स्त्रीमुक्ती चळवळ - संशोधनावर आधारित लेखाजोखा

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 1/12

बर्ट्रांड रसेल यांच्या 'The Conquest of Happiness' या पुस्तकाचा स्वैर मराठी अनुवाद करुणा गोखले यांनी पाव शतकापूर्वी 'सुखी माणसाचा सदरा' या नावाने केला, तो विशेष लोकप्रिय झाला. त्यानंतर सिमोन द बोव्हूआर यांच्या 'सेकंड सेक्स' या आणखी एका जगप्रसिद्ध पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला. त्यांच्या स्वतंत्र लेखनाचे 'बाई माणूस' हे पुस्तकही चांगलेच दखलपात्र ठरले आहे. आज त्यांची ओळख मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त अशी आहे..

त्यांनी 2021 या वर्षी 'स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान' या विषयावरील संशोधन प्रकल्प हाती घेतला होता.. त्यामध्ये 203 युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्या सर्वांना एकूण 62 प्रश्न विचारले गेले आणि प्रत्येक मुलाखत साधारणतः सव्वा तास चालली. त्या अभ्यासावर आधारित बारा भागांची लेखमाला 'कर्तव्य'वरून सलग 12 आठवडे ( प्रत्येक रविवारी ) प्रसिध्द करीत आहोत..

दोन वर्षांपूर्वी मराठीतील एका प्रसिध्द सिनेदिग्दर्शकांनी त्यांच्या वृत्तपत्रीय सदरात विधान केले की, ‘स्त्री चळवळीने स्त्रियांचे फार नुकसान केले आहे.’ त्यांच्या त्या विधानाचा मथितार्थ ढोबळमानाने असा होता की, स्त्री चळवळ स्त्रियांना स्वस्थ बसू देत नाही, सतत कुठल्या ना कुठल्या आकांक्षेच्या मागे धावायला लावते. या व्यतिरिक्त स्त्री चळवळीविषयी आणखीही काही नकारात्मक विधाने त्यांनी केली होती. योगायोगाने त्याच सुमारास मी एक अभ्यास प्रकल्प सुरु केला होता. त्याचे मुख्य उद्दिष्ट 28 ते 38 या वयोगटातील तरुण-तरुणींना त्यांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात स्त्री चळवळीची परिणामकारकता किती वाटते, हे तपासणे असे होते. त्यामुळे तरुण स्त्री-पुरुषांच्या स्त्री चळवळीविषयीच्या भावना त्यांच्याचकडून जाणून घेण्याचे साधन माझ्या हाती होते. त्या अभ्यास प्रकल्पासाठी मी एकूण 203 युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. त्या ध्वनिमुद्रित करून त्यांचे विश्लेषण केल्यावर जे वास्तव समोर आले, ते स्त्री चळवळीविषयीच्या प्रचलित समजांना छेद देणारे आहे. ते वाचकांपुढे आकडेवारीनिशी सादर करत आहे. अर्थात, या लेखाच्या शब्दमर्यादेत हिमनगाचे केवळ छोटेसे टोक सादर करू शकत आहे.

प्रकल्पात 123 युवती आणि 80 युवक सहभागी झाले होते. पैकी फक्त एका युवतीने म्हटले की, स्त्री चळवळीचा व्यक्तिश: तिला काहीही फायदा झालेला नाही. याच युवतीने असेही म्हटले की, स्त्री चळवळीचा पुरुषांनाही काहीही फायदा नाही. उर्वरित 122 युवतींनी स्त्री चळवळीचे एकूण 23 फायदे नमूद केले; काही व्यक्तिगत, तर काही सामाजिक पातळीवर जाणवणारे. उदाहरणार्थ, एका युवतीने सांगितले की, ती केवळ स्त्री चळवळीमुळे जिवंत राहिली, अन्यथा घरात सर्वांना मुलगाच हवा होता. अशा प्रकारच्या कबुलीजबाबापासून ते ‘शिकायला मिळाले’, ‘स्वप्न बघण्याचे धारिष्ट्य दिले’, ‘सामाजिक न्याय ही कल्पना शिकवली’, ‘यंत्रणा समन्यायी केल्या’, ‘आयुष्यातील अनेक गोष्टी कळून त्या पचवण्यासाठी, मानवी जीवनाचा गुंता कशामुळे आहे, हे समजून घेण्यासाठी चळवळ उपयोगी पडली’, ‘इतरांकडून किती अपेक्षा करायच्या हे चळवळीमुळे कळले’, ‘आयुष्यात कुठलाही संघर्ष न करता सर्व मानवी हक्क आपसूक मिळाले, संपूर्ण आयुष्यच सुलभ झाले’, इत्यादी इत्यादी.

