मुंबईत मागील आठवड्यात दोन मोठी आंदोलनं झाली. एकाचं आयोजन कॉक्रोच जनता पार्टीने केलं होतं तर दुसऱ्याचं ठाकरे बंधूंनी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराचा जाब विचारणं आणि त्यांचा राजीनामा मागणं हा या दोन्ही आंदोलनांमागचा उद्देश. मुंबईत असल्यामुळे अनायसे ही दोन्ही आंदोलनं जवळून अनुभवता आली. दोन्ही आंदोलनाला उपस्थित असलेली तरुण मंडळी आणि इतर जाणते लोकसुद्धा केवळ कुठल्या विशिष्ट पक्षाला पाठिंबा म्हणून एकत्र जमले नव्हते. त्यापैकी प्रत्येकाच्या मनात देशात काहीतरी चुकीचं घडतंय आणि त्याविरोधात आपण आवाज उठवायला हवा अशी साधारण भावना दिसून येत होती. या दोन्ही आंदोलनात नेमकं काय दिसलं याविषयीचा हा थोडक्यात वृत्तांत..!
दोन-अडीच महिन्यांपूर्वी दिल्ली गाजवलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं वलय दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर हे सीजेपीचं प्रमुख हत्यार बनलं आहे. जंतरमंतरवर महिनाभर ठिय्या मांडल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची करामत सीजेपीने करून दाखवली. त्यानंतर स्कुल ठीक करो आंदोलनाच्या निमित्ताने देशभरातील सरकारी शाळांच्या स्थितीविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली.
याच काळात द इंडियन एक्सप्रेसच्या रितिका चोप्रा यांच्या शोधपत्रकारितेने देशभरात खळबळ माजवली. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा रिपोर्ट त्यांनी प्रसिद्ध केला. वादग्रस्त SIR प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जातोय, मतदान कुणी करायचं हे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजप ठरवत आहेत, अशी मांडणी राहुल गांधी मागील वर्षभर करत होते. त्यांनी यासंदर्भात तीन-चार वेळा पत्रकार परिषदाही घेतल्या होत्या. मात्र त्याचा तितका प्रभाव दिसून आला नव्हता. रितिका चोप्रा यांच्या रिपोर्टनंतर मात्र काँग्रेस, सीजेपी आणि देशातील विरोधी पक्षातील इतर लोकांनी आक्रोश वाढवला आणि रस्त्यावरची लढाई सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सीजेपीने गांधी जयंतीदिवशी मुंबईतून याचा एल्गार पुकारला. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील गोंधळ, पक्ष फोडून सरकार बनवण्याचे उद्योग आणि निवडणुकीतील पैशांचा वारेमाप वापर हे मुद्दे केंद्रस्थानी होते. आंदोलन मुंबईत सुरू करून ते दिल्लीपर्यंत नेण्याचा विचार सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बोलून दाखवला. जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा असूनही ते शक्य न झालेल्या हजारो तरुणांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. सीजेपीच्या लोकांनी दोन दिवस आधीपासून मुंबईत वातावरणनिर्मिती सुरू केली. अभिजित दिपके स्वतः लोकांमध्ये जाऊन आंदोलनाला येण्याचं आवाहन करत होते. चहा-पोहे खात, रिक्षातून फिरत, मरीन ड्राइव्हवर फिरत किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या भेटी घेत आंदोलन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू होता. ठाकरे बंधूंनीही पत्रकार परिषदेत सीजेपीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
2 ऑक्टोबर 2026 - कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन - शिवाजी पार्क, गेट नं. 6
आंदोलनाची वेळ संध्याकाळी 4 वाजता असली तरी बाहेरगावाहून आलेले अनेक लोक सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात होते. टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी कॅमेऱ्यांसाठी जागा तयार करत होते, इन्फ्लुएंसर लोकांच्या बाईट्स घेत होते आणि क्रिएटिव्ह पोस्टर्स दिसत होते. सीजेपीने तयार केलेला ‘गद्दार ग्यानू मस्ट गो’ हा मोठा फ्लेक्सही लावला जात होता. दुपारी 12 ते 3 या वेळेत वातावरणनिर्मितीचा हा कार्यक्रम सुरू होता.
दुपारनंतर तरुणांची गर्दी वाढू लागली. शिवाजी पार्क गेट नं. 6 ते शिवसेना भवन परिसरातील रस्ते लोकांनी भरू लागले. या गर्दीत जेन झीची संख्या सर्वाधिक होती. क्रिएटिव्ह मिम्स, पोस्टर्स, त्यांचे फोटो, रील्स आणि सोशल मीडियावर तात्काळ पोस्टिंग हा तरुणांचा उत्साही कार्यक्रम सुरू होता. ‘बंदे में था दम’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘रंग दे बसंती’ अशी गाणी वाजत होती आणि त्यावर तरुण थिरकत होते.
