्या परिसरातील संसर्गाचा तपशिल अद्यायावत माहितीसह मोबाईल अॅपद्वारे पुरवला जाईल याची खबरदारी घेण्यात आली. आरोग्य विभागाकडे असलेल्या माहिती बॅंकवर रूग्णाचा तपशील, होणाऱ्या सुधारणा यांचा वेळोवेळी आढावा घेण्यात आला. दोन-अडीच महिन्यांच्या या अविश्रांत उपाययोजनांमुळे वुहानमध्ये आता एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही असा दावा चीनने केला आहे. (अर्थात, माहिती वहनाच्या या प्रक्रियेत चीनी सरकारचा पोलादी पडदा विसरता येणार नाही.) जागतिक आरोग्य संघटनेने या प्रभावी प्रयत्नांचं कौतुक केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव इटलीमध्ये मोठ्या प्रमाणात का झाला याची कारणे समजावून घेण्यासाठी तेथील सामाजिक संबंधाची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. एकत्रित कुटुंबपद्धती, नात्यांमधील जपणूक, सहभोजन अशा गोष्टींना इटलीमध्ये आजही विशेष महत्व आहे. मिलान या शहरात काम करणारे अनेक तरूण आसपासच्या छोट्या शहरांतून व ग्रामीण भागांतून येथे येतात. त्यातील बाधित तरूण आपल्या गावी भेट देत असल्यामुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग छोटी शहरे आणि खेडेगाव असा सर्वदूर पसरला.
जगातील कुठल्याच खेड्यात अतिदक्षता विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती अशा सुविधा शक्यतो नसतात. तशा त्या इटालीतील खेड्यापाड्यांतही नव्हत्या. त्यात ग्रामीण भागांत निवृत्त वृद्धांची संख्या लक्षणीय असल्याने कोरोनाच्या बळींमध्ये ग्रामीण/ निमशहरी नागरिकांचे प्रमाण वाढले. आज इटलीची आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. उपचाराच्या अपुऱ्या सुविधा; डॉक्टर्स, नर्सेस, औषधे यांची अनुपलब्धता अशा सर्वच पातळींवर तो देश लढाई देतोय. एका बातमी नुसार 75 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे इटलीने बंद केले आहे. त्या देशासमोरचे सर्वांत मोठे आव्हान तरूण व उत्पादक पिढी वाचवण्याचे आहे. ही परिस्थिती भीषण आहे.
चीनचा शेजारी असणाऱ्या द. कोरिया या देशातही कोरोनाचा प्रसार विलक्षण वेगाने झाला. कोरोना बाधितांचे चीननंतरचे दुसरे केंद्र द. कोरिया बनेल की काय अशी शंका घेण्याइतपत हा प्रसार होता. पण सुरुवातीच्या गोंधळानंतर कोरिया प्रशासनाने विषाणूग्रस्त व त्यांच्या संपर्कात आलेल्या संभाव्य संशयितांवर त्वरित उपचार केले. विलगीकरणाची (Quarantine) पूर्ण खबरदारी घेत न्युमोनिया, सामान्य ताप व खोकला ग्रस्त रूग्णांच्याही चाचण्या घेऊन प्रतिबंधात्मक उपाय केले. विषाणू पसरण्याची संवेदनशील ठिकाणे निश्चित करून मोठ्या प्रमाणावर तपासणी/चाचण्या घेण्यात आल्या.
कोरियन प्रशासनाने हा प्रश्न अत्यंत आक्रमक व वेगवान पद्धतीने हाताळल्याने संक्रमणाला प्रभावी पायबंद बसला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एका खाजगी कोरियन कंपनीने कोरोना चाचणी करण्यासाठी घरगुती वापरावयाचे कीट बनवण्याचा दावा केलाय. अशी संशोधने उपचार व रोगनिवारण संदर्भात गेमचेंजर ठरु शकतात.
भारतानेही चीनच्या धर्तीवर लॉकडाऊन व सीमाबंदी यांसारख्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. उपचारांपेक्षा आजारच होऊ नये यासाठी सक्तीची जमावबंदी आवश्यकच असते. अशा जमावबंदीमुळे विषाणू पसरवणारी साखळी निर्माण होणार नाही व प्रसाराला आळा बसतो, जेणेकरून नवीन संक्रमण रोखता येते. ज्या रूग्णांना आधीच विषाणूची बाधा झाली आहे, अशांची त्वरित ओळख / पडताळणी करून त्यांचे उपचार करावे लागतील. यासाठी चीनसारखी एक राष्ट्रीय डेटा बॅंक बनवून त्याद्वारे रूग्णांचा पाठपुरावा केला जाऊ शकतो.