80 पुरुष उत्तरदात्यांपैकी फक्त 3 युवकांनी म्हटले की, ‘पुरुष असल्याने त्यांना स्त्री चळवळीचा फायदा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ अन्य 77 युवकांनी स्त्री चळवळीचे पुरुषांना झालेले 19 प्रकारचे फायदे नोंदवले. त्यांमध्ये ‘शिक्षित आणि स्वयंपूर्ण आई मिळाली’, ‘खंबीर साथ देणारी बायको मिळाली’, ‘पुरुषाचे कौटुंबिक स्थैर्य वाढले’ येथपासून, ते ‘आम्ही माणूस म्हणून संवेदनशील झालो’, ‘पुरुषांमधील फुकाची आक्रमकता कमी झाली’, ‘सर्व क्षेत्रांत स्त्रियांची कार्यक्षमता आणि व्यवस्थापन कौशल्य उपलब्ध झाले’, ‘स्त्री चळवळीने जातिभेद नष्ट करण्यास हातभार लावला’ येथपर्यंत विविध व्यक्तिगत आणि सामाजिक फायदे होते. एका युवकाचे उत्तर तर फार अर्थगर्भ होते. तो म्हणाला, “स्त्री चळवळीने स्त्रियांच्या व्यक्त होण्यास कृतिकार्यक्रम दिला.” स्त्रिया विविध माध्यमांमधून व्यक्त होतात, तो पोकळ आरडाओरडा किंवा रडगाणे नसून ती राजकीय/सामाजिकदृष्ट्या एक सजग कृती असते असे त्याला म्हणायचे होते.

मुलाखतींदरम्यान विचारलेल्या 62 प्रश्नांपैकी 29 प्रश्न हे युवा पिढीच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात स्त्री चळवळीचा काय परिणाम ‘त्यांना’ जाणवतो, याविषयी होते. त्यांमधून स्त्री शिक्षण, अर्थार्जन, संततिनियम, लैंगिकता, व्यक्त होण्यास संधी, राजकारणात प्रतिनिधित्व, रूढी-परंपरांचा जाच, स्त्री-पुरुष सहजीवन, त्यांच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत, घरकाम आणि अर्थार्जनातील ताण, स्त्री-पुरुषांमधील विविध गंड, कौटुंबिक नात्यातील बदलती समीकरणे अशा मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला.

तरुण-तरुणींनी दिलेली उत्तरे हा सुखद आश्चर्याचा अनुभव ठरला. याचे कारण स्त्री मुक्ती चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात आजूबाजूच्या लोकांकडून सहसा चळवळीविषयी कौतुक, आस्था, कृतज्ञता वगैरे उत्साहवर्धक बोल ऐकायला मिळत नाहीत. उलट हिरमोड होईल, मन दुखावेल अशी शेरेबाजीच सहन करावी लागते. बहुतांश वेळेला अशी शेरेबाजी करणाऱ्या व्यक्तींना चळवळीचे म्हणणे, भूमिका, काम यांविषयी काडीचीही माहिती नसते. ती करून घ्यावी आणि मगच टीका करावी अशी इच्छाही नसते. चित्रपट, नाटक, मालिका या करमणूक प्रकारांतसुध्दा स्त्रीमुक्ती चळवळ आणि स्त्रीमुक्तिवादी महिला हे कुचेष्टेचे विषय असतात. स्त्री चळवळींविषयी असा सार्वत्रिक आकस अनुभवास येत असताना अभ्यास प्रकल्पात सहभागी झालेले युवक-युवती मात्र वेगळीच मते मांडताना आढळली.

