मन हो मीरा रंगी रंगले

मॅक्सवेल लोपीस लिखित 'मीरा श्याम रंगी रंगली' या पुस्तकाचा परिचय

कृष्णाच्या भक्तीत लीन असलेल्या मीरेची मानसिक अवस्था हा खरं तर ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे ठरवायचा विषय आहे. पण तिच्या या साऱ्या प्रक्रियेत तिला चैतन्याने भरलेल्या शांतीची अनुभूती होत होती, ज्या शांतीच्या शोधात आज सारे जग आहे. देवाच्या नावाने उभे राहिलेले हजारो संप्रदाय, कालांतराने त्यांचं पुढे धर्मामध्ये झालेलं रूपांतर, 'माझाच धर्म आणि संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे आणि बाकी सगळेच कसे अयोग्य आहेत' या मुद्द्यावरून होणारे वाद हे सगळं सध्याच्या काळात आपण हतबल होऊन बघत आहोत. दया, क्षमा, शांती, अहिंसा, भक्ती अशा नीतिमूल्यांच्या राशी सर्वच धार्मिक ग्रंथांमध्ये आहेत. पण धर्मांमुळे निर्माण झालेल्या वादविवादांत सर्वात जास्त गरज असलेला खरा ईश्वर बाजूलाच राहतोय. आजच्या काळात धर्माच्या नावाखाली कुठल्या तरी दिशेने भरकटत चाललेल्या जनसमुदायासाठी संत मीराबाई नक्कीच दिशादर्शक ठरू शकेल. त्यामुळेच अध्यात्माच्या मार्गाने जीवनाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाने आणि विशेषतः आजच्या काळातील समस्त स्त्रीवर्गाने संत मीराबाईंची 'मीरा श्याम रंगी रंगली' ही प्रेरणादायी कथा नक्की वाचावी.

संत मीराबाईंचा परिचय शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकामुळे झाला होता. पुस्तकात एखादंच वाक्य होतं त्यांच्याबद्दल. त्यानंतर स्वर्गीय लता मंगेशकर यांनी गायलेलं 'पायो जी मैने राम रतन धन पायो' हे गाणं ऐकलं. पण त्या पलिकडे संत मीराबाईंबद्दल माहिती करून घेण्याचा योग कधी आला नाही. पुढे बऱ्याच वर्षांनी भगवान श्रीकृष्णाच्या एका भजनात मीरेचा उल्लेख केलेला ऐकण्यात आला. 'कौन कहते है भगवान आते नहीं, हम मीरा के जैसे बुलातें नहीं।' ह्या ओळी ऐकल्या की मनात प्रश्न यायचा की, मीरेची भक्ती नक्की कशी असेल - ज्यामुळे या ओळी सुचल्या असतील? 

या प्रश्नाचे उत्तर मला अलिकडेच 'मॅजेस्टिक' तर्फे प्रकाशित झालेल्या श्री. मॅक्सवेल लोपीस यांच्या 'मीरा शाम रंगी रंगली' या पुस्तकाचे वाचन केल्यावर मिळाले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये थोर समाजसेविका सौ. मंदाताई आमटे यांनी केलेल्या भाषणामुळे पुस्तकाबद्दल, मीराबाईंच्या जीवनाबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं. ते शमविण्यासाठी म्हणून हे पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि जसजशी ते वाचत गेले तसतसा मीरेचा जीवनपटच जणू माझ्यासमोर उलगडत गेला. तिचे जीवन श्याममय रंगात कसे रंगून गेले होते ते स्पष्ट झाले. 

