अभिवादन : बहिष्कृत भारताच्या नायकाला

Wikimedia Commons

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी, 1920 रोजी सुरु केलेल्या 'मूकनायक' या पत्राला आज शंभर वर्षे होत आहेत. साधना साप्ताहिकाच्या  13 एप्रिल 2008 च्या अंकात प्रसिद्ध झालेले  ‘अभिवादन : बहिष्कृत भारताच्या नायकाला‘हे संपादकीय या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत. 

‘‘एवढा कोरीव वृत्तपत्रीय प्रपंच करूनही, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘पत्रकार आंबेडकर’ म्हणून कोणी मानाचा मुजरा केला नाही’’, अशी खंत डॉ. गंगाधर पानतावणे यांनी ‘पत्रकार आंबेडकर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत व्यक्त केली आहे (आणि ‘अस्मितादर्श’ हे नियतकालिक प्रदीर्घ काळ चालवत राहिलेल्या डॉ. पानतावणे यांचाही उल्लेख ‘पत्रकार पानतावणे’ असा कोणी करीत नाही). मराठी वृत्तपत्रसृष्टीनेही डॉ. आंबेडकरांना ‘अस्पृश्य’च ठरवले, असा निष्कर्ष डॉ. पानतावणे यांनी काढला आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पत्रकारितेवर एक दृष्टिक्षेप टाकणे आवश्यक वाटते.

डॉ. आंबेडकरांनी चार वृत्तपत्रे सुरू केली. त्यांपैकी ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या दोन पत्रांचे संपादन स्वत: बाबासाहेबांनी केले आणि त्यातला बहुतांश मजकुरही त्यांनी स्वत:च लिहिला. ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारत’ या दोन पत्रांचे संपादन मात्र त्यांनी सहकाऱ्यांवर सोपवले आणि त्यातून त्यांची भाषणे, लेख व चळवळीचे वृत्तांत येत राहिले. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करताना ‘मूकनायक’ व ‘बहिष्कृत भारत’ यांच्या अंकांकडे पहावे लागते. पण ‘मूकनायक’ पाक्षिक सुरू केल्यावर केवळ सहा महिन्यांनंतर (म्हणजे 12 अंकांनंतर) बाबासाहेबांनी त्याचे संपादन सहकाऱ्यांवर सोपवले आणि ते स्वत: पुढील अभ्यासक्रमासाठी परदेशात गेले. सहा वर्षांनी पुन्हा भारतात आल्यावर त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ हे पत्र सुरू केले.

‘मूकनायक’ सुरू केले तेव्हा (1920 साली) बाबासाहेबांचे वय होते अवघे 29वर्षे आणि ‘बहिष्कृत भारत’ सुरू केले तेव्हा (1927 साली) त्यांचे वय होते 36 वर्षे. ‘बहिष्कृत भारत’च्या पहिल्याच अग्रलेखात ‘मूकनायक’चे संपादकपद का सोडले याचा खुलासा त्यांनी केला आहे : ‘‘मूकनायक पत्राचा उपक्रम सुरू केल्यावर प्रस्तुतच्या लेखकास असे दिसून आले की अशा प्रकारचा लोकसेवेचा मार्ग पत्करणे झाले तर त्याकरिता कोणता तरी एखादा स्वतंत्र धंदा हस्तगत करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून सुसाध्य असा ब्यारिस्टरीसारखा स्वतंत्र धंदा करता यावा म्हणून आपला अवशेष राहिलेला अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी त्यास परत विलायतेस जाणे भाग पडले.’’

याच अग्रलेखात ‘बहिष्कृत भारत’ का सुरू केले, याबाबत खुलासा करताना बाबासाहेब म्हणतात, ‘‘आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्याची भावी उन्नती व तिचे मार्ग याच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.’’

