स्त्री चळवळीचे पुरुषांना जाणवणारे (स्त्रियांवरील) दुष्परिणाम

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 6 /12

blog.ipleaders.in

आपल्या घरातील पुरुष एखाद्या बाबतीत योग्य त्या दिशेने बदलला असेल आणि त्याबद्दल स्त्रीने समाधान व्यक्त केले, तरच त्याचा बदलण्याचा हुरूप टिकून राहील. या उलट तो ज्या बाबतीत बदललेला नाही, त्याबद्दलच जर स्त्री सतत दूषणे देत राहिली, तर त्याचाही बदलण्याचा उत्साह संपेल. जे स्त्री चळवळीमध्ये घडताना दिसते, तेच आपल्याला इतर परिवर्तनवादी चळवळींमध्येपण घडताना दिसते. येथे बाबासाहेबांचे वाक्य उद्धृत करणे योग्य ठरेल. एकदा ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले होते, “मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, ब्राह्मण्याच्या विरोधात आहे.” असे असूनही अनेकदा ज्या उच्चवर्णीयांच्या बोलण्या-वागण्यात काडीचाही वर्चस्ववाद नाही, त्यांनासुद्धा ‘जातीयवादी, मनुवादी, वर्णवर्चस्ववादी’ असे आरोप सहन करावे लागतात. त्याने दुखावले जाऊन असे लोक परिवर्तनवादी चळवळीपासून अलिप्त राहू लागतात. स्त्री चळवळसुध्दा पुरुषांच्या विरोधात नसून पुरुषश्रेष्ठत्वाच्या विरोधात आहे, स्त्रीमुक्तिवाद हा व्यक्तिविरोध नसून विचारविरोध आहे.

“सर्व पुरुषांमध्ये पुरुषी अहंकार असतो, असे गृहीत धरून मुली पुरुषांना धारेवर धरतात. त्यांच्या मनात पुरुषांविषयीचे बायस फार वाढले आहेत.”

“अधिकार मिळाला आहे, म्हणून तो वापरलाच पाहिजे हा अट्टाहास मुली करतात.”

“किमान 20% पुरुषांना तरी स्त्रीच्या विरोधात बायस नसतो. पण त्यांच्यावरसुध्दा सरसकट पुरुषीपणाचा आरोप करतात. सतत पुरुषांना झोडपण्यात कसली आली आहे समानता?”

“मी टू चळवळीचं रुपांतर इतकं विचित्र झालंय, की नकोच फार संबंध असं वाटायला लागलंय.”

“मुली स्त्रीमुक्तीच्या नावाखाली दारू पिणे, ड्रग्ज घेणे असे उद्योग करतात, पण ती काही स्त्रीमुक्ती नाही. त्याला विरोध म्हणून पुरुषांच्या बाजूने सेक्शुअल हरॅसमेंट, डोमेस्टिक व्हॉयलन्स होतो.”

“काही मुली खूप ड्रिंक्सविषयी आणि अग्रेसिव्हली बोलतात. त्यात भूषण, अविर्भाव असतो, तो खटकतो. लिबरेट होण्याचे त्यांचे अर्थ कधी कधी चुकीचे वाटतात.”

“आपला मुद्दा डावलला जाईल या भीतीने त्या जास्त आक्रमकपणे बोलतात.”

“स्त्रियांचा आत्मविश्वास कधी कधी इतका वर असतो, की त्यापुढे आपण नक्की काय करावं हे कळतच नाही.”

“स्त्रियांमध्ये अहंगंड वाढलाय, हा मला स्त्री चळवळीचा एकमेव तोटा वाटतो.”

“मला आता स्त्री चळवळीच्या मानसिक परिणामांची भीती वाटायला लागली आहे. मुली फार प्रॅक्टिकल, मेकॅनिकल व्हायला लागल्या आहेत. इतके दिवस पुरुष भावनाशून्य असतात, अशी त्या तक्रार करायच्या, आता मुलगा भावनाप्रधान असेल, तर त्यांना त्याच्या भावनांचं लोढणं वाटतं.”