राधेची आणि इतर गोपिकांची आपल्या भगवंतावरील भक्ती वर्णन करताना लेखकाने व्यक्ताला बिलगून अव्यक्तात संचार करणाऱ्या भक्तीच्या अंतिम अवस्थेचे, अर्थात समाधी अवस्थेचे वर्णन केले आहे. अशी अवस्था जिथे पूजा-अर्चा, देवाचे भय, पश्चातापाचा भाव असे काहीच शिल्लक न राहता भक्त आणि भगवंत यातील अंतरही मिटून जाते. अशीच मीरेची भक्तीही वेगळी होती. तिने आपल्या जगण्यातून, आपल्या भक्तीतून स्वतःच्या नावाला एक नवा अर्थ दिला. कधी सगुण, कधी निर्गुण, कधी नाथ संप्रदाय, कधी रामभक्ती असे भक्तीचे वेगवेगळे मार्ग चोखाळत, तर कधी आपल्या या भक्तिमय प्रवासात भेटणाऱ्या सर्व साधुसंतांसोबत चर्चा करत आपल्या भक्तीची दिशा तिने स्वतःच ठरवली होती. अशी एक समजूत आहे की मीरेने संत रैदासांचे शिष्यत्व स्वीकारले होते. पण जनसामान्यांतील या समजूतीप्रमाणे रैदास हे मीरेचे गुरू नव्हते. त्या एका ऐतिहासिक चुकीने पूर्ण राजस्थानचा इतिहास कसा बदलू शकतो हे लेखकाने या पुस्तकात सप्रमाण स्पष्ट केलं आहे. मीरेने कोणाकडूनही दीक्षा घेतली नाही आणि कोणाला दीक्षा दिलीही नाही. तिच्या मनात असलेली भक्ती निश्चल होती म्हणून तिने आपल्या मनातील परमेश्वरालाच गुरू मानले. या आपल्या भक्तीतून मीराबाईंनी कुठल्याही प्रकारचा संप्रदायसुद्धा स्थापन केला नाही. 

राजपूत समाजात वाढलेल्या मीरेसाठी बहुभार्या पद्धती, पुरुषांचा भोगवाद, स्त्रियांचा त्याग, पुरुषांचे स्वामित्व, स्त्रियांचे दास्यत्व यातले काही नवीन नव्हते. लहानपणी आईने कृष्णाच्या मूर्तीकडे इशारा करत 'हा तुझा पती' असे सांगितल्या क्षणापासून तिने भगवान श्रीकृष्णालाच आपला पती म्हणून वरलं. तोच तिचं अस्तित्व झाला. आपला पती शाश्वत असल्याची जाणीव असलेल्या मीरेसाठी ती मूर्ती केवळ तिच्या भक्तीसाधनेतील एक साधन होती. तिचं साध्य त्या पलीकडचं होतं. भोजराज आणि मीरेचा विवाह ही केवळ एक औपचारिकता असल्या कारणाने त्यांना संतान झालं नाही. पण तरीही भोजराजने तत्कालीन प्रथांनुसार दुसरा विवाह केला नाही. भोजराजच्या त्यागाचे, मीरेला स्वीकारून तिच्यावर केलेल्या एका वेगळ्याच प्रेमाचे, त्यांच्या पवित्र नात्याचं महत्त्व नाकारणंही केवळ अशक्य आहे. भोजराजच्या मृत्यूनंतरही हरीनामात रंगलेल्या मीरेने आपल्या रचनेतून महाराणाला आपले अलौकिक सौभाग्य पटवून देत आपण सती जाणार नाही असं ठणकावून सांगितलं. मध्ययुगातील मीरेच्या स्वरांचं दर्शन आपल्याला आधुनिक युगात स्वर्गीय लता मंगेशकर यांनी गायलेल्या तिच्या पदांमधून घडतं. 

हरिनामात रंगलेल्या मीरेला मंदिरात सत्संगाच्या वेळी निर्गुणाचे बोल ऐकू येताच ती देहभान हरपून, श्यामरंगात रंगून जाऊन, भक्तीमध्ये लीन होऊन नाचत असे. राजघराणे, वंशगौरव, कुलमर्यादा, सीमाविस्तार अशा सगळ्या - आपल्यासारख्या सामान्यांसाठी अतिमहत्त्वपूर्ण असलेल्या - गोष्टींच्या पलीकडे गेलेले असे मीरेचे हे असीमित स्वातंत्र्याचे भावविश्व होते. 

