काळाचे भान म्हणजे परिवर्तनाचे भान

समाज साहित्य विचार संमेलन 2024 (मालवण) येथील अध्यक्षीय भाषण

या विचारमंचावरील तसेच समोर उपस्थित सगळ्या मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार. आपण सगळे परिवर्तनाच्या वाटेवरून चालणारे वाटसरू इथे जमलो आहोत. आपण समतेच्या पथावर चालणारे यात्रिक आहोत. प्रगतीशील विचारांशी आपली बांधिलकी आहे. इथे एकत्र येण्याकरता ‘समाज साहित्य विचार संमेलन’ हे एक निमित्त आहे. खरं तर या संमेलनाचे नावच या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे कारण नावातूनच या संमेलनाचा उद्देश स्पष्ट होतो आहे. इथे समाज, साहित्य आणि विचार यांचे संमीलन अपेक्षित आहे. बॅ. नाथ पै या एका उन्नत समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या कोकणच्या सुपुत्राचे नाव असलेल्या परिसरात हे संमेलन होत आहे. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. आज आपण इथे अशा वाटेवरून चालणाऱ्या तिघांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा देतो. 

या पुरस्कारांचे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले गेले ते एका प्रगल्भ समाजाचे स्वप्न पाहत त्याकरता आयुष्यभर झटत होते. गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचा जन्म येथून वेंगुर्ल्याजवळ असलेल्या केळूस या गावचा हे तुम्ही सगळे जाणताच. विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला उपलब्ध असलेली सगळी संदर्भसाधने अभ्यासून त्यांनी पहिले शिवचरित्र लिहिले, तुकाराम महाराजांचे चरित्र आणि भगवान गौतम बुद्धाचे चरित्र लिहिले. चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात बाबासाहेब मुंबईला एलफिस्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना केळुस्कर मुंबईलाच विल्सन हायस्कूलचे हेडमास्तर होते याचा उल्लेख आहे. बाबासाहेब केळुस्करांच्या संपर्कात कसे आले हे देखील त्यांनी लिहिले आहे. बाबासाहेबांच्या अभ्यासू वृत्तीमुळे केळुस्करांचा त्यांच्यावर लोभ जडला. आपल्याजवळची पुस्तके ते बाबासाहेबांना वाचायला देत असत. १९०७ साली बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा पास झाले त्या वेळेस गौतम बुद्धाचे चरित्र केळुस्करांनी बाबासाहेबांना भेट दिले. बाबासाहेबांनी ते चरित्र आयुष्यभर जवळ ठेवले. पुढे जेव्हा धर्मांतराबाबत निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांना या चरित्राच्या वाचनाचा उपयोग झाला असे बाबासाहेबांनी नमूद केले आहे. अशा प्रबुद्ध केळुस्करांच्या  नावाचा पुरस्कार आज अतुल पेठे यांना दिला गेला कारण ते देखील एक प्रबुद्ध रंगकर्मी आहेत. आयुष्यभर त्यांनी नाटक हे एक खुल्या डोळ्यांनी, खुल्या मनाने आणि खुल्या विचारांनी, एक बांधिलकी मानून केले. इतिहासाचे भान ठेवून आपण हाताळत असलेले माध्यम अनेक प्रकारे कसे विस्तारता येईल याचा त्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात शोध घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे ते पुढेही घेत राहतील.

