शोध एका सर्वसमावेशक भारतीय व्यक्तीचा

ख्वाजा अहमद अब्बास यांची लघुकथा 

ख्वाजा अहमद अब्बास. फोटो सौजन्य: medium.com

पत्रकार, लेखक आणि दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांची आज 106वी जयंती. उर्दू, हिंदी आणि इंग्रजी या तिनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या अब्बास यांनी आपल्या 72 वर्षांच्या आयुष्यात एकूण 74 पुस्तके, 90 लघुकथा आणि 3000 लेख लिहिले. सोबतच 40 चित्रपटांचे लेखन व दिग्दर्शनही केले. स्वतःला संवादक म्हणवून घेणे त्यांना आवडायचे. ‘समाजात सकारात्मक बदल घडवणे आणि मनुष्यातील मानवता जागवणे’ या एकाच ध्येयाने ते प्रेरित झाले होते. 1935 मध्ये बॉम्बे क्राॅनिकलमध्ये सुरु झालेला ‘लास्ट पेज’ हा त्यांचा साप्ताहिक स्तंभ पुढे ब्लिट्झ पत्रिकेत प्रकाशित होऊ लागला. हा स्तंभ त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे तब्बल चाळीस वर्षे अखंडपणे प्रकाशित होत असे. ‘भारत आणि भारतीयत्व’ यांची जाणीव करून देणाऱ्या त्यांच्या कथेचा हा मराठी अनुवाद.

गरज आहे- राष्ट्रीय एकता परिषदेसाठी एका भारतीय व्यक्तीची, जी पन्नास कोटींच्या देशासाठी आदर्श ठरू शकेल. 

वय- वैकल्पिक, 5 वर्षांपासून ते 95 वर्षांपर्यंत...

लिंग- पुरुष अथवा स्त्री, मुलगा वा मुलगी... 

धर्म- हिंदू किंवा मुसलमान; किंवा ख्रिस्ती वा पारशी; किंवा शीख वा बौद्ध अथवा नव-बौद्ध वा जैन, नाहीतर अनिश्वरवादी किंवा नास्तिक...

भाषा- तमिळ किंवा हिंदी किंवा तेलुगु अथवा उर्दू, मराठी किंवा सिंधी किंवा गुजराती किंवा असामी, कन्नड किंवा मल्याळम, किंवा पंजाबी अथवा पुरबी वा भोजपुरी वा उडिया भाषी. तिला या सर्व भाषा अवगत असू शकतात किंवा यांपैकी एकाही भाषेचा गंध नसेल.. किंवा ती मूकबधीरही असू शकतो. 

व्यवसाय- काहीही- शेतकरी वा कामगार किंवा इंजिनिअर; डॉक्टर वा प्राध्यापक किंवा शिक्षक वा कारकून किंवा अधिकारी व अधिकाऱ्याचा शिपाई, हॉटेलचा वेटर किंवा फिल्मस्टार, किंवा पत्रकार वा लेखक किंवा कवी. काहीही.

त्वचेचा रंग- काळा, तपकिरी, पिवळा किंवा पांढरा असू शकतो.

केसांचा रंग- काळा, तपकिरी, पांढरा, लाल, सोनेरी, सावळा किंवा ती आपले केस रंगवत असो किंवा नकली केसांचा विग लावत असो. 

डोळ्यांचा रंग- काळा, तपकिरी, सोनेरी, निळा, भुरा, हिरवट निळा असो किंवा कॉंटॅक्ट लेन्स लावत असो...

शैक्षणिक पात्रता- ती पीएचडी असो, एम.ए., बी.ए., बी.एस.सी., मॅट्रिक पास किंवा मॅट्रिक फेल किंवा अडाणी व अशिक्षित...

आर्थिक स्थिती- ती श्रीमंत असू शकतो किंवा गरीब; किंवा मध्यमवर्गीयही असू शकते. 

पण...
त्या व्यक्तीचे मन भारतीयतेच्या चेतनेने आणि भारतीयतेच्या भावनेने ओतप्रोत असावे;
सर्व भारतीयांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब पाहण्यास ती समर्थ असावी, सर्वांवर प्रेम करण्याची तिच्यात क्षमता असावी;

धर्माच्या आधारे ती लोकांमध्ये भेद करत नसावी, तिच्यासाठी सर्व भारतीय समान असावेत;
ती व्यक्ती जातीप्रथेच्या जुनाट परंपरा आणि रुढी यांवर विश्वास ठेवणारी नसावी;

आपल्या भाषेवर तिचे प्रेम असावे; सोबतच इतर भारतीय भाषांना आपल्या मानत त्यांच्यावरही प्रेम करणारी, त्यांचा सन्मान करणारी असावी;
केवळ आपल्याच धर्मावर (व धार्मिक नेत्यांवर) त्याची श्रध्दा नसावी. उलट इतर सर्व धर्मांकडे (आणि धार्मिक नेत्यांकडे) ती तितक्याच आदरभावाने पाहत असावी;

अनिश्वरवादी, संशयवादी आणि नास्तिक यांच्याविषयीही तिच्या मनात तितकीच सहिष्णूता असावी; विवेकबुद्धी आणि तर्कशिलतेवर तिचा भरोसा असावा; लोकशाही आणि लोकशाही मुल्यांवर तिची श्रद्धा असावी;

ती व्यक्ती भले काश्मिरी का असेना; मात्र केरळसाठीही लढण्याची तिला इच्छा असावी;  
ती मराठा असू शकते मात्र तिला म्हैसूरच्या लोकांप्रतीही प्रेम असायला हवे;
ती म्हैसूरची असो मात्र महाराष्ट्राच्या लोकांवर ती प्रेम करणारी असावी;
ती असामी असेल पण बंगालींशी तिचा स्नेह असावा; आणि बंगाली असेल तर असामी आणि बिहारींशी सहानुभूती ठेवणारी असावी. 
ती तमिळ भाषिक असावी मात्र हिंदीवरही प्रेम करणारी असावी;
ती हिंदी भाषिक असली तरी तामिळी साहित्याचा सन्मान करणारी असावी. 

मानवावर प्रेम करणारी ती व्यक्ती अशी भारतीय असावी, जी इतर सर्व प्राण्यांपेक्षा, इतर सर्व गोष्टींपेक्षा मनुष्याला अधिक महत्त्व देणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी, मनुष्य आणि मनुष्य जीवन यांचे मूल्य जाणणारी असावी-

गाय किंवा शेळी वा उंट यांपेक्षा तिला मनुष्य अधिक प्रिय असावा,
खजूर किंवा पिंपळाच्या झाडाहूनही अधिक प्रिय,
मस्जिद किंवा मंदिर किंवा गुरुद्वारा यांच्या भिंतीतील विटा आणि दगडांपेक्षा प्रिय, 
कुण्या प्रदेश, शहर किंवा नदी यांपेक्षाही अधिक प्रिय,

जी सर्व मनुष्यांवर प्रेम करत असावी, सगळ्यांचा आदर करणारी असावी आणि जिच्या मनात भारतीय देशबांधवांप्रती सर्वाधिक प्रेम असावे.
त्यांच्यामध्ये गुणच नव्हे तर अवगुण असूनही जी व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करेल, त्यांच्या सामर्थ्यासोबतच त्यांच्या मर्यादांचाही स्वीकार करेल,

जी, बुद्ध आणि शंकराचार्य, अशोक आणि अकबर, गुरुनानक आणि भक्त कबीर यांच्यासोबतच बु अली शाह कलंदर आणि संत जेविअर्स यांच्याप्रती समान आदरभाव ठेवणारी असेल. कारण या सर्वांनी विविधतेत एकता असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संस्कृतीत अद्वितीय योगदान दिले आहे. 

ती, महात्मा गांधी आणि बाळगंगाधर टिळक, गोखले, दादाभाई नौरोजी आणि मौलाना अबुल कलाम आझाद, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह या सर्वांचा आदर करणारी असावी, कारण या सर्वांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी संघर्ष केला आहे आणि बलिदानही दिले आहे. 

तामिळचे सुब्रमण्यम भारती, हिंदीचे निराला आणि सुमित्रानंदन, उर्दूचे गालिब, इक्बाल, जिगर, फिराक आणि प्रेमचंद, गुजरातीमधील मेघाणी, मल्यालमचे शंकर कुरूप आणि तकष़ी, तेलुगुचे के श्री, मराठीतील अत्रे आणि खादीदार, बंगालचे बंकिम आणि टागोर, शरत आणि नजरूल इस्लाम, पंजाबीचे वारीस शाह, मोहन सिंह आणि अमृता प्रीतम या सर्वांप्रती जिच्या मनात आदर आणि प्रेम असेल, कारण यांचे साहित्य, यांचे काव्य हे सर्वच भारतीयांचा अनमोल ठेवा आहे. 

सर्वसमावेशक भारतीय व्यक्ती तीच आहे- जी भारत आणि भारताच्या प्रत्येक गोष्टीत सर्व भारतीयांना भागीदार मानत असेल. 

(29 जून 1968 रोजी ब्लिट्झ पत्रिकेतील 'लास्ट पेज' या स्तंभात प्रकाशित झालेली लघुकथा)         

(अनुवाद- समीर शेख) 

Tags: ख्वाजा अहमद अब्बास भारतीय भारतीयत्व khwaja ahmad abbas short story Load More Tags

Comments:

Ratnakar Pawar

अप्ररतिम लेख

salunke kavindra

varil kathemadhye " Marathitil Atre ani Khadidar " asa ullekh ahe . te Atre ani Khandekar asa asava .

Add Comment

संबंधित लेख