अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत संभाजीराजे व नंतर शिवाजी महाराज या भूमिका समर्थपणे साकारल्या. या भूमिकांची मूलभूत पायाभरणी नकळतपणे कशी होत होती हेदेखील पुस्तकात नमूद केले आहे... परंतु या सर्वोच्च यशःशिखरावर पोहोचेपर्यंत झालेला प्रवास निश्चितच फारसा सोपा नव्हता. या उच्च ध्येयापर्यंत मजल मारेपर्यंत अमोल यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले व ती आव्हाने त्यांनी कशी पेलली, त्यासाठी वेळप्रसंगी क्षणिक मोहांना तिलांजली देऊन कोणते त्याग त्यांनी केले याचेही विवेचन हे पुस्तक तितक्याच मनोज्ञपणे करते.
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द म्हणजे भारतीय इतिहासाचे एक सोनेरी व प्रेरणादायी पान. मराठी भाषकांनी अभिमानाने मिरवावी अशी अस्मिता! हा असा हळवा कोपरा आहे... ज्यात आपापसांतील सर्व जातिभेद व मतभेद विसरून समस्त महाराष्ट्राला एकत्र आणण्याची अलौकिक शक्ती फार पूर्वीपासून आहे. शिवाजी महाराजांची थोरवी एका वाक्यात सांगायची तर जुलमी परकियांच्या विरोधात राजांनी रोवलेली मराठी स्वराज्याची यशस्वी मुहूर्तमेढ होय.
शिवाजी महाराजांवर व शिवशाही कालखंडावर आत्तापर्यंत विविध पार्श्वभूमीच्या व्यक्तींनी अनेक रूपबंधांतून लेखन केलेलं आहे. त्याचा थोडक्यात आढावा घेताना काही नावं आठवल्याशिवाय राहत नाहीत. ती नावं म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, ना.सं. इनामदार, वसंत कानेटकर, गोविंद पानसरे, मेधा देशमुख भास्करन आदी. उपरनिर्देशित लेखकांनी शिवरायांवर चरित्र, नाटक व कादंबरी या स्वरूपांत लेखन केले आहेच... शिवाय दिवंगत चित्रमहर्षी भालजी पेंढारकरांपासून आजचा आघाडीचा दिग्दर्शक दिक्पाल लांजेकर याच्यापर्यंतच्या फिल्ममेकर्सनीसुद्धा शिवाजीराजांच्या जीवनातील एकेका मोहिमेवरील सिनेमे काढले आहेत. 2020 या वर्षाच्या प्रारंभीच्या यादीत अभिनेता व चित्रपटनिर्माता अजय वीरू देवगणदेखील (स्थानापन्न) झाला आहेच. या प्रकारातील त्याने काढलेला सिनेमा म्हणजे 'तानाजी - द अनसंग वॉरियर'. असो.
शिवरायांच्या जीवनावरील व राजकीय कारकिर्दीवरील एक महत्त्वाची उत्तम कलाकृती म्हणजे स्टार प्रवाह या वाहिनीने प्रसारित केलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका होय. या मालिकेचे खास वैशिष्ट्य म्हणजे दृक्श्राव्य माध्यमात शिवरायांच्या जीवनाचा व त्यांच्या कारकिर्दीचा सांगोपांग व समग्रपणे आढावा याच मालिकेतून घेण्यात आला आहे... यामुळे ही मालिका खऱ्या अर्थाने यशस्वी म्हटली पाहिजे.
या मालिकेच्या निर्मितीच्या प्रवासावरील ‘शिवगंध’ हे पुस्तक डिंपल पब्लिकेशने प्रकाशित केलेय. या पुस्तकाचे लेखक डॉ.अमोल कोल्हे असून डॉ.नितीन दत्तात्रेय आरेकर यांनी पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. ही दोन्ही नावं मराठी रसिकजनांना आता चांगलीच परिचयाची झाली आहेत. अमोल कोल्हे तर आता शिवरायांच्या भूमिकेने सर्वश्रुत आहेतच; पण डॉ. आरेकर हे त्यांच्या ‘ये है मुंबई मेरी जान’ या सरदार कुलवंतसिंग कोहलींच्या पुस्तकाच्या शब्दांकनामुळे माहीत आहेत.
म्हटले तर ‘शिवगंध’ हे पुस्तक ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेच्या निर्मितीची कहाणी विशद करणारे आहे अन् म्हटले तर ते डॉ. अमोल कोल्हे यांचे लघू आत्मचरित्रसुद्धा आहे. या पुस्तकास डॉ. अमोल कोल्हेंचे आत्मचरित्र संबोधण्यामागेदेखील खास असे औचित्य आहे. या पुस्तकाची मांडणी साधारण चोवीस प्रकरणांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रितीने करण्यात आलेली आहे. या पुस्तकात अमोल यांनी आपले कुटुंब, नारायणगावसारख्या ग्रामीण भागातील जडणघडण, तेथील व नंतर पुणे-मुंबईतील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण तसेच प्रथमतः डॉक्टर व नंतर अभिनेता म्हणून झालेली वाटचाल कसलाही आडपडदा न ठेवता प्रामाणिकपणे कथन केली आहे.
