जी.एं.च्या कथेतील जोगतिणींचे गूढ विश्व

जी.ए. कुलकर्णी यांचे जन्मशताब्दीवर्ष आज संपते आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या कथांतील एका अनवट पैलूवर दृष्टीक्षेप.

मराठी कथावाङ्मयातील मानदंड ठरलेले प्रतिभावंत साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांनी आपल्या कथांमधून मानवी दुःखाची, वेदनेची अथांगता,अगम्यता आणि नियतीची अनाकलनीयता यांच्या सखोल जाणीवेचे दर्शन उत्कटतेने व प्रभावीपणे घडविले. त्याच्या कथांमधून अभिव्यक्त झालेले स्त्रीविश्वही अत्यंत प्रभावी, प्रत्ययकारी, जिवंत आणि वैविध्यपूर्ण असे आहे. आपल्या कथांमधून निव्वळ स्त्री म्हणून तिचा विचार न करता एक ‘माणूस’ म्हणून तिच्या सुख-दुःखाचे, समस्यांचे, शोषणाचे, परात्मतेचे, एकाकीपणाचे, अगतिकतेचे दर्शन ते आपल्या कथांमधून घडवितात.

जी.एं.नी कथांमधून साकारलेले ‘जोगतिणी’चे व्यक्तिचित्रण हा त्यांच्या कथेतील स्त्रीचित्रणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आपल्या देशात हिंदुधर्मामध्ये प्राचीन काळापासून देवदासींची प्रथा प्रचलित आहे. या देवदासींचाच एक प्रकार म्हणजे जोगतिणी. मुख्यतः महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील ग्रामीण भागांत मुलांना व मुलींना जोगते व जोगतिणी करून देवाला सोडण्याची प्रथा आहे. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे रेणुका म्हणजेच यल्लम्मा देवीचे मुख्य देवस्थान आहे; त्या ठिकाणी हा विधी केला जातो.

जी.एं.च्या कथांमधील परिसर हा महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमाभागातलाच असल्यामुळे जोगतिणी हा येथील ग्रामीण दैनंदिन जीवनाचा एक भागच होता. जी.ए. आपल्या बालपणीच्या आठवणीत सांगतात, ‘दर मंगळवारी व शुक्रवारी या जोगतिणी लोकांच्या दारोदार जाऊन जोगवा मागत. त्यांच्या गळयातील कवडयाची माळ, देवीचा मुखवटा असलेला जग, भंडाऱ्याचा मळवट भरलेला त्यांचा उग्र चेहरा या सगळ्याविषयी समाजमनात भयमिश्रित कुतुहल कायम होते.’ जी.एं. च्या बालमनावरही या सगळ्याचा प्रभाव पडलेला होता; त्यामुळेच जी.एं.नी आपल्या कथांमधील स्त्रीजीवन रंगविताना ‘फुका’, ‘वश’, ‘तळपट’, ‘लक्ष्मी’ इत्यादी कथांमधून जोगतिणींचे वास्तव व प्रभावी चित्रण केलेले आहे.

जी.एं.च्या ‘वंश’ या कथेतील करेव्वाची आई तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर जोगतीण झाली होती.. त्या दिवसापासून तिने केसांना फणी लावलेली नव्हती. त्यामुळे जट धरलेले तिचे केस तिच्या पाठीवर कांबळयाच्या तुकडयाप्रमाणे हेलकावत असत. तिच्या गळयात कवडयांची माळ होती व एक कवडी मंत्रून एका गोफात अडकवून तिने करेव्वाच्या गळयात बांधलेली होती. भीतीच्यावेळी तिला नुसता हात लावला तरी ती धार्जिण होते, असे तिने आपल्या मुलीला सांगितलेले होते. तेव्हापासून ती कवडी करेव्वाच्या आयुष्याला कायमचीच चिकटली होती. करेव्वाची ही जोगतीण आई लोकांना तोडगे सांगत असे. “ तेलात कालवलेले काजळ वाटीला लावून ती त्यात पाहत बसे. त्यात तिला मग नखाएवढया आकृती दिसू लागत व हरवलेली वस्तू कोठे आहे, चोरी कोणी केली हे त्या काजळबाहुल्या सांगून जात. 