‘मूकनायक’च्या प्रत्येक अंकात शिरोभागी तुकारामांचा पुढील अभंग छापला जात होता,

काय करू आता धरूनियां भीड। नि:शंक हे तोंड वाजविले॥
नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण। सार्थक लाजून नव्हे हित॥

आणि ‘बहिष्कृत भारत’च्या प्रत्येक अंकात शिरोभागी ‘ज्ञानेश्‍वरी’तील पुढील ओवी छापली जात होती,

आता कोदंड घेऊनि हातीं। आरूढ पा इये रथीं। देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने.
जगी कीर्ति रूढवीं। स्वधर्माचा मानु वाढवी। इया भारा पासोनि सोडवी। मेदिने हे.
आतां पार्था नि:शंकु होई। या संग्रामा चित्त देई। एथ हे वांचूनि कांही। बोलो नये.

वरील सर्व तपशील संदर्भासह समजून घेतले तर लक्षात येते ते हेच की, मूक जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी तरुण बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ सुरू केले. पण त्यासाठी आपली पूर्वतयारी नीट झालेली नाही, हे त्यांना पहिल्या सहा महिन्यांच्या अनुभवातूनच कळून चुकले. परदेशातून परत आल्यावर म्हणजे तब्बल सहा वर्षांनी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ सुरू केले; तेव्हा त्यांच्याकडे अभ्यास व अनुभव यातून आलेला प्रचंड आत्मविश्‍वास होता. हा आत्मविश्‍वास त्यांच्या ‘बहिष्कृत भारत’च्या पहिल्याच अग्रलेखात स्पष्ट दिसून येतो.

त्या अग्रलेखाचे शीर्षक ‘पुनश्‍च हरि: ॐ!’ हेच खूप बोलके होते (लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटून आल्यावर ‘केसरी’त लिहिलेल्या पहिल्या अग्रलेखाचे शीर्षकही हेच होते.) म्हणजे नि:शंक होऊन आणि वीरवृत्ती धारण करून ते प्रदीर्घ लढ्यासाठी सज्ज झाले होते. अर्थातच, हा लढा स्वकीयांविरुद्ध होता आणि 'हे स्वकीय कौरवांसारखे आहेत', हेच बाबासाहेबांना ‘ज्ञानेश्‍वरी’तील ‘त्या’ ओवीतून सूचित करायचे होते. हिंदू धर्मातील ‘चातु:र्वर्ण्य’ आणि ‘अस्पृश्यता’ यांची फेरमांडणी करून बाबासाहेबांनी ब्राह्मण, ब्राह्मणेतर आणि बहिष्कृत अशी वर्गवारी केली आणि बहिष्कृत समाजाचे, खरे तर बहिष्कृत भारताचे नेतृत्व करायचे ठरवले.

त्यामुळे ‘बहिष्कृत भारत’ हे त्यांना वृत्तपत्र करायचे नव्हते, तर ते बहिष्कृत समाजाच्या चळवळीचे मुखपत्र बनवायचे होते. त्याप्रमाणे ‘मनुस्मृतीचे दहन’ आणि ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’ यांच्यासाठीच ‘बहिष्कृत भारत’ त्यांनी सुरू केले. ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’ या घटनेची तुलना १७८९ मधील फ्रेंच राज्यक्रांतीच्या जाहीरनाम्याशी स्वत: बाबासाहेबांनीच त्यावेळच्या अग्रलेखात केली आहे. म्हणजे आपण करत असलेली कृती किती ‘ऐतिहासिक’ आहे याचे त्यांना पुरेपूर भान होते, किंबहुना अगदी नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी ती कृती केली.

त्यानंतर डॉ. आंबेडकरांना बहिष्कृतांचे नेते म्हणून राष्ट्रीय स्तरावर आणि ब्रिटिश सरकारकडेही मान्यता मिळाली, ‘बहिष्कृत भारताचा नायक’ अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी व प्रादेशिक भाषांतील वृत्तपत्रांतूनही बहिष्कृत भारताचा नायक काय म्हणतोय, याची दखल घेतली जाऊ लागली. ‘बहिष्कृत भारत’ या पत्राचे संपादन स्वत: बाबासाहेबांनी करण्याची गरज उरली नाही, त्याचे हे महत्त्वाचे कारण होते. तसेच राष्ट्रीय स्तरावरील कार्याचा वाढलेला व्याप हेही एक कारण होते.

पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना वृत्तपत्रं पुरी पडणार नव्हतीच. अधिक मूलगामी चिंतन व प्रकांड बुद्धिमत्ता असलेल्या बाबासाहेबांना आपले विचार शब्दबद्ध करायला ग्रंथ हेच माध्यम योग्य होते. त्यांनाही ‘पत्रकार’ या बिरुदापेक्षा (किंबहुना सर्वांत जास्त) ‘ग्रंथकार’ हेच बिरुद आवडत होते; पण ‘बहिष्कृत भारताचा नायक’ होण्याची सक्ती परिस्थितीने त्यांना केली आणि त्यासाठी ‘पत्रकारिता’ हे केवळ साधन म्हणून त्यांनी वापरले.

म्हणूनच तर ‘बहिष्कृत भारत’ सर्वोच्च शिखरावर असताना (केवळ अडीच वर्षांनंतर) बाबासाहेबांनी बंद केले आणि ‘जनता’ हे पत्र लगेचच सुरू करून (1930) सहकाऱ्यांच्या हाती सोपवले. त्यामुळे ‘पत्रकार आंबेडकर’ म्हणून त्यांना मानाचा मुजरा कोणी केला नाही, याची खंत बाळगण्याची आवश्यकता नाही.

पण डॉ. आंबेडकरांकडे लढाऊ पत्रकारितेच्याही किती अचाट क्षमता होत्या, हे ‘बहिष्कृत भारत’चे अंक पाहिल्यावर लक्षात येते. त्यांच्या मराठी लेखनातही प्रवाह, जोश, आवेश होता आणि थेट मुद्याला हात घालण्याचे व वाचकांना धरून ठेवण्याचे कसबही होते. काही वेळा तर पाक्षिक अंकाचे 24 रकाने भरून काढण्याचे कामही त्यांनी केले.

भाषेवरील प्रभुत्वाबरोबरच त्यांच्याकडे वादविवादांना तर्कशुद्ध उत्तरे देण्याची आणि अपशब्दांचा वापर न करता कठोर टीका करण्याची क्षमताही होती. ‘उदारमतवाद’ आणि ‘सनदशीर मार्ग’ हा त्यांच्या विचारांचा व कृतिशीलतेचा गाभा होता. म्हणूनच तर ‘रानडे, गांधी आणि जीना’ या आपल्या भाषणात त्यांनी न्या. म.गो.रानडे यांना गौरविले आणि ‘बहिष्कृत भारत’च्या दुसऱ्या वर्षापासूनच्या प्रत्येक अंकात ‘लोकहितवादींची शतपत्रे’ पुनर्मुद्रित केली. त्यांनी पाश्‍चात्त्य तत्त्वज्ञानाचा जेवढा अभ्यास केला होता, तेवढाच मूलगामी अभ्यास हिंदू, ख्रिश्‍चन, मुस्लिम व बौद्ध धर्मांचाही केला होता, याचे प्रतिबिंब ‘बहिष्कृत भारत’ या पाक्षिकाच्या अडीच वर्षांच्या अंकांत पाहायला मिळते. पण त्यांना स्वत:ची प्रतिमा ‘पत्रकार’ अशी निर्माण होऊ द्यायची नव्हती, याचेही दर्शन ‘बहिष्कृत भारत’च्या पानोपानी घडते!

Tags: Mooknayak Bahishkrut Bharat Journalism History Editorial डॉ आंबेडकर मूकनायक बहिष्कृत भारत पत्रकारिता इतिहास संपादकीय Load More Tags

Comments:

Heena

Really nice information

Sudam Gopal Sutar

Nice

Sachin Shinde

Khup Chan aahe ha lekh babasaheb fakt dalitanche nayak mhanun ganale gele pan tyache anek pailu aahet je baher aale pahijet lokana samajale pahijet.

Add Comment