दुसरा पुरस्कार माझ्या पिढीचे महत्वाचे लेखक, कथाकार आणि नाटककार जयंत पवार यांच्या नावाने संग्राम गायकवाड यांना दिलेला आहे. ऐंशीनंतरच्या पिढीतील मोठे लेखक कोण असा प्रश्न कुणी केला तर निर्विवादपणे आपण जयंत पवार यांचे नाव घेऊ शकतो. समाजाच्या आणि सत्तेच्या नव्हे तर जगण्याच्याच परीघाबाहेरील, वंचित, दुर्लक्षित, स्थलांतरित, साधनहीन अशा समाजघटकांच्या जगण्याचे चित्रण, ताणेबाणे आणि वेदना त्याच्या साहित्यातून विलक्षण शैलीत येतात. जयंत पवार यांच्या नावाचा हा पहिला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी संग्राम गायकवाड यांचे मनापासून अभिनंदन करतो. संग्राम गायकवाड यांच्या ‘मनसमझावन’ या कादंबरीत त्यांनी आपल्या समाजाची विसविशीत होणारी वीण, त्याचे तुटत जाणारे धागे, काळाच्या ओढाताणीत जागोजागी फाटत जाणारे समाजाचे वस्त्र याचे अतिशय सूक्ष्म आणि भेदक चित्रण केले आहे, त्यामुळे संग्राम गायकवाड यांचा हा गौरव मला औचित्यपूर्ण वाटतो.

तिसरा पुरस्कार सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर’ कवितासंग्रहाला मिळाला आहे. ज्यांनी धर्मातच असहिष्णुतेची भिंत उभारली, ज्यांनी धर्माच्या आडून द्वेष पेरला आणि रानटी पद्धतीने वागून माणुसकीला काळिमा फासला ‘अशांच्याही मुखात सदैव एकत्र नांदू दे अल्लाह आणि ईश्वराचे नाव, सर्वमंगल कल्याणासाठी’ अशी प्रार्थना करणारा हा कवी आजच्या काळातील धार्मिक पेच त्यांनी या कवितासंग्रहात अचूकपणे पकडले आहेत. त्याने भोगलेले सतत वाढत जाणाऱ्या असहिष्णुतेचे चटके आपल्याला त्याच्या कवितेतून दिसून येतात. आपल्याला आलेल्या अनुभवच लिहित आपल्या समाजाच्या दुखऱ्या नसेवर नेमके बोट ही कविता ठेवून अंतर्मुख करते.

थोडक्यात सांगायचे तर सर्जनशील लेखन आणि निर्मिती करताना विचारांचे महत्व जाणणाऱ्या, साहित्य आणि समाजाची गाठ बांधणाऱ्या, त्यातील अनुबंध शोधून आपल्या लेखनातून मांडणाऱ्यांचा आपण आज गौरव करतो आहे. आपण माणूस आहोत, आपल्याजवळ बुद्धी, विचार आणि भावना आहेत. मात्र या तिन्ही गोष्टी वापरत असताना विवेकाची गरज असते. विवेक ठेवून समाजाचा विचार करणाऱ्या कलावंतांचा हा गौरव आहे.

या समाजाचाच एक घटक म्हणून आणि लेखक म्हणून अनेक प्रश्न माझ्यापुढे उभे राहतात आणि विचार करायला भाग पाडतात. त्यातील काही मुद्दे आपल्यापुढे उपस्थित  करणार आहे. मी त्यांची उत्तरे शोधत आहे तुम्हीही शोधावी. हा शोध असाच पुढेही सुरु राहणार आहे. त्यामुळे मला उत्तर सापडले आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे अशा भ्रमात कुणी राहू नये. मी ज्या मुद्द्यांबद्दल बोलणार आहे ते मुद्दे आजच्या आपल्या संमेलनाच्या नावातच अंतर्भूत आहेत. ‘समाज, साहित्य आणि विचार’ ही एक त्रिसूत्री आहे. याबाबत बोलताना आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे त्याकडे आपण डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. 
उदय प्रकाश यांची एक कविता आहे - 

माणूस मेल्यानंतर 
काही विचार करत नाही 

माणूस मेल्यानंतर 
काही बोलत नाही  

काही विचारच केला नाही 
आणि काही बोललाच नाही 
तर माणूस मरून जातो. 

यामुळे आपल्याला विचार करणं आणि आपल्या काळाबाबत बोलणं भाग आहे. अनेक परस्परविरोधी गोष्टी एकाच वेळेस घडणारा हा काळ आहे. आधी हा काळ समजून घ्यायला हवा. या काळात आपल्याला भ्रमित करण्याची ताकद आहे. पराकोटीची निराशा यावी असे आजूबाजूला घडत असते. सोबतच कधी काही बऱ्या गोष्टीही आपल्या नजरेला पडतात; मात्र त्याने हुरळून न जाता त्यापासून ऊर्जा घेऊन अधिक जोमाने आपले माणूसपण टिकवून ठेवायचा लढा लढायचा आहे, याची जाणीव असणे आवश्यक असलेला हा काळ आहे.

