'मुख्य प्रवाहात राहून जगायला शिकणे आव्हानात्मक होते!'

साहित्य अकादमी विजेत्या अनुवादक सोनाली नवांगुळ यांच्याशी साधलेला संवाद...  

सर्व छायाचित्रे : आदित्य वेल्हाळ | lokmat.com

सप्टेंबर महिन्यात साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा झाली. लेखिका सलमा यांच्या तमीळ भाषेतील 'इरंदम जमनकालीन कथाई' या कादंबरीच्या 'मध्यरात्रीनंतरचे तास' या मराठी अनुवादासाठी सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्याशी ऋता ठाकूर यांनी साधलेला हा संवाद

प्रश्न - पत्रकार म्हणून तुम्ही आम्हांला माहीत आहात, साहित्यिक लिखाणाकडे तुम्ही कशा काय वळलात?
-   2002 ते 2007 या काळात मी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि कोल्हापुरात आले. तिथे एक संस्था अपंग पुनर्वसनाचे काम करते. तिथे मी सोशल वर्कर म्हणून काम करत होते. भारतभरातून येणाऱ्या अपंगांशी बोलायचे, त्यांच्या अडचणी सोडवायच्या, त्यांच्यासाठी योग्य कृत्रिम साधन निवडायचे, या पद्धतीची कामं. त्या निमित्ताने संस्थेच्या अनेक जबाबदाऱ्या अंगावर आल्या. त्यापूर्वी मी असं काही काम केलं नव्हतं. कारण इयत्ता चौथी ते बी. ए. पर्यंत मी शाळा-कॉलेजला गेले नाही. शारीरिक अपंगत्वामुळे घरी राहून शिक्षण घ्यावे लागले. अशा वेळी तुम्हांला लोकांना भेटण्याचे धाडस नसते. आत्मविश्वास नसतो.

या पार्श्वभूमीवर जबाबदारी नव्यानं अंगावर आली आणि मला त्यात आनंद वाटू लागला. माझ्या स्वभावात मोकळेपणा असल्यामुळे तिथे सगळ्यांशी बऱ्यापैकी जमायचं. माझ्या आईबाबांनी मला आणि माझ्या लहान बहिणीला- संपदाला- मोकळ्या वातावरणात वाढवलं. आई स्मिता मूकबधिर शाळेत शिक्षिका, वडील प्रकाश माध्यमिक शाळेत शिक्षक. त्यांनी आम्हांला कधी अडवलं नव्हतं, कधी कशाला नाही म्हटलं नव्हतं. अर्थात त्यांनी आम्हांला नाही म्हणावं अशी बंडखोर स्वप्नंदेखील तेव्हा तयार झाली नव्हती. साध्यासाध्या गोष्टींना नकार मिळतात, तसे आमच्याकडे मिळाले नव्हते, हे मात्र खरं. त्यामुळे मी मोकळी आणि बोलकी होते.

संस्थेतील कामामुळे माझा संवाद समृद्ध झाला. आणि जेव्हा संवाद समृद्ध होतो, तेव्हा आपली भाषा तयार होते. तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला की तुम्हांला लिहायला यायला लागतं. विश्राम गुप्ते म्हणतात, तसं लेखन ही रियाज करण्याची गोष्ट असते, निसर्गदत्त असे काही नसते'. भाषा ही आपल्याला घडवावी लागते किंवा आपण जेव्हा माणसांमध्ये राहतो तेव्हा ती घडते. तसं माणसांमध्ये न राहता निरीक्षण करून लिहिणारे लेखक आहेत. मात्र माझा पिंड हा माणसांमध्ये मिसळण्याचा आहे.

