तरुणाईत भिनत चाललेला मुस्लिमद्वेष

'बुल्ली बाई' आणि 'सुल्ली डिल्स' अ‍ॅप प्रकरणांच्या राजकीय-सामाजिक पैलूंचा आढावा

indiatimes.com

जुलै 2021 मध्ये 'सुल्ली डील्स' नावाचे एक अ‍ॅप चर्चेत आले होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचा कथित लिलाव केला जात होता. पुन्हा याचप्रकारचे 'बुल्ली बाई' नावाचे अ‍ॅप तयार केले गेल्याचा प्रकार नववर्षाच्या सुरुवातीलाच समोर आला. नुकतेच या प्रकरणातील महत्त्वाच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. या घटनेचा आढावा घेऊन, अशी अ‍ॅप तयार करण्यामागच्या प्रवृत्तींच्या मुळाशी जाणारा आणि अशा घटनांमध्ये समाज म्हणून आपल्याला काय भूमिका निभवावी लागेल याविषयीचा दृष्टीकोन देणारा हा लेख.

1. नीरज बिश्नोई - वय 21. बी टेक विद्यार्थी - वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोपाळ. आसाम राज्यातून दिल्ली पोलिसांनी केली अटक. ‘बुल्ली बाई डिल्स’ अ‍ॅपचा मास्टरमाईंड असल्याचा पोलिसांचा आरोप.

2. श्वेता सिंग - वय 18. उत्तराखंड राज्यातून मुंबई पोलिसांनी अटक केली. इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. ‘बुल्ली बाई डिल्स’ अ‍ॅप प्रकरणात महत्त्वाची आरोपी.

3. मयांक रावत - 20. बीएससी - केमिस्ट्रीचा विद्यार्थी. उत्तराखंड राज्यातून अटक. ‘बुल्ली बाई डिल्स’ प्रकरणात सहआरोपी.

4. विशाल झा - वय 21. दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग. सिव्हिल इंजिनीअरिंगचं दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होता. बंगलोरहून अटक. ‘बुल्ली बाई डिल्स’ अ‍ॅप प्रकरणातला आरोपी.

5. ओमकारेश्वर ठाकूर - 25. बीसीए पदवीधारक. दिल्ली पोलिसांच्या अटकेत. इंदोर - मध्यप्रदेश मधून अटक. ‘सुल्ली डील्स’ अ‍ॅप प्रकरणात अटक. 

तरूण अटकेत

मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस येणाऱ्या काळात ‘बुल्ली बाई' अ‍ॅप आणि 'सुल्ली डिल्स' प्रकरणात आणखी अटक करतील. पण, त्याआधी सध्या अटकेत असलेल्या वरील पाच आरोपींची नावं, त्यांचं शिक्षण आणि वय या तीनही गोष्टी पुन्हा एकदा वाचूया. मग या प्रकरणाने समाजासमोर आणलेली दोन महत्त्वाची गंभीर आव्हानं समजून घेऊया. 'सुल्ली डिल्स' आणि 'बुल्ली बाई' या अ‍ॅप या माध्यमातून मुस्लिम महिलांचे ऑनलाईन लिलाव करण्यात आले. ते लिलाव करणारे आरोपी कोण, तर पोलिसांच्या सध्याच्या तपासानुसार वरील आरोपी. विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या मुस्लिम महिलांच्या नावाची निवड करून, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे खासगी फोटो वापरून त्यांना हिणवणारे असे हे ऑनलाईन लिलाव जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहींपैकी एक असलेल्या भारतात घडवून आणण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी ‘सुल्ली डिल्स’च्या माध्यमातून घडलेल्या या प्रकाराविरोधात देशभरात विविध ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या. दिल्लीमध्येही तक्रार झाली. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या दिल्ली पोलिसांनी या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीला ‘बुल्ली बाई अ‍ॅप’ नावाने पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना टार्गेट करण्यात आलं. पण यावेळी देशभरातल्या विविध भागातल्या पुरोगामी व्यक्तींनी जोरकस आवाज उठवला. महाराष्ट्र सरकारने पहिलं पाऊल उचललं. मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार बंगळुरू येथून पहिली अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांवरचा नैतिक दबावही वाढला आणि अखेरीस दिल्ली पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली. 

‘सुल्ली’ आणि ‘बुल्ली’ म्हणजे काय?