पोटी अपत्य नसलेल्या बायकाही तिच्याकडे येत. एकदा एक गोठ-पाटल्या घातलेली श्रीमंत बाई खणखणीत तीन रूपये करेव्वाच्या आईसमोर टाकते. तेव्हा वळचणीला नेऊन घोगऱ्या आवाजात ती त्या बाईला मूल होण्यासाठीचा तोडगा सांगते. ‘अंधाऱ्या पंधरवडयात कोणालाही सोबत न घेता रात्रीच्या वेळी रानमारुतीच्या देवळाकडे जायचे व त्या समोर पाच-सात झाडांचा जो घोळका आहे, त्यात एक नारळ पुरला की हटकून एका वर्षात पाळणा हललाच! पण जायचे म्हणजे एकटेच जायला हवे हं!’ करेव्वाच्या आईनेही हाच तोडगा केलेला असतो व करेव्वाचा जन्म झालेला असतो. मूल नसलेली करेव्वा जिवावर उदार होऊन हा तोडगा करायला जाते व तिच्या अंगचटीला आलेला बैरागी जेव्हा तिच्या हातून मारला जातो तेव्हा भय, निराशा याबरोबरच ‘आपला जन्म इथल्या नवसामुळेच झाला, म्हणजे हा बैरागी आपला बाप तर नसावा?’ या विचाराचा झगझगीत नवा डोळा फुटतो व ती वेड्यासारखी बेभान धावत सुटते. ते वातावरण व तो गूढ भीतीदायक चित्तथरारक प्रसंग जी.एं.नी अतिशय प्रभावी शब्दांत व्यक्त केलेला आहे.

‘लक्ष्मी’ कथेतली गंगू जोगतीण हातात घुंगराची काठी घेऊन फिरत असे. तिचे वर्णनही जी.ए. अतिशय बारकाईने करतात, ‘तिच्या केसांच्या जटांचा पट्टा हातभर रुंद झाला होता आणि तो भुईपर्यंत लांब होता. त्याच्यासाठी तिने एक कापडाची खोळ करून घेतली होती व तिचे टोक तिने खांद्याला बांधले होते. ती कधी तोंडाने जोगवा मागत नसे. हळदीची चिमूट देऊन थोडा वेळ थांबे आणि तेवढयात जर मूठभर तांदूळ आले नाहीत तर घुंगुरपावली चालू लागे.’ हीच गंगू जोगतीण एक दिवस लक्ष्मीच्या दारासमोर थांबते. तेव्हा घरात तांदळाचा दाणाही नसलेली लक्ष्मी ओशाळवाणी होते. पण ती जोगतीणच लक्ष्मीला तांदळाची पिशवी काढून देते. तिने दाखविलेली आपुलकी पाहून लक्ष्मी भावनावश होते आणि आपलं मन तिच्यासमोर मोकळे करते. तेव्हा गंगू जोगतीण तिला एक अघोरी उपाय करायला सांगते. म्हणते, “मी एक सांगू? करून बघ. गाऱ्हाणं घालून देव उठत नाही तर त्याला चिडवून जागं कर. पण त्यासाठी तुला मन मात्र जात्यासारखं घटट् करायला पाहिजे. झेपेल तुला? कुठल्यातरी देवळात करकरीत तिन्हीसांजेला 21 दिवस दररोज 21 प्रदक्षिणा घालून बघ. मात्र या प्रदक्षिणा उलटया घाल.” आपल्या कुटुंबासाठी हेही दिव्य लक्ष्मी करते. भल्या मोठ्या अजगराला हात लावून सोनं मिळवते. पण पुढे जेव्हा तिचे घरचे लोकच तिला घराबाहेर काढतात तेव्हा आत्महत्येशिवाय तिला दुसरा मार्गच राहत नाही. ती जेव्हा कपिलतीर्थाकडे जाते तेव्हा तिथे तिला गंगू जोगतीण भेटते. ती स्त्री म्हणजे आपली मृत्यू पावलेली सवत होती हे लक्ष्मीला कळते व ती दिङ्मूढ होते. लौकिक जगात वावरणाऱ्या व्यक्तींच्या अतिमानवी अनुभवांचं विश्व जी.ए. उभं करतात. या कथेतील भयावह वातावरणाची तीव्रता जोगतिणीच्या व्यक्तिरेखेने अधिक तीव्र होते व कथेची गूढताही वाढते.


हेही वाचा : जी. ए. कुलकर्णी : नियती नाट्याचे निरुपणकार - केशव साठे


‘तळपट’ नावाच्या कथेमध्ये असा प्रसंग आहे की, गोल्ल गारूडयाच्या वस्तीत एकाकी राहणाऱ्या, भ्रमिष्ट झालेल्या एका ‘हुच्च’ म्हातारीला एक दिवस आपल्या केसांत कांबळ्याच्या तुकड्यासारखी जटापट्टी दिसते आणि ती जोगतीण होते. त्यानंतर अमावास्या-पौर्णिमेला तोंडभर कुंकू फासून, पायात घुंगरू बांधून ती दणादण नाचू लागते. नंतर तीन दगड कुंकू व तेलाने माखून ती रस्त्याच्या कडेला ठेवते, आपले खोपटे उचलून निंबाच्या आडोशाला मांडते व गळ्यात कवड्यांची माळ घालून कवड्यासारख्या डोळयांनी पाहत ती बसून राहू लागते. तिचे वागणे विक्षिप्त होते. काहीवेळा भर उन्हाळयात रात्री शेकोटी पेटवून ती त्यात भुताप्रमाणे पाहत बसू लागते. एरवी कुणालाही कसलाच त्रास न देणारी ही म्हातारी दानय्याचे दुर्दैव बनून त्याच्या मागे लागते. नागपंचमीच्या तोंडावर दानय्याचा नाग तिच्याकडून मारला जातो. तिच्यामुळेच दानय्या चोर ठरतो व वस्तीतून हाकलला जातो. ईर्ष्येला पेटून दुसरा नाग पकडायला गेलेल्या दानय्याला वाटेत ठिकठिकाणी कुंकवाचा मळवट भरलेली, रक्तात भिजल्याप्रमाणे ओलसर लाल रंगाचं जुनेर नेसलेली ही जोगतीण दिसल्याचा भास होतो. तिच्या या अशुभ सावटामुळे दानय्याचा आत्मविश्वास कमी होतो व नागाशी झालेल्या जीवनमरणाच्या लढाईत त्याचा मृत्यू होतो.

‘फुक’ कथेतल्या यमनी जोगतिणीचे चित्रणही असेच भयप्रद आहे. शिवनाथाच्या देवळामागच्या मसणवटीजवळ एका खोपट्यात माणसाची हाडे व कवटी आहे. अमावास्येच्या रात्री खोपटाजवळ शेकोटी पेटवून यमनी त्या भोवती फिरत असते. असे तिच्याविषयीचे विविध प्रवाद गावात प्रसृत असल्याने संध्याकाळच्या वेळी त्या बाजूने जायचे धाडस गावातल्या एकाही माणसाला होत नसे.

पौर्णिमेच्या दिवशी मध्ये मुख्य मुखवटा आणि बाजूने छोट्या मूर्ती बसवलेला जग घेऊन यमनी गावात दारोदार हिंडे, ती आली की लोक घाबरून तिला मूठ पसा तांदूळ देत व हातावर भंडारा पडला की सुटकेचा निःश्वास टाकत. एकूणच यमनीचे तिथे असणे लोकांना अशुभ वाटत असे. यमनीच्या फुक्याने माणूस मरतो अशी गावातल्या लोकांची दृढ समजूत होती आणि त्याविषयी गावकऱ्यांच्या मनात प्रचंड भीतीही असे. संगाशी यमनीचे भांडण होते तेव्हा गावात येऊन यमनी त्याच्यावर फुंका घालते. गावातला बाबल्या घाबरतच ही गोष्ट संगाला सांगतो. तो म्हणतो, “तिने घसाघसा माती घासून तीनदा डोक्यात घातली आणि डोकं हळदीने भरलं. हातात तीनदा भंडारा घेऊन तुझ्या नावानं तिनं भंडारा उधळला आणि फुका टाकला. फुंका अमाशेपर्यंत जारी आहे.” हे ऐकून संतापलेला संगा यमनीला जिवानिशी ठार मारतो.