मी सुरुवातीला म्हणालो की आपण सगळे परिवर्तनाच्या वाटेवर चालणारे वाटसरू आहोत. परिवर्तन ही काळाशी संबंधित गोष्ट आहे त्यामुळे काळाचे स्वरूप समजून घेऊन त्याचा अन्वय लावण्याचा प्रयत्न करायला हवा. काळ वाहता आहे. तो थांबत नाही. काळाच्या वाहत्या प्रवाहात नवे क्षणात जुने होते आणि डोळ्यासमोर वाहून जाते. अखंडपणे काही नवे येत असते आणि ते सतत जुने होत असते. या वाहतेपणामुळे आपल्या मूल्यांमध्ये, परंपरांमध्ये, जाणिवांमध्ये सूक्ष्म बदल होत असतात. आपल्या संचितामध्येही सतत भर पडत असते आणि त्यातून आपली भूतकाळाकडे पाहण्याची दृष्टीदेखील बदलत असते. जीवनाला आलेली गती ही काळामुळे असते. या काळाचे भान आपल्याला असणे म्हणजे परिवर्तनाचे भान असणे हे होय.

आपण वर्तमानात जगतो असं म्हणतो परंतु खरं तर वर्तमान आपल्या चिमटीत कधी येतच नाही. ते फक्त निसटत राहतं. आपण केवळ भूतकाळ उपसून पाहत असतो. त्यातून जे काही धागेदोरे आपल्या हाती लागतात त्यातून वर्तमानाची व्याख्या करण्याचा आपला प्रयत्न असतो. आपली वर्तमानावर थेट अशी कुठल्याही अर्थाने पकड नसते. ‘भूतकाळात गेलेले’ आणि ‘भविष्यातून येऊ घातलेले’ या अशा दोन गोष्टींमधील अतिशय अरुंद फटीत कासावीस होऊन धडपडणे म्हणजे वर्तमानात जगणे होय. हा ‘वर्तमानकाळ’ आपल्या लेखनात आणण्याची लेखकाची धडपड सुरु असते.

आपण जगत असलेला हा काळ समजून घेण्याची दृष्टी तयार करण्याचे काम साहित्य आणि कला करतात. आपला काळ समजून घेणे हे मला सगळ्यात मोठे आव्हान वाटते तो समजून घेण्याचा, त्याबाबतचे आपले आकलन शब्दांमधून मांडण्याचा माझा प्रयत्न अविरत सुरु असतो. काळासोबत आपली एक शर्यत असते. एक जीवघेणी ओढाताण असते. लिहिणे म्हणजे काळावर मात करण्याची पराकाष्ठा करणे आहे.

आपण समाज निर्माण केला, नीतीनियम बनवले, मूल्यव्यवस्था आली. जे हवे ते माणूस मिळवत गेला आणि आपण प्रगत झालो असे मानत गेला. मात्र या समाजात, या व्यवस्थेत जगताना आपण काय कमावत आहोत आणि काय गमावत आहोत याचा हिशेब प्रत्येकाने मांडायला हवा. अनेक वस्तूंनी आपल्या जगण्यात प्रवेश केला. दिवसेंदिवस ‘संपन्नता’ वाढते आहे. नवनव्या गोष्टी शोधल्या जात आहेत सोबतच आपली लालसा, आपली हावदेखील वाढते आहे. एका बाजूला श्रमातून भांडवलाची प्रचंड प्रमाणात निर्मिती होत आहे पण ते मूठभरांच्या हातात केंद्रित झालेले आहे. जो माणूस श्रम करतो, कष्ट करतो त्याला त्याच्या श्रमातून निर्माण झालेल्या व्यवस्थेचा उपभोग घेण्यासारखी परिस्थितीच नाही. गावांमध्ये, शहरांमध्ये अनेक श्रमजीविंच्या श्रमातून मोठमोठ्या इमारती, कारखाने, मॉल्स, दुकाने, कार्यालये, घरे, बाजार उभे राहतात मात्र हे उभे करणारा श्रमजीवी आयुष्यभर रात्री फुटपाथवर निजलेला आपल्याला दिसतो. शेतात राबणारा मजूर, पीक घेणारा शेतकरी, कारखान्यात काम करणारा कामगार, रोजगारासाठी लहान लहान कामे करणारे, छोटेमोठे धंदे करणारे कष्टकरी या सगळ्यांची जगताना परवड होते आहे. समाजाच्या अशा सगळ्या वर्गातून लेखक-कलावंत उभे झाले आहेत आणि ते आपले जगणे, आपल्या जगण्यातील पेच अभिव्यक्त करत आहेत. हा देखील व्यवस्थेच्या जीवघेण्या पकडीविरुद्ध उभे राहण्याचा एक मार्ग आहे