‘सुल्ली’ आणि ‘बुल्ली’ याचा अर्थ काय, असं अनेकांनी विचारलं. ही स्लँग आहे. मुस्लिम बायकांना मानहानीकारक किंवा अपमानास्पद, म्हणून ही नावं अ‍ॅपला देण्यात आली. हे ऑनलाईन लिलाव करणारी मंडळी सोशल मिडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव होती. स्वत:ची मूळ नावं बदलून खोटी - दिशाभूल करणारी नावं परिधान करून त्यांचा सोशल मिडियावर वावर सुरू होता. या खोट्या नावांमुळे शीख व्यक्ती हे काम करत असल्याचं भासवलं जात होतं. 

विशी ते साठीतल्या मुस्लिम बायकांचे ऑनलाईन लिलाव झाले. अमेरिकेतील 'गिटहब' या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे फोटो दाखवून लिलाव झाले. ज्या महिलांचे फोटो यासाठी वापरले गेले, त्यांची यादी पाहता या लिलावांमागचा उद्देश सहज लक्षात येतो. मुस्लिम महिलांना धमकावणं, घाबरवणं, दहशत पसरवणं, त्यांना गप्प करणं, त्यांना आपल्याच देशात हीन वागणूक देणं, त्यांचं चारित्र्यहनन करणं याच उद्देशाने हे काम करण्यात आलं. ‘तुमच्या परवानगीशिवाय तुमचे फोटो ऑनलाईन झळकवून आम्ही तुमचे लिलाव करू शकतो, तुमची काय लायकी आहे?’ असं मेसेजिंग त्यात अध्याहृत होतं. या लिलावांसोबतच सोशल मिडियावर जी मीम्स शेअर केली जात होती त्याचा कटेंट अत्यंत सेक्शुअलाईज्ड आणि व्हायलंट टोनचा होता. 

तुम्हा सगळ्यांना आठवत असेल, 2020 ला कोविड-19 चा जगावर हल्ला होण्याआधी भारत देशामध्ये ठिकठिकाणी 'एनआरसी' आणि 'सीएए' विरोधात आंदोलनं सुरु होती. दिल्लीमध्ये 'शाहिन बाग'मध्ये आंदोलन करणाऱ्या भारतीय मुस्लिम महिला या लोकशाही आंदोलनाचा चेहरा बनल्या होत्या. लॉकडाऊनमुळे ही आंदोलनं मागे घेण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने अत्यंत दडपशाहीच्या मार्गाने शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता, 'कृषी कायदे' आणले. कृषीविषयक कायद्यांत सुधारणांची गरज कुणीच नाकारत नाही. मात्र या देशातील संसदीय कामकाज पद्धतीचा, शेतकऱ्यांचा आणि इतरही अनेक घटकांचा मान न राखता; जनमताला कुठलीही जागा न ठेवता हे कायदे लादण्यात आले. उत्तरेकडील शेतकऱ्यांनी वर्ग-जात-धर्म यांच्या बेड्या न मानता एकत्र येत याविरोधात मोठं आंदोलन केलं. जवळपास वर्षभर चाललेल्या या आंदोलनामुळे नरेंद्र मोदी सरकारला अखेर झुकावं लागलं. या आंदोलनात पंजाब-हरियाणाचे शेतकरी मोठ्या संख्येने नेतृत्व करत होते. शीख शेतकऱ्यांना त्यामुळेच 'देशद्रोही’, ‘खलिस्तानवादी' अशी लेबल्स उजव्या विचारसरणीच्या नेत्यांनी उघडपणे लावली होती. पॉपस्टार रिहाना हिने जेव्हा लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल ट्वीटरवरून प्रश्न विचारला होता, तेव्हा तिला ट्रोल करण्यात हेच उजव्या विचारसरणीचे लोक आणि त्यांच्यासमोर लाचारी पत्करलेले सेलिब्रिटीज् होते. त्यामुळे मोदींनी कायदे मागे घेतले तरी या लोकांची पोटदुखी कायम होती. शीखांना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न सुरुच होते. ‘बुल्ली बाई डिल्स’च्या माध्यमातून तीन तीर मारण्यात आले - मुस्लिम द्वेष, शीखांची बदमानी आणि महिलांचा अपमान. 

2014च्या निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडियाचा राजकीय निवडणुकीचं टूल म्हणून वापर सुरु केला. त्यानंतर हळूहळू महिलांविरोधी सेक्शुअलाईज्ड, व्हायलंट ट्रोलिंगसाठी त्याचा पद्धतशीर वापर करण्यात येत होता. पण सुल्ली डिल्स आणि बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणाने त्याचा कळस गाठला. 