मी जेव्हा स्वतंत्र राहायला सुरुवात केली तेव्हा माझा आत्मविश्वास वाढू लागला. मुंबईचे स्वागत थोरात नावाचे माझे मित्र आहेत. ते फोटोग्राफर, चित्रकार आहेत. त्याच काळात ते अंध लोकांकरता ब्रेल लिपीत दिवाळी अंक काढायचे. महाराष्ट्रभर आणि बाहेर फिरताना त्यांच्या लक्षात आले की अंधांसाठी एकसुद्धा वर्तमानपत्र नाही. त्यांनी 'स्पर्शज्ञान' या नावाने ते सुरू केले, तेव्हा लक्षात आले की ते मराठी भाषेतील अंधांसाठी असलेले एकमेव वर्तमानपत्र आहे. ‘स्पर्शज्ञान’ची उपसंपादक होण्याची संधी त्यांनी मला दिली. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘मला कसं जमणार? कारण मला काही सराव नाही.’’ तर ते म्हणाले, "जमेल!" उदय कुलकर्णी म्हणून माझे मार्गदर्शक होते. त्यांनी मला सांगितले, ‘‘कुठलेही काम आपण पूर्ण शिकून घेतो, मग करतो असे होत नाही. शिकता शिकता काम करायचे असते किंवा काम करता करता शिकून होते, पूर्ण ज्ञान मिळते.’’

मग मी काम करायला सुरुवात केली. त्या वेळी मी मोठा लेख लिहिला. त्यापूर्वी मी अगदीच माहितीपर म्हणजे संस्थेच्या निमित्ताने काहीतरी माहिती पोहोचवण्याच्या विचाराने लिहिले होते. पण हा लेख ठरवून गंभीरपणाने लिहिला. अमृता वाळिंब यांनी सुचवलं, ‘‘तू तुझ्या घराविषयी लिही.’’ माझं घर अपंगांशी मैत्रीपूर्ण कसं काय आहे याविषयी मी लिहिलं. मग हळूहळू लिहायला सरावले. 

उदय कुलकर्णी, गायकवाड ही मंडळी वेगवेगळ्या चळवळींशी संबंधित होती. या दरम्यान ते मला भेटले. त्यांच्या चळवळी, त्यांचा पर्यावरण रक्षणासाठीचा लढा याविषयी माझ्या कानांवर यायचे. 'जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप' या विषयावर कोल्हापुरात मोठी आंदोलने झाली. जनुकीय बदल केलेली पिके नकोत. माझं म्हणणं असं होतं की, मी पॅराफिजिक आहे. काही वेळा मला अँटिबायोटिक घ्यावे लागतात. असे कृत्रिम पद्धतीने तयार केलेले अन्नधान्य जर माझ्यासारख्यांच्या पोटात गेले तर अँटिबायोटिक्स काम करणार नाही. हा माझा संताप होता. त्याच्यातून माहिती घेऊन मी लिहायला लागले. लोकप्रभा या साप्ताहिकाला पहिल्यांदा ती स्टोरी पाठवली. खूप दिवस उत्तर आले नाही. एक दिवस लेखाविषयी सगळं संशोधन करून पराग पाटलांचा फोन आला, त्यांनी मला कळवलं, 'लेखातील माहिती आम्ही तपासली आहे. या लेखाला आम्ही योग्य जागा देऊ'. त्याची त्यांनी कव्हर स्टोरी केली. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. आत्मविश्वास वाढवणारी होती. लोकप्रभाला पहिल्यांदा माझा लेख आला तो कव्हर स्टोरीलाच! म्हणजे गंभीरपणाने आपण लिहिले तर काहीतरी बदल होऊ शकतात.  

दुसरी गोष्ट. माझ्यासारख्या व्यक्तीसाठी बाहेर जाऊन काम करण्याची योग्य ठिकाणेसुद्धा नाहीत. म्हणून मी त्याविषयी लिहायला लागले. मग वेगवेगळ्या विषयांवर लिहायला लागले. 'तरुण भारत'मध्ये काही काळ सदर चालवले, 'म.टा' मध्ये सदर लिहिले. त्यानंतर लोकसत्तामध्ये थोडेफार लिहिले. 2011 मध्ये मी एक बातमी वाचली. ऑस्कर पिस्टोरीयस नावाचा धावपटू. त्याला दोन्ही पाय नाहीत. ब्लेड्स (कृत्रिम पाय) लावून तो वेगवान धावतो. त्याला पॅरालिंपिकमध्ये नव्हे तर ऑलम्पिकमध्ये धावायची इच्छा आहे. त्या बातमीने मी खूप प्रभावित झाले. त्याला निखळ स्पर्धा करायची होती. आपण अपंग असलो तरी मुख्य प्रवाहामध्ये स्पर्धा करू शकतो, असे त्याला वाटायचे.

