द रियल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया या पुस्तकाचा अनुवाद करताना...

माझ्या घरात मागच्या सात पिढ्यांमध्ये कोणीही कॉलेजचं तोंडही पाहिलेलं नाही. त्यामुळे माझं पहिलं अनुवादित पुस्तक प्रकाशित होणार, ही कल्पनाच माझ्यासाठी स्वप्नवत होती. त्यात परंजय गुहा ठाकुरता आणि सिरिल सॅम यांच्यासारख्या वरिष्ठ पत्रकार- संपादकांचं पुस्तक अनुवादित करणं ही एक खूप मोठी संधी आणि आव्हानही होतं. शब्द पब्लिकेशनचे येशू पाटील यांनी, मी हे काम करू शकेन, असा विश्वास दाखवून ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. 27 नोव्हेंबरला मेरी पाटील स्मृती पुरस्कार आणि व्याख्यानाच्या कार्यक्रमात, मी आता ज्याबद्दल बोलतेय ते पुस्तक ‘फेसबुकचा भारतातील खरा चेहरा’ प्रकाशित झालं. ‘द रियल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया’ या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद. पुस्तकाचा अनुवाद करण्याची प्रक्रिया रंजक आहे पण त्याआधी थोडंसं पुस्तकाबद्दल.

फेसबुक, व्हॉट्सअप, ट्वीटर, इंस्टाग्रामसारखी समाजमाध्यमं आपण सगळेच वापरतो. या माध्यमांची कार्यपद्धती संपूर्णपणे (आणि ही माध्यमं दावा करतात तशी) लोकशाहीवादी, निरागस नाहीत, हे एव्हाना आपल्याला ठाऊक झालेलंच आहे. जगभरातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या व्हॉट्सअप सर्विलन्सचं प्रकरण अलीकडेच समोर आल्याने तर या समाजमाध्यमांच्या एकंदर कार्यपद्धतीबाबतच्या तज्ञांच्या दाव्याला पुष्टीच मिळते. पण हे हिमनगाचं एक टोक आहे, त्याखाली अक्राळ विक्राळ अशी खूप तथ्यं दडलेली आहेत. या अक्राळ विक्राळ तथ्यांच्या समुद्राचा तळ गाठणारं पुस्तक म्हणजे ‘फेसबुकचा भारतातील खरा चेहरा’. 

फेसबुक इंडिया या संस्थेचा भारतातला कारभार, त्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची राजकीय - सामाजिक पार्श्वभूमी, भाजपचे फेसबुक इंडियातील अधिकाऱ्यांशी असलेले संबंध, समाजमाध्यमांचा राजकीय फायद्यांसाठी भाजपने केलेला वापर, फेक न्यूजमुळे निर्माण झालेलं विखारी वातावरण, फेसबुकची धोरणं असं बरंच काही अत्यंत तपशीलाने यात वाचायला मिळतं. अनेक ‘शॉक एलिमेंट्स’ या पुस्तकात आहेत, अनेक तथ्यं चक्रावून टाकतात, विचार करायला भाग पाडतात. जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, असं आज म्हटलं जातं. मला असं वाटतं की आज तर तिसरं महायुद्ध झालं तर ते डेटासाठी किंवा डेटामुळे होईल आणि यात अजिबात अतिशयोक्ती नाही.

समाजमाध्यमांद्वारे आपल्या प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष परवानगीने आपल्याकडून मिळवलेला डेटा विकला जातो आणि त्यातून प्रचंड नफा कमावला जातो, हे तर आपल्याला केंब्रिज एनालिटिकासारख्या प्रकरणातून माहीत झालंच आहे, पण फक्त पैसा कमावणं हेच डेटाच्या व्यापारामागचं उद्दिष्ट नाही, तर जगभरातील सामर्थ्यशाली शक्ती, संस्था, राजकीय घटक डेटाच्या आधारे, समाजमाध्यमांच्या आधारे अतिउजव्या, भांडवलवादी, वर्णवर्चस्ववादी, स्थलांतरविरोधी, अल्पसंख्यांकविरोधी विचारांचा प्रसार करतात. वर्चस्ववाद टिकवण्यासाठी, आपला अजेंडा रेटण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी जनमत मॅन्युप्लेट करण्यासाठी... अशा अनेक कारणांसाठी समाजमाध्यमांचा आज अक्षरश: एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जातो आहे.

