एड्सग्रस्त अनाथ मुलांचं घर: ममता फाउंडेशन

जागतिक एड्स दिवसाच्या निमित्ताने...

दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स(AIDS-Acqired Immune Deficiency Syndrome) या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी, यासाठी हा दिवस पाळावा असे जागतिक राष्ट्रसंघाने1988 साली घोषित केले. त्यानिमित्ताने एड्समुळे आई-वडील गमावलेल्या, एड्सग्रस्त अनाथ मुलांसाठी पुणे येथे काम करणाऱ्या ममता फाउंडेशन या संस्थेचा करून दिलेला परिचय. 

दोन वर्षांपूर्वी एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीने दाखवलेल्या एका बातमीने खळबळ माजली होती. उत्तर भारतातील एका गावात नुकत्याच मरण पावलेल्या एड्सग्रस्त दांपत्याच्या लहान मुलांना गावातील नागरिकांकडूनच गावाबाहेर जाण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे, जिथे स्वतःच्या आईवडिलांना दफन केलं होतं, त्या स्मशानातल्या जागेशेजारी त्यांना आसरा घ्यावा लागला होता.. गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण प्रचारामुळे शहरांमध्ये आज हे चित्र बरंचसं बदललं असलं तरी ग्रामीण भागात एड्सविषयीची साशंकता, गैरसमज मात्र अजूनही पूर्णतः संपलेले नाहीत. दहा-बारा वर्षांपूर्वी हे प्रमाण आजच्याहून बरंच अधिक होतं. सर्वसामान्यांमध्ये या आजाराविषयी असलेल्या भीतीमुळे एड्सने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अनाथ मुलांविषयीही  समाजात फारशी आस्था नव्हती. या मुलांना तरी निदान त्यांचं आयुष्य इतर सामान्य मुलांसारखं जगता यावं या भावनेने त्यांच्या आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी खरंतर विशेष प्रयत्न होण्याची गरज होती. ही गरज ओळखूनच अमर व शिल्पा बुडुख या दाम्पत्याने अनाथ एड्सग्रस्त मुलांच्या संगोपनासाठी संस्था काढायचं ठरवलं. आणि 19 जुलै 2008 रोजी ममता फाउंडेशन ही संस्था आकाराला आली.

अमर आणि शिल्पा हे मुळचे बार्शीचे. महाविद्यालयीन जीवनात अमर राष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल चॅम्पियन होते. शिल्पा यांनाही नाट्यस्पर्धांमध्ये काम करण्याची विशेष आवड होती. लग्नानंतर 2001मध्ये ते पुण्यात स्थायिक झाले. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे शिल्पा यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एम. एस. डब्ल्यू. ही पदवी संपादन केली. तर अमर यांनी बालमानसशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे. पुण्यात आल्यानंतर आठ वर्षं त्यांनी लहान मुलांसाठी काम करणाऱ्या विविध एनजीओज् मध्ये काम केलं. दरम्यानच्या काळात एड्स या आजाराचा अभ्यास करावा आणि त्या आजाराने आई-वडील गमावलेल्या एड्सग्रस्त मुलांसाठी काम करावं, अशी कल्पना त्यांना सुचली. बालाजी नगर येथे भाड्याच्या जागेत दोन मुलांना सांभाळण्यापासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली.

एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणं, हे तितकंसं सोपं नव्हतं. ‘एड्स हा आजार संसर्गजन्य नाही’ हे लोकांपर्यंत पोहोचलेलं असलं तरी त्यांनी मनाने ते स्वीकारलेलं असतंच, असं नाही. त्यामुळे संस्थेसाठी जागा मिळवणंदेखील त्यांना अवघड गेलं. पहिल्यांदा बालाजीनगर, मग धनकवडी, त्यानंतर सुखसागरनगर, असं हे विंचवाचं बिऱ्हाड तब्बल सहा ठिकाणी वागवल्यानंतर, गेल्या वर्षी संस्थेला जागा मिळाली. कात्रजपासून तीनेक किलोमीटर अंतरावर, गुजर निंबाळकरवाडी इथं स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम यांनी देणगी म्हणून दिलेल्या तीन गुंठयांच्या जागेत, लोकसहभागाने संस्थेची वास्तू उभी राहिली. भाड्याच्या घरांमध्ये राहताना, या मुलांच्या घराशेजारी खेळण्याविषयीही आसपासच्या स्थानिकांची नाखुशी असे. आता या नव्या वास्तूमुळे मुलांना स्वतःच्या हक्काची जागा मिळाली आहे.