या गंगू, यमनी, हुच्च म्हातारी यांच्यासारख्या म्हाताऱ्या, कुरूप, भयानक जोगतिणींपेक्षा एका वेगळ्या प्रकारच्या तरूण, सुंदर विठा जोगतिणीचे चित्रण आपल्याला ‘बळी’ या कथेत पाहावयास मिळते. ‘घुंगुर घातलेली, पेरवाच्या पाकीसारखी विठा जोगतीण सखाराम पाटलाच्या आयुष्यात येते.’ तिच्याविषयी जी. ए. लिहितात, ‘देवबाभळीच्या उग्र, मादक निकोप वासाची विठी अशाच सावल्यांची चित्रे असलेल्या चांदण्यात ज्या ज्या वेळी त्याला आंबराईत भेटत असे, त्या वेळी त्याचे शरीर पुरूषभर दिवटीप्रमाणे धगधगीत पेटत असे.’ ही विठी जोगतीण एक दिवस आपल्या वीतभर अपंग मुलीला त्या गावातच सोडून निघून जाते. अमावस्येला जन्मलेली जोगतिणीची कारटी म्हणून तिला गाव ‘अमाशी’ म्हणू लागते. सखाराम पाटील तिच्यावर मुलीसारखेच प्रेम करतो; पण तिला अशुभ समजणारे गाव पाटलाच्या अपरोक्ष त्या निष्पाप मुलीचा क्रूरपणे बळी देते.

अशाप्रकारे तत्कालीन प्रादेशिक ग्रामीण लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग बनून राहिलेल्या या जोगतिणींचे, त्यांच्याविषयीच्या समज-अपसमज-गैरसमजांचे, समाजात त्यांच्याविषयी असणाऱ्या गूढ धार्मिक वलयाचे, जनमानसावरील त्यांच्या प्रभावाचे आणि या स्त्रियांच्या मानसिकतेचे वास्तव चित्रण जी.एं.नी अतिशय प्रभावीपणे आपल्या कथांमधून केले आहे. त्यामुळे त्यांच्या कथांनाही एक भयमिश्रित गूढ, अतिंद्रियशक्तीचे परिमाण लाभले आहे. जी.एं.नी साकारलेल्या या स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती उभ्या राहिलेल्या या गूढ, भयावह कवचामुळे आजूबाजूचा समाज त्यांच्यापासून दूर राहतो आणि त्या स्त्रियांना लैंगिक, आर्थिक शोषणापासून काही मर्यादेत संरक्षण मिळते असेही निरीक्षण मांडता येईल. जोगतिणींविषयीच्या अंधश्रद्धांना खतपाणी न घालता त्यांचे वास्तवरूपच वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न जी.एं.नी आपल्या कथांमधून केला आहे, हे विशेष होय!

- डॉ. प्रमदा देसाई, केपे, गोवा.
Pramadadesai01@gmail.com 
(लेखिका, मराठीच्या निवृत्त प्राध्यापक असून 'जी.एं.च्या कथेतील स्त्री विश्व' या त्यांच्या पुस्तकाला गोवा साहित्य अकादमीचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.) 


साधनाच्या अर्काईव्हवर हेही वाचा : साधनाचे भूतपूर्व संपादक ग. प्र. प्रधान यांना जी. एं.नी पाठवलेली पत्रे

Tags: जी. ए. कुलकर्णी साहित्य मराठी साहित्य जन्मशताब्दी कथा रूपक कथा Load More Tags

Add Comment

संबंधित लेख