या घरकामाचे करायचे काय? (पूर्वार्ध)

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 2/12

idiva.com | प्रातिनिधिक चित्र

बर्ट्रांड रसेल यांच्या 'The Conquest of Happiness' या पुस्तकाचा स्वैर मराठी अनुवाद करुणा गोखले यांनी पाव शतकापूर्वी 'सुखी माणसाचा सदरा' या नावाने केला, तो विशेष लोकप्रिय झाला. त्यानंतर सिमोन द बोव्हूआर यांच्या 'सेकंड सेक्स' या आणखी एका जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला. त्यांच्या स्वतंत्र लेखनाचे 'बाई माणूस' हे पुस्तकही चांगलेच दखलपात्र ठरले आहे. आज त्यांची ओळख मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त अशी आहे..

त्यांनी 2021 या वर्षी 'स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान' या विषयावरील संशोधन प्रकल्प हाती घेतला होता.. त्यामध्ये 203 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्या सर्वांना एकूण 62 प्रश्न विचारले गेले आणि प्रत्येक मुलाखत साधारणतः सव्वा तास चालली. त्या अभ्यासावर आधारित बारा भागांची लेखमाला 'कर्तव्य'वरून सलग 12 आठवडे (प्रत्येक रविवारी) प्रसिध्द करीत आहोत..

घरकाम एकसुरी, कंटाळवाणे, दमछाक करणारे असते. त्यातील काही कामे रोज आणि ठराविक वेळी करावीच लागतात; त्यांत सवलत घेणे शक्य नसते. शिवाय त्यात अनपेक्षिततेचा मोठा घटक असतो. अचानक पाहुणे येतात, कुणी आजारी पडते, मुलांना विशेष काही खावेसे वाटते, कधी करून ठेवलेला पदार्थ बिघडतो, कमी पडतो, विजेचा मीटर जळतो, पाण्याचा पाईप फुटतो;एक ना अनेक. त्यातच सण, उत्सव, घरगुती समारंभ येतात. म्हणूनच घर चालवणाऱ्या व्यक्तीला 24 तास ड्युटीवर राहावे लागते. जोपर्यत स्त्री फक्त घर आणि बालसंगोपन सांभाळत होती, तोपर्यंत खूपसे घरकाम पुरुषाच्या पाठीमागे, बिनबोभाट होत होते. त्यात स्त्रीची किती ऊर्जा, वेळ आणि नियोजन खर्ची पडत होते, त्याची त्याला कल्पनाच आली नाही. पण स्त्रीचे शिक्षण आणि अर्थार्जन सुरु झाल्यावर आणि अगदी पूर्ण वेळ गृहिणीवरसुध्दा मुलांचे अभ्यास घेणे, त्यांची शाळेत ने-आण करणे आणि इतर बाहेरच्या कामांची जबाबदारी येऊ लागल्यावर तिला घरकामासाठी वेळ, शक्ती आणि मानसिक उभारी कमी पडू लागली. 

हे असे घडले, कारण आपण मुलींना मुलांची कामे शिकवली पण मुलग्यांना मुलींचे एकही काम शिकवले नाही. मुलींकडून अर्थार्जनाची अपेक्षा करू लागलो, पण पुरुषाकडून गृहव्यवस्थापनाची अपेक्षा सुरु केली नाही. मुलींच्या छंदांना, इच्छांना, तिच्यामधील कलागुणांना प्रोत्साहन देऊ लागलो, पण हे सर्व जोपासायचे, तर तिला घरकामातून उसंत द्यावी लागेल याचे फारसे भान ठेवले नाही. त्यामुळे तिच्यावरची ‘आधी घरातील काम, मग बाकी सारे’ ही सक्ती संपलीच नाही. मुठभर अतिश्रीमंत वर्गातील स्त्रियांनी शक्य ती कामे मोलाने करून घेऊन स्वत:पुरता हा प्रश्न सोडवला. परंतु अशा स्त्रियांचे प्रमाण नगण्य असते. उर्वरित स्त्रियांनी घरातील इतर स्त्रियांची मदत घेऊन स्वत:चे अर्थार्जन, छंदोपासना सुरु ठेवण्याचा पर्याय निवडला. पण या पर्यायात पुन्हा कुठल्या ना कुठल्या स्त्रीचेच श्रम गृहीत धरले जाऊ लागले. मग ही स्त्री आई असेल, वा सासू. याचा परिणाम असा झाला आहे की, कुठे तरूण स्त्रिया घरकामाने त्रासलेल्या बघायला मिळतात, तर कुठे वृद्धत्वाकडे झुकू लागलेल्या स्त्रिया घरकामाच्या ओझ्याखाली पिचताना दिसतात. पण 2021 सालीसुध्दा पुरुषाचा घरकामातील सहभाग दिवसाला सरासरी 15 मिनिटेच राहिला आहे. 