4 वाजल्यानंतर स्टेजवर वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना बोलण्याची संधी देण्यात आली. जवळपास 6-7 हजार तरुण परिसरात जमले होते. मराठी-अमराठी अशा सर्वांचा त्यात समावेश होता. पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटक अशा राज्यांतूनही तरुण आले होते. नंतर मिलेनियल्स आणि सिनिअर सिटीझन्सही सहभागी झाले. दिशा, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र या संघटनांनी डफ वाजवत, घोषणा देत आणि चळवळीतील गाणी सादर करत वातावरणात जोश निर्माण केला. ‘जय भीम’, ‘हम लेके रहेंगे आझादी’, ‘हल्लाबोल’, ‘ज्ञानेश कुमार इस्तीफा दो’, ‘ज्ञानेश कुमार को फासी दो’, ‘नरेंद्र मोदी व्होटचोर’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. स्टेजवरील सीजेपीची भाषणं आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची सांस्कृतिक अभिव्यक्ती समांतरपणे सुरू होती.
आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांशी बोलल्यावर त्यामागची कारणंही वेगवेगळी असल्याचं दिसलं. उत्तर प्रदेशातील आझमगडचा 34 वर्षीय प्रवीण यादव ऐरोलीत राहतो आणि फार्मा कंपनीत काम करतो. देशाची सिस्टीम करप्ट झाली असून महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांतील धांदली, शिक्षण, आरोग्य आणि प्रशासनातील भ्रष्टाचार, पेपर लीक, बेरोजगारी आणि महागाई या सगळ्याबाबत प्रश्न विचारले पाहिजेत, असं त्याचं म्हणणं होतं. लोकांच्या मताशी खेळ करणाऱ्या निवडणूक आयुक्तांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, म्हणून तो आंदोलनात आला होता.
22 वर्षांची हर्षदा समाजशास्त्र विषयात मास्टर्स करत असून 25-30 मित्रमैत्रिणींसोबत आंदोलनात आली होती. ती दिशा विद्यार्थी संघटनेची प्रतिनिधी आहे. मत देण्याचा मूलभूत अधिकारच निवडणूक यंत्रणा हिरावून घेत आहे, असा तिचा आरोप होता. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला जाब विचारण्यासाठी जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरावं लागेल तेव्हा आम्ही उतरू, अशी तिची भूमिका होती. तिच्या देहबोलीतून तरुणांचा सळसळता जोश जाणवत होता.
सीजेपीच्या आंदोलनाचं व्यवस्थापन करण्यासाठी जवळपास 300 लोकांची टीम कार्यरत होती. स्वयंसेवक, त्यांना मार्गदर्शन करणारे मार्शल आणि आंदोलनाचं कव्हरेज करणारे क्रिएटर्स अशा तीन स्तरांवर व्यवस्था होती. पाणी आणि वैद्यकीय सुविधांचीही खबरदारी घेण्यात आली होती.
सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधून आलेले विद्यार्थीही आंदोलनात होते. शुभम लंगडे याने छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील विद्यार्थी व आदिवासी आंदोलनांना अभिजित दिपके यांनी दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या नेत्याच्या मागे उभं राहायला हवं म्हणून आवाहन होताच मुंबईला आलो, असं त्याने सांगितलं. अभिजित दिपके मागील 2 महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत आणि दुर्गम गावांत जाऊन समस्या समजून घेत असून त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. या माध्यमातून त्यांनी स्थानिक संपर्काचं नेटवर्कही उभं केलं आहे, हे आंदोलनात आलेल्या लोकांवरून जाणवत होतं.
आंदोलनात अनुभवी व्यापारीही होते. ठाण्यातील दिनेश आणि प्रिया हे जोडपं आंदोलनाचं निरीक्षण करत होतं. लोकांच्या मूलभूत अधिकारांबाबत महत्त्वाचा मुद्दा मांडला जात आहे आणि जेन झी या मुद्द्यांवर बोलत आहे, म्हणून आपण त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं दिनेश म्हणाले. अनेक वर्षांनंतर तरुणांची ताकद योग्य दिशेने काम करताना दिसतेय, हे समाधानकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
50 वर्षीय विनायक साळुंखे यांच्या मते सीजेपीला पाठिंबा देणारे तरुण कोणत्याही राजकीय विचारसरणीच्या पलीकडचे आहेत. स्वतःच्या अडचणी समजून त्या मांडण्याची आणि कुणाचीही भीड न बाळगता प्रश्न विचारण्याची त्यांची तयारी आहे. मात्र इतर राजकीय पक्षांच्या आणि डाव्या संघटनांच्या विद्यार्थी नेत्यांनी सीजेपीसोबत एकत्र लढा द्यायला हवा, असं त्यांचं मत होतं. 2029च्या निवडणुकीत तरुणांचा मतातील वाटा सर्वाधिक असणार असून आज रस्त्यावर उतरलेली हीच पिढी उद्याचा देश बदलणार आहे, असं ते म्हणाले.