आज श्रमाची किंमत कमी होऊन भांडवलाचा खेळ सुरु झालेला आहे. अपरिमित राजकीय सत्ता आणि अपरिमित आर्थिक सत्ता याची अत्यंत विषारी अशी युती आज आपल्याला समाजात दिसते आहे. या युतीने आपली सगळी सामाजिक नैतिकता धाब्यावर बसवली आणि मूल्यव्यवस्थाच हलवून टाकली आहे. ही अपरिमित सत्ता आता विरोधच नको, असहमती नको, प्रश्न विचारणे नको म्हणते आहे. तिला सार्वभौमत्व हवे आहे. आपली लढाई या अपरिमित सत्तेविरुद्ध, या विषमतेच्या दरीविरुद्ध आहे. अण्णाभाऊ साठे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येकाला त्याचा वाटा मिळायलाच हवा. हा काळच इतका भ्रमित करणारा आहे की आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्याला कुणाविरुद्ध लढायचे आहे. हिंदीतील मोठे कवी मंगलेश डबराल यांच्या कवितासंग्रहाचे नावच ‘नये युग में शत्रू’ हे आहे. ते या कवितेत लिहितात,
    अखेरीस आमचा शत्रूदेखील एका नव्या युगात प्रवेश करतो 
    आपल्या बुटांसह, कपड्यांसह आणि मोबाईलसह 
    तो एका शतकाचा दरवाजा ठोठावतो 
    आणि त्याच्या तळघरात निघून जातो 
    जे या शतकाप्रमाणे आणि सहस्रकाप्रमाणेच अथांग आणि अज्ञात आहे 
    तो जिंकून आलाय आणि हे ठाऊक आहे की त्याच्या अनेक लढाया अजून बाकी आहेत

हा शत्रू ओळखणे आज आपले पहिले काम आहे. काळ वेगाने बदलत असतो. आपल्या लक्षात येण्यापूर्वीच आपला शत्रू वेगळे रूप धारण करतो. तो मायावी आहे. उदा., आज हा शत्रू आपल्या मोबाईलमधून थेट आपल्या डोळ्यात बघतो आहे, आपल्या विचारांवर परिणाम करतो आहे, आपल्या कृतीवर प्रभाव टाकतो आहे. याची कल्पनादेखील आपण ही वस्तू आपल्या हाती येण्यापूर्वी केली नव्हती. आज अशी परिस्थिती झाली आहे की मोबाइल हे आपल्या हातातले उपकरण राहिले नसून आपण त्याच्या हातातले खेळणे झालेलो आहोत. ज्ञानाच्या देवाणघेवाणीकरता जरी मानवाने इंटरनेटच्या माध्यमातून जग जोडले असले आणि या राजमार्गावरून सुजाण, विचारी माणसे जात असली तरी येथेच चोर लुटारुदेखील लुटमार करून आपली वाहने हाकत आहेत हे सत्य आहे. आपल्याला नियंत्रित करू पाहणाऱ्या शक्ती अधिकच भेसूर होत आहेत. या बाजारवादी शक्ती आहेत, जातीय शक्ती आहेत, धर्मांध शक्ती आहेत. यांना कान आहेत, डोळे आहेत, भले मोठे तोंड आहे. या माणसाची किंमत जोखून त्याच्याशी स्वयंप्रेरणेने व्यवहार करतात. कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी शत्रू तुमच्यापासून अदृश्य आणि अनोळखीच राहतो. या शत्रूची ओळख पटवून देणे हे माझ्या मते लेखक-कलावंतांपुढे असलेले मोठे आव्हान आहे आणि आपण सगळे हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करत आहोत.

आपण आपल्या समाजाचे स्वरूप समजून घेताना ज्या समाजाबद्दल बोलतो, लेखक म्हणून जिथे लिहितो तो कसा आहे, त्याची गतीकी – म्हणजे त्याचं डायनामिक्स- काय आहे, तो कुठल्या अंगाने पुढे जातोय आणि कुठल्या अंगाने उलटी चाल चालत मागे चाललाय, तो आपले रंग कसे बदलतो, त्याच्यावर कुठले आणि कसे प्रभाव पडत आहेत, याची जाणीव असणे गरजेचे आहे. लेखक म्हणून आपण समाजावर किती प्रभाव पडू शकतो की समाजाच्या रेट्यापुढे मान तुकवून लाटेसोबत वाहत जातो याचाही आपल्याला पडताळा घेणे गरजेचे आहे. मला समाज असा दिसतो पण म्हणून तो तसाच आहे, हे काही खरे नाही. चक्रधरांच्या दृष्टांतपाठात आलेल्या सात आंधळे आणि हत्तीच्या गोष्टीसारखे हे आहे. आपण जे पाहतो, जे अनुभवतो त्यापेक्षा जग कितीतरी मोठे आहे याची आपल्याला कल्पना असते, आपण आपल्या कक्षा विस्तारण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

आपला समाज हा शब्द वापरताना मी एकूण भारतीय समाज गृहीत धरत असतो. हा समाज बहुलतापूर्ण, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समाज आहे. याचा अर्थ तो अनेक तुकडे जोडून किंवा एखादी मोळी बांधल्याप्रमाणे ओढूनताणून तयार झाला आहे, असे नसून या बहुमुखी समाजाला जोडून ठेवणारी काही सूत्रे आहेत. या बहुलतेचे स्वरूप काय आहे? ही वांशिक, भाषिक, धार्मिक, जातीय, भौगोलिक अशी सांस्कृतिक बहुलता आहे. कदाचित भारतीयत्वाची हीच ओळखदेखील आहे. ही बहुलता जाणून आपल्या जगण्याचा पसारा जितका व्यापक करत जाऊ तितके आपण अधिक समावेशक होऊ, तितके आपण अधिक सहिष्णु होऊ. आपल्या समाजात असलेली बहुलता स्वीकारणे आणि या बहुलतेतील प्रत्येक घटकाचा आदर ठेवणे हे आपल्या रक्तात आहे आणि या सगळ्यांना बांधून ठेवणारे ते सूत्र आहे. आपण हे सूत्र आत्मसात केले आहे. गेली अनेक शतके ही बहुलता आपण आपल्यात मुरवली आहे. आपले आपली संत परंपरा, लोक परंपरा, अनेक प्रकारचे संगीत, नृत्ये, साहित्य, चालीरीती, आपले खानपान यात प्रचंड प्रमाणात वेगळेपण आहे परंतु या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून शतकानुशतके नांदत आहेत. एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर असणे, एकमेकांच्या विचारांना आणि अभिव्यक्तीला पुरेसा पैस देणे हे भारतीयतेचे लक्षण आहे. ही सहिष्णुता आपल्या रक्तात पिढयानपिढ्या भिनलेली आहे.

विविधता हे आपले शक्तिस्थान असताना या विविधतेतील वेगवेगळ्या घटकांच्या अस्मिता जागवून, भडकावून, दुफळी निर्माण करून समाजावर आपली पकड घट्ट करण्याच्या प्रयत्नात अनेक प्रवृत्ती विशेषतः मूलतत्ववादी आणि उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्ती दिसत आहेत आणि त्यांना काही प्रमाणात यशही मिळत आहे. धार्मिक संकुचितता, जातीय वैरभाव, वांशिक अस्मिता यांना चेतवून समाजात ज्या काही फुटीरतावादी शक्ती आज कार्यरत झालेल्या आहेत. अशा शक्तींच्या विरोधात उभे राहण्याची आज गरज आहे. हे बळ आपल्याला आपली परंपरा सखोलपणे समजून मिळू शकते. साहित्याचे वाचन देऊ शकते. सगळेच साहित्य आणि कला म्हणजे एक पवित्र गोष्ट आहे आणि त्या सकारात्मकता देतात असे नाही. विषवल्ली पसरवण्याचे कामही साहित्यातून केले जाऊ शकते. चंद्रकांत देवताले म्हणतात ‘साहित्यातही साप ठेवू शकतात लोक.’ त्यामुळे आपल्याला चांगल्या-वाईट साहित्यातही भेद करता आला पाहिजे.

आपल्या जगण्याच्या दोऱ्या भूतकाळाच्या हातात आपण सोपवलेल्या आहेत की काय असेही कधी कधी वाटून जाते. आपल्यावर खरा दाब भूतकाळाचा असतो त्यामुळे वर्तमानात जगताना जर आपण आपल्या भूतकाळावर बारीक नजर ठेवली तर वर्तमानातील आणि भविष्यातील अनेक प्रश्न आपल्याला नीट हाताळता येऊ शकतील. आज आपल्यापुढील अनेक प्रश्न भूतकाळाच्या गौरवीकरणाने उभे केले आहे. भूतकाळाचा गौरव करत, परंपरांचे दडपण ठेवत पुनरुज्जीवनवादी शक्ती आपले काम करत आहेत. माणसाला दडपण्याची ही एक तऱ्हा आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेने आपल्याला दिले असले तरीही दडपणाखाली लिहिणे, दडपणाखाली जगणे, दडपणाखाली अभिव्यक्त होणे हे काळाच्या अनेक टप्प्यांवर आणि आताही  लेखक-कलावंतांच्या वाट्याला आलेली आहे आणि येत आहे. गजानन माधव मुक्तिबोधांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ‘अभिव्यक्तीची जोखीम पत्करून’ लेखक लिहित असतो. मात्र हे बाहेरील दडपण इतके वाढत आहे की ते दडपण लेखकाच्या व्यक्तिमत्वावर आणि त्याच्या अंतर्मनात झिरपून त्याच्या लेखनावर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नात आहे. लेखक लिहित असतानाच त्याच्या मनात अंतर्गत सेन्सॉरशिप तयार झालेली असावी असा प्रयत्न बाहेरील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक शक्ती करत असतात. कुठलीही एकाधिकारशाहीवादी, हुकुमशाहीवादी किंवा पोथीनिष्ठ प्रवृत्ती ही मुक्त अभिव्यक्तीच्या विरोधात असते. कला ही मुक्त अभिव्यक्तीतून जन्मास येत असल्याने ती कलेच्याही विरोधात असते. याविरोधात केवळ लेखकाने नव्हे तर लोकांनीही सतर्क राहून सातत्याने आपला प्रतिरोध नोंदवणे गरजेचे आहे. भारतीय साहित्यात या प्रतीरोधाचीही परंपरा आहे. कबीर,  अक्कमहादेवी,  आपले ज्ञानदेव, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई  अशी समृद्ध मराठी संतपरंपरा ते नामदेव ढसाळ, विजय तेंडुलकर, भुजंग मेश्राम, जयंत पवार यासारखे अनेक लेखक प्रतिरोध नोंदवतच त्यांच्या लेखनातून पुढील पिढ्यांकरता वाट मोकळी करून देतात हे आपण पाहतो आहे. या परंपरेचा आपल्याला विसर पडायला नको.