हे घडण्यास आपल्या मनातील ‘स्वावलंबन’ या संकल्पनेची एकांगी व्याख्या कारणीभूत आहे. जी कमवत नाही, ती परावलंबी असे आपण मानतो. आपली मुलगी, बहीण, बायको, सून परावलंबी राहू नये म्हणून घरोघरी वडीलधारे स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी झटताना दिसतात. पण दिवसातून तीन वेळा खाणे ही शारीरिक गरज असताना पुरुषाला स्वत:चे अन्न शिजवता येत नाही, हे कुणालाच परावलंबन वाटत नाही. मूल असणे हे वंशसातत्यासाठी आणि पुरुषार्थ सिध्द होण्यासाठी आवश्यक वाटते, पण बहुसंख्य पुरुषांना स्वत:च्याच मुलांना साधी डाळ-तांदुळाची खिचडीपण करून घालता येत नाही, यात परावलंबन दिसत नाही. त्यामुळे मुलीचे आर्थिक परावलंबन दूर करण्यासाठी झटणारे आई-वडील मुलाचे व्यावहारिक परावलंबन दूर होण्यासाठी त्याला स्वयंपाक आणि इतर घरकाम शिकवावे असा विचार सहसा करत नाहीत. 

स्वयंपाक, घरगुती खरेदी, स्वच्छता यांत मला रस नाही असे म्हणणारे अनेक पुरुष असतात. असे म्हणण्याची सवलत ते आतापर्यंत घेऊ शकत होते, कारण मानवी अस्तित्वाच्या तात्कालिक गरजा भागवण्याची संपूर्ण जबाबदारी परंपरेने स्त्रीवर टाकली होती व घराबाहेरचे एकही काम तिने करणे अपेक्षित नव्हते. पण आता घराबाहेरचीपण अनेक कामे तिने करावीत अशी कुटुंबाची अपेक्षा असे. आणि कित्येक जणी पुरुषाएवढाच वेळ अर्थार्जनासाठी देत असतात. असे असताना घरकामाचीपण सुसंगत वाटणी व्हावी ही अपेक्षा न्यायाला धरून आहे. स्त्रीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य शाबूत राहायचे असेल, तर घरकामाच्या वाटणीविषयी समन्यायी भूमिका विकसित करणे गरजेचे झाले आहे. तशी ती करायची असल्यास मुलगा व मुलगी या दोघांवरही घर आणि घराबाहेर अशा दोन्ही ठिकाणच्या स्वावलंबनाचे आणि परस्परावलंबनाचे संस्कार बालपणापासून करावे लागतील. मुलीसाठी अर्थार्जन ऐच्छिक आणि पुरुषासाठी घरकाम ऐच्छिक हे पर्याय ठेवून चालणार नाही. अन्यथा स्त्री-पुरुषांमधील विसंवाद  आणि स्त्रीच्या आरोग्याचे प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करतील.  

आपल्या उत्तरदात्यांमधील एक तरुणी म्हणाली की, पुरुषांनी स्वयंपाकघरात काम करणे तिला पटत नाही. तिच्या व्यक्तिगत मताचा आदर करूनही म्हणावेसे वाटते की, हा सामाजिक संस्कारांचा भाग झाला. कारण आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो, तेव्हा तेथील स्वयंपाकघरात पुरुषांचेच राज्य असते. आपल्या देशातला मोठा स्त्रीवर्ग विष्णू मनोहर, संजीव कपूर यांना स्वयंपाकघरातच आवडीने बघतो. त्यावेळी या सेलिब्रिटी बल्लवाचार्यांचा पुरुष म्हणून अवमान होतोय असे स्त्री वर्गाला वाटत नाही. पण आपले भाऊ, वडील, सासरे, नवरा, मुलगा असे कुणी स्वयंपाकघरात शिरले, तर ते त्यांच्यासाठी अवमानास्पद वाटते, याचा सरळ अर्थ असा की, स्त्री स्वयंपाकघरात जे काम करते, ते खालच्या दर्जाचे आहे, हे पुरुषांच्याच नाही, तर अनेक स्त्रियांच्यासुध्दा मनात घर करून असते. 