त्याची जीवनकहाणी सांगणारे पुस्तक उपलब्ध होते. ते पुस्तक वाचून मी कविता महाजन यांना फोन केला. या पुस्तकाचा अनुवाद व्हायला पाहिजे, असं सांगितलं. तेव्हा कविता महाजन या माझ्या मार्गदर्शक मैत्रीणीने मला खडसावलं, ‘‘तू करून बघ, इतर कशाला कोणी करायला पाहिजे? तुला कशाला कोणी शिकवले पाहिजे? आणि करून बघितल्याशिवाय कसे कळणार? तू करू शकतेस.’’ मी पुस्तकाचा अनुवाद केला. कविता महाजनांना तो दाखवला. त्यांनी मनोविकास प्रकाशनाच्या अरविंद पाटकर यांच्याशी ओळख करून दिली. ‘‘आपण ताबडतोब हे पुस्तक प्रकाशित करू’’, असं त्यांनी सांगितलं. यथावकाश ते पुस्तक प्रकाशित झालं. लंडन ऑलिम्पिकच्या आधी या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मग मला कळालं, मी अनुवाद करू शकते. मग वेगवेगळ्या प्रकारची कामे मला मिळायला लागली.

प्रश्न - या पुस्तकाच्या अनुवादाची परवानगी कशी मिळाली?
- ऑस्कर पिस्टोरीयसचं पुस्तक मी अनुवादासाठी निवडलं तेव्हा कविता महाजन यांनी सल्ला दिला होता- इटलीतील मूळ प्रकाशकाशी पत्रव्यवहार करून परवानगी घे. मग खुद्द ऑस्कर पिस्टोरीयसशी संपर्क केला. मी त्यांना सांगितले की हे पुस्तक अनुवादित करणे आवश्यक आहे. मी स्वतः डिसेबल आहे, आमचे विचार एक आहेत. अपंगत्वाला जास्त किंमत देऊन त्याच्या सवलती घेत जगणे त्यालाही मंजूर नाही आणि मलाही. म्हणून हे पुस्तक मला मराठीत पोहोचवले पाहिजे. त्याने परवानगी दिली. 

प्रश्न - अनुवाद करताना कोणत्या अडचणी येतात?
- अनुवाद करताना खूप अडचणी येतात. कधीकधी वाक्याचे गर्भितार्थ तुम्हांला कळत नाहीत. तुम्ही शब्दच वाचायला जाता आणि कधीकधी त्यामागे मोठा अर्थ असतो. सुरुवातीलाच चाचपडायला होते. काही वेळा धार्मिक, सामाजिक, राजकीय संदर्भ माहीत नसतात. त्यामुळे ती सर्व माहिती करून घ्यावी लागते. ती नसेल तर अनुवादित वाक्याचा चुकीचा अर्थ लागण्याची शक्यता असते. कधीकधी जसाच्या तसा अनुवाद केला तर तो रुक्ष होतो. त्यामुळे तिकडेही लक्ष द्यावे लागते. अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि दर वेळी त्या नव्याने कळतात. प्रत्येक पुस्तकाच्या वेळी जाणवणारी अडचण वेगळी असते. 'ऑस्कर पिस्टोरियस'च्या वेळी मला खेळातले ज्ञान नव्हते. त्यामुळे त्या खेळाबद्दलच्या सगळ्या वैशिष्ट्यांची मी माहिती करून घेतली. त्याच्या अडचणींची जाणीव असणं, खेळाचे नियम माहीत असणं गरजेचं होतं.

सलमाच्या 'इरंदम जमनकालीन कथाई' या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. अनुवाद करताना पुस्तकातील वेगवेगळे धार्मिक संदर्भ, रूढी-परंपरा, तमीळमधल्या या मुस्लिम समाजातील सणवार, त्यांच्या प्रार्थनेच्या पद्धती हे सगळं जाणून घेणं गरजेचं होतं. त्याशिवाय अनुवाद कसा करायचा? या पुस्तकात सणावारांचे, पदार्थांचे बरेच संदर्भ आहेत. काही समजुती, अंधश्रद्धा यांचेही संदर्भ आहेत. ते समजून न घेताच अनुवाद केला तर वाचकांचा गैरसमज होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळं मी ते सगळं समजून घेतलं, अभ्यास केला.   