गंमत म्हणजे, या तरूण आरोपींनी आता जामिनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. व्हर्चुअल जगात आपण कधीच पकडले जाणार नाही, द्वेष पसरवण्याचा आपला प्रयत्न तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लपून करता येईल, हा त्यांचा गैरसमज पोलिसांनी मोडून काढला आहे. कायद्याचं राज्य म्हणजे काय, ते हेच. व्हर्चुअल जगातलं तुमचं वर्तन बेजबाबदार असलं तर खऱ्या जीवनात त्याचे काय परिणाम होतात, याचे धडे हे आरोपी सध्या घेत आहेत.  त्यातून ते काही शिकतील की नाही, त्यांच्यावरच्या खटल्यांचा निकाल काय लागेल, ते दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होईल का, किती होईल, त्यांना जामिन कधी मिळेल, त्यांच्या घरच्यांना या सगळ्यामुळे नेमकं कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे असे अनेक प्रश्न सध्या समोर आहेत. पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कधी पकडला जाणार की नाही? याचं उत्तर सध्या तरी ‘नाही’ असं दिसतंय. कारण सोपं आहे. सत्ता, पॉवर!

मुस्लिम द्वेष  

मॉब लिंचिंग - जमावाने ठेचून मुस्लिमांना मारण्याच्या घटना आत्ताशा कुठे कमी होऊ लागल्या आहेत. तरीही व्हाट्सअ‍ॅपवर दररोज द्वेषाचे, खोट्या माहितीचे असंख्य मेसेजेस एक्स्चेंज होतात. भारतातला प्रत्येक मुस्लिम हा जणू पाकिस्तानधार्जिणा आहे, अशा अफवांचं पीक पोसून मोठं करण्यात आलंय. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत, या देशाच्या उभारणीत ज्या मुस्लिमांनी जीव ओतला त्यांचं योगदान द्वेषाचा वापर करून पुसलं जातंय. इतिहास नव्याने लिहिला जातोय. भारत देशाची निर्मिती ही पाकिस्तानप्रमाणे धर्माच्या आधारे झालेली नाही त्यामुळे ज्या मुस्लिमांनी भारत देशात राहणं पसंत केलं, निवडलं त्यांनी इथली लोकशाही समृद्ध केली. विविधता नटवली. या देशावर त्यांचाही तेवढाच हक्क आहे जेवढा हिंदूंचा आहे. हे सत्य गेल्या अनेक वर्षांत लोकांना स्विकारायला लावण्यासाठी या देशात स्वातंत्र्योत्तर काळात अनेक प्रयत्न झाले. कारण फाळणीच्या जखमांची खपली कुणालाच काढायची नाही आहे. 'मिले सूर मेरा तुम्हारा' पासून ते बॉलिवूडच्या ‘किंग खान’पर्यंत हा मिलाफ भारतीय संस्कृती बनला होता. पण भाजप सत्तेत आल्यावर अचानक 'हिंदू खतरेमे आ गये’. हिंदुत्ववादी पार्टी सत्तेत आल्यावरच हिंदूंना धोका कसा काय संभवतो? कारण त्यांचं राजकारण द्वेषावर आधारलेलं आहे. 

आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देण्याऐवजी ‘लव्हजिहाद’चं राजकारण सुरु झालं. दिवाळीच्या जाहिरातीत मॉडेल्सनी टिकली लावली नाही, तर संस्कृती बुडाल्याच्या आवया उठल्या! अशा घटना मग रोजच्याच बनल्या. कितीतरी भारतीय मुस्लिमांना दिवसाढवळ्या जमाव धमकावू लागला. 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या तरच तुमचं राष्ट्रप्रेम सिद्ध होईल, असं ठणकावून सांगितलं जाऊ लागलं. नॉएडामध्ये नमाज पढणाऱ्या मुस्लिमांना रोज धमकावलं जाऊ लागलं. हे रुटीन बनलं. सोशल मिडियावर तर ‘मिसइनफर्मेशन’चा महापूर येऊ लागला. मुस्लिमांना घरं नाकारण्यापुरता आता हा द्वेष मर्यादित नव्हता. मुस्लिम आणि त्यांच्या घटनादत्त अधिकारांविषयी बोलणाऱ्या प्रत्येकाला 'पाकिस्तानला जा', असे सल्ले दिले जाऊ लागले. हे इतकं, की आता गंभीरपणे लोक बोलतात, “मुस्लिमांना असुरक्षित वाटतं तर ते देश सोडून का जात नाहीत?”  “पण का जावं त्यांनी त्यांचा हा भारत देश सोडून?” असा प्रतिप्रश्न विचारणाऱ्याला ‘अँटीनॅशनल’ म्हटलं जाऊ लागलंय. इतका विखार कुठून आला, अचानक आला का? …नाही. ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये वाढवलेलं हे द्वेषाचं राजकारण कमी करण्याचे खूप प्रयत्न झाले. विविधता हीच भारताची संस्कृती आणि ओळख आहे, असा राजकीय संदेश देण्यानेच भारताचा सन्मान झाला असता. पण फॅसिस्ट उजव्या विचारसरणीला ते नको आहे.

