तालबद्ध नाताळ...

तर हा ‘नाताळ’ खराखुरा ‘नाताळ’ होईल...

फोटो सौजन्य : Museo dell'Opera del Duomo, Siena

कोरोनाने मृत्यूचे थैमान घातलेले असून काही ठिकाणच्या अत्याचार, बलात्काराच्या घटनांनी माणसाला पशुपातळीवर आणलेले आहे. अशा काळातील ‘नाताळ’, येशूच्या जन्माबरोबरच त्याच्या आईचाही झालेला नवजन्म म्हणून समजून घेतला; तर हा ‘नाताळ’ खराखुरा आणि तालबद्ध ‘नाताळ’ होईल! स्त्रीचाही सन्मान करणारा !!

‘ख्रिसमस’ या इंग्रजी शब्दासाठी ‘ख्रिस्तजन्म’ वा ‘नाताळ’ असे मराठी शब्द वापरले जातात. ख्रिस्तजन्म हा उचित असा मराठी शब्द असला; तरी ‘नाताळ’ हा मराठी शब्द म्हणजे Natus या लॅटीन शब्दाचा अपभ्रंश आहे. पोर्तुगीज आणि इंग्रजीत मात्र Natal हा शब्द प्रचलित आहे. त्याचा अर्थ ‘जन्म’ असा आहे. खरं तर ही वैद्यकीय संकल्पना आहे. ‘बाळाला जन्म देणे’ असा त्याचा अर्थ. बर्‍याच वैद्यकीय संकल्पना लॅटीनमधून आल्याने कदाचित, येशूच्या जन्माला ‘नाताळ’ असे मराठीत संबोधले जात असावे किंवा सामान्य माणसासारखाच येशूचा जन्म झाला असल्याने ही संकल्पना ‘ख्रिस्तजन्मा’शी तंतोतंत जोडली गेली असावी.

येशूचा जन्म मध्यरात्री वा पहाटेच्या प्रहरी झाला असे म्हटले जाते. किंबहुना विश्‍वातील एकूणच ‘महापुरुषां’चे जन्म मध्यरात्री वा पौर्णिमेच्या रात्री अथवा मध्यरात्री, पहाटेच्या वेळी झालेले आहेत, असे मानले जात. परंतु हे फार सूचक आहे. मध्यरात्र म्हणजे काळोख आणि उजेड यांची सीमारेषा. पहाटेचा प्रहर! अज्ञानाच्या अंध:कारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा महापुरुष याच सीमारेषेवर जन्माला येणार. परंतु या महापुरुषांना जन्मास घालणारी त्यांची आई, हिचाही खरं तर तो नवा जन्म असतो. प्रसववेणा सहन करून बालकाचा जन्म होताना तिच्या शरीराचे हजारो स्नायू तटतट तुटतात. त्यातून एक तर ती सहीसलामत बाहेर पडून जिवंत राहते, वा आपल्या जीवास मुकतेदेखील. कित्येकदा तर बाळ-बाळंतीण दोघेही जीवास मुकतात वा दोघेही जिवंत राहतात. असे असताना आणि विशेषत्वाने महापुरुषांचे जन्मदिवस साजरे करीत असताना त्यांना जन्म देणार्‍या ‘बाई’ला मात्र आपण सोइस्करपणे विसरतो आणि तिचा झालेला ‘नवजन्म’ही आपण विसरतो... तिला आईप्रद प्राप्त होणं हाच खरा तर तिचा जन्म असतो.

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे महान ठरलेल्या महिलांचे जन्म असे पौर्णिमेच्या दिवशी वा पहाटप्रहरी साजरे केले गेलेलेही फारसे ऐकीवात नाहीत. हा पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव! आज कोरोनाच्या काळात सामाजिक-धार्मिक-राजकीय अशा सार्‍याच व्यवस्था झपाट्याने बदलत आहेत. कोरोना या ‘महागुरू’ने केलेली ही किमया आहे. त्यामुळे जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्वच ‘साजरेपणा’वर बंधने आलेली आहेत; शिवाय मिथकांचे नवे अर्थ लावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा काळात ‘नाताळ’ कसा साजरा करायचा याचा सुज्ञ व्यक्तीने विचार करायला हवा.