इथे कोकणात दशावतार जेव्हा रंगतो तेव्हा अनेक देवदेवता रंगमंचावर अवतरतात आणि सामान्य माणसाच्या जगण्यातल्या दुखऱ्या जागा हास्यविनोद करत दाखवून देतात. तमाशात पौराणिक कथेतील पात्रांचा वग रंगतो तो आजच्या राजकारणावर थेट टीका केली जाते म्हणून. प्रेक्षकांच्या मनातील सत्तेच्या विरोधातील खदखदत असलेल्या गोष्टी विनोदचे अस्त्र वापरत जाहीरपणे लोककलांमधून उच्चारल्या जातात. मात्र आता याविरुद्ध भावनादुखीचे राजकारण खेळले जात आहे. आमची परंपरा अशी आहे, धर्म असे सांगतो, नीतीनियम असे आहेत, आमची श्रद्धा अशी आहे, अमुक ग्रंथात असे सांगितले आहे या कारणाने लेखक-पत्रकार-कलावंतांवर आणि सर्वसामान्य माणसांवर झुंडशाही करत दडपण आणणे राजरोसपणे सुरु आहे. ही वाढती झुंडशाही कशी हाताळायची हा आपल्यापुढील मोठा प्रश्न आहे, याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा.

केवळ वेगळ्या विचारांचे आहेत म्हणून याच महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना गोळ्या घातल्या गेल्या. या जखमा ताज्याच आहेत. धर्माच्या नावावर ठिकठिकाणी हत्या सुरूच आहेत. अलीकडे पुण्यातील ललित कला विभागात भावना दुखावल्या गेल्याचा कांगावा करत  नाटकाचा प्रयोग बंद पाडला गेला. कवी वसंत गुर्जर यांच्या ‘गांधी मला भेटला’ या कवितेवरील खटला सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊनही अजून सुरूच आहे आणि चौऱ्यांशी वर्षांच्या वसंत गुर्जरांनी आपली कविता अश्लील कशी नाही हे सिद्ध करावे याची वाट न्यायदेवता आजही बघते आहे. आपल्या पंढरपुरात जन्मलेल्या चित्रकार हुसेन साहेबांना देश सोडून परागंदा व्हावे लागले. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत आपल्या सुसंस्कृतपणावर प्रश्न उभे करणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहेत. एक नागरिक म्हणून आपण जे सुसभ्य जीवन जगायला हवे त्याच्या सीमा आक्रसत आहेत ही मला काळजीची वाटते.

सध्या जगभर पुनरुज्जीवनवादाचा उत्कर्ष काळ सुरु आहे असे दिसते. इतिहासाचे गौरवीकरण करण्याच्या नादात आपणही काळाची चक्रे मागे फिरवून पुन्हा पाषाणयुगात जाऊ की काय अशी शंका मनात येते आहे. विवेक, बुद्धिप्रामाण्य, तर्कसुसंगतता या गोष्टीच दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. सुदृढ समाजासाठी विचारांचा प्रतिवाद झालाच पाहिजे मात्र तो विचारांनीच केला पाहिजे. एखाद्याचे विचार पटत नाही तर त्याला गोळ्या घाला हा न्याय मानणे हे प्रगत समाजाचे लक्षण असू शकत नाही. न्यायिक कारवाईआधीच कायदा हातात घेऊन आरोपीची हत्या करणे, संशयावरून एखाद्याच्या घरावर बुलडोझर फिरवणे आणि याला न्याय दिला असे म्हणणे ही नागरी सभ्यता असू शकत नाही. दुर्दैवाने अशा निषेधार्ह घटना आपल्या स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा वारसा मानणाऱ्या महाराष्ट्रातदेखील घडत आहेत.