प्रश्न - तुमची इंग्रजीची समज कशी होती. इंग्रजीतून मराठीत भाषांतर कसे काय केले?
- मला इंग्रजीबद्दल न्यूनगंड होता. आमच्या वेळी इयत्ता पाचवीमध्ये इंग्रजी शिकवायला सुरुवात व्हायची. मात्र तेव्हापासूनच मला घरी बसून शिकायची वेळ आली. इंग्रजी विषय घेऊन मी बी.ए. झाले. मात्र भाषा ही संवादातून सुधारते. जोडीला साहित्य आणि इतर वाचन असेल तर ती अधिकच बहरते. इंग्रजी समजून घेण्यासाठी मला तेव्हा तसे वातावरण नव्हते. आता खूप गोष्टी उपलब्ध आहेत. मराठी तर आपली बोलीभाषाच आहे. हिंदीची भीती वाटत नाही. कारण बॉलीवुडवर आपण पोसलो गेलो आहोत. इंग्रजीची इतकी भीती वाटते की चुकेल म्हणून आपण बोलतच नाही. त्यामुळे साहजिकच इंग्रजी भाषांतराची भीती वाटत होती. पण पहिल्या पुस्तकानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. मोठमोठ्या लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढला. तुम्ही संवेदनशील असाल, तुम्हांला भावनांचे लहानसहान पदर कळत असतील, तर तुम्हांला भाषा समजून घ्यायला कमी त्रास होतो. 

प्रश्न - भाषांतरासाठी 'इरंदम जमनकालीन कथाई' हेच पुस्तक का निवडले?
- भारताच्या महत्त्वाच्या प्रादेशिक भाषेत लिहिणार्‍या लेखिकांना मराठीत आणायचे, असे कविता महाजन आणि मनोविकास यांनी ठरवले. त्या प्रकल्पाचे नाव 'भारतीय लेखिका'. वेगवेगळ्या भाषांत काम करणाऱ्या कवयित्री, चळवळीतील स्त्रिया, पत्रकार, आत्मकथन लिहिले आहे अशा स्त्रिया, राजकीय स्तंभ लिहिणाऱ्या स्त्रिया- अशा सगळ्या वेगवेगळ्या भाषांतल्या स्त्रियांचं महत्त्वाचं साहित्य कविता महाजन यांनी निवडलं. हिंदी, तमीळ, उडिया अशा खूप भाषा होत्या. त्यातून तमीळ भाषेतील हे पुस्तक निवडले गेले. संपादक या नात्याने कविता महाजन यांनी हे पुस्तक माझ्याकडे सोपवले आणि ते मी पूर्ण केले.

प्रश्न - साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याचे सर्वप्रथम कोणाला सांगितले?
सगळ्यांत आधी पुस्तकाच्या लेखिकेला-सलमाला ही आनंदाची बातमी दिली. म्हटले,  ‘‘तुझे अभिनंदन! तू मला या प्रवासात सामील करून घेतले म्हणून हा सन्मान होतो आहे, म्हणून माझंही अभिनंदन!’’. कविताताई आज हयात नाहीत. पण मी मोठ्याने ओरडून त्यांना सांगितले - आपल्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे. मग मी प्रकाशकांना फोन केला. नंतर जवळच्या मित्रमंडळींना.