स्त्रियांबरोबर वावरताना काय समस्या येतात, या प्रश्नाला पुरुषांनी दिलेली ही काही उत्तरे आहेत. त्यांचा संदर्भ विशेषकरून कामाच्या जागी, समवयीन स्त्रियांबरोबर येणाऱ्या समस्यांशी आहे.

स्त्री चळवळीच्या मांडणीचे भान असो वा नसो, चळवळीमुळे व्यवस्थेच्या पातळीवर जो बदल घडण्यास हातभार लागला, त्याची फळे स्त्रियांना मिळू लागली आहेत. त्याचबरोबर स्त्री-पुरुषांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी चळवळीने साहित्यापासून ते ललितकलांपर्यंत अनेक माध्यमे चोखाळली, त्यानेसुध्दा स्त्रीचा स्वत:च्या आयुष्याकडे, जीवनमार्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याचे प्रतिबिंब तिच्या वागण्या-बोलण्यात, तिच्या निर्णयप्रक्रियांमध्ये पडणे अपरिहार्य आहे. चळवळीने स्त्रियांना मानसिक आणि सामाजिक दुय्यमत्वातून बाहेर पडण्यासाठी मदत केली हे निर्विवाद. याउलट स्त्री चळवळ पुरुषांपर्यंत पोचते ती मुख्यत्वे त्यांच्या सहवासात आलेल्या स्त्रियांवर झालेल्या बदलांच्या माध्यमातून. याचा अर्थ असा की, या स्त्रिया चळवळीची शिकवण म्हणून जे काही आत्मसात करतात आणि स्वत:च्या वर्तणुकीतून व्यक्त करतात, ते चळवळीचे म्हणणे होय असे बहुसंख्य पुरुष मानून चालतात. आता त्यांच्यामधील बदलांची दखलही तिने घेतली पाहिजे असे वाटते. तरच चळवळीला अपेक्षित ते यश टिकेल, अन्यथा प्रतिक्रियावादी प्रवृत्ती डोके वर काढतील.

स्वाभिमान आणि अहंकार, आत्मसन्मान आणि अहंगंड, स्पष्टवक्तेपणा आणि उर्मटपणा, स्वधर्माचा अवलंब आणि बेबंद वृत्ती, स्वच्छंदपणा आणि बेफामपणा, चुणचुणीतपणा आणि आगाऊपणा यांमधल्या सीमारेषा धूसर तर असतातच, पण व्यक्तिसापेक्षही असतात. याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे नम्रपणा आणि पडखाऊपणा, जुळवून घेणे आणि कणाहीन राहणे, प्रसंग बघून गप्प बसणे आणि अन्याय सहन करणे यांच्या व्याख्यासुध्दा व्यक्तिसापेक्ष असतात. आजच्या तरुण स्त्रियांच्या वर्तणुकीबाबतीत आपल्या उत्तरदात्या तरुणांनी नमूद केलेल्या तक्रारींविषयी बोलायचे तर दोन-तीन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या देशाने स्वीकारलेल्या लोकशाही तत्त्वज्ञानात काही प्रमाणात व्यक्तिवाद अनुस्यूतच आहे. घराबाहेर लोकशाहीची सवय लागली, की तेच लोकशाही अधिकार कुटुंबात मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा सुरु होते. त्यात गैर असे काहीच नाही. परंतु पितृकेंद्री कुटुंबव्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला आणि अगदी तरुण स्त्रियांपर्यंत ते मान्य व्हायला खूप वेळ लागेल. जी स्त्री अनेक शतके तोंडातून ब्र काढत नव्हती, ती आज मनातले तर बोलू लागली आहेच, पण आपले बोलणे खोडूनपण काढते आहे, हे सहजी मान्य होणारे नाही. त्यामुळे स्त्रीने बोलणे हेच काही स्तरांत आक्रमकतेचे लक्षण वाटू शकते. पण आपले उत्तरदाते तरुण अल्पशिक्षितही नाहीत आणि मागास प्रदेशांतूनही आलेले नाहीत. ते सर्वच्या सर्व उच्चशिक्षित, निमशहरी किंवा शहरी भागात लहानाचे मोठे झालेले आणि सध्या शहरांत वास्तव्य करणारे आहेत. स्त्रीने मोकळेपणाने बोलणे, बरोबरीने वावरणे त्यांना नवे नाही, आणि त्यात त्यांना काही वावगेही वाटत नाही. असे असूनही जेव्हा सुमारे 5 टक्के तरुण म्हणतात की, स्त्रिया फार आक्रमकपणे बोलतात, तेव्हा त्यांची ही तक्रार गांभीर्याने घेतली पाहिजे.

