28 फेब्रुवारी 2024 : साने गुरुजी लिखित नामदार गोखले चरित्र या पुस्तकाचे प्रकाशन

'नामदार गोखले चरित्र' या साने गुरुजींनी त्यांच्या वयाच्या 24व्या वर्षी लिहिलेल्या चरित्राच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 रोजी झाले. 99 वर्षांपूर्वी गुरुजींनी 'भारत सेवक समाजा'च्या ज्या ग्रंथालयात बसून, अभ्यास संशोधन करून हे पुस्तक लिहिले त्या ऐतिहासिक हॉलमध्येच या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तर 'गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे'चे कुलगुरू डॉ. अजित रानडे हे अध्यक्ष होते. 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुहास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन आणि गोखले इन्स्टिट्यूट व सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साधनाचे अनेक लेखक, वाचक व हितचिंतक या ऐतिहासिक महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी यावेळी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ लवकरच साधनाच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध होईल.