संस्थेमध्ये सध्या सात ते एकोणीस वयोगटातील एकूण 35 मुलं-मुली आहेत. बालकल्याण समितीकडून या मुलांना इथे आणलेलं आहे. ‘ममता’च्या जन्मापासून मुलांसोबत असणाऱ्या साधनाताई, म्हणजे मुलांच्या ‘मम्मी’ इथली व्यवस्था पाहतात, मुलांना काय हवं-नको, ते पाहतात. दोन डॉर्मीटरीज् मध्ये मुलांची आणि मुलींची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. व्यायाम आणि योगासनांनी मुलांच्या दिवसाची सुरुवात होते. तिन्हीसांजेच्यावेळी मधल्या हॉलवजा जागेत मुलं एकत्र येतात आणि पंधरा ते वीस मिनिटं प्रार्थना, ओंकारपठण व ध्यान करतात. त्यानंतर जेवणाची वेळ होईपर्यंत आपापल्या खोल्यांमध्ये जाऊन गप्पा-खेळ चालतो. दिवसांतला अख्खा वेळ एकत्र राहिल्यामुळे, ममता हे या मुलांचं कुटुंबच बनलं आहे. त्यामुळे अभ्यास, शारीरिक स्वच्छता या गोष्टी मुलं सवयीने स्वतःहूनच करतात. ममतामध्ये प्रवेश करण्याआधी टायगर आणि सिल्क हे दोन खंदे रखवालदार नीट चौकशी करूनच आपल्याला आत सोडतात! या दोघांशिवाय टफी, मिडनाईट, प्रिन्स अशा गमतीशीर नावांचे तीनचार पेट्स इथे आहेत. मुलांना त्यांचा फार लळा आहे. फावल्या वेळात मुलांसोबत त्यांची भरपूर दंगामस्ती चालते.

मुलांच्या न्याहरीच्या, जेवणाच्या आणि औषधांच्या वेळा नियमितपणे पाळाव्या लागतात. आठवड्यातून दोनदा मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. ससून हॉस्पिटल, कमला नेहरु हॉस्पिटल, आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज आणि भारती हॉस्पिटल या चार हॉस्पिटल्सशी संस्थेचा संपर्क असतो. तपासणीसाठी मुलांना गटागटाने नेलं जातं. डॉ. जितेंद्र ओसवाल, डॉ. राकेश गुप्ता हे अधूनमधून मुलांच्या तपासणीसाठी इथे भेट देतात. याशिवाय अनघा परांजपे, सचिन पुरोहित, शरद सोनवणे या विश्वस्तांचं सक्रीय पाठबळ संस्थेला असतं.

ममता सुरु करण्याचा बुडुख यांचा उद्देश, या मुलांना नियमित औषधोपचारांसोबतच ‘घरच्यासारखं’ वातावरण निर्माण करून देणं, हा होता. त्यामुळे प्रत्येक सण-समारंभ, मुलांचे वाढदिवस इथे एकत्रित साजरे केले जातात. पूर्वपरवानगीने, बाहेरच्या व्यक्तींनाही इथे येऊन आपला वाढदिवस मुलांसोबत साजरा करता येतो. मुलांसाठी अधूनमधून सहलींचं आयोजनही केलं जातं.
 
इथल्या प्रत्येक मुलाला त्याच्या आजाराविषयी नीट माहिती आहेच, शिवाय एड्सविषयी लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजुतींचं भानही आहे. कुठल्याही कारणाने स्वतःविषयी त्यांच्या मनात न्यूनगंडांची भावना निर्माण होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. त्यांचं शिक्षणही इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच व्हावं, याकडे संस्थेचा कटाक्ष आहे. आठवी ते दहावी मध्ये शिकणारी मुलं कात्रज इथल्या महानगरपालिकेच्या शाळेत जातात आणि पहिली ते सातवीपर्यंतची मुलं गावातील प्राथमिक शाळेत शिकतात. या शाळांमधील शिक्षकांना, मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही ‘एड्स संसर्गजन्य नाही’ याची जाणीव करून देण्यात ‘ममता’ला यश मिळालेलं आहे. या मुलांना इतर सामान्य मुलांसारखं आयुष्य जगता यावं, यादृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं आहे. एड्सविषयीची समाजाची मानसिकता बदलणं आणि या मुलांचा आत्मविश्वास वाढवणं, हा दुहेरी हेतू त्यातून साध्य होतो आहे.