लक्षात घेण्याजोगी दुसरी बाब म्हणजे दीर्घकाळ शोषित, वंचित, अवमानित राहिलेले समूह जेव्हा स्वतंत्र होऊन सत्तेत सहभाग घेऊ लागतात, तेव्हा त्यांच्या वर्तणुकीत शोषकाविषयीची चीड, भूतकाळातील अन्यायाचा वचपा घेण्याची इच्छा, शोषक वर्गाविषयीच्या साचेबध्द कल्पना आणि पूर्वग्रह, त्याच्या हेतूंविषयी शंका, आपण शोषकाएवढेच किंबहुना अधिक सक्षम आहोत हे दाखवून देण्याची इर्षा, नव्याने मिळालेले अधिकार वापरण्याचा सोस, मिळालेले स्थान गमावण्याची धास्ती अशा अनेक वृत्तींची सरमिसळ असते. या भावना नकारात्मक असल्या, तरी त्या निसर्गसुलभ आहेत. सर्व नव-विमुक्त समूहांमध्ये त्या दिसून येतात. त्यांची नकारात्मकता जाणवून त्या प्रयत्नपूर्वक कमी कराव्या लागतात. तसे प्रयत्न झाले नाहीत, तर एक उत्तरदाता म्हणाला त्याप्रमाणे ‘ज्या पुरुषांना स्त्रीचे भले व्हावे असे मनापासून वाटते, ते पुरुषही दुखावून लांब जातील’. आपला आणखी एक उत्तरदाता म्हणाला, “ज्या मुठभर पुरुषांचा कल स्त्रियांना चांगलं वागवण्याकडे आहे, त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी ते अप्रिशिएट केलं नाही, तर पुरुषांचा हिरमोड होतो की, एवढं चांगलं वागूनही त्याचं अप्रिसिएशन नाही. स्त्रियांनी त्यांना काय मिळालं नाही, याचंच फक्त भान ठेवलं तर प्रॉब्लेम येतो.”

आपल्या घरातील पुरुष एखाद्या बाबतीत योग्य त्या दिशेने बदलला असेल आणि त्याबद्दल स्त्रीने समाधान व्यक्त केले, तरच त्याचा बदलण्याचा हुरूप टिकून राहील. या उलट तो ज्या बाबतीत बदललेला नाही, त्याबद्दलच जर स्त्री सतत दूषणे देत राहिली, तर त्याचाही बदलण्याचा उत्साह संपेल. जे स्त्री चळवळीमध्ये घडताना दिसते, तेच आपल्याला इतर परिवर्तनवादी चळवळींमध्येपण घडताना दिसते. येथे बाबासाहेबांचे वाक्य उद्धृत करणे योग्य ठरेल. एकदा ते आपल्या सहकाऱ्यांना म्हणाले होते, “मी ब्राह्मणांच्या विरोधात नाही, ब्राह्मण्याच्या विरोधात आहे.” असे असूनही अनेकदा ज्या उच्चवर्णीयांच्या बोलण्या-वागण्यात काडीचाही वर्चस्ववाद नाही, त्यांनासुद्धा ‘जातीयवादी, मनुवादी, वर्णवर्चस्ववादी’ असे आरोप सहन करावे लागतात. त्याने दुखावले जाऊन असे लोक परिवर्तनवादी चळवळीपासून अलिप्त राहू लागतात. स्त्री चळवळसुध्दा पुरुषांच्या विरोधात नसून पुरुषश्रेष्ठत्वाच्या विरोधात आहे, स्त्रीमुक्तिवाद हा व्यक्तिविरोध नसून विचारविरोध आहे.