उदाहरणार्थ, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 114 (56%) व्यक्ती म्हणाल्या की, त्यांना त्यांच्या पालकांवर स्त्री चळवळीचा सकारात्मक परिणाम जाणवतो. या चळवळीमुळेच त्यांच्या पालकांनी मुलींना उच्च शिक्षण घेऊ दिले, अर्थार्जन करण्याची परवानगी दिली, खाणेपिणे, शिक्षण यांबाबतीत मुलगा-मुलगी भेद केला नाही, इत्यादी. 172 (85.15%) व्यक्तींना वाटते की, स्त्री चळवळीचा पुरुषांनाही फायदा झाला आहे. गमतीची बाब म्हणजे स्त्रियांनी त्यांच्या मते पुरुषांना होणारे 12 फायदे नमूद केले, तर पुरुषांनी त्यांना होणारे तब्बल 19 फायदे नमूद केले. उदाहणार्थ, तरुणी म्हणाल्या की, पुरुषांवरील आर्थिक भार आणि निर्णय घेण्याचे ओझे कमी झाले, त्यांना सेन्सिटिव्ह व्हायला स्पेस मिळाली, स्त्रियांच्या मल्टिटास्किंगचा फायदा झाला. एका युवतीकडून आलेले उत्तर विशेष उल्लेखनीय आहे. ती म्हणाली, “स्त्री चळवळीमुळेच महिला पुरुषांना समजून घेऊ लागल्या आहेत”.

पुरुषांनी स्त्री चळवळीमुळे त्यांना मिळणारे आर्थिक फायदे तर नमूद केलेच, शिवाय असेही म्हटले की, स्त्रियांच्या दृष्टिकोनाची जोड मिळाल्याने निर्णय अधिक संतुलित होऊ शकतात, पुरुष माणूस म्हणून अधिक प्रगल्भ झाला, घरातल्या प्रत्येक गोष्टीत पडायची, सूचना करायची गरज नाही, बायकांना सगळं कळतं, हे पुरुषाला उमगलं, पुरुषाला आधार मिळाला, आई शिक्षित असल्याने आम्हा नवरा-बायकोतील नाते अधिक सुलभ झाले, आपल्याला काही झालं तरी आपल्यामागे बायको समर्थपणे घर सांभाळेल अशी खात्री वाटू लागली, घरातील स्त्रिया आत्मनिर्भर झाल्याने पुरुषाला स्वत:ला आवडेल ते करण्यास स्पेस मिळू लागली, इत्यादी.

रूढी-परंपरांविषयी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना 136 (67.33%) उत्तरदात्यांनी सांगितले की, स्त्री चळवळीमुळे स्त्रीस जाचक अशा रुढींचा प्रभाव कमी झाला आहे. 143 (70.79%) युवक-युवतींनी नमूद केले की, स्त्री चळवळीमुळे शासकीय यंत्रणा स्त्रीप्रती संवेदनशील होऊ लागल्या आहेत. 189 (93.57%) उत्तरदाते म्हणाले की, स्त्री चळवळीमुळे स्त्रीला व्यक्त होण्यास अधिक संधी प्राप्त झाल्या आहेत.

आपले उत्तरदाते मध्यम/उच्च मध्यमवर्गातील असल्याने शासकीय योजनांचे लाभार्थी नव्हते. तरीसुध्दा शासन स्त्रियांसाठी काही कल्याणकारी योजना राबवते याची अनेकांना जाणीव होते. या योजना स्त्री चळवळीच्या व इतर सामाजिक चळवळींच्या रेट्यानेच सुरु झाल्या असणार असे 154 (76.24%) उत्तरदात्यांचे मत पडले. स्त्री चळवळ समाजासाठी बऱ्याच उपयुक्त गोष्टी करत असते अशी कबुलीच जणू त्यांनी आपल्या उत्तरांमधून दिली.