आजकाल काही पुरुषांना स्वत:पुरता स्वयंपाक करता येतो व हे चांगलेच आहे. त्यातील अनेक जण अभिमानाने सांगतातसुध्दा की, त्यांचे बायकांवाचून काही अडत नाही. हेपण चांगलेच आहे. मात्र त्यातील काही असाही दावा करतात की, स्वयंपाककलेचे स्त्रियांनी नको इतके रहस्यीकरण आणि उदात्तीकरण करून ठेवले आहे व त्यामागे स्वत:चे महत्त्व वाढवणे हाच हेतू असतो. येथे असे विचारावेसे वाटते की, ज्या पुरुषांना रोजचा स्वयंपाक येतो, ते रोज स्वयंपाक करतात का? तो स्वेच्छेने करतात, की त्यांच्यावर तशी सक्ती असते? स्वयंपाक न करण्याची मुभा त्यांना मिळते का? मिळत असल्यास आठवड्यातून किती वेळा ते अशी मुभा घेतात? अशी मुभा घेतल्यास समाज त्यांना अपराधीपणाची भावना देतो का? स्वयंपाक करता येणारे पुरुष फक्त स्वत:पुरता स्वयंपाक करतात की सगळ्या घरासाठी करतात? 

स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वयंपाक करण्यात काही तपशिलातील फरक आहेत, हे ध्यानात घेतले पाहिजे. स्त्रिया कधीच स्वत:पुरते शिजवून खात नाहीत. त्यांना संपूर्ण कुटुंबासाठी रांधावे लागते. तेसुध्दा तिन्हीत्रिकाळ; नाष्ट्यापासून ते शाळेच्या डब्यापर्यंत, गोडाधोडाच्या स्वयंपाकापासून ते फराळाच्या जिनसांपर्यंत! इच्छा असो, वा नसो. तब्येत बरी असो, वा नसो! 

स्वयंपाक करणे हा भारतात तरी अजूनही बहुतेक पुरुषांसाठी इच्छेचा मामला आहे, आणि स्त्रियांसाठी सक्तीचा! दोन्हींत फार मोठा गुणात्मक फरक आहे. दुसरा फरक म्हणजे जे पुरुष स्वयंपाक करतात, ते त्याच्या आधीची आणि नंतरची आनुषंगिक कामेपण करतात का? स्वयंपाकघरातील सर्व अत्यावश्यक जिन्नस भरून ठेवण्याचा मेंटल लोड घेतात का? स्वयंपाक झाला की ओटा पूर्ववत स्वच्छ करून ठेवण्याचे कर्तव्य स्वत: करतात की, दुसऱ्या कुणावर सोपवतात? 

आपण केलेल्या सर्वेक्षणात एक प्रश्न होता, ‘स्त्री चळवळीमुळे स्त्रीवर घरकाम आणि आर्थिक स्वावलंबन अशी दुहेरी जबाबदारी आली असे वाटते का?’

203 पैकी 167 उत्तरदात्यांना (82.67%) वाटते की, त्यांच्या स्तरातील स्त्रियांवर अर्थार्जन आणि घरकाम अशी दुहेरी जबाबदारी पडत आहे. या उलट 28 व्यक्ती (13.86%) व्यक्ती म्हणाल्या की, स्त्रीवर अशी दुहेरी जबाबदारी वगैरे काही नाही. 

4 व्यक्तींच्या मते स्त्रियांनी घरकाम हे स्वेच्छेने ओढवून घेतलेले असते; तर एकाच्या मते दुहेरी जबाबदारी हा त्यांचा चॉइस असतो. या प्रश्नावर काहींनी ज्या जास्तीच्या टिप्पण्या केल्या, त्या खाली नमूद केल्या आहेत. त्यांवर थोडी चर्चा करणे गरजेचे आहे तरच घरकाम या मुद्द्याला किती अगणित पैलू आहेत, हे ध्यानात येईल.  

उत्तरदात्यांनी केलेल्या टिप्पण्या-

कदाचित स्त्रियांनी ती (घरकाम आणि अर्थार्जन ही दुहेरी जबाबदारी) स्वत:हून लादून घेतलेली असेल. (पुरुष)
घरकाम स्वत:हून ओढवून घेतलेलं असतं. (पुरुष)
स्त्रीवर दुहेरी जबाबदारी आली, कारण तो तिचा चॉइस असतो. (पुरुष)
दुर्दैवाने स्त्रिया घरकाम अंगावर ओढवून घेतात. घरात काम नाही केलं, तर त्यांना गिल्टी वाटतं. (स्त्री) 
खालच्या स्तरात आधीपासूनच जास्त इक्वॅलिटी आहे, दोघेही काम करतात, कमवतात. (पुरुष)