स्व-विलगीकरण संदर्भात समाजात काही (गैर) समज आहेत. भारतात, स्व-विलगीकरणाच्या प्रक्रिया करताना जणू काही कोरोना विषाणूंचे बाधाचक्र हे 14 दिवसांपर्यंतचे असते असे मानले गेले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण हा साधारण 14 दिवसांत बरा होतो असा समज निर्माण झाला आहे. पण कोरोना संदर्भात अशी खात्री देता येत नाही. एक तर कोरोनाची बाधा झालेली व्यक्ती कोणत्याही उघड लक्षणांशिवाय या विषाणूंचा वाहक म्हणून कार्य करू शकते. शरीराची प्रतिकार क्षमता सुदृढ असणाऱ्या रुग्णांबाबत हे सहज शक्य आहे. दुसरे, या विषाणूंचे संक्रमण व त्याची लक्षणे यादरम्यान प्रत्यक्षात दोन ते एकवीस दिवसांचा कालावधी लागू शकतो असे विषाणू तज्ञ मानतात. त्यामुळे स्व-विलगीकरण हे गरजेचे आहेच, पण पर्याप्त मात्र नाही. चेहरा- कान- नाक- डोळे यांना सारखा स्पर्श न करणे, वारंवार हात धुणे, स्वच्छ कापडांनी चेहरा झाकणे, डोळ्यांना चष्मा लावणे, सामाजिक अंतर राखणे, एकांतवासात राहणे, व्यक्तिगत स्वच्छता ठेवणे इ. खबरदाऱ्या सातत्याने घ्यावी लागणार आहे.
उपदेशाच्या पातळींवर आपण हे सर्व तत्वत: मान्य करतो. पण व्यवहाराच्या पातळींवर वागण्याच्या काही पद्धती अगदी खेदपूर्वक नोंदवाव्या लागतात. शासकीय यंत्रणा पुरेशा गांभीर्याने रात्रंदिवस राबत असताना गंमत म्हणून रस्त्यावर फिरणे, नुकसान होईल म्हणून कामधंदा चालू ठेवण्याचा प्रयत्न करणे, सुट्टी समजून बाहेरची कामे आटपण्याचा प्रयत्न करणे, गावाकडे जाण्यासाठी शहराबाहेर पडणे, भाजी मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये अनावश्यक आणि प्राथमिक काळजी न घेता गर्दी करणे, आपल्याला काही होणार नाही-भारतीयांची प्रतिकारशक्ती श्रेष्ठ दर्जाची असल्याने आपल्यावर त्याचा फरक पडणार नाही या भ्रमात राहणे अथवा त्याकडे विनाकारण कानाडोळा करून प्राथमिक सुरक्षितता न बाळगणे, मित्रांना जमवून घरगुती पार्ट्या करणे अशा स्वरूपाचे उद्योग सुरु असतात. आता मात्र हे चित्र बदलावे लागेल.
सर्वदूर संक्रमणाने कोरोना विषाणू इटलीच्या महानगरांतून उपनगरांमध्ये व नंतर खेडोपाडी वेगाने पसरल्याचे लक्षात आले. दूर्दैवाचा भाग असा की पुरेशा आरोग्य सोयी-सुविधांअभावी मृत्यू पावणाऱ्यांमध्ये खेड्यांतील नागरिक सर्वांत जास्त आढळले. त्या खालोखाल होते उपनगरांमधील व नंतर महानगरांमधील नागरिक. भारतातील सामाजिक संबंध व सामाजिक रचना ही बरीचशी इटलीशी मिळती-जुळती आहे; तेव्हा भारतीयांनी इटलीच्या उदाहरणापासून धडा घ्यायला हवा. इटली असो, ब्रिटन असो की भारत, कोरोनाविरुद्धच्या सर्वंकष लढ्यात जगातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्राचा टिकाव लागणे कठीण असणार आहे.
हा धोका लक्षात घेता कोरोना विषाणूचे संक्रमण हे आहे त्याच महानगरांपुरतेच सीमित कसे राहील याची सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे. भारतात ही लढाई निर्णायक टप्यावर आली आहे. कोरोना संक्रमण दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्यावर जाऊ न देणे, तसेच आरोग्य सेवासुविधांचे नाजूक व अपर्याप्त (Vulnerable) जाळे असलेल्या ग्रामीण भागांत तिसऱ्या टप्यातील संक्रमण (Community transmission) पोहचू न देणे, यासाठी केवळ सरकारीच नव्हे तर सामुदायिक पातळीवरही सर्वांनाच दक्षता घ्यावी लागणार आहे.
कोरोना संक्रमणामुळे जगातील जवळपास सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अब्जावधी डॉलर्सचा चुराडा झाला आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. लक्षावधींना या विषाणूची लागण झाली आहे. कित्येक लोक प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी रांगेत उभे आहेत. परिस्थिती भयकारी असली तरी तिला सर्व शक्तीनिशी तोंड देण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. कोरोनाचे हे अग्निदिव्य पार करताना सरकारी प्रयत्नांना सामुहिक शक्तीची जोड देऊया. हा लोकलढा आहे. चला तर, प्रत्येक जण कसलेल्या योद्ध्याप्रमाणे आपापली जबाबदारी ओळखून सामुहिक सहकार्याचा भारतीय अविष्कार घडवूयात. त्यातून उदयाला येणारे तेज जगण्याची नवीन दिशा घेऊन येईल हे नक्की.
- स्वप्निल बावकर, सातारा.
b.swapnil16@gmail.com
(हा लेख लिहिताना The Economist, New York Times,The New Yorker, Times of India, BBC आणि YouTube documentaries इत्यादींचा आधार घेण्यात आला आहे.)
Tags: कोरोना वायरस चीन वूहान इटली भारत संचारबंदी साथ आजार विषाणू Corona Corona Virus Pandemic China America Italy India Wuhan Load More Tags
Add Comment