प्रश्न - पुरस्कार मिळाल्यावर तुमच्या मनात काय विचार आले?
- आपण काम करत राहणे महत्त्वाचे आहे हे माझ्याभोवतीची मित्रमंडळी मला सतत सांगत असतात. आपल्याला कौतुक लागते, जरूर पडली तर आपण ते एकमेकांचे करू. एकमेकांचे वाचू, टीका करू, चिकित्सा करू, आणखीन मजकूर सुधारू पण पुरस्कार ही अशी गोष्ट असते जी आपसूक येते. जशी शाबासकी आपसूक येते अगदी तसेच. कौतुक प्रत्येकाला हवे असते आणि अशा पातळीवर तर खूपच हवे असते. मला जेव्हा पुरस्काराची बातमी, म्हणजे फोन आला तेव्हा प्रचंड आनंद झाला. कारण ही राष्ट्रीय पातळीवरची खूप मोठी शाबासकी आहे. त्यामुळे काम मिळण्यात मला फरक पडेल. कष्ट न करता जास्त चांगली कामं माझ्या हातात येतील. जास्त चांगली काम करण्याची संधी हा पुरस्काराचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे पुस्तक सर्वदूर पोहोचायला सोपे होते. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते. पण या दबावामुळे लेखनातील प्रसन्नपणा, आपल्याला जे वाटते ते करण्याची खुमखुमी, धाडस करून पाहण्याची शक्ती गमावता कामा नये, असे मी स्वतःला बजावत होते. पण चहूबाजूंनी प्रेम करणारे लोक कौतुकाचा वर्षाव करतात तेव्हा तुम्हांला आनंदाव्यतिरिक्त दुसरे काहीच सुचत नाही. मलाही तसेच झाले!

प्रश्न - भविष्यातले प्रकल्प कोणते आहेत?
- खरं सांगू का? लेखन, अनुवाद ही माझी आवडती गोष्ट आहे. पण मला बाकीच्या गोष्टीही आवडतात. म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतो. फिरायला आवडतं. गप्पागोष्टी करायला आवडतात. वीस वर्षं मी पूर्णपणे घरात होते. आता वीसपैकी सात वर्षे संस्थेत आणि चौदा वर्षे मी बाहेर आहे. तर या वेळी मला बऱ्याच गोष्टींना नव्याने सामोरे जावे लागते. मुख्य प्रवाहात येताना माझ्यासारखीला स्वतःमध्ये आणि समोरच्यामध्ये काही बदल करणे भाग पाडावे लागते. त्यामुळे मुख्य प्रवाहात राहून जगायला शिकणे हेच आव्हानात्मक होते. आता कुठे माझी सुरुवात झाली आहे. त्यामुळे मला पुढे कळेल की, मला काय करायचे आहे. आता ती वेळ अजून आलेली नाही.

प्रश्न - अपघातामुळे शारीरिक मर्यादा येतात. तरीसुद्धा तुम्ही लेखक-पत्रकार,अनुवादक, मोटिव्हेशनल स्पीकर, अशा अनेक पातळ्यांवर काम कसं काय करता?
- कुणी चुकीच्या पद्धतीने बोललं की पूर्वी मला खूप राग यायचा. हळूहळू या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. मी स्वतःला समजावले. तमीळ बंडखोर लेखिका सलमाच्या पुस्तकासोबतच मी साधनासाठी गांधीजींच्या नातवाच्या म्हणजेच डॉ. अरुण गांधींच्या दोन पुस्तकांचा अनुवाद केला. लहान लहान पातळीवर माणसं समोरच्याच्या अंगावर ओरखडासुद्धा न ओढता हिंसा करतात. ती हिंसा मी अनुवादित करते, तेव्हा मला माझ्या रोजच्या वागण्यातल्या हिंसेबद्दल ही कळायला लागते. माणूस म्हणून वेगवेगळ्या पातळींवर आपल्याला त्रास होत असतात. आपण पुस्तकं, जागतिक सिनेमा, चांगली माणसं यांच्या संपर्कात असू आणि दुसरीकडे स्वतःच्या विकारांवर थोडासुद्धा विजय मिळवत नसू तर काय अर्थ आहे या सगळ्यांत वावरण्याचा? शारीरिक मर्यादा एकदा समजली की, पुन्हा भांडण्याचा प्रश्न नसतो. पण एखाद्या गोष्टीशी भांडत बसलो की त्रास होतो. मला वाटते, ही भांडणं कमी केली की आपल्याला जास्त चांगली कामं करता येतात.