मात्र स्त्री चळवळीचे फायदे मिळवून पुरुषाच्या बरोबरीने काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला याचे भान राहतेच असे नाही. मुळात ती स्त्री चळवळीची लाभधारी असली, तरी तिला चळवळीच्या भूमिका ठाऊक असतातच असे नाही. किंबहुना ठाऊक नसण्याची शक्यताच जास्त असते. कारण आपल्या उत्तरदात्या तरुणींपैकी फक्त एकीला स्त्रीवादातील विविध प्रवाहांची जाण होती. या उलट बहुतेक सर्व तरुण-तरुणींनी ‘स्त्री चळवळीच्या कोणत्या भूमिकांची माहिती आहे?’ या प्रश्नाला आरंभालाच शरणागती पत्करली.

स्त्रियांच्या मनात पुरुषांविषयीचे बायस फार वाढले आहेत हे एका तरुणाचे निरीक्षणसुध्दा काळजीत टाकणारे आहे. स्त्री-पुरुषांमधील अभिसरण वाढले आहे, त्यांच्या नात्यात मोकळेपणा आला आहे असे जर आपलेच उत्तरदाते म्हणत आहेत, तर मग बायसेस कमी व्हायला हवेत. त्याऐवजी ते वाढत आहेत असे जर वाटत असेल, तर याचा अर्थ तरुणींमध्ये विचार करून प्रतिक्रिया देण्याइतका, आपले समज साधार आहेत का, याचा पडताळा घेण्याइतका संयम नाही. हे निरीक्षण इतर क्षेत्रांत काम करणाऱ्या अभ्यासकांचे देखील आहे. फरक इतकाच की, ते फक्त तरुणींनाच नाही तर सर्व पिढ्यांमधील स्त्री आणि पुरुषांना लागू आहे.

सतत प्रगत तंत्रज्ञान हाताशी असल्याने आजच्या युवा पिढीला सगळ्या गोष्टी क्षणार्धात घडण्याची सवय झाली आहे. कम्प्युटर उघडला, आंतरजाल जोडणी झाली, की एका मिनिटात लाखोंचे देयक भरले जाते. तिकडे अमेरिकेत बाळ जन्माला आले, की दुसऱ्या क्षणी त्याचे फोटो भारतातील सर्व नातेवाईकांना मिळतात. मुलगी प्रवासाला निघाली, की ती स्वत:चे लाइव्ह लोकेशन पाठवते आणि आई-वडील दर पंधरा मिनिटांनी ती कुठवर पोचली, हे बघत बसतात. केवळ तरुणच नाही, तर समस्त मानव जातीत घायकुतेपणा शिरला आहे. आपला एक उत्तरदाता म्हणालाच, “हमारे जनरेशनमें ठहराव नाम की चीज है ही नहीं.” बायसेस ऊर्फ पूर्वग्रह वाढणे आणि ते बोलून दाखवणे याचा सरळ अर्थ असा होतो की, स्त्रिया वस्तुस्थिती नीटशी समजण्याआधीच निष्कर्ष काढून मोकळ्या होत आहेत. हे झाले तरुणींमधील बायसेसबद्दल. आता पुरुषांमधील स्त्रीविषयक बायसेसबद्दल तरुणी काय म्हणाल्या, ते बघू या. खाली आपल्या उत्तरदात्या मुलींच्या तक्रारी उद्धृत केल्या आहेत :

"मला हे कळतं, हे मुलींना प्रूव्ह करावं लागतं.”