विवाहानंतरच्या मीरेच्या या अशा प्रकारच्या वागण्यामुळे तिच्या सासरहून तिला विरोध झाला. आणि तिच्या वागण्याचा निषेध म्हणून तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचे, जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार सुरू झाले. पण या सगळ्यातून केवळ भगवंतावरील आपल्या भक्तीवर असलेल्या विश्वासाच्या बळावर ती बाहेर पडली. 

मीराबाईचा विश्वास केवळ एकाच ईश्वरावर होता. स्व- इच्छाप्राप्तीसाठी तिला वेगवेगळ्या दैवतांकडे जाण्याची गरज भासली नाही. भगवद्गीतेतील सातव्या अध्यायातील श्लोकांचा संदर्भ देत आणि मीराबाईच्या या संदर्भातील एका पदाचा दाखला देत लेखकाने कर्मठपणा आणि श्रद्धा यात असणाऱ्या अदृश्य दरीचं स्पष्टीकरण केलं आहे. सगळ्याच भौतिक सुखांचा त्याग करून, सर्व नात्यांना विसरून मीरा परम सत्याचा शोध घेत होती. तिची ही एकाच परमेश्वरावर असलेली भक्ती कुठल्याही परंपरेच्या चाकोरीत अडकलेली नसून विमुक्त होती. निर्गुण शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीकृष्णाची मूर्ती हे केवळ एक साधन होतं. तिची भक्ती तर मानवी मुक्तीसाठी होती असा नवा दृष्टिकोन लेखकाने या ग्रंथात दिलेला आहे.

परंपरा, मर्यादा अशा साऱ्या पाशांपासून मुक्त झालेली मीरा आपल्या मनातील कृष्णाबाबत मात्र सर्व मर्यादांचं पालन करणारी होती. गायन, नृत्य, काव्य अशा माध्यमातून तिने तिच्या पुरोगामी अशा लौकिक जीवनात आपल्या या मनोविश्वाचं दर्शन जगाला घडवलं आहे. मीरेच्या पदांमध्ये तिच्या लौकिक जीवनाचं सार, अलौकिक भावनांचं रूप कथन, समर्पणाची भावना, विरक्ती, एकेश्वरवाद, उपासनापद्धती, कर्मवाद, गोकुळाचं आणि राधेचं वर्णन, परमेश्वराशी भांडण, विरह अशा अनेक छटा येतात. आपलं लौकिक अस्तित्व भोजराजमुळे सुरक्षित आहे हे मीरा जाणून होती. तिच्या भक्तीचा खरा उत्कर्ष तिच्या वैधव्यानंतर दिसून आला. आपण वरलेला पती आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात कधीच अवतरणार नाही ही वेदना घेऊन ती आयुष्य जगत होती. तिची ही विरहवेदना जगाने जाणण्यापलीकडची अशीच होती. तिच्या या वेदनेचा इलाज तिच्या मनात असलेल्या तिच्या भगवंताकडेच होता. त्यामुळेच मग ती या निरर्थक जगापासून दूर राहून साधुसंगतीमध्ये हरिसुख मिळण्याच्या भूमिकेवर ठाम होती. तिला अविनाशी सुखाचं ते जग खुणावत होतं. 