स्त्री चळवळीने लोकांना काय शिकवले, या प्रश्नाला एकूण 33 निरनिराळी उत्तरे आली. त्यांतील फक्त दोन उत्तरे नकारात्मक, तर 31 सकारात्मक आहेत. उदाहरणार्थ, एक तरुण म्हणाला की, स्त्री चळवळीने जे योग्य, न्याय्य आहे, ते समाजाला स्वीकारायला शिकवले. एक तरुणी म्हणाली की, या चळवळीने विविध प्रकारचे इन्क्लूजन शिकवले (समावेशकता). तिचा रोख स्त्री चळवळीकडून प्रेरणा घेऊन समाजातील विविध वंचित, दुर्लक्षित समूहांनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्या चळवळी उभारल्या, त्यांकडे होता. एका युवकाच्या मते स्त्री चळवळीने सामाजिक न्याय ही संकल्पना शिकवली. एका तरुणीने मत मांडले की, समानता गरजेची असून त्याने नुकसान न होता फायदाच होणार आहे, हे शिकवले. एका युवकाने कबूल केले की, “चळवळ नसती, तर मला मैत्रिणी मिळाल्या नसत्या आणि मी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात रसही घेतला नसता, चळवळीमुळे पुरुष संवेदनशील झाला.” दुसऱ्या एका तरुणाने समाधान व्यक्त केले की, स्त्री चळवळीने हिंसा कमी करून सामोपचाराने चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आणखी एका तरुणाने आवर्जून सांगितले की, स्त्री चळवळीने अनेक चांगल्या, फायदेशीर गोष्टी केल्या पण तिच्यामुळे तरुण स्त्रियांमधील अहंगंड वाढला हा एकमेव तोटा मला दिसतो.

एक युवक मात्र कडवटपणे म्हणाला की, स्त्री चळवळीने '498 अ' कलमाचा सोयीस्करपणे वापर करण्यास शिकवले. दुसऱ्या एका युवकाचे उत्तर होते की, कुठलीही चळवळ समाजाला काही शिकवते असं वाटत नाही. चळवळी डावीकडे झुकलेल्या असतात, प्रागतिक मूल्ये पाळणाऱ्या असतात, पण त्यांचे पुरोगामित्व बेगडी असण्याचेच अनुभव जास्त येतात.

मुलाखतीसाठी वापरलेल्या प्रश्नावलीमध्ये ‘स्त्री चळवळीमुळे स्त्रियांमध्ये अहंगंड किंवा स्वकेंद्रीपणा वाढला असे वाटते का?’ हा प्रश्न होता. त्याला 98 (48.5%) उत्तरदात्यांनी होकारार्थी उत्तर दिले. त्याच वेळी ‘अहंगंड आणि आत्मविश्वास; स्वकेंद्रीपणा व आत्मभान यांतील सीमारेषा पुसट आणि व्यक्तिसापेक्ष असतात’ असेही दोन तरूणींनी नमूद केले. या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणाऱ्या 8 पुरुषांच्या टिप्पण्या तर फारच अनपेक्षित होत्या. विस्तारभयास्तव त्यातील फक्त 3 टिप्पण्या उद्धृत करते. एक तरूण म्हणाला, “स्त्री स्वत:ला महत्त्व द्यायला लागली, हे चांगले आहे.” दुसऱ्या एका युवकाने पुस्ती जोडली, “पूर्वी स्त्रिया फार सगळं सहन करायच्या; त्यांच्यामध्ये आणखी थोडा अहम् आणि स्वकेंद्रीपणा आलाच पाहिजे.” तिसरा तरुण म्हणाला, “स्त्रियांनी ही चळवळ खूप पॉझिटिव्हली घेतली आहे, पण पुरुषांनी नाही. त्यामुळे स्त्रियांमध्ये अहंगंड आलाय असं वाटतं.” या टिप्पण्या म्हणजे स्त्री-पुरुष एकमेकांच्या जीवनवैशिष्ट्यांकडे संवेदनशीलतेने बघू लागले आहेत, याचा पुरावाच म्हणायला हवा.