“स्त्री घरच्या जबाबदाऱ्यांमुळे अवघड काम करूच शकणार नाही असं पुरुष सहकारी गृहीत धरतात.”

“कामाच्या जागी मुलीला आरक्षणाचे फायदे मिळालेत असं गृहीत धरलं जातं.”

“मुलगी असल्याने आर्थिक नियोजन कळत नसणार असं गृहीत धरतात.”

"मी फॅशन डिझायनर आहे. या क्षेत्रात मी जरा जरी मोकळेपणाने बोलले तरी मी 'चालू' आहे, हिच्याबरोबर मुभा घेतली तरी चालेल असे पुरुषांना वाटते.”

“खेड्यातून आलेल्या कलिग्जना मुलींशी बोलण्याची सवय नसते. ते माझ्या वागण्याचा चुकीचा अर्थ काढतात, मी 'चालू' आहे असं समजतात.”

“पुरुषांशी चांगले वागले की ते समजतात, आपण त्यांच्यात गुंतलोय.”

तरुणींना पुरुषांच्या मनात स्त्रीविषयक जे पूर्वग्रह जाणवतात, ते मुख्यत्वे दोन प्रकारांत मोडतात; स्त्रीच्या क्षमतांविषयी अविश्वास आणि तिच्या चारित्र्याविषयी सोयीस्कर गैरसमजुती. या उलट स्त्रीच्या मनातील पुरुषविषयक पूर्वग्रह मुख्यत्वे त्याच्या हेतूंविषयी आणि त्याच्या स्त्रीविषयक संभाव्य वर्तणुकीविषयी असतात. थोडक्यात, पूर्वग्रह दोघांच्याही मनात असतात आणि दोघांनाही त्यांचा त्रास सहन करावा लागतो.

मानवाचा मेंदू काही गोष्टी गृहीत धरून, काही पूर्वनिष्कर्ष हातचे धरून पुढील विचार आणि कृती करतो. असे केल्याने दैनंदिन व्यवहारातील नित्याच्या गोष्टींवर निष्कारण विचार करण्यात त्याची ऊर्जा खर्ची पडत नाही. आपण सर्व जण अगदी रोज हे करत असतो. आज सूर्य उगवला म्हणजे उद्या उगवणारच हे आपण कुठल्याही तार्किक समीकरणाने सिध्द करू शकत नाही. तरी सुध्दा उद्या पहाट होणार हे आपण गृहीत धरून जगत असतो. म्हणून तर जगात एकही असा वैज्ञानिक मुक्रर केलेला नाही, जो रोजच्या रोज काही तरी गणित करून ‘उद्या सूर्य उगवणार आहे बरं का’ असे रोज रात्री बारा वाजता घोषित करेल आणि मगच जग येणाऱ्या दिवसाच्या नियोजनाला लागेल. मुद्दा हा आहे की, रोजच्या वागण्यात काही गोष्टींचे सर्वसाधारीकरण करण्याने, काही पूर्वरचित कल्पना आधारभूत मानण्याने आपल्या क्रिया-प्रतिक्रिया झटपट होऊ शकतात, अपेक्षाभंग आणि अनर्थ टळू शकतात. या पूर्वरचित कल्पना सर्वस्वी निराधार नसतात, त्यांना प्रदीर्घ निरीक्षणांचा आधार असतो. (आपलाच एक उत्तरदाता म्हणाला की, 20 टक्के पुरुषांच्या मनात स्त्रीविषयी वाईट पूर्वग्रह नसतात. याचा अर्थ 80% पुरुषांमध्ये ते असतात, हे तो मान्य करतो आहे.)