थोडं मागे जाऊया. वि. दा. सावरकर यांनी त्यांच्या ‘इतिहासाची सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात चौथ्या प्रकरणात शिवाजी महाराजांवर ‘सद्गुण विकृती’ची टीका केली आहे. कारण, मुस्लिम सुभेदाराच्या सुनेला त्यांनी आदराने परत पाठवलं. सावरकर त्यांच्या या लिखाणात राजकीय बदला घेण्याचा पुरस्कार करतात. तो न घेतल्याबद्दल महाराजांवर 'सद्गुण विकृती' म्हणून टीका करतात. तिथपासून ते संघाच्या मुस्लिम द्वेषापर्यंत राजकारण येऊन ठेपलंय. 

आज उत्तरप्रदेशमध्ये ‘80 टक्के - 20 टक्के’ची भाषा अमित शहांनी सुरु केली आहे. 'घर मे घुस के मारेंगे'ची भाषा त्यांनी राजकारणात रुळवली. जो द्वेष बोलायला, दैनंदिन जगण्यात दाखवायला जनता बिचकायची; त्या द्वेषमूलक वातावरणाला राजकीय आश्रय, निर्भय देऊन त्याला औपचारिक रुप देण्यात आलं ते याच सरकारच्या काळात. राजकीय नेते जी भाषा बोलतात त्यातला प्रत्येक शब्द जनतेवर परिणाम घडवतो. मुस्लिमांच्या नावाचा टाळलेला उच्चार, लिंचिंगच्या घटनांबद्दल पंतप्रधानांनी बाळगलेलं मौन, गोरक्षेच्या नावाखाली सुरु असलेली लूट आणि धुडगूस हे कुठे नेणार होतं? तरूणांच्या मनात द्वेष खदखदू लागला. दिवसरात्र गोदी मिडियाचे मोहरे देशासमोरचे खरे प्रश्न, मुद्दे, माणसं हे सोडून भारत - पाकिस्तान, हिंदू - मुस्लिम असा आरडाओरडा करत आहेत. ‘मास मिडिया’चा परिणाम समाजावर होणारच. समाज केवळ बधीर नाही झाला तर द्वेषाने पेटला. आजची तरुण मुलं, तरुण नागरिक हे भविष्यात देशाचे जबाबदार नागरिक होणार आहेत. त्यामुळे ‘सुल्ली डील्स’ आणि ‘बुल्ली बाई’ अ‍ॅपमधला तरुणांचा सहभाग ही देशाच्या एकात्मतेला धक्का मारणारी खूप खालची पातळी आहे. ती एक सुट्टी घटना म्हणून त्याकडे पाहता येणार नाही.

दिल्लीतून पोलिस सूत्रांच्या हवाल्याने ज्या बातम्या येत आहेत; त्यांमध्ये असं सांगण्यात येत आहे की, बिश्नोईला त्याने केलेल्या कृत्याबद्दल जराही पश्चाताप होत नाही आहे. हे भयानक आहे. याचं कारण, हिंदू-मुस्लिम द्वेषाचं विष आजच्या तरूणाईत भिनवण्यात राजकीय व्यवस्था यशस्वी ठरली आहे असा याचा अर्थ होतो.