स्त्री-पुरुषांमधील नाते किमान शहरी, शिक्षित समाजात तरी अधिक मोकळेपणाचे झाले आहे, हे निश्चित. असा मोकळेपणा येण्यात स्त्री चळवळीचे काही योगदान आहे का असाही प्रश्न विचारण्यात आला होता. उत्तरादाखल 180 युवक-युवतींनी (90%) त्याचे श्रेय काही प्रमाणात स्त्री चळवळीला दिले. स्त्री-शिक्षण, कामाच्या जागी स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर हे घटकही साहाय्यभूत झाले असले, तरी चळवळीने स्त्री-पुरुष समतेचा विचार अधोरेखित करून स्त्री वा पुरुष असण्याचा बाऊ कमी केला व म्हणून दोघांच्या नात्यात मोकळेपणा येण्यास मदत झाली असे युवा उत्तरदात्यांचे मत पडले.

स्त्री चळवळीचा कौटुंबिक नातेसंबंध बिघडण्यास हातभार लागला का, या प्रश्नाला उत्तरदात्यांनी जो प्रतिसाद दिला, त्यातून तर स्त्री चळवळीविषयी जनमानसात रुज(व)लेली प्रतिमा विपर्यस्त आहे, याचा जणू पुरावाच मिळाला. याचे कारण 203 उत्तरदात्यांपैकी फक्त 54(26.7%) व्यक्तींनी वरील प्रश्नास होकारार्थी उत्तर दिले. त्यातही अनेकांनी पुढील प्रकारच्या पुस्त्या जोडल्या: नव्या विचारांचा स्वीकार आहे, तिथे संबंध नाही बिघडत. स्त्रीच्या आणि कुटुंबीयांच्या शिक्षणात फरक असला की, संबंध बिघडतात. स्त्री खरोखरच आपल्या बरोबरीला आली आहे, हे जिथे झेपत नाही, तिथे बिघडतायत. पूर्वी स्त्रिया मुकाट्याने सर्वांचे ऐकून घेत असतील. त्यामुळे लोकांना वाटत असेल की, या घरात शांती आणि सुख आहे. आता स्त्रिया बोलू लागल्यामुळे घरात वाद होतात असं वाटत असेल.

कौटुंबिक नाती बिघडण्याचे अपश्रेय चळवळीच्या परिणामांना देणाऱ्या काहींनी असे घडण्यास स्त्रीमधील वाढता स्वकेंद्रीपणा, ढासळती सहनशीलता, चळवळीमुळे मिळालेले अधिकार जिथे तिथे गाजवण्याचा अट्टाहास, नव्याने झालेल्या कायद्याच्या ज्ञानाचा गैरवापर इत्यादी कारणे सांगितली.

स्त्री चळवळ, स्त्रीचा अहंगंड किंवा स्वकेंद्रीपणा आणि कौटुंबिक नाती यांमधील परस्पर संबंध उत्तरदात्यांच्या प्रतिसादांवरून लावायला गेलो, तर फार गमतीशीर बाब समोर येते. स्त्री चळवळीमुळे स्त्रियांमध्ये अहंगंड किंवा स्वकेंद्रीपणा वाढला असे 98 (48.5%) उत्तरदात्यांना वाटते. त्यामुळे तेवढ्याच व्यक्तींनी कौटुंबिक नातेसंबंध बिघडण्याससुध्दा स्त्री चळवळीनेच हातभार लावला असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते. पण प्रत्यक्षात फक्त 54 (26.7) उत्तरदात्यांनी तसे म्हटले आहे. शिवाय त्यातील अनेकांनी त्यामागे चळवळीपेक्षासुध्दा शिक्षित स्त्री व उर्वरित कुटुंब यांमधील शैक्षणिक/वैचारिक दरी हे कारण उद्धृत केले. याचा अर्थ, कालसुसंगत विचार केल्यास संबंध बिघडणार नाहीत असा सल्लाच जणू तरुण पिढीने दिला.