पण हे सगळं नेमकं कसं घडतं, हे कुतूहल शमवण्यासाठी याबाबतचं खूप कमी साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे. पाश्चात्य देशांत याबाबत अनेक संशोधनं केली जात आहेत. या सगळ्याबाबतचा उहापोह करणारे सखोल शोधवृत्तांत परंजय गुहा ठाकुरता आणि सिरिल सॅम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवले, ही महत्त्वाची बाब आहे. भारतातील घडामोडी, तथ्यांचा वेध घेत असताना जगभरात काय घडतं आहे, याचाही वेध लेखकांनी घेतल्यामुळे भरपूर उपयुक्त माहिती आणि संदर्भ वाचकाला मिळतात आणि जागतिक संदर्भातही भारतातली फेसबुकची कार्यपद्धती समजून घेण्यास मदत होते.

एकीकडे समाजमाध्यमांमुळे माध्यमांचं लोकशाहीकरण झालं, समाजाच्या तळातल्या व्यक्तीला आवाज मिळाला, प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी मोडून निघाली असं म्हटलं जातं. यात काही प्रमाणात तथ्यही आहे, पण फेसबुक, व्हॉट्सअप, ट्वीटर या समाजमाध्यमांच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश 'जनकल्याण' नसून 'पैसा कमावणं' हाच असल्याने, आज या माध्यमांमुळे फेक न्यूजचा भडिमार, व्यक्तीच्या खासगीत्वाच्या (राईट टू प्रायवसी) हक्काचा भंग झाला, फेक न्यूजमुळे निरपराध लोकांना जीव गमवावा लागला तरी या माध्यमांनी जगभरातच याची पुरेशी गंभीर दखल घेतलेली नाही. डिजिटल हक्क चळवळीतले अनेक लोक आज याविरोधात मोठा संघर्ष करत आहेत. या सगळ्याबद्दलच सविस्तर वाचण्यासाठी हे पुस्तक वाचणं महत्वाचं आहे. 

या पुस्तकाचा अनुवाद करताना मी स्वत: अनेक पातळ्यांवर समृद्ध झाले; पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजमाध्यमांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. याआधी समाजमाध्यमांचं सारं काही आलबेल आहे, असा माझा समज नव्हताच, तरीही त्याच्या खोलात शिरल्यावर दृष्टी बदलते. साधी गोष्ट आहे, आज सकाळीच मी ट्वीटरवर काही ट्वीट्स पाहिली. सिटीझनशिप अमेंडमेंड बिलाबाबतची ही ट्वीट्स होती. एकच ग्राफिक अनेकांनी ट्वीट, रिट्वीट केलं होतं. त्या ग्राफिकमध्ये बांग्लादेशची 1971 नंतरची हिंदू आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येतील तुलनात्मक वाढ आकड्यांच्या माध्यमातून दिली होती, तर दुसऱ्या बाजूला भारतातील हिंदू - मुस्लिमांच्या लोकसंख्येतील तुलनात्मक वाढीची आकडेवारी दिली होती. मागील काही वर्षांत मुस्लिम नागरिकांची लोकसंख्या पुर्वीपेक्षा वाढून जवळपास 14 टक्के म्हणजे दुप्पट झाली आहे आणि हिंदू नागरिकांची संख्या साधारणपणे 85 टक्क्यांपासून 79 टक्क्यांपर्यंत घसरली आहे, हा हिंदू राष्ट्राला - हिंदूंना असलेला धोका आहे, असं अर्थसूचन त्या ग्राफिकमधून केलेलं होतं.