1616 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ख्रिस्तपुराण’ या फादर थॉमस स्टिफन्स (1549-1619) लिखित महाकाव्यात त्यांनी येशूची आई मेरी हिचे महत्व (पुराण पैले, प्रसंगु 1-47मध्ये) वर्णन केले आहे. ते म्हणतात,

    जे इवेपासोनि हरिपले । तिथे प्रसंगी अंतरले ।
    ते तुजेनि गर्भफले लाभले । पुणती आम्हा ॥

जे एवेने (इव्हने) केलेल्या पापामुळे हरवले; ते मारियेने दिलेल्या येशू ख्रिस्तामुळे आम्हाला गवसले. खरं तर ‘जुन्या करारा’त एवेने ‘ज्ञानवृक्षा’चं फळ खाल्लं आणि तिच्या पायाने पाप चालत आले, असा ठपका ठेवलेला आहे. या मिथकांचा अर्थ सरळ सरळ प्रतीत होतो, की इव्हने जर ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ले; तर ती ज्ञानवंत झाली. परंतु बाईला पापाची धनी म्हणून धर्माधिकार्‍यांनी हात स्वच्छ धुवून पुरुषप्रधानतेचा डंका पिटला. त्या आवाजात ‘ज्ञानवृक्षा’चा अर्थ मिटून गेलेला आहे.

फादर थॉमस स्टिफन्स मारियेची महती गाताना म्हणतात, ‘तुऊं परम गतिचे माहेर’ (पुराण दुसरे प्रसंगु 2-165) ‘परम गति’ म्हणजे मोक्ष. मारियेकडे-  येशूच्या आईकडे गेल्याशिवाय, तिला शरण गेल्याशिवाय स्वर्गप्राप्ती नाही. येशूच्या जन्म अर्थात मारियेचा प्रसुतकाळ पाहण्यासाठी चंद्र उतावीळ झाला होता; दुसर्‍या प्रहरात उगवलेली नक्षत्रे, ‘ते नवल पाहावया अंबरि। स्थिराऊ पाहती’ (पुराण दुसरे- प्रसंगु - 7-53,54) अशा शब्दांत फादर स्टिफन्स यांनी वर्णन केले आहे. फादर स्टिफन्स यांना स्त्रीचे हृदय लाभले असावे, अथवा स्त्रीच्या नजरेने ते या घटनेकडे पाहतात, हे विशेष वाटते.

येशूच्या मानवीकरणाबरोबरच त्याचे महत्त्व पटवून देताना आणि ‘व्यवस्थां’चे वास्तव वर्णन करीत फादर थॉमस स्टिफन्स लिहितात,‘आमच्या मनातला अंधार नाहीसा करण्यासाठी, तू रात्रीच्या अंधारात’ जन्मास आलास, आमच्या मनाला गारठलेपण आले होते, म्हणून तू कुडकुडणार्‍या थंडीच्या काळात जन्मास आलास...आम्ही पशूपातळीवर गेलो होतो; म्हणून तूही प्राण्यांच्या सहवासात या जगात आलास. (पुराण दुसरे - प्रसंगु 7-79-80)

आज यापेक्षा वेगळी स्थिती नाही. फादर थॉमस स्टिफन्स जे चारशे वर्षांपूर्वी सांगू धजले, ते आपण आजच्या काळात का बरं बोलू शकत नाहीत? आजही आपल्याला तसेच गोठलेपण वा गारठलेपण आलेले आहे. संवेदनशीलता बथ्थड झाली आहे. मरण स्वस्त झालं आहे... अज्ञानांचा अंध:कार पाय घट्ट रोवून उभ्या आहे. कोरोनाने मृत्यूचे थैमान घातलेले असून काही ठिकाणच्या अत्याचार, बलात्काराच्या घटनांनी माणसाला पशुपातळीवर आणलेले आहे. अशा काळातील ‘नाताळ’, येशूच्या जन्माबरोबरच त्याच्या आईचाही झालेला नवजन्म म्हणून समजून घेतला; तर हा ‘नाताळ’ खराखुरा आणि तालबद्ध ‘नाताळ’ होईल! स्त्रीचाही सन्मान करणारा !!

- डॉ. सिसिलिया कार्व्हालो, वसई.
drceciliacar@gmail.com

Tags: सिसिलिया कर्व्हालो नाताळ ख्रिसमस Cecilia Carvhalo Chirstmas Jesus Christ Merry Load More Tags

Comments:

Alphie Monteiro

मातेची पर्यायाने स्त्रीची महती अधोरेखित करणारा सुंदर लेख.

विष्णू दाते

जनमानसात "नाताळा" ची आणि "आई" ची ही महती प्रसवणारा छान लेख!

Maxwel Andrew Lopes

खूपच समर्पक मुक्तचिंतन.

अरुण कोळेकर ,सासवड

अगदी खरंय. आईचाही सन्मान व्हायलाच हवा. नाताळ सणाला या लेखाने नवा अर्थ ,संदर्भ प्राप्त झाला‌ आहे. धर्म कोणताही असो स्त्रीला सन्मान आणि प्रतिष्ठा सहजा सहजी कुठेच मिळाली नाही. हा इतिहास आणि कटु वास्तव आहे. आपल्या या नव्या अन्वयार्थाने या सणाला एक नवा पैलू प्राप्त झाला आहे. आपले अभिनंदन.

Anup Priolkar

Nice article. Roll of mother is nicely highlighted.

Add Comment