घोड्यांचा बाजार

तत्वनिष्ठ राजकारणी बी. जे. खताळ पाटील यांचे काल निधन झाले. त्यांनी  वयाच्या शंभरीत लिहिलेल्या 'वाळ्याची शाळा' या पुस्तकातील लेख 

aldf.org

तत्वनिष्ठ राजकारणी हे विशेषण गांभीर्याने लावता येईल अशा बी. जे. खताळ पाटील यांचे आज ( 16 सप्टेंबर 2019 रोजी ) निधन झाले.  26 मार्च 2018 रोजी त्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती, तेव्हा त्यांनी लिहिलेले माझे शिक्षक (साधना प्रकाशन) हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यानंतर त्यांनी वाळ्याची शाळा हे पुस्तक लिहायला घेतले होते. ते पुस्तक गेल्या आठवड्यात (दादा ज्यांना मानसपुत्र म्हणायचे त्या ) संतोष खेडलेकर यांनी प्रकाशित केले आहे.  त्या पुस्तकाची  कल्पना अशी आहे की, गेली तीन दशके खताळदादांची सेवा करायला - त्यांची साथसंगत करायला रामनाथ वाळे नावाचे गृहस्थ रोज सकाळी येतात. त्यांना राजकारणातील बदलांविषयी कमालीचा रस असतो, त्यामुळे ते दादांशी गप्पा मारताना, त्यांची निरीक्षणे सांगतात आणि दादांना काही मूलभूत म्हणावे असे प्रश्न विचारतात. तेव्हा 70 वर्षांचे वाळे  हे शिक्षक तर 100 वर्षांचे खताळ हे विद्यार्थी असे चित्र आकाराला येते. त्यातून आठ लेख तयार झाले, ते म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड, उंदरांचा सुळसुळाट, घोड्यांचा बाजार, गाढवांचा भार, मेंढ्यांचा कळप, हत्तीचा चित्कार, कुत्र्याच्या निष्ठा, रंग बदलणारा सरडा.  त्यातील दोन लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.  एक- घोड्यांचा बाजार आणि दुसरा- गाढवांचा भार.

घोड्यांचा बाजार

इतर ठिकाणचे माहित नाही, परंतु धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील, सारंगखेडा या गावी तापी नदीच्या काठावर- दर दत्तजयंतीला मोठी यात्रा भरते. ती सध्या 'चेतक फेस्टिव्हल' म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे एक महिना ही यात्रा चालते.या यात्रेत मोठा घोडे बाजार भरतो. या बाजारात भारतातील विविध ठिकाणांहून नानाप्रकारचे घोडे विक्रीसाठी आणले जातात. त्यांचा स्वतंत्र बाजार भरविला जातो. यात्रा संपल्यानंतरही तो महिनाभर चालू असतो.या बाजारात महाराष्ट्रातील सांगली-सातारा भागातील (शरीराने छोटे असलेले) कृष्णाकाठचे 'तट्टू', राजस्थानातील मेवाडमधून आलेले 'मारवाडी', गुजरात मधील काठीयावाडचा 'काठेवाडी', सिक्कीमचा 'भुतिया', जम्मू-काश्मीरचा 'झांझकरी', मणिपूरचा 'मणिपुरी', हिमाचलचा 'स्पिटी', अरब देशाचा 'अबलख' आणि इतर बऱ्याच ठिकाणचे घोडे विक्रीला आणले जातात.

हे घोडे विविध रंगांचे, विविध उंची-लांबीचे, विविध वेगाने धावणारे, पळणारे असतात. शिवाय त्यांचे मालक त्यांना उच्च प्रतीचे पौष्टिक खाद्य देऊन खूपच धष्ट-पुष्ट करतात. तसेच काहींना विविध प्रकारचे नाच आणि इतर कलाही शिकवतात. त्यांना बहुगुणी बनवितात. तो बाजार पाहून खरेदीदारांचे आणि प्रेक्षकांचे डोळे दिपतात. त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. संबंधित घोड्याची किंमत वयानुसार आणि गुणांनुसार काही हजार रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असते हे सांगणे नको.

खरेदीदार मालक या घोड्यांचा वापर विविध कामांसाठी करतात. कुणी बग्गीसाठी, कुणी लग्नादी शुभकार्यात भाड्याने देण्यासाठी, कुणी स्वतःची हौस म्हणून फेरफटका मारण्यासाठी तर कुणी शर्यतीसाठी करतात. याचबरोबर सरकार असल्या घोड्यांचा वापर लष्करातही करते. फ्रान्सचा नेपोलियन, भारताचे शिवछत्रपती, राणा प्रताप यांचे घोडे तर इतिहासप्रसिद्ध आहेत. ते योद्धे घोड्यावर बसूनच स्वाऱ्या करीत असत. आणि आज तरी काय? कोणत्याही छोट्या-मोठ्या देशाकडे घोड्यांच्या लष्करी पलटणी असतातच.

कितीही बहुगुणी, चांगली, उपयोगी असली तरी अखेर घोडा ही हौशी धनिकांनी, उद्योगपतींनी वा राज्यकर्त्यांनी किंमत-पैसा देऊन विकत घेतलेली पशू जमातच आहे. पशूंमध्ये घोडा नावाची जमात आहे हे सर्वज्ञातच आहे; पण मानवांमध्येही ती जमात असल्याचे कितींना माहीत आहे?  विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रातही ही जमात आढळते. पूर्वीच्या काळी ती असेल नसेल, पण हल्लीच्या जमान्यात मात्र उघड-उघड दिसते. ही जमात समाजात, राजकारणात, सभासमारंभात उजळ माथ्याने वावरत असते.