शेवटच्या टिप्पणीवर सर्वात आधी चर्चा करू या. ‘खालच्या स्तरात आधीपासूनच जास्त इक्वॅलिटी आहे’, हे मत भलतेच फसवे आहे. कष्टकरी समाजात अनेक स्त्रिया शेतमजूरी, घरकाम, स्वयंपाकाची कामे, कारखान्यात दिवसपाळी करून पुरुषाच्या बरोबरीने कमवतात, पण म्हणून त्यांच्यामध्ये इतर बाबतीत इक्वॅलिटी असते असे नाही. आर्थिकदृष्टया खालच्या स्तरात स्त्रीला पहाटे उठून, संपूर्ण घराचा स्वयंपाक करून घराबाहेर पडावे लागते आणि परतल्यावर पुन्हा धुणी-भांडी आणि रात्रीचा स्वयंपाक करावा लागतो. जेव्हा तिला एवढी कामे करणे शक्य नसते, तेव्हा तिच्या मुली आणि सुना ती करतात, पण घरचे पुरुष कदापि करत नाहीत. तिचे मुलगे दळण आणणे, पाणी भरणे अशी कामे अवजड असूनही ‘बायकी’ म्हणून करत नाहीत. अशा सामाजिक स्तरात स्त्रीने कमावलेला पैसा ती सहसा मनाप्रमाणे खर्च करू शकत नाही. अशा बहुतांश घरांत पुरुषांना व्यसने असतात. त्यामुळे त्यांच्या व्यसनांसाठी स्त्रीला स्वकष्टाचा पैसा पुरवावा लागतो. घरात वंशाचा दिवा म्हणून मुलग्यांचे खूप लाड होत असल्याने ते आई आणि बहिणीवर शिरजोरी करतात. खाण्या-पिण्याबाबत पुरुषाला झुकते माप आणि बाईकडे दुर्लक्ष असतेच असते. त्यामुळे खालच्या स्तरात आधीपासूनच जास्त इक्वॅलिटी आहे, हे विधान एकांगी आहे; इक्वॅलिटी फक्त कष्टांत असते, दर्जात आणि अधिकारांमध्ये नाही. 

एक वास्तव मात्र बेदखल करून चालणार नाही. कष्टकरी वर्गातील पुरुष जेव्हा दिवसभर काम करतात, तेव्हा ते खूप अंगमेहनतीचे काम करत असतात. रंगारी, सुतार, गवंडी, सफाई कामगार, हमाल असे किती तरी कष्टकरी पुरुष दिवसाचे 8-9 तास कठोर परिश्रम करत असतात. त्यांच्या घरच्या स्त्रिया जर पैसे कमवण्यासाठी बाहेर पडत नसतील, तर त्यांना घरची सर्व कामे करणे भागच असते, कारण घराबाहेर 8-9 तास सक्त कष्ट केल्यानंतर परत पुरुषाकडून घरकामाची अपेक्षा करणे योग्य ठरत नाही. म्हणूनच घरकामाची वाटणी प्रत्येक घरात त्या त्या कुटुंबातील परिस्थितीशी सुसंगत ठेवणे वाजवी ठरेल. आणि हे मान्य करूनसुध्दा स्त्री-पुरुष दोघांनाही गृहव्यवस्थापनेचे बाळकडू सारख्याच प्रमाणात देणे व दोघांनीही ती स्वत:ची जबाबदारी मानणे ही काळाची गरज झाली आहे.

