शेतकरी नवरा नको गं बाई!?

मुली गावातल्या शेतकरी मुलांशी लग्न करायला नकार देतात याला नक्की जबाबदार कोण?

आधीच कित्येक पालकांना मुली 'नकोशा' असतात. त्यात गरिबी आणि व्यसने असली की पालक मुलींच्या लग्नाची फार घाई करतात. मुलींचे शिक्षण ही कधीच कुणाची priority नव्हती. आणि आता शिकलेल्या मुली शेफारतात, गावातल्या मुलांना नाकारतात असा ग्रह लोकांनी करून घेतलेला आहे. म्हणून कित्येक मुलींची सोळाव्या सतराव्या किंवा अगदी तेराव्या चौदाव्या वर्षीही लग्नं लावून दिली जात आहेत.

गावोगावी मुलांना लग्नासाठी मुली मिळेनात ह्याबद्दल अलीकडे समाजमाध्यमात खूप बोलले जातेय. लेख/ साहित्य / कविता यांचा काळजीवाहू प्रवाह तयार होतोय. गावागावात अक्षरशः शेकाड्याने लग्नाळू मुलगे आहेत ज्यांची लग्न जमण्याचं वय निघून गेलंय, आणि मुलगी मिळण्याची आशाही मावळत चाललीय.. नाईलाजाने हे मुलगे दारू आणि इतर व्यसनाच्या आहारी जात आहेत. हे दाहक वास्तव नजरेआड करता येत नाही.

अर्थात ह्याला एक कारण म्हणजे समाजात मुली कमी आहेत. गेली काही दशके एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रूणहत्या झाल्या, त्याचे हे परिणाम आहेत. ह्या मुलींना आजकाल नाहक आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जातंय. कारण काय, तर “लग्नाळू मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण पूर्वीच्या तुलनेत त्यांनी थोडेतरी जास्त शिक्षण घेतलेले आहे. मुलींना चांगली नोकरी, पुण्यात फ्लॅट, गावाकडे शेती, गाठीला पैसा असणारा नवरा हवाय. फक्त नोकरी / फक्त शेती / प्रचंड होतकरू अशा नवऱ्या मुलांचीही लग्न जमेना झालीयेत.

ह्यावर ज्या चर्चा होत आहेत त्या चर्चांमध्ये मुलींना आणि मुलींच्या पालकांना टार्गेट केलं जातंय... जसं की मुलींना पुण्यातच / शहरातच राहायचंय!! ते का?? गावाकडेच जन्म आणि मुलगी आतापर्यंत गावातच राहिली असली तरी नवरा मात्र शहरात राहणारा हवा. मुलींना सासू-सासरे नकोत, दीर नको, नणंद नको, आपापले त्रिकोणी चौकोनी कुटुंब पुरेसे झाले इथपर्यंत मुली अपेक्षा व्यक्त करताना दिसत आहेत. आणि हे आरोप ही काही खोटे म्हणता येणार नाहीत. मुलींना शेती पाहिजे पण शेतीत काम करायला नको. अशी अट लग्नाच्या वेळीच मुलींच्या पालकांकडून घातली जाते. आणि ह्यात मुलांकडच्यांची बाजू उचलली जाते आणि मुलींना खलनायक बनवलं जातंय. 

पण वस्तुस्थिती अशी आहे की, हे नकार पचवू न शकणारे बहुसंख्य मुलगे नालायक, मवाली, बेरोजगार, व्यसनी असतात. कित्येक शेतकरी मुलगेही नाईलाजाने शेतकरी झालेले असतात. किंवा वडिलोपार्जित शेती नशिबाने मिळाली म्हणून आणि दुसरा कोणताही धंदा / काम मिळाले नाही म्हणून शेतकरी मुलगा शेती करतोय. (ह्याला अपवाद काही कर्तबगार तरुण शेतकरी मुलगे आहेत. पण अशी majority नाही) 

मुलींच्या बाजूचा विचार केला जात नाही. गेली कित्येक शतके मुलींना नकार द्यायचा अधिकारच नव्हता. आजही मुलगी नकार देत असेल तर ती चांगली मुलगी समजली जात नाही. मुलींची संख्याच कमी झाल्याने तेवढा तरी नकाराधिकार काही प्रमाणात मुलींना मिळायला लागला आहे, ही खरं म्हणजे समाधानाची बाब आहे. तर त्याचा फायदा मुलींनी का करून घेऊ नये? आजवर मुलगे अत्यंत साध्या साध्या कारणांनी मुली नाकारत होते. काळीच आहे, जरा तिरके बघते, दात वाकडे, तिळमात्र अपंगत्व, मुलीची आईच काळी आहे, वडील हुंडा देऊ शकत नाहीत इ.इ. 