वयाच्या 18व्या वर्षानंतर या मुलांनी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं राहणं, ही संस्थेला स्वतःची जबाबदारी वाटते. इथल्या प्रत्येक मुलाची स्वप्नं वेगवेगळी आहेत. कुणाला शालेय अभ्यासापेक्षा गाण्याची आवड आहे तर कुणाला चित्रकलेची! त्याचं भान ठेवून मुलांसाठी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरु करावं अशी बुडुख यांची कल्पना आहे. लहानपणापासून ममतामध्ये वाढलेला आकाश आवडीने स्वतः गाडी चालवायला शिकला आहे, अभ्यासात हुशार असलेली निकिता ऑफिसचं काम, पाहुण्यांच्या गाठीभेटी स्वतः पाहते आहे. मागच्याच वर्षी इथल्या एका मुलीचं लग्न होऊन ती सोलापुरात स्थायिकही झाली आहे. 12 वर्षांपूर्वी रुजवलेलं हे संस्थेचं रोपटं आता चांगलंच बहरू लागलं आहे!

ममतातर्फे एड्स या आजाराविषयीच्या मार्गदर्शनाबरोबरच स्त्रियांच्या समुपदेशनाचंही काम केलं जातं. कौटुंबिक हिंसाचार, गृहकलह यांमधून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांना मदत करणं, हा त्यामागचा उद्देश असतो. ग्रामीण भागातील महिलांनी ‘चूल आणि मुल’ यांतून बाहेर पडून आत्मनिर्भर व्हावं यासाठी त्यांना शिवणकाम, साबणनिर्मिती, संगणक वापराचं सामान्य ज्ञान अशा विविध कौशल्यांबाबत मोफत मार्गदर्शन केलं जातं.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (NACO) 2017 मधील अहवालानुसार भारतातील नोंदणीकृत एड्स बाधितांचा आकडा 21 लाख 40 हजार इतका आहे. एड्सग्रस्तांच्या संख्येबाबतीत भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे! भारतामध्येही, महाराष्ट्रात एड्सग्रस्तांची संख्या सर्वाधिक, म्हणजे साडेतीन लाखांच्या आसपास आहे. पण नॅकोच्याच  अहवालानुसार गेल्या काही वर्षांत एड्सग्रस्तांची आणि एड्ससंबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वेगाने कमी होते आहे. एड्स समूळ बरा करण्याचा उपाय आजही सापडलेला नसला तरी उपलब्ध झालेल्या औषधांमुळे, प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्णांना एड्ससहदेखील आनंदात जगणं शक्य झालं आहे. याच हेतूने धडपडणाऱ्या, एड्सग्रस्त मुलांच्या काटेरी आयुष्यात आनंद पसरावा यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या, ममतासारख्या संस्थांना समाजानेच बळकटी देण्याची गरज आहे.

सुहास पाटील 
suhasp455@gmail.com

Tags: HIV AIDS ममता फाउंडेशन संस्था परिचय Load More Tags

Comments:

सुरज पोवार

लेख छान लिहिला आहे. ममता फौंडेशन विषयी माहिती मिळाली.

Gaurav S Hange

The work of Mamata foundation is very inspiring for the society. Amar and Shilpa are doing great job of children empowerment. Their sacrifice for the cause is noteworthy as they have set an example before the society. Hope their work to minimise the struggles and ordeals of these less fortunate children of heaven inspire others.

निकेत काळभोर

सुहास तुम्ही खुप अप्रतिम लेख लिहिला आहे, त्यामुळे समाज्यातील मदतकरूंचा ममता फौंडेशन वर नक्कीच कटाक्ष पडेल. डॉ अमर आणि शिल्पा ताई यांचे कार्य खरंच खुप उल्लेखनिय आणि अभिमानास्पद आहे.

अक्षय सुतार

ममता फौंडेशनच्या या पुढाकाराने त्या मुलांना आपलं घर मिळालं..Hats off to Mamata Foundation. खुप छान लेख लिहला आहे. तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Ramchandra Mali

खरंच खूप छान लेख, खरंच अशा प्रकारच्या अनेक लोकांनी आपले जीवन समाजासाठी समाजातील दुर्लक्षित अन वंचित घटकांसाठी त्यागले आहे, त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे, आपण किमान काही वेळ देऊन आणि इतर मदत करून हातभार लावू शकतो. शिल्पताई आणि अमर यांना अन त्यांच्या ममता फौंडेशनच्या कार्यास सलाम!

Add Comment