सदर अभ्यास प्रकल्पात फक्त शहरी/निमशहरी, शिक्षित मध्यमवर्गातील युवा पिढीच्या विचारविश्वाची झलक बघायला मिळते. अल्पशिक्षित, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरांतील युवक-युवतींच्या धारणा पूर्णपणे निराळ्या असतील. उत्तरदात्यांनीसुध्दा “पण ग्रामीण भागांत चित्र वेगळे आहे” अशी टिप्पणी वारंवार केली.

तसेच, अभ्यासात सहभागी झालेल्या युवा वर्गाला स्त्री चळवळीच्या परिणामांविषयी काही तक्रारी नाहीतच असे नाही. तरुण मुली आक्रमक झाल्या आहेत, त्यांच्या मनात पुरुषांविषयी पूर्वग्रह वाढले आहेत, त्यांच्याबरोबर वावरताना पोलिटिकली करेक्ट वागण्या-बोलण्याचा ताण येतो अशी गाऱ्हाणी मुलग्यांनी मांडली. एक तरुण तर म्हणाला, "या चळवळीमुळे स्त्रिया खूप प्रॅक्टिकल झाल्या आहेत, मला चळवळीच्या या मानसिक परिणामाची भीती वाटायला लागली आहे.” या उलट तरुण स्त्रियांनी तक्रार केली की, मुलीला स्वत:चे मत असले की ती विचारी न वाटता आगाऊ वाटते. सक्षम, आत्मविश्वासू स्त्रीशी कसे वागावे हे अनेक पुरुषांना कळत नाही, हा आम्हा तरुण मुलींपुढचा मोठाच भावनिक प्रॉब्लेम आहे.

सदर अभ्यास प्रकल्पात एकूण 62 प्रश्न विचारण्यात आले. त्यातील अगदी मोजक्याच प्रश्नांचा परामर्श येथे घेणे शक्य झाले. हा लेख म्हणजे हिमनगाचे केवळ टोक आहे. मात्र त्यात जे नजरेस पडते, त्यातून एक निष्कर्ष नक्की काढता येईल:

युवा पिढीच्या सर्वच्या सर्व अपेक्षा स्त्री चळवळीकडून पूर्ण झालेल्या नाहीत. तिच्या काही सामाजिक, भावनिक परिणामांविषयी युवा पिढीत नाराजीसुध्दा आहे. पण त्याचबरोबर या चळवळीने अनेक समाजोपयोगी बदल घडवून आणले असून आपण त्या बदलांचे लाभार्थी आहोत याची युवा पिढीस कृतज्ञतापूर्वक जाणीव आहे.

आता थोडे प्रकल्पाच्या स्वरूपाविषयी. प्रकल्पांतर्गत घेतलेल्या मुलाखतींसाठी युवक-युवतींची निवड पुढील निकषांनुसार करण्यात आली: वयोगट 28-38 वर्षे, शिक्षण बारावीनंतर किमान चार वर्षे, शालेय शिक्षण महाराष्ट्रातील तालुक्याच्या वा जिल्ह्याच्या गावी, मासिक उत्पन्न महिना किमान 30,000/- रुपये. थोडक्यात, हा अभ्यास शहरी/निमशहरी, शिक्षित, मध्यमवर्गीय, महाराष्ट्रीय (मराठी भाषकच असे नाही) युवक-युवतींवर करण्यात आला. उत्तरदाते विविध जाती-धर्मांचे, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले असतील व त्यांच्या शिक्षणांत आणि कार्यक्षेत्रांत वैविध्य असेल, याची खबरदारी घेण्यात आली. ते स्त्री चळवळीशी निगडीत नसतील याचीही काळजी घेण्यात आली, जेणेकरून त्यांच्या उत्तरांत चळवळीकडे झुकलेला दुजाभाव नसेल. प्रत्येक मुलाखत सरासरी एक तास वीस मिनिटे चालली.