23 वर्षांची श्रिया मूळची पश्चिम बंगालची असून 8 वर्षांपासून मुंबईत आहे. नव्या मतदार यादीत तिच्या आई-वडिलांची नावं हटवण्यात आली आहेत. 40-50 वर्षं देशात राहिल्यानंतरही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणं चुकीचं असल्याचं ती म्हणाली. बंगालमध्ये लोकांना बांगलादेशी ठरवण्याचे प्रकार सुरू असल्याचाही तिने आरोप केला.
कोलकात्याहून 30 मित्रांसोबत रेल्वेने आलेला 27 वर्षीय दीपांकरही याच मुद्द्यावर बोलला. मागील 6 महिन्यांत बंगालमध्ये मुस्लिमांमध्ये दहशत निर्माण करण्याचे आणि त्यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा त्याचा आरोप होता. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही हल्ले होत असून उन्मादी वातावरण तयार झाल्याचं तो म्हणाला. मतदार यादीतून लाखो मतं कापून भाजप सत्तेत आली असून शक्य झाल्यास ती निवडणूकच रद्द व्हावी, अशी भावना त्याने व्यक्त केली.
आंदोलनाच्या स्टेजवर शबाना आझमी, विशाल ददलानी, साम्या कोरडे, मोहम्मद जुनैद, सौरभ दास, आशुतोष रांका आणि अभिजित दिपके यांनी आपले मुद्दे मांडले. जात-धर्माच्या आधारावर देशाची विभागणी मान्य नसून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका सर्वांनी मांडली. ज्ञानेश कुमार यांनी देशासोबत विश्वासघात केला असून त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं दिपके म्हणाले. गांधी जयंतीच्या निमित्ताने गांधी विचार देशाचा आत्मा, आंबेडकर विचार पाठीचा कणा आणि नेहरू विचार देशाचं मन असल्याचं त्यांनी सांगितलं. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी हा लढा जेन झी स्टाईलने, हसत-खेळत पण मुद्द्याचं गांभीर्य न सोडता लढला जाईल आणि 10 ऑक्टोबरपासून जंतरमंतरवर पुढील आंदोलन सुरू होईल, अशी घोषणा केली.
देशातील तरुण सोशल मीडियाच्या जंजाळात अडकत आहेत अशी भीती व्यक्त होत असताना शिवाजी पार्कवरची तरुणाई सोशल मीडियाच्या ताकदीवरच महत्त्वाचे प्रश्न मांडताना दिसत होती. दिल्ली आणि झारखंडमधील आंदोलनात अन्न-पाण्याची व्यवस्था करणाऱ्या मोहम्मद जुनैदसोबत फोटो काढण्यासाठी तरुणांनी केलेली गर्दीही लक्षणीय होती. मागील 3 महिन्यांत हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून लोकांना भडकवणं सोपं राहिलेलं नाही, याची जणू पोचपावतीच या प्रसंगातून मिळत होती. काही जण पहिल्यांदाच आंदोलनात सहभागी झाले होते, तर काही जण आंदोलनाच्या क्रेझमुळे आले होते. तरीही 10 हजारांहून अधिक लोकांना ठोस कार्यक्रम देण्यात सीजेपी यशस्वी ठरली, हे नाकारता येत नाही.
आंदोलन क्रमांक 2 - 4 ऑक्टोबर 2026 - ठाकरे बंधू - बृहन्मुंबई महानगरपालिका ऑफिससमोरील रस्ता
सीजेपीच्या आंदोलनानंतर 2 दिवसांनी ठाकरे बंधूंनी मुंबईत दुसरं मोठं आंदोलन केलं. ‘ठाकरेंचा आदेश आला की तो ऐकायचाच’ या भावनेने आयुष्य घालवलेले हजारो शिवसैनिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मेट्रो सिनेमा ते महापालिका ऑफिस या परिसरात सकाळी 10 वाजल्यापासून गर्दी होऊ लागली. मेट्रोमधून सीएसटीकडे येणारे शिवसैनिक हातात शिवबंधन आणि तिरंगा घेऊन मोर्चाच्या तयारीत दिसत होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी त्यांनी वातावरण भारावून टाकलं.