कुठल्याही राजकीय युद्धात महिला आणि तरूण मुलं हे राजकीय हत्यार म्हणून वापरले जातात, हे इतिहासातून आपण शिकलोय. देशात अघोषित आणीबाणीच्या रूपाने जी दडपशाही सुरु आहे, जे सुप्त युद्ध दोन धर्मांच्या जमातीत लावण्यात आलं आहे, त्यामध्ये महिला आणि मुलांचा - तरूणांचा वापर पुन्हा एकदा होताना दिसत आहे. इथून पुढे आपल्याला ‘आयडिया ऑफ इंडिया’ टिकवायची असेल तर प्रेमाची, सौदार्हाची, माणुसकीची शिकवण देणं इथून सुरुवात करावी लागेल. ज्या मूल्यशिक्षणाला अलीकडच्या शिक्षणाने नाकं मुरडली, तिकडेच परत जावं लागेल. आधुनिक तंत्रज्ञान माणसाला समृद्ध जगायला मदत करेल पण त्या जगण्याची दिशा माणसाला ठरवून द्यावी लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या अल्गोरिदमवर जगणं सोडून दिलं तर भविष्य भयंकरच असेल. ‘आजची पिढी टेक्नोसॅव्ही – तंत्रज्ञानप्रेमी, फार पुढचा विचार करणारी’ असं म्हणून पालकांना अंग झटकता येणार नाही. बाहेरच्या जगात हा द्वेष, मिसइनफॉर्मेशन असणारच आहे. तेव्हा त्यातलं काय निवडायचं, कसं निवडायचं हे तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. चुप्पी तोडली पाहिजे. आपल्या संस्कृतीमधले अनेक दाखले त्यासाठी पालक म्हणून तुम्ही देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जागतिक घडामोडींचं भान असलं पाहिजे, देशाच्या राजकारणाची माहिती असली पाहिजे. मिसइनफर्मेशन कशी ओळखायची, एवढं तरी तुम्ही मुलांना शिकवू शकताच.

नीरज, श्वेता, मयांक, विशाल, ओमकारेश्वर यांच्या कहाण्या तुमच्या तरूणवयात येणाऱ्या मुलांना सांगा. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार या मुलांनी काय चूक केली ती समजवा. मुस्लिम महिलांची ऑनलाईन मिम्सच्या माध्यमातून केलेली विटंबना ही ‘विनोद’ किंवा ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ या कॅटेगरीत मोडत नाही, तर ‘गुन्हा’ या कॅटेगरीत मोडते हा फरक त्यांना समजावून सांगा. तुमच्यामध्ये भरलेला द्वेष तुम्ही कळत - नकळत पुढच्या पिढीपर्यंत पोचवता. या द्वेषाचं रुपांतर गुन्ह्यांमध्ये व्हायला वेळ लागत नाही, हे ‘सुल्ली डिल्स’ आणि ‘बुल्ली बाई’ अ‍ॅपच्या माध्यमातून दिसून आलंय. तेव्हा या द्वेषाच्या रोगावर उपाय म्हणून भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांसोबत तुमच्या मुलांची ओळख करून द्या. भारतीय लोकशाही टिकवायचं 'टूलकिट' कदाचित यातच दडलेलं असू शकतं.

-  अलका धुपकर
alaka.dhupkar@gmail.com 
(लेखिका 'टाईम्स इंटरनेट लिमिटेड'च्या सहायक संपादक आहेत.)  


हेही वाचा :
बोलती हुई औरतें... : हिनाकौसर खान 

Tags: सुल्ली डील्स लव्हजिहाद हिंदू-मुस्लिम द्वेष Load More Tags

Comments:

विश्वास पेंडसे

२०२४सालची निवडणूक टर्निंग ठरणार आहे.लोक नक्की म्हणणार कोणत्याही परीस्थितीत बीजेपीची हिंदुराष्ट्र कल्पना नको कारण लोकाना टैकाच्या धर्मद्बेषाचे हत्याकांडची कल्पना आहे.त्याना अफणाण सौदी अरेबिया सिरिया या देशांतील जनतेचे हाल दिसत आहे.भारतीय जनता नक्कीच सुद्ज्ञ आहे.

दिपाली अवकाळे

अगदी सरळ आणि सोप्या भाषेत महत्वाचा विषय मांडला आहे. हा लेख नुसताच प्रश्न मांडत नाही तर आपल्याला पुढील विचार व कृति यासाठीची दिशा सुद्धा देतो. लेखिकेने अज्जिबात "विक्टिम" रोल मधे न जाता लिहिले आहे याबद्दल विशेष धन्यवाद.

मोहन देशपांडे.

मिडिया वर प्रसिध्द होणाऱ्या बातम्यांच्या शब्दाकनावर आणखी टोकाच्या चर्चेवर विचारवंतांनी नियंत्रण ठेवावे.तरुण पिढी संस्कारक्षम असते.देशातील घटना अशा ऐकीव गोष्टीतून कशा प्रकारे सादर व्हाव्यात यावर वचक हवा. अन्यथा एरंडाच्या गुऱ्य्हाळाप्रमाणे ही चर्चा अनाठायी ठरेल.

Suresh Pund

छान विश्लेषण.

Add Comment