येथे आणखी एक बाब आवर्जून नमूद करायला हवी. 203 उत्तरदात्यांपैकी फक्त तीन जण स्त्री चळवळीत रस वाटतो म्हणून स्त्रीवादी विचार जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. बाकी सर्वांचे स्त्री चळवळीविषयीचे आकलन हे वैयक्तिक जीवनात आलेले अनुभव, समाजमाध्यमे, चित्रपट किंवा साहित्यातून आलेली स्त्री-पुरुष समतेच्या प्रयत्नांची जाण, बातम्या आणि वृत्तपत्रांमधून त्यांच्यापर्यंत पोचणारी माहिती, स्वत:च्या आजी, आई, विवाहित बहिणी यांच्या वाट्याला आलेले जीवन आणि आताच्या तरुण-तरुणींमधील नाते, स्त्रियांसाठीचे आरक्षण आणि त्याने मिळालेल्या किंवा हिरावलेल्या संधी यांमधून साकार झालेले आहे. विशेषत: कामाच्या जागी लैंगिक छळाविरोधी स्थापन झालेल्या विशाखा समित्या, आस्थापनांमधील नव्याने लागू झालेले स्त्रीविषयक कायदे तरुणांच्या जीवनावर थेट परिणाम करत आहेत. घराघरांमधून, सजग, कमावती स्त्री असण्याचे फायदे किंवा ती परावलंबी, कुचंबलेली असण्याचे तोटे युवा पिढीस अनुभवावे लागत आहेत. स्त्री चळवळीला अभिप्रेत अशी आत्मनिर्भरता आणि आत्मभान स्त्री दाखवू लागली की तिच्यासोबत वावरताना स्त्री-पुरुषविषयक पारंपरिक धारणा निरुपयोगी ठरतात हे युवा पिढी रोज अनुभवते आहे. कुणी या नव्या वास्तवाने सुखावते आहे तर कुणी भांबावते आहे. स्त्री चळवळीची माहिती असो वा नसो; तिच्याविषयी आस्था वाटो वा आकस, तिचे अस्तित्व प्रत्येक कुटुंबात माजघरापासून ते शेजघरापर्यंत जाणवू लागले आहे. हे आपोआप घडलेले नसून त्यामागे संघटित प्रयत्न आहेत, हे युवा पिढी जाणून आहे. तिला स्त्री चळवळीचे ज्ञान आणि भान कमी असेल; नव्हे आहेच. (हे इतर प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांमधून स्पष्ट झाले.) पण म्हणून तिच्या परिणामांपासून आपण निर्लेप राहू शकत नाही, एवढी जाण आजच्या तरुण-तरुणींना नक्की आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, त्यांनी दिलेली उत्तरे त्यांच्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक आहेत.

युवक-युवतींनी 62 प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि केलेल्या जास्तीच्या टिप्पण्या म्हणजे युवा मानसिकतेचे कवडसे होत. त्यांतील काही विशेष उल्लेखनीय टिप्पण्यांचा सविस्तर परामर्श आपण पुढील लेखांमधून घेणार आहोत.

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com 

Tags: स्त्री मुक्ती चळवळ करुणा गोखले स्त्री पुरुष समता युवा भान Load More Tags

Comments:

Renuka Tapsale

आता गरज आहे.. पुरुषांच्या वैचारिक बदल चळवळीची.. स्त्रीवादी चळवळीमुळे जे असंतुलन निर्माण झालंय त्याला संतुलित करण्यासाठी.

Shivanand sathe

खूपच महत्वाचे लिखाण झाले आहे . पुढे आणखीन उस्तुकता वाढली आहे.

सुजाता देशमुख

या विषयामुळे पुढच्या लेखनाची उत्सुकता वाढली. आणि आजूबाजूला सर्वार्थानं काहीसं नकारात्मक वातावरण असतांना पहिल्याच लेखातला सकारात्मक सूर दिलासा देऊन गेला. प्रकाशित करणं शक्य असेल तर विचारलेले सगळे प्रश्न समजून घ्यायला आवडतील.

Asawari Deshpande

Khup chaan ani samarpak

अंजली मुळे

अभिनंदन करुणा ! खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे हा.पुढचे लेख आणि निष्कर्ष वाचण्याची उत्सुकता वाढली आहे.

Add Comment