स्त्रिया अपरिचित पुरुषावर विश्वास टाकत नाहीत त्यामागे असेच सर्वसाधारणीकरण असते, ज्यायोगे ती स्वत:ची सुरक्षितता नक्की करत असते. स्त्रिया जेव्हा सरसकट सर्व पुरुषांमध्ये पुरुषी अहंकार असणार, ते स्त्रीला कमी लेखणार असे गृहीत धरून वागतात, तेव्हा त्या पूर्वरचित कल्पनांनुसार वागून अपेक्षाभंग टाळत असतात. याचा अर्थ त्यांचे तसे वागणे समर्थनीय आहे का? तर नाही; अजिबातच नाही. ते काही अंशी नैसर्गिक असले तरी समर्थनीय नाही. याचे कारण नियमांना अपवाद असतात. बहुसंख्य पुरुषांमध्ये पुरुषी अहंकार असतो व त्यापायी ते स्त्रीला कमी लेखतात हा बहुसंख्य स्त्रियांना नियम वाटतो. (हे मी नाही, काही उत्तरदाते तरुणच म्हणाले आहेत.) पण त्याच वेळी सगळ्याच पुरुषांमध्ये पुरुषी अहंकार नसतो, सगळेच पुरुष स्त्रीला कमी लेखत नाहीत हेसुद्धा तेवढेच खरे असते.

स्त्रीला आर्थिक नियोजनातील फारसे काही कळत नाही, असे अनेक पुरुषांना वाटत असते, तेसुद्धा अगदीच निराधार नसते. कित्येक उच्चशिक्षित, कमावत्या स्त्रियासुध्दा कुटुंबाच्या आर्थिक नियोजनात घरच्या पुरुषाएवढ्या उत्साहाने लक्ष घालत नाहीत. याचे एक कारण असेही असते की, त्यांना घरातील दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये खूप लक्ष द्यावे लागत असल्याने आर्थिक नियोजन त्या पुरुषावर सोपवतात. पण याचा अर्थ स्त्रियांना अर्थकारण कळत नाही असे नाही. बँकिंग क्षेत्रात, शेअर ट्रेडिंगमध्ये काही कमी स्त्रिया कार्यरत नाहीत. आज जगभर सर्व क्षेत्रे सर्वांना खुली झाल्यामुळे कुणाला कशात गती असेल याविषयीचे परंपरागत ठोकताळे कुचकामी ठरण्याचे प्रसंग वाढत आहेत. याचे भान जेवढे वाढेल, तेवढा मिश्र समूहामधील विसंवाद कमी होईल, मग तो समूह भिन्नधर्मीय असो, भिन्नवांशिक असो, वा भिन्नलिंगी.

शिवाय माणसाची मानसिक जडणघडण ही वज्रलेप आणि अपरिवर्तनीय नसते. ती लवचिक, संस्कारक्षम आणि म्हणून परिवर्तनक्षम असते. लोकशाही मूल्यांची रुजवणूक, समतावादी चळवळींचे परिणाम, स्त्रीचे शिक्षण, स्त्री-पुरुष अभिसरणाच्या वाढलेल्या संधी, शिक्षित आया आणि मोठ्या बहिणी यांचे संस्कार, यांमुळे पुरुषपण बदलत आहेत. त्यांच्यातील बदलांना सकारात्मक प्रतिसाद देणे, यातच स्त्री आणि पुरुष दोघांचेही भले आहे.

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com  

(मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त)


हेही वाचा : 
भाग 1 स्त्रीमुक्ती चळवळ - संशोधनावर आधारित लेखाजोखा
भाग 2 या घरकामाचे करायचे काय? (पूर्वार्ध)
          या घरकामाचे करायचे काय? (उत्तरार्ध)
भाग 3 आक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर
भाग 4 संवादाचा अतिरेक आणि अभाव
भाग 5 स्त्री मुक्तीच्या विपर्यस्त कल्पना 

Tags: करुणा गोखले मेंटल लोड डोमेस्टिक व्हॉयलन्स Load More Tags

Add Comment