प्रश्न - प्रत्येक दहा वर्षांनी बदलत गेलेले तुमचे जीवन थक्क करणारे आहे. हे बदल तुम्ही कसे काय करता? म्हणजे आहे तो कम्फर्ट झोन सोडून पुन्हा नव्याने मांडामांड कशी काय जमते तुम्हांला?
- माझ्यासारख्या शारीरिक स्थिती वेगळ्या असणाऱ्या माणसाला कम्फर्ट झोन कधी मिळतच नाही. एक उदाहरण सांगते. मला जेव्हा लघवीसाठी नव्याने  कॅथेटर घातले गेले तेव्हा खूप वेदना झाल्या. मला तर ते कायम वापरावे लागणार होते. माझे डॉक्टर अजित कुलकर्णी मला धीर देत म्हणाले, की तुम्ही त्याकडे खूप लक्ष देत आहात म्हणून तुम्हाला त्रास होतोय, दुखतंय. आता तुम्ही ते आहे हे विसरून जगायला सुरुवात करा.

एकदा काय झाले... या सलमाच्या अनुवादाच्या कामात होते. शेवटची काही पाने राहिली होती. पण मला अचानक पोटात आणि पाठीत दुखायला लागले, मला व्हीलचेअरमधून पलंगावर आरामासाठी येता येईना. मला काही कळेच ना. जोरात हालचालपण झाली नाही. वाटलं हाड तुटलं की काय आतल्याआत? पण माझं कॅथेटर ब्लॉक झालं होतं, युरीन पास व्हायची बंद झाली होती. आणि हे मला अनुवाद करताना कळलेच नाही. कारण तो कंटेंटच तसा होता. पण त्या वेळी मला डॉक्टर म्हणाले, ‘‘मी तुम्हांला ते विसरा, असं म्हणालो होतो, पण इतके विसरायचे नाही की त्याच्याकडे दुर्लक्ष होईल!’’ मला असं वाटतं आयुष्य असंच असतं. शांतपणे एखादी परिस्थिती समजूनही घ्यायची आणि त्याचे काय बरे-वाईट परिणाम होतील याचे भानही ठेवायचे. हा सुवर्णमध्य प्रत्येकाला गाठवाच लागतो! 

कम्फर्ट झोन तर सारखे मोडावेच लागतात. कामाचे वेगवेगळे प्रकार असतात. शारीरिक स्थितीही. पण हा कम्फर्ट झोन मोडण्याने एक गंमत येते. माझे डॉक्टर मला म्हणाले होते, ‘‘करोनाच्या काळात व्यायाम आणि काम करताना एकाच ठिकाणी, एकाच खोलीत रोज-रोज बसू नका. अधूनमधून खोली, जागा बदलत जा. एकच कृती वेगवेगळ्या ठिकाणी केली की नव्याने आपली स्पेस कळते. ती स्पेस आपल्या शरीराला, मनाला कळणे जरुरी असते.’’ प्रतल बदलणे गरजेचे आहे, असे ते म्हणायचे! कम्फर्ट झोन बदलणे हे एखाद्या साधनेसारखे जरी वाटत असले तरी सरावाने ते जमते. म्हणजे तितके कठीण वाटत नाही. मला मेघना पेठे यांच्या भाषणातील एक किस्सा आठवतो. त्या म्हणाल्या होत्या, 'तुम्ही नदीत पाय ठेवले आणि पुढच्या क्षणी त्याच नदीत पुन्हा पाय ठेवले तरी तुम्हांला वाटते की तुम्ही त्याच नदीला अनुभवत आहात. पण खरं तर तो प्रवाह पुढे गेलेला असतो. आणि पुन्हा नव्याने ती नदी तुम्ही अनुभवत असता. प्रत्येक वेळी नदीचा प्रवाह तोच नसतो.' आयुष्याचंही तसंच असतं. ते इतकं बदलत असतं की तुम्हांला समजून आणि जुळवून घ्यावंच लागतं! तुमच्याकडे पर्याय नसतो.

(मुलाखत व शब्दांकन - ऋता ठाकूर, अहमदनगर)
rutavijayarv@gmail.com

Tags: मुलाखत सोनाली नवांगुळ ऋता ठाकूर साहित्य साहित्य अकादमी Interview Sonali Navangul Ruta Thakur Sahitya Akademi Load More Tags

Add Comment

संबंधित लेख