स्त्री चळवळीने स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले. त्याच बरोबर स्त्री शिक्षणाचा वाढता प्रसार, शासनाची लिंग-निरपेक्ष धोरणे, औद्योगिकीकरण या सगळ्याच्या परिणामी स्त्रिया मोठ्या प्रमाणात अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या. घरकामाची लिंग-निरपेक्ष वाटणी व्हावी हा मुद्दाही स्त्री चळवळीने वारंवार ऐरणीवर आणला, परंतु त्यास फार म्हणजे फार अल्प प्रतिसाद मिळाला. कारण स्त्रीवर घरकामाच्या जबाबदारीचे शतकानुशतके संस्कार झालेले आहेत, या उलट पुरुषाच्या मेंदूत त्याचे अजिबातच प्रोग्रामिंग नाही. किंबहुना, घरकाम हे हलक्या प्रतीचे काम असून ते स्त्रीनेच करायचे असे त्याच्या (आणि अनेक स्त्रियांच्यापण) मेंदूत हार्डवायर्ड झालेले आहे. त्यामुळे स्त्री घरातील आणि घराबाहेरील कामांनी शिणते आहे, हे काही पुरुषांना जाणवत नाही, (कारण बहुतांश घरकाम त्यांच्या अनुपस्थितीत आटोपलेले असते), काहींना दिसत असूनही ते पटत नाही. काही पुरुषांना ते दिसते, जाणवते, पटते, पण मान्य करवत नाही. काही पुरुषांना स्त्रीवर दुहेरी जबाबदारी पडते व त्यात त्या थकून जातात हे पूर्णपणे मान्य असते, पण त्याबाबत त्यांना स्वत:ला काहीही सक्रिय साहाय्य करायचे नसते. ‘मीपण करत नाही, आणि तुम्हीपण करू नका’, अशी त्याची भूमिका असते. मग तो सल्ले देतो, ‘नका करू, बाहेरून आणा, नोकर ठेवा’. हे सल्ले जेव्हा व्यवहार्य असतात, तेव्हा वास्तवात उतरतात. सुखवस्तू घरांतील स्त्री आता धुणी-भांडी-केर-पोछा ही कामे मोलानेच करून घेते. अनेक घरांत पोळ्या आणि काही घरांत रोजचा स्वयंपाकपण मदतनीस बाईकडून करून घेतला जातो. पण अनेकदा त्यांत व्यावहारिक अडचणी असतात. कधी नोकर किंवा बाहेरून खाद्यपदार्थ आणणे परवडत नाही. छोट्या गावांमध्ये अनेक पदार्थ बाहेर उपलब्धच नसतात. कधी घरातल्या कुणाला तरी पथ्य असल्याने बाहेरचे चालत नाही. अशा व्यावहारिक अडचणी उद्भवल्या तर ही कामे मुख्यत्वे स्त्रीच्याच खांद्यावर येऊन पडतात. शिवाय कपडे मशिनमध्ये धुतले, तरी ते वाळत स्त्रीलाच घालावे लागतात. भांडी बाईने घासली, तरी ती जागच्या जागी गृहिणीच लावते. पोळ्या बाईने केल्या, तरी नाश्ता, दिवसात अनेक वेळा चहा/कॉफी गृहिणीलाच बनवावी लागते. प्रत्येकवेळी कपबशा तिलाच विसळाव्या लागतात. 

या नाण्याला दुसरे पैलूही असतात आणि ते नाकारून चालत नाही. काही स्त्रियांना आपल्याला घरकाम उरकत नाही म्हणजे आपण स्त्री म्हणून कमी पडतो असे वाटते. काही स्त्रियांना पुरुषांनी चुकतमाकत केलेले घरकाम पसंत पडत नाही म्हणून त्या वैतागून पुरुषांना घरातली कामे सांगत नाहीत. (बहुतेक पुरुष काही केल्या घरकामाची योग्य पध्दत शिकून घेत नाहीत, हेसुध्दा तेवढेच खरे असते.) काही कुटुंबांमध्ये पुरुषाला घरकाम सांगणे आधीच्या पिढीला आवडत नाही म्हणून ते पूर्णपणे बाईलाच करावे लागते. काही घरांमध्ये पुरुषाने एखादे जरी काम घरात केले, तरी तो त्याची जाहिरात फार करतो आणि मग शेजारचे-पाजारचे, नातेवाईक यांकडून त्याला किंवा बाईला टोमणे बसतात. तो ताप नको म्हणून पुनश्च स्त्रीवरच सगळी कामे पडतात. कधी पुरुषाची फिरतीची नोकरी असते, त्यामुळे अनेक कामांच्या वेळी तो आसपास नसतोच. या आणि अशा अनेक कारणांपायी पुरुष घरकामातून निसटतात. एका सर्वेक्षणानुसार भारतातील पुरुष घरकामासाठी दिवसातून सरासरी फक्त 13 मिनिटे देतात हे वास्तव समोर आले आहे. याउलट नोकरी करणारी स्त्रीसुध्दा रोज सरासरी 4 तास घरकाम करते. हे सत्य उद्वेगजनक आहे. 

या पार्श्वभूमीवर आपल्या उत्तरदात्यांच्या काही टिप्पण्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण पहिल्या तीन टिप्पण्या एकत्र करू या. “घरकाम स्त्रीने स्वत:हून ओढवून घेतलेले असते आणि दुहेरी जबाबदारी हा स्त्रीचा चॉइस असतो.”