अर्थात अशा प्रकारचा, धार्मिक आधारावर नागरिकांचं विभाजन करु पाहणारा आशय ‘धर्मनिरपेक्ष’ देशातील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरवला जातो आणि समाजमाध्यमांचे धोरण विभाग त्याबाबत सुशेगाद असतात, हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही, पण अशी ट्वीट्स - ते ज्यावरुन ट्वीट केलंय ते ट्वीटर आयडी पाहिले तरी हा सगळा काय प्रकार आहे, हे कोण करतंय, ते चटकन लक्षात येतं. तर अशा कित्येक बाबी, विशेषत: समाजमाध्यमांवरील कोणत्याही विषयाबाबतचा प्रॉपगंडा चटकन लक्षात येतो. रोज सकाळी उठल्यावर महत्त्वाच्या घडामोडी, मार्केटमधील हालचाली जशा पाहिल्या जात तसंच आता ट्विटर ट्रेंड्स माझ्याकडून आपसूक पाहिले जातात. याआधी या माध्यमांवरचा माझा वावर आणि आताचा वावर यात फरक जाणवतो, तो कदाचित मी पत्रकार असल्यामुळेही असेल पण आपल्या दृष्टिकोनात झालेले बारीक-सारीक फरकही जाणवतात.

अनुवाद प्रक्रियेबाबत म्हणायचं तर, याआधी मी काही लेख, कथा अनुवादित केल्यात. कामाचा भाग म्हणून छोटे-छोटे अनुवादही केले आहेत. पण संपूर्ण पुस्तक अनुवादित करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. त्या अर्थाने मी ‘पहिलीटकरीण’च म्हणायला हवं. त्यात मराठी माध्यमात शिक्षण झाल्याने, आपण हे कितपत करु शकू? असा एक विचार होताच, पण प्रकाशक येशू पाटील, शब्दच्या प्राजक्ती बक्षी यांनी आत्मविश्वास वाढवला. अनेक अडलेल्या संदर्भांसाठी मित्र-मैत्रिणींनी मदत केली. एखादा अगदी साधासा शब्द अडला आणि गूगलवर अथवा शब्दकोशात पाहूनही आपल्याला योग्य अर्थ सापडेनासा झाला, तर कोणताही संकोच न बाळगता, जमेल त्या तज्ञ माणसाला विचारुन मी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला. या पुस्तकादरम्यान मला असं लक्षात आलं की, अनुवादासाठी केवळ दोन भाषांची चांगली समज असून चालत नाही तर इतरही कौशल्यं असणं गरजेचं असतं. मांड ठोकून तासन् तास लिहायला ( लॅपटॉपवर टायपायला) बसणं हे खरोखरच जिकीरीचं काम असतं.

माझे सुरुवातीचे कितीतरी दिवस नुसती बैठक जमवायलाच गेले. त्यानंतर किमान दोन-तीनदा संपूर्ण मजकुराचं बारकाईने वाचन, आवश्यक तिथे पेन्सिल, रंगीत पेनांच्या खाणा-खुणा, आवश्यक संदर्भ, अर्थ लिहीणं... अर्थात ज्याची त्याची पद्धत निराळी असते, मला मात्र पेन्सिल हातात असल्याशिवाय लिखाणाचं कोणतंही काम होत नाही आणि य़ाचा एक फायदा असा की, हवं ते हवं तिथे - त्याचक्षणी (विसरुन जायच्या आत) टिपता येतं. एकेक प्रकरण अनुवादित करुन झाल्यानंतर ते पुन्हा वाचून आवश्यक वाटेल तिथे, तेवढ्या भागाचं - वाक्यांचं पुनर्लेखन केलं.

