कादंबरीचं कथानक केवळ मीराच्या आयुष्यात येणारे पुरुष आणि त्यांच्याशी निर्माण होणारे संबंध एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. तिच्या आई-वडिलांच्या आपसांतल्या संबंधांतील गुंतागुंत, खुद्द तिचे तिच्या खऱ्या आईशी हळूहळू उलगडत जाणारे पण माय-लेकीच्या पारंपरिक नात्याला छेद देणारे संबंध, सावत्र वडिलांची अनपेक्षित वर्तणूक, स्वयंसेवी संस्थांतर्फे लैंगिक भेदभावाविरोधातील जागृती करण्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जग, त्या विरोधात संस्कृतिरक्षकांचे होणारे विरोध अशी अनेक उपकथानकं मूळ कथाशयाचा रूळ न सोडता किंवा त्याला समांतर जात सुरू राहतात.
मराठी कथात्म साहित्यात स्त्रियांच्या विश्वाचा, जगण्याचा वेध घेणारे साहित्य मोठ्या प्रमाणात रचलं गेलं आहे आणि बदलत्या काळानुसार तिच्यासमोर उभी ठाकणारी आव्हानं चित्रित करणारं साहित्य आजही रचलं जात आहे. यात पुरुष लेखकांचा सहभाग आहेच पण स्त्रीचं अंतर्विश्व स्त्री लेखिकांच्या लेखनातून अधिक प्रामाणिकपणे आणि सच्चेपणे जगासमोर मांडलं जाऊ लागलं. आजही त्यात खंड पडलेला नाही, किंबहुना आज ते प्रमाण वाढलेलं दिसून येतं. मराठीत अशा लेखिकांच्या परंपरेत आणखी एका दमदार नावाची भर पडली आहे. ते नाव आहे, ऐश्वर्या रेवडकर. ‘विहिरीची मुलगी’ ही त्यांची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. (प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस).
मीरा या प्रमुख पात्राचा कॉलेजवयीन वयापासून सुरू झालेला पण ठरवून न केलेला आत्मशोधाचा प्रवास या कादंबरीत प्रत्ययकारी पद्धतीने चित्रित केला आहे. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटणारे पुरुष हे तिला अनेक अंगांनी स्वतःच्या जगण्याकडे सजगपणे पाहायला भाग पाडतात. पुरुषसत्ताक समाज, कुटुंबव्यवस्था, लग्नसंस्था, स्त्री-पुरुष नातेसंबंध या बाबतींतले तिचे विचार आणि तिची मानसिकता यांत होणारे बदल हे तिला नात्यांत जे काही टक्केटोणपे खावे लागतात, त्यांतून जे काही अनुभव तिला येतात; त्यांवर आधारित असतात. त्यामुळे यश नामक प्रियकराला आवडेल म्हणून साडी नेसणारी, त्याला आवडतील असे ओढणीवाले सलवार कुर्ता घालण्यात धन्यता मानणारी मीरा पुढे बऱ्याच गोष्टी नाकारत जाते. पण तिचा तिथपर्यंतचा प्रवास तिच्याकडून फार मोठी किंमत मागतो. लेखिकेने मीराच्या कॉलेज जीवनाचं चित्रण करताना तिच्या मित्र-मैत्रिणींच्या गप्पांतून लग्न, संसार, मुलींनी करावयाचं करियर अशा विषयांवर पारंपरिक-अपारंपरिक मतं समोरासमोर ठेवलेली आहेत. ती पात्रं त्यांच्या विचारसरणींसकट साक्षात होतात इतकी ती नेमकी चित्रित केली आहेत. मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या दर्शना नावाच्या मैत्रिणीशी मीराच्या ज्या चर्चा होतात त्यातून स्त्रियांच्या शरीराविषयी, स्त्रीच्या शरीराकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनाविषयी जो काही विचारांचा धुरळा उडतो त्यातून मीरा नव्याच गोष्टींशी परिचित होत जाते. शिकलेल्या समाजातही लग्नाआधी जर मुलीला गर्भ राहिला तर ते मान्य केलं जात नाही आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या सुशिक्षित घरातल्या मुलींनाही गर्भपातामुळे होणारा शारीरिक त्रास, मानसिक यातना सहन कराव्या लागतात हे दर्शनाच्या बाबतीत पुढे जे काही घडतं त्यातून लेखिका अधोरेखित करते.