अनेक स्त्रियांना स्वयंपाकाची आवड असते, स्वच्छतेचे वेड असते आणि घरसजावटीची हौस असते हे निर्विवाद. त्यापायी त्या खूपसे घरकाम स्वत: करतात. पण त्यांच्या या आवडीचा, हौसेचा आणि वेडाचा घरातील सर्वांना फायदा मिळत असतो हेपण निर्विवाद. त्यामुळे ‘तुला हौस आहे, तर तूच कर’ असे म्हणून सगळी मेहनत तिच्यावर ढकलणे ही चलाखी झाली. दुसरे म्हणजे स्वयंपाकाची हौस आहे, याचा अर्थ तिला त्यात मदत नकोच असते असे नाही. ती जर खटाटोप करून संपूर्ण कुटुंबासाठी एखादा वेळखाऊ पदार्थ करत असेल, तर त्या वेळात घरातील स्वच्छतेची किंवा चहा-नाश्त्याची जबाबदारी दुसऱ्या कुणी उचलली, तर तिला ते आवडेलच. स्वयंपाकाची आवड आहे म्हणून ती काही फक्त स्वत:पुरते करून खात नसते; तर साऱ्या घराला खाऊ घालत असते. स्त्रीला जर स्वच्छतेची, घर सजावटीची आवड असेल, तर तिच्या मेहनतीमुळे संपूर्ण कुटुंबाला चोवीस तास एक नेटका, आरामदायी भोवताल उपलब्ध होत असतो. त्याचा सकारात्मक परिणाम घरातील प्रत्येकाला विनासायास उपभोगता येतो. असे असताना त्याविषयी कृतज्ञ राहून तिची इतर काही कामे हलकी करण्याऐवजी ‘ही तिने आपणहून ओढवून घेतलेली कामे आहेत’ असे म्हणणे हे संवेदनशून्यतेचे लक्षण होय. 

अनेक स्त्रिया त्यांना उत्तम जमतो असा एखादा पदार्थ अगदी धावपळ करून ऑफिसला घेऊन जातात, किंवा शेजारी, नातेवाईक यांना नेऊन देतात. त्रयस्थ व्यक्तीला ही ओढवून घेतलेली कामेच वाटतील. काही अंशी ते बरोबरही आहे. पण या कामांद्वारे स्त्री तिचे सामाजिक नातेसंबंध, तिच्या आधारयंत्रणा दृढ करत असते. अशा देवाणघेवाणीतून ती तिला सुखावणारे कौतुक, आपुलकी, स्तुती आणि मैत्रीची ऊब मिळवत असते. या सगळ्याचे मोल तिच्या लेखी खूप असते. शिवाय अशा स्त्रीच्या स्वभावातील आदरातिथ्याचा लाभ पुरुष सहकाऱ्यांनासुद्धा मिळत असतो. 

(येथे एक निरीक्षण नोंदवू इच्छिते. माझ्या परिचयातील 3-4 पुरुष नेहमी त्यांना अमुक एक पदार्थ किती छान जमतो, आणि घरात हा पदार्थ नेहमी तेच कसे करतात असे कौतुकाने माझ्याकडे बोलतात. पण त्यातील एकानेही एकदाही तो पदार्थ मला चाखायला आणून दिलेला नाही. स्त्री आणि पुरुषांच्या पाककौशल्यातील हा मोठाच सामाजिक फरक म्हणायला हवा.) 

यातील एक लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे कामाच्या जागी स्त्रीने एखादी उल्लेखनीय कामगिरी केली, तर त्याचे कौतुक होईलच याची हमी नाही. (एका उत्तरदात्रीने म्हटलेच आहे की, ऑफिसमध्ये तिने विशेष कामगिरी केली, तरी काही पुरुष केवळ ‘इगो’पायी तिच्या कामगिरीविषयी बोलतच नाहीत आणि त्याकडे बघतही नाहीत.) कधी कधी स्त्रीचे कुटुंबीयसुध्दा तिच्या घराबाहेरच्या कामगिरीस अनुल्लेखाने मारतात. विशेषत: ती त्यांच्या अपेक्षेइतकी गृहकृत्यदक्ष नसेल, तर तिच्या ऑफिसमधील कामगिरीविषयी घरात उघड नाराजी व्यक्त होते. पण तिने एखादा पदार्थ खाऊ घातला, तर त्याचे मात्र आवर्जून कौतुक करतात. जोपर्यंत स्त्रीच्या पाककलेचे अतोनात कौतुक आणि तिच्या घराबाहेरच्या कार्याविषयी औदासिन्य असते, तोपर्यंत स्त्रीची सामाजिक कौतुकाची भूक पूर्ण करण्यासाठी तिला पाककौशल्य हाच खात्रीचा मार्ग असतो. अर्थात, अनेक स्त्रिया - कौतुक करा अथवा न करा - स्वत:च्या आनंदासाठी स्वयंपाक करतात हेसुध्दा दिसते. त्याबद्दल तिचे होणारे कौतुक मनापासून असू शकते, किंवा दुसरी एक उत्तरदात्री म्हटल्याप्रमाणे मखलाशी असते, व तिला भुलून स्त्री उरापोटी स्वयंपाक करून खाऊ घालते. पण त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्याऐवजी तिच्या हौसेवर टीका करण्याने नात्यात तेढ येते.