मेट्रो सिनेमा परिसरात 8-10 हजार लोक जमले होते. सीजेपीच्या तुलनेत क्रिएटिव्ह पोस्टर्स कमी असले तरी रंजक पोस्टर्स दिसत होते. दोन्ही आंदोलनांचा सुरुवातीपासून अनुभव घेतल्यामुळे सांगता येईल की ठाकरेंच्या आंदोलनाला सीजेपीपेक्षा जवळपास तिप्पट गर्दी होती. मात्र महत्त्वाचा फरक असा की सीजेपीच्या आंदोलनात तरुणांची संख्या मोठी होती, तर ठाकरे बंधूंच्या आंदोलनात सर्व वयोगटातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आयोजक अॅड. अनिल परब आणि बाळा नांदगावकर कार्यकर्त्यांना सूचना देतानाच पोलिसांशी समन्वय साधत होते. मुंबईच्या विविध भागांतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आले होते. त्यात रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला, डबेवाले, खासगी कंपनीतील कर्मचारी, छोटे-मोठे व्यावसायिक होते. भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातूनही कार्यकर्ते आले होते.
त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यामागची कारणं वेगवेगळी असली तरी काही मुद्दे समान होते. ठाकरेंचा आदेश आणि त्यांच्यावरील प्रेम, शिवसेनेतील फूट आणि त्याचा शिंदे गटाला झालेला फायदा, सरकार गरिबांसाठी काही करत नसल्याची भावना, महागाई-बेरोजगारी आणि भाजपकडून विविध यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची नाराजी ही त्यापैकी प्रमुख कारणं होती. निवडणूक आयोग दोषी असेल तर भाजपचे नेते त्याच्या बचावासाठी का बोलतात, यात त्यांचाही सहभाग आहे का, अशी साधी शंकाही लोक व्यक्त करत होते. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या घोषणा त्यामुळे सुरू होत्या.
हेही वाचा : How Should We View the Cockroach Janta Party? (Editor - vinod Shirsath)
उद्धव आणि राज ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी आल्यानंतर उत्साह वाढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही मनोगत व्यक्त केलं. राज ठाकरेंनी सरकारवर टीका करत SIR प्रक्रिया रद्द करून निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जिथे विरोधकांचं बळ वाढतं, तिथे केंद्र सरकार निवडणूक आयोगामार्फत गैरप्रकार करत असल्याचा आरोप केला.
एकूणात दोन्ही आंदोलनांत महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील 50-60 हजारांहून अधिक लोक मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. ही सगळीच माणसं स्वतःच्या बुद्धीने आंदोलनात आली होती असं मानता येणार नसलं तरी आपल्या आसपास काहीतरी चुकीचं घडतंय, ही भावना त्यांच्यात होती. याच काळात दिल्लीतील जंतरमंतरवर नेहा बोरा आणि योगेंद्र यादव यांनी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न केला; तो पोलिसांनी हाणून पाडला. तिथेही हजारोंच्या संख्येने नागरिक एकवटले होते.
लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणारी प्रक्रिया मनमानी असून असं करणं म्हणजे त्यांच्या शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी नुकतंच म्हटलं आहे. मात्र झालेल्या प्रकारात काहीच चुकीचं नाही, देशात सगळं आलबेल आहे आणि विरोधकांना लोकांनी नाकारल्यामुळे त्यांची धडपड सुरू आहे, असं सांगत भाजप नेते या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी विरोधक आणि पत्रकारांकडे झालेला प्रकार चुकीचा असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर चौकटीतून संरक्षण देणारी तरतूद केंद्र सरकारने 2023 मध्ये केली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर चुकीला चूक म्हणण्याचं धाडस दाखवत सत्ताधाऱ्यांना नामोहरम करण्याचा विडा उचललेल्या सीजेपीला मुख्य निवडणूक आयुक्तांच्या खुर्चीला धक्का लावता येतो का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. 10 ऑक्टोबर 2026पासून या आंदोलनाचं पुढचं बिगुल वाजणार आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत असताना सीजेपी त्यांना किती बळ पुरवते आणि सोबतीने ही लढाई यशस्वी करते का, याचं उत्तर मिळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.
- योगेश जगताप
yogeshjagtap8819@gmail.com
(लेखक महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर लेखन करणारे मुक्त पत्रकार आहेत.)
Tags: thackrey brothers raj thackrey uddhav thackrey gyanesh kumar election commission ज्ञानेश कुमार निवडणूक आयोग सीजेपी ठाकरे राज ठाकरे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेना गर्जना sir एस आय आर Load More Tags
Add Comment