यश, मल्हार, नितीन असे अनेक पुरुष मीराच्या आयुष्यात येतात. त्या प्रत्येकाकडून ती तिचं स्वतंत्र अस्तित्व शाबूत राखता येईल, लैंगिक व्यवहारातील प्रामाणिकपणा जपता येईल अशा जीवनाची आस बाळगते. काही वेळा ती अशा जगण्याच्या काठापर्यंत पोहोचतेदेखील पण तिच्या हाती निराशाच पडते. ती शरीरओढीची असोशी लपवत नाही. तिच्या मनात आंदोलनं होत राहतात. शरीरसुखाच्या लाटा मनावर धडका देत राहतात. आणि ती त्यांना नकार देत नाही. त्याचे जे काही परिणाम होतील ते ती समजूतदारपणे भोगत राहते. लेखिका एक कणखर, स्वतःच्या अटींवर जगू पाहणारी, स्त्रीला बंदिस्त करू पाहणाऱ्या परंपरांची ओझी उचलण्यापेक्षा अनुभवांतून येणारं शहाणपण प्रमाण मानणारी आधुनिक स्त्री प्रतिमा मीराच्या निमित्ताने अग्रभागी आणते. आणि म्हणून मीराच्या काही वेळा कोसळण्यातदेखील एक प्रकारचा ग्रेस आहे. त्या प्रसंगांत ती केविलवाणी वाटत नाही. स्वतःच्या आई-वडिलांच्या नात्याचे वेगवेगळे पदर हाती लागतात तशी तिची केवळ त्यांच्याच नाही तर एकूणच नातेसंबंधांकडे पाहण्याची नजर बदलत जाते. ती सतत स्वतःला तपासत राहते. प्रत्येक नात्यातल्या ठेचकाळण्यानंतर नात्यांना गृहीत धरणं हे किती अंगलट येऊ शकतं याचा तिला प्रत्यय येत जातो.
कादंबरीचं कथानक केवळ मीराच्या आयुष्यात येणारे पुरुष आणि त्यांच्याशी निर्माण होणारे संबंध एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. तिच्या आई-वडिलांच्या आपसांतल्या संबंधांतील गुंतागुंत, खुद्द तिचे तिच्या खऱ्या आईशी हळूहळू उलगडत जाणारे पण माय-लेकीच्या पारंपरिक नात्याला छेद देणारे संबंध, सावत्र वडिलांची अनपेक्षित वर्तणूक, स्वयंसेवी संस्थांतर्फे लैंगिक भेदभावाविरोधातील जागृती करण्याचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं जग, त्या विरोधात संस्कृतिरक्षकांचे होणारे विरोध अशी अनेक उपकथानकं मूळ कथाशयाचा रूळ न सोडता किंवा त्याला समांतर जात सुरू राहतात. लैंगिक बळजबरी काही प्रमाणात सहन करावी लागण्याच्या घटनेनंतर मीराचं मानसिकदृष्ट्या खचत जाणं आणि नंतर मानसोपचाराच्या साहाय्याने पुन्हा उभं राहणं हा प्रवास लेखिका फारच वास्तववादी पद्धतीने रेखाटते. यात ती पात्रांच्या त्या त्या काळातील मनोवस्थांचं यथोचित चित्रण करते. सुमन आणि देव अंकल यांच्या नात्याच्या चित्रणातून लेखिका लग्नसंस्थेचा पोकळपणा, नात्यांतील दिखाऊपणा उजागर करते.
मीरा अधूनमधून तिच्या ब्लॉगवर लेखन करत असते. हे लेखन ती ज्या वयात करते आहे त्या वेळची तिची जी काही समज असायला हवी त्यानुसार आलेलं आहे. त्या लेखनाची भाषा, त्यात योजलेल्या उपमा, प्रतिमा या गोष्टी उगाचच काव्यात्म केलेल्या नाहीयत. बऱ्याचदा एखादं पात्र पत्रं, डायरी, ब्लॉग लेखन वगैरे करत असेल तर पात्राच्या त्या त्या प्रसंगातील मनःस्थितीचा विचार केला जातो पण त्या वयात त्याला उपलब्ध असणारी भाषा कशी असायला हवी या बाबीचा विचार केला जात नाही. कादंबरीकार स्वतःची पल्लेदार, काव्यात्म वाक्यं त्यात घुसवतो. सुदैवाने असं काही मीराच्या ब्लॉग लेखनात आणि डायरी लेखनातही होत नाही. तिचं ब्लॉगवरील लेखन हे तिच्या अंतर्मनाचा आरसा आहे, असंच वाटत राहतं.
लेखिका बहुतेक प्रकरणांचा शेवट करताना निवेदन काव्यात्म पातळीवर घेऊन जाते. त्यातून तिच्या कल्पनाशक्तीचाही प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, पुढील उतारे वाचा : “...की-बोर्डमधून मघाशी तिने टाइप केलेले शब्द, वाक्ये, विरामचिन्हे जिवंत होऊन हलक्या पावलांनी बाहेर आली. त्यांनी एकमेकांचे हात पकडून तिच्या डोक्याभोवती फेर धरला. वेगवेगळे शब्द तिच्या केसांमधून आनंदाने बागडू लागले. अक्षरे केस पकडून झोके घेऊ लागली, तर काही वाक्ये चक्क तिच्या कानांच्या पाळीवर घसरगुंडी खेळू लागली...” (पृ. 46) “...मुळीच न घाबरता मी आकाशात जाणाऱ्या पायऱ्या चढू लागले, पण अलगद एक चांदणी निखळली आणि त्यासोबत माझ्या पायाखालची पायरीही. तोल जाऊन मी पडणारच खाली तर बाकीच्या चांदण्यांनी मला कवेत पकडलं आणि खट्याळपणे हसत पुन्हा मला गच्चीवर आणून सोडलं...” (पृ. 58).
कादंबरीतला काळ हा नव्वदीच्या दशकातील आहे हे काही सिनेमांची नावं, गाणी यांतून ठळक होत जातं. कादंबरीत कोणताही तपशील विनाकारण आला आहे असं वाटत नाही. उदाहरणार्थ, मीरा रत्नागिरीला तिच्या घरात पहिल्यांदा प्रवेश करते तेव्हा दर्शनी भागातल्या वस्तूंचं विस्ताराने वर्णन करते. तर हा केवळ तपशील भरण्याचा भाग वाटत नाही. कारण पुढे जेव्हा या घरात राहणारे देव अंकल मीराला सुमनच्या (मीराची आई) स्वभावाबाबत सांगत असतात तेव्हा या वस्तूंचा संदर्भ देऊन म्हणतात, “...तिचे स्टॅण्डर्डस् इतके उच्च आहेत की, ते पुरे करताना दमछाक होते. सुमनला सगळं युनिक हवं असतं. घरातलं फर्निचर पाहा. किती उच्च प्रतीचं आहे. निर्जीव वस्तूंबाबत जर ती इतकी काळजी घेते तर माणसांच्या बाबतीत किती काटेकोर असेल...” (पृ. 120).
असं असलं तरी एके ठिकाणी मात्र एका स्त्रीचं नग्न चित्र दिलं आहे ते अस्थानी वाटतं. निशा (एक पात्र) मीराला एक चित्र भेट देतं. त्या चित्रात एक नग्न स्त्री उभी आहे. तिच्या उभं राहण्यात एक डौल आहे. डोळ्यांत आत्मविश्वास आहे. हे चित्रातून जाणवणारे आणि लेखिकेला ठळक करू वाटणारे घटक ती चित्राचं जे वर्णन करते (शब्दांत) त्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर ती स्त्री कशी उभी आहे त्याचंही वर्णन केलेलं आहे. असं असताना नग्न स्त्रीचं पानभरून चित्र देण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न पडतो. या चित्रात असे बारकेसारके काही बारकावेदेखील नाहीत ज्यांचा कथानकात पुढे काही संबंध येणार आहे. उदाहरणार्थ, उदय प्रकाश यांच्या ‘वॉरन हेस्टिंग्जचा सांड’ या दीर्घकथेत जे छायाचित्र येतं त्याचा त्या कथानकाशी खोलवरचा संबंध असल्यासारखं वाटतं. तसं काही या कादंबरीतील चित्रावरून वाटत नाही.
कादंबरीलेखिकेने पात्रांची उभारणी, त्यांच्या मनोविश्वात होणारे बदल, त्यांची स्वप्नं, त्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि त्यांना जाणारे तडे या सगळ्याची रचना समर्थपणे केली आहे. त्यांच्या आयुष्यात कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींचे पुढल्या काळात उलगडणारे अर्थ वाचकाला नातेसंबंधांबाबत नवी दृष्टी देतात. कादंबरीचं निवेदनही गरजेनुसार प्रथमपुरुषी, तृतीयपुरुषी असं बदलत जातं. मीराच्या आत्मशोधाची ही कहाणी वाचताना आजच्या तरुण मुलींना स्वतःचा चेहरा - त्यावरच्या सगळ्या बारीकसारीक खाणाखुणांसह - आरशात पाहिल्यासारखं वाटेल.
- विकास पालवे
vikas_palve@rediffmail.com
(लेखकाचा 'चकवा' हा कवितासंग्रह नुकताच काव्याग्रह प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे).
हेही वाचा :
Tags: साहित्य कादंबरी मराठी विहिरीची मुलगी पुस्तक परिचय न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस नवे पुस्तक ayshwarya revadkar vihirichi mulgi marathi books literature Load More Tags
Add Comment