भक्तिमार्गातून होणाऱ्या परिवर्तनावर मीराबाईचा विश्वास होता. तसंच कर्मसिद्धांताच्या अटळतेवर भाष्य करताना देवाचं महत्त्वही तिने मान्य केलं. तिच्या मते विधीलिखित बदलून विषाचं अमृत करण्याची शक्ती केवळ देवामध्येच आहे. अष्टांगयोगाचं महत्त्व ज्ञात असलेल्या मीरेची मोक्षप्राप्तीसाठी भक्तियोगावर श्रद्धा आहे. ती सगुणोपासक होती. कृष्णाची नवविधा भक्ती ही तिची उपासनापद्धती होती. मधुराभक्तीची साधक असलेल्या मीरेच्या शृंगार कथनात भक्तीरसाची सोबत असल्याने तिचा लौकिक शृंगार अलौकिक बनून जातो. म्हणूनच 'मीरेचा प्रवास हा भौतिक प्रेयसाकडून आध्यत्मिक श्रेयसाच्या वाटेने होतो' हे लेखकाचे वाक्य मनाला स्पर्शून जाते.

लेखकाने येशू ख्रिस्त आणि संत मीराबाई यांच्या विचारांतील साम्य दाखवून देताना पुस्तकात या दोघांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांचे दाखले दिले आहेत. परमेश्वराच्या राज्याचा शोध मीराबाई स्वतःच्या अंतरात्म्यातच घेत होती आणि येशू ख्रिस्तानेसुद्धा स्वर्गाचे राज्य प्रत्येक मनुष्याच्या अंतरंगात असल्याची ग्वाही दिली होती. स्वर्गाची वाट, अर्थात माणसाची आत्मविकासाकडे आणि चिरंतन सभ्यतेकडे होणारी वाटचाल ही जरी अवजड आणि अरुंद असली तरी ती जीवनाकडे घेऊन जाणारी आहे असं येशू ख्रिस्ताचं म्हणणं होतं आणि मीरेलासुद्धा या वाटेच्या अनन्यसाधारण भयाणतेची कल्पना होती. ज्या मीरेने आपल्या भगवंतावर दुर्दम्य विश्वास ठेवून विषाचा प्याला स्वीकारला त्याच विश्वासाबद्दल सांगताना भगवान येशू ख्रिस्त म्हणतात की, जर तुमच्याकडे मोहरीच्या कणाइतका विश्वास असेल तर तुम्ही पर्वत उपटून समुद्रात फेकू शकता. ह्या विश्वासाने माणसाची सर्व पीडांतून मुक्तता होते.

संत मीराबाई ही एक विशुद्ध संत होती. भगवद्प्राप्ती हेच तिचं एकमेव उद्दिष्ट होतं. मीरेचे विचार स्वतंत्र होते. तिचं स्वातंत्र्य जुलमी व्यवस्थेपलीकडे गेलं होतं पण तरी तिच्या मनातील नैतिक स्वराज्याला मात्र सीमा होत्या. ती चौकट तिने कधीही सोडली नाही. हा फरक आधुनिक युगातील प्रत्येक स्त्रीने लक्षात घेण्यासारखा आहे. स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घ्यायला हवं की, व्यक्ती स्वातंत्र्य कुठल्या दिशेने आणि कुठपर्यंत असावं याची एक सीमारेषा ज्याने त्याने आपापलं स्वातंत्र्य उपभोगताना ठरवायची असते. या संदर्भात विचार करायचा झाल्यास संत मीराबाई आजच्या काळात आणि भविष्यातही स्त्रियांसाठी नक्कीच एक प्रेरणादायी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व ठरू शकते.