हौस, आवड, वेड, सोस म्हणून गळ्यात घेतलेली कामे बाजूला ठेवून आता आपण सक्तीच्या घरकामाविषयी बोलू या. घटकाभर असे गृहीत धरू या की, ज्या 4 निकषांवर आपण आपले उत्तरदाते निवडले, त्यांना घरकामासाठी एकच नाही, तर दोन मदतनीस ठेवणे आर्थिकदृष्टया सहज शक्य आहे. (वास्तव तसे नाही, काहींनी आर्थिक ओढाताण होते, असे कबूल केले आहे.) आता मोलाने काम करून घेऊनसुद्धा स्त्रीवर का आणि किती कामे पडतात, ते बघू.

स्वयंपाकाची बाई उशिरा येत असेल, तर मुलांचे किंवा स्वत: आणि नवरा यांचे डबे करावेच लागतात. सकाळ-संध्याकाळ धरून 3-4 वेळा तरी चहा-कॉफी, कपबशा विसळणे करावेच लागते. अनेक घरांत सकाळी केलेल्या पोळ्या रात्री खायला आवडत नाहीत, म्हणून रात्री ताज्या पोळ्या कराव्या लागतात किंवा रात्री डाळ-भात-भाजी हे ताजे करावे लागते. शिवाय सणाचा किंवा नैवेद्याचा स्वयंपाक, आजारी माणसाचे पथ्याचे जेवण स्त्रीलाच बनवावे लागते. या सगळ्या गुंतागुंतीत घरकामाच्या मदतनीसांनी सुट्टी घेणे, काम सोडणे, ते आपल्या सोयीच्या वेळांत येऊ न शकणे, अप्रामाणिक निघणे, त्यांच्या कामाचा दर्जा समाधानकारक नसणे किंवा जेथे मदतनीस उपलब्ध नाही अशा ठिकाणी कुटुंबाचे वास्तव्य असणे अशा किती तरी व्यावहारिक अडचणी असतात. मदतनीस येवो अथवा न येवो, काही गोष्टी कराव्याच लागतात. त्या न करणे हा पर्याय उपलब्ध नसतो. 

स्वयंपाकघरातील कपाटे, फ्रीज, डबे-डुबे यांची स्वच्छता, वाणसामानाची खरेदी, भाजी आणणे-निवडणे, रोजच्या स्वयंपाकाचे नियोजन व त्यानुसार पूर्वतयारी, एखाद्या विशेष प्रसंगासाठी स्वयंपाकाची तयारी ही कामे अर्ध्या तासासाठी येऊन जाणारी स्वयंपाकाची बाई करत नाही, ती घरातले पुरुषही करत नाहीत, तर गृहिणीलाच त्यात लक्ष घालावे लागते.. कुटुंबाच्या खाण्यापिण्याची जबाबदारी नीट पार पडावी यासाठी स्त्रीला सतत जी व्यवधाने ठेवावी लागतात, जे कामाचे नियोजन आणि पूर्वतयारी करावी लागते, त्याला स्त्रीवादात ‘मेंटल लोड’ हा शब्द वापरतात. तो पूर्णपणे स्त्रीवर पडतो, मग ती स्त्री पूर्ण वेळ गृहिणी असो, वा नोकरदार. त्यात ऐच्छिकता नावालाही नसते. गृहव्यवस्थापनाचा मेंटल लोड हा चॉइस नसून कम्पल्शन असते. 

धुणे-भांडी-झाडू-पोछा ही कामे मोलाने करून घेतली, तरी भांडी लावणे, कपड्यांच्या घड्या करणे, कपड्याची कपाटे आवरणे, बाथरूम्स, बेसिन धुणे, मुलांचे अभ्यास घेणे, त्यांच्या शालेय उपक्रमांना हजेरी लावणे, त्यांच्यासाठी पौष्टिक खाऊ बनवणे किंवा आणून ठेवणे, रोजचा पसारा आवरणे, गाद्या घालणे-काढणे, अधून-मधून अडगळ आवरणे, दारे-खिडक्या, भिंती, छत, पंखे स्वच्छ करणे, पडदे धुणे-बदलणे ही कामे मोलाने करता येत नाहीत. ती ओढवूनपण घेतलेली नसतात; ती कुणाला तरी करावीच लागतात. फक्त मूठभर, अती श्रीमंत कुटुंबांमध्येच अशा प्रकारची कामे करणे ऐच्छिक असते. 