राजकारणातील 'घोडा' कुणाला म्हणतात? थोडासा खोल विचार केला तर लक्षात येईल. राजेशाही, लष्करशाही, एकाधिकारशाही, हुकूमशाही अशा प्रकारच्या 'शाही' राजवटीत तो असतो. त्याचे अस्तित्व ऐकावयास, वाचावयास मिळते. इतकेच काय, तर ते व्यवहारी जगात प्रत्यक्षात पहावयासही मिळते. हे सूर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे.

लोकशाहीच्या कक्षा सारख्या बदलत राहतात. पूर्वी ती फक्त केंद्रापुरती मर्यादित होती. आता मात्र या कक्षा केंद्र, राज्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती इथपर्यंत गेल्या आहेत. इतकेच काय तर सहकार आणि इतर सरकारी, निमसरकारी क्षेत्रांपर्यंतही त्या पोचल्या आहेत. या सर्व क्षेत्रांत निवडणुका आल्या, अधिकारी, पदाधिकारी आले आहेत. राजकीय आर्थिक सत्ता आली आहे. मानमान्यता मिळाली आहे. सबब 'सत्ता तिथे घोडेबाजार' असे जणू गणिती प्रमेयच बनले आहे.

राजकीय क्षेत्रातील घोडेबाजारातील घोडा कोणाला म्हणतात? वर उल्लेख केलेल्या संस्थांमधून एका बाजूने पक्षामार्फत जो निवडून येतो; तो पुढे ऐनवेळी मलिदा (पैसा) घेऊन स्वलाभापोटी समोरच्या पक्षाला वा व्यक्तीला मत देऊन छुपी वा उघड मदत करतो, गद्दारी करतो. अशाला समाज राजकीय घोडेबाजारातील घोडा समजतात/म्हणतात. पूर्वी असा घोडेबाजार मतदानानंतर घडायचा, आता तो मतदानापूर्वीही घडतो हे विशेष!

पशूंच्या घोडेबाजाराचे परिणाम चांगलेच असतात. कदाचित नसले तर निदान वाईट तरी नसतात. त्याचे जे काही परिणाम व्हायचे असतात ते व्यक्तिगत असतात, ते सामाजिक-राजकीय असत नाहीत. मानवी घोडेबाजाराचे मात्र तसे नसते. त्याचे सामाजिक, राजकीय परिणाम वाईटच असतात. इतकेच नव्हे, तर समाज, प्रदेश वा राष्ट्रालाही घातक असतात.

मानवी घोडेबाजारामुळे केंद्रीय सत्ता डळमळीत होते. मग सत्ताकेंद्र सारखे बदलत राहतात. विविध क्षेत्रांतील सत्तास्थाने अस्थिर बनतात. हाती असलेली सत्ता अन्य व्यक्ती किंवा गटाकडे कधी जाईल याचा नेम नसतो. यामुळे जनहित, समाजकल्याण, राष्ट्ररक्षण, परराष्ट्रधोरण याकडे लक्ष देण्याऐवजी संबंधितांना सत्ता टिकवण्यासाठीच आपली शक्ती खर्च करावी लागते. मग राज्यकारभार ठप्प होतो. भ्रष्टाचार, वशिलेबाजी वाढते. सरकार नावापुरतेच शिल्लक राहते. हे आहेत मानवी घोडेबाजाराचे दुष्परिणाम.

आज भारतीय राजकारणात वरील परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. वाचायला, पहायला, अनुभवायला येते. सध्या राजकारणी जनकल्याणाच्या बाबींऐवजी एक - दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यात अधिक रस घेत आहेत. राज्यकारभार नीट चालत नसल्याने जनतेला न्यायालयांचा आधार घ्यावा लागतो. खालपासून ते वरिष्ठ न्यायालयांपर्यंत नेहमीच्या न्यायालयीन कामकाजपेक्षा सरकारी कामाबाबत निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे जनतेचा विश्वास सरकारी न्यायापेक्षा न्यायालयाने दिलेल्या न्यायाकडे अधिक झुकलेला आहे. ही सर्व अवस्था बहुतांशी दोन पायी घोडेबाजारामुळे आली आहे.

चार पायी घोड्यापेक्षा दोन पायी घोड्याची किंमत खूप अधिक असते. असला घोडेबाजार बंद झाला तरच सरकार हे सरकार राहिल... अन्यथा, असलेल्या - नसलेल्या देवाच्या हाती ते जाईल. आमचा वाळे हतबलपणे म्हणतो - "दादा, हे आता खरंच थांबेल का हो?"

माझ्याकडे उत्तर नसते... मी निरुत्तर होतो.

बी. जे. खताळ पाटील यांनी 99 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली त्यांची मुलाखत
बी. जे. खताळ पाटील यांनी 101 व्या वर्षात पदार्पण केले तेव्हा साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला संपादकीय लेख.  

Tags: Hourses Valyachi Shala बी जे खताळ पाटील घोड्यांचा बाजार लेख अनुभव वाळ्याची शाळा Load More Tags

Add Comment