लेखकाने मानवी जीवनातील निरनिराळ्या घटनांचा, अनुभवांचा त्या व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणाम महाभारतातील वेगवेगळ्या व्यक्तींचे प्रतिकात्मक दाखले देऊन अतिशय सुंदररित्या स्पष्ट केला आहे. जसं - 'धर्म कळतो पण प्रवृत्तीत येत नाही आणि अधर्म कळूनदेखील त्याची निवृत्ती होत नाही असे म्हणणारा दुर्योधन आपणच आहोत, स्त्रीसुखाची आशा धरलेला शंतनूही आपणच आहोत. असहाय्यतेच्या बाणशय्येवर जखडलेले भीष्म आपणच आहोत आणि स्वार्थासाठी स्व-धर्माचा त्याग करणारे द्रोणाचार्यही आपणच आहोत. अपराधी माणसाला सुडाच्याच नजरेने पाहणारी द्रौपदी, सत्याचे थर मनामध्ये जमवून ते सत्य नजरेआड करण्याचा प्रयत्न करणारी कुंती, मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत जीवाला छळणारी पूर्वायुष्यातील महाचूक मनात चिरंजीवी असणारे अश्वत्थामादेखील आपणच आहोत. जीवनप्रवासात थकून गेलेलं आपलं मन हे कुरुक्षेत्रात हतबल झालेल्या पार्थाचं रूप म्हणायला हवं. पण या सगळ्यांमध्ये सत्याची एक कधीही न विझणारी वातदेखील भगवान श्रीकृष्ण बनून आपल्या मनात सदैव तेवत आहे'. मीरेच्या आयुष्याचा, तिच्या जगण्याचा अभ्यास केल्यास आपल्या हे लक्षात येतं की, मीरादेखील अशाच एका भक्तीचं आणि आनंदरुपी जगण्याचं प्रतीक बनून जाते. लेखकाने हा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे या पुस्तकात मांडला आहे. या आणि अशा अनेक निरनिराळ्या प्रतीकांच्या आदर्शावरच माणसाला जीवनातील अनेक समस्यांची उकल करणं सोपं होऊ शकतं.

कृष्णाच्या भक्तीत लीन असलेल्या मीरेची मानसिक अवस्था हा खरं तर ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे ठरवायचा विषय आहे. पण तिच्या या साऱ्या प्रक्रियेत तिला चैतन्याने भरलेल्या शांतीची अनुभूती होत होती, ज्या शांतीच्या शोधात आज सारे जग आहे. देवाच्या नावाने उभे राहिलेले हजारो संप्रदाय, कालांतराने त्यांचं पुढे धर्मामध्ये झालेलं रूपांतर, 'माझाच धर्म आणि संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे आणि बाकी सगळेच कसे अयोग्य आहेत' या मुद्द्यावरून होणारे वाद हे सगळं सध्याच्या काळात आपण हतबल होऊन बघत आहोत. दया, क्षमा, शांती, अहिंसा, भक्ती अशा नीतिमूल्यांच्या राशी सर्वच धार्मिक ग्रंथांमध्ये आहेत. पण धर्मांमुळे निर्माण झालेल्या वादविवादांत सर्वात जास्त गरज असलेला खरा ईश्वर बाजूलाच राहतोय. संतांनी नीतिमूल्यांनाच महत्त्व दिलं आहे. रामाला आणि कृष्णाला सारख्याच रुपात पाहणारी मीरा आपल्या ईश्वरशोधनात इतर संप्रदायांशी सुसंवाद साधूनही स्वतःचा मार्ग स्वतः ठरवते. आजच्या काळात धर्माच्या नावाखाली कुठल्या तरी दिशेने भरकटत चाललेल्या जनसमुदायासाठी संत मीराबाई नक्कीच दिशादर्शक ठरू शकेल. त्यामुळेच अध्यात्माच्या मार्गाने जीवनाचा शोध घेणाऱ्या प्रत्येकाने आणि विशेषतः आजच्या काळातील समस्त स्त्रीवर्गाने संत मीराबाईंची 'मीरा श्याम रंगी रंगली' ही प्रेरणादायी कथा नक्की वाचावी आणि स्वतःला एकदा तरी मीरेच्या रंगात रंगून घ्यावं.

मीरा श्याम रंगी रंगली
लेखक - मॅक्सवेल लोपीस
प्रकाशन - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
मूल्य - 350 रू.

- कोमल केळकर, विरार
komal.patki@gmail.com 

Tags: वसई मीरा भारतीय संगीत अध्यात्म मधुराभक्ती कृष्ण संतसाहित्य हिंदी वाङ्मय पुस्तक परिचय नवी पुस्तके ख्रिश्चन मराठी Load More Tags

Add Comment

संबंधित लेख