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com 

Tags: करुणा गोखले स्त्री पुरुष समता युवा भान स्त्रीवाद घरकाम गृहिणी Load More Tags

Comments: Show All Comments

Musale Anand Ramdas

वास्तवदर्शी मांडणी

Vrushali Magdum

खूप छान विवेचन घरकामातील सूक्ष्म कंगोरे अतिशय परिणामकारक मांडले आहेत.स्त्री वर्गाला हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग वाटतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,या लेखाने समस्त स्त्री पुरुषांना अनुभूती होईल .

Vandana Kanase

Realistic Article madam,Very nice.

Pradnya

एक नंबर लिहलाय ♥️

सारिका सावंत

खूप छान लेख लिहिला आहे. वाचताना असं वाटतं कि माझ्या मनातील भावना या लेखात छापून आल्या आहेत. आपण अपेक्षिलेला बदल होणे ही काळाची गरज आहे. पण भारतीय समाजात हा बदल उत्क्रांती च्या वेगाने च घडणार की काय अशी भीती वाटते सद्यस्थिती पाहून.

Ashwini ade

लेख आवडला, वास्तवदर्शी, सूक्ष्म लिखाण आहे

विकास गोलांडे

वास्तवदर्शी लिखाण, स्त्री- पुरुष दोघांच्याही मानसिकता बदलणे आवश्यक आहेत.

अंजली मुळे

सगळे मुद्दे अगदी बरोबर आहेत. अलीकडे बरीच मंडळी ( मुलं/ मुली ) परदेशी जायला लागली आहेत .तिथे ते बऱ्यापैकी घरकामाची जबाबदारी घ्यायला लागले आहेत. अर्थात शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांचे सुरुवातीला जरा हालच होतात म्हणून शिक्षण झाल्याबरोबर ते लग्न करतात .नंतर हळूहळू शिकतात . असं माझं निरीक्षण आहे.त्यावरही करुणाची मतं वाचायला आवडेल.

Anuradha kale

स्त्री पुरुष किंवा नर मादी ही निसर्गाची निर्मिती आपल्याला चॉईस विचारला नव्हता पण स्त्रियांना काही गोष्टी अपरिहार्य सगळ्यांनी एकमेकांशी समजुन वागणे ह्यातच सगळ्यांचे हित व कल्याण पूर्वीच्या समाजरचनेत बदल होत होत स्त्री शिकुन अर्थार्जनासाठी बाहेर पडली पण त्यातून काही समस्या निर्माण झाल्या घरकामाचे मुलांचे संगोपन वडिलधाऱ्या मंडळींच्या समस्या वृद्धाश्रम आले पाळणाघर आले एकमेकांशी समजुन माणुसकीने वागणे हे आवश्यक आहे पण हे दिसत नाही प्रत्येक पुरुषाने स्वयंपाकच केला पाहिजे असा दृष्टीकोन न ठेवता आपले पणाने मदत केली तरी चित्र बदलेल डाॅक्टर शल्य विशारद प्रसुती तज्ञ अंत्यसंस्कार करणारे सरण किंवा विद्युतदाहिनी चालवणारे एंब्युलन्स ड्रायव्हर 24/7चॅनेलमध्ये काम करणारे पायलट सैनिक अशी इतकी क्षेत्र आहेत की त्याची जीवनशैली इतकी वेगळी असते की ह्या अपेक्षा आपण ठेवणे योग्य आहे का? तेच नर्सेस महिला पोलीस इ ना लागु आहे त्याचप्रमाणे बाईने पण बाईला समजुन माणुसकीने वागणे अपेक्षित आहे अशी अनेक उदाहरणे निरिक्षण केले तर दिसतील की बायका पण कारणीभूत असतात दुसऱ्या स्त्री च्या दुःखाला त्रासाला तेव्हा प्रत्येक व्यक्तीने परिस्थिती जाणून सर्वांशी माणुसकीने प्रेमाने वागण्याची शिकवण अंगी बाणली पाहिजे मग ते नाते पती पत्नी भाऊबहिणींच्या जावा मित्र मैत्रीण कोणतेही असो

Ashwini

हा लेख अतिशय वास्तवदर्शी आहे. स्त्री- पुरुष दोघांच्याही मानसिकता बदलणे आवश्यक आहेत. नाहीतर हे 'The Great Indian Kitchen' बायकांचे शोषण असेच करत राहील.

Add Comment