शिवगंध या पुस्तकाची खासियत ही की, हे पुस्तक लेखनाच्या पारंपरिक घाटाने जाणारे नाही. शिवगंधची सुरुवात राजा शिवछत्रपती मालिकेच्या चित्रीकरणाच्या अनुभवापासून होते. अर्थात असं असलं तरी ‘महाराज - एक आकर्षण’ या दुसऱ्याच प्रकरणापासून पुस्तकाचे लेखक डॉ. अमोल कोल्हे अलगदपणे वाचकाला आपल्या बालपणात घेऊन जातात. थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक फ्लॅशबॅकच्या तंत्राने प्रवास करते.
अभिनेता अमोल कोल्ह्यांची कौटुंबिक व भौगोलिक पार्श्वभूमी ही मालिकेला पूरक अशीच होती असं म्हणावं लागेल. शिवाजी महाराज जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मले होते. अमोल यांचा जन्मही जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथीलच...! त्यांचा बालपणीचा काळही अर्थात त्यांनी तिथेच व्यतीत केला आहे. साहजिकच शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्यकर्तृत्वाचा एक वेगळाच व मूलगामी संस्कार अमोल यांच्या मनावर झाला होता.
अमोल यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत संभाजीराजे व नंतर शिवाजी महाराज या भूमिका समर्थपणे साकारल्या. या भूमिकांची मूलभूत पायाभरणी नकळतपणे कशी होत होती हेदेखील पुस्तकात नमूद केले आहे... परंतु या सर्वोच्च यशःशिखरावर पोहोचेपर्यंत झालेला प्रवास निश्चितच फारसा सोपा नव्हता. या उच्च ध्येयापर्यंत मजल मारेपर्यंत अमोल यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले व ती आव्हाने त्यांनी कशी पेलली, त्यासाठी वेळप्रसंगी क्षणिक मोहांना तिलांजली देऊन कोणते त्याग त्यांनी केले याचेही विवेचन हे पुस्तक तितक्याच मनोज्ञपणे करते... त्यामुळे शिवगंध हे पुस्तक फक्त एका अभिनेत्यावरील पुस्तक राहत नाही... तर त्या पलीकडे जाऊन त्यास एका संघर्षशील व मेहनती कलावंतांच्या आत्मकथनाचेही मूल्य प्राप्त होते.
अमोल कोल्हे यांचे गाव, त्यांचं कुटुंब, त्यांचा नारायणगाव येथील जन्म, आपटे प्रशाला पुणे येथील शालेय शिक्षण तसेच मुंबईतील जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातील त्यांनी घेतलेले उच्च शिक्षण आदी त्याच्या प्रारंभीच्या जीवनातील पर्व हे पुस्तक सुरुवातीच्या प्रकरणांत अधोरेखित करते.
या पूर्वार्धानंतर आपण मध्यावर येतो... तो पुस्तकाचा कणा असलेला भाग. अमोल यांची राजा शिवछत्रपती मालिकेकरता शिवरायांच्या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरणाबद्दलचे अनुभव यामध्ये आले आहेत. मुळातच लेखकाचे हे अनुभव जीवनसंपन्न करणारे आहेत, तसेच शब्दांकनकार डॉ. नितीन आरेकर यांची शब्द-भाषेवरची पकड आणि वातावरण चित्रमय पद्धतीने जिवंत करण्याची हातोटी यांमुळे पुस्तकातील प्रसंग अन् प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर साक्षात जिवंत होतो. अर्थातच प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होण्याआधी अमोल यांनी भूमिकेची पूर्वतयारी कशी केली याचेही संदर्भ या भागात अगदी खुबीने पेरले गेले आहेत. परिणामी हे पुस्तक एखाद्या अभिनेत्याच्या दूरचित्रवाणीवरील कारकिर्दीचा आरंभ कसा असू शकतो याचीही अगदी स्पष्ट कल्पना करून देते.
शिवगंध या पुस्तकाला आणखी एक जमेची बाजू आहे. या पुस्तकात डॉ. अमोल कोल्हे केवळ आपल्या अभिनयाबद्दलच सांगून थांबत नाहीत. या मालिकेशी जोडल्या गेलेल्या ज्या अन्य व्यक्ती आहेत... त्या व्यक्तींचे महत्त्वपूर्ण पैलूसुद्धा तितक्याच तन्मयतेने विशद करतात. निर्माता व कलादिग्दर्शक नितीन देसाई, लेखक शिरीष गोपाळ देशपांडे आणि प्रताप गंगावणे, संकलक प्रशांत खेडेकर, साहसदृश्य-दिग्दर्शक रवी दिवाण आदी या व्यक्ती होत. या अन्य व्यक्तींचा मालिकेतील सहभाग व योगदान कशा स्वरूपात होते याचाही वेध पुरेशा खोलात जाऊन या पुस्तकात लेखकाने घेतल्याने या पुस्तकास एक आगळे संदर्भमूल्य प्राप्त होते.
या पुस्तकाचे आणखी एक वेगळे अंग आहे. हे पुस्तक समकालीन विषयाच्या मालिकेचे नसून ऐतिहासिक मालिकेच्या निर्मितीची यात्रा सांगणारे आहे. साहजिकच त्यामुळे मालिका-दिग्दर्शक व अभिनेता यांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कोणता असतो; इतिहासात संदर्भ अभावामुळे कोऱ्या, रिकाम्या वा संदिग्ध राहिलेल्या जागा अभिनयाने व दिग्दर्शकीय प्रतिभा कौशल्याने कशा भरून काढल्या जातात याचेही अतिशय सुरेख चित्रमय विवरण हे पुस्तक करते.
त्या अनुषंगाने पाहता शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई यांच्या निधनाचा प्रसंग अतिशय बोलका म्हणावा लागेल. महाराज व त्यांचे इतर दरबारी यांची त्या वेळची मानसिकता दाखवण्यासाठी महाराजांचे दुःख चित्रित करताना अभिनेता म्हणून अमोल कोल्हे यांचा व दिग्दर्शक म्हणून हेमंत देवधर यांचा कस लागला होता. इतकेच कशाला... पडद्यापाठीमागचे आपले सहकलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांच्याशी लेखकाचे संबंध कसे होते याचेही वर्णन अगदी रसाळ व ओघवत्या शैलीत या पुस्तकात लेखकाने केलेय. कोणतीही मालिका दूरदर्शनवर प्रसारित होताना त्यापाठीमागचा निर्मितीचा प्रवास कसा आव्हानात्मक असू शकतो, त्यात किती जण या ना त्या प्रकारे सहभागी असतात याचे एक डोळस भान हे पुस्तक देते.
शिवगंध पुस्तकाची आणखी दोन वैशिष्ट्येदेखील दखलपात्र ठरावीत. सामान्यपणे पुस्तके ही प्रामुख्याने एकाच व्यक्तीने लिहिण्याचा प्रघात आहे. हे पुस्तक या रुळलेल्या वाटेने गेलेले नाहीये. यामध्ये प्रारंभीच्या एकोणीस प्रकरणांनंतर शेवटच्या पाच प्रकरणांमध्ये निर्माता, दिग्दर्शक व अमोल यांचे सहकलाकार यांनीदेखील आपली मनोगते मांडलेली आहेत... त्यामुळे मुख्य लेखकाबरोबरच इतरांचेसुद्धा दृष्टीकोन पैलूदार झालेत... ते यामुळेच. आजवर मराठीत दृक्श्राव्य माध्यमातील अनुभवांवर असंख्य पुस्तके मूळ व अनुवादित स्वरूपांत प्रकाशित झालेली आहेत. यामध्ये अनेक सिनेदिग्दर्शकांची व सिनेकलावंतांची चरित्रे आत्मचरित्रे, चित्रपट-समीक्षापर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अगदी सत्यजित भटकळ यांनीही ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालेल्या लगान या उत्कृष्ट सिनेमाच्या निर्मितीवर लिहिलेले पुस्तक मराठीत अनुवादित स्वरूपात प्रकाशित झाले होते ‘लगान : एका स्वप्नाचा प्रवास’... परंतु शिवगंध हे मालिकानिर्मितीवरील मराठीतील पहिलेच पुस्तक होय. या पुस्तकामुळे मालिकानिर्मितीच्या कहाणीवर लेखन करण्याचा नवा पायंडा पडला तर तेही शिवगंधचे खास वैशिष्ट्य ठरण्यास हरकत नाही.
- चैतन्य सदाशिव डुम्बरे
chetudumbre@gamil.com
पुस्तकाचे नाव : शिवगंध
लेखक : डॉ. अमोल रामसिंग कोल्हे
शब्दांकन : डॉ. नितिन दत्तात्रय आरेकर
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पेपरबॅक : रुपये 300/-
हार्डबाउंड: रुपये 400/-
(चैतन्य डुम्बरे हे स्वतः कवी, अनुवादक आहेत. कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे 'कोरी वही, निळी शाई' हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित आहे. यासिर उस्मान लिखित 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या इंग्रजी चरित्राचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.)
Tags: अमोल कोल्हे शिवगंध डिंपल पब्लिकेशन स्टार प्रवाह मालिका पुस्तक परीक्षण book review dimple publications shivgandh amol kolhe raja shivchhatrapati chaitanya dumbare Load More Tags
Add Comment