या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ करून समतेचा एक नवा धडा समाजासमोर ठेवला. या महाराष्ट्रात महर्षि कर्व्यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया मजबूत केला. याच महाराष्ट्र जोतीबा फुल्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ ओढून इथल्या पोशिंद्या शेतकऱ्याला आत्मभान दिले. या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातवास्तवाशी लढा देत सगळ्या समाजाला सोबत घेऊन समतेच्या दिशेने एक अभूतपूर्व असे पाऊल उचलले. या महाराष्ट्राला ज्ञानेश्वर-नामदेव-तुकारामापासून पुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज अशी समाजाविषयी कळवळा असलेल्या सुधारक संतांची परंपरा लाभली. यापैकी कुणीही आजच्यासारखे कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेल्या भव्य मंडपात सत्संग नामक दांभिक प्रकार केले नाहीत. आपली परंपरा कुठली हे डोळसपणे ठरवणे गरजेचे आहे. आपल्या पुढ्यात आणि मागेही अनेक गोष्टी विखरून पडलेल्या आहेत; त्यातले काय निवडायचे याचे भान असणे आवश्यक आहे आणि याबाबत सजगता निर्माण करणे गरजेचे आहे.

नुकताच २६ नोव्हेंबरला ७५ वा भारतीय संविधान दिवस साजरा झाला. हे संविधान आपल्या नागरिकत्वाचे रक्षण करणारे प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मिळालेले एक कवच आहे. आपल्यातल्या धार्मिक, जातीय, भाषिक, लिंगाधारित, पंथीय, आर्थिक, वांशिक अशा सगळ्या प्रकारच्या अल्पसंख्यांकांना, वंचितांना, परिघाबाहेर फेकल्या गेलेल्यांना सन्मानाने जगण्यासाठी मिळालेले ते अभय आहे. हे संविधान आपल्या मूलभूत हक्कांचा, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, समताधिष्ठित न्यायभावाचा जाहीरनामा आहे. आपल्या जगण्यातल्या सीमित आणि संकुचित अस्मिता बाजूला ठेवून आपले संविधान हीच आपली अस्मिता आपण मानायला हवी. आपले अभिव्यक्तीस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आपले संविधान अबाधित ठेवणे, त्याकरता जागरूक राहणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर जिथे अतिक्रमण होताना दिसेल तिथे लोकांसोबत राहून एकजुटीने आवाज उठवणे गरजेचे आहे. सुप्रसिद्ध उर्दू कवी फैज अहमद फैज साहेब त्यांच्या एका नज्म मध्ये आवाहन करतात :  
बोल के लब आजाद है तेरे / बोल जबाँ अब तक तेरी है
तेरा सुत्वाँ जिस्म है तेरा / बोल कि जाँ अब तक तेरी है   
बोल ये थोड़ा वक्त बहुत है / जिस्म ओ जबाँ की मौत से पहले 
बोल कि सच ज़िंदा है अब तक / बोल जो कुछ कहना है कह ले 

सोबतच कविवर्य म. म. देशपांडे यांच्या कवितेच्या ओळी आठवतात:
सारा काळोखाच प्यावा / अशी लागावी तहान 
एक साध्या सत्यासाठी / देता यावे पंचप्राण 
हे सत्य सांगणारा महात्मा ‘हे राम’ म्हणून छातीवर गोळ्या झेलून धाराशायी पडला.  

जेव्हा आपण समाज साहित्य विचार संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येतो आणि विचारमंथन करतो तेव्हा रवींद्रनाथ टागोर म्हणतात त्याप्रमाणे ‘भयशून्य चित्त जेथ’ अशा समाजासाठी आपण एकत्र आलेलो असतो. आपल्या स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी, बंधुत्वासाठी, सहिष्णुतेसाठी, विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनासाठी आपण जागरूक राहू या आणि कुठलेही दडपण मनावर न ठेवता अभिव्यक्त होऊ या असे आवाहन करून मी माझे हे भाषण संपवतो. 
मला इथे बोलावल्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो! तुम्हा सगळ्यांचेही आभार !

- प्रफुल्ल शिलेदार
(वक्ते प्रख्यात कवी, संपादक आणि कवितांचे अनुवादक आहेत. समाज साहित्य विचार संमेलन 2024 (मालवण) येथे ते संमेलनाध्यक्ष होते.)

Tags: समाज साहित्य विचार संमेलन 2024 (मालवण) अध्यक्षीय भाषण साहित्य संमेलन साहित्यिक कोकण Load More Tags

Add Comment