भाषिक अंगाने या पुस्तकावर बरंच काम आम्ही केलं (तरीही ते परिपूर्ण नसावं), उदा., प्रणब मुखर्जी हे मूळ इंग्रजी पुस्तकातलं नाव मराठीत आणताना ‘प्रणव’ असं लिहायचं की ‘प्रणब’च ठेवायचं, मार्क झुकरबर्गसाठी एकेरी संबोधन वापरायचं की आदरार्थी एकवचनी संबोधन वापरायचं, पुस्तकातील 2019च्या निवडणुकांबाबतचा तपशील असणारी भविष्यकाळातील वाक्यं बदलायची की एक संपादकीय सूचना देऊन तशीच ठेवाय़ची, अशा अनेक बारीक सारीक गोष्टींवर भरपूर खल केला. (इंग्रजी पुस्तक 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी प्रकाशित झाल्याने आणि अनुवाद येईपर्यंत निवडणूक होऊन गेल्याने, तारखांचे अनेक संदर्भ बदलले होते.) तसंच हे पुस्तक आजच्या काळातल्या तंत्रज्ञानाविषयी, समाजमाध्यमांविषयी असल्याने त्यातील तांत्रिक शब्द, परिभाषांचं अवघड मराठीकरण न करता ते प्रचलित इंग्रजी शब्दच ठेवायचे का, हा एक महत्त्वाचा निर्णय होता. अर्थातच सोपे आणि रुळलेले इंग्रजी शब्द (ज्याचे मराठी प्रतिशब्द अतिशय अवघ़ड आहेत) ते तसेच ठेवण्याचा निर्णय संपादकांशी बोलून घेतला. 

अशा खूप बारीक-सारीक गोष्टी आहेत, पण एक मात्र मला प्रामाणिकपणे कबूल करायला हवं की, या पुस्तकाच्या निमित्ताने मला माझ्या मर्यादा स्पष्टपणे समजल्या आणि मी ही महत्त्वाची उपलब्धी मानते, कारण मर्यादांची सुस्पष्ट जाणीव झाल्याशिवाय त्यावर काम करणं शक्य होत नाही. अशीच दुसरी एक बाब म्हणजे, अनुवादाला हात लावण्याआधीच, हा अनुवाद प्रकाशकांना नेमका कसा हवा आहे, याविषयीच्या काही संपादकीय बाबींची पुरेशी चर्चा करणं फायद्याचं ठरतं; किंबहुना ते आवश्यक असतं.  त्याने एक निश्चित दिशा मिळते. शक्य झालं तर एखाद्या प्रकरणाचा नमुना अनुवादही संपादक- प्रकाशकांना पाठवून त्यावर चर्चा करुन मग पुढचं काम पूर्ण करणं, माझ्यासारख्या नवख्या अनुवादकांनी करणं फायदेशीर ठरतं. हे मला उशिरा कळलं आणि माझा याबाबतचा क्रम चुकला, त्यामुळे माझ्या नवख्या मित्र-मैत्रिणींसाठी ही गोष्ट सांगावीशी वाटते.

अनुवाद म्हणजे केवळ एका भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत नेणं नव्हे, तर मूळ लेखकाचं ‘बिटवीन द लाईन’ म्हणणंही समजून घेऊन ते उतरवण्याचा (शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणं) होय. ही गोष्टही अगदी पुस्तकाला सुरुवात केली तेव्हा नाही, तर पुस्तकाचं काम शेवटच्या टप्प्यात आल्यावर उमगलेली ( थिअरी म्हणून आधी माहीत होतीच; पण प्रत्यक्षात उमगणं, थोडं वेगळं आहे) गोष्ट आहे. त्यामुळे हे पुस्तक ही सुरुवात आहे, असं वाटतं. एक चांगलं काम करण्याचं समाधान आणि आत्मविश्वास या दोन्ही गोष्टी या पुस्तकामुळे मिळाल्या, आता ते वाचकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे आणि परखड समीक्षा, समृद्ध करणाऱ्या टीकेचीही प्रतीक्षा आहे.

- प्रियांका तुपे 

Tags: प्रियांका तुपे पुस्तक परंजय गुहा ठाकुरता सिरिल सॅम द रियल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया priyanka tupe cyril sam paranjoy guha thakurta book Load More Tags

Comments:

Dilip Chaware

The usage is 'Between the Lines.' To say 'between the line' is wrong. Only way to refining is to try to be as accurate as possible. Cheers.

बि. लक्ष्मण

छान.उत्तम.

प्रकाश कुलकर्णी

एक महत्त्वाचा, अभिनंदनीय उपक्रम

विशाल विमल

हेच पुस्तकं वाचतो आहे.

Add Comment