
वाचन विशेषांक परीक्षण स्पर्धेचा निकाल
लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर परिचय नव्हे, परीक्षण ! जागतिक ग्रंथदिनाच्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने 26 एप्रिल 2025 चा अंक 'दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन' या विषयावर काढला होता. 84 पानांच्या त्या अंकात विविध क्षेत्रांतील 16 मान्यवरांनी लेख लिहिले होते. त्या अंकाचे (परिचय नव्हे) परीक्षण करणाऱ्या लेखांची स्पर्धा आम्ही आयोजित केली होती. तो अंक वाचून एक हजार शब्दमर्यादेतील परीक्षण लेख पाठवण्यासाठी 15 मे पर्यंतची मुदत दिली होती. स्पर्धा सर्वांसाठी खुली होती, वयाची अट नव्हती. त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध क्षेत्रांतील, विविध वयोगटांतील लहान-थोरांनी त्या स्पर्धेत भाग घेतला. महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्यांतून मिळून 93 लेख आले, बेळगाव व जर्मनी येथून एकेक. त्यात 22 स्त्रियांचा समावेश आहे. साधनाच्या संपादकांनी ते सर्व 95 परीक्षण लेख वाचून, त्यातील 21 लेख (शॉर्टलिस्ट केले) अंतिम फेरीसाठी निवडले. आणि मग साधनाचे तीन सहकारी व तीन निमंत्रित अशा सहा जणांना ते 21 लेख पाठवण्यात आले. त्या सहा जणांनी ते सर्व लेख काळजीपूर्वक वाचून, दहा जणांची अंतिम निवड केली आहे. त्यानुसार... 'उत्तम' परीक्षण लेख लिहिणाऱ्या पाच व्यक्ती पुढीलप्रमाणे 1. जयदीप कर्णिक (बिबवेवाडी, जिल्हा पुणे) 2. जावेद शहा (शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर) 3. भागवत शिंदे (श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर) 4. सिद्धार्थ नाईक (पिंपरी, जिल्हा पुणे) 5. भूषण निगळे (जर्मनी) आणि 'चांगले' म्हणता येतील असे पाच परीक्षण लेख लिहिणाऱ्या व्यक्ती पुढीलप्रमाणे 1. सरिता फडके (बार्शी, जिल्हा सोलापूर) 2. सीमा शेलार (खेड, जिल्हा पुणे) 3. सुरज महाजन (कराड, जिल्हा सातारा) 4. उमेश घेवरीकर (शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर) 5. अनिता भालेकर (चिंचवड, जिल्हा पुणे) 'उत्तम' परीक्षण लेख लिहिणाऱ्या पाच जणांना प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची (एमआरपी), तर 'चांगले' परीक्षण लिहिणाऱ्या पाच जणांना प्रत्येकी तीन हजार रुपये किमतीची (एमआरपी), साधना प्रकाशनाची पुस्तके बक्षीस म्हणून पाठवण्यात येतील. साधना प्रकाशनाची 225 पुस्तकांची सूची वरील दहा जणांना पाठवली जाईल, त्यातून प्रत्येकाला आपल्या आवडीची पुस्तके निवडता येतील. ही कार्यवाही 31 मे पूर्वी साधना कार्यालयाकडून पूर्ण होईल. शिवाय, साधना साप्ताहिकाच्या 7 जून 2025 च्या अंकात, वरील पाचही 'उत्तम' लेख पूर्णतः प्रसिद्ध होतील, तर पाच 'चांगले' लेख संक्षिप्त स्वरूपात प्रसिद्ध होतील. आणि अर्थातच, या स्पर्धेची प्रक्रिया सांगणारे सविस्तर संपादकीय निवेदनही त्या अंकात असेल. अंतिम निवड झालेल्या दहा व्यक्तींचे हार्दिक अभिनंदन आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !