शब्दांची रोजनिशी: कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त 

'शब्दांची रोजनिशी' या नाटकातील एक दृश्य

'रंगधर्मी'हे विशेषण विशेष गांभीर्याने लावता येईल अशी फार थोडी माणसे मराठी नाट्यसृष्टीत आहेत, त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे अतुल पेठे. 1990 नंतरच्या तीन दशकांत त्यांनी किती विविध प्रकारची नाटके रंगमंचावर आणली आणि  त्यांच्या उभारणीतही किती वैविध्य आहे, यावर दृष्टीक्षेप टाकला तर कोणीही जाणकार नाट्यप्रेमी चकितच होईल. त्यातही विशेष हे आहे की,  नाट्यसृष्टीत नाव कमावलेल्या व यशस्वी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहानथोरांना मोह व्हावा किंवा त्यांनी  प्रलोभनाला बळी पडावे असे दृकश्राव्य माध्यमातील कितीतरी पर्याय मागील तीन दशकांत उपलब्ध झालेले आहेत. तरीही हा अतुलदादा नाटकच करतो आहे. त्याचे कारण सांगताना तो एक उत्तर असे देतो की, "टीव्ही माणसाला आहे त्यापेक्षा लहान दाखवतो, सिनेमा माणसाला आहे त्यापेक्षा मोठा दाखवतो, नाटक मात्र माणसाला आहे तेवढाच दाखवते." अशा पार्श्वभूमीवर, आज जागतिक रंगभूमी दिवसाच्या निमित्ताने, अतुल पेठे यांनी पुढाकार घेऊन अलीकडेच  रंगभूमीवर आणलेल्या नव्या नाटकाविषयीचा हा लेख...
- संपादक

सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये योगदान देणारा, कधीही समोर न येऊ दिलेल्या किंवा विरून गेलेल्या घटना, व्यक्ती, इतिहास इत्यादींचा शोध घेऊन, त्यावर संशोधन करून त्या प्रक्रियेतून सापडलेलं सत्य नाटकांतून मांडणारा द्रष्टा नाटककार म्हणजे रामू रामनाथन!

कॉटन 56 पॉलिस्टर 84, कॉम्रेड कुंभकर्ण, महादेवभाई (1892-1942), द डायरी ऑफ अ वर्ड, पोस्टकार्ड फ्रॉम बारडोली, द बॉय हु स्टॉप्ड स्माईललिंग, यार! व्हॉट इज द कॅपिटल ऑफ मनिपुर, शांती! शांती! इट्स अ वॉर,  नथिंग-अ प्ले विदाऊट वर्ड्स अशी 30 विविध नाटकं रामू रामनाथने लिहिली आहेत.

आपल्याला माहित नसलेल्या, मात्र महत्वाच्या असलेल्या गोष्टींकडे समाजाचे लक्ष वेधण्याच्या हेतूने रामू रामनाथन नाटकं लिहितात. दडपल्या गेलेल्या आवाजांनी व्यक्त व्हायला नेहमीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने वाट शोधलेली आहेच आणि ‘नाटक’ हे त्यासाठीचं एक अत्यंत महत्वाचं माध्यम ठरलेलं आहे. रामू रामनाथनची नाटकं मूळ इंग्रजी भाषेत असली तरी आजवर ती विविध भाषांमध्ये सादर झालेली आहेत. द डायरी ऑफ अ वर्ड’ चं मराठी रुपांतर ‘शब्दांची रोजनिशी’ हे त्यातलंच एक उदाहरण.

अमर देवगांवकर अनुवादित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘शब्दांची रोजनिशी’ हे नाटक सादर करतात केतकी थत्ते आणि अतुल पेठे. केवळ 50 ते 125 प्रेक्षकांसाठी कम्युनिटी नाटकाचे हे प्रयोग सुरु असताना कोरोनाच्या साथीमुळे याचे प्रयोग तात्पुरते थांबविले आहेत. तत्पूर्वी  पुणे आणि मुंबई येथे या नाटकाचे एकूण चौदा प्रयोग झाले आहेत आणि सगळे सुरळीत झाल्यावर महाराष्ट्रभर आणि भारतभर याचे प्रयोग होतील यात शंका नाही!

या नाटकाची गंमत म्हणजे मला हे नाटक खूप ओपन वाटलं. ओपन या अर्थाने की प्रत्येकाला हे नाटक आपल्या पद्धतीने समजून घेता येतं आणि त्या समजण्यात चूक- बरोबर असं काहीच नसतं! ते तुमच्या कल्पनाशक्तीला, मधूनच येणाऱ्या काही आठवणींना, तुम्ही तयार करत असलेल्या परसेप्शनला कुठेही रोखत नाही. कोणत्याही कलाकृतीची ही खरी ताकद असते असं मला वाटतं - टू बी ओपन इनफ! किती इनफ? इतकं की तुम्हाला ते पटलं नसलं, त्यातल्या पुराव्यासकट सांगितलेल्या फॅक्ट्स आवडत नसल्या तरी तुम्ही ते नाकारू शकणार नाही इतकं ‘इनफ ओपन’!

रामू रामनाथनच्या इतर नाटकाप्रमाणेच या नाटकाचीही हीच गंमत आणि ताकद आहे की-तो सायंटीफिकली संशोधन केलेल्या, खऱ्या-खुऱ्या असणाऱ्या, आजच्या आणि पुढच्या काळाला एकदम रिलीव्हंट असणाऱ्या आणि आपण लक्ष द्यावं इतक्या महत्वाच्या असणाऱ्या फॅक्ट्स कलात्मकता वापरून नाटकाच्या रूपाने आपल्यासमोर मांडतो! नॉट इझी!

आजच्या काळात, जिथे बऱ्याचदा आपल्या ओपिनियनलाच फॅक्ट म्हणून  मांडलं जातं, तिथे हा अवलिया नाटकावर नाटकं लिहून त्यातला खरेपणा, तपासलेल्या फॅक्टस आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न  करतो… मग अतुल पेठे आणि टीम यातलं एक महत्वाचं नाटक आपल्यासाठी मराठी भाषेत घेऊन येतात. त्याचं नाव- ‘शब्दांची रोजनिशी’. हे सगळं कुठेतरी कृतज्ञता मानण्यासारखं आहे. असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे अशा प्रयोगांमुळे प्रेक्षक ग्रो होतो आणि समाजसुद्धा!

या नाटकाची सौंदर्यस्थळे सांगण्याचा अट्टाहास न केलेला बरा कारण ते प्रत्यकाने आपापल्या नजरेतून बघण्याचं नाटक आहे. रामू रामनाथनने एक बरी सोय करून ठेवली आहे. एखाद्याला इतकी गंभीर गोष्ट असूनसुद्धा, जर या नाटकातल्या फॅक्ट्समध्ये फार रस वाटतच नसेल तर त्याला किमान- 'मध्यम वय असलेल्या एका स्त्रीने तिच्या दुसऱ्या नवऱ्याला अमुक-अमुक मजल्यावर लग्नासाठी कशी मागणी घातली?' याची ‘रोमांचक’ कहाणी अनुभवायला मिळेल, अशाप्रकारे हे नाटक लिहिलं गेलं आहे!

संपूर्ण नाटक, ‘हरवत चाललेल्या भाषा आणि त्याचे भूतकाळात झालेले आणि भविष्यकाळात होणारे परिणाम’ याबद्दल आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र नाटक लक्षपूर्वक पाहिलं तर त्याचे अनेक पैलू समोर येतात. नाटकाची सुरुवातच या वाक्याने होते- “जिवंतपणीच सगळं कुजत चाललेलं आहे!”. हे वाक्य एका अर्थाने आज आणि आत्ताच्या कोरोनाच्या स्थितीलासुधा लागू होणारे नाही का वाटत? एक एक करून आपण काय-काय कुजवतोय? (आपोआप कुजणे-विरणे वेगळे... आणि जाणून-बुजून दुर्लक्ष करून गोष्टी कुजवणे किंवा कुजू देत राहणे, हे वेगळे!) या ‘काय-काय कुजवतोय?’ मधली एक महत्वाची गोष्ट म्हणजे ‘भाषा’! ...आणि या कुजणाऱ्या भाषेसोबत विरणारे, विरून गेलेले अनेक लेखक, कवी, संशोधनकार, प्रबोधनकार इत्यादी. आणि त्यासोबातची संस्कृती यांचं काय?

ही विरण्याची प्रक्रिया ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकात दाखवताना केलेला टेक्नोलॉजीचा वापर आणि त्याच बरोबर केतकी थत्ते आणि अतुल पेठे यांनी केलेल्या स्वतःच्या आवाजाचा वापर लाजवाब आहे. आपल्या सेन्सेसना हे नाटक समोर सुरु असल्याला गोष्टींमध्ये खिळून ठेवतं. म्हणजे अगदी इन द प्रेझेंट!

नाटकाची स्टोरी लाईन अगदी साधी-सोपी आहे- 321व्या मजल्यावर घडत असणारी एका मध्यम वयातील स्त्री आणि पुरुषाची प्रेम कथा आणि त्या परिसरातील काही हरवलेल्या शब्दांबाबत कथेतील एका पात्राकडे आलेली तक्रार! संपूर्ण कथा संवादात्मक लिहिली गेली असली तरी ते संवाद ठिगळ्या-ठिगळ्यांत आहेत. कधी शब्द हरवल्याने अडखळलेले संवाद जे आपल्याला शब्दांच्या काल्पनिक दुनियेत घेऊन जातात, तर कधी वास्तवात आणणारे संवाद.

ही ठिगळं एकत्र शिवण्याचा प्रयत्न करत प्रेक्षक ‘भाषेभोवती’ चालणाऱ्या राजकारणापर्यंत येऊन पोहोचू शकतो किंवा नाटकात हरवूनही जाऊ शकतो आणि हे नाटक प्रेक्षकाला या दोन्हींची परवानगी देतं! कारण पहिल्यामुळे प्रेक्षक अवेअरनेसमध्ये आहे याची शाश्वती मिळते आणि दुसऱ्यामुळे प्रेक्षक काहीसा अवेअरनेसमध्ये येण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची उमेद निर्माण होते…

अतुल पेठे, केतकी थत्ते आणि टीम यांनी ‘शब्दांची रोजनिशी’ च्या सादरीकरणात कोणतीच कसर सोडलेली नाही. हे वाक्य मी काळजीपूर्वक वापरते आहे. अगदी सुरुवातीपासून दोन स्टोरीलाईन्स एकत्र बांधत, सिम्बॉलीझमचा उत्तम वापर करण्यासाठी जयंत भीमसेन जोशी यांनी रेखाटलेल्या भित्तीचित्रांपासून ते केतकी थत्तेच्या आवाजात तिने गायलेल्या पाचपेक्षा अधिक भाषांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या गीतांपर्यंत!

अधून-मधून येणारा घरातल्या एका व्यक्तीचा फोन आणि त्याच्या रेकॉर्डिंगचा केलेला वापर तिथे उपस्थित सगळ्यांनाच दातात जीभ धरायला लावणारे प्रसंग निर्माण करत आपल्याला दोन्ही पात्रांची ओळख करून देतो. केतकी आणि अतुल पेठे यांच्यामधील संवाद स्पष्ट आणि व्यवस्थित केलेल्या गप्पांबरोबरच तुटक-तुरळक, जेवढ्यास-तेवढे, कधी टोमणे, कधी माहिती उकलणे, कधी धमक्या, कधी मोनोलॉग वगैरे या स्वरूपात समोर येतात तेव्हा दोन लोकांमधील नैसर्गिक संवादाची मांडणी प्रेक्षकांसमोर होते. रामू रामनाथनच्याच भाषेत - ‘कोणत्याही प्रेम-भाषेशिवाय प्रेमकथा दाखवण्याचा एक प्रयत्न म्हणजे हे नाटक!’  

या नाटकाविषयी लिहिण्यासारखं खूप आहे आणि तसं पाहिलं तर लिहिण्यासारखं काहीही नाहीसुद्धा! कारण हे नाटक प्रत्येकाने आपल्या दृष्टीकोनातून बघावं अशी माझी विनंती आहे. अगदी आताच्या काळातील 'Baba black sheep,have you any wool?' एवजी 'Baba back sheep, have you any tool?' सारख्या नवीनच छापलेल्या कवितेविषयीच्या फॅक्टस किंवा ‘Special project about survey of minor and endangered languages' मधून आलेला, नष्ट होत चाललेल्या भाषांबाबतचा शोधप्रबंध सांगतो की-1962च्या जनगणनेनुसार  आपल्या देशात 1652 मातृभाषा नोंदवल्या गेल्या होत्या. त्यानंतर केवळ दहाच वर्षांनी झालेल्या जनगणनेत फक्त 108 मातृभाषा उरल्या!  मग बाकी 1544 मातृभाषांचं काय झालं? याचं उत्तर या नाटकात कुठेतरी सापडतं का बघा...

- दिपाली अवकाळे, पुणे
deepaliawkale.25@gmail.com

Tags: दिपाली अवकाळे नाटक अतुल पेठे केतकी थत्ते भाषा रामू रामनाथन Load More Tags

Comments:

Sharmishtha kher

नाटकाची गोळा उत्तम आहे. पण प्रेक्षक ग्रो होतो असलं मराठी? ग्रो मराठीत म्हणताच येणार नाही का ?

Mukesh

नाटकाचा विषय छान आहे परंतु तो चांगला मांडता आलेला नाही. हे नाटक म्हणजे कशाचा कशाशी ताळमेळ नसलेली ओढून ताणून बनवलेली कलाकृती आहे. केतकीचा आवाज आणि अभिनय छान आहे बाकी काही खास नाही.

Subhash Athale

"यथा बाधति बाधते'. या संस्कृत वचना प्रमाणे दीपाली ऐवजी दिपाली वाचायला "बाधते".

Add Comment