गावी राहणाऱ्या मुली पुण्यातले / शहरातले नवरे पाहिजे म्हणतात त्यातही मुलीच्या दृष्टीने चुकीचे काही नाही.  शहरात छोट्या घरात का होईना जे स्वातंत्र्य तिला मिळते ते गावाकडे मिळण्याची शक्यता नाही. खरं म्हणजे 'गाव' कितीही सुंदर असलं तरी आणि 'गड्या आपला गाव बरा' किंवा ‘गावाकडे चला’ ह्या घोषणा कितीही गोड वाटत असल्या तरी, गाव ही एक जुनाट आणि सहज ना बदलणारी व्यवस्था आहे. जात पात, भाव भावकी, गट-तट, राजकारण, व्यसनाधीनता, घाण, दुर्गंधी ह्यांना कंटाळलेली कोणतीही शहाणी व्यक्ती गाव (शहर / राज्य /देश) सोडण्याचा विचार करतेय हेही एक सामाजिक सत्य आहे. ह्यात मुलींनी गावात परत जायला किंवा गावातच राहायला नकार दिला तर वावगे काय? 

शिवाय सोयी, सुविधा संधी ह्यासुद्धा गावापेक्षा शहरात मिळण्याची शक्यता जास्त असते. मला अशा काही मुली माहिती आहेत ज्यांनी गावाकडच्या घरची शंभर एकर जमीन असलेल्या मुलांना नकार देऊन पुण्यात फ्लॅट असणाऱ्या मुलांना होकार दिला.  शेवटी हा तिचा चॉईस होता हे आपण समाज म्हणून स्वीकारू शकत नाही का? (वर वरवपाहता हा चुकीचा वाटत असला तरी त्याला कारणं खूप वेगळी आहेत हे आपण accept करायला पाहिजे)

माहेरी शेतीत काम करणारी मुलगी सासरी शेत तर असावे पण काम नको म्हणते. ह्याला कारण घरच्या बाईच्या शेतीच्या कामाचे काही मोलच नाही. गावोगावी शेतीकामाला पैसे देऊन मजूर मिळेनात अशी परिस्थिती आहे त्यात बिनमोल काम करायला तेही उन्हातान्हात कुणाला आवडेल? (तेही नकार देण्याचा चॉईस उपलब्ध असताना…) त्यात आता शेतमजूर शेतकऱ्याला वाकुल्या दाखवत आहेत. नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था शेतकऱ्याची आहे. मुलींना माहिती आहे की शेतकरी अत्यंत पिचलेल्या अवस्थेत आहे.  ह्याला कारण जरी शेतकरी स्वतः नसला तरी किंवा शेतकऱ्याचा ह्यात काही दोष नसला तरी… शेतकरी स्वतःच एका सामाजिक षड्यंत्राचा शिकार आहे. त्या धगीत मुलींनी आत्मसमर्पण करायला नकार दिला तर एवढा गहजब का होतो? 

गेली हजारो वर्षे स्त्री स्वतःचा जोडीदार निवडते तेव्हा काही गोष्टींचा विचार नक्की करते. हा पुरुष माझे आणि माझ्या मुलांचे रक्षण करू शकेल का? आणि त्यात आर्थिक स्थिती मजबूत आहे की नाही हे पालकांनी खातरजमा करणे इष्टच आहे. खरं म्हणजे हा साधा व्यवहार आहे. ह्यासाठी मुलांनी स्वतः नकार पचवायला शिकावे हा उपाय आहे. मुलींच्या नावाने खडे फोडून / गळे काढून काही उपयोग नाही. 

या वास्तवाला दुसरीही एक दाहक बाजू आहे. आधीच कित्येक पालकांना मुली 'नकोशा' असतात. त्यात गरिबी आणि व्यसने असली की पालक मुलींच्या लग्नाची फार घाई करतात. मुलींचे शिक्षण ही कधीच कुणाची priority नव्हती. आणि आता शिकलेल्या मुली शेफारतात, गावातल्या मुलांना नाकारतात असा ग्रह लोकांनी करून घेतलेला आहे. म्हणून कित्येक मुलींची सोळाव्या सतराव्या किंवा अगदी तेराव्या चौदाव्या वर्षीही लग्नं लावून दिली जात आहेत. ह्यातल्या काही मुली ज्यांचे नवरे व्यसनाधीन आहेत त्या तिशीच्या आत विधवासुद्धा होतात. पुन्हा त्यांच्या मुलींची लग्ने लवकर केली जातात! पस्तिशीत आजी झालेल्या मुली मला माहिती आहेत! 

पूर्वी बी ए बी कॉम बीएस्सी च्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणार्या मुली त्यात एखादीच लग्न झालेली असायची. आता पंच्याहत्तर टक्के च्या आसपास मुली लग्न झालेल्या असतात. ह्यांना मुले झाली की शिक्षण सोडून देत आहेत. ह्या मुलीसुद्धा ह्या विचित्र सामाजिक परिस्थितीच्या शिकार आहेत. त्यांना न्याय कसा देणार? आणि मुख्य म्हणजे असे विषय घेऊन ह्यांच्या बाजूने लढणारे कुणीच नाही!

आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे सामान्यतः मुलांनाही कर्तबगार मुली नको असतात. आजच्या काळातही त्यामुळे Male ego खूप सहजासहजी दुखावला जातो. आपली बायको दिसायला सुंदर पाहिजे पण बाकी सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावी असावी. तिने स्वतःची बुद्धी जास्त चालवू नये. In fact मुलींचे लग्नासाठी grooming केले जाते, त्यातही ही शिकवण येतेच की पती परमेश्वर असतो, (अगदी परमेश्वर नाही तरी किमान बायकोपेक्षा वरचढ तर असतोच!), त्याला किंवा सासू-सासऱ्यांना उलट बोलायचं नाही, खाली मान घालून काम करत राहायचं, चांगला स्वयंपाक शिकायचा... अर्थातच माहेरी असताना सहज हसणारी बोलणारी सासरी मुलगी मरगळून जाते. मग मुलींनीही well-setteld मुलगा असावा ही किमान अपेक्षा ठेवली तर काय चुकले? 

या कारणामुळे कर्तबगार मुलींना कर्तृत्ववान मुलगेही मिळेना झालेत. पूर्वी न शिकलेल्या, आपल्या व्यक्तित्वाचे, आपल्या सामर्थ्याचे भान न आलेल्या मुलींना जसे दामटून लग्न लावले जायचे, पण आजच्या काळात स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या मुली नाही म्हणू शकतात. आणि हा चॉईस ही खूप दिवस मिळेल असे नाही. लिंग-गुणोत्तर समजा कधी एकसमान झालेच तर सर्व मुलांना सुंदर, सर्वगुणसंपन्न मुली मिळतील. (हा विचार का? कारण स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी हा एकच मापदंड आपण वापरतो, असं आजूबाजूला सर्रास दिसतं ना, म्हणून!) 


हेही वाचा - आत्मविश्वास, अहंगंड, स्वकेंद्रीपणा आणि अधिकारी वृत्ती - करुणा गोखले (स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 7/12)


घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. त्यालाही लोकांच्या दृष्टीने ह्या मुलीच जबाबदार असतात किंवा मुलींच्या घरचे नातेवाईक! वरील प्रत्येक नकारामध्ये मुलींच्या मनातील असमाधान बाहेर पडत राहते. ज्या नवऱ्या मुलाला असे वाटते की मुलीने माझ्या आई-वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे कारण आतापर्यंत बायका तेच करत आल्यात, तोच मुलगा मुलीच्या आई-वडिलांना समीकरणातून सोयीस्करपणे विसरून जातो. मुलीचे आई-वडील काहीच महत्वाचे नाहीत फक्त माझेच आई-वडील महत्वाच असे म्हटल्यास मुलींनी सासू-सासऱ्यांना सामावून घ्यायला नकार दिल्यास त्यात नवल नाही. आपण सर्वजण सासुरवासाच्या गोष्टी ऐकत मोठे झालोय. येणाऱ्या बायको / सुनेकडे एक विनामोबदला काम करणारं मशीन असंच बघितलं गेलेलं आहे. मग मुली एक्सटेंडेड फॅमिलीचं लचांड का नाकारणार नाहीत? एकत्र कुटुंब हा निव्वळ romanticism आणि शोषणाला वाव देणारा कुटुंबप्रकार आहे. तर तो नाकारणे योग्यच आहे. मग आता थोडे दिवस का होईना, नकार पचवायला मुलांनी शिकून घ्यावं! बाकी ही दुनिया पुरुषांची आहे आणि अजून दीर्घकाळ पुरुषांचीच राहणार आहे…

खरं म्हणजे ही वेळ अशी आहे की मुलींनी लग्नसंस्थाच नाकारली पाहिजे. कारण एका लग्नानंतर मुलांना काय काय मिळतं तर, बायको मिळतेच पण 24 तास घरकाम करणारी मोलकरीण पण मिळते. ती सुद्धा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करणारी! तिन्ही त्रिकाल स्वयंपाक, धुणी भांडी, केर कचरा, मुलांचे संगोपन करणारी बाई इत्यादी गोष्टी पण मिळतात. ह्याच्या उलट मुलींना काय मिळते तर जन्माचे काम आणि जबाबदाऱ्या. (एक सामाजिक सुरक्षा मिळते पण तीही पुरुषसत्ताक समाजरचनेतून तयार झालेल्या असुरक्षिततेपासूनच, आणि तिचीही शाश्वती नाहीच.) अर्थात, प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळतो पण बहुतांश वेळा “भीक नको पण कुत्रं आवर” अशी मुलींची अवस्था होते. 

मुली शिकल्या आणि म्हणून शेतकरी / गावकरी मुलांना नकार द्यायला लागल्या असं आपण समजत असू, तर आपण चुकतोय. त्याहीपेक्षा शिकलेल्या मुली नकार देतात, कारण शिक्षणामुळे त्यांच्या अपेक्षा वाढतात, म्हणून त्यांना जास्त शिकवूच नये हा उपाय आपण सुचवत असू तर ती त्याहून मोठी चूक आहे.

लेखक - सृजन

Tags: स्त्रीवाद स्त्रियांचा आत्मविश्वास नकाराधिकार शेतकरी गावकरी शहर सोई सुविधा अधिकार स्वातंत्र्य Load More Tags

Add Comment

संबंधित लेख